दिवाळी २०१६ – श्री
सर्वोत्तम ::: कथा – राजहंस होऊन जा
“हॅलो अलका, मी शुभा बोलते. उद्या मी तुझ्याकडे यायचं म्हणते. घरी असशील ना?”
“हो, आहे ना. केंव्हा येतेस? शाळेतून परस्पर येतेस का? मग जेवायलाच ये. मी
दिवसभर घरीच आहे.” आणि शुभा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहाचे सुमारास अलकाचे घरी
आली. थोडसं इकडचं तिकडचं झालं. एकंदरीत शुभाचा सूर अलकाला वेगळा वाटला. तिने कॉफी
केली. दोघींनी घेतली. एका भिशी ग्रुप मधल्या मागील सातआठ वर्षे एकत्र येणाऱ्या
मैत्रिणींपैकी या दोघी.
एका
ग्रुप मध्ये होत्या काही बायका
तशा
साध्यासुध्या साऱ्याजणी सारख्या
त्यातच
एक होती, चारचौघींसारखी
होती
जरा वेगळी, इतरांना नवखी
तिलाही
ठावूक नव्हता तिचा वेगळेपणा
ती
समजायची स्वत:ला, “ मीही इतरांसारखी”
बोलायची
साऱ्यांशी, यायची जायची,
ठरलं
की भेटायची, हवं नको टिपायची
तिच्या
मनी कधी साधी शंकाही नसायची
पाठीमागली
कुजबुज तिच्या कानी नाही यायची.
तिच्या
मनी नव्हता वेगळेपणा
नव्हती
स्वत:च्या यशाची घमंड
मिळालेलं
यश ती बोलायची सुद्धा नाही
आणि
म्हणूनच, ती येतच राहिली
सर्वांच्यात
मिसळून राहू लागली.
आपण
साऱ्या मैत्रिणी
एका
ग्रुप मधल्या साऱ्याजणी
कधीतरी
काहीतरी बिनसायाचं
सगळ्यांचच
कधीतरी चुकायचचं
चुकणारी
तशी ती एकटी नव्हती
पण
इतरांच्या मते ती वेगळी होती
इतरांचं
हे मत तिला ठावूकच नव्हतं
बाकीच्यांनी
तिला बाजूला टाकलं होतं
तिच्या
ध्यानीमनी, स्वप्नी सुद्धा नव्हतं
गॉसिप
मध्ये तिचे कधी लक्षच नव्हतं
तशी चार पाऊले पुढे होती ती
धडाडी,
जाणीव, कष्ट, होती तिला गती
विचारांची
स्पष्ट, गुळूमुळू नव्हती
स्वच्छ
कारभार, मतं परखड होती
तिचं
नाव नेहमी यायचं कोठेतरी
करीत
राहायची काहीतरी, तिला उत्साहच भारी
आहे
तिची लेखणी साधीसुधी न्यारी
लोकांकडून
कौतुक पडतं तिच्या पदरी
पण
म्हणून काय झालं ?
इतरांचं
काय गेलं?
त्यांना त्याचे काय खुपलं ?
तिने यांचं काय बिघडवलं ?
तिला वाळीत का टाकलं?
तिला ‘गेट आउट’ का म्हंटल ?
अशा
प्रश्नांना का कधी उत्तर असतं?
तिचं
वेगळेपण तसं जगजाहीर होतं
तिला
जाणवलं, पण तिने मिरवलं नव्हतं
यशापयश
तसं तिच्या जवळचं होतं
‘फार
काही सांगत जाऊ नकोस.’ कोणी सुचविलं होतं
पण
ग्रुप मधलं वार काही वेगळचं असतं
एकीचं
यश दुसरीला खूपतं असतं
पण
तसं कधी काही बोलायचं नसतं
‘ती
तशी, ही अशी’ लेबलं चिकटवलं जातं
अचानक
पटावरून नाव कमी केलं जातं
नाव कमी केल्याचा तिला
सांगावा येतो
आश्चर्याचा
तिला मोठ्ठा धक्काच बसतो
काहीतरी,
कुठलंतरी समर्थन केलं होतं
‘No one is comfortable with you’ बोललं जातं
अशा
वेळी अनेकांच्या कामी इंग्रजी येतं
तिचं
पाउल हळूचं वर्गाबाहेर पडतं.
