Friday, November 25, 2016

28. Diwali 2016 - Shree Sarvottam - राजहंस होऊन जा




दिवाळी २०१६ – श्री सर्वोत्तम :::  कथा – राजहंस होऊन जा
“हॅलो अलका, मी शुभा बोलते. उद्या मी तुझ्याकडे यायचं म्हणते. घरी असशील ना?”
“हो, आहे ना. केंव्हा येतेस? शाळेतून परस्पर येतेस का? मग जेवायलाच ये. मी दिवसभर घरीच आहे.” आणि शुभा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहाचे सुमारास अलकाचे घरी आली. थोडसं इकडचं तिकडचं झालं. एकंदरीत शुभाचा सूर अलकाला वेगळा वाटला. तिने कॉफी केली. दोघींनी घेतली. एका भिशी ग्रुप मधल्या मागील सातआठ वर्षे एकत्र येणाऱ्या मैत्रिणींपैकी या दोघी.
      एका ग्रुप मध्ये होत्या काही बायका
      तशा साध्यासुध्या साऱ्याजणी सारख्या
      त्यातच एक होती, चारचौघींसारखी
      होती जरा वेगळी,  इतरांना नवखी
      तिलाही ठावूक नव्हता  तिचा वेगळेपणा
      ती समजायची स्वत:ला, “ मीही  इतरांसारखी”

            बोलायची साऱ्यांशी, यायची जायची,
            ठरलं की भेटायची, हवं नको टिपायची
            तिच्या मनी कधी साधी शंकाही नसायची
            पाठीमागली कुजबुज तिच्या कानी नाही यायची.

      तिच्या मनी नव्हता वेगळेपणा
      नव्हती स्वत:च्या यशाची घमंड
      मिळालेलं यश ती बोलायची सुद्धा नाही
      आणि म्हणूनच, ती येतच राहिली
      सर्वांच्यात मिसळून राहू लागली.

            आपण साऱ्या मैत्रिणी
            एका ग्रुप मधल्या साऱ्याजणी
            कधीतरी काहीतरी बिनसायाचं
            सगळ्यांचच कधीतरी चुकायचचं
            चुकणारी तशी ती एकटी नव्हती
            पण इतरांच्या मते ती वेगळी होती

      इतरांचं हे मत तिला ठावूकच नव्हतं
      बाकीच्यांनी तिला बाजूला टाकलं होतं
      तिच्या ध्यानीमनी, स्वप्नी सुद्धा नव्हतं
      गॉसिप मध्ये तिचे कधी लक्षच नव्हतं
           
तशी चार पाऊले पुढे होती ती
            धडाडी, जाणीव, कष्ट, होती तिला गती
            विचारांची स्पष्ट, गुळूमुळू नव्हती
            स्वच्छ कारभार, मतं परखड होती

      तिचं नाव नेहमी यायचं कोठेतरी
      करीत राहायची काहीतरी, तिला उत्साहच भारी
      आहे तिची लेखणी साधीसुधी न्यारी
      लोकांकडून कौतुक पडतं तिच्या पदरी

            पण म्हणून काय झालं ?          
            इतरांचं काय गेलं?
त्यांना त्याचे काय खुपलं ?
तिने यांचं काय बिघडवलं ?
तिला वाळीत का टाकलं?
तिला ‘गेट आउट’ का म्हंटल ?

      अशा प्रश्नांना का कधी उत्तर असतं?
      तिचं वेगळेपण तसं जगजाहीर होतं
      तिला जाणवलं, पण तिने मिरवलं नव्हतं 
      यशापयश तसं तिच्या जवळचं होतं
      ‘फार काही सांगत जाऊ नकोस.’ कोणी सुचविलं होतं

            पण ग्रुप मधलं वार काही वेगळचं असतं
            एकीचं यश दुसरीला खूपतं असतं
            पण तसं कधी काही बोलायचं नसतं
            ‘ती तशी, ही अशी’ लेबलं चिकटवलं जातं
            अचानक पटावरून नाव कमी केलं जातं

     
नाव कमी केल्याचा तिला सांगावा येतो
      आश्चर्याचा तिला मोठ्ठा धक्काच बसतो
      काहीतरी, कुठलंतरी समर्थन केलं होतं
      ‘No one is comfortable with you’  बोललं जातं
      अशा वेळी अनेकांच्या कामी इंग्रजी येतं
      तिचं पाउल हळूचं वर्गाबाहेर पडतं.



असा झाला त्या दोघींचा म्हणजे शुभा आणि अलकाचा त्या दिवशीचा संवाद. शुभाने थोड्यावेळाने विषय बदलला. तिला काहीतरी अलका कडून  माहिती हवी होती. प्रश्न केला शुभान, “ अगं, तू म्हणाली होतीस ना हे असं असं करणं तुझ्या फायद्याचं होईल. तर मला सांग ना ते कसं करायचं ते.”

“ आता नाही मी सांगणार. संपल म्हणजे संपलं. मला विचारू नये.” अलकाने लगेचच स्पष्ट उत्तर दिलं.

पाच सात मिनिटात शुभा एक बॉम्ब टाकून निघून गेली. कोणी घरी येऊन सांगू शकतं? “ तू आमच्यात येऊ नकोस. कोणीही तुझ्याशी कम्फर्टेबल नाही.” आश्चर्याचा धक्काच होता तो. इतकं डेअरिंग होतं एका बाईचं? दुसरीला हाकलून द्यायचं. म्हणा, अलका पहिली नव्हती त्या भिशी ग्रुप मधून अशीच याच पद्धतीने ढकलून दिलेली. काही वर्षापूर्वी असेच नीनाला डच्च्यू दिला होता. अगदी किरकोळ कारणावरून. नक्की काय झालं, हे अलकाला माहित नव्हतं, कारण त्या नाटकात ती नव्हतीच मुळी. नंतर नीना म्हणाली अलकाला, “ मला तरी कुठे गं वेळ होतो. कामे खूप वाढली आहेत. जाऊ दे, नको ना त्यांना आपण, तर माझंही काही अडतं नाही त्यांच्यावाचून. तू राहा ग्रुपमध्ये.” याची आठवण आल्या शिवाय राहील का? त्या घटनेनंतर कधीही, कोणीही तिचं नाव घेतलं नाही, हे मात्र खरं.

