Saturday, March 15, 2014

43. LOksatta - Chaturang - कशी आहे मी

लोकसत्ता : चतुरंग : लेखमाला : फक्त तीन शब्द
कशी आहे मी?’
लेखिका :  सौ.वंदना विजय धर्माधिकारी

                  धावत येऊन विचारला आरशाला प्रश्न
                  बावळट, मूर्ख, तर कधी वेडी शहाणी  
                  घरातल्या साऱ्यांचीच मते किती भिन्न
                  मला नाही समजत, मी होते सुन्न
                  अशी का तशी? कशी आहे मी?
                  तू सांगशील तेच खरं, तेच मला मान्य




या चिमुरडीला प्रश्न पडायचे कधी सोपे कधी अवघड. उभी रहायची आरशापुढे. आरशातली ‘ती’ गोष्टी सांगायची. काहीतरी मिळताचं स्वारी खुशीत खेळायला धावायची. आरशात असतं प्रतिबिंब, त्याच्याशी संवाद? त्यानं काय होत? प्रश्न्नाच उत्तर सापडतं?

“आई गं ...” जोराची हाक ऐकताच शांताबाई दचकल्याच. काय झालं म्हणत आवाजाच्या दिशेने पळाल्या. खोलीच दार नुसतं ढकललेलं. साडेतीन वर्षाची अलका आईला पाहताच बिलगली. मोठ्ठा भोकाड पसरला. बाबांनी आणलेला मोठ्ठा पावडरचा संपूर्ण डबा आपल्या अंगावर ओतला होता, आणि ‘मी कशी दिसते’ बघायला आरशासमोर जाताच घाबरगुंडी झाली.
“इतकी पावडर ? हे काय ?” आईने पदरानंच तोंड पुसलं.                                  
वाहतं नाक फुरफुरलं “ ताई पावडर लावून गोरी झाली ना. म्हणून मी” उंउं  ....                 
“ असं नसतं राणी.”
“ होच मुळी. सगळे म्हणतात काळी काळी अलका. मी पावडर लावणार.”
शांताबाईना गलबलून आलं. “तू काळी आहेस, म्हणून जास्त छान आहेस. लाडोबा आहेस माझी.”
झरकन अलकाला कुशीत ओढलं, पापे घेतले. तेंव्हाचं ते आईने कुशीत घेणं, पापे घेणं, लाडोबा जाहीर करणं तिला आयुष्यभर पुरलं. अलकाने आपला काळा रंग इतक्या लहान वयात स्वीकारला. जे आपण बदलू शकत नाही त्याचा बिनशर्त स्वीकार हवाच. वाड्यात कुठूनही ‘ये काळे’ अशी हाक येताच ‘आलेच रे’ म्हणून धावयाची जोमानं.

कुणी कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीतजास्त कसं नसावं हे नक्कीच अत्यंत महत्वाचं असतं. कसं नसावं हे कोरूनच सुंदर घडवायचे असते स्वत:ला आयुष्यभर. “मी कशी/कसा आहे?” याचं मोजमाप रंगरुपापेक्षा स्वभाव आणि वागणूक यानेच मोजलं जाणार याची तीव्र जाणीव माणूस बनायची पहिली पायरी म्हणावी.  मनातलं आपलं दर्शन धूसर असतं. तेथे प्रतिमा नसते, चेहराही नसतो. असतात फक्त शब्द. ‘मी शहाणी आहे’, ‘मी धीट आहे’, अशी विशेषणे चिकटवली जातात. विचार घोळवले जातात आणि प्रश्न पडतो “खरचं मी तशी आहे का?” याला ‘हो’ म्हणताना पटकन ‘नाही’च पुढं येते. ‘हो’ म्हणून घ्यायचेचं असेल तर नक्कीच चुकीच्या वागण्यात सुधारणा केली जातेच. तरचं ‘मी एक चांगला मुलगा आहे’. हे वाक्य उच्चारले जाते. चांगले विचारांच्या अनुषंगाने आपल्या आंतरिक शक्तीला नक्की काय हवे याची जाणीव होते. आपोआप वागणं, बोलणं चांगुलपणाकडे झुकू लागते. निर्भीडपणे स्वत:च्या प्रतिमेच्या नजरेला नजर भिडते आणि सुधारायची प्रक्रिया सुरु होते. त्याचक्षणी शब्द उमटतात, “मी अशी आहे, यापेक्षा मला असं व्हायचं, काय काय करू” प्रश्नांकित चेहरा आरसा वाचतो, बघताबघता मार्ग सुचतो. यामध्ये  सातत्य लागते, मार्गदर्शनाने इप्सित लवकर साध्य होते.

