नुक्कड – फेसबुक पेजवर १९ मार्च,२०१८ रोजी कथा टाकली
होती.
कथा ::::: फू.. फू… फू....
लेखिका : सौ.वंदना विजय
धर्माधिकारी
“पियुष, काय करतोस तू... ही बिस्किटे घे.”
पियुषचे मात्र एक ना दोन. मावशीने
हाक मारलेली त्याचा कानात गेलीच नाही. खिडकीत बसून एकटक बघत होता तो, कोपऱ्यावरून
वळणाऱ्या प्रत्येक वाहनाकडे. किती उशीर झाला.
शमा होती इतक्यावेळ, ती पण गेली तिच्या मावशी बरोबर. तिची मावशी आणखीन थोडी उशिरा
का नाही आली?
राहुलचे बाबा तर किती लवकर आले आज
ऑफिसमधून. त्याला बरं नव्हतं ना म्हणून झोपेच्या आधीच नेलं घरी. माझे बाबापण असेच
आले होते मला खूप खोकला सर्दी झाली होती ना त्यादिवशी. आज नाही बाबा येणार. आईचं
येणार मला न्यायला. सारिकाची आई रोजच्याच वेळेला आली. माझीच आई का नाही आली
अजून...? आई, ये ना लवकर. बघं ना सगळे गेले घरी. मी एकटाच राहिलो.”
“ हे घे, बिस्कीटे खा, मी जाते हं... “ असं म्हणून नंदामावशीने दोन
बिस्किटे पियुषच्या हातावर ठेवली. डोक्यावरून
हात फिरवला आणि हात हलवीत बाय बाय म्हणतं गेली देखील बाहेर.
‘नंदामावशी दिवसभर असते. संध्याकाळी सगळं आवरून जाते
निघून. तोपर्यंत सगळी मुलं जातात घरी. मला आवडते ती. काकूंना बरं नसतं ना म्हणून
आता ती शेवट पर्यंत थांबते. आधी काय करायची, आम्ही झोपलोत की नंदामावशी घरी जायची.
आता नाही लवकर जात.’
“आली आली, स्कुटी आली, नाही...
आईची नाही.? का उशीर करतेस गं तू ?????”
पाच वर्षाचा पियुष अगदी रडवेला
झाला. टचकन आलंच बाहेर, सुं सुं... ही झालं.
खरंच आज रेखाला - पियुषच्या आईला नेहमीपेक्षा उशीर झालाचं होता. सहसा असं
ती करीत नाही, असेल काही काम. सगळी मुलं गेली, आणि पियुषचा धीर सुटत चालला.
“पियुष, काय करतोस?” काकांची हाक
आली.
“काही नाही. ” फक्त इतकेच उत्तर
पुरते काकांना. काही उद्योग जोवर मुलं
करीत नाहीत तोवर काका खूष असतात. मधून
मधून अंदाज घेत असतात बासं इतकेच. हळू हळू म्हंटल तरी दोन्ही बिस्किटे फस्त झाली
खरी, तरीही येऊ नये का आईने. पियुषला समजेना काय झालं असेल?
‘सुहासदादा कसा एकदा उशिरा आला...
खूप खूप उशीर झाला होता त्याला.... आणि त्याला कोणीतरी पाडलं होतं. त्याला खूsssप लागलं, आणि नंतर तो आलाच नाही घरी ? त्या दिवशी किती
लोकं आले होते आमच्या सोसायटीत. बाबा पण लवकर आला. माझ्याशी बोलला पण नाही, आणि
गेला दादाच्या घरी. लगेच आला आईजवळ, मला आईने घरात बसायला सांगितलं म्हणे जायचं
नाही बाबांच्या मागे. रागावली मला. अस्सा राग आला ना आईचा.’
‘अजून का नाही आली? तिला नसेल ना
कोणी धक्का दिला. पाडलं नसेल ना आईलापण...’
मन वेडं असतं. नको तेच डोक्यात
येतं हेच खरं. लहान असला म्हणून काय झालं? पियुषला आईची काळजी की काय ते वाटायला
लागलं होतं. समोरच्याच घरातल्या
सुहासदादाला उशीर इतका झाला, की नंतर तो पियुषला दिसलाच नाही.
‘सुहासदादाला लागलं होतं म्हणे. मी
त्याला फुंकर मारणार होतो. बाबाला नाही का मी फुंकर मारून बरं केलं. कपाटाच्या
दारात बाबाचं बोटं चेमटलं होतं ना, तर त्याचा हात दुखतं होता, नखचं निघालं. मी
सकाळी फुंकर मारून त्याला ऑफिसला पाठवायचो. आणि संध्याकाळी आल्यावर बाबा म्हणायचा,
“पियुष ये लवकर, फुंकर मार, माझा बाऊ लवकर बरा कर.” आणि फू फू केल्यावर त्याचा बाऊ
बरा झाला, अगदी खरंच!
