कै.अविनाश केळकर स्मृतीप्रित्यर्थ साहित्यप्रेमी
भगिनी मंडळातर्फे घेतलेल्या
अप्रसिद्ध ललितलेख स्पर्धेतील पुरस्कारप्राप्त
लेख – जाऊ दे ना
लेखिका : सौ. वंदना विजय धर्माधिकारी
कच्चकन गाडीचा ब्रेक लागला.
लगेच रेवाने स्कुटी कंट्रोल केली. चारच गाड्या तिच्या पुढे होत्या. रिक्षाने मागून
धडक दिली कारला. दोघेही उतरले आणि आले हमरीतुमरीवर. बाईकवाल्याने एकाला बाजूला
काढलं. तेव्हढयात गर्दीतून आवाज आला, “ओ पाव्हनं, जाऊ द्या ना. उगीच नाही कोणी
ठोकत कुणाला. जीव सगळ्यांनाच प्यारा. द्या सोडून. सगळ्यांनाच उशीर होतोय
तुमच्यामुळे. बसा गाडीत. जाऊ द्या म्हंटल की ऐकायचं असतं. माहित नाही का? सरका.”
इतकी गर्दी, दोघेही चिडलेले, गचांडी धरलेली, पण सोडली, वाद मिटला, भांडण संपले,
कुणाचे किती नुकसान झाले कोणी नाही बघितले. गेले दोघे निघून. रेवाने गाडी स्टार्ट
केली.
रेवा आली ऑफिसला, पण रेवाचा
पिच्छा पुरवू लागले ‘जाऊ दे ना’ हे शब्द. जातायेता किती घोकायाचे? सकाळीच
ग्यास पाशी उभी असताना दुध ऊतू गेलं, म्हंटल
“जाऊ दे ना”. मी आंघोळीला जाणार इतक्यात हे मध्ये घुसले, पुन्हा तेच “जाऊ दे ना.”
नवीन ड्रेस पाण्यात घालताच पोतेरे झाले. रेवाने बडबड केली तर प्रकाश म्हणाला, ‘जाऊ
दे गं.’ काल, बसमधून उतरताना चुकून एकाचा धक्का लागला, वटारून बघितलं, तोही वरमला.
दिलं सोडून. अशा छोट्याछोट्या गोष्टींवरून दिवसभरात किती टपला बसतात आपल्याला.
प्रत्येकवेळी “जाऊ दे ना”. बरोबरच आहे ते. असलं फालतू काय धरून बसायचे का? छे!
तेव्हढ्यात, साहेब हॉलमध्ये येऊन बोलू लागले,
असच काहीसं. एकदम म्हणाले, “ मी सांगतो ते सिरीयसली घ्या. नाहीतर जाऊ दे ना म्हणून
द्याल सोडून.”
किती दाबले तरी रेवाला हसू आलेच.
“ काय झालं म्याडम, हसलात. काही चुकले का? ”
“ नाही. ”
“ नाही ना. मगं जाऊ देत.”
आजचा
दिवस बहुधा ‘जाऊ दे ना’ दिन आहे असेच वाटले रेवाला.
किती सहजगत्या म्हणतात
सगळेजण ‘जाऊ दे ना.’ त्यानेच पांघरून घातलं जातं सगळ्याच चुकांवर. चूक स्वत:ची
असो, नाहीतर दुस-या कोणाचीही. ओळखीचा असो नसो. जवळचा, ऑफिसमधला नाहीतर भेटलेला
सिग्नलला. मुद्दाम का कोणी चूक करतं? जी माणसाच्या न कळत होते, ती चूक असते. आणि
जर मुद्दाम काही वाईट गेलं दुसऱ्याला दुखावलं, त्रास दिला, अपमान केला, तर... तो
गुन्हा असतो. इथे कसली आली गुन्ह्याला
शिक्षा. म्हणायचं जाऊ द्या ना, आणि व्हायचं पुढे. घरीदारी, ऑफिस, रेल्वे स्टेशन
धक्काबुक्कीत देखील डोकावतात हेच शब्द ‘जाऊ दे ना’. परिणामाची कल्पना नसते. पटकन
कोणीतरी ‘जाऊ द्या ना’ म्हणतो, आणि झटकन माफी मिळून जाते. कारण ही चूक असते, तो
गुन्हा नसतो. मुद्दाम ठरवून जर कोणी कोणाचे वाईट केले, फसवाफसवी, चोरी, खून केला
तर तो गुन्हाच ठरतो. त्याला माफी नसतेच. चूक ही अजाणतेपणी नकळत घडून जाते. तिचे
गांभीर्य कधी असते, कधी नसते, पण अशा चुकांना माफी मंजूर असते.