बदलापूर्वीचा  स्वस्वीकार खूप मोलाचा असतो. आपणच आपल्याला नाकारलं तर प्रगती होणारच नाही. जो स्वत:वर प्रेम करू शकतो, तोच इतरांवर प्रेम करेल. दुर्गुणांसह स्वस्वीकार असलेला सहज इतरांना त्यांच्या दोषांसकट आपलेसे करू पाहतो. मन फार रगेल असतं, वरवर  म्हणतं, ‘बरं, मी बदलेन.’ पण प्रत्यक्षात अवघड जाते. स्वस्वीकारात श्रीगणेशा असतो. आपली श्रद्धास्थाने मनोभावे पुजली जातात.  माझ्यातील दोष, कमीपणा, नकारात्मकता, सर्व मर्मस्थाने मीच उत्तम जाणू शकतो. स्वत:चे वाईट वागणे आरशातील प्रतिमेला नजर भिडवू देत नाही. वाईटचा त्याग हवाच, म्हणता स्वच्छता मोहीम घेतली जाते.  जिद्द घट्ट होताना, आत्मपरीक्षण होतेच. मी इतर कुणाला आवडो, अथवा ना आवडो. पण मी मला आवडलेच पाहिजे. मला माझ्या नजरेला नजर भिडवता आलीच पाहिजे. इथेच ध्येयाची वाट सापडून मार्गक्रमणा सुरु होते. प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारे, मुळापासून हलविणारे क्षण येतातच अधून मधून. तेच गुरु बनतात. असे कोणीतरी येईल आणि मी बदलेन असे म्हणून चालत नाही.  गुरूच्या भूमिकेत कधी घरातली, जवळची माणसे तसेच एखादा प्रसंग, पुस्तक, घटना, सिनेमा, वा अन्य काही येऊ शकते. बदलाच्या वाऱ्याला दिशा दिली जाते सगळ्यांकडून. सद्सद्विवेकबुद्धी जागृत केली जाते. बरेचदा परिस्थिती आड येते. आत्मबळाची  कसोटी साशंक होते.  एक मात्र चांगलं आहे. आपल्या अपयशाचं, असल्यानसल्याचं  खापर देवाच्या माथी फोडायला आपण तयार असतोच सदोदित. आणि तो देव, कसे ही असलोत आपण तरी स्वीकारायला राजी असतोच.

तरुण संदीपचेच बघा. काय झाल? तो आळशी, झोपाळू, अभ्यासातही बेताचाच. कायम घरच्यांची बोलणी खाणारा. एकदिवस जोरचं वाजलं घरात. वडिलांनी पूर्ण तोंडसुख घेतलं. आईने फोडणीही घातली. हाणूनपाडून वाट्टेल तसे बोलले. संदीपला अपमान असह्य झाला, त्याचाही पारा चढला, “ मी आहे हा असा आहे. त्यात माझा काय दोष? तुम्हीच वाढवलेत कायकाय खाऊपिऊ घालून. त्यावर तर पोसलो मी. आणि तुम्हीच ओरडता माझ्यानावाने. काही सांगू नका मला. तुम्हीच जरा आरशात जाऊन बघा स्वत:ला.” मुलाचं वक्तव्य ऐकून आईबाबा वरमले, काहीतरी कुजतयं आपल्यातच दोघांनी जाणलं. मोठ्यांच्या चुकांची कबुली लहानांकडे कशी द्यायची? दोघे गप्प बसले. संदीपने “माझा मीच शिल्पकार होणार” असे ठरवले.  बाथरूमचे दार बंद करून घेतलं. बसला आरशात स्वत:ला बघतं. संताप निवळला. काहीतरी फेकून द्यायचं निश्चयाने ठरवलं, तेंव्हाच काहीतरी कोरायचं पक्क झालं. मनावर घेतलं तर नक्कीच मी मला हवा तसा होऊ शकेन, हे जाणवलं. यासाठी सातत्याने प्रयत्न करायचे ठरलं. घाण साफ करायची म्हणताच मस्त शॉवर घेतला, झुलपं  उडवली, तुषारांनी अर्वांगावर  उत्साहाचे रोमांच उभे राहिले, मंद शीळ घुमली आतबाहेर. “मी इतरांना आवडतो की नाही, हे मला माहित नाही. पण मला मी नक्कीच आवडेन असेच मी वागणार, करणार. मी चुकलो असेन, पण मी मनाने वाईट नाही. एक चांगला माणूस बनून दाखवेन सगळ्यांना. विश्वास ठेवा माझ्यावर. ठेवला विश्वास तर मी लवकर फुलेन. इतकचं.”

आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रीयांना स्वत:ला घडूच दिलेलं नाही. कुजतात बिचाऱ्या. बायकांना कोंडलं जातं घरात. घरकाम, चुलमूल यातच आयुष्याची इतिश्री होते. काहीजणींच्या आयुष्यात अचानक सर्व जबाबदारी घ्यायची वेळ येते. उत्तम तऱ्हेने घरदार, मुलं, संसार, व्यवसाय, नोकरी सारेकाही सांभाळतात. त्यांनाच आश्चर्य वाटते की मी हे करू शकते? सांभाळू शकते? मग, पूर्वी का नाही करू दिलं मला? नुसती कठपुतली म्हणून पुढेमागे नाचले. स्वत:चाच राग येतो अशावेळी. इथे, ‘मी कशी आहे’, हे एखाद्या स्त्रीने ओळखले असले तरी ती ते करू शकत नाही ही एक शोकांतिका आहे. आज आपल्याच देशात राजकारणासह  अनेक क्षेत्रात विधवा महिलांचे योगदान मोलाचे दिसते.  स्त्रीशक्तीचा स्वीकार होत नाही, तिला डावललं जाते. स्त्रीला चांगल्या पद्धतीने जगूच  देत नाहीत. स्त्री फक्त स्वत:ला प्रश्न विचारीत असते, तेही आतल्याआत. ‘मी कशी आहे, मला असं व्हायचंय... पण, हे नाही म्हणतात’ आणि गाडी थांबते. 

