Thursday, November 8, 2018

41. Diwali 2018 - Dhamal masti - मनीचा पराक्रम

धमाल मस्ती : दिवाळी अंक : २०१८
कथा : मनीचा पराक्रम
लेखिका  ::  सौ. वंदना विजय धर्माधिकारी

घरात हॉलभर  अनेक रंगांच्या लोकारींचे गुंडे अस्ताव्यस्त पडलेले होते. जसे लोकरीचे तुकडे तशीच  दोऱ्याची रिळे भारंभार. पेन्सिली त्याही सहासात होत्याच, शिवाय शार्पनर, कात्री, मणी असा लवाजमा घेऊन जयाश्रीचे काम सुरु होते. रंगीबेरंगी डब्यात तयार झालेली फुले ठेवली होती. जयश्री मावशी झाली होती ना. म्हणून बाळासाठी  छान छान काहीतरी करीत होती. नक्कीच. तिला खूप आवडत असलं काहीतरी करायला. पुढच्याच रविवारी बारसं बाळाचं, मग नको का तयार करायला भरभर. तेच तर चालू होतं. आईने मस्त सिफॉनची कुंची केली होती, शिवाय मॅचिंग मोजे, झबले देखील तयार होते.  जमतील तशी त्यावर फुले लावायची असं जयश्रीने ठरवलं आणि लागली कामाला. होते तेव्हढे सगळे रंग पसरलेले ते याचसाठी.

जोरात बेल वाजली. “दादा आलाच.” म्हणतं पटकन उडी मारून जयश्री दाराकडे धावली. इतक्यात बेलचा आवाज ऐकून मनी धावत आली. धावता धावता मधेच थांबली. काय ते कोणालाच कळले नाही. मनीने दादाला पाहून सोफ्यावर उडी घेतली. मनीकडे दोघांचही लक्ष नव्हतं.  प्रकाशच्या हातात होत्या हरभऱ्याच्या जुड्या. एक नाही, दोन नाही चक्क तीनतीन.  

“धर ना पटकन.” म्हणून हरभरा त्याने जयश्रीच्या हातावर ठेवला आणि तो लगेच निघाला.

“आता कुठे चाललास?” जयश्रीने दादाला विचारले.

“अगं थांबा ना. माझी पुस्तके कॅरियरला तशीच आहेत. मी आलोचं घेऊन.”’

असं म्हणतं प्रकाश धावत गेला, तसाच पटकन वर आला. हातात पुस्तके आणि सायकलची किल्ली. थोडेच लगेच जागेवर ठेवतात या गोष्टी? दिल्या भिरकावून खुर्चीवर आणि पळाला स्वयंपाकघरात.  

“तू तीन तीन गड्या आणल्यास हरभऱ्याच्या.” असं म्हणतं पटकन जयुच्या  तोंडात गेला देखील.

“अगं, आपण सोलून ठेवू यात. आई त्याची उसळ करेल. मला खूप आवडते.”

“मला पण.” जयुने पक्यादादाच्या हातावर टाळी दिली.

सकाळ पासून न भेटलेले बहिण भाऊ हरभरा समोर ठेवून त्याचा फडश्या पाडू लागले. बाहेर रेडीओ गात होता, कोणी बघत नव्हते, तरीपण टूरटूर टीव्ही सुरूच होता. 

खाता खाता टेबलावर नजर गेली आणि पक्यादा ओरडला जयश्रीला, “अगं, किती खातेस सारखी. सोललेले बघ किती कमी ते. उसळ करायची म्हंटल ना मी. आता बास खाणं. फक्त सोलायचे.” असे म्हणून पक्यादाने आपल्या तोंडात मात्र चार दाणे टाकले.



तोपर्यंत मनी माऊ किती वेळा इकडून तिकडे गेली, हे काही दोघाच्या लक्षात आलेच नाही. मनीनेही आवाज केला नव्हता, आणि केला असला तरी हरभरे खाणाऱ्यांच्या लक्षात आला नाही. शिवाय हॉलमध्ये टीव्ही सुरूच असल्यावर कशी काय “म्यांव! म्यांव!!” ऐकू येणार?

