निरंजन
दिवाळी अंक २०१७ :: छान आहे मी जशी आहे मी
लेखिका ::
सौ. वंदना विजय धर्माधिकारी
तिन्हीसांज झालेली. एकेक
करीत आईबाबा आले, आपल्या बाळाला घेऊन घरी गेले. राहिला फक्त संकेत. वय वर्ष दोन...
खिडकीत बसून बाहेर नजर. ‘माझी आई अजून का नाही आली?’ पाठीमागे
आवराआवर करणारी मावशी नाहीतर ताई एकीकडे संकेतला सांगते,”अरे, येईल आई आता.
ट्राफिक मध्ये अडकली असेल.”.... संकेतला आईची काळजी. “आईला काही होणार नाही ना
गर्दीत. किती लांब तिचं ऑफिस? तिला बाप्पा घेऊन तर नाही ना जाणार त्याच्या घरी.
पकादादा कसा गेला गर्दीतून वर.... बाबांनी सांगितलं.”.... आणि संकेत मुसमुसू
लागला. ताईची घरी जायची घाई. काकू फोनवर कोणाशी तरी काहीतरी... काका संध्याकाळी
बाहेर जातात... कोणी बघतं नव्हतं संकेतकडे. तशी पाळणाघरातून सगळे घरी गेलेले.....
चिमुकल्या संकेतला घेरलं भीती, काळजी,
धास्ती, आणि अशाच काहीबहीने......
यालाच ताण म्हणतं असणार. कदाचित त्याही आधी कधीतरी
संकेतने ताण अनुभवला असेलही. तर हा ताण.....त्याची सवयच पुढच्या आयुष्यात होऊन
जाते. खाणं पिणं जसं सहज होतं तसाच ताण अंगात सहजरीत्या मुरु लागतो. इतका अंगवळणी
पडतो की तो कधी काढला पाहिजे असे वाटतंही नाही, किंबहुना नको असलेली गोष्ट अंगात
मुरलेली आहे ह्याची जाणीव देखील होत नाही. ताणतणाव पाणवनस्पती किंवा बांडगुळासारखा
नको असताना प्रचंड गतीने सर्वत्र पसरणारी
कीड आहे. मनापासून आणि मुळापासून काढायचा प्रयत्न केला तरी तडतडणारे तण आपली चिकाटी
न सोडता तिथे दबा धरून राहतात. पुढेपुढे
डोकं काढायचा प्रयत्न करतातच आणि तेच चेचायाचे असते.
ताण ताण म्हणजे नक्की तरी काय? त्याची काही
व्याख्या? काही मोजमाप? आयुष्यातील विविध लहानमोठ्या प्रसंगात मिळणारे यशापयश,
घरादारातील लोकांनी दिलेला प्रतिसाद, वागणूक, सकारात्मक वा नकारात्मक प्रतिक्रिया
याचा त्या व्यक्तीवर होणारा एकत्रित परिणाम म्हणजे ताणतणाव असे म्हणता येईल. तो
प्रसंग मोठा छोटा यावर त्या तणावाची उंची मोजता येणार नाही. त्याला उंची खोली
आकारमान सारे सारे असते. सहज आपण म्हणतो, “अरे, किती शुल्लक बाब आहे, इतका का
चिडलास, का तणतणतोस? पूर्ण वातावरण तणावपूर्ण बनवतोस, स्वत:बरोबर सगळ्यांना वैताग
देतोस.” आता काय प्रसंग असेल हे थोडेच सांगता येते? घरात लहान मुलांनी पळत जाताना
कशाला धक्का लागला आणि मोठ्या माणसाच्या कपाळाला आढी पडली. त्याच्या मनाला ताण
पडला. त्यात चिमुकल्या पिल्लाचा काय दोष? दोष म्हंटल तर मोठ्या माणसाचा. कशाला
चिडचिड करायची. यालाच स्वभाव म्हणायचं का? जे जसं पाहिजे होतं ते मिळाले नाही, मग
तो लाडूचा तुकडा देखील असू शकेल; एखादे गणित आले नाही, गाणे म्हणायचे नव्हते पण
आईबाबांनी म्हणायलाच पाहिजे सांगितले.... इतके साधे साधे प्रसंग मुलांना ताण
निर्माण करणारे असू शकतात. घरात कोणी बोललं, कोणी चिडवल, कुणी बघितलं नाही, कुणी
रुसलं आणि कुणी हसलं तरीही नाराजी येते. वारंवार येणारी नाराजी कुठेतरी स्वभावाचा
नकारात्मक भाग बनून राहते. आणि कानफाट्या नाव पडते, तेंव्हा आणखीनच चीड येते.
एकटेच बरे असेही वाटू लागते. आपण कानफाट्या म्हणजे वाईट, कोणालाही आवडणार नाही
असेच, बावळट नालायक मूर्ख तो मीच. रुजवली गेली स्वत:बद्दलची नकारात्मक भूमिका खोल
खोल मनात. त्यातून सुटका जवळजवळ अशक्यच असते का? इतका खोलवर तण मुरलेला असतो?
