स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट, २०१५ रोजी “प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी
कार्यक्रम” सरकार ने घोषित केला. कौशल्य विकास आणि मेक इन इंडिया ह्या
सरकारच्या योजनांना नजरेसमोर ठेवून
जास्तीत जास्त भारतीय युवकांनी यामध्ये सहभागी व्हावे त्यासाठी त्यांना आवश्यक ते
शिक्षण घेताना आर्थिक मदत मिळावी. अशा उदात्त उद्देशाने नवीन पोर्टल सुरु केले.
गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे त्यांच्या आवडीचे शिक्षण घेताना
आर्थिक अडचणी येऊ नयेत, त्यासाठी त्यांना आर्थिक मदत करू शकणारी ही ऑनलाईन
प्रक्रिया आहे. सरकार कडून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध प्रकारच्या
शिष्यवृत्ती तसेच बँकातर्फे शैक्षणिक कर्ज रूपाने मदत घेण्यात यामुळे सुलभता आणली
गेली आहे. भारत सरकार, अर्थ मंत्रालय,
मानव संसाधन विकास मंत्रालय, उच्चतर
शिक्षा विभाग, भारतीय बँक संघ (Indian Bank’s Association – IBA) आणि NSDL - e governance सर्वांनी मिळून “प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी कार्यक्रम” साठी तयार केलेले पोर्टल आहे www.vidyalakshami.co.in.
NSDL - e governance द्वारा सरकारच्या योजना राबविणे, त्यामध्ये
पारदर्शकता ठेवणे, विविध सुविधा पुरविण्यात येणाऱ्या अडचणींवर मात करणे, योग्य
लाभार्थीनां फायदा मिळवून देणे, संपूर्ण नियंत्रण ठेवणे, समस्या निवारण करणे, अशी
सर्वतोपरी जबाबदारी घेतली जात आहे. जास्त माहितीसाठी www.egov-nsdl.co.in या वेबसाईटला भेट
द्यावी.
वरील पोर्टल वर जाऊन विद्यार्थी आपले संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर देऊन आपले
रजिस्ट्रेशन करून शकतो. भारतीय बँक संघ (IBA) यांनी तयार केलेला सर्व
बँकेचा एकत्रित असा कर्ज अर्ज फॉर्म ( CELAF – Common Education Loan
Application Form) भरायचा असतो. पत्त्याचा दाखला, स्वत:चे आधार कार्ड, आय डी प्रुफ, कॉलेजमध्ये प्रवेश
मिळाच्याची नोंद, पैसे भरल्याची पावती, बँक खाते नंबर अशी माहिती भरायची. आपल्या ग्राहकास जाणा – केवायसी प्रक्रियेच्या
आवश्यकतेनुसार कागदपत्रे स्कॅनकरून पाठवायची असतात. अटींना मान्यता दिल्यावर शिष्यवृतीसह शैक्षणिक कर्ज
उपलब्धता पोर्टल दर्शविते. कर्ज कुठल्या कुठल्या बँकांकडून घेता येते त्या बँकांची
यादी बघायला मिळाल्यावर तीन पर्याय निवडता येतात. प्रत्येक बँकांच्या शैक्षणिक
कर्ज योजनेनुसार पुढील कर्ज प्रकरण कर्ज अर्ज तपासणी व मंजुरी केले जाते.
विद्यार्थ्याने भरलेला अर्ज एनएसडीएल तर्फे त्या त्या बँकेमार्फत ज्या भागात
विद्यार्थी राहत असेल, अथवा त्याने नमूद केलेल्या बँकेच्या विशिष्ट शाखेकडे अर्ज
पाठविला जातो. त्या बँक शाखेच्या CAPS – Credit Automation Processing
System वर सर्व
पाठविल्यावर पुढील प्रक्रियेसाठी अर्जदार विद्यार्थ्याला बँकेत बोलावले जाते. या
पोर्टलवरून कर्ज मिळाल्यास शैक्षणिक कर्जासाठीची
सबसिडी दिली जात नाही. ही विद्यार्थ्याच्या सोयीसाठीची एक खिडकी योजना (singal window) आहे.प्रत्येक बँकेची कर्ज योजना थोड्याफार फरकाने एकसारखी आहे. काही फरक असू
शकतो. ढोबळमानाने पुढील मुद्धे महत्वाचे आहेत. विद्या लक्ष्मी पोर्टलवर न जाता देखील विद्यार्थी डायरेक्ट बँकेत जाऊनही
कर्जप्रकरण करू शकतो. पोर्टल बँकेत जाण्याची
एक उत्कृष्ट सोय आहे.