‘प्लीज, मला नव्हते माहित.
मुद्दाम नाही मी केलं ‘जाऊ दे ना’ या वेळी.” असे म्हणता क्षणी समोरच्याला निरागसता भावते, “ होतं असं कधी कधी. मुद्दाम
तू नाही माझं नुकसान करणार. ‘जाऊ दे ते’ दिलं सोडून.” क्षणात गळामिठी पडते. डोळे
पाणावतात.
एकटं असताना देखील हेच शब्द
कधीच्या काळचे, कोणाच्या तोंडचे, मागेपुढे सारं काही स्पष्ट नजरेसमोर उभे राहते.
यालाच म्हणतात आठवण, भूतकाळाची खपली नाहीतर आनंदोत्सव. समजायच्या आत काहीतरी
चुकीची गोष्ट होऊन जाते. होतं असंच काहीतरी, म्हणजे होतंच. करणाऱ्याचा काहीच का
कंट्रोल नसतो ते तसे घड्ण्यावर? असं झाल्यावर किती त्रास देतात तेच शब्द. रवीने का
म्हणावं, “ रेवा, जाऊ दे गं, काय करणार आपण? सोडून दे सगळं. चुका झाल्यात आपल्या
दोघांच्या हातून. माहित नव्हतं असे गुंतत जाऊ. तशी हरकत काही असेल असे नाही गं
वाटलं. नको दुखवायला घरच्यांना. जाऊ दे ना, नको हट्टाला पेटूस.”
“हे हे असं बोलून सगळं होतं
नव्हतं विसकळीत करून निघून जायचं एखादीच्या आयुष्यातून. हे असं वागायचं होतं तर का जीव ओतला होतास तू माझ्यापाशी???? कसं म्हणवल
तुला ते जाऊ दे ना ???” रेवा कोसळली एकदम. पाच मिनिटांपूर्वी हसणारी ती घायाळ
झाली. जोरात खपली उचकटली त्याच्या त्या शब्दांनी, ‘जाऊ दे ना.’ आयुष्य उलटवून
टाकायची ताकद याच शब्दात आहे हे पटलं रेवाला.
का होतात दोन जीव एकत्र, की
दुरावा अनुभवण्यासाठीच एकत्र आणते नियती त्या दोघांना.
जाऊ दे म्हणून सगळ्याच
गोष्टींवर पाणी सोडता येत नाही, हीच वस्तुस्थिती आहे. म्हणून तर रवीने म्हंटलेलं
‘जाऊ दे ना’ आज असं अचानक सात वर्षांनी पुढ्यात दत्त म्हणून यावं आणि ओरबडून
काढावा रेवाचा वर्तमान. तशी रवीची आठवण दिवसातून एकदा तरी यायचीच, या ना त्या
कारणाने, रेवा कधी मोहरायाची, तर कधी गंभीर, तर कधी पापुद्रे काढायची
अपराधीपणाच्या जाणीवेचे. होय, ती
दुसऱ्याची पत्नी होती, एका मुलाची आई होती. तरीही, हे असे, मन व्हायचेच सैरभैर गत
काळातील हिंदोळ्यावर. कधी कधितर रेवा स्वत:शीच म्हणते, “ लग्न झालं म्हणजे माझ्या
जिवलग मित्राची आठवण पण काढायची बंदी का कोणाची. मला हे पटत नाही. मी कुकुलं बाळ
नाही आत्ता. ‘जाऊ दे ना.’ ‘पण मला
मस्त वाटतं ना रवी
बरोबरच्या आठवणीत, काढणार मी, रमणार मी. माझ्या
त्या मलमली क्षणात. जपून ठेवीन नाहीतर जाऊ दे म्हणून देईन उडवून. का असं करू मी?
नाही करणार? जपणार ते क्षण देखील. जाऊ दे ना, कोणाला काय म्हणायचं असेल ते, म्हणू
देत. मी थोडीच सांगायला जाते कोणाला, की मी आज रवी बरोबर तासभर होते.” आपल्याच एका
मानाने ‘जाऊ दे ना’ म्हणायचं आणि दुसऱ्याने पटकन ‘हो’ म्हंटल की झालं. इतक्यात...फोनची
रिंग वाजली म्हणून बरं. म्हणा, पटकन एक फेरफटका मारून आली तेव्हढ्यात रवी बरोबर
ती. नेहमीची सवय बोलून गेली,’हॅलो ssss!’
‘जाऊ दे ना’ ला नसतो उलटा
प्रवास. ते काय अॅक्शन रिप्ले आहे का? चालणाऱ्याला उलट उलट पळवलं. लग्नाची कॅसेट
उलटी उलटी बघितली की किती गम्मत येते. बाकीच्या कॅसेटस एकवेळ उलट्या फिरवल्या तर
फारसा फरक पडणार नाही. पण, लग्नाची म्हणजे अवघडच. दोन जीव बांधणारी ती भक्कम दोरी.