मधून मधून वादावादी, मतभेद व्हायचेच. बायका एकत्र आल्या कि होतात तसंच इथेही . कधीतरी ट्रीपला जाणं होतं, सिनेमा असायचा. वाढदिवस, केळवण, पार्ट्या चालूच अधूनमधून. तसा बरा ग्रुप जमलेला. काहींची होती एकमेकींशी तसूभर जास्त घसट. असतेच कोणाकोणाची घट्ट मैत्री. त्यातही काही गैर नव्हे.
अधिक उणे सांभाळून होत्या तशा. तरी नीनाच्या नंतर बाहेर  काढलं लतिकेला. त्यावेळी सुद्धा अलका भिशीला गेली नव्हती. गावाला गेली होती. आल्यावर पुढच्या भिशीच्या वेळेला समजलं. ‘तू नव्हतेस, तेंव्हाच ठरलं लतिका आणि आरुषी दोघींना काढायचं म्हणून.’

‘ अगं, तुम्ही लतीकाच्या घरी जमला होतात ना? तिचं आणि तुमचं वाजलं. म्हणून तिला काढता. इथे
आरुषीने काय केलं? तिचा काय दोष? त्या दोघी एका बाजूला राहतात, म्हणून येताना बरोबर येतात. त्यात आरुषीला काढणं बरोबर नाही गं. असं करू नका.’ जुनी कधीतरी केलेली मध्यस्ती आठवली अलकाला. म्हणजे मी काय पहिली नाही, जिला ‘गेट आउट’ म्हणून हाकलून दिलेली. त्यानं अलकाला थोडं हलकं वाटलं.

संध्याकाळचा घाव अलकाला जोरात लागला होता. बरं झालं, अलकाचा नवरा घरात नव्हता शुभा आली तेंव्हा. तो आला तासाभरानं. काहीचं घडलं नाही असंच जेवणखाण उरकलं गेलं. दहा साडेदहा वाजता झोपणारी अलका त्याला म्हणाली, ‘ मला काही लिहायचं आहे, पाठवायचं उद्या पेपरला.’ हे तिचं तसं बरेचदा असायचं. खूप वेळा रात्री बसून ती लिखाण करायची. सलग वेळ मिळाला, की लेखणी सरसर सरते. आणि, लगेचच सगळं नवऱ्याला सांगायलाच पाहिजे, अशा मताची अलका नव्हतीच. त्याला कशाला सांगू काय झालं आमच्या मैत्रिणींचे ते लगेचच.

तिला झोप लागणं शक्यच नव्हतं. अलकाला खूप वाईट वाटलं. कोणालाही या गोष्टीचा त्रास होणारचं, तसाच तिला झाला. हाकलून दिलेल्या नीना आणि लतीकाची आठवण झाली आणि जरा बरं वाटलं. अशी वेळ अनेकांवर येतेच. मी पहिली नाही, कधीतरी येईल असं जरी मनात आलं नसलं, तरी अचानक येऊन धडकली तर बिघडले कुठे? पडली आहेत ना ढीगभर कामे एकावर एक. ती करावीत. काही अडणार नाही तुझंही. मनाची समजूत घालणं सुरु झालं.

आठवली अजून एक मैत्रीण याच ग्रुप मधली. ‘तिलाही आपल्यात घ्यायचं नाही आता.’ असं अगदी पक्क झालेलं. दोन भिशींच्या मधल्या महिनाभरात अलका सोडून बाकीच्या अनेकवेळा भेटल्या होत्या. गप्पागोष्टी रंगल्या होत्या. काहीतरी शिजत होतं. अलकाला कोणी बोललं नव्हतं, त्या भेटत आहेत ते सुद्धा तिला ठावूक नव्हतं. कसं असणार? मागच्या राजकारणात ती कधी नसायचीच. भिशीचे वेळी अलकाला समजलं. आधी तिला फारसं कोणी सांगितलं नव्हतं त्यामुळे घातलेला असा हा घाट अलकाला नवीन होता. पुन्हा एकदा तिने समजावलं.

‘अग, वयानं मानानं मोठ्या आहेत गं त्या. असतो स्वभाव काहींचा असा. त्यांना काढणं योग्य नाही वाटत. आणि अगं, एकट्या असतात म्हणून म्हणते, नका काढू त्यांना. जरा स्ट्रीक्ट आहेत, असू देत.’ हळूहळू एकेकीच्या मतात बदल होऊ लागला. वयाला, ज्ञानाला मान दिला गेला. तिथेच संपल.

तो प्रसंग सरकन सरकला डोळ्या समोरून. इथे कोणालाही खाडकन घरी पाठवले जाते, हे सत्य ठळकपणे दिसू लागलं, इतकं की त्याची भीतीच मरून गेली. मन निर्ढावल आणि दु:ख पोटात ढकललं गेलं.


आता आली माझी पाळी. असं म्हणून स्वीकारलं गेलं ते झिडकारणं.

      काय गुन्हा केला? माझं काय चुकलं?
      त्याचं उत्तर मात्र तिला नाही मिळालं
      जाऊ दे ना. आपलं तरी काय नडलं?
      केलं पटावरून कमी,तर केलं कमी
      करायला भरपूर आहे, वेळच पडतो कमी
           
सांगावा आला त्या रात्री
तिचा डोळा नाही लागला 
विचार करता करता कोणीतरी
तिच्या कानी बोलू लागला.

