|
सुधारित अकरावी आवृत्ती, प्रकाशक : सकाळ
प्रकाशन,पुणे.२५,एप्रिल,२०१८,पृष्ठे २१० किंमत रु.२८०.-
दैनंदिन बँकिंगची सुलभ आणि उपयुक्त माहिती एकाच ठिकाणी
मराठी भाषेत ज्यांना हवी आहे त्यांना वंदना धर्माधिकारी लिखित ‘मैत्री बँकिंगशी’ या
पुस्तकाच्या सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या सुधारित अकराव्या आवृत्तीशिवाय
पर्याय नाही. आजकाल सर्वसामान्य शिक्षित आणि सुशिक्षित मराठीजन,ज्ञानभाषा म्हणून केवळ इंग्रजी हीच एकमेव भाषा असल्याची ओरड करतात त्यांना वंदना धर्माधिकारी लेखित‘मैत्री बँकिंगशी’ हे बँकिंगविषयीची
जिज्ञासा भागविणारे सुलभ आणि माहितीपूर्ण पुस्तकरुपी उत्तर आहे. गेल्या सात वर्षांत निघालेल्या विक्रमी अकरा आवृत्या ही ‘मैत्री बँकिंगशी’ पुस्तकाच्या यशाची सर्व थरातील वाचकांनी
दिलेली पावती आहे. जनसामान्यांचे बँकेंविषयीचे अज्ञान दूर व्हावे, बँकिंग साक्षरता वाढावी, बँक
व्यवहारांचे आकलन व्हावे, सुलभरित्या मातृभाषेत बँक व्यवहाराबद्दल प्राथमिक आणि
सखोल माहिती मिळावी यासाठी स्वत: अनुभवी सेवानिवृत्त बँक अधिकारी असल्याने लेखिकेने
अतिशय उत्तमरितीने उपयुक्त आणि मार्गदर्शक माहिती बँक ग्राहकांपर्यंत पोहोचविली
आहे.प्रचलित प्राथमिक ते महाविद्यालयीन
अभ्यासक्रमात पुरेसा ऊहापोह नसलेल्या बँकिंग सारख्या व्यवहारातील अविभाज्य अंग
बनलेल्या विषयाची ओघवत्या शैलीतील वाचनीय, आकलनास सुलभ आणि नेमकी माहिती देणार्या लेखिकेच्या लेखनकौशल्याला दाद द्यावी तेव्हढी थोडीच.
‘मैत्री बँकिंगशी’ या पुस्तकाच्या मराठीतील अकरा आवृत्यांच्या प्रकाशनाबरोबर हिंदी,
गुजराती आणि ब्रेल लिपीत झालेले या पुस्तकाचे भाषांतर/रूपांतर त्यातील माहिती चोखंदळ
बँक ग्राहकांच्या आणि वाचकांच्या पूर्णपणे पसंतीला उतरल्याची साक्ष देते. विशेष
असे की मैत्री बँकिंगशी पुस्तकाच्या स्वतंत्र अशा आवृत्त्या तीन बँकांनी खरेदी
केल्या आहेत. दोन बँकांनी या पुस्तकावर सर्व स्टाफची परीक्षा घेतली आहे, हे तर
नक्कीच विशेष.
अनेक बँकांनी शेकड्याने मैत्री बँकिंगशीच्या प्रती खरेदी करून अनेकांना
पुस्तकभेट दिलेली आहे. लेखिकेने विकसनशील भारताच्या ग्रामीण, अर्धनागरी आणि नागरी
भागांत पसरलेल्या बँकांच्या जाळ्याचा विचार करुन जनसामान्यांना बँकांशिवाय जगणे
आणि आर्थिक व्यवहार करणे शक्य नाही याचा विचार करुन या पुस्तकात अमुल्य मार्गदर्शन
केले आहे. पारंपरिक बँकिंगसोबत प्लॅस्टिक मनी, कॅशलेस, इंटरनेट, इलेक्ट्रॉनिक बँकिंगचे
अनेक प्रकार आता जनसामान्यांना हाताळावे लागत आहेत. व्यवहारांची सुलभतेने ओळख करुन
देण्याचे काम आणि अधिकचे कौशल्य आत्मसात करण्याची संधी ‘मैत्री बँकिंगशी’
पुस्तक करुन देते.लेखिकेने नागरिकांच्या बँकिंग विषयांच्या समस्येवर सांगोपांग उत्तरे
शोधण्याच्या तळमळीतून स्वानुभवातून मिळविलेल्या ज्ञानावर आधारित बँकिंग
विषयाची उपयुक्त माहिती सुलभ आणि सोप्या भाषेत सामान्य माणसापर्यंत पोहोचविली आहे. मराठी भाषिक बँक ग्राहकांसाठी आणि अन्य वाचकांना बँकिंगविषयी विस्तृत माहिती
एकाच ठिकाणी असलेले असे हे दर्जेदार पुस्तक आहे.‘मैत्री
बँकिंगशी’या पुस्तकाच्या रुपाने मराठीत बँक व्यवहारांसंबंधीच्या माहितीची
मौलिक भर पडली आहे हे
निश्चित.