शिक्षण कुठले कुठे घेणार, प्रवेश मिळाला का? शिक्षणाचा कालावधी,
विद्यार्थ्याची कुवत, आधी मिळालेले मार्क्स, एकूण प्रगती, घरची आर्थिक स्थिती व
इतर असा सर्वतोपरी आढावा घेतला जातो.
कर्जाऊ
रक्कम ठरविताना सर्व प्रकारच्या खर्चाचा अंदाज घेऊन रक्कम ठरवली जाते. सर्व
प्रकारची फी, वह्या, पुस्तके, स्टेशनरी, साहित्य, प्रक्टिकल प्रोजेक्ट साहित्य,
कॉम्प्युटर खरेदी आणि त्या अनुषंगाने लागणारी खरेदी, ग्रंथालय, वसतिगृह प्रवेश फी,
जेवणाखाण्याचा खर्च, राहण्याचा खर्च, मेस बिल, व्यतिरिक्त विद्यार्थ्याला आवश्यक
असलेले इतर खर्च असा सर्वांगाने विचार करून कर्जाऊ रक्कम ठरविली जाते. इतकेच नव्हे
तर विद्यार्थ्याला आवश्यक असेल आणि अंतर जास्त असेल, जायची सोयी नसेल तर दुचाकी खरेदीसाठी देखील काही बँका
कर्ज देतात.
अटी व जबाबदारी :
विद्यार्थ्याने दरवर्षी पास झालेच पाहिजे. पास झाल्यावर मार्कलिस्ट बँकेत देणे
आवश्यक आहे. समजा, जर आजरी असल्याने परीक्षेला बसता आले नाही तर तसे रजिस्टर
डॉक्टरचे सर्टिफिकेट द्यायला पाहिजे. काही चुकीचे कृत्य केल्याने कॉलेजने जर काढून
टाकले, रस्टीकेट केले, पोलीस केस झाली, गंभीर गुन्हा केला तर पुढील कर्ज मिळणे
बरेचदा अशक्य होते. केलेल्या खर्चाच्या, भरलेल्या पैशाच्या सर्व पावत्या बँकेत
द्याव्या लागतात, त्या वेळोवेळी देणे आवश्यक असते. समजा, एखाद्या वर्षी एखादा
दुसरा विषय राहिला आणि एटीकेटी (Allowed to keep term) मिळून पुढील वर्षात
प्रवेश दिला गेला तरीही बँकेत येऊन सांगणे कर्तव्य आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर,
बँकेत येऊन सांगायलाच पाहिजे. पुढे काय करणार ते सांगणे आवश्यक जरी नसले तरी
कर्जाची परतफेड कशी करणार यावर चर्चा बँकेशी करायला लागते. नोकरी लागलेली कळवायचे,
हप्ते सुरु करायचे आणि लवकरात लवकर कर्जफेड करून त्यातून मोकळे होताना आणखीन एका
विद्यार्थ्याला शैक्षणिक कर्ज बँक आता देऊ शकेल याचे समाधान मनी ठेवायचे. समाजाचे
आपण देणे लागतो, तेंव्हा कधीही कुठेही असले तरी दुसऱ्याला शिक्षणासाठी आवश्यक ते
मार्गदर्शन, आर्थिक मदत देखील अशा मुलांनी केली पाहिजे.
कर्ज मंजुरी ::
भारतात शिक्षणासाठी : जास्तीतजास्त १० लाखापर्यंत,
परदेशात शिक्षण घेणार असल्यास २० ते २५ लाखांपर्यंत
मार्जिन ::
कर्जदाराचा सहभाग : ४ लाखापर्यंत – ०%
पुढे – भारतात शिक्षण –
५% ते १०%
परदेशात शिक्षण – १५% ते २०%
कर्जदार ::
विद्यार्थी, सहकर्जदार :: आईवडील, पालक,
रतफेड :: १)
संपूर्ण शिक्षण झाल्यावर सहा महिन्यांनी वा नोकरी लागल्यावर लगेचच.
२) शिक्षण चालू असताना दरमहिन्याला लागणारे व्याज भरल्यास काही बँकांकडून
व्याजदरात ०.०५% सवलत
३)
शिक्षण पूर्ण होई पर्यंत ठराविक दराने दरमहा सरळ व्याज
विद्यार्थिनींना
विशेष सवलत :: ०.०५ ते १ % व्याजदर कमी
सबसिडी :: ४
लाखांपर्यंतच्या कर्ज प्रकरणास काही खात्यांमध्ये सबसिडी देण्यात येते.