      तो होता असाच कोणीतरी
      दूर ढकललेला इतरांनी कधीतरी 
      त्याने आठवण करून दिली
      सुंदर एका अजरामर गीताची

            “ एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
              होते कुरूप वेडे पिल्लू तळ्यात एक.”

हे गीत तर गदिमांचे. होय, त्या थोर माणसाला सुद्धा कोणीतरी असेच बोलले होते. त्या रात्री, गदिमा अस्वस्थ झाले, खूप वाईट वाटलं होतं त्यानाही. इतरांनी त्यांना असेच ढकललेले होते. त्याच रात्री हे गीत गदिमांनी रचलं आणि नंतरच झोपले. त्याच गाण्याची कॅंसेट अलकाच्या डोक्यात वाजू लागली. आपोआप  गुणगुणू लागली.

“त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक.”
गाण संपल. अलगद शब्द ओले झाले. पुन्हा पुन्हा गायलं गेले. गाता गाता तिचे ओझे उतरू लागले.

“जर, ही दुनिया, ही आपल्या अवतीभोवती असलेली माणसं अगदी  मराठीच्या वाल्मिकीला, श्रीयुत गजानन दिगंबर  माडगुळकर यांच्या सारख्या थोर माणसाला असे वाळीत टाकून बोलू शकतात तर, अलके तू तर कोणीच नाहीस गं. तुला दूर सारलं तर फार कोणी चुकलं असं समजू नकोस. तू तशीच वागली असशील. या आधीच तू बाहेर पडायला हवं होतंस. अगदी हाकलून देण्यापर्यंत कशाला रहा एखाद्या टोळक्यात? तसं, मधून मधून तुला कॉर्नर केलेलं जाणवायचं. तरी तू आपली जाऊ दे म्हणून घुसायची भिशीच्या जागी. काही जणींशी तुझही तसूभर सख्य झालेलं. कधीतरी, मनातलं त्यांनीही तुला सांगितलेलं. ते घरचं, दारचं, मुलाचं, नवऱ्याच... असचं मनातलं. तुही बोलायचीस आतलं. आपलं यश मात्र गाळून बोलायची सवय तू जाणून बुजून,  इतर काही जणींच्या सांगण्यावरून करून घेतली होतीस. हे तू नक्कीच चांगल केलं होतसं. सोडून देण जमवलं होत तुझं तूच. ‘जाऊ दे,’ हा शब्द तुझा आवडीचा आहे ना, मग इथेही तोच उच्चार परत एकदा.”

घड्याळाकडे नजर गेली, रात्रीचे तीन वाजले होते. इतक्या वेळ नुसती समजूत  घालत होती स्वत:चीच. तो, मघाशी डोकावलेला होता आजूबाजूला शांत बसून. अलगद तिचे  ओठ थोडेसे अलग झाले. का ते त्याला नाही समजलं. त्याला तिला  काही सांगायचं होतं. विचारांची तंद्री संपली, तसा तो म्हणाला.

      जसा मी, तशी तू
      माझ्यासारखीच आहेस तू
      दुनिया ही अशीच आहे
      उभी आडवी मुलामी आहे.

            विचार एकच प्रश्न स्वत:ला
            ‘जाणूनबुजून तू दुखावलं नाहीस ना कोणाला?
             त्याच उत्तर नाही आलं, तरचं मी पुढचं सांगीन.








आधीच विचार करून करून विस्कटलेला तो जीव. आणखीन आठवू लागला, काय झालं, काय चुकलं माझं. तसं कधीतरी स्पष्ट मत मांडलेलं आठवलं. त्याने कुठे काय बिघडलं. कदाचित ते खटकलं असेल. इतरांची वर्तणूक तपासली गेली. जवळपास प्रत्येकीचं  कधीतरी काहीतरी चुकीचं बोलणं वागणं होतचं होतं सगळ्यांच. कोणी मनावर घेतं का लगेचं. दुर्लक्ष केलं जातं. अलकाने त्याला सांगितलं. “मुद्दाम नाही मी कोणा दुखावलं.”

      मला वाटलंच होतं
      तू तसं नाही वागणार.
      आता ऐक,
      असे तुझ्यासारखे उगीचच
जे ढकलले जातात ना
त्यांच्या जवळ जातो मी
सावरायला त्यांना.

     
असतात असेच बरेच जण
      नाकारलेले विनाकारण
      नाकारलं जरी अस्तित्व
      तरी धीराने जपतात ते स्वत्व

जसा मी, तसा तो,
जशी तू, तशी ती
अगदी खरं आहे तुझं
वाईट नक्कीच वाटणार तुला
कोण कधी कसं वागेल?
ते आधी कळतं का कोणाला?

      ‘मित्र मेल्यापेक्षा मैत्री मेल्याचं दु:ख जास्त असतं’
      हे तुला चांगलेच ज्ञात आहे.
      ‘वेळ आली, तर तू खूप खंबीरपणे घेशील.’
      हे मला तुझ्याबद्दल ज्ञात आहे.
      म्हणून तर मी तुझ्याकडे आलो आहे.

