Wednesday, November 7, 2018

40. Diwali 2018 - Rangatdar - चला भेळ खायला

रंगतदार बाळ साहित्य दिवाळी अंक – 2018
कथा :: चला, भेळ खायला.
सौ.वंदना विजय धर्माधिकारी



रेखाताईची दहावीची परीक्षा झाली आणि तिचे सगळे मित्रमैत्रिणी संध्याकाळी भेळ खायला गेले. घरी आल्यावर जेवायला सुट्टी दिली. इतर सगळे जेवत होते. भेळेतले एकेक पिंटूच्या पानात नाचत होते, पण हाती काही केल्या येत नव्हते. पोळी एकीकडे तर हात दुसरीकडे. आवडीची भेंडीची भाजी, हात दुसरीकडे शोधात होता काहीतरी.

“काय चालले तुझे पराग? हात कुठे जातोय? डोळे मिटून घेतले कि काय?” बाबांनी विचारले.

“ मला भेळ खायची. एकट्याने नाही. सगळे मित्र मैत्रिणींच्या बरोबर. ताई सारखी.” परागने मागणी केलीचं.

“ इतकेच ना. उद्या दुपारी. तुला देखील सुट्टी लागली आहेच. बोलवं सगळ्यांना. आपण मस्त भेळपार्टी करू. मागच्या अंगणात करायची. मी सगळं देईन. काय? आता जेवा पटापट.” आईनेच भेळ पार्टी ठरवली म्हणजे नक्कीच मस्त मस्त होणार.

“आई, मला शिकशील उद्या भेळ करायला.” रेखला उत्साह आला.

“ तुझी मदत हवीच मला. सकाळी घेऊन येऊ सामान. काय? एक मुलगा खूष.”     

सगळी चिल्लीपिल्ली गोळा झाली परागच्या घरी. सकाळीच परागने बोलावलेले. उन्हे ओसरली तशी मुले धावली अंगणात. काही ठरवले नव्हते तरी प्रत्येकाने काही ना काहीतरी आणलेच. मोठी परात ठेवली मध्ये आणि ओतले की त्यात. चुरमुरे, फरसाण, खारेदाणे, खारीबुंडी, कैरी, कांदा, शेव, कोथिंबीर. चुमुकल्या हातांनी कालवली. तेव्हढ्यात आईने मुलांना हाक मारली. सगळे घरात पळाले. पाहतात तो काय परागच्या आईने केव्हढी तयारी केलेली.... उचललं एकेक आणि आले पळत बाहेर. सगळं एकदम ओतलं. सांडल बाहेर. निनादने मुठभर भेळ उंच उडवली. त्याने उडवली, काहींनी तोंडात कोंबली, मग उडवली.

त्यांना काय माहित, वरून कोणीतरी बघतं होते ते. अंगणभर भेळचं भेळ! वर बसलेले आले खाली. पटापटा टिपले, उडाले वर, आले खाली, उडाले वर! खुपचं मज्जा वाटली. तशी पोटंही भरत आली होती.

थोडी मोठी ढमाली लीना म्हणाली, “आपण गंमत करू, घरात जाऊ. पक्षांची गंमत बघू.”



बापरे! सगळी मुले  उठली, आत पाळली. चिवचिवाट अंगणात. मुलांच्या आवाजापेक्षा जोरात. इकडून आले, तिकडून आले, काही तर पलीकडून आले, जोरात आले, खाली धावले, दुडक्या पायांवर उड्या मारीत मारीत टिपायला लागले. अंगण झाडून साफ तर केलेच लगेच एका मिनिटात. भरलेली परात होतीच, झेपावले त्यात, आलेले उडाले, चार जणांना घेऊन आले. त्यांचा आवाज चार गल्लीच्या पलीकडे गेला आणि धाड पडली परातीवर.