लेखिकेने
आपली भूमिका स्पष्ट करताना सर्वसामान्यांसह बँकिंग परिचितांना समोर
ठेवून सर्वांना रुचेल अश्या सुबोध,
सोप्या, सुटसुटीत आणि
नेमका अर्थ व्यक्त करणार्या तरीही भाषेचा उच्च स्तर राखण्याचा समतोल साधला आहे.
बँकिंग विषयाची माहिती
देताना केवळ बुद्धिमत्तेचे व व्यासंगाचे प्रदर्शन न करता गेल्या तीन चार वर्षातील नोटाबंदी, नकदी
व्यवहारांना प्रोत्साहन, वस्तू व सेवा कर याविषयांची सुगम माहिती सादर केल्याने नव्याने
झालेले सर्व बदलांचे ज्ञान, त्याबद्दलच्या
शंकाकुशंकांचे समर्थन इथे होते. प्रचलित बँकिंगमधील काही संबोधनपरशब्द मराठीत आणि इंग्रजीत तसेच मराठीत अर्थासह दिलेले आहेत. पर्याय उपलब्ध नाही तिथे स्पष्टीकरणात्मक
टिपा देऊन माहिती वाचकाला समजेल यावर भर दिला आहे. शेवटच्या प्रकरणात ४०० बँकिंग संक्षेप रूपे
विस्तारासह दोनतीन वाक्यात समजून दिलेली आहेत, त्याचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच
होईल. कुठेही असे सापडलेले नाही. प्रत्येकाच्या संग्रही पुस्तक हवेचं असे म्हणावेसे वाटते.
गेल्या काही वर्षातील सरकार पुरस्कृत अनेक समाजोपयोगी
योजनांचा समावेश पुस्तकात केला असल्याने वाचकांस नवीन बँकिंग बदलांचा आणि कार्यप्रणालींचा
परिचय होतो. संबंधीत माहिती संकलित करताना लेखिकेने अभ्यासपूर्वक निरीक्षणे, तज्ज्ञांशी
सल्लामसत करून अद्यतन माहिती अंतर्भूत केली असल्याचे प्रकर्षाने जाणवते. भारतातील
बँकांचे प्रकार, कार्यशैली, आरबीआय, अनिवासी भारतीय, ठेवींचे प्रकार, तसेच पीपीएफ,
सारे काही आहेच. शिवाय कर्जाची मानसिकता, आवश्यकता, विविधता, सुविधा, प्रकार, फरक,
देताना लहानापासून ते ज्येष्ठ नागरिकांना लागणाऱ्या सर्व कर्ज योजना पुस्तकात समजून दिल्याने कर्ज
घ्यायलाच पाहिजे अशीच भावना होईल. \ नामांकन सुविधा,सुरक्षित ठेव कक्ष, वित्तीय समावेशन, जन-धन योजना, मृत्युपत्र,
प्लास्टिक मनी, इंटरनेट बँकिंग, निधी हस्तांतरणाच्या सुविधा, असा सर्वतोपरी
ग्राहकोपयोगी माहितीचा भरणा खच्चून पुस्तकात आहे. वाचकांना सहजपणे बँकसुविधांचा लाभ
घेणे शक्य होऊ शकते. वाचक बँकिंग पारंगत होऊ शकतो.
भारतीय चलन-रुपया प्रकरणात रुपयाबद्दल उद्बोधक आणि उपयुक्त माहिती दिली आहे.चलनी
नाणीं आणि नोटांची विशद केलेली वैशिष्ट्यपूर्ण
माहिती वाचकाच्या ज्ञानात भर घालणारी आहे. दैनंदिन आर्थिक व्यवहारांच्या सक्षम पूर्ततेसाठी
प्रचलित आधुनिक मार्ग, भेडसावणार्या अडचणीं, आवश्यक काळजी यांचा यथोचित आवश्यक उल्लेख आहे. त्याचबरोबर
सरकारतर्फे तळागाळातील नागरिकांना देशाच्या प्रमुख अर्थप्रवाहात सामावून
घेण्यासाठी सुरु केलेल्या अनेकविध उपक्रमांची
ओळख पुस्तकांत करुन देण्यात आली आहे. वाचकांनी पुस्तक काळजीपूर्वक वाचल्यास मोबाइल
पेमेंट, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिटकार्ड वापर, कॅशलेस व्यवहारासाठी आवश्यक विविध अॅप्स कशी हाताळावीत याची माहिती देखील
वाचकांना सापडेल. त्याने समज वाढेल, ज्ञान मिळेल, आपोआप दर्जा सुधारेल.