एकुणात तणाव म्हणजे कोणत्याही प्रसंगाला
किंवा बदलाला व्यक्तीने दिलेला नकारात्मक शारीरिक आणि भावनिक प्रतिसाद.
अनावश्यक चिकित्सक विचारांची गर्दी मनात तणाव
गोळा करते. अटीतटीचा क्रिकेटचा सामना बघताना अनेकांच्या चेहऱ्यावरचा ताण मुद्दाम
बघावा असा असतो. तर अचानक जेवायला पाहुणे आले तर गृहिणीवर मानसिक दडपण येतेच. ऑफिसला
उशीर झाल्यावर तिथे काय वाढून ठेवले जाईल या काळजीने गाडीचा वरचा गिअर टाकलाच
जातो, तेंव्हा अपघाताची भीती देखील पळून जाते. तर, कोणीकोणी जुन्याच आठवणींना
दररोज अश्रूंचा अभिषेक करीत असते, समजूत निघतच
नाही त्यांची काहीकेल्या..... इतकेच काय आईने चेहरा आपल्याच हाताने झाकला आणि
बाळाला ‘बुवा कुक’ करायला लागली, तर त्या चिमुकल्याचा चेहरा किती कावरा बावरा
होतो, रडायला लागतो, तेही ओक्साबोक्सी. असा आहे ताणतणाव इतरांना छळून स्वत:
नामानिराळा राहणारा. इतका की त्याचे अस्तित्वही कोणाला जाणवत नाही. अवघड असते ते
हेच.
दिवसेंदिवस प्रचंड गतिमान धकाधकीच्या
आयुष्यात समाजातील प्रत्येक व्यक्तीला तणाव घेऊन वावरण्याचा अनुभव येतो. तणावाचे दुष्परिणाम मनावर शरीरावर होत राहतात,
हळू हळू पोखरून काढतात. तणावासाठी वयाची अट नाही. किंबहुना व्यक्ती, स्थल, काल,
प्रसंग, ऋतू, दिवसरात्र काहीही असो तणाव निर्मितीला पोषक ठरते, आणि कशाचीही पर्वा न करता सर्वांसाठी तणाव निर्मिती होते. तणाव अनेक
समस्या,विकृती, संकटे यांना निमंत्रण देणारा असतो. कुठलेही काम तणाव पूर्ण वातावरणात
केले तर कामाचा दर्जा घसरतोच. वाटतं की नकारात्मक एकगोष्ट समाज घेऊन बसला आहे ती अशी की सध्या वातावरण
दुषित झाले आहे, त्याने समाजाचा विवेक
हरवत चालला आहे. ह्याची सत्यता कशावर अवलंबून? एकाने सांगितले, वाचले, टीव्हीवर
बघितले, की झाले मत पक्के. त्याने दुसऱ्याला सांगितले, त्याने आणखीन दहा जणांना
कथन केली कहाणी. अशा वाईट गोष्टी तिखटमीठ लावून फोडणी देत पुढे ठेवल्या जातात.
त्याची चावून चोथा होईस्तोवर चर्चा करायला मिडिया असतेच आघाडीवर. त्यात रस घेऊन
पाहणाऱ्या रिकामटेकड्या माणसांचे उद्योग फुगा फुगवतात. समाजात जसे वाईट आहे, तसेच
किंबहुना त्याहून अधिक चांगले होत असते. पण दुर्दैवाने त्यावर कमीप्रमाणात भाष्य
सामोरे येते. जे सतत पुढे येते त्याचा परिणाम अधिक प्रमाणात होतो. मिडीयाचा असल्या
दुष्कृत्यात प्रमुख वाटा असतो. चांगली घडलेली गोष्ट पंधरावीस सेकंदात गुंडाळली
जाते, आणि वाईट गोष्टीचा प्रचंड उहापोह होतो. म्हणून नकारात्मकतेला पोषक वातावरण
बनवायचे नाही. घरातले वातावरण जर सकस, समृद्ध, आनंदी, एकमेकांची काळजी घेणारे असेल
तर आपोआप मुलांवर चांगले संस्कार होतात. इथे एकमेकांशी संवाद साधून आपापल्या
समस्यांवर, चांगल्या वाईट गोष्टींवर चर्चा केली तर सहजगत्या त्यातून मार्ग निघू
शकतो. शेअरिंग वाढवले की टेन्शन कमी होते, कारण त्यात अनेक डोकी लक्ष घालतात. यातच
नाती जपणूक होते. त्याने ताणतणाव कमी होतो.
सदसदविवेकबुद्धी हा शब्द
सध्या फार कमी प्रमाणात वापरला जातो. तो प्रत्येकाने जपला पाहिजे, वाढवला पाहिजे.