टाळ्यांनी केले पक्षांचे स्वागत, उड्यांनी केला मोठा जल्लोष, आई आली आतून बाहेर. बघते तो काय, पक्षांचीच शाळा सुटलेली आणि अंगणात सगळे मस्त मज्जेत. निनादचा चेहरा पडला. त्याने नव्हती खाल्ली खूप खूप ढेरपोटभर भेळ. आईच्या नजरेनं टिपलं.

रेखाताई आली, “ व्वाव... बाहेर कोणी जायचं नाही. थांबा.” आणि पाळली आत.  जशी गेली तशी आली. हातात काय होतं....भेळ! भेळ!!

“होय...” एकचं आवाज, गलका घरातही. पक्षांनी मात्र घरात आजीबात बघितलं नाही. सगळे दंग झालेले  परातीत. सगळ्यांनी त्यावर ताव मारला.... आत बसलेल्यांची पोटे भरली, आणि बाहेर पक्षांची देखील. फरक काय झाला सांगू. तुम्हाला येईल का तरी ओळखायला? नाहीच मुळी. मीच सांगते.
‘अंगण होते सफी साफ. आणि आतमात्र सगळीकडे भेळेचा सडा, कुठे पांढरा, कुठे पिवळा, कोथिंबीरीची हिरवा हिरवा.’

पुढे सरसावली रेखाताई, तिच्या शेजारी धमाली लीना. ठेवले कंबरेवर हात आणि दिले फर्मान, “ बघा बरं बाहेर. काय होते तिथे आत्ता.”

रेखाताईने समजावलं “किती चाटून पुसून खाल्ली भेळ पक्षांनी. नाहीतर आपण, ते बघा अगदी सोफ्यावर बसून कोणी सांडली. खुर्ची खाली उडाली. खिडकीत, सगळ्या घरभर. आवरायचं, सांडलेल गोळा करायचं.”

सोनाली झाली चिमणी, उड्या मारीत चुरमुरे वेचले. निनाद झाला कावळा करू लागला कावकाव, गोळा केले त्याने दाणे फक्त. लीनाला ढकललं ताईने तिने घेतला सोफ्याचा ताबा. पटकन घर सफी साफ.  
मुले आली अंगणात, बघितले वर!!!! तर---. काय... गमाडीगंमत !

सगळे पक्षी झाडावर मुलांची वाट बघत होते. मुलांनी मारल्या उड्या, वाजवल्या टाळ्या, उंच हात करून बोलावले पक्षांना. ते तरी काय कमी की काय! त्यांनी घेतली झेप खाली. फिरले गोलगोल. मुलांच्या भोवती. चिवचिव, कावकाव, कून..कून... आईने पटकन काढला फोटो.

बघायचा तुम्हाला.....

वंदना धर्माधिकारी
M : 9890623915


Tuesday, November 6, 2018

37. Punyacha abhiman - पुण्याचा अभिमान







“अलका बापूराव भोमे, १९७६ साली आले मी सासरी
विजयची मी वंदना आडनाव धर्माधिकारी
आहो,... सगळंच माझं पुण्यात, आहे मी पक्की पुणेरी
आपला देश, भाषा, संस्कृती याप्रती स्वाभिमान माझ्या उरी”

माझ्याच कवितेच्या या ओळींचा प्रत्यय मला वेगळ्याप्रकारे करून देण्यात आला. मी पुणेकर तर आहेच, त्याचा स्वीकार पुण्याने केला आणि पुण्याचा अभिमान सन्मान मला मिळाला.

“पुण्याचा अभिमान : ज्येष्ठोत्सव २०१८ : मा.सौ.वंदना धर्माधिकारी”