तसंच, सुहासदादाच्या बाउला मी बरं
केलंच असतं, पण आई ना अशी आहे. तिने तर मला इथे काकूंच्या घरी आणलं आणि गेली घरी.
त्या दिवशी तर अस्सा राग आला मला आईचा. मी जाणारचं नव्हतो घरी. काकू खूप लाड करतात
माझे. मी इथेच काकूंच्या घरी राहणार होतो, पण आली की आई मला घ्यायला. मगं काय गेलो
घरी.
त्याचं काय की.. शेजारच्या मीराताई
घरी आल्या म्हणाल्या, ‘सुहासला आणणार आहेत. पियुषला सोडून ये तू’. मी पळालो घरात.
तर ओरडली आई मला. मी सांगितलं तिला. ‘बाबाचा बाऊ मी बरा केला तस्सा त्याचाही करतो
ना. जोरात फू फू मारेन मी दादाच्या बाऊला.
मला नाही जायचं काकूकडे.’ पण नाही ऐकलं तिने. पण, आज काय झालं तिला? बाऊ नसेल ना
झाला आईला??’
शेंडा लालीलाल व्हायला लागला होता
एका मुलाचा. इकडे काकू स्वयंपाक घरात गेलेल्या पियुषला कळलं. त्याने डोकावलं आत तर
काका काहीतरी शोधतं होते, आणि काकू चहा करायला गेल्या. कसला आवाज झाला म्हणून लगेच
पियुषने खिडकीतून बघितलं. काही नव्हतं, एक जुनाट टेम्पो आवाज करीत जोरात केला. आली
का नाही?
‘ये ना गं आई लवकर....‘आता मात्र
आईशी बोलायचं नाही. आज काकुकडेच राहणार मी, आली आली... चं! आईची स्कुटी नाही,
रिक्षा आली, आणि इथेच का थांबली? आईची स्कुटी कुठे? आई कशाला रिक्षाने येईल. सकाळी
तर गेली स्कूटीवर मला इथे सोडून. ओ, थांबली
की ही रिक्षा. कोण आलं असेल? मला काय करायचं. कोणीतरी असेल. कोपऱ्यावरून काहीच
येताना दिसत नाही. ही तर निमामावशी, आईच्या ऑफिसमधली. ती का आली?
आणि आई कुठे? तिला कोणी पाडलं नसेल ना? नाही नाही. आई येणार. हो यायलाच हवी.
सुहासदादा सारखं नाही लागलं तिला. मी बरं करणार तिला. पुन्हा पुन्हा दिसला नाही
दादा. आई दिसणार. येणार, हो येणार. मावशीने पैसे नाही दिले रिक्षावाल्या काकांना. मग, आत कोणाशी तरी
काय बोलली. उघडलं की तिने फाटक.’
रिक्षात कोण आहे? हीच साडी. थोडाच
पाय काय बाहेर काढते. ये ना बाहेर. हो हीच
साडी नेसून आई गेली होती ऑफिसला. रिक्षात आई आहे? उतरतं का नाही ती. बाहेर पण नाही
आली. आली तर तिला मी दिसेल की. का नाही येत?’
‘आई गं... नको मीच जातो खाली. तिला
फू मारून पटकन बरं करतो. काय झालं असेल? रक्त आलं असेल का? जातोच पळत.’
तेव्हढ्यात बेल वाजली. “पियुष...आई
आली असेल रे. ये इकडे.” असं काकू म्हणायच्या आत पियुष दारात.’
काकूंनी दार उघडलं तर दुसरीच बाई
दारात. ”मी रेखाची मैत्रीण, नीलिमा. पियुषला न्यायला आले.” काकूंनी दार उघडलं आणि
त्यांच्या हाताखालून स्वारी पळाली देखील खाली.
“पियुष... थांब. जायचं नाहीस तू.”
काकूंनी जोरात हाक मारली, पण ऐकेल कोण.
“जाऊ देत त्याला. रेखा खाली आहे
रिक्षात. मी जाते खाली” नीलिमाने सांगितलं.
“अगं. रेखाताई दिसतात खाली.
रिक्षातून डोकावलं बघ त्यांनी, मला हात केला. जाऊ देत त्याला. दे पिशवी त्याची.”