विवेक म्हणजे चागले काय वाईट काय, खरेखोटे काय, फसवे काय याची समज असणे, त्यानुसार
भाष्य करून कृती करणे. विवेक नसेल तर
मनाचे आरोग्य बिघडते. नैराश्याचा वेढा बसतो, खोलखोल कुठेतरी पोकळी जाणवू लागते. नको
त्या कृती हातून घडतात, त्याचेही सोयरसुतक रहात नाही. बेपर्वा वृत्ती फोफावते,
वाईट असूनही त्याची खुशामत केल्याने प्रतिमा डागाळते. जोपर्यंत माज असतो, तोपर्यंत
त्याचाच पाठपुरावा केला जातो. आणि कधीतरी पोकळ वासा कसा रिकामा याची जाणीव होते. चुकलेल्याची कान
उघडणी झाल्याने जीवही नकोसा होतो. कधीतरी तो संपवायचा विचार येतो. वरवर बघितलं तर
घरीदारी कशाकश्याला कमी नसते. मनावर नसते
भूत स्वार होते. आणि एखादा जीव संपतो.
मागला पुढला विचार केला जात नाही, आणि विपरीतच होते. याला जबाबदार कोण? नको त्याचा
केलेला उदोउदो असा त्रासदायकरित्या भोगला जातो. नको त्या तणावाचे दडपणाखाली जीव
मेटाकुटीस येतो, आणि आत्महत्येचे धाडस केले जाते.
माणूस एकटा राहू शकत नाही. कायम कळपात
राहणारा हा प्राणी. कळपात राहताना तो एकटा नसतोच, एकमेकांशी नाते जुळलेले असते,
संवाद साधताना जवळीक येते तर कधी बिनसते. सूर जुळला तर सुरावट उमटते, आनंदाच्या
लहरी उठतात. कधीकधी त्यात खर्ज्य येणारच गृहीत असले तरी सुरावट बेसूर होऊ द्यायची
नाही. अपेक्षा वाढल्या आणि अपेक्षाभंग झाला. त्यापाठोपाठ राग संताप अबोला आपसूक येतातच.
तिथे खुन्नस होते, दुष्मनी आणि शीत युद्ध. तसेच कायमचा भावनिक ताणतणाव, रुसवेफुगवे, आवडीनिवडी,
तुझंमाझं, आतली घुसमट, गोंधळ गडबड, प्रचंड शांतता असा विरोधाभासही. नातेसंबंधातले
प्रदूषण फार बोचरं असतं. किती जरी निगरगट्ट माणूस असला तरी कुठेतरी धागे अडकलेले
असतात. त्याची बोचणी छळतेच सटीसामासी. यातून मार्ग काढताना होणारा गैरसमज आणि तुटणारी
नाती, तीही तणावात भर घालतात. मग करायचं तरी काय? मोठ्ठ प्रश्नचिन्ह? इथे
अपेक्षांचे ओझेही गर्तेत खेचते. अपेक्षाभंगाचे दू:ख प्रचंड असते, पेलवत नाही आणि
खोल खड्यात जाऊन तणावाने अंगावर माती ओढली जाते. काय करणार?
तणाव येणारच. तो सहन करण्यापेक्षा त्याचा
योग्य पद्धतीने निचरा होणे महत्वाचे.
एकामागून एकेक करीत अनेक तणाव एकमेकांत गुंतत जातात. तो गुंता सोडवणे कठीण
असले तरी अशक्य नसावे. निदान प्रत्येक गुंत्याचा बाज कसा त्यावर आधारित असते
सोडवण्याची पद्धत. कधी त्यातून अंग काढून घेणेही सोयीस्कर आणि श्रेयस्कर असते. एक
घाव दोन तुकडे हे देखील एक सोल्युशन म्हणून म्हणायला वरवर बरे वाटते. काही जरी
झाले तरी नैराश्याचे निरसन करायला गंडे दोरे, बुवाबाजी, असे अंधश्रद्धेचा पाया असलेले उपाय करू नयेत. त्याने होतं तर काही नाही, उलट विपरीत परिणाम होऊन पश्चातापाची वेळ येते.
वेळ आणि पैसा दोन्हीचा अपव्यय होतो तिथे. विवेकाने, शांत विचारानेच तणावावर मात
करावी. सांगणे सोपे असते, तसेच वागणे
कृतीत आणणे देखील सोपेच असते. फक्त माणसाची विचारशक्ती अशा दिशेने विचार करीत नाही
आणि सगळेच ओमफस होऊन जाते.
कधीकधी आपण ऐकतो, तो किंवा ती.. इतके तिला टेन्शन असताना घरीदारी समस्याच समस्या
शिवाय तब्येतीच्या तक्रारी असताना देखील तिने यश खेचून आणले. उत्तम मार्क्स मिळाले. नोकरी घर मुले आणि आजारी
सासूसासरे सर्व नीट सांभाळलं. कधी तो तर कधी ते... संसारातील परीक्षा पास होताना,
त्यांना घराबद्दल, घरातल्यांबद्दल असलेले प्रेम, जिव्हाळा यामुळेच अवघड दिव्य पार
करायला त्यांना ताकद मिळते. जातात तेही कडू दिवस. काळ कोणासाठी थांबत नाही, आणि
सतत बदलत असतो. आजचा दिवस उद्या नाही, आणि उद्याचा परवा. तणावावर नियंत्रण ठेवून
उत्तम काम करायचे कौशल्य तिने अंगी रुजवले असणार. किंवा त्या ताणाची सवय झाल्याने
त्याला कृतीच्या आड येऊ दिले जात नाही.