असा झाला त्या दोघींचा
म्हणजे शुभा आणि अलकाचा त्या दिवशीचा संवाद. शुभाने थोड्यावेळाने विषय बदलला. तिला
काहीतरी अलका कडून माहिती हवी होती.
प्रश्न केला शुभान, “ अगं, तू म्हणाली होतीस ना हे असं असं करणं तुझ्या फायद्याचं
होईल. तर मला सांग ना ते कसं करायचं ते.”
“ आता नाही मी सांगणार. संपल म्हणजे संपलं. मला
विचारू नये.” अलकाने लगेचच स्पष्ट उत्तर दिलं.
पाच सात मिनिटात शुभा एक
बॉम्ब टाकून निघून गेली. कोणी घरी येऊन सांगू शकतं? “ तू आमच्यात येऊ नकोस. कोणीही
तुझ्याशी कम्फर्टेबल नाही.” आश्चर्याचा धक्काच होता तो. इतकं डेअरिंग होतं एका
बाईचं? दुसरीला हाकलून द्यायचं. म्हणा, अलका पहिली नव्हती त्या भिशी ग्रुप मधून
अशीच याच पद्धतीने ढकलून दिलेली. काही वर्षापूर्वी असेच नीनाला डच्च्यू दिला होता.
अगदी किरकोळ कारणावरून. नक्की काय झालं, हे अलकाला माहित नव्हतं, कारण त्या नाटकात
ती नव्हतीच मुळी. नंतर नीना म्हणाली अलकाला, “ मला तरी कुठे गं वेळ होतो. कामे खूप
वाढली आहेत. जाऊ दे, नको ना त्यांना आपण, तर माझंही काही अडतं नाही
त्यांच्यावाचून. तू राहा ग्रुपमध्ये.” याची आठवण आल्या शिवाय राहील का? त्या
घटनेनंतर कधीही, कोणीही तिचं नाव घेतलं नाही, हे मात्र खरं.
मधून मधून वादावादी, मतभेद
व्हायचेच. बायका एकत्र आल्या कि होतात तसंच इथेही . कधीतरी ट्रीपला जाणं होतं,
सिनेमा असायचा. वाढदिवस, केळवण, पार्ट्या चालूच अधूनमधून. तसा बरा ग्रुप जमलेला.
काहींची होती एकमेकींशी तसूभर जास्त घसट. असतेच कोणाकोणाची घट्ट मैत्री. त्यातही
काही गैर नव्हे.
अधिक उणे सांभाळून होत्या
तशा. तरी नीनाच्या नंतर बाहेर काढलं
लतिकेला. त्यावेळी सुद्धा अलका भिशीला गेली नव्हती. गावाला गेली होती. आल्यावर
पुढच्या भिशीच्या वेळेला समजलं. ‘तू नव्हतेस, तेंव्हाच ठरलं लतिका आणि आरुषी
दोघींना काढायचं म्हणून.’
‘ अगं, तुम्ही लतीकाच्या
घरी जमला होतात ना? तिचं आणि तुमचं वाजलं. म्हणून तिला काढता. इथे
आरुषीने काय केलं? तिचा काय
दोष? त्या दोघी एका बाजूला राहतात, म्हणून येताना बरोबर येतात. त्यात आरुषीला
काढणं बरोबर नाही गं. असं करू नका.’ जुनी कधीतरी केलेली मध्यस्ती आठवली अलकाला.
म्हणजे मी काय पहिली नाही, जिला ‘गेट आउट’ म्हणून हाकलून दिलेली. त्यानं अलकाला
थोडं हलकं वाटलं.
संध्याकाळचा घाव अलकाला
जोरात लागला होता. बरं झालं, अलकाचा नवरा घरात नव्हता शुभा आली तेंव्हा. तो आला
तासाभरानं. काहीचं घडलं नाही असंच जेवणखाण उरकलं गेलं. दहा साडेदहा वाजता झोपणारी
अलका त्याला म्हणाली, ‘ मला काही लिहायचं आहे, पाठवायचं उद्या पेपरला.’ हे तिचं
तसं बरेचदा असायचं. खूप वेळा रात्री बसून ती लिखाण करायची. सलग वेळ मिळाला, की
लेखणी सरसर सरते. आणि, लगेचच सगळं नवऱ्याला सांगायलाच पाहिजे, अशा मताची अलका
नव्हतीच. त्याला कशाला सांगू काय झालं आमच्या मैत्रिणींचे ते लगेचच.
