ॐ सहना ववतु, सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै ।
तेजस्वीनावधीतमस्तु माविद्विषावहै ॥
ॐ शांति: ! ॐ शांति: !! ॐ शांति: !!!
तेजस्वीनावधीतमस्तु माविद्विषावहै ॥
ॐ शांति: ! ॐ शांति: !! ॐ शांति: !!!
“हे परमेश्वरा, आमचे
रक्षण कर, सुखाचा लाभ मिळू देत, एकमेकांचा द्वेष लोप पावू
देत. जीवन समृद्ध होऊ देत. आपण सगळे
एकत्रित होऊन सामर्थ्याने कामास लागू, तेंव्हा आपले काम यशस्वी होईलच. यामध्ये
कुठलीही शंका नसो. प्रेमभावना सगळ्यांच्या मनात असल्यावर सुनीत साकार होते.
सर्वत्र सुख, शांती, समाधान नांदो. दिवाळीच्या शुभ मुहूर्ती शुभेच्छा! “
दिवाळी म्हंटल की
किती धांदल असते हे वेगळे सांगायलाच नको. साफसफाई पासून ते मस्त तयार होऊन
येणाऱ्या आप्तेष्टांचे स्वागत, मिष्टान्न भोजन, खास बनवलेला फराळ, रांगोळी,
आकाशकंदील, वसुबारस गो माता पूजन, पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान, वाजवलेला पहिला
फटका, त्यासाठीची मुलांची धावपळ, लक्ष्मीपूजन, औक्षण, पाडव्याची खरेदी, आणि भाऊबीज
भेट. यात मध्ये मध्ये दिवाळी अंकांचा आस्वादिक साहित्यिक फराळ. सर्वांची चव बदलून
देणारा वेगळाच आनद असतो दिवाळी अंकात.
सहकार सुगंध
दिवाळी अंकांत काय लिहावं, हे काही सुचत नव्हतं. नेहमीचे आर्थिक विषय, योजना ...
नकोच म्हंटल. जरा दिवाळीला काहीतरी वेगळं स्वादिष्ट चविष्ट चटपटीत इथेही लिहावं
असे किती जरी वाटले तरी सुचलं पाहिजे ना. शब्द देखील रुसून बसतात नेमके घाईच्या
वेळेला. भराभरा लेख कथा लिहून मोकळं व्हावं आणि घरातली कामे करावीत, तर काहीच
सामोरे येईना. “लेख कधी देता?” म्हणून फोनवर फोन. “देते, देते.” द्यायला तर
पाहिजेचं ना. नियमित लिहिते सहकार सुगंध
मध्ये, मग दिवाळीला कसा नाट लावायचा. “थांबा म्हंटल, देईन लवकर.”
तर, शेवटी झालं
काय? *सहकारातला सह-सह*, म्हणता म्हणता मनात श्लोक उमटला, घुमू लागला, आणि मीही
त्याच्यात गुंतले आणि उतरविला इथेच. *“ॐ सहना ववतु, सहनो भुनक्तु सहवीर्यं करवावहै।“* मनाला शांत
वाटलं, आणि लॅपटॉपवर बोटं फिरू लागली. त्याच्या कितीतरी जलद गतीने *सह-सह* शब्द
धावायला लागले मनात. अगदी फेर धरून नाचायला लागले एकत्रित. त्याच्या तालावर माझी
बोटांनी देखील तालबद्ध नृत्य सुरु केले एकेका बटनावर. तेच गोळा झाले सगळे.
बाईसाहेबांची लेख पाठवायची घाई आहे, त्याचा गाजावाजा झालाच होता घरात. काय सांगू, आणि मस्त पैकी आलं गवतीचहा सह आमच्या
यांनी चहा समोर ठेवला. मग काय विचारता. सरसरली माझी लेखणी, आली दिवाळीची नटून थटून
तुम्हा सर्वांच्या स्वागतासाठी!!