त्याने निर्मिती योग्यच होते. तिला ते जमतं सगळ्यांना जमेलचं असे नाही. इथे
पेशन्स, संयम, सहनशक्ती पणाला लागते. त्यापुढे ताणतणाव नांगी टाकतात. आपसूक सुटका
होते. कधी कधी नंतर मागे वळून बघताना तिचे तिलाच आश्चर्य वाटते... ‘मी हे कसे काय
केले असेल?’
बरेचजणांना तणाव असह्य झाल्यावर चिकटते ती
व्यसनाधीनता. प्रचंड मोठी समस्या. त्याने तणाव प्रश्न कमी होण्यापेक्षा वाढतात.
तणाव एकाच व्यक्तीचे खच्चीकरण करेल, पण व्यसन घरदार बायको मुले, इज्जत, अब्रू,
स्व:ताची इमेज सगळ्यांला रसातळाला नेणारे
आहे. दुर्दैव हेच की आजकाल व्यसनाधीनता विविध रंगीढंगी तर झालीच आहे, शिवाय सहज
मिळू लागली. एक प्रतिष्ठेचा सिम्बॉल म्हणून त्याला गोंजारताना शरम कशी वाटणार?
त्यातून अनेक रोग शरीरात घुसतात, गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. मागे
येण्याचा मार्ग अशक्य नसला तरी अवघड नक्कीच असतो. म्हणून किती जरी ताण वाढला, अगदी
प्रचंड असला तरी व्यसनाची जोड त्याला कधीही देऊ नये. पण, तसे होत नाही. वाकड्या
वाटेने पाय वळतात व्यसनाचे मार्गावर आणि घसरगुंडी सुसाट सुटते. इतका रसातळाला
जाण्याइतका ताण प्रचंड वाईट असतो का?
तणाव कशाने वाढतो? कशानेही असेच जरी असले तरी
घर प्रथमस्थानी येते. नंतर नोकरी व्यवसाय त्यातील समस्या, पैशाची चणचण, अपयश,
चढाओढ, प्रमोशन्स, तेथील राजकारण, कॉर्नर करणे, असेच बरेचकाही. दिवसातील आठ दहा
तास नोकरीच्या जागी असल्याने तेथील वातावरणाचा प्रभाव व्यक्तीवर असतोच. प्रसंगी
जीवावर बेतलेले अघटीत प्रसंग चोरी,मारामारी, बलात्कार, खुन, कोर्ट केस, अफरातफर,
फसवणूक, अब्रू नुकसान, दंगल, जाळपोळ, मोठी हार ... अशा केल्श्कारक प्रसंगाने असल्याचे नव्हते व्हायला काही तास देखील पुरतात.
खच्चीकरणासाठी नामी तंत्र असते ते हेच.
जग जवळ आले, जगण्याची गती पटीने वाढली.
अफाट आणि सर्व क्षेत्रात तंत्रज्ञानाची क्रांतीगती आवाक्याच्या बाहेर गेली असली
तरी तिचाच पाठलाग करताना माणसाला दम लागतो. तरी जीवाच्या आकांताने त्याची माहिती शोधावीच
लागते. मानवी जीवनावर तंत्रज्ञानाचा होणारा परिणाम पदोपदी लक्षात येतो. माहितीचा
स्त्रोत कोसळताना नुसते बघितले तरी डोळे दिपतात, तर त्यात डुंबून जाताना काम
करणाऱ्यांना नक्कीच त्रास होतो. सर्वच गोष्टींचा शहानिशा करून खरेखोटे करताना
चेहरे फाडले जातात, त्याचीही भीती दडपण मनावर आल्याशिवाय रहात नाही. आत्ताचा माणूस
मध्ये लोंबकळत आहे. ना सुधारलेला ना मागासलेला, मधेच लोंबकाळणारा. पुढचे नीट समजत
नाही, मागचे सोडवत नाही, अशी सारी कुतरओढ. पिढ्यानपिढ्या चालत आलेले चांगले वाईट
अशा लेबलांनी बरबटलेले असते, तर चकाचक टकमक नवीन वातावरण डोळे दिपवून टाकते. गोंधळलेला
माणूस बिचारा डोक्याला हात लावून तणतण करीत असतो. आभासी जगाची दुनिया माणूसपण समजू
शकत नाही. आभासी भुलभुलैय्यात कोणाच्या तरी प्रतिक्रियेवर ‘ओके थँक्स’ देताना
स्वत:च्या भावना, संवेदना, गरजा, विचार, मानसिकता, यांचा विचार करून त्यांना
पारखून तपासून त्यानुसार व्यक्त होणे म्हणजे अगदीच आऊट डेटेड असते, आभासी जगात असा
विचारही ‘शीट’ असतो. तरीही हे समजून घेण्याची धडपड, विविध प्रतिक्रियांची हौस
किंवा त्रास, पेलण्यास जड जात असतानाही उचलावी लागणारे अवजड चॅलेंजेस, स्पर्धा,
पैसा, राजकारण, हाणामार्या, लावालाव्या, चुगली, चेष्टा, मत्सर, पोटदुखी, चढाओढ, आणि
काय काय पुढ्यात असताना ताण येणार नाही तर
काय आनंदाच्या उकळ्या फुटणार? असाच एखादा
प्रचंड हुशार, उत्तम नोकरी व्यवसाय करणारा देखील तणावाने मनोरुग्ण बनतो. प्रचंड नैराश्य येते, डिप्रेशनमध्ये गेल्यावर कशातच रस
वाटत नाही, नैराश्य स्पष्ट होते, सर्वत्र पीछेहाट होऊ लागते. मानसिक आरोग्य
धोक्यात येते. तो तर प्रचंड गहन
आणि व्यापक विषय आहे. भल्या भल्य मानसोपचार तज्ञमंडळींना उलगडत नाही त्याचे रहस्य.
