01-02-2014
लोकसत्ता : चतुरंग : लेखमाला : फक्त तीन शब्द
तू नसताना मी
लेखिका : सौ.वंदना विजय धर्माधिकारी
अगदी परवाचीच गोष्ट. पाहुणे
आलेले घरी. मस्त गप्पा रंगल्या मधेच एकेकजण
झोपायला गेला. शेवटी मी स्वयंपाकघरात डोकावून आत जावून बघते तो काय, सगळे ढाराढूर.
मला हि खूप झोप आलेली,पण माझी उशी कुणीतरी घेतलेली. मी मनात बोलून गेले “अगं उशी
गं उशी, तू नसताना मी झोपू तरी कशी?”
जसं उशीच तसं कितीतरी
होतंच. सवयीचे गुलाम आपण, दुसरं काय.
हातात मोबाईल नसेल तर अस्वस्थ होतातच. गाडी एखादे दिवशी सर्व्हिसिंगला दिली कि लगेच, गाडी
नसताना मी जाऊ तरी कशी? इतर वाहने, रिक्षा, बस, लोकल आहे ना, आणि नसेल सोयीस्कर तर
दोन पाय आहेतच की शाबूत. पण छे, पडणार नाही बाहेर. घरात, लाईट नाही म्हणजे टीव्ही,
इंटरनेट, laptop नाही. करमणार कसं?
खरं तर माणूस येताना एकटा
येतो, आल्यावर गोतावळा गोळा करीत फाफट
पसाऱ्यात जगतो. प्रत्येकात कणकण जीव अडकतो म्हणूनच उठताबसता म्हणतं राहतो. “पेपर
नाही टाकला, उठल्याउठल्या चुकल्यासारखं झालं.” “गॅस नाही स्वयंपाक कसा करू?” “दूधच
नासलं आज, चहा कसा मिळणार?”
“अरे,अरे, मिठा, तू नसताना
मी भाजी गिळू तरी कशी?” आहे ना गंमत. अडकावं कशाला इतक्या सर्वत्र? थोडं खुट्ट
झालं कि बिनसलं. इतक्या वर्षांची जुनी सवय अशी थोडीच मोडणार.
अशी या निर्जीव वस्तूंमध्ये
अडकणारी आपण माणसे, आपापसात गुंतलो नाही तरच नवल. बाळाला
पंहिल्या श्वासालाच भेटतात
सगळी नाती. वाढत्या वयाबरोबर नातीही फुलतात. आई करते, “बुवा s s कू.. क!” तोंडावर
धरलेला आपलाच हात. बाळाचा चेहरा कावराबावरा. जणू म्हणतं, “आई गं, तू नसताना
मी...आं आं आं S .” किती अल्पावधीसाठी हात धरला चेहऱ्यावर. इथे लहानग्याला आई
नसतानाची भावना रडायला लावते. असं का होतं? कुठेतरी गुंतलेला धागा अडकतो, तुटेल
अशी भीती वाटते, रडू कोसळतं.
खरं पाहता, कोणाचंच
कोणावाचून काहीही आडत नाही. थोडा वेळ, काही दिवस अनुपस्थिती जाणवते. हळू
हळू आपोआप सगळं सुरळीतहोते.
परंतू, त्या मधल्या काळातील मनाची अस्वस्थता असह्य भयानक होते. वास्तव स्वीकारले
जात नाही. आपल्या आयुष्यातील महत्वाचे क्षण वाया घालवले जातात इतकंच. काळ हेच सर्वावर औषधं असल्याने, कालांतराने पडदा
पडतो. थोड्या दिवसांसाठी, किंवा कायमस्वरूपी गेलेल्या व्यक्तीचे स्थान मनातल्या
मनात अबाधिक राहू शकते. फक्त जागा बदलते. आधी वावर होता,
सहवास होता, आता फक्त
मनातल्या कोप-यात निवास उरला. असं मनाला समाजवलं तर म्हणता येते, “तू
नसल्याची भावना मला बोथट करता येत नाही,
फक्त त्या भावनांबरोबर हिंदोळायाचं नाही असं ठरवलं मी आणि पूर्वीसारखे वागू
लागले.” अगदी चांगला आहे हा विचार. नसलेल्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावायचं नसतं.