मला तर पुण्याचा अभिमान आहेच.  पुणे शहर हीच कर्मभूमी. मी स्वत: पक्की नारायणपेठी पुणेकर आहे. ज्या पुण्यात माझे आयुष्य गेले त्या शहराची एक विशेष संस्कृती आहे, तीच माझी आहे. त्याच पुण्यातील आमदारांकडून “पुण्याचा अभिमान” असे गौरवचिन्ह स्वीकारताना मला खूप आनंद झाला, समाधान वाटले. पुणेकरांना, पुणे शहरालाही माझा अभिमान आहे, हे माझ्या लक्षात आणून दिले गेले. "पुण्याचा अभिमान" हा सन्मान  मिळाला. समाजिक न्याय
(महाराष्ट्र शासन), आमदार मेधाताई कुलकर्णी, आणि अॅस्कॉप यांचे तर्फे आयोजित ज्येष्ठोत्सव -२०१८ कार्यक्रमाचे सुंदर आयोजन १ ऑक्टोबर, २०१८ रोजी शुभारंभ लॉंन्सवर केले होते. पुण्यातील विशेष कार्य केलेल्या अनेक पुणेकरांना  "पुण्याचा अभिमान" सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात मलाही हाचं सन्मान मिळाला. 

"मला पुण्याचा अभिमान आणि मी पुण्याचा अभिमान"

माननीय मंत्री राजकुमार बडोले, आणि आमदार मेधाताई कुलकर्णी, यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. त्यांचे खूपखूप आभार मानते..                     

आणि... मुख्य म्हणजे मला ही जाणिव करून दिल्याबद्दल विशेष धन्यवाद!

आणि म्हणूनचं मी खूष आहे!!

वंदना धर्माधिकारी                           
मी पुणेकर
१ ऑक्टोबर, २०१८, सोमवार
शुभारंभ लॉंन्स. डी.पी.रोड, एरंडवणे, पुणे.

Friday, October 26, 2018

93. Deshonnati 70 article - Nomination baarkave

93. Deshonnati 70 article - Nomination baarkave




नामांकनाचे (Nomination) महत्व,  कसे, कोणाच्या नावे करायचे, म्हणजे नमिती (Nominee) कोण? याची माहिती मागील लेखात घेतली आहे. बरेचदा वारसदार हाच नमिती असतो. आपल्या पश्चात आपली संपत्ती ही आपल्या पुढच्या पिढीकडे द्यायची असते, ती तिकडेच गेली पाहिजे, असे जरी नसले तरी बहुतांशी तसे होते.  त्यामुळे वारसदारांचे नावाने नामांकन करण्यात येते. याला अपवाद असतात. आपल्या संस्कृतीत वर जाताना  पुढच्या पिढीसाठी काहीतरी ठेवून जायची पद्धत, कृती, विचार, पिढ्यानपिढ्या  चालत आलेले आहेत. त्याला आपण वडिलोपार्जित संपत्ती म्हणतो.

सर्व प्रकारच्या मालमत्तेचे नामांकन करता येते. तसे करणे सगळ्यांच्या हिताचे असते. बँका, पोस्ट ऑफिस, म्युच्युअल फंड, शेअर्स, डीमॅट खाते, रोखे, घर, जमीन जुमला, सर्वांचे नामांकन करता येते. उपलब्ध नामांकन सुविधेचा फायदा घ्यावा. नमिती अज्ञान बालक असल्यावर (वय जर १८ वर्षापेक्षा कमी) असेल तर अधिक काळजी घ्यावी लागते. कारण १८ वर्षाखालील व्यक्ती आर्थिक व्यवहार पूर्णत: करायला सक्षम समजली जात नाही, त्यास अज्ञानी, लहान(Minor) समजले जाते.  अशावेळी नामितीचे नाव,वय,जन्मतारीख द्यावी लागते. शिवाय, तो/ती नमिती व्यक्ती सज्ञान होईस्तोवरच्या कालावधीत बालकाच्या वतीने व्यवहार बघणाऱ्या जबाबदार व्यक्तीचे नाव, पत्ता, आणि नाते नमूद करावे लागते. कारण, त्या त्या व्यक्तीच्या मृत्युनंतर नामितीची भूमिका असते. अशावेळी विश्वासू व्यक्तीवर  पुढची जबाबदारी टाकली जाते. त्या व्यक्तीस त्याची कल्पना द्यावी.