आपलं काय होतं? जागेपणी दुसऱ्याचाच विचार करतो कायम. शब्दांची रेलचेल नुसती. त्याऐवजी आपलंच मन वाचलं तर? कधीकधी राहावं आपण एकटेच, गोंगाटापासून दूर. मनापासून पुसलं जातं माझं मलाच. नव्याने आपलंच एखादं रहस्य उलगडतं. सापडतात काही लपलेले खजिने,  धावता धावता खाली गाडलेले. उघडली जातात भारलेली तावदाने, चकाकतात पैलूदार हिरे. दिपून जातात डोळे तेजाने. आश्चर्य वाटलं तरी विश्वास बसतो त्यावर. हे माझेच धन आहे. वर्षानुवर्षे बघितलंच नाही, त्या गुणांचे आस्तित्व मला जाणवलं देखील नाही. चुकलं माझंच, दुर्लक्षच केलं मी माझ्याकडे. आता मात्र मी फुलणार. आणि हसून सांगणार  त्याला ‘मी अशी सुद्धा आहे. सुंदर सुंदर!!’

असं असलं तरीपण. “मी कशी/कसा  आहे”,  हे दुसऱ्याला आपणहून सांगायची गरज नाही. का म्हणून सांगत सुटायचं जगाला आपल्याबद्दल? त्यातल्या गोष्टींचं इतरांसमोर प्रदर्शन नसतं मांडायचं. माझ्यात काही अदभूतही असेल, इतरांना न उलगडणारं, न समजणार.  अशावेळी  सांगितलं सगळ्यांना  तर कदाचित खोट वाटेल, चेष्टा करतील माझीच. काय सांगा, माझा आत्मविश्वास डळमळेल. आपणच खोटे ठरू. कोणालाही सांगायला नकोच. लाखमोलाचं माझं मीपण माझ्याजवळ. सांभाळेन माझं आत्मभान. मला मी आवडते. खूप प्रेम करते माझ्यावर. छान आहे मी!!!

वंदना धर्माधिकारी
vandana10d@yahoo.co.in


     



.























Saturday, February 1, 2014

46. Loksatta - Chaturang - तू नसताना मी

01-02-2014
लोकसत्ता : चतुरंग : लेखमाला : फक्त तीन शब्द
तू नसताना मी
लेखिका : सौ.वंदना विजय धर्माधिकारी

अगदी परवाचीच गोष्ट. पाहुणे आलेले घरी. मस्त गप्पा रंगल्या मधेच  एकेकजण झोपायला गेला. शेवटी मी स्वयंपाकघरात डोकावून आत जावून बघते तो काय, सगळे ढाराढूर. मला हि खूप झोप आलेली,पण माझी उशी कुणीतरी घेतलेली. मी मनात बोलून गेले “अगं उशी गं उशी, तू नसताना मी झोपू तरी कशी?”

जसं उशीच तसं कितीतरी होतंच. सवयीचे गुलाम आपण, दुसरं काय.  हातात मोबाईल नसेल तर अस्वस्थ होतातच. गाडी  एखादे दिवशी सर्व्हिसिंगला दिली कि लगेच, गाडी नसताना मी जाऊ तरी कशी? इतर वाहने, रिक्षा, बस, लोकल आहे ना, आणि नसेल सोयीस्कर तर दोन पाय आहेतच की शाबूत. पण छे, पडणार नाही बाहेर. घरात, लाईट नाही म्हणजे टीव्ही, इंटरनेट, laptop नाही. करमणार कसं?

खरं तर माणूस येताना एकटा येतो, आल्यावर  गोतावळा गोळा करीत फाफट पसाऱ्यात जगतो. प्रत्येकात कणकण जीव अडकतो म्हणूनच उठताबसता म्हणतं राहतो. “पेपर नाही टाकला, उठल्याउठल्या चुकल्यासारखं झालं.” “गॅस नाही स्वयंपाक कसा करू?” “दूधच नासलं आज, चहा कसा मिळणार?”
“अरे,अरे, मिठा, तू नसताना मी भाजी गिळू तरी कशी?” आहे ना गंमत. अडकावं कशाला इतक्या सर्वत्र? थोडं खुट्ट झालं कि बिनसलं. इतक्या वर्षांची जुनी सवय अशी थोडीच मोडणार.

अशी या निर्जीव वस्तूंमध्ये अडकणारी आपण माणसे, आपापसात गुंतलो नाही तरच नवल. बाळाला
पंहिल्या श्वासालाच भेटतात सगळी नाती. वाढत्या वयाबरोबर नातीही फुलतात. आई करते, “बुवा s s कू.. क!” तोंडावर धरलेला आपलाच हात. बाळाचा चेहरा कावराबावरा. जणू म्हणतं, “आई गं, तू नसताना मी...आं आं आं S .” किती अल्पावधीसाठी हात धरला चेहऱ्यावर. इथे लहानग्याला आई नसतानाची भावना रडायला लावते. असं का होतं? कुठेतरी गुंतलेला धागा अडकतो, तुटेल अशी भीती वाटते, रडू कोसळतं.