भूतकाळातील आठवणींमुळे वर्तमानातला क्षण सोडायचा नसतो. आपल्यालाही मोजकेच श्वास
दिलेले आहेत, याच भान ठेवून समोरचा क्षण जिवंतपणे स्वीकारला की धीर वाढतो, क्लेश
जाणवत नाहीत. अशीच व्यक्ती म्हणू शकते, “
तू असताना मी एक झंझावाती वादळ होते, तू नसतानाही तशीच आहे. जेंव्हा केंव्हा
वादळ शमतं तेंव्हा थकून भाकून तुझ्याजवळ विसाव्याला येतं हे नक्की.”
तर काहींच्या बाबतीत भयानक
घडतं. अवास्तव अपेक्षा, स्वत:बद्दलचा ओव्हर कॉन्फिडन्स, बेफिकीर वृत्ती ताब्यात
ठेवणं जमतंच असे नाही. हवं ते मिळवण्यासाठीची हट्टी मन वाट्टेल त्या मार्गाने धडपड
करतं . काय सांगा अशावेळी वाईट मार्गाने पाहिजे ते मिळवताना कोणाची पर्वा केली जात
नाही. माणुसकीला काळिमा नुसता. वाचताना हळहळतात
सगळे, “ एकतर्फी प्रेमात, ती नसताना मी जगूच शकत नाही, ती माझी नाही तर
कोणाचीही नाही. प्रेयसीचा खून आणि
आत्महत्या ” किती ही अमानुषता.
कधी काय होईल सांगता येत
नाही. क्वचित एखाद्याचं नसणे सार्वजनिक होऊ शकतं. हेच पहा ना. आपल्या सचिनने
क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि तमाम भारतीयांना क्रिकेटची काळजी पडली. शेजारच्या
नंदूने तर सचिनला इमेल केला, “ तू नसताना मी मॅच बघू शकणार नाही. मला ती शिक्षा
वाटेल.”
कोण एका घरी काय झालं
सांगते. रेखा, हुषार आणि करिअरिस्ट. तिला अधूनमधून जावं लागायचं बाहेर परगावी
किंवा परदेशात सुद्धा. जाताना तिच्या आपल्या सूचनांवर सूचना हे नेहमीचच झालं.
तेंव्हा शशांक, तिचा नवरा तिला म्हणाला, “तू नसताना माझी मुलांशी मस्त ए वन मेतकुट जमलं. वेव्ह लेंध जुळल्याने मोकळेपणा आला नात्यात.
नाहीतर आई असायचीच मध्येमध्ये. बघशीलच, तू नसताना मी कसं छान मॅनेज केलं घर. अर्थात तुझी आठवण पदोपदी. गप्पात
तूच. तुला सांगतो, गरज असेल तेंव्हा तू जात जा. तुलाही तुझं करिअर आहेच की. तुझी
वाट बघत आहोत सगळे.” स्त्रीयांना इतकी मोकळीक देऊन करिअर करताना साथ देणारे थोडेच
आहेत.
माणसांचा एकमेकांचा सहवास
प्रत्येकाच्या मानसिकतेवर, परीपक्वतेवर, विचारधारेवर परिणाम करतो. थोड्या काळाचा
दुरावा देखील बोलून जातो. बाई वर्गात नसताना कुठल्याच शाळेतली मुले वर्गात शांत
बसत नाहीत. ऑफिसमध्येही तेच चित्र. बॉस खडूस असेल तर बाहेर जायची वाट बघतात सगळेजण,
आणि तो जाताच सुटतात एकामागून एक. शाळा,
ऑफिस, घर फरक काहीच नाही. घरात सुद्धा बाबांचा धाक इतका की, ते यायच्या वेळेला
एकदम चिडीचूप होते, मुलं अभ्यासाला बसतात, ती कामात गर्क असते. अशाने घराचे स्पष्ट
चित्र बाबांना कळतच नाही.