ताणतणावाच्या परिणामांना सामोरे जाताना
अगदी दमछाक होते, पण नाईलाज को क्या इलाज म्हणत सोसण्यापलीकडे काहीही उरत नाही.
इथे माणसाचा इगो आड येतोच. ‘मला काही झाले नाही. मी काय वेडा आहे का?, तुम्ही
तुमचं बघा. मी खंबीर आहे निस्तरायला...’ असा पोकळ आत्मविश्वास बळावलेला माणूसच
आतून पोखरत जात असतो. तणावाचे दुष्परिणाम शरीरावर दिसू लागतात. पित्त वाढणे,
खवळणे, भूक मंदावणे, दम लागणे, रडावेसे वाटणे, ओरडणे चिडणे, त्यापुढे रक्तदाब,
मधुमेह, हृदयरोग, अशक्तपणा, वजन कमी होते, एक ना दोन...... एकातून एक उत्पन्न होत
जाते. त्याचबरोबर मानसिक आरोग्यही धोक्यात येत असतेच. कोणाशी बोलावेसे वाटत नाही,
वृत्ती साशंक होते, सगळे आपल्या विरोधात आहेत असा विचार बळावतो, विश्वास टाकला जात
नाही, उदासीनता प्रचंड वाढते, विस्मरण होते, चिडचिड वाढते, मन हळवं होऊन रडायला
येते, भावनांवर ताबा रहात नाही, जास्त बडबड, नाहीतर एकदम गप्पगप्प राहणे, विविधता
भरपूर वाढते, मनोरुग्ण, वेडा.... किती यादी करायची सर्वांची. या सर्वाना जबाबदार
माणसाच्या मनावर येत असलेला ताणतणाव आहे. हे लक्षातही येत नाही, आणि माणूस माणूसपण
गमावून बसतो.
पण, हे असे सर्वांनाच होते का? नाही.
व्यक्ती तितक्या प्रकृती असे उगीच नाही म्हणतं. बाहेरच्या पेक्षा माणसाची आतील आंतरिक जडणघडण
जास्त कारणीभूत असते. प्रसंगानुसार सगळ्यांना सारखाच ताण आलेला दिसत नाही कधी.
त्याच घरातले एखाद्या प्रसंगाला कमीजास्त महत्व देतात, काही स्वीकारतात, काही
गोंधळतात, काही सोडून देतात, तर काही आणखीन वेगळंच काहीतरी बडबडतात..असो.. तर
परिस्थिती वा प्रसंग तणावपूर्ण नसतो, व्यक्तीचा
त्याकडे बघायचा दृष्टीकोन महत्वाचा
असतो, त्यानुसार तणाव निर्मिती होते. परिस्थिती स्वीकारता आली पाहिजे. ‘कुठल्याही
परिस्थितीत डगमगायचे नाही, धीर धरायचा, शांत विचार करायचा.... अशी शिकवण शाळेतच
दिली जाते. अशा विचारांचा खुराक कायम वरचेवर घेत गेलेली व्यक्ती संकटाना न घाबरता
कुठल्याही परिस्थितीत खंबीरपणे उभी राहते. स्वत: बरोबर इतरांनाही सांभाळून घेते.
तेंव्हा ती व्यक्ती स्वत:चे असे वेगळे अस्तित्व दाखविते. एक खूप छान प्रार्थना आहे
ती स्वत:ला आरशात बघून रोज म्हंटल्यास आत्मबळ वाढते, किमान सामना करायची ताकद तर
नक्कीच वाढते. ती प्रार्थना अशी आहे, ‘ देवा, जी परिस्थिती मी बदलू शकत नाही, ती
स्वीकारायची मानसिकता मला दे. जी परिस्थिती बदलायला पाहिजे ती बदलण्याचे धैर्य ताकद
हुशारी मला दे. आणि या दोहोंमधील फरक जाणून घ्यायाची बुद्धी मला दे.”