काकांनी खिडकीतून डोकावून बघितलं
रेखाला आणि काकूंनी पिशवी निलिमाच्या हातात दिली.
रिक्षात आईला बघून इवलासा घायाळ
जीव भाड्यांत पडला. “आई किती उशीर?” आणि तोंड डोळे दोन्ही एकदम बोलू लागले.
“आई, कुठे बाऊ झाला. दाखव. मी फू
मारतो. बाबा सारखा छोटाच आहे ना. किती उशीर केलास यायला. मी घाबरलो ना. मला वाटलं
सुहास दादा सारखा मोठा बाऊ झाला आणि तुला घरीच येता आलं नाही तर, मग???” आणि माय
लेकरांचे डोळे वाहू लागले. पियुषने तर
हंबरडा फोडला. “आई......”
नीलिमाही आली. रिक्षा घराच्या
दिशेने निघाली देखील. पियुला थोडं रडू दिलं. कुशीत शिरला आईच्या तो. तिही हलली
खूप. ओसरला पहिला ओघ.
”पियुष, राजा.... मला बाऊ झाला,
तोही आपल्या बाबासारखाच. छोटासा. अरे, मी ऑफिसमध्ये जिन्यावरून पडले. अगदी घरी
निघताना. फक्त दोनचं पायऱ्या राहिल्या आणि पाय मुडपला. हा बघ, थोडा सुजलाय ना.
रक्त पण नाही आलं. तू फू फू करून माझा बाऊ बरा करायचा हं.
करशील ना तू.”
पियुने डोळे पुसले, आणि पटकन
रिक्षात खाली बसला. आईचा पाय आपल्या
इवल्या मांडीवर घेतला आणि सुरु केलं तिथेच त्याने....” फू.......... फू.........
फू.........”
वंदना धर्माधिकारी
लहान मुलांचे भावविश्व छान उलगडले आहे.
ReplyDeleteहोय. किती भिती वाटली असेल चिमुरड्याला. धन्यवाद!
ReplyDeleteलहानपण भावना मस्त ।मला कधी कधी अशीच भीती वाटायची।
ReplyDeleteहो ना. मोठ्यांना याची जाणीव असते का असा प्रश्न बरेचदा पडतो. आईला घरी यायला उशीर होणार असेल तर आईने बाबांनी देखील घरी फोनवर मेसेजवर मुलांना सांगायला पाहिजे ते. पूर्वी ती सोय सरसकट सगळ्यांना नव्हती. आता आहे. एकदा असंच, मला यायला उशीर झाला. घरी फोन वगैरे काही नव्हते. दार उघडलं तर दारामागे सगळं स्वयंपाक घर. भांडी, पातेली पालथी घातली होती. कधीतरी आजीने तसं सांगितलं होतं, 'उशीर झाला की दारामागे भांड पालथ घालायचं.' पातेल्यासह दारामागे माझी वाट बघत होते सगळे. दार उघडलं दोघी रडत होत्या, नंतर चिडल्या, आणि बिलगल्या मला.काय सांगू...
DeleteNice expressions of children
ReplyDeleteDifficult to extract
Did a good job
Thanks! really it is difficult to understand child mind. Most of the time we, elder ones deviate baby instead of understanding.
ReplyDeleteफारच छान लिहिलंय. छोट्या मुलांचे भाव विश्व . कसे सुचते हे सर्व? कुठे भेटतात ही पात्र ....... किती सुंदर ओघवती भाषा
ReplyDeleteकुठे भेटतात? प्रत्येक घरात असतात. आपण वाचायला चुकतो असे आता माझी मुले मोठी झाल्यावर लक्षात आलं... आलं नातवंडांना वाचते. खूप धन्यवाद!
ReplyDeleteपाळणाघरात मुलांना सोडून जाताना जशी अवस्था मोठयांची होते. त्याहूनही अधिक मुलांची हळवी अस्वस्थता कथेत मांडली आहे.असा पियुष घराघरात आहे.त्याचे हळवेपणही जपले पाहिजे.
ReplyDeleteअगदी खरं आहे. मुलांचे हळवेपण जपलं पाहिजे. कधी कधी वाटतं आजकाल हळवं असणं हे चुकीचे आहे, असाच विचार मानत येतो. आणि मोठी माणसं देखील हळव्या मनाच्या व्यक्तीला हसतात, नावं ठेवतात. म्हणतात, "त्यात काय एव्हढं रडायचं?"... रडणे हा जणूकाही चुकीचे वागणे. पण ते तसे नाही. धन्यवाद!
ReplyDeleteVery nicely written!
ReplyDeleteTouching reality... thanks
ReplyDelete