01-04-2018
आम्ही सारे ब्राह्मण
पत्ते खेळायला शिकवा
लेखिका : सौ.वंदना विजय धर्माधिकारी
शाळांची परीक्षा झाली,
सुट्टी सुरु होणार आणि मुले घरी थांबणार. अलगद आपले मन लहानपणीच्या दंगामस्तीत चुळबुळ करू लागते. खास करून
वाड्यातच कोणाच्या तरी घरात टाकलेला पत्त्याचा डाव.
त्यावेळचा आरडाओरडा, ते
रुसवे फुगवे, ती भांडणे आणि ती खादाडी. आता काय करतात मुले सुट्टीत? तसा गलका
सोसायटीत ऐकू येतच नाही. किती तरी मुले आहेत पत्ते खेळण्याच्या वयाची, मग खेळत का
नाहीत पत्ते? त्यांना माहित नाही कि काय कसे खेळतात, किती प्रकरे खेळतात ते?
पत्ते आणि त्याचे
विविध खेळ आठवले तरी स्फुरण चढते मनात. काय सांगाव्या त्या गमतीजमती. गेले
ते दिवस, कुठे असतील सगळे आता? त्यांना होत असेल आठवण पत्त्यांची, ते राज्य, ते
गाढव होणे, हरणं, भांडण, एका मागून एक लाडू खाणं.
आता ही मुले या लाडू खाण्याला नावेच ठेवतील नाही का? मला तर वाटते, त्यांना
लाडू, ती वख्खई, ते भिडू मागणे आणि ३०४ करणे हे खेळ माहित असतील.
नसायला काय झाले? सुट्टी
आणि पत्ते यांचे अतूट समीकरण आहे म्हणे. पण त्याच समीकरणाला आता छेद दिला गेला
आहे, हे कोणाच्या लक्षात आले का? आता बघा, वाडे गेले, पटकन कोणाच्याही घरात घुसणे,
ढसाढसा पाणी पिणे, काही दिले तर गप्पकन तोडांत कोंबून पळ ठोकणे, पाहिजे तर
अंगतपंगत करायला आपलीच ताटली नेणे आणि ताटली गच्च भरेस्तोवर खादाडी करणे. काय
मज्जा होती, ती ह्या पुढच्या पिढीला नाही का दिली आपण? अरे, खरंच हे देणे द्यायचे
राहिले. आत्ता आज जाणवले तरी.
असू देत, आजूनही वेळ गेलेली
नाही. करा सुरवात आपल्याच घरापासून, सोसायटीतल्या मुलांना एकत्र करून. काही करायचे
नाही, नुसते पत्ते कुटायला जरी शिकवले तरी खूप झाले. नाहीतरी पत्त्यानीच किती तरी
गोष्टी शिकवल्या लहान असल्यापासून. भिकार सावकार एकटे खेळताना हारलोत तरी हार
स्वीकारायचीच हीच पहिली प्रामाणिकपणाची
शिकवण दोनतीन वर्षाचे असल्यापासूनची आहे. केव्हढे मोठे मूल्य त्याचे, आणि पुढची
पिढी त्यापासून वंचित ठेवायची? नाही... नाही, चला सगळे. शिकवा, सांगा, त्यांना
पत्त्याच्या एकेका डावात काय काय शिकलात ते. कदाचित आठवत नसेल, सांगतेच प्रत्येक
खेळातली लपलेली शिकवण. नुसते, नाव घेतले तरी आठवतील विविध खेळ, त्यांची देणगी -
चिकाटी, कसोटी, सहभाग, दुसर्याला सामावून घेणे, ठामपणे नाही म्हणणे. सांगतेच.
५२ पत्ते, आणि जोकर कुट कुट
कुटायचे. मधेच जादू करायची. एक जादू सांगू ... अष्ट एक्का, त्रिभुज राणी, सप्त
राणी, चतुर गुड्डू, छकी दश्शी, दुरी नव्वी आणि पंजी. आठवली ना? भिकार सावकार मध्ये
कधी कफल्लक, तर कधी श्रीमंत. काय शिकविणार मुलांना, “ बाबा रे सगळे दिवस सारखे
नसतात. गरिबी आली तरी लाजू नये, आणि श्रीमंती आली तर माजू नये. शिवाय प्रामाणिकपणे
परिस्थितीचा स्वीकार करायचाच असतो.”