तिला झोप लागणं शक्यच
नव्हतं. अलकाला खूप वाईट वाटलं. कोणालाही या गोष्टीचा त्रास होणारचं, तसाच तिला
झाला. हाकलून दिलेल्या नीना आणि लतीकाची आठवण झाली आणि जरा बरं वाटलं. अशी वेळ
अनेकांवर येतेच. मी पहिली नाही, कधीतरी येईल असं जरी मनात आलं नसलं, तरी अचानक
येऊन धडकली तर बिघडले कुठे? पडली आहेत ना ढीगभर कामे एकावर एक. ती करावीत. काही
अडणार नाही तुझंही. मनाची समजूत घालणं सुरु झालं.
आठवली अजून एक मैत्रीण याच
ग्रुप मधली. ‘तिलाही आपल्यात घ्यायचं नाही आता.’ असं अगदी पक्क झालेलं. दोन
भिशींच्या मधल्या महिनाभरात अलका सोडून बाकीच्या अनेकवेळा भेटल्या होत्या.
गप्पागोष्टी रंगल्या होत्या. काहीतरी शिजत होतं. अलकाला कोणी बोललं नव्हतं, त्या
भेटत आहेत ते सुद्धा तिला ठावूक नव्हतं. कसं असणार? मागच्या राजकारणात ती कधी
नसायचीच. भिशीचे वेळी अलकाला समजलं. आधी तिला फारसं कोणी सांगितलं नव्हतं त्यामुळे
घातलेला असा हा घाट अलकाला नवीन होता. पुन्हा एकदा तिने समजावलं.
‘अग, वयानं मानानं मोठ्या
आहेत गं त्या. असतो स्वभाव काहींचा असा. त्यांना काढणं योग्य नाही वाटत. आणि अगं,
एकट्या असतात म्हणून म्हणते, नका काढू त्यांना. जरा स्ट्रीक्ट आहेत, असू देत.’ हळूहळू
एकेकीच्या मतात बदल होऊ लागला. वयाला, ज्ञानाला मान दिला गेला. तिथेच संपल.
तो प्रसंग सरकन सरकला डोळ्या समोरून. इथे
कोणालाही खाडकन घरी पाठवले जाते, हे सत्य ठळकपणे दिसू लागलं, इतकं की त्याची भीतीच
मरून गेली. मन निर्ढावल आणि दु:ख पोटात ढकललं गेलं.
आता आली माझी पाळी. असं म्हणून स्वीकारलं गेलं
ते झिडकारणं.
काय
गुन्हा केला? माझं काय चुकलं?
त्याचं
उत्तर मात्र तिला नाही मिळालं
जाऊ
दे ना. आपलं तरी काय नडलं?
केलं
पटावरून कमी,तर केलं कमी
करायला
भरपूर आहे, वेळच पडतो कमी
सांगावा आला त्या रात्री
तिचा डोळा नाही लागला
विचार करता करता कोणीतरी
तिच्या कानी बोलू लागला.
तो
होता असाच कोणीतरी
दूर
ढकललेला इतरांनी कधीतरी
त्याने
आठवण करून दिली
सुंदर
एका अजरामर गीताची
“
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तळ्यात एक.”
हे गीत तर गदिमांचे. होय,
त्या थोर माणसाला सुद्धा कोणीतरी असेच बोलले होते. त्या रात्री, गदिमा अस्वस्थ
झाले, खूप वाईट वाटलं होतं त्यानाही. इतरांनी त्यांना असेच ढकललेले होते. त्याच
रात्री हे गीत गदिमांनी रचलं आणि नंतरच झोपले. त्याच गाण्याची कॅंसेट अलकाच्या डोक्यात
वाजू लागली. आपोआप गुणगुणू लागली.
“त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक.”
गाण संपल. अलगद शब्द ओले झाले. पुन्हा पुन्हा
गायलं गेले. गाता गाता तिचे ओझे उतरू लागले.