बँकेत ठेव पावतीची मुदत संपल्यावर आपोआप नूतनीकरण (Auto Renewal) होते. अशावेळी पावतीचे आधी केलेले नामांकन तसेच अबाधित राहते. ते बदलत नाही. एकाच खात्यात अनेक ठेव पावत्यांपैकी एका ठेव पावतीस एक नमिती असे करून प्रत्येक ठेव पावतीचे नामांकन वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने करता येते. नामांकन कितीही वेळा बदलता येते. नवीन नामांकन आधी केलेले नामांकन आपोआप रद्द करते. एका डायरीत कुठल्या पावतीला कोण नमिती आहे, यांची  व्यवस्थित नोंद करावी. आणि सर्व काही घरातील एखाद्या विश्वासू जबाबदार व्यक्तीस सांगून ठेवावे. कारण त्यानुसारचे सोपस्कार हे भविष्यात खातेदाराच्या मृत्युनंतरचे सोपस्कार असल्याने त्यावरील कारवाई करतेवेळी खातेदार जिवंतच नसणार. अगदी बारकाईने सांगायची देखील गरज नसते. पण, किमान ‘माझे काही कमीजास्त झाले तर मी या डायरीत सगळं नमूद केलेले आहे. सगळ्या नोंदी बघा, आणि करा.” इतके मुलांना, जवळच्या माणसाला सांगायला काहीच हरकत नसावी.

घरातल्या कोणाचाही मृत्यू झाल्यास घराच्यांनी त्याच्या बँकेत कळवावे. ग्रामपंचायत, म्युनिसिपालिटी, कोर्पोरेशन, यांच्याकडून मृत्यू दाखला मिळतो. याही गोष्टी आता संगणकावर नोंदविल्या जात असल्याने त्यासही वेळ लागत नाही. सर्वच कामे सर्वत्र भराभर होऊ लागलेली आहेत. मृत्यू दाखल्याची झेरोक्स प्रत बँकेत द्यावी. मूळ प्रत कुठेही देऊ नये. ती फक्त बरोबर नेऊन बँकेत दाखवावी लागते. मृत व्यक्तीच्या खात्या संदर्भात काही पूर्तता करावी लागते. क्लेम फॉर्म भरावा लागतो. नमिती जेंव्हा खातेदाराचे मृत्युनंतर बँकेत ठेव पावती घेऊन जातो तेंव्हा त्याला स्वत:ची ओळख पटवावी लागते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे, पॅन कार्ड, आधार कार्ड घेऊन जावे लागते. प्रक्रिया पूर्ण करून ठेव पावतीचे मुदत संपण्यापूर्वी रोखिकरण (Before maturity encashment) करण्यात येते. बँकेच्या नियमांनुसार पावतीचे पैसे नामितीच्या खात्यात जमा होतात. .  

नामितीस पैसे जरी दिले तरी तो त्याचा हक्कदार बनत नाही. वारसदारांचा त्या रकमेवरील हक्क अबाधित राहतो. त्यावर वारसदार आपला हक्क प्रस्थापित करतात आणि ‘नामितीस रक्कम देऊ नये’ असे बँकेस सांगू लागतात. महत्वाचे असे की नामितीची जबाबदारी पैसे बँकेकडून काढून घेऊन वारसदारांच्या स्वाधीन करणे अशी असते.  बरेचदा तो ही एक वारसदार असतो. त्याने पुढाकार घेऊन गेलेल्याच्या इच्छेचा मान  राखण्यासाठी  इतर सर्वांना एकत्र करून वादावादी भांडणे न करता सामंजस्याने पैशाची वाटणी करावी, त्यासाठी प्रयत्न करावेत. असे आहे. पण, बरेचदा समस्या उद्भवतात. त्यावरही उपाय आहे.