तो बोलत होता, अलकाची पुन्हा तंद्री लागली. कधीतरी वाचलेलं आठवलं.... “ मंदिराच्या पायथ्याशी खूप माणसे असतात. जसं जसं वर चढायला सुरवात होते. तशी काही गळतात. वर चढून जाणे नाही जमत कोणाकोणाला. थांबतात बिचारे खाली. सर्वांनी वर पर्यंत कळसाला हात लावायला जावं असा काही नियम नाही या जगाचा. ज्याला जायचं तो जाईल. मधेच नको वाटलं तर येईलं खाली. असाच एक खालून वर चढतो. मध्यावर गेल्यावर मागे बघतो. अगदी थोडी माणसे येतं असतात बरोबर. पुन्हा सुरु होतं  वरवर सरकणे. मधेच कोणीतरी त्याला खालून दगड मारतो. तेंव्हा मात्र रागाने बघतो वळून. लक्षात येते, कोणी दगड मारला ते. कारण इतर काहीजण त्याला रागवीत असतात. तर काही त्याच्याकडे बघून हसत असतात. संतापाची एक लहर मस्तकात जाते. क्षणिक वाटतं, झरझर खाली यावं आणि विचारावा जाब त्याला. ‘काय घोडं मारलं मी तुझं, मला दगड मारतोस ते.’ पण, ते फक्त क्षणिकच. पुन्हा दुसरं मन बोलून गेलं. तू आणखीन वर जा, तेही भरभर. की त्या उंचीवर त्याला दगड देखील मारता येणार नाही. मान वर करून तुझ्याकडे बघताना त्याचीच मान दुखेल. अशांच्या नादी नाही लागायचं. आपलं आपण पुढे पुढे जायचं. आले इतर बरोबर तर उत्तमच. सोबत मिळेल. आणि नाही आलं कोणी तर एकला जीव सदाशिव. चलं, नको घुटमळूस.”

तो बोलतच होता. अलका सुद्धा त्याचं सांगण मनापासून ऐकू लागली.

तुझ्या झोळीतलं यश तसं नाही खूप मोठ
      ही तर सुरवात आहे, हे तुलाही ठावूक होतं
      तुझ्यामागून येणं त्यांना जमतं नव्हतं
      मागून चिखलफेक करणं सर्वात सोपं होतं
      तू होतीस पुढं, तुला नाही दिसलं
      तुझ्यामागे तुला, कोण किती  हसलं

            एक लक्षात ठेव कायम मनी
            आता सांगितलेलं सुंदर गाण
            पिल्लाला जसं समजलं त्याचं वेगळेपण
            तसंच, तुही ओळखून वाग तुझेही वेगळेपण

      आहे थोडं  वेगळं, देवानं दीधलं
      फुलवल तसं फुललं, मन तुझं रमलं
      होतं आत दडलेलं, हळूच बाहेर डोकावलं
      वाचणाऱ्याच्या आयुष्यात आनंद वाटत सुटलं
     
            आठवं तू तो इतिहास
कधीतरी  वाचलेला
            अनुभवाचे बोलं,
कोणीतरी सांगितलेला
            अनेकांना झेलाव्या लागलेल्या,
मनस्तापाच्या खपल्या ओल्या

     



             


              जिथे असते वेगळेपण,
      तिथे भोगावे लागते बोचरेपण
      नसतो त्यांचा काहीच अपराध
      फक्त दुसऱ्यांचा दुस्वास त्रास
     
              त्या वेगळ्याला  त्याचं अप्रूप नसतं
      पण अशांच्याच माथी मारलं जातं

            या गोष्टींना महत्व द्यायचं नसतं
            अनुभवातून काहीतरी शिकायचं असतं
            कामाला बांधून घ्यायचं असतं
            सुटलेलं, तुटलेलं दूर फेकायचं असतं
            स्वत:च वेगळेपण जपायचं असतं

      ज्यांनी जपलं आपलं वेगळेपण
      अशा काहींच्या हातून
      खूप काही वेगळं ही घडलं
      आणि म्हणूनचं गं... समज तू....

            पुढे तुझ्या हातून घडण्यासाठी काहीतरी
            तुझं वेगळेपण समजून वाग निदान आतातरी

      होऊन जा तू ही एक राजहंस
      डौलाची चाल,  ताठ मान
      यशाचं शिखरं,  मानाचं पान

            कदाचित, तू होणारही नाहीस राजहंस
            नाही झालीस राजहंस तरी चालेल
            पण, तुझ्या समोर बंद केलेल्या
            दरवाज्याकडे ढुंकूनही बघू नकोस
            तुझ्या दिशेने उडवलेल्या चिखलात
            तू पाय ठेवू नकोस. तू पाय ठेवू नकोस.


वंदना धर्माधिकारी
M: 09890623915






26. Diwali 2016 - Niranjan - Magova


अर्थविश्व दिवाळी अंक २०१६ :::   सहकारी बँकिंग क्षेत्र – महत्वाचे टप्पे
लेखिका  :::  सौ.वंदना विजय धर्माधिकारी


 “एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ” या उक्तीनुसार समाज घडत असतो, प्रगती करीत असतो. अनादिअनंत काळापासून एकमेकांच्या पाठीशी उभा राहणारा समाज हे मानवतेचे द्योतक आहे. सहकार क्षेत्राबद्दल बोलताना शंभर सव्वाशे वर्षे मागे जाऊन अंदाज घेता येईल, तत्पूर्वी सहकार नव्हता असा त्याचा अर्थ कोणीही काढू नये. सहकार होताच, आहेच, आणि राहीलही.