खरं पाहता, कोणाचंच कोणावाचून काहीही आडत नाही. थोडा वेळ, काही दिवस अनुपस्थिती जाणवते. हळू
हळू आपोआप सगळं सुरळीतहोते.  परंतू, त्या मधल्या काळातील मनाची  अस्वस्थता असह्य भयानक होते. वास्तव स्वीकारले जात नाही. आपल्या आयुष्यातील महत्वाचे क्षण वाया घालवले जातात इतकंच.  काळ हेच सर्वावर औषधं असल्याने, कालांतराने पडदा पडतो. थोड्या दिवसांसाठी, किंवा कायमस्वरूपी गेलेल्या व्यक्तीचे स्थान मनातल्या मनात अबाधिक राहू शकते. फक्त जागा बदलते. आधी वावर होता,
सहवास होता, आता फक्त मनातल्या कोप-यात निवास उरला. असं मनाला समाजवलं तर म्हणता येते, “तू नसल्याची  भावना मला बोथट करता येत नाही, फक्त त्या भावनांबरोबर हिंदोळायाचं नाही असं ठरवलं मी आणि पूर्वीसारखे वागू लागले.” अगदी चांगला आहे हा विचार. नसलेल्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावायचं नसतं. भूतकाळातील आठवणींमुळे वर्तमानातला क्षण सोडायचा नसतो. आपल्यालाही मोजकेच श्वास दिलेले आहेत, याच भान ठेवून समोरचा क्षण जिवंतपणे स्वीकारला की धीर वाढतो, क्लेश जाणवत नाहीत.  अशीच व्यक्ती म्हणू शकते, “ तू असताना मी एक झंझावाती वादळ होते, तू नसतानाही तशीच आहे. जेंव्हा केंव्हा वादळ  शमतं तेंव्हा थकून भाकून  तुझ्याजवळ विसाव्याला येतं हे नक्की.”

तर काहींच्या बाबतीत भयानक घडतं. अवास्तव अपेक्षा, स्वत:बद्दलचा ओव्हर कॉन्फिडन्स, बेफिकीर वृत्ती ताब्यात ठेवणं जमतंच असे नाही. हवं ते मिळवण्यासाठीची हट्टी मन वाट्टेल त्या मार्गाने धडपड करतं . काय सांगा अशावेळी वाईट मार्गाने पाहिजे ते मिळवताना कोणाची पर्वा केली जात नाही.  माणुसकीला काळिमा नुसता. वाचताना हळहळतात सगळे, “ एकतर्फी प्रेमात, ती नसताना मी जगूच शकत नाही, ती माझी नाही तर कोणाचीही  नाही. प्रेयसीचा खून आणि आत्महत्या ” किती ही अमानुषता.

कधी काय होईल सांगता येत नाही. क्वचित एखाद्याचं नसणे सार्वजनिक होऊ शकतं. हेच पहा ना. आपल्या सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि तमाम भारतीयांना क्रिकेटची काळजी पडली. शेजारच्या नंदूने तर सचिनला इमेल केला, “ तू नसताना मी मॅच बघू शकणार नाही. मला ती शिक्षा वाटेल.”

कोण एका घरी काय झालं सांगते. रेखा, हुषार आणि करिअरिस्ट. तिला अधूनमधून जावं लागायचं बाहेर परगावी किंवा परदेशात सुद्धा. जाताना तिच्या आपल्या सूचनांवर सूचना हे नेहमीचच झालं. तेंव्हा शशांक, तिचा नवरा तिला म्हणाला, “तू नसताना माझी मुलांशी  मस्त ए वन मेतकुट जमलं.  वेव्ह लेंध जुळल्याने मोकळेपणा आला नात्यात. नाहीतर आई असायचीच मध्येमध्ये. बघशीलच, तू नसताना मी कसं छान मॅनेज   केलं घर. अर्थात तुझी आठवण पदोपदी. गप्पात तूच. तुला सांगतो, गरज असेल तेंव्हा तू जात जा. तुलाही तुझं करिअर आहेच की. तुझी वाट बघत आहोत सगळे.” स्त्रीयांना इतकी मोकळीक देऊन करिअर करताना साथ देणारे थोडेच आहेत.

माणसांचा एकमेकांचा सहवास प्रत्येकाच्या मानसिकतेवर, परीपक्वतेवर, विचारधारेवर परिणाम करतो. थोड्या काळाचा दुरावा देखील बोलून जातो. बाई वर्गात नसताना कुठल्याच शाळेतली मुले वर्गात शांत बसत नाहीत. ऑफिसमध्येही तेच चित्र. बॉस खडूस असेल तर बाहेर जायची वाट बघतात सगळेजण, आणि तो जाताच  सुटतात एकामागून एक. शाळा, ऑफिस, घर फरक काहीच नाही. घरात सुद्धा बाबांचा धाक इतका की, ते यायच्या वेळेला एकदम चिडीचूप होते, मुलं अभ्यासाला बसतात, ती कामात गर्क असते. अशाने घराचे स्पष्ट चित्र बाबांना कळतच नाही.

एखाद्याच्या आयुष्यात ‘तू नसताना’ सुखावह होते. आमची कामवाली खूप कष्ट करायची. शिवाय मार
खायची. तो गेला आणि सहज सखुबाई बोलली परवा, “गुरावाणी  बडवायचास मला. लाथा बुक्यांनी मारलस. मी आणि पोरं नुसती रडयाचोत. तुला यायचा चेव. का रडता म्हणतं लाथा  घालायचास कंबरेत. मुडद्या मेल्या, नरकात गेलास. आता, तू नसताना मी मजेत आहे. मी, माझी मुलं, माझं घर सारे सुखात आहोत. आनंदोत्सव साजरा करतो आम्ही.” किती वाईट बोलते. पण सत्य आहे. सहनशीलतेलाही मर्यादा असतातच. सुटली सखुबाई कायमची. लोकं असं का वागतात, आपल्याच बायकोशी?