वंदना धर्माधिकारी

Tuesday, October 16, 2018

39. Facebook page - Nukkad - न लिहिलेली पत्रे - तू




न लिहिलेली पत्रे :: नुक्कड :: बुक हंगामा :: यावर प्रसिद्ध झालेले – शनिवार १३.१०.२०१७.
........ तू,
एक पुढे, एक मागे... त्याला ओलांडून पुढे जाताना  ना चढाओढ, ना ढकलाढकली, ना स्पर्धा, ना दुस्वास. सगळीकडे असेच असते. कोणाचेही असो, मुंगीपासून हत्तीपर्यंत, किंवा अवाढव्य डायनोसॉर पर्यत. एकचं पद्धत आखून दिलेली त्या नियंत्याने. तिचे पालन इतके काटेकोरपणे सारे करतात. आश्चर्य आहे ना.....
ते असते एक संचलन, तालासुरातले, बदलत्या गतीचे आणि मनही डोलत असतं आतल्या आत... नाही दिसलं म्हणून काय झालं?  आपले मातीशी नाते सांगत सांगत पुढे पुढे जाताना कुठेतरी बाक येतोच. तो यायलाच हवा, ताठरता सोडली  तरचं पुढंच नजरेत येईल, त्याला पकडायचा मोह होणारचं आपसूक. इतकं सुंदर सभोवताली असताना गप्प का कोणी बसेल. सोडला ताठपणा आणि घेतली धाव, तर बिघडलं कुठे? नाही.. नक्कीच नाही! ते तर हवेच, नाहीतर गोळा पडून राहणार की काय घरातल्या खबदाडात? उर्जा हवीच शरीराला आणि मनालाही. सोडलाच तो ताठा. माहित असलं तरीसुद्धा नेहमी नाही जमतं असा ताठा विरघळून टाकायला. मलाही नाही, आणि तुलाही नाही जमणार. समजलं मी काय म्हणते ते तुला.... तसं अवघड नाही रे, तुझ्यातर लक्षात यायला हवं..... इतकं काय विचार करतोस तू... मी तुझ्या माझ्या पायांच सांगते. बघं.. एकटं चाल नाहीतर माझा हात हातात घेऊन चाल.. एकाच तालासुरात हलतात पाय. एक वाकतो तेंव्हा दुसरा ताठ होतो. लगेच ताठ झालेला वाकतो आणि आधीचा वाकलेला ताठ होतो. बघ चार पावले चालून लगेच... किती सोपं असतं चालणं, जमिनीवरून.

वाकलाच  ना तुझा पाय कुठेतरी. त्यामुळे तर आपण जातो कुठच्या कुठे? हे असं रिदमिक असलं की कापलेलं अंतर उमजतं नाही, लांब पल्ला गाठता येतो सहजगत्या. आणि बरोबर कोणी असेल साथीला तर.... असाही विचार आलाच बघं माझ्या मनात. तुलाही आवडणार असेच कोणाचा तरी हात धरून भराभरा पाऊले उचलायला. तिथे नसते ना चढाओढ, आधी कोण याचा हट्ट...म्हणा दोन्ही तुझेच पाय असतात म्हणूनही नसेल. पण, मी तुझी नाही की काय? निदान कागदोपत्री, पत्रिकेत आणि त्या सही शिक्यानिशी सरकार दरबारी रुजू केलेल्या कागदावर आहेच ना मी तुझी. मग, इथे का करतोस इतकी चढाओढ, मारामारी, अवहेलना, शर्यत, तुझं माझं? का उठते तुझ्या पोटात कळ, बळावते पोटदुखी?