दुसरा डाव पाचतीनदोन. त्यात
हात ओढण्यात मजा येते नाही का? आपले हात करताना आपली ठेव वाढवायची. मी कमावलेले
फक्त माझेच नाही, तर त्यावर इतरांचा सुद्धा हक्क आहेच. मागील देणे स्वखुषीने
आधी द्यायचे. शिवाय, कधी आयुष्यात काही मागायची वेळ
आलीच तर मागायला मागे पुढे पाहायचे नाही. आपले ते वसुल करता आलेच पाहिजे. आता,
बदाम सात बघू यात काय सांगते. सत्ती आधी मग छक्की किंवा आठ्ठी. इतरांना प्रवेश
नंबर येईल तेंव्हा. याचाच अर्थ, ज्याने त्याने आपली जागा, पत, दर्जा ओळखून राहावे.
जे आहे ते स्वीकारावे बास. लॅडिजचा डाव आणि ते हाणलेले लाडू अजिर्ण होईस्तोवर.
आठवले ना? त्याने सांगितले, कुठल्याही परिस्थितीत आपल्या जोडीदाराला साथ द्या, आणि
खाताना पोटाचा विचार करा. आहे कि नाही गम्मत. मग सांगणार ना आपल्या आजूबाजूच्या मुलांना?
हुकमाची दुर्री तिर्री
सुद्धा महत्वाची असते पत्यात, तसेच आपल्या सहवासात एखादे दुसरे हक्काचे माणूस
असतेच जवळ, ते ओळखायचं, त्याच्या जवळ मोकळं व्हायचं हे तर जमलेच पाहिजे आयुष्यात.
वाईट प्रसंग येतातच तेंव्हा कोणीतरी लागते ना पाठीशी आपल्या. वाईट वरून चोर आठवला
तो गुलाम चोर. ३०४ मध्ये तर त्याला खूपच महत्व.
कधी लाल बिल्ले तर कधी काळे बिल्ले. यांच्याकडून शिकतो आपण कधी चांगले कधी
वाईट. दोन्हीमध्ये आनंदात राहायचे. याच खेळातील जोडी राजा राणीची कित्ती महत्वाची
असते ना. चवकट राजाला एकच डोळा तरीसुद्धा चवकटची राणी त्याच्याच बरोबर असते. काय शिकणार सांगा बर? मुलांना काय
सांगणार? अरे बाळांनो, “आयुष्यात आपला जोडीदार स्वीकारायचा. ते प्रकरण, एक्सटर्नरल
अफेअर, लफडं नका करू. आहे त्या व्यक्तीला गुणदोषांसह माझे म्हणायचे बरं का? म्हणजे
सुखाचा संसार होतो.”
बापरे! काय काय शिकवतात हे
पत्ते. हे मुलांना शिकवायचे काम तमाम मोठ्या माणसांनी मनावर घेतले पाहिजे. त्याची
आज गरज आहे, त्यातूनच संस्कार केले जातात, चांगले विचार कोवळ्या संस्कारक्षम मनावर
बिंबवले जातात. आज प्रत्येक घरात एखादे मुल टीव्हीपुढे नाहीतर अशाच गेम्स खेळत
असते. त्यामध्ये मारा मारीचे, खून
दरोड्याचेच खेळ जास्त असतात. तेच पुन्हा पुन्हा खेळण्याने मुलांची मानसिकता
बिघडते. याला जबाबदार कोण? आपण सर्व. मुलांच्या आजूबाजूला वावरणारे. आज सहज नेट
क्याफेत डोकावून बघा. पाचवी सहावीत शिकणारी मुले किती भयानक खेळ खेळत असतात.