अशी ही नाती आणि त्यांचे घट्ट जाळे. नात्यानात्याचे धागे भक्कम असतात, म्हणून तर सगळं कसं सुरळीत होतं आयुष्यात. एखादा धागा सैल पडला, तुटला, निसटला तर जाळ्याची विण कमकुवत होते,
कुरकुरू लागते. टांगणीला लागतो जीव. सगळेच अनुभवतात हे असलं जीणं. हा नियम सगळ्यांना सारखाच. प्रसंगात बदल आणि वस्तू किंवा व्यक्ती वेगवेगळी. तो, ती, आणि ते नसताना मी नीट राहू शकत नाही, एव्हढेच. जवळ असताना किंमत कळत नाही, दूर गेल्यावर चैन पडत नाही. बरोबर जगताना, प्रेम करायचं, समजून घ्यायचं, चुकलं तर माफ करायचं असतं. त्याऐवजी आपलाच अहं कुरवाळत बसतात सगळे. नंतर स्वत:चा रागराग करीत जगतात. येणारा जाणारच कधीतरी. भेटलेला दुरावणारच. आपलं वागणं तर असतं आपापल्या हातात. गेलेले-दुरावलेले  मनात असतात ठाण मांडून. त्यांनाच विचारायचं, “तू नसताना मी काय कसं करू?”

अवघड असतं आपल्या माणसाला सोडून राहणं. आपलं म्हंटल की नाते कुठलेही असो. तरीही पतीपत्नीच्या नात्यात मागे उरलेल्याची हालत फार वाईट होते. कोण पुढे जाणार यांत शर्यत लागते. माझ्या विना तू कसा राहशील, तुझे कोण काय बघेल, ही विवंचना छळते आतल्याआत. कशी सांगावी ती कुतरओढ ? माझ्याच एका कवितेसारखी तर असते ती. बघा जरा, पटते कां?     

संसाराचा किती वर्षं  खेळला त्यांनी सारीपाट
तरीपण दोघांना जाता येत नाही पाठोपाठ
“ तू थांब मागं, मला जावं  लागेल पुढं”
दोघेजण दामटत होते आपलं आपलं घोड.

            देवाच्या हिशोबी दोघांचेही हिशोबच वेगळे
            बेरीज, वजाबाकी, गुणाकार करून उरलेल्याला भागलं
            ज्याचं  गणित बरोबर त्याला अलगद उचललं
            खूप विचार केला, वाटलं सारकाही संपलं.

रडलं, भाकलं, ओरडलं, आरडलं नंतर मात्र स्थिरावलं
पुढे गेलेल्याला काय वाटेल? मीच मनाला दटावलं
तेंव्हा कुठे माझं मला थोडाफार उमजलं
“तू नसताना मी,” आहे त्यातच सूख मानायचं ठरवलं.


वंदना धर्माधिकारी
vandana10d@yahoo.co.in  M: 9890623915.




Wednesday, January 1, 2014

45. Loksatta - Chaturang - गुंता कसा सोडवायचा

01-03-2014
लोकसत्ता : चतुरंग पुरवणी : लेखमाला : फक्त तीन शब्द :
गुंता कसा सोडवायचा?????
लेखिका : सौ.वंदना विजय धर्माधिकारी

घर आवरताआवरता खूप लोकर सापडली सीमाला. व्वाव! याचं काहीतरी छान करणार.  पाहते  तर काय? फारच गुंतलेली होती लोकर. ठेवली बाजूला. ‘सोडविण नंतर’, असे म्हणत आठ दिवस गेले. सीमाने मधूनमधून गुंता सोडवायचा प्रयत्न केला. विशेष काही घडलंच नाही.

रविवार उजाडला आणि  सीमाची आई आणि आजी तिच्याकडे आल्या. कोप-यात पसरलेल्या लोकरीकडे नजर जाताच आजीने ताबा घेतला तिचा. गुडघ्यात अडकवून, आतून घाल, वरून काढ, कधी या रंगाचा तर कधी दुसऱ्या रंगाचा हातात. करताकरता  दोनतीन गुंडे तयारही झाले. सीमाने ते पहिले आणि चिकटली आजीला.
“अगं सीमा, किती लोकर कापलीस गं भराभरा.”
“मंग काय करू? सुटत नव्हता गुंता.”
 “म्हणून काय झालं? कापल्यावर संपत गं. जोडला धागा तरी गाठ राहतेच. वीणही सलग होत नाही अशावेळी.”