परंतू, “प्रधान मंत्री विद्या लक्ष्मी
कार्यक्रम – एनएसडीएल पोर्टल” वर अर्ज नोंदणी
केल्यास सबसिडी मिळत
नाही.
तारण :: बँक ठेवपावत्या, केवायसी, एनएससी, घर-बंगला-फ्याट, सरकार बॉंड,
विद्यार्थ्याचे पालक आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतील तर कर्ज प्रकरणात त्यांना व्याज
उत्पादन योजनेच फायदा घेता येतो. मानव संसाधन विकास मंत्रालय कडून व्यवसाय शिक्षण
प्रशिक्षण यासाठी कर्ज घेता येते. यामधील बरेचसे कोर्सेस अल्प कालावधीसाठी असतात.
६ महिने/१ वर्ष अशा काळात शिक्षण घेऊन नोकरी देखील लागू शकते, अथवा व्यवसाय काढता
येतो.
प्रमुख तारण :: विद्यार्थ्याची गुणवत्ता, प्रामाणिकपणा, चिकाटी, ध्येयाप्रती
निष्ठा, कष्ट, जिद्द, झेप. कर्ज प्रकरण करताना अनेक कागदपत्रे द्यावी लागतात.
त्याचा स्वतंत्र विचार करावा.
सर्व प्रक्रिया चालू असताना आपला अर्ज कुठ पर्यंत आलेला आहे, त्याचा प्रवास
तपासता येतो.
अधिक माहितीसाठी पुढील ठिकाणी संपर्क साधता येतो. मुंबई : फोन नंबर : 022 24994200/ 022 24976351 :: Email ID : vidyalakshami@nsdl.co.in
शिक्षण मग ते कुठलेही असो, दिवसेंदिवस महाग होत चालले आहे. सरकारी योजनांचे
मार्फत अनेकविध शैक्षणिक सवलती देऊ केल्या आहेत. त्याचा फायदा जरूर घ्यावा. शाळा
कॉलेज यांचेकडे सर्व संकलित माहिती मिळते. बँकिंग इंडस्ट्रीद्वारे शिक्षणासाठी
शक्षणिक कर्ज योजना आहे. बहुतांशी सर्वच बँका असे कर्ज देऊन विद्यार्थ्यांचा
आर्थिक बोजा उचलतात, आणि त्याने विद्यार्थी पूर्णवेळ मनलावून अभ्यास करू शकतो. विद्यार्थ्यानेही
विचार करताना कर्जफेडीची जबाबदारी स्वत: स्वीकारण्याची मनासिक तयारी केली पाहिजे.
हे कर्ज तिलाच/ त्यालाच फेडायचे असते. इथे तिलाच म्हणताना मुलींनाही कर्ज घेऊन
शिकवले पाहिजे. हे नमूद करते. मुलींच्या शिक्षणाची आबाळ करू नका. सुकन्या आत्ता
आलेली आहे. आधी त्यांच्यासाठी काही वेगळी सोय केलेली नव्हती. तरी आत्ता ज्या
मुली पदवी पद्वित्तोर शिक्षण घेत आहेत,
घेणार आहेत. त्यांनीही शैक्षणिक कर्ज घ्यायची तयारी ठेवावी. लग्न करून सासरी
गेल्यावर देखील हप्प्ते भरायचेच आहेत मुलींनी. मुली तिकडे सासरी जाऊन सर्वस्व पणाला लावतात त्या घरासाठी, आचार विचार
संस्कार, तन मन धन, कपडे लत्ते पुस्तके वा इतर अनेक गोष्टी घेऊन जातात. एव्हढे सारे नेले मग अ तिने एखाद्या कर्जाचा
हप्ता नेला तर सासरच्या लोकांनीही आरडाओरडा करायचा नाही वा तिला त्रास देता कामा
नये. मुलींनी आपले कर्ज आपणच फेडले पाहिजे. सासरी त्रास होत असेल तर अन्य मार्गही
त्यांच्या विरोधात उपलब्ध आहेत हे देखील मुलींनी लक्षात ठेवावे. बायका ऐकतात
म्हणून त्यांना त्रास दिला जातो. तीच दुर्गा व्हायला वेळ लागू देऊ नका. स्वत:ला कमी
लेखू नका, खंबीर बना, शिकलेल्या मुलींनो, फक्त डिग्री नाही घेतली तर कणखरपणाही
घ्या. इथे मानसिकता बदलली पाहिजे समाजाची. बरेच काही लिहिता येईल. इथे इतकेच बास.