प्रत्येक सोसायटीमध्ये
वयस्कर माणसे असतात. खरे पाहता ती देखील मालिकांमध्ये नाहीतर पेपरमध्ये डोकं घालून
बसलेली. अशांना कळकळीचे एक सांगणे या लेखातून सांगत आहे. ते देखील आपल्याच समाजाला
जास्त चांगले जमेल, याची खात्री आहे. कारण, पत्त्यातल्या स्मरणशक्ती खेळ आपणा
खेळतच होतो. तेंव्हा डोक्याला ताण देण्याची लहानपणीची सवय तशीच असणार आपली
सगळ्यांची. पत्ते खेळता खेळता मनावर होणारे हे संस्कार खोलवर रुतून बसतात.
आजूबाजूच्या मुलांना सुट्टीत एकत्र करून एकेक खेळ शिकवायचा. खूप पारंगत होई पर्यंत
खेळतील ते. खेळता खेळता, त्याचे गमक सहज ध्यानी आणून द्यायचे. पुस्तकात वाचून
किंवा वहीत लिहून जे चांगले संस्कार, विचार, वागणुकीचे दाखले मुलांच्या लक्षात
राहू शकत नाही. ते पत्त्यान्मधून सांगायचे.
चांगल्याबरोबर वाईट काय ते
देखील लक्षात आणून द्यायचे. कायम पत्ते कुटत बसायचे नाही, तर त्यातील मुल्ये
वाढविण्यासाठी इतर गोष्टी करायच्या. त्याने दिलेले चांगले विचार मनावर बिंबवयाचे,
ठासून घ्यायचे, आपोआप आचरणात येतात. मनाला सवय लागते दुसऱ्याला देण्याची, योग्य
तेच मागण्याची, आहे ते स्वीकारायची. नाटे ठोम म्हणजे नॉट अॅट होम. ‘नाही’ म्हणणे
अनेकांना अवघड जाते. त्याचीच योग्य शिकवण या खेळत मिळते. असेल तर हो म्हणा नाहीतर
नाही. खोटे बोलायचे नाही. तसाच तो चॅलेंज. पकडा जो खोटे बोलतो, खेळतो, वागतो
त्याला आणि करा गाढव. आजकाल कोणी चुकत असेल, तर दुसऱ्या कोणाचीही हिंमत होत नाही
चार शब्द सांगायची. नको रे बाबा, मध्ये पडायला?
इथेच चुकते. बोला एकमेकांशी. हो पण त्यासाठी आधी एकत्र या सगळेजण. कुट कुट
कुटा पत्ते. एकमेकांना ओळ्खल ते इथेच, एकमेकांचे व्हाल तेही इथेच याच सुट्टीतल
पत्ते खेळता खेळता. पुढे एकमेकांच्या पाठीशी उभे राहाल खंबीरपणे. त्याचीही शिकवण
इथेच मिळणार आहे. मोठ्या माणसांनो, थोडा वेळ काढा आपल्याच पुढच्या पिढीसाठी. वेळ
भरपूर आहे, त्यातच पत्ते घुसडायाचे. ते तर नक्कीच जमते.
तमाम सर्व आपल्या लोकांनी
आजूबाजूच्या मुलांना पत्त्यांच्या माध्यमातून शिकवावे, इतकेच सांगणे आहे.
करा पत्ते पिसायला सुरवात,
आपोआप आठवतील सगळे खेळ, सर्व छुपे निरोप या पत्त्यांनी दिलेले. मुले खूप खुश
होतील, आणि म्हातारी वयस्कर मंडळी सुद्धा.
वंदना धर्माधिकारी
M: 9890623915
Pattyancha daav changlach rangto ani bharpur shikvun jaatie
ReplyDeleteम्हणून तर तू शहाणी झालीस.
ReplyDeleteपत्ते खेळायला मलाही आवडते. खेळात खोलवर धिचार करून गुणांची देणगी शोधावी थी आपल्या सारखीनेच.ते एरागबाळ्याचे काम नाही. आतिव सुंदर लेख.
ReplyDeleteमलाही खूप आवडतात. याच पत्त्यांवर माझ्या दोन कविता आणि दोन लेख आहेत. प्रत्येक खेळातून कळत न कळत संस्कार होतोच, आणि मुले घडत जातात. पत्ते शिकवा हे सांगायची वेळ आली, आता तरी शिकवावेत. असो...
ReplyDeleteधन्यवाद!