एखादी कला जोपासावी, संगीत, चित्र, नृत्य, बाग काम, लिखाण,
वाचन, नाटक सिनेमा, विविध कार्यक्रम,
इत्यादी इत्यादी यांचा सराव केला तर मनाला सकस खाद्य मिळते आणि तणाव दूर
केला जातो. आपले छंद आपले मित्र असतात. मैत्री हे तणाव नाहीसा करणारे सर्वोत्तम औषध
आहे. मित्रमैत्रिणींच्या सहवासात मोकळेपणा असल्याने आपल्या वेदना, त्रास इतरांना
सांगितला जातो, विभागणी होते त्याची. गप्पाटप्पा महत्वाच्या. प्रत्यक्ष गाठीभेटी
घेतल्याने उत्साह मिळतो. इथे एकमेकांना आधार दिला जातो, त्याने आपले संकट हलके
होते, वेगवेगळी मते, प्रतिक्रिया मिळाल्याने वैचारिक गतीस चालना दिली जाते. पर्याय
शोधले जातात, अंधुकशी का होईना पाउलवाट दिसू लागते. आशा बळावते, आणि मार्ग मोकळा
करताना आपण एकटे नसतो. मैत्रीच्या नात्याची वीण ताकद देणारी, समजून घेणारी, सहभाग
देणारी असल्याने खरे मित्र हे पाहिजेतच. जसे मैत्रीचे तसेच घरातल्या आपल्या
माणसांचे असते. घर म्हणजे नुसत्या भिंती नसतात. नात्यात प्रेम, जिव्हाळा, ओलावा,
आपलेपणा, त्याग, विश्वास, जबाबदारी, कर्तव्य, सहवास, आठवणी, यांची खच्चून गर्दी
असते, त्याच्या जीवावर प्रचंड संकट, ताण
सहन करून पुढे धावण्याचे बळ देण्याची आशा असते. म्हणून आपली माणसे जपावीत.
कमी बोलणारा, कायम शांत राहणारा माणूस जास्त
डेंजर असतो. त्याच्या तळाशी बरेच काही कुजलेल असतं. उथळ वाहणारं नितळ पाणीच
पिण्यायोग्य असतं. माणूस तसाच असावा, स्वभावात खळखळाट असावा असं नाही, पण तो
कमालीचा शांत आतल्या गाठीचा असू नये. स्वभावाला औषध नाही, अशी म्हण आहे. त्यात
काही अर्थ नाही. जर ठरवले तर माणूस आपला
स्वभाव कधीही कुठल्याही वयात वा परिस्थितीत बदलू शकतो. लागते ती इच्छाशक्ती. खाली
मुंडी पातळ धुंडी अशीही माणसे असतात. आयुष्यात पूर्वायुष्यातील काही प्रसंग दबलेले
असतात. एखादी तेढ रुतलेली असते. त्यातून बरेचजण कधीच बाहेर येते नाहीत. उलट,
घाणेरड्या गोष्टीना खतपाणी तिथेच दिले जाते. कुचकट शब्द, अपमानास्पद वागणूक,
घमेंड, पोटदुखी, इर्षा, अशा नको त्या गोष्टी भावना तिथे उदयास येतात.
असे अनेक प्रकारे ताणतणाव सर्वांना नुसते
छळतं असतात. आयुष्यातील आनंदाचे क्षण गोळा करून मस्त जगायचे सोडूण ताणात माणूस
खंगत जातो. त्यातून सुटका करून घेताना आपल्या चुका स्वीकारणे, पटकन सॉरी म्हणून
मोकळे होते, .
‘स्वस्वीकार’ जर असेल तर आपल्यातील
गुणदोषांचे पृथ्थकरण सहजगत्या केले जाते. स्वत:लाच दोष देऊन मनस्ताप करून रडत
बसायचं, इतरांवर चिडायचं, मी वाईट म्हणत स्वत:ला कोसायचं असे वागणे अनेकांचे
अनेकदा होतेच. त्याऐवजी आहे तसे आपण आपलं व्हायचं, म्हणजे स्वस्वीकार. त्यानंतर, खरोखरीच आपली चूक असेल तर तिचा स्वीकार केला
जातो. आणि बरोबर असेल तर ते इतरांना पटवून देता येते. मग टेन्शन फारसे उरत नाही,
तेही संवादाने विरघळून टाकता येते. स्व म्हणजे मी, मी कशी आहे, आणि कशी का असेना
माझी मी मला आवडते, मी माझ्यावर प्रेम करते, छान आहे मी जशी आहे मी. असे म्हणून
जेव्हा आहे त्या परिस्थितीत स्वीकार केला आपला, की आपोआप आपल्यातील नकारात्मक
गोष्टी दिसल्यावर त्या बाजूला करताना खूप यातना होत नाहीत. म्हणजे असं...शमाला
समजले की ‘मी लोकांचं म्हणनं नीट ऐकून घेत नाही. ते जर समजून घेतले तर वादावादी
झालीच नसती.’ तत्क्षणी तिने ठरवले इथून पुढे असे होऊ द्यायचे नाही. .... आणि लवकरच
ती ऐकून घ्यायला लागली, म्हणून इतरही
खालच्या आवाजात तिच्याशी बोलायला लागले, संवाद सुरळीत होऊ लागला, एकमेकांच्या
अडीअडचणींची उकल होऊ लागली, घट्ट मैत्री झाली तिची, आणि घरातल्या सर्वांची लाडकी झाली ती.... प्रयोग
प्रत्येकाने करून बघावा.