१८८९ - अन्योन्य सहकारी मंडळी - एकोणिसाव्या शतकाचे शेवटी शेवटी सहकाराला संस्थात्मक रूप मिळत गेले. समाजातील काही लोक आपल्याच समाजबांधवांना प्रोत्साहित व सबळ करावे या विचाराने त्यांच्या गरजा भागविण्यासाठी पतपेढ्यांच्या स्वरुपात एकत्र आहे. या पतपेढ्या सहकारातून निर्माण झालेल्या म्हणून सहकारी पतपेढ्या होतं. एक ध्येय, एक विचार, एकत्र कृती, संघटीत कार्य दिसू लागले. गरीब व मध्यमवर्गीय सभासदांना सावकाराच्या पाशातून दूर ठेवताना त्यांच्या आर्थिक गरज पुरविण्यासाठी अनेकांनी सक्रीय सहभागास सुरवात केली. भारावून सोडणारी उद्दिष्टे साकारण्यासाठी सर्वच सरसावले आणि सहकारी सोसायटी, संस्था स्थापन होऊ लागल्या. अगदी पहिली सहकारी सोसायटी म्हणून बडोदा, गुजरात येथील श्री. भाऊसाहेब कवठेकर या मराठी माणसाने स्थापन केलेली “अन्योन्य सहकारी मंडळी” यांचा नामोल्लेख केला जातो.

१९०४ - सहकारी पतपुरवठा संस्थांचा कायदा - विसाव्या शतकाच्या सुरवातीस २००४ साली सहकारी पतपुरवठा संस्थांचा कायदा (Cooperative Credit Society Act 2004) संमत झाला. तेंव्हापासून जाणीवपूर्वक सहकारी पतसंस्थांची आखणी व स्थापना होण्यास सुरवात झाली.

२०१२ - मध्ये संस्थांना पूरक अशा कायद्यांचे रुपांतर संमत झाले.

२०२५ - तत्कालीन मुंबई सरकारने प्रथमत: “राज्य सरकारचा सहकारी सोसायटी कायदा आणला. त्यामध्ये सहकाराचे आर्थिक धोरण, स्वत: बरोबर सर्वांना मदत करायची वृत्ती, समाजाभिमुख कृती या महत्वाच्या गोष्टींवर भर देण्यात आला. त्याचेच अनुकरण इतर राज्यांनी केले. तेंव्हापासून नागरी (अर्बन) सहकारी बँकांची भूमिका देशाच्या आर्थिक घडामोडींमध्ये महत्वाची समजण्यात येऊ लागली. हळूहळू तरीपण निश्चित स्वरुपात सहकारी बँकांची नोंद घेतली जाऊ लागली. त्याचे  कार्य सुधारणा करण्यासाठी पुढे वेळोवेळी विविध समित्या कमिट्या स्थापन केल्या गेल्या. त्यांचा नामोल्लेख करणे आवश्यक आहे.



१९३१ – दि इंडिअन सेन्ट्रल बँकिंग इन्क्वायरी कमिटी
१९३९ – मेहता भन्साळी कमिटी
१९४६ – सहकारी प्लानिंग कमिटी
१९५० – ग्रामीण बँकिंग चौकशी कमिटी
या समित्यांचे उद्दिष्ट एकच होते, ते म्हणजे सहकारी बँकांच्या कामाबद्दल आस्था असल्याने त्यातून आणखीन काय चांगले करता येईल त्यावर भर दिलेला होता. आणखीन सुधारणा, वाढ, व्यवसायवृद्धी, समाज उत्थानासाठी प्रयत्न आणि त्यादृष्टीने मार्गदर्शन व नियम आले. समाजातील अनेक वर्गांना हक्काचे आर्थिक पाठबळ देणारे सक्षम व्यासपीठ म्हणून सहकारी बँकांकडे बघितले गेले. सहकारी क्षेत्रास बळकटी येऊ लागली, आणि जिल्हा स्तरावरून तालुका वा खेडेगाव असा बँकांचा विस्तार करण्यात आला. त्या त्या  गावाचा, विभागाचा विस्तार करताना सहकारी बँकांची भूमिका ही कुटुंबप्रमुखाची राहिल्याने समाजाचे त्यावरील अवलंबित्व वाढीस लागले. आपोआप बँकांचा  शाखा विस्तार व आर्थिक समृद्धता वाढीस लागली.

१९६३ - वर्दे कमिटीच्या शिफारशींनुसार दोन निकषांवर आधारित बँकेस अर्बन बँक संबोधण्यात येऊ लागले. एकतर त्या  भागातील लोकसंख्या आणि बँकेचे भागभांडवल ( Equity Capital). या बँकांवर कुठल्याही एकाच समाजाचा वरचष्मा असता कामा नये हे स्पष्ट सांगितले. एक लाख लोकसंख्या असलेल्या प्रत्येक ठिकाणी नागरी बँकांची शाखा सुरु करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली गेली. राज्य सरकारने विशेष लक्ष घालायला सुरवात केली.

१ मार्च, १९६६ - पासून भारतीय रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांवरील आपले नियंत्रण बळकट केले आणि सहकारी बँकांसाठी बँकिंग रेग्युलेशन १९४९ (BR Act, 1949 AACS) – Banking Regulation Act 1949 As Applicable to Cooperative Societies) लागू केला.  त्यावेळी ज्या सहकारी सोसायट्यांचे भागभांडवल आणि स्वनिधी किमान एक लाख रुपये होता त्यांना बँकिंग व्यवहार करण्याचा परवाना देण्यात आला. ‘इन्श्युअर्ड  बँक’ हे नवीन कलम राज्य सहकारी कायद्यात टाकण्यात आले. त्याने नागरी सहकारी बँकांच्या खातेदारांच्या ठेवींना विमा संरक्षण दिले गेले. एकुणातच व्यवस्थापनाचा दर्जा उंचावणे बरोबर बँकांची गरज, काय हवे नको यासाठीच्या  प्रयत्नांवर जोर देण्यात येऊ लागला. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये सहकारी बँकांचा विस्तार जास्त प्रमाणात दिसत होता. भारतीय रिझर्व्ह बँकेचे वर्चस्व वाढल्याने आपोआप बँकांना आधार मिळू लागला. अभ्यासू गटाचे उत्तम मार्गदर्शन, सक्षम नियंत्रक मिळाले. दर्जा तर सुधारलाच शिवाय व्याप्ती वाढली,  हे वेगळे सांगणे न लगे.