अतिशय महत्वाची पोर्टल माहिती वर दिलेलीच आहे. इतरही अनेक गोष्टी जाणून घेणे
हिताचेच आहे. शिक्षणासाठी
लागणाऱ्या पैशाच्या सोयीचे अनेकविध मार्ग आहेत. शैक्षणिक क्षेत्रात अनेक उलाढल्या
होतात आणि सामान्यांना त्याची कल्पना नसते. छोटे मोठे कोर्सेस, पदवी शिक्षण सुरु
केले जाते, यांना शासकीय मान्यता आहे किंवा नाही याची पडताळणी प्रवेश घेताना केली
जात नाही. ठराविक संस्थांच्या विद्यार्थ्यांना कर्ज मंजुरी मिळते किंवा नाही याचा
अंदाज प्रवेश घेण्यापूर्वी घेतलेला नसतो, आणि मग बँकांकडून कर्ज मिळत नाही.
अशावेळी बँकेत जाऊन आधीच चौकशी करणे आवश्यक. शिवाय दर दोनचार वर्षांनी प्रवेश प्रक्रियेत
अनेकविध बदल होताना दिसतात. त्यासाठी पालक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक तत्वे,
पद्धती, प्रवेश प्रक्रिया, अडचणी सोडविण्यासाठी आयोजित केलेली व्याख्याने जरूर
ऐकावीत. त्यातून बरेच काही समजते.
किमान दहावी पर्यंतचे शालेय शिक्षण
तर घ्यायलाच पाहिजे. समाज शिक्षित करण्यासाठी सरकारी योजनांद्वारा बऱ्याच गोष्टी
अमलात आणल्या जातात. फी माफी, वह्या पुस्तके, शैक्षणिक सीडीज, शैक्षणिक साहित्य,
शालेय गणवेश, मधल्या सुट्टीतील आहार, शैक्षणिक संस्थांचा दर्जाही उंचवण्यासाठी
समुपदेशन, मार्गदर्शन, संगणक शिक्षण याद्वारे प्रयत्न केले जात आहेत. तरीदेखील
तेवढेही शिक्षण न घेता अर्धवट टाकून घरी बसणारी मुले-मुली मोठ्या प्रमाणावर
दिसतात. शालेय शिक्षणानंतर दहावीच्या यशावर थोडेफार अवलंबून पुढील बारावीची वाट
आखली जाते. कला, वाणीज्य, शास्त्र, व्यवसायाभिमुख वा इतर तत्सम शैक्षणिक कोर्से या
सर्वात विद्यार्थी विभागले जातात. बारावी
नंतरचे शिक्षण शाखांनुसार बदलत असते. ते वैविध्यपूर्ण, सूक्ष्म अभ्याक्रमाचे महत्वाचे शिक्षण असते. ते शेवटास
नेणे जिकीरीचे असल्याने विद्यार्थ्याने जाणीवपूर्वक ध्येय डोळ्यापुढे ठेवून यशस्वी
वाटचाल शेवटपर्यंत करणे अतिशय महत्वाचे
असते. परिस्थितीला शरण न जाता उलट दोन हात करावयाची तयारी असेल तर यशाचा मार्ग
रोखता येत नाही. लढणाऱ्याला या मार्गावर
अनेक वाटाडे भेटतात, जे हा मार्ग सुकर करण्यासाठी मदत करतात, यासाठी समाजातील
धडपड्या यशस्वी लोकांचा आदर्श समोर ठेवावा
आणि सर्व ताकदीनिशी लढावे.
आपल्या पाल्याच्या शिक्षणाची आर्थिक तरतूद काही सुज्ञ पालक करतच असतात.