“किती गुंता तिचा. मला नाही इतका वेळ. नाही सुटला. लावली कात्री. एकसारखे धागे बांधले परत. मी केलाय एक गुंडा.” असं म्हणून सीमाने आठवडा भरात सोडवलेला गुंडा दाखवला. आजीने हातात घेतला मात्र, स्वत:च्या हातातली लोकर टाकली बाजूला. “सीमा, असं नसतं करायचं. किती घट्ट गुंडाळलीस लोकर. जरा मोकळीक हवी धाग्याधाग्यांमध्ये सैलसर. हवा  खेळली पाहिजे त्यातून. किती गाठी लागतात हाताला. पेशन्स पाहिजेत गुंता सोडवायला. मी केलेला बघ.”
“ काय बघू आता?”
“ अशी जवळ ये. काम ठेव बाजूला. अगं, गुंता, मंग तो कुठलाही असो, सोडवायचा प्रयत्न करायचा. ह्या लोकरीचा, घरातल्या पसाऱ्याचा, ऑफिसमधल्या कामाचा आणि आपल्या नात्यानात्याचा. इतकंच कशाला आपल्या भावनिक गुंतागुंतीचा. सोडवताना कुठे काही तुटणार नाही, धक्का लागणार नाही अशाप्रकारे हळुवार हाताने, ओलेत्याने सोडवला की  तोडफोड होत नाही गं.”
“ काय सुंदर बोलतेस तू आजी. किती छान विचार तुझे.”
“ सुविचार नुसते वाचायचे नसतात.  अंगीकारायचे. नात्यानात्यात देवाणघेवाण, तुझं माझं होतचं आणि गैरसमजांचा गुंता वाढतच जातो. वाढवला तर सुटायला अवघड जातो. एखादी निरगाठ बसते. ही बघ दोन लोकरींची कशी बसली. तरीही अलगद सुईने मी काढते की नाही बघंच. जरा वेळ दे मला.”

“ माणूस प्रेमाच्या धाग्याने बांधलेला आहे म्हणून गुंतत जातो  सगळ्यांमध्ये. जीवापाड जपलं नातं  म्हणजे आयुष्य कसं मऊशार, उबदार, होत. छान वाटतं. तसंच मनाचं. प्रेमाच्या शब्दांनी सुखावतात. खाडखाड आवाज करीत फेकलेले शब्द चिरा पाडतात खोलवर. सबुरीनं केले की होतं सगळं ठाकठीक. धीराने घ्यावं लागतं सगळं प्रत्येकवेळी.”

ऐकता ऐकता एकीकडे आईने अलगद गुंता सोडवून एक रंग वेगळा केला.

“ बघं, माझ्या मुलीला जमलं. नातीला का नाही जमणार? शिकं पोरी. खूप अर्थ आहे त्यात. लोकर गुंडाळताना मनात विचार येतात घरादाराचे, तेथील गुंत्यांचे. सहज सुचत जातो काही तोडगा. कसं करावं, काय बोलावं, कोणाला सांगावं, समजवावं कसं. तेच तर करीत आले आयुष्यभर. हा गुंताच तुला सांगेल कसं वागायचं, बोलायचं, निस्तारायचं, ते. ‘गुंता’ आणि ‘गीता’, आहे ना साधर्म्य.  गीतेमध्ये ‘अर्जुना’च्या मनातला गुंता ‘भगवान श्रीकृष्णा’ने ‘गीता’ सांगून सोडवला. आजतागायत त्याच गीतेचे मार्गदर्शन घेतात सगळे. गुंता सोडवता आला नाही तर काय गत होते, वेगळं का सांगायला हवं? गत व्यवस्थित असताना उत्तम गती मिळते जीवनाला. गतिमान आयुष्याच्या खाचखळग्यात तग धरून जगता आलं पाहिजे आपल्याला. दोनचं अक्षरे ‘ग’ आणि ‘त’. समजली  त्यांची ताकद.”

“आजी” म्हणत सीमा आजीला बिलगली. तिच्या गतिमान जीवनातला गुंता आत टोचू लागला. त्यावर उपायही आजीच्याच बटव्यात आहे, हेही जाणवलं. एक पाऊलवाट दिसली दूर पर्यंत गेलेली अंधुकशी. प्रत्येकाला कुठेतरी टोचणारी निरगाठी असतेच, लोकरीच्या निरगाठीपेक्षा कितीतरी भयंकर. सदोदित बोचणी सहन करणं एव्हढंच उरतं आपल्या हातात. कशी सोडवायची गुंतलेली गाठ? प्रश्नही छळतात. जीव घाबरतो, सोडवायला गेलं, आणि कात्री लागली तर सगळंच अवघड, त्यापेक्षा सहन करावं. असूं देत अशीच आत ठुसठुसणारी. आजी म्हणाली, गाठ सोडवायचा  प्रयत्न केला की गुंता सुटत जातो. शब्दांच्या मऊशार रेशीम लडीची ताकद अजमावयाची असते, अशाच बिकट प्रसंगी. दीर्घ संवाद, तोही अधून मधून साधला की सैल होता होता सुटतं जातो गुंता. खालून वर किंवा वरून बाहेर सोडवतं जाताना जाणवतं, असं बोललं तर कदाचित नाही पटणार त्याला. वेगळ्या पद्धतीने बोलले तर? लेट असं ट्राय थिस वे.

धीर धरावा लागतो, म्हणाली होती आजी. आजच्या ऐवजी उद्या बोललं तर. आत्ता गडबडीत आहे  रवी. निवांत क्षणी कसं जुळून येतात धागे. उघीच घाईघाईत, चुकीच्या वेळी काहीतरी बोलायचं, अर्धवटचं राहणार सारं. सुई पण कामास येते गाठ सोडवायला. कदाचित मोठी सुई, नाहीतर दाभण लागेल मला हातात घ्यायला. आपल्याच विचारावर हसायला येतं, तशीच हळूच हसली सीमा. आत्ता नकोच. सगळाच पचका होईल. दमादमाने घेतलं तर सुटेलही दोघांच्यातलं भांडण. लोकर ओढली तर तुटते नाही का?  तशी लवकर नाही तुटतं, चिवट असते नात्यांसारखी. पण पातळ होवून विसविशीत होतो पीळ. फोर पलाय! थ्री पलाय! एखादा धागा सटकतो. नात्यातले बांध अनेक भावनांशी लगडलेले असतात. एखादा धागा निसटतोय असं जाणवताच, खेचायचा पुऱ्या ताकदीनिशी, आणि गुंफायाचं एकत्र. वीण कशी एकसारखी यायला हवी ना. मस्त!