१९६८ – डॅर्मी (Damry) कमिटी या गटाने इंडस्ट्रीअल फायनान्स बाय को-ऑपरेटीव्ह बँक्स यावर अभ्यास केला. नागरी सहकारी बँकांनी कुटीरोद्योगांना कर्ज पुरवठा करावा असे सुचविले.

१९६९ - मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

१९७९ - मध्ये माधवदास कमिटीने सुचविले की नागरी सहकारी बँकांच्या बाबतीत राज्य सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांनी एकत्रितरीत्या विचार करून काही  विशिष्ट मागासलेल्या भागात बँकांचा शाखाविस्तार विचाराधीन ठेवावा. एकुणातच अस्तिवात असलेल्या बँकांची परिस्थिती सुधारण्यासाठी मदत करावी.

१९८१ – हाटे वर्किंग ग्रुपने सुचविले की  इतर सर्व व्यावसायिक बँकांप्रमाणे CRR आणि SLR अर्बन बँकांनी भरावा. राष्ट्रीयीकृत बँकांचे प्रमाणे नागरी बँकांना दर्जा देण्यात यावा आणि त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे.

१९९२ – मराठे कमिटी – भारतीय रिझर्व्ह बँकेने ही कमिटी नेमली ती योग्य भागात नागरी बँकांचा शाखाविस्तार होण्यासाठी. कमिटीने अनेक शिफारशी केल्या. बँक ही एक सामाजिक गरज असल्याने ती पाहिजेच, अशी आग्रही भूमिका या कमिटीने मांडली. त्यामुळे १९९३-१९९७ या काळात अनेक बँका सुरु केल्या गेल्या. परंतु अनेक बँकांची अवस्था सशक्त नसल्याने झाल्याने त्या बंदही केल्या गेल्या. त्यावेळी महिलांची, महिलांनी, महिलांच्या हितासाठी चालवलेली महिला बँक ही संकल्पना उदयास आली. पुढे एकामागून एकेक महिला बँका सुरु झाल्या, त्यांनी वाखाणण्याजोगी कामगिरी केली यात शंका नाही.

१९९४ – खासगी बँकांचे आगमन -  खासगी बँकांना परवानगी दिल्याने बँकिंग क्षेत्रात त्या शिरल्या. त्याचवेळी अनेक परदेशी बँका भारतात आल्या. दोहोंच्या  आगमनाने बँकिंग क्षेत्रात अटीतटीची  स्पर्धा सुरु झाली. त्यामध्ये आपला टिकाव ठेवताना नागरी बँकांना धावपळ करावे लागली. तरीही अनेक बँकांचा या काळात विस्तारही झाला आहे.


१९९९ – माधवराव कमिटी – आजारी बँका बंद करणे, अथवा दुसऱ्या सक्षम बँकेत त्यांचे विलीनीकरण करणे सूचित केले. तसेच  संचालक मंडळावर बँकिंग दर्दी, ज्ञानी व्यक्तीची नेमणूक करण्यावर भर दिला. एकुणातच बँक व्यवस्थापनाचा मुद्दा महत्वाचा मानला गेला. व्यावसायिक बँकांचे बरोबरीने व्यवसाय वृद्धी झाली. नागरी बँकांनी दिलेली हमी गॅरंटीची  स्वीकृती कंद्र व राज्य सरकार कडून व्हायला लागली, म्हणजेच बँकांचा परीघ रुंदावला.

२००४-२००५ – व्हिजन डॉक्युमेंट – २००० सालापर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेने विस्तार झपाट्याने केला परंतू अनेक बँकांना बंद करणे भाग पडले. राज्य सरकार व भारतीय रिझर्व्ह बँक अशा या दुहेरी नियंत्रणामध्ये अनेक अडचण्या येतात. काम कोणाच्या अधिपत्यात येणार  इथपासून पुढे जाताना प्रत्येक वेळ निर्णयप्रक्रियेत दिरंगाई होणे, हे एकुणातच बँक व सहकारी क्षेत्र यास घातक होत होते.  त्यावर विचार करून २००५ साली सुधारणा करताना भारतीय रिझर्व्ह बँकेने एक सामंजस्य करार ( MOU – Memorandun of Understanding ) प्रत्येक राज्याबरोबर केला. काही प्रमाणात दुहेरी नियंत्रणाचा त्रास कमी झाला, आजारी बँकांचे दुसऱ्या बँकेत विलीनीकरण केले गेले, तर काही आजारी बँका बंद करण्यात आल्या.

व्हिजन डॉक्युमेंट मध्ये रिपोर्टिंग नियमावलीत काही बदल केले गेले. तर काहींची भर पडली. आर्थिक वर्ष अखेर बँकेला आपली वार्षिक व्यावसायिक उद्दिष्टे द्यावी लागत  होती. त्याचबरोबर पुढील वर्षात कुठे कुठे शाखा काढायचा बँकेचा विचार आहे. हे कळविणे सक्तीचे केले गेले.
नागरी बँकांना कोर बँकिंग सोल्युशन सक्तीचे केले गेले जेणेकरून त्यांना इलेक्ट्रॉनिक बँकिंग कार्यप्रणाली आत्मसात करता येईल. इन्फर्मेशन इलेक्ट्रॉनिक टेक्नोलॉजी वर आधारित बँकिंग प्रॉडक्ट NEFT/RTGS/NFS/ECS  आणि नंतरचे प्रगत तंत्रज्ञानावर आधारित सर्व प्रकारही त्या बँकांना NPCI - National Payment Corporation of India ने देऊ केले. .