जन्मापासून वाढत्या वयातील वेगवेगळ्या शैक्षणिक टप्प्यांनुसार परिपक्व होणाऱ्या
ठेव पावत्या, आवर्ती जमा खाती, पोस्टातील नियमित गुंतवणूक, वाढदिवसाच्या
निमित्ताने आकडा वाढवीत केलेली NSC
(National Savings Certificate) खरेदी, म्युच्युअल फंड, SIP( Systematic
Investment Plan) , उत्तम परतावा देणाऱ्या कंपनी
ठेवी, सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी गुंतवणूक या सर्वांचा विचार करावा. अतिशय
महत्वाचे म्हणजे नव्याने २०१५ साली सुरु केली गेलेली खास मुलींच्या शिक्षणासाठीची
योजना सुकन्या समृद्धी योजनेमध्ये मुलींसाठी केलेली गुंतवणूक. ही तर प्रत्येक
पालकाने आपल्या लाडक्या कन्येच्या शिक्षणाची सोय करायला सर्वोत्तम अशी योजना
असल्याने तिला तसाच उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हे महिला जगतसाठी सुचिन्ह आहे. तसेच,
वयानुसार उच्च शिक्षणाच्या वेळी परतावा घेता येईल अशा विमा योजनाही आहेत. तसेच खास
शैक्षणिक योजना, Child Plan म्युत्युअल फंड, असेही सुरु केलेले आहेत. बाजारात नवनवीन योजना येतच आहेत. हे
सर्व काही तरतूद करू इच्छिणाऱ्या पालकांसाठी आहे.
जिथे हातातोंडाची मिळवणी करता करता नाकेनऊ येतात, तिथे शिक्षणासाठी पैसा बाजूला
टाकणे अवघड असते. तरीही अनेक पालक पोटाला चिमटे घेऊन मुलांना शिकवितात. मुले काय
शिकतात, कसे वागतात, शिक्षणाचा दर्जा काय, त्यातून खरोखरीच मुलांचा विकास होतो का, कि केवळ
पैसा वर्षे वाया घालवून पास हा शिक्कामोर्तब केला जातो. बरेचदा असेच दिसते.
नुकतेच एका बी.कॉम झालेल्या मुलाला “महाराष्ट्र” शब्द इंग्रजीमध्ये लिहिता आला
नाही. मराठीत देखील खूप विचार करून लिहांवा लागला. शाळा कॉलेज करून त्याला काय
मिळाले. विषय वेगळा आहे, पण अतिशय महत्वाचा आहे. या शिक्षणाला अर्थ नाही. त्याचा
परिणाम असा होतो की अशांना नोकऱ्या मिळत नाही, व्यवसाय करायची धमक नाही. खरे पाहता
देशात सध्या प्रत्येक क्षेत्रात मनुष्यबळ हवे आहे. पण, डोक्याला डोके ठेवून कामे
करणारे हात, आणि विचार करणारे डोके मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात
नोकऱ्या असूनही हवी तशी माणसे मिळत नाहीत. इथे शिक्षणाचा दर्जा वेगळा विषय ओघाने
आलाच. तो विद्यार्थी कुठेही शिक्षण घेत असो, प्रत्येक विद्यार्थ्याने स्वत: उत्तम
अभ्यास केला तरच तुमचे व्यक्तिमत्व घडणार
आहे याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. नुसता पुस्तकी किडा नको, व्यवहारात त्याची उपयोगिता,
त्याच्या अनुषंगाने येणारे विषय, संगणकीय वापर हातोटी, आणि आपले विचार, आचार,
मानसिकता, सकारात्मकता आणि माणूसपण या सर्वांची जो वृद्धी करेल त्याला आकाश ठेंगणे
होईल, उत्तुंग यश आयुष्यात मिळविता येईल
इतक्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. ठरवले तर सोने करता येते, नाहीतर आहेच
गटारात हातपाय मारणे.
शिक्षणाचे फायदे, महत्व समाजातील
सर्व स्तरांतील लोकांना पटू लागले आहे. शिक्षणाने व्यक्तीमध्ये आमुलाग्र बदल घडू
शकतो असा विश्वास वाढला आणि आपल्या मुलामुलींना शिकवणाऱ्या पालकांचे प्रमाण वाढीस
लागले. लहानपणापासूनच विद्यार्जनाचे संस्कार रुजवण्यास सुरवात होते. प्रत्येक
घरातले वातावरण पोषक असेलच असे नाही. ते तसे असो वा नसो, विद्यार्थ्याने
स्वत:उभारी घेऊन जिद्दीने, दृढनिश्चयपूर्वक शिक्षण घेतले पाहिजे. कष्टाला पर्याय
नाही हे लक्षात ठेवावे. शिक्षणासंदर्भात पालकांची मानसिकता, दृष्टीकोण,
प्रोत्साहन, मुलामुलींमध्ये सकारात्मक बदल घडवतात. हवे ते शिक्षण, हव्या त्या
शैक्षणिक संस्थेत घ्यावयास मिळणे अवघड होत
आहे. संसारात ओढाताण करून इकडून-तिकडून पैसा गोळा करून मुलांना शिकवणारे पालक
मोठ्या संख्येने आढळतात. मुलगी हुशार असली तरी तिच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले
जाते. शैक्षणिक कर्ज घेऊन मुलींना शिकवणारे
पालक तर फारच थोडे. मुलगा वा मुलगी दोघानाही समान शिक्षणसंधी देणे पालकांचे
कर्तव्य आहे.