दुपारची वेळ होती, जेवण करून आई जरा पडली होती आतल्या खोलीत. पक्यादा आणि जयश्री  दोघांची जुंपली होती हरभऱ्याच्या  घाट्यांबरोबर.

तेव्हढ्यात! टण! टण! करीत भांडे लोळत कुठेतरी गेलेच.  सकाळी शेजारचे नंदुकाका आले होते, त्यांना पाणी दिलं ते तांब्याभांड तसेच हॉलमध्ये टीपॉयवर राहिले होते. मनीने ते दिलं ढकलून. टण! टण!! टण!!!

काय झालं? बघायला जयश्री आली तोच, “ये मने, काय केलंस हे, माझी......”

खरं तर, जयूला रडायलाच यायला लागलं. एकाजागी बसून ती फुल करीत होती. पक्यादा आला तेंव्हा बाल्कनीतून मनीने आत उडी मारलेली जयूला कळलं होतं. मनीने सगळी लोकर इकडून तिकडे उड्या मारीतमारीत घरभर केली होती. त्याचे वेढे पडले होते सगळ्यांना. पार बाल्कनी पासून हॉलच्या दरवाज्यापर्यंत. ज्या काही वस्तू तिच्या वाटेत आल्या त्या सगळ्यांना प्रदक्षिणा घालून लोकरीने  गुंडाळून घेतले होते मनीने.

जयुचे ओरडणे, मनिवर खेकसणे ऐकताच जयश्रीचा पक्यादादा बाहेर हॉलमध्ये आला. एकूण  अवतार पाहून “ये हे काय???” जोरजोरात हसायला लागला.  मनी बसली होती कोपऱ्यात आणि जयू कमरेवर हात देऊन डोळे वटारून मनीकडे बघत होती.

‘मनीला वाटल, पक्यादा तरी येईल माझ्या मदतीला. तिने अपेक्षेने पक्यादा कडे बघितलं. तसा दादा आला पुढे तर त्याचाच पाय अडकला लोकरीच्या धाग्यात. अलगद सोडवून घेतला त्यानं.

पक्यादाने खुर्चीखाली लपलेल्या की अडकलेल्या मनीला बाहेर काढलं. पाहतो तर काय तिच्या पायात धागा अडकलेला होता. तो काढाणार तरी कसा, लोकरीचे सगळे धागे, दोऱ्याची रीळ आणि दोरे सारे काही मनीच्या शेपटीला आणि पोटाला पूर्णपणे गुंडाळले गेले होते. मनीची  आवळलेली शेपटी पाहताच जयुने  एकदम फक्कन फस्स केले.  दोघांना गंमत वाटली, तिकडे मनी अधिकच कावरी बावरी झाली.

“पोटात दुखत असेल तिच्या बहुतेक” पक्याची लाडली ना ती, लगेच तिच्या बाजूने झाला.

“कसं केलंय बघ माझं सगळं तिने, दोन धपाटे घाल आधी तिला.” संताप आलेलाच होता.

“थांब, हिला सोडवतो गं आधी. ये मनाली माझी.”




“अगं, मनुटले धीटूकले. काय केलंस तू? कसं गं तुला कळतं नाही? अडकली लोकरीत आणि नाचलीस घरभर. आता कसे काढायचे हे धागे, किती गुंता केलास त्यांचा. शेपटी बघितलीस का रंगीबेरंगी दोऱ्यांनी सजलेली?” पक्या गुंत्याचे काय करावे याचा शोध घेता घेता मनीला धीर देत होता.

“दादा थांब. मी मनुलीचा असाच फोटो काढते. आणि घराचा देखील. बघा ना कसं केलंय तिने.”

“मस्त विणलंय जाळं. आता तुझं काम झालं.” दादाने जयश्रीला डिवचले.