‘निरावेग होणं’ म्हणजे आतला गाभारा स्वच्छ
करणे. किती कचरा किल्मिषे भरलेली असतात मनात. हाकलली तरी लोचट
कुत्र्यासारखी मागेमागे येतात. कुब्बट वास
येतो, आत आग लागते, बाहेर चिखल होतो, आणि आपलाच आवाज टिपेला जातो. सगळं चुकीचेच
वाटायला लागते. खरं तर आत नवीन काही घुसायला फट देखील रहात नाही. तेंव्हा, साफ
करायचा मनीचा गाभारा, जुनेपुराणे कुजलेले खऱ्याट्यांने मोरी घासतो, तसे घासून
काढायचे. जमते, मन सहाय्य करते हे असे फेकताना कारण तेही वैतागलेले असते. मानाने
इतके वर्ष सांभाळलेले असते या वेदनांना, जखमांना. खपली पुन्हा पुन्हा काढूनही काही
होत नाही तर विसर्जन करून टाकू यात त्या नको असलेल्याचे. यावर आपोआप येणाऱ्या
अश्रुधारांना वाहते ठेवावे, एकेक वाईट आठवण मोकळी करीत जाते मनाला. तो रिकामा
कप्पा हसत असतो आतल्याआत. आपले आपण मोकळं होणं. वाहतं होणं, सोडून देणं, यालाच
निरावेग होणं म्हणतात.
“ जाऊ दे ना” म्हणजे आपल्याशी कोणी चुकीचे
वागले मग ते चूकून असो नाहीतर मुद्दाम असो, त्याला माफ करून सोडून देणे असा सोपा
उपाय आपण केला तर पुढील नकारात्मक गोष्टींपासून आपला बचाव होतो. समोरच्याचा अपराध
लहान मोठा कसाही असो, त्याला समज देऊन आपल्याला थोडी शांती लाभतेच, ती थोड्यावेळा
पुरती असू शकते. जेंव्हा एखादी गोष्टी, त्यामधील आपला इंटरेस्ट आपण काढून घेतो
तेंव्हा मुक्तता मिळते. दुसऱ्या व्यक्तीलाही आपली चूक समजलेली असते, पण इगो आड
येतो. अशावेळी आपण स्वत: जर जाऊ दे ना म्हणून माफ देलं तर आपल्याला बरे तर वाटतेच,
शिवाय नाते तुटत नाही, आपल्याबद्दल असलेले प्रेम, जिव्हाळा, वाढला नाही तरी आधी
असेल तितका तर राहतोच. विसरून जाणे ही दैवी शक्ति दिलेली आहे देवाने आपल्याला.
विसरले की पुन्हा त्या विचाराने त्रास करून घ्यायचा नसतो. जाणीवपूर्वक झाले गेले
सोडून दिले, असे म्हणून ‘जाऊ दे ना’ लेबल लावून फेकून द्यावेत काही आयुष्यातील
प्रसंग. मस्त आंघोळ करून फ्रेश व्हावे. आणि गुणगुणत बसावे एखादे आवडते गाणे,
नाहीतर डोळे मिटून शांत बसावे. संगीत ऐकणे हुकमी उपाय असतो ताण नाहीसा करायला.
करून तर बघाच.
‘शांत बसावं’ असं म्हणतो पण आतल्या आत धुमसते
त्याचे काय? असा प्रश्न येतोच सामोरा. प्रसंगानुरूप आपण शांत राहणे समस्या
सोडवायला उपयोगी पडणारे होऊ शकते. आपली एखाद्याशी स्पर्धा असते, ती पुढे गेलेतर
मला का वाईट वाटले, पोटात माझ्या का दुखते. इर्षा, चढाओढ, तुलना, वरखाली असले की
आपोआप स्पर्धा सुरु होते, तीही मनातल्या मनात. अशावेळी, कदाचित दुसऱ्याला माहितही
नसते की ही मुलगी माझ्या बरोबर तुलना करते म्हणून. आपली स्पर्धा नसेलही कदाचित, पण
समोरच्याला जर तसे वाटत असेल तर अजिबात त्याला सांगायला जाऊ नये, की बाबा रे ...
मी तुझ्याशी स्पर्धा करते. गप्प बसावे.