एखाद्याच्या आयुष्यात ‘तू
नसताना’ सुखावह होते. आमची कामवाली खूप कष्ट करायची. शिवाय मार
खायची. तो गेला आणि सहज
सखुबाई बोलली परवा, “गुरावाणी बडवायचास
मला. लाथा बुक्यांनी मारलस. मी आणि पोरं नुसती रडयाचोत. तुला यायचा चेव. का रडता
म्हणतं लाथा घालायचास कंबरेत. मुडद्या मेल्या, नरकात गेलास. आता, तू नसताना मी मजेत आहे. मी,
माझी मुलं, माझं घर सारे सुखात आहोत. आनंदोत्सव साजरा करतो आम्ही.” किती वाईट
बोलते. पण सत्य आहे. सहनशीलतेलाही मर्यादा असतातच. सुटली सखुबाई कायमची. लोकं असं
का वागतात, आपल्याच बायकोशी?
अशी ही नाती आणि त्यांचे
घट्ट जाळे. नात्यानात्याचे धागे भक्कम असतात, म्हणून तर सगळं कसं सुरळीत होतं
आयुष्यात. एखादा धागा सैल पडला, तुटला, निसटला तर जाळ्याची विण कमकुवत होते,
कुरकुरू लागते. टांगणीला
लागतो जीव. सगळेच अनुभवतात हे असलं जीणं. हा नियम सगळ्यांना सारखाच. प्रसंगात बदल
आणि वस्तू किंवा व्यक्ती वेगवेगळी. तो, ती, आणि ते नसताना मी नीट राहू शकत नाही,
एव्हढेच. जवळ असताना किंमत कळत नाही, दूर गेल्यावर चैन पडत नाही. बरोबर जगताना,
प्रेम करायचं, समजून घ्यायचं, चुकलं तर माफ करायचं असतं. त्याऐवजी आपलाच अहं
कुरवाळत बसतात सगळे. नंतर स्वत:चा रागराग करीत जगतात. येणारा जाणारच कधीतरी.
भेटलेला दुरावणारच. आपलं वागणं तर असतं आपापल्या हातात. गेलेले-दुरावलेले मनात असतात ठाण मांडून. त्यांनाच विचारायचं,
“तू नसताना मी काय कसं करू?”
अवघड असतं आपल्या माणसाला सोडून राहणं. आपलं
म्हंटल की नाते कुठलेही असो. तरीही पतीपत्नीच्या नात्यात मागे उरलेल्याची हालत फार
वाईट होते. कोण पुढे जाणार यांत शर्यत लागते. माझ्या विना तू कसा राहशील, तुझे कोण
काय बघेल, ही विवंचना छळते आतल्याआत. कशी सांगावी ती कुतरओढ ? माझ्याच एका
कवितेसारखी तर असते ती. बघा जरा, पटते कां?
संसाराचा किती वर्षं खेळला त्यांनी सारीपाट
तरीपण दोघांना जाता येत नाही पाठोपाठ
“ तू थांब मागं, मला जावं लागेल पुढं”
दोघेजण दामटत होते आपलं आपलं घोड.
देवाच्या
हिशोबी दोघांचेही हिशोबच वेगळे
बेरीज, वजाबाकी, गुणाकार करून
उरलेल्याला भागलं
ज्याचं गणित बरोबर त्याला अलगद उचललं
खूप
विचार केला, वाटलं सारकाही संपलं.
रडलं, भाकलं, ओरडलं, आरडलं नंतर मात्र स्थिरावलं
पुढे गेलेल्याला काय वाटेल? मीच मनाला दटावलं
तेंव्हा कुठे माझं मला थोडाफार उमजलं
“तू नसताना मी,” आहे त्यातच सूख मानायचं ठरवलं.
वंदना धर्माधिकारी
vandana10d@yahoo.co.in M: 9890623915.
हलवून सोडणारा लेख. शेवटची कविता touching. नात्यांवर तूम्ही छान लिहीता. खूप काही घेण्याजोगे असते.
ReplyDeleteकाही गोष्टी कवितेतून अधिक प्रभावित मांडल्या जातात, अगदी काळजाला भिडतात काव्यपंक्ती. धन्यवाद!
ReplyDelete