शिक्षणामध्ये प्रचंड वैविध्य आहे, त्यांची यादी देण्यात काही अर्थ नाही. जसे
पुस्तकी ज्ञान असते, तसे कृतिशीलता वाढविण्यासाठी कौशल्य वृद्धीचे शिक्षणही घेतले
जाते. कौशल्यवर्धन करणे म्हणजेच एखादा विशिष्ट प्रकल्प वा काम वा जबाबदारी पार पाडताना
अंगी असाव्या असलेल्या आवश्यक गुणांची जोपासना करून गुणवत्ता वाढविणे होय. त्याचे
जोरावर काम करून पूर्णत्वास नेणे. ह्याचे
शिक्षण देण्यासाठी तर मोदी सरकारने प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना काढली आहे.
त्याचा फायदा तरुणाईने घेतला पाहिजे.
शिवाय मुलांना पालकांच्या कष्टाची कितपत जाण असते हाही प्रश्न वेगळा असला तरी
शिक्षणाशी निगडीत आहे हेच मुलांच्या लक्षात नसते. आम्हाला जन्म दिला ना मग त्यांनी
आमचे सर्व केलेच पाहिजे, असे उद्गार काढणार्यांना काय म्हणावे? विचार करा आणि
मानवी मुल्ये जपणूक सर्वश्रेष्ठ पदी ठेवूनच काय शिकायचे ते शिका. शिवाय पालकांनी
मुलांचे फालतू लाड करू नयेत. मुले त्यांने बिघडतात. मोठ्यांचा धाक, आदर, कर्तव्य
महत्वाच्या गोष्टी सांभाळणे सगळ्यांचेच कर्तव्य आहे. नुसत्या केवळ डिग्र्या मिळवून शिक्षण घेऊन आयुष्य सुखी होत नाहीत. आणि
सध्याच्या परिस्थितीत डिग्र्या घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. साधारणपणे जुने ते ऑगस्ट सर्वच
शाळा कॉलेजेस यांचे नवीन शैक्षणिक वर्ष देशभर सुरु होते. पुढील वर्षात जाताना
प्रत्येक विद्यार्थी आनंदाने पाऊल टाकतो. त्याचवेळी पुढील जबाबदारीची जाणीवही असते
बरोबर. त्याच्या सर्व जाणिवांना सकारात्मकतेच्या धाग्याने बांधून घेताना कस लागतो
विद्यार्थ्याच्या संस्कार समृद्धीचा. आपल्याकडे आर्थिक विषय स्वतंत्ररित्या
शाळांमधून शिकविला जात नाही. मुलांना
पैशाचे ज्ञान आजूबाजूच्या वातावरणातून, घरातून, मोठ्यांच्या वागणुकीतून,
घरोघरीच्या देवाणघेवाणीतून होत असते.
त्यात भर पडलेली आहे मीडियाची, खऱ्या खोट्या बातम्यांची, आकर्षित करणाऱ्या
जाहिरातींची, नवीननवीन उपकरणांची, त्यांच्या वापराची आणि मग मुलांचा पाय तिकडे
वळायला वेळ लागत नाही. आणि मानवींमुल्यांची पायमल्ली कधी केली जाते याचे भानही
राहत नाही., खरं तर हेच वय असते सकस सात्विक आयुष्याची घडण स्वत:च्या मनात रोवायची.
तसेच पैशासह अनेक गोष्टींचे ज्ञान आत्मसात करण्याची. व्यक्तिमत्व विकासात
संस्कारांची भूमिका अहम असते. माणसाच्या जीवनात अर्थसंस्कार महत्वाचे असतात. इथेच माणूस घडतो.
थोडेसे अधिक बोलावे असे वाटते.
देशोन्नती वर्तमानपत्रात विद्यालक्ष्मी योजनेची माहिती मी दिली होती. विद्यार्थी,
पालक यांचे फोन आले. त्यात, अनेक तरुण मुलांनी विचारलेले प्रश्न मला अस्वथ करणारे होते.