२००५ – २००६ - भारतीय रिझर्व्ह बँकेने शासनाबरोबर केलेल्या सामंजस्य करारामुळे TABCUF –
Task Force on Cooperative Urban Banks चे आगमन झाले. त्यामुळे दुहेरी प्रशासनामुळे निर्माण झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीत थोडाफार सकारात्मक परिणाम झाला. कालबद्ध नियोजनामुळे व्यवस्थापन शिस्तबद्ध झाले. कमकुवत समस्याग्रस्त अशा बँकांचा शोध घेऊन त्यांच्यासाठी विशेष फ्रेमवर्क प्रोग्राम आखला गेला. त्याचा चांगलाच फायदा झाला. बँकांना योग्य ती समजही दिली गेल्याने, काय चुकते हेही समजले, चुका सुधारायला वाव मिळाला. आजारी बँकांचे दुसऱ्या सक्षम बँकेत विलीनीकरण देखील केले गेले. TABCUF मुळे एकुणातच परिस्थिती सुधारली.


२०१० मालेगाम कमिटी :: श्री. वाय एच मालेगाम, संचालक, भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली ही समिती.
एकंदरीत मागील दहा वर्षांचा सहकारी बँकांचा अहवाल घेणे, सक्षम बँकांसाठी कायदेशील व नियामक व्यवस्था (Legal and Regulatory Services) करणे, नवीन बँकांसाठी प्रारंभ बिंदू प्रमाण (EPN – Entry Point Norms) ठरविणे, नवीन नागरी बँका तसेच अस्तित्वात असलेल्या विस्तारू पहात असलेल्या बँकांना
शाखाविस्ताराचे परवाने देणे, या गोष्टीचा विचार केला गेला. त्याच बरोबर बँकांना आर्थिक अडचणी आल्यावर मदत करणारी एखादी केंद्रीय संस्था पाहिजे या अनुषंगाने संशोधनात्मक आढावा घेतला गेला.

मालेगाम कमिटीने सर्वकष अभ्यासपूर्ण रिपोर्ट जानेवारी २०११ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेकडे देताना बँकांची राज्यानुसार आकडेवारी देऊन अनेक सूचना केल्या. सहकारी बँकांचा बँकिंग इंडस्ट्रीमधील सहभाग, ठेवी, कर्जे, व्याजदर, नेट इंटरेस्ट मार्जिन, अनुत्पादित कर्जे, निरीक्षण श्रेणी, दर्जा, ग्रेड, विस्तारातील भौगोलिक असमतोल, अनेक बँकांचे असलेले उणे नक्तमूल्य (Negative net worth), व्यवस्थापनाची परिस्थिती व आढावा, सहकाराच्या सहकार ह्या मूळ गाभ्यापासून दूरत्व ठेवून व्यावासायवृद्धीचे होत असलेले प्रयत्न, प्राधान्य क्षेत्राला दिलेली कर्जे, या व इतर अनेक महत्वाच्या गोष्टींवर भाष्य कमिटीने केले. कमिटीने केलेल्या शिफारशी व त्यांतील महत्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे आहेत. 

·         लोकसंख्येच्या आधारावर बँकांचे वर्गीकरण केले गेले. (१) १० लाखापेक्षा अधिक लोकसंख्या,
(२) ५ ते १० लाख लोकसंख्या, (३) १ ते ५ लाख लोकसंख्या आणि (४) लाखापेक्षा कमी लोकसंख्या.

·         एका राज्यात कार्यक्षेत्र असलेली बँक जर आणखीन शाखाविस्तार करू पहात असेल तर परवाना देताना वरील लोक्संख्या आधारित वर्गीकरण केले गेले पाहिजे. बँकेचे भागभांडवल, राज्यातील शाखांची संख्या, ठराविक विभागात शाखा उघडण्याचा अधिकार, या सर्वांच्या निकषावर आधारित परवाना मंजुरी देण्यात येईल. बहुराज्यीय बँक होताना काही वेगळे निकष लावले गेले. सर्वतोपरी बँकेची बारकाईने तपासणी झाल्यावर भारतीय रिझर्व बँकेकडून परवाना मंजुरी देवून शाखा विस्तार होतो., अथवा नवीन बँकच उदयास येते.देण्यात

नवीन अर्बन सहकारी बँकांच्या संघटनातील सुचविलेले बदल. ( Organization structure in New UCBs)  :: एकुणातच महत्वाचा आणि मोठ्या जबादारीचा बदल संघटनेत सुचविला गेला. जसे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतात, तसेच बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सुरु करावे असा सुझाव देण्यात आला. त्यांच्यासाठी काही विशेष नियमावली बनविली गेली. ज्या पद्धतीने सर्व व्यापारी वा राष्ट्रीयीकृत बँकावर
संपूर्णपणे भारतीय रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण असते, तसेच बंधनमुक्त  नियंत्रण सर्व सहकारी बँकांवर सुद्धा रिझर्व्ह बँकेने ठेवले पाहिजे. बोर्ड ऑफ डायरेक्टर, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट आणि मुख्य कार्यकारी अधिकारी - CEO – Chief Executive Officer   यांच्यावर देखील रिझर्व्ह  बँकेचे नियंत्रण असायला
पाहिजे.




अम्ब्रेला ऑर्गनायझेशन – UO – अर्बन सहकारी बँकांसाठी त्यांना आधारभूत होणारी, वेळेवर मदत करणारी अशी एक संस्था पाहिजे ही संकल्पना विस्तृत करण्यात आली. दोन प्रकारच्या अम्ब्रेला ऑर्गनायझेशन असाव्यात असे सुचविण्यात आले.

१.      देशभरात कार्यरत असलेली, पेमेंट व सेटलमेंट करणारी, तसेच तरलता सांभाळताना आधारभूत अशी एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशन पाहिजे.