“जर, ही दुनिया, ही आपल्या
अवतीभोवती असलेली माणसं अगदी मराठीच्या
वाल्मिकीला, श्रीयुत गजानन दिगंबर
माडगुळकर यांच्या सारख्या थोर माणसाला असे वाळीत टाकून बोलू शकतात तर, अलके
तू तर कोणीच नाहीस गं. तुला दूर सारलं तर फार कोणी चुकलं असं समजू नकोस. तू तशीच
वागली असशील. या आधीच तू बाहेर पडायला हवं होतंस. अगदी हाकलून
देण्यापर्यंत कशाला रहा एखाद्या टोळक्यात? तसं, मधून मधून तुला कॉर्नर केलेलं
जाणवायचं. तरी तू आपली जाऊ दे म्हणून घुसायची भिशीच्या जागी. काही जणींशी तुझही
तसूभर सख्य झालेलं. कधीतरी, मनातलं त्यांनीही तुला सांगितलेलं. ते घरचं, दारचं,
मुलाचं, नवऱ्याच... असचं मनातलं. तुही बोलायचीस आतलं. आपलं यश मात्र गाळून बोलायची
सवय तू जाणून बुजून, इतर काही जणींच्या
सांगण्यावरून करून घेतली होतीस. हे तू नक्कीच चांगल केलं होतसं. सोडून देण जमवलं
होत तुझं तूच. ‘जाऊ दे,’ हा शब्द तुझा आवडीचा आहे ना, मग इथेही तोच उच्चार परत
एकदा.”
घड्याळाकडे नजर गेली, रात्रीचे तीन वाजले होते.
इतक्या वेळ नुसती समजूत घालत होती
स्वत:चीच. तो, मघाशी डोकावलेला होता आजूबाजूला शांत बसून. अलगद तिचे ओठ थोडेसे अलग झाले. का ते त्याला नाही समजलं.
त्याला तिला काही सांगायचं होतं.
विचारांची तंद्री संपली, तसा तो म्हणाला.
जसा
मी, तशी तू
माझ्यासारखीच
आहेस तू
दुनिया
ही अशीच आहे
उभी
आडवी मुलामी आहे.
विचार
एकच प्रश्न स्वत:ला
‘जाणूनबुजून
तू दुखावलं नाहीस ना कोणाला?
त्याच उत्तर नाही आलं, तरचं मी पुढचं सांगीन.
आधीच विचार करून करून विस्कटलेला तो जीव. आणखीन
आठवू लागला, काय झालं, काय चुकलं माझं. तसं कधीतरी स्पष्ट मत मांडलेलं आठवलं.
त्याने कुठे काय बिघडलं. कदाचित ते खटकलं असेल. इतरांची वर्तणूक तपासली गेली.
जवळपास प्रत्येकीचं कधीतरी काहीतरी चुकीचं
बोलणं वागणं होतचं होतं सगळ्यांच. कोणी मनावर घेतं का लगेचं. दुर्लक्ष केलं जातं.
अलकाने त्याला सांगितलं. “मुद्दाम नाही मी कोणा दुखावलं.”
मला
वाटलंच होतं
तू
तसं नाही वागणार.
आता
ऐक,
असे
तुझ्यासारखे उगीचच
जे ढकलले जातात ना
त्यांच्या जवळ जातो मी
सावरायला त्यांना.
असतात असेच बरेच जण
नाकारलेले विनाकारण
नाकारलं जरी अस्तित्व
तरी धीराने जपतात ते स्वत्व
जसा मी, तसा तो,
जशी तू, तशी ती
अगदी खरं आहे तुझं
वाईट नक्कीच वाटणार तुला
कोण कधी कसं वागेल?
ते आधी कळतं का कोणाला?
‘मित्र मेल्यापेक्षा मैत्री मेल्याचं दु:ख जास्त असतं’
हे तुला चांगलेच ज्ञात आहे.
‘वेळ आली, तर तू खूप खंबीरपणे घेशील.’
हे मला तुझ्याबद्दल ज्ञात आहे.
म्हणून तर मी तुझ्याकडे आलो आहे.
तो बोलत होता, अलकाची पुन्हा तंद्री लागली.
कधीतरी वाचलेलं आठवलं.... “ मंदिराच्या पायथ्याशी खूप माणसे असतात. जसं जसं वर
चढायला सुरवात होते. तशी काही गळतात. वर चढून जाणे नाही जमत कोणाकोणाला. थांबतात
बिचारे खाली. सर्वांनी वर पर्यंत कळसाला हात लावायला जावं असा काही नियम नाही या
जगाचा. ज्याला जायचं तो जाईल. मधेच नको वाटलं तर येईलं खाली. असाच एक खालून वर
चढतो. मध्यावर गेल्यावर मागे बघतो. अगदी थोडी माणसे येतं असतात बरोबर. पुन्हा सुरु
होतं वरवर सरकणे. मधेच कोणीतरी त्याला
खालून दगड मारतो. तेंव्हा मात्र रागाने बघतो वळून. लक्षात येते, कोणी दगड मारला
ते. कारण इतर काहीजण त्याला रागवीत असतात. तर काही त्याच्याकडे बघून हसत असतात.