ऑफिसमध्ये असंच काहीतरी झालं. प्रकाशने प्रेझेन्टेशन दिलं, आणि गहजबच झाला. बरंचसं चुकलेलं, घाईघाईत केलेलं, कुणालाच आवडलं नाही. सीमालाही खटकलं. त्याला थोडी मदत केली असती तर, त्याच्यावर अशी वेळ नसती आली. दोनदा प्रकाशने सीमाकडे बोलूनही दाखवले होते. आपलंच चुकलं, जाणवलं सीमाला. लोकरीच्या गुंत्यानेच सांगितलं. आपल्या धावपळीत दुसऱ्याला धक्का लागणार नाही, इजा होणार नाही हवं बघायला. ओढाओढी करून चालत नाही, दुर्लक्ष करून भागत नाही. माझी धावपळ कायमचीच. त्यातच बघायला हवेच होते प्रकाशकडे. अशक्य नव्हतं, आपलं उगीचच बिझी असल्याचा शोऑफ केला. आजी म्हणते तेच खरं.

मांडीवर डोक  ठेवलेल्या नातीला आजी गोंजारीत होती. थांबली थोडावेळ. सीमाला आतल्या आत मोकळं झालेलं पाहून आजीने सुरवात केली. “सीमा, तुम्हा मुलींचे केस कापलेले. त्यात गुंता तो काय गं! एक ब्रश फिरवला झाला मोकळा. तुला सांगते, माझे आणि नंदाताईचे असे दाट काळेभोर आणि लांबसडक केस होते. आमच्या घरात तीसएक  माणसं. आईचं वेणी घालायला हवी असं नव्हतचं. आजी, आत्या, काकू, चुलत मावस बहिणी, मावशी नाहीतर शेजारच्यापाजारच्या कोणीही घालायचं वेण्या. केसातला गुंता काढून नीट विंचरून लांबसडक दोन वेण्या रिबीन लावून वर बांधेपर्यंत प्रत्येकजण काहीतरी बोलत रहायची. अग, तिथेच शिकले मी गुंता सोडवायला. दोष तुमचा नाही. परिस्थितीचा आहे. राहावं लागतं काळाप्रमाणे. आज कळलं तुला थोडफारतरी. आणि हे बघ, लोकारीला उब असतेच. तशीच उब आयुष्यभर मिळावी तीसुद्धा प्रत्येक नात्याची. उबेचा आब असतो वेगवेगळा. जाणवत असतो आपल्याला. माया, ममता, वात्सल्य, प्रेम, मैत्री, आपलेपणा, ही रूपे उबेची. उबदार नाती असली की सकस वाढ होते. प्रयत्न कर, जमेल गुंता सोडवायला. छटा बघितल्यास या लोकारीतील एकाच रंगाच्या. नात्यातील भावनांना देखील असतात रंगछटा. स्वभावातली कुठली छटा कधी चमकेल सांगता येत नाही. ती छटा म्हणजे तो संपूर्ण माणूस नसतो. आपल्यालाच घाई होते आणि ती छटा, तो विचार, ती कृती त्या व्यक्तीशी पक्क्या धरून बसतो. एक मत मनात तयार केलं जाते त्या व्यक्तीबद्दल, आणि मंग गैरसमजांचे पेव फुटते. तसं होऊ द्यायचं नाही. यालाच म्हणतात जरा वाव देणं, स्पेस देणं. घाईघाई करून कुठे जायचे असते आपल्याला. नाहीतर होतेच ताणाताणी. हीच कसोटी असते झेलणाऱ्याची. उतरायचं असतं अशा कसोटीमधून. सिद्ध करायचं स्वत:ला. त्यावेळी मिळणारा स्वान्तसुखाय आनंद अनुभवण स्वर्ग सुखापेक्षा मोलाचं असतं. इथूनपुढे तुलाही  प्रचीती येईल. आलेली प्रचीती तुझी जीवनतत्वे  होतील, तुझी स्टाईल होईल.  कारण सांगू, आता आमची सीमा लोकरीचा गुंता सोडवायला शिकली.  कसे सांभाळून वागायचे तिला आता जमणार आहे. आपण एकटे थोडेच राहतो, आपल्यालाही सांभाळून घेणारी आपली माणसं आहेत. आपणसुद्धा असतो एक छोटासा धागा त्या गुंत्यामधला. आपलीच लोकं गुंता सोडवून घेतात आपल्यालाही जवळ.