२.      आणि दुसरी अम्ब्रेला ऑर्गनायझेशन इन्फरमेशन टेक्नोलॉजी संबंधी  प्रशिक्षण देणारी, मार्गदर्शन करणारी, कम्प्युटरायझेशन करताना आधारभूत होणारी पाहिजे.

प्रत्येक राज्यात त्या त्या राज्यातील नागरी बँकांच्या पाठीशी उभी असणारी अम्ब्रेला ऑर्गनायझेशन म्हणजे त्या त्या राज्यातील नागरी सहकारी बँकांची फेडरेशन होय. आणि देशभरातील सर्व फेडरेशन्स व सर्व नागरी सहकारी बंकांच्ये पालकत्व स्वीकारलेली राज्यस्तरीय संस्था म्हणून  नॅफकब - NAFCUB – The National  Federation of Urban Cooperative  Banks and Credit Societies Ltd. अत्युच्च स्तरावर असलेली उच्च दर्जाची प्रमोशनल सर्वांना आधारभूत अशी ही संस्था आहे. राज्य स्तरावर सर्व राज्यात नॅफकब ची ऑफिसेस आहेत. नॅफकब ची स्थापना १७ फेब्रुवारी, १९७७ साली झाली असून त्यांचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे आहे. राष्ट्रीय स्तरावर नागरी बँकांच्या समस्या सोडवणारी, त्याच्या हिताचा विचार करणारी, सहकार मूल्यांना जोपासणारी समाजिक अशी ही संस्था सर्व बँकांना वेळोवेळी पाठबळ देते, मदत करते, मार्गदर्शन करते तसेच समजही देऊ करते. सर्वांसाठीच भक्कम आधारस्तंभ ही भूमिका नॅफकब ची असल्याने सहकार क्षेत्राचे योग्य आणि उत्तम प्रतिनिधित्व केले जाते. केंद्र व राज्य सरकार, सहकार खाते, नॅफकब यांच्याकडून बंकासाठीच्या महत्वपूर्ण योजना, कार्यपद्धती, समस्या, उपाय व एकुणात कार्यप्रणाली यावर अभ्यासपूर्ण निर्णयप्रक्रिया होते. अंमलबजावणी केली जाते. प्रशिक्षण देण्यासाठीचे विविध सेमिनार्स घेतले  जातात. त्याने उत्पादन क्षमता वाढते, बँकांना बळकटी येते. हा सकारात्मक बदल नक्कीच स्वागतार्ह्य आहे.
एकुणात नागरी सहकारी बँकांचा शतकाचा आढावा घेतल्यावर जाणवते की सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्याकडून विविध समित्यांच्या माध्यमातून वेळोवेळी सहकारी बँकांच्या संदर्भात प्रयत्नपूर्वक सुधारणा करण्याचे काम अंगिकारले गेले.त्यात यशही चांगले मिळाले आहे.  आत्ताच्या अनेक सहकारी बँकांची सुधारित प्रतिमा बघताना, अनुभवताना समाजास त्यांची प्रचंड प्रमाणात गरज आहे, त्या बँकांची उपयुक्तता आहे हे लक्षात येतेच. 
यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर श्री. आर गांधी यांची कमिटी आली, त्याचा स्वतंत्र विचार करायला पाहिजे. त्यामुळे सहकार क्षेत्र मुळापासून ढवळून निघत असल्याने त्याबद्दल इथे काही न लिहिता लेख इथेच संपवीत आहे.

वंदना धर्माधिकारी
M:9890623915
पत्ता : 25, तेजस सोसायटी, चैतन्य बिल्डींग, तेजस नगर, कोथरूड, पुणे -   411038 .






















Friday, October 7, 2016

24. Diwali 2016 - Sushrey - नित्यापठणार्थ सार्थ १८ क्ष्लोकी गीता




नित्यपठणार्थ सार्थ १८ श्लोकी गीता
माझी आई, श्रीमती शांताबाई बापूराव भोमे ४ सप्टेंबर,२००४ रोजी आम्हाला सोडून गेली. आईने “श्रीमद्भगवतगीता” आणि “श्री ज्ञानेश्वरी” या  दोहोंचा अभ्यास वर्षानुवर्षे केला होता. तिने त्यावर टिपण्णी काढून खूप लिहून ठेवले आहे. प्रत्येक अध्यायावर एक श्लोक एस अशी ही १८ श्लोकी गीता आई रोज म्हणायची. आम्हालाही तिने ही गीता शिकवली. गीतेच्या प्रत्येक अध्य्यात योगेश्वरने अर्जुनाला कथन केलेला योग व त्याचे वर्णन सारांश्रुपणे एका एका श्लोकात मांडलेले या गीतेत दिसते. त्या संक्षिप्त स्वरूपातील १८ श्लोकी गीतेवर आईने लिहिले निरुपण छोट्या पुस्तकरूपाने मी प्रकाशित केले आहे. आई असताना जर हे काम माझ्या हातून झालं असतं तर तिला खूप आनंद झाला असता. पण काळाचे काटे उलटे फिरवता येत नाहीत. हे पुस्तक हीच माझी आई व मामांना श्रद्धांजली.

सौ. वंदना धर्माधिकारी
४ सप्टेंबर, २००७






Camera is a responsive/adaptive slideshow. Try to resize the browser window
It uses a light version of jQuery mobile, navigate the slides by swiping with your fingers
It's completely free (even though a donation is appreciated)
Camera slideshow provides many options to customize your project as more as possible

Here is a video for National Webinar on IBPS Exam. Guidance by Smt.Vandana Dharmadhikari on 17th July, 2020 

vandanadharmadhikari.blogspot.com