संतापाची एक लहर मस्तकात जाते. क्षणिक वाटतं, झरझर खाली यावं आणि विचारावा जाब
त्याला. ‘काय घोडं मारलं मी तुझं, मला दगड मारतोस ते.’ पण, ते फक्त क्षणिकच.
पुन्हा दुसरं मन बोलून गेलं. तू आणखीन वर जा, तेही भरभर. की त्या उंचीवर त्याला
दगड देखील मारता येणार नाही. मान वर करून तुझ्याकडे बघताना त्याचीच मान दुखेल.
अशांच्या नादी नाही लागायचं. आपलं आपण पुढे पुढे जायचं. आले इतर बरोबर तर उत्तमच.
सोबत मिळेल. आणि नाही आलं कोणी तर एकला जीव सदाशिव. चलं, नको घुटमळूस.”
तो बोलतच होता. अलका सुद्धा त्याचं सांगण
मनापासून ऐकू लागली.
तुझ्या झोळीतलं यश तसं नाही
खूप मोठ
ही
तर सुरवात आहे, हे तुलाही ठावूक होतं
तुझ्यामागून
येणं त्यांना जमतं नव्हतं
मागून
चिखलफेक करणं सर्वात सोपं होतं
तू
होतीस पुढं, तुला नाही दिसलं
तुझ्यामागे
तुला, कोण किती हसलं
एक
लक्षात ठेव कायम मनी
आता
सांगितलेलं सुंदर गाण
पिल्लाला
जसं समजलं त्याचं वेगळेपण
तसंच,
तुही ओळखून वाग तुझेही वेगळेपण
आहे
थोडं वेगळं, देवानं दीधलं
फुलवल
तसं फुललं, मन तुझं रमलं
होतं
आत दडलेलं, हळूच बाहेर डोकावलं
वाचणाऱ्याच्या
आयुष्यात आनंद वाटत सुटलं
आठवं
तू तो इतिहास
कधीतरी वाचलेला
अनुभवाचे
बोलं,
कोणीतरी सांगितलेला
अनेकांना
झेलाव्या लागलेल्या,
मनस्तापाच्या खपल्या ओल्या
जिथे असते वेगळेपण,
तिथे
भोगावे लागते बोचरेपण
नसतो
त्यांचा काहीच अपराध
फक्त
दुसऱ्यांचा दुस्वास त्रास
त्या वेगळ्याला त्याचं अप्रूप नसतं
पण
अशांच्याच माथी मारलं जातं
या
गोष्टींना महत्व द्यायचं नसतं
अनुभवातून
काहीतरी शिकायचं असतं
कामाला
बांधून घ्यायचं असतं
सुटलेलं,
तुटलेलं दूर फेकायचं असतं
स्वत:च
वेगळेपण जपायचं असतं
ज्यांनी
जपलं आपलं वेगळेपण
अशा
काहींच्या हातून
खूप
काही वेगळं ही घडलं
आणि
म्हणूनचं गं... समज तू....
पुढे
तुझ्या हातून घडण्यासाठी काहीतरी
तुझं
वेगळेपण समजून वाग निदान आतातरी
होऊन
जा तू ही एक राजहंस
डौलाची
चाल, ताठ मान
यशाचं
शिखरं, मानाचं पान
कदाचित,
तू होणारही नाहीस राजहंस
नाही
झालीस राजहंस तरी चालेल
पण,
तुझ्या समोर बंद केलेल्या
दरवाज्याकडे
ढुंकूनही बघू नकोस
तुझ्या
दिशेने उडवलेल्या चिखलात
तू
पाय ठेवू नकोस. तू पाय ठेवू नकोस.
वंदना धर्माधिकारी
M: 09890623915
Excellent collection
ReplyDeleteThanks!
ReplyDeleteNice article
ReplyDeleteVery nice .Keep it up.
ReplyDeleteअशी वागणूक अशांना मिळते जिथे काही अधिक चांगले असते. अशा त्रासातून गदिमा सुटले नाहीत तिथे सामन्यांची कोण कदर करणार? खरं आहे.
ReplyDeleteचालायचेच. पोटदुखी असते इतरांची. लक्ष द्यायचे नसते.
ReplyDelete