“जाळं कसलं? नुसता गुंता करून ठेवलाय. जाळं एकसारखं असतं समजलं.  इथे बघा, काय झालं. खुर्चीला दिला वेढा, तिथून एकदम सोप्यावर, तिथे गुंडाळले कुशन. समजेना काय करायचं तर पळाली बाल्कनीत. जाताना गुंडाळला पेपर. खिडकीतून फिरली आत. बाहेर जाताना एका चौकोनातून गेली आणि येताना बयाबाई दुसरीकडून आली. हे बघ, कशी फिरली लोकर कुठून कुठे.  आत येताना पाडला डबा, सांडली माझी सगळी फुलं.”

जयू आधी धावली फुलांकडे. तिने किती कष्टाने केली होती फुलं. पेन्सिलीला मागून एक छोटासा छेद द्यायचा. सुईत लोकरीच्याचं रंगाचा दोरा ओवून दुपदरी गाठ बांधायची. दोरा अडकवायचा पेन्सिलच्या चिरेत. सुई धरायची पेन्सिलीवर. दुसऱ्या हातात लोकर धरून पेन्सिलीवर वेढे घालायचे. लोकरीने गोल गोल गोल ८/१० वेढे झाले की सुई पुढे ओढायची आणि मागे अडकवलेला धागा काढायचा. त्याच्या गाठीतून सुई ओवायची  आणि दोरा ओढायचा की सगळे वेढे बांधले जातात. पेन्सिल मधून सगळं काढलं बाहेर. सुरगाठ नंतर निरगाठ घट्ट बांधायची. हाताने लोकर मस्त फुलवायची. झालं फुलं तयार तेही सुंदर छान छान!

आईला अजून चाहूल लागलेली नसणार, नाहीतर आलीच असती आई बाहेर मदतीला. काही झालं की ते सोडवायला आई लागतेच ना मुलांना. तशीच इथे लगेच आईची आठवण आली. दोघेही शहाणी मुलं होणार होती, असं नुकतेच ठरवले होते दोघांनी. आधी आपण प्रयत्न करायचाच, तोही नेहमीच असेच काहीतरी होते दोघांचे. तेही मागल्या महिन्यापासून. म्हणून आईला उठवायला लगेच गेले नाहीत.

कसचं काय? घरात नुसता पसारा आणि हरभऱ्याचा केर. टेबल भरलेलं ठेवलं तसचं. दोघेही लागले लोकर गुंडाळायला. संपूर्ण गुंडा संपे पर्यंत मनीने उड्या मारून मारून हॉलभर आपला पराक्रम पसरवला होता. बरं तर बरं, ती कोपऱ्यातल्या टी-पॉय कडे गेली नाही. नाहीतर त्यावरची आईने नुकतीच आणलेली फुलदाणी पडली असती, तर मनीची कंबख्ती झाली असती.

“आणि बरं झालं तांब्यात पाणी नव्हतं नाहीतर, दादाच्या वहीचे काय झाले असते? आणि माझी  लोकर  ओली झाली असती तर?” जयश्रीचे निरीक्षण चालले होते.




मनी घाबरलेली दिसतं होती. तिच्या पायात अडकलेली  लोकर अलगद काढायला पक्यादा तिच्या जवळ  गेला तर...”उं! उं!!” करीत मनी रडायला लागली. तिची शेपूट ओढली जात होती. जयुने पटकन कात्री आणली.

“कपू का शेपूट तुझी. उडवलीस ना शेपटी घरभर. थांब आता.” एकीकडे फुलांची नासाडी आणि दुसरीकडे ते करणारी आपलीच मनी.

हळूच शेपटीवर गुंडाळलेली लोकर कापली. धागा केला मोकळा. मनीने पटकन उडी मारली. खरं, तर पटकन तिने बाहेर पळायला हवे होते. पण, कसलं काय? दोन पावलं पुढे गेली तर तिला लाल लोकरीचा धागा दिसला तशी मनुली झटकन मागे वळली आणि दादाच्या मांडीवर बसली. दोघांना हसायला आलं ‘ये मनू’ त्यानेही बसवलं तिला.