कुठे चालली आमची पुढची पिढी? या प्रश्नाने मला वेगळ्या प्रकारे लिहिते केले. इथे पुढच्या
पिढीची मानसिकता, त्यांची नकारात्मकता अत्यंत महत्वाची वाटली. “मल्या, निरव मोदी
गेले ना पळून, चुना लावून, मग, आम्हीच का कर्ज फेडायचे?” “कर्ज माफ करायला काय
जाते?” “शेतकऱ्यांची कर्ज माफ होतात, मग आमची का नाही.” “काय करेल बँक? नाही आम्ही
कर्ज फेडले तर?” “बघू, काय करतात बँकेतले. मी पण बघून घेईन त्यांच्याकडे.” अगदी
अशा शब्दात मला विचारणा केली गेली. काहींना बँकेचा अनुभव चांगला नाही, नकार
देण्यात आला. बँकेने स्पष्ट सांगितले की, “शैक्षणिक कर्ज मुलं फेडत नाही, बँकेला
त्याचा त्रास होतो. आम्ही देत नाही.” तेही खरंच आहे. नुकतीच बातमी वाचली होती
एनपीए झालेल्या एज्युकेशनल लोन खात्यांची. काही मुलांनी कर्ज फेड केली नाही, आई
वडिलांनी पोटाला चिमटा घेऊन कर्जफेड केली. मुलाने शिक्षण सोडून दिले, ऐकत नाही,
पैसे उडवले, अशाही गोष्टी कानावर आल्या. एकंदरीत शिक्षणिक कर्जाची ऐशी की तैशी.
पालक तर अगदीच वैतागून गेले होते. त्याचेही काही दाखले देते. “कर्ज काढून
शिकवायचं पण अभ्यास करीतच नाही तो. त्याला काहीच वाटतं नाही. त्यापेक्षा केलं असतं
काहीतरी काम, निदान भाजीची गाडीतरी सांभाळली असती घराची.” “काय सांगू ताई, त्याला
शिकायचं नाही. आमची परिस्थिती बरी आहे. शिकला तर खर्च करू, पण ते नको त्याला. गाडी
तेव्हढी पाहिजे. माझी मोटर सायकल घेऊन जातो, मस्ती करतो मित्रांसंग, पोरी फिरवतो,
रातच्याला कधी बी येतो, दारू प्यायला तर लागलाच हाय, पण, आणखीन काहीतरी चुकीचे
धंदे करतो. आमच्या घरात इतकं बिघडलेले हे पहिलचं दिवट.” “त्याने केला अभ्यास,
शिकला, आता कर्ज फेड म्हणतो तर नाय फेडणार बोलला. तुम्ही फेडा. आमच्याच्याने नाही
होणार ते. एक दिवस तर धावून आला अंगावर.” “कुठून त्याला बँकेने कर्ज दिलं असं
वाटतं बघा. इतका माज आलाय त्याला. अभ्यास तर नाहीच. फुशारक्या मारीत गावभर हिंडतो.
लोकांना वाटतं लई छान. खरं आम्हालाच ठावूक” काहींनी स्वत: काहीतरी सोय करून
मुलांची कर्जफेड केली. याची जाणीव मुलांनी ठेवायला नको का? आईवडिलांना किती त्रास
द्यायचा? शिक्षणाची आर्थिक सोय झाली
तर नीट अभ्यास करून नंतर कर्जफेडीची
जबाबदारी मुलांनी घ्यायलाच हवी. त्यासाठी पालकांना वेठीस धरू नये, त्यांच्यावर
कर्जफेडीचा आपला भार कमवते झाल्यावर तरी टाकू नये. फक्त आठवावे, आईवडिलांनी
आपल्यासाठी काय केले आणि मी काय करीत आहे.
तेंव्हा त्यांना परिस्थितीची जाणीव करून द्यावी असे वाटले मला. त्यावरही
लिहिते थोडेसे. “कोणाचे करावे भले, तर तो म्हणतो माझेच खरे”. आला असेल आपणासही असा
अनुभव कधीतरी. मलाही इथे देखील आला, मुलांच्या हिताचे लिहिले, तर मलाच काय काय
सुनावले. वैयक्तिक, समाजाचे दृष्टीने, देशासाठी देखील अशी विचार सरणी चांगली
नाहीच. भयानक चित्र सामोरे आले. विद्यार्थ्यांनी मानसिकता बदल केला पाहिजे. अन्यथा, मुलांनाच त्रास होईल या विचाराने
लिहित आहे. दुसर्याने सरी घातली, आपल्याकडे नाही म्हणून आपण गळ्यात दोरी बांधत
नाही. एकाने शेण खाल्ले, म्हणून आपण खायचे का? चुकीचा मार्ग आहे तर त्यावरून जायचे
कशाला? आपल्याच हाताने पायावर धोंडा मारणे म्हणता येईल यास.