माझं घर पूर्णपणे
भरले, “सह”ने. केवळ सह म्हणून कसे चालेल, त्यावर सहलेखन करू लागले. सहज उलगडा होऊ
लागला खरा. अगदी सहजपणे मांडू शकते मी ही सहजता. सहजगत्या जेव्हढ जमेल तेतर करणारच
की अशीच असते अनेकांची सहजवृत्ती, तशीच माझी. काय सांगू, नुकतीच मी यांच्या सह कारची
डिकी भरून सहस्त्र प्रकारे खरेदी केलीच आहे, आता त्याचे सहस्त्रदर्शन हवे की
येणाऱ्यांसाठी दाखवायला.
दिवाळीला आमच्या
कुटुंबातले झाडून सारे सहजन येणार आहेत घरी. माझे आणि आहोंचे सहोदर येतातची त्यांच्या कुटुंबासह. इतकेच कशाला
चुलत, मावस, आत्ये, मामे भावंड पण सहज एक फोन केला की आलेच सहभाग नोंदवायला, ते देखील सहकुटुंब सहपरिवार. सर्वांसह सहभोजनाचा आस्वाद घ्यायला. काय सांगू
सहजानंद किती आणि कसा फुलतं जातो अशावेळी. मुलांची फर्माईश असते सह सिनेमा बघायची.
त्या भलत्या सलत्या सिनेमाचे सहदिग्दर्शन
कोण एकाच्या मित्राने केलेले असते. तर दुसऱ्या चित्रपटातली सहकलाकार तिची मैत्रीण
असते. यांचे तर ठाम मत आहे की, सहदिग्दर्शकाची भूमिका महत्वाची असते. म्हणून
त्यांच्या सह फक्त दोघांनी चित्रपट बघताना सर्व सह-मंडळींची ओळख सहजपणे होतेच.
नेहमी नको वाटते ते, म्हणून दिवाळीत हे असे गोतावळ्यासह सिनेमा बघायला आम्ही सह
तयार असतो. सिनेमाचा आनंद घेणे ही तर आता सहजवृत्ती झालेली आहे. सहज मिळतंय ना
बघायला मग कशाला घ्यावेत आढेवेढे. आणि गंमत सांगते, मुलं की नाही पटापटा मोबाईलवर
सहज भराभरा बोटं फिरवून तिकिटे पण बुक करतात. त्यांच्यात या सहकार्याची जणू चढाओढ
लागते. मग, एक चित्रपट दिवाळीच्या आधी, आणि दुसरा नंतर. आहे की आमच्याकडची
सहदिवाळी सहजानंदी साजरी करायची पद्धत.
एव्हढंच नाही तर
आमचे सगळे सहयोगी देखील सहभाग घेतात घरी येऊन. दररोज ऑफिसमध्ये भेटणं वेगळं आणि
त्याच सहयोगींने अचानक आपल्या सह ला बरोबर घेऊन आमच्या घरी येणं. यात किती फरक
आहे, तो अशावेळी सहज लक्षात येतोच. त्यांची वाटही मन बघतं राहतं. मित्रमैत्रिणीचा
सहभाग असतो. नाहीतर मस्तपैकी परत एखादा सिनेमा होतो.
कधीकधी तर सहलचं
काढतो आम्ही आणि मस्त फिरून येतो. मग काय विचारता, सहगान इतके उंचावते, की समुहगायनाचा
आनंद आवाजाच्या पट्टीत वरवर चढतो. ऐकणाऱ्याची सहनशक्ती लागते कधीतरी पणाला. मग,
तोही सहमती देतो गाण्यांना आणि मिसळतो आपलाही सहभाग सहजतेने. समूहगीते सह
तालासुरात मोठ्यांने म्हणायचा आनंद विचारूच नका. घसा खरडून खरडून सहभाग घेतात
सगळे, अगदी म्हतार्यांसह झाडून सगळे. हे आपलं माझं मी लिहिलं सर्वांसाठी, आणि
मांडल इथेच आपल्या सहकारात. तर, सांगून ठेवते..आणि बरं का.... तुमचा सर्वांचा वाचानासाठीचा
सहभाग मात्र सगळ्यांनी इथे सहकार सुगंध मध्ये नोंदवायचा आहे. नाहीतर काय होईल
सहकाराच? मी एकटीच बडबड केली, तुम्ही नाही सहमत झालात तर? किती सहज, उगवते खुसपट डोक्यात.