वंदना धर्माधिकारी

M : 9890623915

























                                                               


















Monday, December 23, 2013

49. Poem - अडीच अक्षरे - कालिदास पुरस्कार

कधी कधी शब्द अगदी रुसून बसतात. काही केल्या येतचं बाहेर तर कागदावर तरी कसे उतरवणार त्यांना? असेच एकदा झालं. तसे ते रुसतात माझ्यावर. मला बँकिंगचा एक लेख द्यायचा होता. पण, काही केल्या सुचत नव्हतं, लिहीताच येत नव्हता. खरं तर, विषय सोपा, अगदी डाव्या हातचा. पण, संपावर गेलेल्यांना कसे आणायचे. त्यांच्या मागण्या होत्या का काही? समजेना. लेखासाठी ५/६ फोनही आले. “देते” म्हणून आजचं उद्यावर ढकलत गेले. बास. आणि एकदम उफाळून यावे तसे शब्द वर आले, त्यांनाच मी बांधल इथे एका कवितेत. अडीच अक्षरे. हीचं या कवितेची जन्मकहाणी. रात्री कविता उतरवून उशिरा झोपले. कारण लेख सकाळी द्यायलाच हवा होता. तो नाही झाला, अडीच अक्षरे उतरली एकदाची. परत पहाटे जाग आली, मस्त चहा घेतला आणि पटकन अक्षरशः १५/२० मिनिटात लेख लिहून ७ चे आधी ईमेलवर गेला देखील. होतं असं कधीकधी.... काय करणार. हट्ट पुरवावे लागतात शब्दांचे, कधी लेखणीचे, कधी लॅपटॉपचे, तर कधी इंटरनेटचे... आलीया भोगासी....

आणि सांगायचेच राहिलं, ‘अडीच अक्षरे’ या कवितेला ‘साहित्य प्रेमी भगिनी मंडळ, साहित्य परिषद, पुणे’ यांच्यातर्फे ‘कालिदास पुरस्कार’ मिळालेला आहे.

कविता : अडीच अक्षरे
कवयित्री : वंदना धर्माधिकारी

कोणी भरून ठेविले तेथे शब्दांचे रांजण
बाळ रांगत रांगत घेई एकेक वेचून
शब्द अडीच अक्षरे काय सांगू त्याचे गुण?
त्याचे गोडवे गायना शब्द आणू मी कोठून?१.

शब्द शब्दात मांडण्या बनविला शब्दकोष
शब्दाशब्दातून पुसे दोघा मधला तो रोष
अशी शब्दांची किमया, शब्द आहे एक कोडे
कधी सांगावया गोष्ट, एक शब्द ना सापडे ...२.

प्रेम अडीच अक्षरे, त्याला वर्णू कसे किती?
प्रेम जगता उमजे प्रेम भावना  महती
प्रेम शब्द, शब्द शब्द, दोन्ही अडीच अक्षरे
दोघे करिती शिंपण, येती आतून घुमारे  ...३.

प्रेम गुंफाया शब्दात नाही जमले कोणाला
शब्दांवरी जीवा प्रेम कवी म्हणोनी जन्मला
किती प्रयत्न करोनी कवी अपुरा ठरला
दोन्ही लिहिण्या कागदी हात मधेच थांबला....४.  


नका करू चिरफाड, जोडी अडीच दोघांची
सूक्ष्म अती, दिसू नसे, उंची आहे आभाळाची
दोन्ही हवे माणसाला, त्याले खोली सागराची
जीव आसुसतो किती, चालरीत जगण्याची ...५.

बोल बोबडे बाळाचे गोड कानात घुमती
अर्थ नसे का शब्दांना येई प्रेमाला भरती
किती उपसले जरी परी भरीला रांजण
शब्द, अर्थ, प्रेम, भाव जणू मनीचा दर्पण ...६.

वंदना धर्माधिकारी 
M : 9890623915




Sunday, October 10, 2010

18. Balachya haati adgulam madgulam

अडगुलं मडगुलं सोन्याचं कडबूलं
   रुप्याचा वाळा तीट लावा बाळाच्या कपाळाला

हे गाणं गुणगुणलं नाही, अशी मराठी स्त्री नसेल असेच वाटायचे कधी काळी. हो, आता ते कधी काळी झालं आहे ना? मला तरी असेच वाटते. कधी काळी गायलेलं जुनं झालेलं गाणे.  कोण गाणार हे असे गाणे, अगदीचं काहीतरी जुनाट गाणे. खरेचं जुन्या समजुती, जुनी भांडीकुंडी, नाती, अंथरूण पांघरूण, खेळणी आणि खेळ देखील! किती किती जुने झालेलं परत तेच तेच तेच... किती वर्षानुवर्षे वापरून खराब झालेले.

हं... खरं आहे. बदल करायलाच पाहिजे. बदल होतोच. चांगला वाईट. पण विचार करून गोष्टी बदलतात की असेच कंटाळा आला म्हणून, काहीतरी फॅड हवेचं म्हणून चांगल बिघडवायचं आणि नव्याने काहीतरी सुरु करायचं.

पण, म्हणजे तरी काय? आणि हे असे कसे... बघा वाचून. मला काही लिहीताच येत नाही कधी कधी. हे आठवलं आणि लेखणी रुसली.


वंदना
Camera is a responsive/adaptive slideshow. Try to resize the browser window
It uses a light version of jQuery mobile, navigate the slides by swiping with your fingers
It's completely free (even though a donation is appreciated)
Camera slideshow provides many options to customize your project as more as possible

Here is a video for National Webinar on IBPS Exam. Guidance by Smt.Vandana Dharmadhikari on 17th July, 2020 

vandanadharmadhikari.blogspot.com