इतक्यात आई आलीच. बघते तर काहीतरी वेगळंच. खुणेनेच जयश्रीने मनीचे नाव सांगितले, तर, आई हसायला लागली. रागावली नाही तिच्यावर.

“काय गं बाई काय केलेस हे? बरं झालं. झोपताना मी माझं शिवणकाम उचललं होतं ते.” असं म्हणतं आई फुलं गोळा करायला लागली, तशी मनी आईच्या पायात गोलगोल करू लागली. तिला सांगायचं होतं, की आईकडून माया माया घ्यायची होती. हेच खरं, लागलं होतं ना शेपटीला, आईने फुंगर मारली की मनीचाही बाऊ बरा होतो म्हणूनच आली आईकडे.

आईने उचललं आणि बसली सोफ्यावर, तशी मनी आणखीनच बिलगून बसली, अगदी कुशीत आणि मान वर करून सांगू लागली आईला. मनी तशी सगळ्यांचीच लाडकी होती. तिने दुध प्यायल्याशिवाय पक्यादा आणि जयू दोघेही दुध पीत नसतं.

जरा शांत केलं लाडोबाला आणि तिला घेऊनच आई स्वयंपाकघरात आली. मनीला दुध दिलं. आणि आपल्यासाठी चहा ठेवला. जयु आणि पकादा दोघेही आले आईच्या मागेमागे.

“आई, आज उसळ करायची.” पकादाने ऑर्डर सोडली

“करते. आधी दुध घ्या बरं दोघे. मनीने बघा, आज तुमची वाट नाही बघितली. गट्टम करून टाकलं.”
आई असं म्हणाली तर लगेच मनी उडी मारून परत आईच्या खुर्चीवर चढली. एकाबाजूला जयू दुसरीकडे दादा आणि मनी मधेच आईच्या मांडीवर. पण, हलली नाही, डोलली नाही, पोटात दुध गेलं होतं ना. आणि आईचा चहा सांडला तर खरंच धपाटा मिळतो हे मनीला ठावूक होतं.  म्हणून तर एकदम चिडीचूप डोळे मिटून बसली.






मनी खूप खूप दमली होती. आईच्या मांडीवर तिचा चहा पिऊन व्हायच्या आत मनीने मान टाकली. लगेच झोप लागली तिला. आईची मांडी कुणाला आवडणार नाही तिथे झोपायला? प्रकाश आणि जयश्री आत्ता थोडे मोठे झाले म्हणून, नाहीतर मनीला आईची मांडी भांडून मिळायची. कधी कधी तर आईच्या मांडीवर दोघेजण आणि त्यांचा मांडीवर मनुडी. पण, आज दमलेली मनी एकटीच होती. आईने तिला थोपटून झोपवलं शेजारच्या खुर्चीवर. आणि धमाली मनीने तंगड्या ताणल्या की. मनीला हळूच एक चापट दिली जयश्रीने आणि पाळली फुलांकडे. प्रकाश मात्र तिथेच हरभरा सोलायला लागला. सोलता सोलता आईची आणि त्याची गप्पांची मैफल रंगली. आईने सांगितली गोष्ट, कुठली माहित आहे? ‘आजीची मनीने केलेली फजिती.’ विणलेला अर्धवट स्वेटर असाच एका मनीने उसवून टाकला होता ती. माहित आहे की नाही तुम्हाला, नाहीतर परत कधीतरी मीच सांगेन ती गोष्ट.



वंदना धर्माधिकारी
M : 9890623915









12 comments:

Camera is a responsive/adaptive slideshow. Try to resize the browser window
It uses a light version of jQuery mobile, navigate the slides by swiping with your fingers
It's completely free (even though a donation is appreciated)
Camera slideshow provides many options to customize your project as more as possible

Here is a video for National Webinar on IBPS Exam. Guidance by Smt.Vandana Dharmadhikari on 17th July, 2020 

vandanadharmadhikari.blogspot.com