जळणाऱ्या तुझा असा डाव खेळताना संगतीला हातही येतात आपसूक, सर्व ताकदीने उगारलेले, त्याच पायात जोरही भरतोस लगेच आणि उठवतोस माझ्या  गालावर आपली पाच बोटे. काहीचं कसं वाटतं नाही याचे वाईट वाटते, आश्चर्यही डोकावते. मी फक्त तुझ्यापुढे गेलेली असते, इतकाच काय तो माझा गुन्हा असतो. बाकी काही काहीही बिघडलेले नसते संसारात आपल्या. तुझा अहं, फुसका पोकळ लुच्चा इगो दुखावला जातो. तुला नाही जमले ते मी लीलया केले, तेंव्हा तुझा भडकला पोटशूळ. खरं तर.... अभिमान वाटायला हवा होता तुला माझा. कौतुकाचा वर्षाव माझ्यावर इतर सर्वांनी केला, कदाचित मी त्यांची नव्हते म्हणूनही असेल भडीमार अभिनंदनाचा.  तुझा एक शिडकावा हवा होता. पण, नाही दिलास. कपद्रिक तू, दळीद्री तू, चढाओढ माझ्याशी केलीस. मी घेतली उडी, तुला चिडवायला नाही पुढे गेले. समोर तोच एक मार्ग होता म्हणून घेतले प्रमोशन. आणि तू. अरे... तुला प्रमोशन मिळाले नाही, आणि मला मिळाले तर तू, तू...घरात बांधलीस उंच भरभक्कम भिंत....

असू देत. अनेक भिंती असतात, तशीच हीही एक भिंत. आता, ती तोडायचा प्रयत्न मी करणार नाही हे नक्की ठरले. तरीही इथे हे लिहिले, कारण उद्या प्रमोशनवर मी दुसऱ्या गावी जाणार आहे. मागील काही दिवसात झालेल्या प्रकाराने, तुला कसे सांगावे सगळे या विचारात आवराआवर करीत होतें, इतक्यात कागद  आला पुढ्यात. तोही, भराभर चालताना साडीचा घोळ मध्ये येतो तसाच, आत्ता झोपायला जाताना दिसला टेबलावर. हल्ली, आपण एका खोलीत झोपतही नाही. त्यामुळे, तुझे घोरणे कानावर नाही पडतं. हं... बघं, माझं असं झालं. झोप मला आली, आणि आठवलं तुझं घोरण. सोडून देते म्हणा त्याला. नाही बरोबर नेणार त्यास. फक्त मी, होय मीच जाणार तिकडे. ही तूला लिहिलेली चिठ्ठी.... हा खरडलेला कागद वाचशील तू... तेही मी गेल्यावर.....
 मी... पुढे धावलेली.
कधीकाळची तुझी.


Saturday, September 1, 2018

87. Katthak Dance Academy : Chief guest :




87.  के. के. कथ्थक नृत्य अकादमी, धायरी, पुणे
प्रमुख पाहुणी  ::  सौ.वंदना विजय धर्माधिकारी






कथ्थक कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणी म्हणून मला बोलावणे आले होते. सौ. कविता खोडके आणि सौ.   कुलकर्णी यांची के.के.कथ्थक नृत्य अकादमी पुण्यातल्या धायरी येथे आहे. कथ्थक नृत्यांगना कविताने तिच्या क्लासमध्ये मागील १५ वर्षे आपल्या अनेक शिष्यांना अतिशय उत्तम तर्हेने कथ्थक नृत्याचे धडे दिलेत.

कुठलाही कलाकार म्हंटल की मला जाणवते ते असे की कलाकार अतिशय आपला कलेशी जवळीक बाळगून असतो. त्यांचे नाते दृढ खोलवर असते, ते एकजीव झालेले असल्याने नात्याची निरगाठ असते दोघांच्यात. त्यामुळे, मी म्हणते ‘कलाकार हा कधीच मरत नाही.’ मरत नाही याचा अर्थ काय? मरण तर सगळ्यांनाच येते, अगदी अटळ असते मरण तेही प्रत्येकाचे. म्हणजे कलाकार जर आयुष्यात मेला, त्याने खच खाल्ली, डेसपरेट झाला तर त्यातून तो नक्कीच उभारी घेऊन पुन्हा जिवंत राहू शकतो. आहे त्या परिस्थितीत तग धरून आनंदाने आयुष्य जगायला कला शिकविते. तसेच या कलाकारांना कधी जरी कंटाळा आला, नैराश्याने ग्रासले गेले तर तेंव्हा नक्कीच त्यांना आपल्या पायातली घुंगरू साद घालतील, साथ देतील. अगदी एकांतात अलगद घुंगरू बांधले जातील, तोडे ओठावर नाचतील, आणि पाऊले ठुमकतील. ताल, सूर आणि लय यांचा संगम होईल. नृत्याच्या तालावर पदन्यास होईल. एक अदभूत उत्साह आनद एनर्जी घेऊन तो कलाकार परत आपल्या आयुष्यात भरारी घेतात. वेगवेगळ्या वयातील कलाकारांनी अतिशय सुंदर सादरीकरण केल. कविताने देखील आपले कथ्थक नृत्य सादर केले.