‘ पोट दुखी’ असते दुसऱ्याची, म्हणजे दुखते
त्याच्या पोटात, पण मानसिक ताण आपल्याला पडतो. अशावेळी सोडून देणे, दुर्लक्ष करणे
उत्तम. आपण काहीही करू शकत नाही. बोलणाऱ्याच्या तोंडाला हात लावता येतो का, नाहीच.
जळफळ जेव्हढी काय व्हायची असेल त्याची ती होऊ देत. आपण आपले काम करीत राहावे, उलट
जोरात घोडदौड करावी. एकामागून एकेक पादाक्रांत करीत सुटावे. आपल्याला मिळालेले यश
त्याला कळेलच. अनुल्लेखाने मारणे म्हणतात, तसे वागावे.
हुश्श! इतका ताण जर छळवाद असेल तर त्याचा
बंदोबस्त केलाच पाहिजे. होतो का? नक्कीच होऊ शकतो. त्याला प्रयत्न, मार्गदर्शन,
अभ्यास, चिकाटी, सकारात्मकता आणि स्वत:ची मानसिक तयारी, वेळ देण्याचे कौशल्य अशा
साऱ्याची जमवाजमव झाल्यावर नक्कीच ताणतणाव नियंत्रित होऊ शकतो, करता येतो.
अष्टांगयोग – यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी – याने
तर माणूस अत्यानंदात राहतो. अशा सगळ्या गोष्टींची ओळख पाहिजे, त्यांचा सराव
पाहिजे, त्यांचे व्यसन लागले पाहिजे. या सर्व गोष्टी सुरवातीला तज्ञ लोकांकडून
किमान जाणकाराकडून शिकून घ्याव्यात, त्यांचे उपस्थितीत थोडा सराव करावा आणि नंतर
आपलेआपण नियमितपणे ठराविक वेळा त्याचे आचरण करावे. यासर्व गोष्टी एकट्याने
करण्यापेक्षा सामुहिक केल्यास त्याचा परिणाम खोलवर होतो.
ताणतणाव घालवण्यासाठी संगीत, चित्रकला,
नृत्य, वा कुठलेही कला अतिशय मोलाची असते. मन त्यातचं गुंतत जाते,आणि ताण कधीच
विरघळून जातो, लोप पावतो. वाचन तर हवेच. नुसताच ताणाचा निचरा होत नाही वाचनाने तर
व्यक्तिमत्व तिथे घडत जाते. वाचाल तर वाचाल, ह्या वाक्याची देखील हल्ली चेष्टा
केली जाते, तर कोणकोण वाचते हे शोधावे लागते. काय करणार? आलीया भोगासी..... खरं
आहे, शेवटी पाडणाऱ्या ताणाकडे एक भोग म्हणून बघितलं जाते. ताणतणाव आटोक्यात
ठेवण्यासाठी प्रचंड लेखनसाहित्य उपलब्ध आहे. छोटे मोठे कोर्सेस सगळीकडे चालू
असतात. मार्गदर्शक तत्वे आहेत शिकून घ्यावे, करीत राहावे, सातत्य जपावे, चुकवू नये
हे सारे. मी ना योगशिक्षिका, ना मानसोपचार तज्ञ, ना समुपदेशक, ना शाळाकॉलेज मधील
शिक्षिका. मी आहे एक लेखिका....जे सुचलं
ते लिहिलं. तरीही आपला ताण थोडा तरी हलका होईल असं वाटतं... पुन्हा जाता जाता मला
आवडलेलं एकचं सांगते आणि थांबते. सकाळी उठल्यावर आपलेच रुपडं आरशात बघताना मस्त
हसायचे त्याच्याकडे बघून, थोडा वेळ बघत रहा त्याला, आणि अगदी मनापासून म्हणा .... “छान आहे मी, जशी आहे मी!!”..... “छान आहे मी, जसा आहे
मी!!”
वंदना धर्माधिकारी
M :9890623915
पत्ता : 25,तेजस सोसायटी, चैतन्य बिल्डींग,
तेजसनगर, कोथरूड, पुणे 411038.
फारच छान लेख. स्वतःचा आहे तसा स्वीकार केला की उर्जा पटीने वाढते. नको त्या शंका मुळासकट उपडून दूर फेकल्या जातात.,आपणचं आरश्यात बघायचं छान आहे म्हणायचे आणि गोड गाणे जायचा...
ReplyDeleteसुरेख..अभिनंदन!
धन्यवाद! मी ना योगशिक्षिका, ना मानसोपचार तज्ञ, ना समुपदेशक, ना शाळाकॉलेज मधील शिक्षिका. मी आहे एक लेखिका....जे सुचलं ते लिहिलं. तरीही आपला ताण थोडा तरी हलका होईल असं वाटतं... पुन्हा जाता जाता मला आवडलेलं एकचं सांगते आणि थांबते. सकाळी उठल्यावर आपलेच रुपडं आरशात बघताना मस्त हसायचे त्याच्याकडे बघून, थोडा वेळ बघत रहा त्याला, आणि अगदी मनापासून म्हणा .... “छान आहे मी, जशी आहे मी!!”..... “छान आहे मी, जसा आहे मी!!”
ReplyDelete