93. Deshonnati 70 article - Nomination baarkave
नामांकनाचे (Nomination) महत्व, कसे, कोणाच्या नावे करायचे, म्हणजे
नमिती (Nominee) कोण? याची माहिती मागील
लेखात घेतली आहे. बरेचदा वारसदार हाच नमिती असतो. आपल्या पश्चात आपली संपत्ती ही
आपल्या पुढच्या पिढीकडे द्यायची असते, ती तिकडेच गेली पाहिजे, असे जरी नसले तरी
बहुतांशी तसे होते. त्यामुळे वारसदारांचे
नावाने नामांकन करण्यात येते. याला अपवाद असतात. आपल्या संस्कृतीत वर जाताना पुढच्या पिढीसाठी काहीतरी ठेवून जायची पद्धत, कृती,
विचार, पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहेत.
त्याला आपण वडिलोपार्जित संपत्ती म्हणतो.
सर्व प्रकारच्या मालमत्तेचे नामांकन करता येते. तसे करणे सगळ्यांच्या हिताचे
असते. बँका, पोस्ट ऑफिस, म्युच्युअल फंड, शेअर्स, डीमॅट खाते, रोखे, घर, जमीन
जुमला, सर्वांचे नामांकन करता येते. उपलब्ध नामांकन सुविधेचा फायदा घ्यावा. नमिती
अज्ञान बालक असल्यावर (वय जर १८ वर्षापेक्षा कमी) असेल तर अधिक काळजी घ्यावी
लागते. कारण १८ वर्षाखालील व्यक्ती आर्थिक व्यवहार पूर्णत: करायला सक्षम समजली जात
नाही, त्यास अज्ञानी, लहान(Minor) समजले जाते. अशावेळी नामितीचे नाव,वय,जन्मतारीख द्यावी
लागते. शिवाय, तो/ती नमिती व्यक्ती सज्ञान होईस्तोवरच्या कालावधीत बालकाच्या वतीने
व्यवहार बघणाऱ्या जबाबदार व्यक्तीचे नाव, पत्ता, आणि नाते नमूद करावे लागते. कारण,
त्या त्या व्यक्तीच्या मृत्युनंतर नामितीची भूमिका असते. अशावेळी विश्वासू व्यक्तीवर
पुढची जबाबदारी टाकली जाते. त्या व्यक्तीस
त्याची कल्पना द्यावी.
बँकेत ठेव पावतीची मुदत संपल्यावर आपोआप नूतनीकरण (Auto Renewal) होते. अशावेळी पावतीचे आधी केलेले नामांकन
तसेच अबाधित राहते. ते बदलत नाही. एकाच खात्यात अनेक ठेव पावत्यांपैकी एका ठेव
पावतीस एक नमिती असे करून प्रत्येक ठेव पावतीचे नामांकन वेगवेगळ्या व्यक्तींच्या
नावाने करता येते. नामांकन कितीही वेळा बदलता येते. नवीन नामांकन आधी केलेले
नामांकन आपोआप रद्द करते. एका डायरीत कुठल्या पावतीला कोण नमिती आहे, यांची व्यवस्थित नोंद करावी. आणि सर्व काही घरातील
एखाद्या विश्वासू जबाबदार व्यक्तीस सांगून ठेवावे. कारण त्यानुसारचे सोपस्कार हे
भविष्यात खातेदाराच्या मृत्युनंतरचे सोपस्कार असल्याने त्यावरील कारवाई करतेवेळी
खातेदार जिवंतच नसणार. अगदी बारकाईने सांगायची देखील गरज नसते. पण, किमान ‘माझे
काही कमीजास्त झाले तर मी या डायरीत सगळं नमूद केलेले आहे. सगळ्या नोंदी बघा, आणि
करा.” इतके मुलांना, जवळच्या माणसाला सांगायला काहीच हरकत नसावी.
घरातल्या कोणाचाही मृत्यू झाल्यास घराच्यांनी त्याच्या बँकेत कळवावे. ग्रामपंचायत,
म्युनिसिपालिटी, कोर्पोरेशन, यांच्याकडून मृत्यू दाखला मिळतो. याही गोष्टी आता संगणकावर
नोंदविल्या जात असल्याने त्यासही वेळ लागत नाही. सर्वच कामे सर्वत्र भराभर होऊ
लागलेली आहेत. मृत्यू दाखल्याची झेरोक्स प्रत बँकेत द्यावी. मूळ प्रत कुठेही देऊ
नये. ती फक्त बरोबर नेऊन बँकेत दाखवावी लागते. मृत व्यक्तीच्या खात्या संदर्भात काही
पूर्तता करावी लागते. क्लेम फॉर्म भरावा लागतो. नमिती जेंव्हा खातेदाराचे
मृत्युनंतर बँकेत ठेव पावती घेऊन जातो तेंव्हा त्याला स्वत:ची ओळख पटवावी लागते.
त्यासाठी आवश्यक कागदपत्रे, पॅन कार्ड, आधार कार्ड घेऊन जावे लागते. प्रक्रिया
पूर्ण करून ठेव पावतीचे मुदत संपण्यापूर्वी रोखिकरण (Before maturity encashment) करण्यात येते. बँकेच्या
नियमांनुसार पावतीचे पैसे नामितीच्या खात्यात जमा होतात. .
नामितीस पैसे जरी दिले तरी तो त्याचा हक्कदार बनत नाही. वारसदारांचा त्या
रकमेवरील हक्क अबाधित राहतो. त्यावर वारसदार आपला हक्क प्रस्थापित करतात आणि
‘नामितीस रक्कम देऊ नये’ असे बँकेस सांगू लागतात. महत्वाचे असे की नामितीची
जबाबदारी पैसे बँकेकडून काढून घेऊन वारसदारांच्या स्वाधीन करणे अशी असते. बरेचदा तो ही एक वारसदार असतो. त्याने पुढाकार
घेऊन गेलेल्याच्या इच्छेचा मान राखण्यासाठी इतर सर्वांना एकत्र करून वादावादी भांडणे न करता
सामंजस्याने पैशाची वाटणी करावी, त्यासाठी प्रयत्न करावेत. असे आहे. पण, बरेचदा
समस्या उद्भवतात. त्यावरही उपाय आहे.
वंदना धर्माधिकारी
No comments:
Post a Comment