86.
28-11-2018
नामांकन, मृत्युपत्र आणि त्याची
अंमलबजावणी
अथश्री : मार्गदर्शनपर माहिती आणि
मार्गदर्शन
वक्ती : सौ.वंदना विजय धर्माधिकारी
कायद्याने किती जरी आपले आयुष्य आखीव रेखीव करायची सोय केलेली असली तरी देखील
काही शब्द, संकल्पना मनाला टोचतात. अशा विषयात लक्ष घालून करायची तयारी लवकर होत
नाही. मन हळवं होत, आणि आजचे उद्यावर ढकलले जाते. मृत्युपत्राचे बाबतीत असेच होते.
नामांकन सहजगत्या केले जाते. परंतु इच्छापत्र करताना सर्व गोष्टींचा आढावा घ्यायचा
म्हंटल्यावर एक तर ते वेळ खाऊ कष्टाचे वाटते, शिवाय मला थोडंच आत्ता फायदा आहे
त्याचा. असे म्हणून त्यापासून दूर राहण्याचा अनेकांचा कल असतो. त्यासाठी खास मनावर
गोष्ट घेणे आवश्यक असते. शिवाय अनेक शंकाकुशंका डोकावीत असतात. असाच विचार करून
अथश्री येथील सौ.विद्या पंढरपुरे यांनी माझे लेक्चर ठरविले, आणि मी तासाभरात
मार्गदर्शन केले.
नामांकन आता बँकेत तरी सक्तीचे असल्याने अनेकांनी केलेले असते. नामांकन केले
की आपली जबाबदारी संपली. आता त्या पैशांची वाटणी नीट केली गेली असा गोड गैरसमज
अनेकांचा असतो. ते तसे नसते. यावर थोडेसे बोलले असेन. नामांकानापेक्षा मृत्युपत्र
अधिक वरचढ असते. त्यातील नोंदी महत्वाच्या असतात आणि ते फायनल असते. ते करताना
मात्र अनेकांना अवघड जाते, कसे करू, कोणाला काय देऊ? नीट होईल ना? आणि त्याने मनात
गुंतलेले धागे सोडविताना अवघड जाते हे खरे. मृत्युपत्र शब्दाचीच दहशत मनात
असल्याने त्याकडे कानाडोळा करावासा वाटते. जे व्हायचे ते होईल, मी थोडीच असणार ते
बघायला असाही विचार करणारे अनेक असतात.
असे असले तरीही मृत्युपत्र करणे ही देखील प्रत्येकाची आपल्या पुढच्या
पिढीप्रती जबाबदारी असते. ती निभावली पाहिजे, याची जाणीव मात्र पुरेशी नसते.
जाणिवेची टोके बोथट असतात, हेच खरे. पुढच्या पिढीत भावंडांच्यात वादावादी, भांडणे,
कटुता, अबोला होऊन नातेसंबंध बिघडू नयेत. त्यांचे एकमेकांकडे जाणेयेणे असावे,
एकोपा रहावा, प्रेमाने सगळ्यांनी राहावे. या सदिच्छेने मृत्युपत्र करायला पाहिजे.
त्यासाठीची माहिती भाषणातून मी दिली.
तसेच यासाठी बँकांची मदत कशा प्रकारे घेतली जाते. एक्झिक्युटर आणि ट्रस्टी सेवेबद्दल लोकांना
फारसे माहित नसते. तेही समजून सांगितले. काही माहिती पत्रके दिली. बरं वाटले मला
की अथश्री सारख्या सोसायटीमध्ये, की जिथे फक्त ज्येष्ठ नागरिक राहतात अशा ठिकाणी
मी त्यांना थोडीफार माहिती मी दिली. भावनिकदृष्ट्या थोडासा आधार दिला. बास....
इतकेच.
वंदना धर्माधिकारी
No comments:
Post a Comment