जसं सहजासहजी उगवलेले कॉंग्रेस गवत कुठे निघते. तसेच मनाचे, काही कारण नसताना अशीच
सहज शंका उपटते मनात. कशाला हवे ते. नको विचारही तसा. सहज उचलला विचार आणि तसाच
सरकवला बाहेर.
आणखीन एक गंमत
आहे खास सहकाराची. मला व्हॉटस्अॅप वर कोणी काय पाठवलं सांगू? “म्हशींचा कळप”. लहानपणी
आमच्याकडे एक गाय होती, आणि समोर गोठ्यात हा मोठ्ठा म्हशींचा कळप. त्या सगळ्या जशा
सहफेरी काढीत नदीवर जायच्या आंघोळीला, म्हणजे डुंबायला, तेंव्हा रस्त्याच्या पलीकडे
जायला कित्ती वेळ लागायचा आम्हाला. तर, आहो, त्याच सगळ्या म्हशी आल्या माझ्या
मोबाईल स्क्रीनवर. मला आठवल्या त्या माझ्या लहानपणीच्या मैत्रिणी. काय केलं
सांगतेच... आणि त्यांनी एका सिंहाला, न घाबरता पार ठार केला. मारून टाकलं की हो. आपल्या
शिंगावर उचललं काय, फेकलं काय, बापरे!
मध्ये काही म्हशी झाल्या खेळातला कावळा आणि दोन बाजूला आठदहा जणी. उचलले
राजाला फेकले दूर दूर... तिकडच्यांनी शिंगे उंचावली, उचलले शिंगावर आणि उलट करून
भिरकावले जोरात. जंगलाचा राजा पडला खाली, तर मध्यल्या म्हशींनी घुसवली शिंग पोटात.
एकदम सपाट केला त्याला. आहो, अगदी खरंच सांगते मी. कसं काय जमलं असेल म्हशींना. सांगा बर! त्या
एकत्रित आल्या, त्यांचे संगठन सशक्त झाले, ताकद वाढली, आणि त्यांनी राजाला ठार
केलं.
तुम्हाला ती “चिमणी
आणि शिकारी” यांची गोष्ट सहज लगेच आठवलीच असणार. त्या शिकाऱ्याने चिमण्यांसाठी
टाकले दाणे, त्यावर पसरवले जाळे. चिमण्यांना काय माहित? चिमण्यांचा थवा झेपावला
खाली, टिपले पटापटा दाणे. वाटलं असणार त्यांना की, पटकन उडावं आणि पिल्लांना
द्यावेत दाणे. तर कसंच काय, पाय अडकलेले जाळ्यात. त्यांच्यात एक आजीबाई चिमणी
होती. आजी शुषार असतेच. तीने शक्कल लढवली, आणि “एक,दोन,तीन” म्हणता सगळ्या चिमण्या
उडाल्या उंच उंच वरवर, भरभर तेही जाळे पायात अडकवून. शिकारी आला धावतं धावतं, बघतो
तर काय चिमण्या आभाळात वरवर. कशी फजिती झाली त्याची. चिमण्यांनी केली, कारण काय?
समजलं का नाही, की मीच सांगायचं? त्या सगळ्या एकत्रित कामास लागल्या आणि एकाचवेळी
उडाल्या. यालाच म्हणायचे सहकार.
तर वाचक मंडळी म्हणूनच
असाच सहकार हवा असेल सगळीकडे, तर वाचायचा “सहकार सुगंध दिवाळी फराळ”. सगळ्यांनी एकत्रित साजरी करायची “सह नगरी
सहजानंदी दिवाळी.”
वंदना
धर्माधिकारी
पत्ता :: 25, तेजस सोसायटी, तेजस नगर, कोथरूड,
पुणे-411038.
सुंदर विचार. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ.
ReplyDeleteसह या शब्वावरून किती शब्द लिहिलेत. ललित भाषेवर चांगली पकड आहे. हे जाणवते. अशी दिवाळी हवी हे खरंच. आवडले धिखाण
ReplyDelete