वंदना धर्माधिकारी


Saturday, August 4, 2018

38. Sahitya jeevan gaurav puraskar- साहित्य जीवनगौरव पुरस्कार ४ ऑगस्ट, २०१८





साहित्य संमेलन अध्यक्षा आणि साहित्य जीवनगौरव पुरस्कार : ४,ऑगस्ट, २०१८

लेखणीने मला खूप माणसे दिली. त्यापैकी एक श्री. मधुसूदन घाणेकर. त्यांच्याशी परिचय झाला, माझ्या लेखणीची कलाकुसर पाहून लगेचच ते म्हणाले, की तुम्ही आमच्या संमेलनाच्या अध्यक्षा. खरं तर साहित्यात माझे योगदान अध्यक्षा होण्याइतके नाही. तशी जाणीव मला आहे, तेच मी त्यांनाही सांगितले. मध्ये बराच काळ गेला. वाटलं, लोकं म्हणतात हे करू ते करू, पण जोपर्यंत प्रत्यक्ष काही केलं जात नाही तोपर्यंत काही खरं नसतं अशी माझी समजूत.   काही दिवसांनी एकदिवस खरोखरीच मला अध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारण्याची विचारणा झाली. त्याचबरोबर “साहित्य जीवन गौरव पुरस्कार” घोषित केला गेला.

साहित्य गौरव हा साहित्यिकांचा एक ग्रुप आहे. अनेक दिग्गज साहित्यिक एकत्रित येतात आणि दरवर्षी वार्षिक संमेलन ऑगस्ट, महिन्यात भरवतात. तेच यंदा ४ ऑगस्ट,२०१८ रोजी वेद शास्त्रोत्तेजक सभागृह, पुणे येथे भरविले होते. त्या साहित्य संमेलनाची अध्यक्षा व्हायचा मान मला देण्यात आला. त्याने खरं तर माझी जबाबदारी अधिक वाढली असेच मला वाटले. तेंव्हा अधिकाधिक लिखाण करायचेच असे मी मनाशी ठरवले. छोट्याश्या का होईना संमेलनाची मी अध्यक्षा झाले, यात मला खूप आनंद आहे. माझ्या लेखणीला मिळालेली ही अतिशय मोलाची दाद आहे, असे मला वाटते.

“साहित्य जीवन गौरव पुरस्कार” हे नावचं खूप काही सांगून जाते. साहित्य प्रकारातील काही प्रकार मी हाताळते, सातत्याने लिखाण करते त्याचेच हा गौरव हे फलित आहे. विशेषत्वाने माझे अधिकांश लिखाण बँकिंग विषयावर असते. त्याच बरोबर माझा कथासंग्रह, कवितासंग्रह, ललित वैचारिक लेखांचे संकलन केलेले पुस्तक आणि साहित्य क्षेत्रात असलेला वावर याची दखल घेतली गेली याचा मला आनंद आहे, समाधान आहे.

धन्यवाद!

वंदना धर्माधिकारी
४ ऑगस्ट,२०१८
पुणे





Camera is a responsive/adaptive slideshow. Try to resize the browser window
It uses a light version of jQuery mobile, navigate the slides by swiping with your fingers
It's completely free (even though a donation is appreciated)
Camera slideshow provides many options to customize your project as more as possible

Here is a video for National Webinar on IBPS Exam. Guidance by Smt.Vandana Dharmadhikari on 17th July, 2020 

vandanadharmadhikari.blogspot.com