जरी उलटी फिरवली, तोडली, मोडली, जाळली तरी आत धुसफुस करीतच जगावं लागतं उरलेलं
आयुष्य. वर एक मुखवटा, आणि आत वेगळचं काहीतरी. कसरत सांभाळावी लागतेच मनात कायमची.
पुन्हा म्हणायचं इथेही, ‘जाऊ दे ना’, आणि चढवायचा कुकर गॅसवर, कोणासाठी तरी.
झालं गेलं गंगेला मिळालं.
नव्याने श्वास घेताच हायसं वाटलं, उभारी घेतली मनाने. छोट्या छोट्या गोष्टी सोडून
देण्यातच भलं असते. किती भांडायचं, वाद घालायचा, तेढ निर्माण करायची? ज्याच्याशी
आपले बिनसते, त्याचीच आठवण सारखी होतं राहते. रडायला येते शेवटी. ‘चल, जाऊ दे झालं’
म्हणाताच पाटी पुसली जाते. तेही अगदी मनापासून. नाहीतर म्हणायचे, ‘जाऊ दे ना,’ आणि
डोळे मात्र वटारलेले, नाक वाकडे झालेले. हे खरं नाही. त्यापेक्षा खडसावून
विचारावं, “ हे असे का, तसे का नाही?” समाधान झाले, नाही झाले तरी ठीक. सोडून द्यायचे ठरले ना
एकदाचे. दिलेच सोडून. पुन्हा पाटीवर रंगीत चित्र काढायला तयार.
परवा गंमतच झाली. आजींचं
‘जाऊ दे ना’ फार असंत. एकदा आजी चिडली आणि दादाला रागवली, तर चिमुरडी निधी पटकन
म्हणाली, “ आजी, जाऊ दे ना. नाहीतर मला तुझं घर उन्हात बांधावे लागेल.” सगळ्यांनाच
हासू आलं. सहज मोठ्यांचा शब्द उचलला तिने. असं काही चुकलं तर थोडं रागावून सोडून
द्यायचं, समज दिलेली पुरेशी असते, हा एक संस्कार निधीच्या मनात रुजू पाहत होता हे
तिच्या आईच्या लक्षात आलंच.
कोण कधी कसे वागेल हे आधी
थोडेच सांगता येते? कुठेतरी हेकट माणसांशी किंवा एखाद्या अडमुठ्या मुर्खाशी गाठ
पडते. त्यांच्याशी जुळवून घेणे महाकर्म कठीण असताना स्वीकाराचेच लागते. “ जाऊ दे
ना. कशाला डोक्याला ताप करून घ्या. असेच राहणार शेवटपर्यंत.” असे म्हणून अलिप्तता
ठेवून वेळ निभावता येते. पण अशी माणसं जर रक्ताच्या नात्यात, घरातच असतील तर मात्र
अतोनात त्रास होतो. ‘जाऊ दे’ म्हणून काय काय सोडून द्यायचे यांचे? तोडून टाकावी
वाटले पण पीळ तुटेना. खरी कसोटी असते सहनाशिलतेची. दुर्लक्ष, अलिप्तता, असाह्यता,
संयम, समजुतदारपणा सगळ्यांचाच कळस होतो. आलीया
भोगासीचा स्वीकार असतो. अशावेळी नाही काम करीत ‘जाऊ दे ना’, कारण ते फक्त
वन वे असते. दुसऱ्याला त्याचे ना सुख, ना दु:ख. येरे माझ्या मागल्या, चालूच झालं
तर काय करणार? नुसता मनात गोंधळ, आणि डोळ्यात पाणी, मनात बोचणी.
बरेचदा वेळ निघून गेल्यावर
शहाणपण सुचते. उपयोग काय? जाऊ दे ना आता ते, असेच म्हणावे लागते. वेळ गेली म्हणजे
गेली. काही बोलायची, एखादी गोष्ट करायची राहूनच जाते. त्याला ठोस कारण नसतेच.
तरीही वाईट वाटतेच. काहीही म्हणा, घडलेला प्रसंग, बोचणी, जखम लहान असली तरी देखील
पटकन विस्मृतीत जात नाही. कोण, केंव्हा, कशी, का यावर निर्धारित असतो कालावधी.