अनेकांच्या बाबतीत, शैक्षणिक कर्ज हे आयुष्यात घेतलेले पहिले बँक कर्ज प्रकरण
असते. पहिलेच कर्जफेड जर केली गेली नाही, तर पुढे कर्ज मिळविताना नक्कीच अडचणी
येणार आहेत. प्रत्येकाचा क्रेडीट स्कोर, ती व्यक्ती कशाप्रकारे कर्जफेड करते, करते
किंवा नाही, वेळेत खाते बंद केले गेले का? कुठल्या बँकेची ती व्यक्ती दोषी आहे,
डिफॉल्टर आहे याची नोंद घेतली जाते. इथेच भविष्यातले बँकेकडून कर्जरूपाने मदत
घेण्याचे मार्ग बंद होतात. एकदा का कर्जफेड नीट केली नाही तर पुढे कर्ज का म्हणून बँकेने द्यावे. मागील काही
वर्षापासून कर्ज घेताना त्याचा, त्याच्या पालकांचा देखील क्रेडीट स्कोर म्हणजे
आधीची केलेली कर्जफेड पद्धत बघितली जाते. सगळ्या गोष्टी संगणकात एका ठिकाणी नोंदलेल्या
असतात. त्या बघूनच पुढे कर्ज दिले जाते. इथे पहिल्यांदाच जर वाईट नोंदी असतील तर
कधीही कर्ज मंजुरी होणार नाही. आत्ताच, काही जणांना बँकेने स्पष्ट सांगितले की
मुले कर्जफेड करीत नाहीत. योजना जरी चांगली असली तरी बँकेला अनुभव चांगला येत नाही
म्हणून आम्ही शैक्षणिक कर्ज देणे थांबविले आहे. आता बोला, बँकांनी काय करायचे?
खूप काही लिहिता येईल यावर, बास. इतके पुरे. मुले सुज्ञपणे यावर विचार करतील,
वागतील, आपली कर्जफेड आपल्या उत्पन्नातून करतील. आपले कुटुंब, समाज, देश, याप्रती
कर्तव्य पार पडावे. आपले खाते अनुत्पादित कर्जखाते होणार नाही याची जबाबदारी कर्ज
घेणाऱ्याची असते. विद्यार्थ्याचा शोध घेऊन कुठे नोकरी लागली हे शोधणे बँकेला अवघड
नाही. व्यवसाय असेल तरी शोध घेणे सोपे आहे, हेही लक्षात ठेवावे. नव्या नोकरीच्या
ठिकाणी होणारी मानहानी, नाचक्की याचाही विचार करा. आत्ता कदाचित गद्धेपंचविशीत असे
वागणे योग्य आनंद देणारे, मजा करायचे वाटते. त्याचे पडसाद आयुष्यभर झेलायला लागू
नयेत म्हणून अशा विद्यार्थ्यांना हेही इथे कळकळीने सांगण्यात येत आहे.
वरील गोष्टी विस्तृत लिहल्या कारण त्याची गरज समाजाला आहे. याउलट शैक्षणिक
कर्ज घेऊन उत्तम शिक्षण घेणारे, बँकेत येऊन पेढे वाटणारे, कर्ज लवकर फेडणारे, ‘हीच
बँक माझी इथून पुढे’ असे म्हणणारे, पुढेही त्याच बँकेकडून विविध प्रकारे म्हणजे
घर,वाहन, उद्योग, पर्यटन, वा इतर कशाही साठी कर्ज घेऊन कायम नियमित फेडणारे असे
इतरांना आदर्शवत अनेक कर्जदार बँकेत नेहमी येतात. त्याचे उदाहरण इतरांनी समोर
ठेवावे आणि आपल्यात बदल करावा. हेच इथे जाताना सांगते आणि सर्वांना पुढील
शिक्षणासाठी, सुसंस्कारित भारतीय नागरिक होण्यासाठी शुभेच्छा देते आणि थांबते.
वंदना धर्माधिकारी
M : 9890623915