समाजातील सर्व वर्गांच्या बँकिंग गरजांचा
विचार करताना महिला बचत गट, जेष्ठ नागरिक,
विद्यार्थी, दिव्यांग व्यक्ति , छोटे-मोठे उद्योजक, शेतकरी, स्वयंसहायता बचत गट
यासारख्या सर्वसमावेशक समाज घटकांना मार्गदर्शक ठरेल अशा माहितीची तजवीज प्रस्तुत
पुस्तकात लेखिकेने केली आहे. लेखिकेने सहकार क्षेत्राबद्दल लक्षवेधक आणि
माहितीपूर्ण लेखन केले आहे. ग्रामीण, अर्धनागरी आणि नागरी भागातील सहकारी बँकांना
या लेखनाचा खचितच उपयोग होईल. बँकिंग स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासणे परीक्षार्थीना
उपयुक्त आहे.
लेखिका वंदना धर्माधिकारी यांची बँकिंग विषयाची एकूण 9
पुस्तके प्रसिध्द झाली आहेत.‘मैत्री बँकिंगशी’ पुस्तकाच्या ‘मित्रता बँकिंग से’ हिंदीतील पुस्तकास महाराष्ट्र
सरकारतर्फे मामा वरेरकर( 25 हजार रोख)
पुरस्काराने गौरविले आहे. तसेच केंद्र सरकारच्या राजभाषा विभागाने याच पुस्तकास एक
लाख रुपयांचा पुरस्कार दिला आहे. ‘बँकिंग मैत्री’ गुजराती आवृत्तीची खरेदी गुजरात
फेडरेशन, आणि गुजरात सरकार कडून मोठ्या प्रमाणात केलेली आहे. तसेच ‘ब्रेल रुपांतर’
केल्याने बँकांत काम करणाऱ्या, येऊ इच्छीणाऱ्या व इतर सर्व दृष्टिहीन वर्गाला
प्रचंड दिलासा मिळाला आहे. या पुस्तकासह
ब्रेल रीडरवर एकूण ६ पुस्तके आहेत. याच लेखणीला माण देशी बँकेने मोठी दाद दिली,
आणि वंदनाताईंकडून तीन पुस्तके बँकेच्या खासगी वितरणासाठी लिहून घेतली. माण देशी
फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्रभर ग्रामीण
महिलांना बँकिंग शिकविले जाते, आणि तिथे ही पुस्तके भेट म्हणून दिली जातात.
मी हे पुस्तक हल्लीच वाचले. पुस्तक वाचताना मला ते पृष्ठागणिक माहितीपूर्ण आणि उत्तम
वाटले.मी आवडीने वाचलेल्या काही मोजक्या पुस्तकांत ‘मैत्री बँकिंगशी’ हे पुस्तक मला वैशिष्ट्यपूर्ण वाटले आणि म्हणूनच त्याचे
परिक्षण आपणास सादर करीत आहे.लेखिका वंदना
धर्माधिकारी यांचे‘मैत्री बँकिंगशी’ या पुस्तकाच्या अकराव्या आवृत्तीच्या यशाच्या निमित्ताने
हार्दिक अभिनंदन करताना त्यांच्या पुढील लिखाणास शुभेच्छा देतो.
सकाळ प्रकाशन, पुणे - 020
2440567 :: 8888849050 ::
sakalprakashan@esakal,com
विश्वासराव पालेकर
A/12,पपली को.ऑ.हा.सो.लि.,गुप्ते रोड,जोशी नगर, डोंबिवली(पश्चिम)
421202.
अल्पावधित ११ वी आवृत्ती ही मोठी मजल आहे. पुस्तक अतिशय उत्तम मार्गदर्शक आहे. बँकिंग क्षेत्रातले दिग्गज मंडळी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. खूप अभिनंदन.
ReplyDeleteहोय. कधी वाटलं नव्हतं की अशा आवृत्त्यावर आवृत्त्या निघतील माझ्या पुस्तकांच्या. खूप दिग्गज माणसांनी वाखाणले आहे मैत्री बँकिंगशी. त्यामुळे सहज ते मुद्दाम वेळ काढून पुस्तक प्रकाशनाला आले. लेखणीचे भाग्य माझ्या... धन्यवाद!
ReplyDelete