न लिहिलेली पत्रे :: नुक्कड :: बुक हंगामा :: यावर प्रसिद्ध झालेले – शनिवार १३.१०.२०१७.
........ तू,
एक पुढे, एक मागे... त्याला
ओलांडून पुढे जाताना ना चढाओढ, ना ढकलाढकली, ना स्पर्धा, ना दुस्वास. सगळीकडे असेच असते. कोणाचेही असो, मुंगीपासून हत्तीपर्यंत, किंवा अवाढव्य डायनोसॉर पर्यत. एकचं पद्धत आखून दिलेली त्या नियंत्याने. तिचे
पालन इतके काटेकोरपणे सारे करतात. आश्चर्य आहे ना.....
ते असते एक संचलन, तालासुरातले, बदलत्या गतीचे आणि
मनही डोलत असतं आतल्या आत... नाही दिसलं म्हणून काय झालं? आपले मातीशी नाते सांगत सांगत पुढे पुढे
जाताना कुठेतरी बाक येतोच. तो यायलाच हवा, ताठरता सोडली तरचं पुढंच नजरेत येईल, त्याला पकडायचा मोह होणारचं आपसूक. इतकं सुंदर सभोवताली असताना गप्प का कोणी
बसेल. सोडला ताठपणा आणि घेतली धाव, तर बिघडलं कुठे? नाही..
नक्कीच नाही! ते तर हवेच, नाहीतर
गोळा पडून राहणार की काय घरातल्या खबदाडात? उर्जा हवीच शरीराला आणि मनालाही. सोडलाच तो ताठा. माहित असलं तरीसुद्धा नेहमी
नाही जमतं असा ताठा विरघळून टाकायला. मलाही नाही, आणि तुलाही नाही जमणार. समजलं मी काय म्हणते ते तुला.... तसं अवघड नाही रे, तुझ्यातर लक्षात यायला हवं..... इतकं काय
विचार करतोस तू... मी तुझ्या माझ्या पायांच सांगते. बघं.. एकटं चाल नाहीतर माझा
हात हातात घेऊन चाल.. एकाच तालासुरात हलतात पाय. एक वाकतो तेंव्हा दुसरा ताठ होतो.
लगेच ताठ झालेला वाकतो आणि आधीचा वाकलेला ताठ होतो. बघ चार पावले चालून लगेच...
किती सोपं असतं चालणं, जमिनीवरून.
वाकलाच ना तुझा पाय कुठेतरी. त्यामुळे तर आपण जातो
कुठच्या कुठे? हे असं
रिदमिक असलं की कापलेलं अंतर उमजतं नाही, लांब पल्ला गाठता येतो सहजगत्या. आणि बरोबर कोणी असेल साथीला तर.... असाही
विचार आलाच बघं माझ्या मनात. तुलाही आवडणार असेच कोणाचा तरी हात धरून भराभरा पाऊले
उचलायला. तिथे नसते ना चढाओढ, आधी कोण याचा हट्ट...म्हणा दोन्ही तुझेच पाय असतात म्हणूनही नसेल. पण, मी तुझी नाही की काय? निदान कागदोपत्री, पत्रिकेत आणि त्या सही शिक्यानिशी सरकार
दरबारी रुजू केलेल्या कागदावर आहेच ना मी तुझी. मग, इथे का करतोस इतकी चढाओढ, मारामारी, अवहेलना, शर्यत, तुझं माझं? का उठते
तुझ्या पोटात कळ, बळावते
पोटदुखी?
जळणाऱ्या तुझा असा डाव
खेळताना संगतीला हातही येतात आपसूक, सर्व ताकदीने उगारलेले, त्याच पायात जोरही भरतोस लगेच आणि उठवतोस
माझ्या गालावर
आपली पाच बोटे. काहीचं कसं वाटतं नाही याचे वाईट वाटते, आश्चर्यही डोकावते. मी फक्त तुझ्यापुढे
गेलेली असते, इतकाच
काय तो माझा गुन्हा असतो. बाकी काही काहीही बिघडलेले नसते संसारात आपल्या. तुझा
अहं, फुसका
पोकळ लुच्चा इगो दुखावला जातो. तुला नाही जमले ते मी लीलया केले, तेंव्हा तुझा भडकला पोटशूळ. खरं तर....
अभिमान वाटायला हवा होता तुला माझा. कौतुकाचा वर्षाव माझ्यावर इतर सर्वांनी केला, कदाचित मी त्यांची नव्हते म्हणूनही असेल
भडीमार अभिनंदनाचा. तुझा एक शिडकावा हवा होता. पण, नाही दिलास. कपद्रिक तू, दळीद्री तू, चढाओढ माझ्याशी केलीस. मी घेतली उडी, तुला चिडवायला नाही पुढे गेले. समोर तोच एक मार्ग होता म्हणून घेतले प्रमोशन.
आणि तू. अरे...
तुला प्रमोशन मिळाले नाही, आणि मला
मिळाले तर तू, तू...घरात
बांधलीस उंच भरभक्कम भिंत....
असू देत. अनेक भिंती असतात, तशीच हीही एक भिंत. आता, ती तोडायचा प्रयत्न मी करणार नाही हे नक्की
ठरले. तरीही इथे हे लिहिले, कारण उद्या प्रमोशनवर मी दुसऱ्या गावी जाणार आहे. मागील काही दिवसात झालेल्या
प्रकाराने, तुला
कसे सांगावे सगळे या विचारात आवराआवर करीत होतें, इतक्यात कागद आला पुढ्यात. तोही, भराभर चालताना साडीचा घोळ मध्ये येतो तसाच, आत्ता झोपायला जाताना दिसला टेबलावर. हल्ली, आपण एका खोलीत झोपतही नाही. त्यामुळे, तुझे घोरणे कानावर नाही पडतं. हं... बघं, माझं असं झालं. झोप मला आली, आणि आठवलं तुझं घोरण. सोडून देते म्हणा त्याला. नाही बरोबर नेणार त्यास. फक्त
मी, होय मीच
जाणार तिकडे. ही तूला लिहिलेली चिठ्ठी.... हा खरडलेला कागद वाचशील तू... तेही मी
गेल्यावर.....
मी... पुढे धावलेली.
कधीकाळची तुझी.
विसंवादाचा संवाद.
ReplyDeleteअगदी बरोबर बोललात. विसंवादाचा संवाद असाही होतो. धन्यवाद!
Deleteअशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बायका करिअर करतात आणि घरही चांगलं सांभाळतात.त्यांची कदर ठेवली पाहिजे हे नक्की. मानसिकता बदल हवा.
ReplyDeleteनाती जपताना दुसऱ्याला मान जरी नाही दिला तरी अपमान नको, वाईट शब्द, मार नको, अवहेलना नको. टोकाला नेऊ नयेत गोष्टी. मध्य गाठावा त्याने समस्या सुटते. ... कमेंट बद्दल धन्यवाद!
ReplyDelete