रेंगाळलेला परिणाम मधूनमधून डोकं काढतोच. तेंव्हा “ सांगितलं ना एकदा, जाऊ दे ना
म्हणून.” मनाला दटावायचं आणि घडलेल्या प्रसंगाला बगल देवून दुसऱ्या कामात मन
रमवायच. हे सोपे नक्कीच नाही, पण अवघडही नाही. जे नाहीच, किंवा होते पण गेले,
संपले त्यासाठी का रडायचे? चूक स्वत:ची
असली तरीही, कोसायचं, चिडायचं, रडायचं
नाही, ‘मी वाईट’ म्हणायचं नाही. “जाऊ दे ना” म्हणताना एकादृष्टीने आपलाच
विकास होतो. अशी सोडून दिलेली आपलीच माणसे हवी असतात भविष्यात बरोबर. नवीन धागा
सापडताच हळूहळू विसरायला होते. सत्य एकच, जे झालं ते सोडून दिल्याशिवाय, स्वत:बरोबर
दुसऱ्याला माफ केल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. पुढे जातो तो काळ, वाढते ते वय.
घट्ट चिकटलेले खरडून काढल्यावर चकाकतो आतला पृष्ठभाग. ‘जाऊ दे, जाऊ दे’ म्हणत आत
ठाण मांडून बसलेले प्रसंग, व्यक्ती, शब्द खरवडून काढायचे हिमतीने. आणि नाविन्याला
जागा करून द्यायची. अशा वागण्याने नकळत वृती क्षमाशील होते. उत्तम गुण वाढीस
लागताना अनुभवाने घडत जातो माणूस. इतरांच्या मनातील आपली प्रतिमा उजळते. लोकांना
आपण आवडायला लागतो, हवे हवेसे होतो. सोडत नाहीत आपल्याला कारण आपला बदललेला
स्वभाव. छोट्याछोट्या गोष्टींचा इश्यु न करता ‘जाऊ दे ना’ म्हणत झालं गेलं पोटात
घेताच मनही मोठ्ठ होतं. मोठ्ठ्यामनात मोठी स्वप्ने फुलतात.
काही वेळा ‘जाऊ दे ना’
म्हणून नुकसानसुद्धा होते. खरेदी करताना
पावती घ्यायची टाळाटाळ करायची. भविष्यात
तक्रारिची वेळ आल्यास काय? तसेच, रस्त्यात पोलिसाने अडविल्यावर ‘जाऊ दे ना, नसली
पावती तर नाही.” अशा वागण्याने अन्याय, भ्रष्टाचार यांना प्रोत्साहान दिले जाते,
हे लक्षातच येत नाही. इतकेच कशाला, महत्वाची कागदपत्रे दिल्यावर सहिशिक्यानिशी
पोचपावती घेतली नाही. नंतर सापडेना, कोणाकडे दिले? ‘जाऊ दे ना’ कशाला घ्या सही
शिक्का’ असे वागणे किती महागात पडले?
हेच बघा, समोरच्या परागने
घर बुक केले तेच मुळी चुकीच्या बिल्डरकडे. त्याने अनेकांना फसविलेले शेजारच्या
काकांना माहित असल्यावर एक शेजारधर्म, कर्तव्य म्हणून आपणहून परागला सांगायला
पाहिजे. “जाऊ दे ना, आपण कशाला त्यांच्या व्यवहारात पडा?” असा विचार शेजारधर्मात नक्कीच
नाही. आपली प्रतिष्ठा, अहं, बाजूला ठेवून प्रत्यक्ष समस्येला भिडून, परागची होणारी
फसवणूक, नुकसान टाळणे आवश्यक योग्य आहे. इथे ‘जाऊ दे ना’ म्हणून सोडणे हा गुन्हा
होईल.
आहो, आपण साधीं माणसे. फार
काही देता घेता येत नाही एकमेकांना. समजून घेणे, त्यासाठी चार शब्द खर्ची घालणे,
थोडासा वेळ देणे पुरेसे होते. कडू प्रसंग पुन्हापुन्हा काढायचे नाहीत हे पथ्य
पाळायचे. त्यानेच सकस नाती, एकोपा आनंदाची पाखरण करतो. त्यासाठी खूप काही नाही
करायचं. “जाऊ दे ना” म्हणत सोडून देणे, सामावून घेणे, पुरेसे आहे आपलेपणा जपायला
वाढवायला.
वंदना धर्माधिकारी
मो : 9890623915
पत्ता : 25, तेजस सोसायटी, तेजसनगर, कोथरूड, पुणे 411038.
Very good advise
ReplyDeleteजाऊ दे म्हणणे सोपे असूनही आपला ईगो सुटत नाही. पुरस्कार मिळण्याजोगाच हा वैचारिक लेख आहे. आपोआप वाचक विचार करू लागतो मी किती चुकीचे वागतो याचा. अभिनंदन वंदना@
ReplyDelete