मैत्री बँकिंगशी
: ११ वी आवृत्ती
प्रस्तावना : श्री.रवींद्र प्र. मराठे
व्यवस्थापकीय संचालक व मुख्य
कार्यकारी अधिकारी,
बँक ऑफ महाराष्ट्र.
आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. सर्वच क्षेत्रात सर्व
स्तरांवर स्पर्धात्मक वातावरण आहे. पुस्तक प्रकाशन क्षेत्र देखील याला अपवाद नाही
हे निश्चित! तर या स्पर्धेमध्ये स्वत:ला सिद्ध करून, अत्यंत अल्पावधीमध्ये
पुस्तकाची ११ वी आवृत्ती प्रकाशित करण्याचा मान सौ.वंदना धर्माधिकारी यांनी
पटकाविला आहे. त्यातही हिंदी, गुजराती आणि ब्रेल रुपांतरीत पुस्तकांचा समावेश असणे
हे नक्कीच विशेष आहे. बँकिंगशी निगडीत विविध सेवा सुविधांची माहिती सोप्या भाषेत
मांडून बँकिंग साक्षरता वृद्धीचे मोलाचे कार्य लेखिकेच्या लेखणीने केलेले आहे.
बँकिंग क्षेत्रात कालानुरूप बरेच बदल झाले. नवनवीन
तंत्रज्ञानाधिष्ट बँकिंग हे इलेक्ट्रॉनिक बँकिंग म्हणून ओळखले जाऊ लागले.
ग्राहकांच्या अपेक्षा देखील वाढल्या. ग्राहक आपल्या हक्कांसाठी सजग झाले. बँकिंग
क्षेत्रामध्ये कामाच्या स्वरूपातही बदल झाले, सुधारणा झाल्या. परिणामी तणावही
वाढला. बँकांचा कायापालट झाला म्हंटले तर योग्य होते.
“कस्टमरची पासबुक भरता भरता आपलं पासबुक भरायचं राहून गेलं
कि काय?” असा प्रश्न बँकेतील
कर्मचाऱ्यांना नेहमीच पडतो. सेवानिवृत्तीनंतर पासबुकासारखे काय काय राहिले याची
जाणीव होते. कारण या धकाधकीच्या करियरमध्ये आपले छंद असेच बाजूला पडलेले असतात.
पण लेखिका याला अपवाद आहेत असेच म्हणावे लागेल. २८
वर्षांच्या प्रदीर्घ सेवाखंडानंतर लेखन, निवेदन आणि काव्य क्षेत्रांमध्ये भरीव
कामगिरी त्या करीत आहेत. आपल्याजवळ असलेल्या ज्ञानाचा सर्वसामान्यांनाही फायदा
करून देण्याच्या हेतूने झालेले हे आर्थिक लेखन निश्चितच स्तुत्य आहे. केंद्र व
राज्य सरकार यांनी लेखिकेला पुस्तकांसाठी पुरस्कृत केलेले आहे.
मागील दोन-तीन वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण
समाजाला मुळापासून हलवून सोडणारे बदल केले गेले. विमुद्रिकरण, कॅशलेस आणि वस्तू व
सेवा कर दोन्ही कार्यप्रणाली देशासाठी आवश्यक. अर्थव्यवस्थेला मजबूती देणाऱ्या
एकापाठोपाठ आल्याने थोडाफार ताणही जाणवू लागला. भारत सरकारच्या या दोन्ही
निर्णयांवरून जागतिकदृष्ट्या विशेष उल्लेखनीय वाहवा मिळाली. जन-धन योजनेद्वारा २०१४ नंतर तळागाळातील लोकांना बँकेच्या माध्यमातून
देशाच्या अर्थप्रवाहात सामावून घेण्यात आले. मोठ्या संख्येने खाती उघडली गेली आणि
करोडो रुपये त्या खात्यात जमा केले गेले.
विमुद्रिकरणाने सर्वांना बँकिंग
व्यवहारांच्या नव्या नव्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक वळवले गेले. लहानलहान
व्यावसायिक लोकांनी देखील मोबाईल द्वारा आपापले खरेदी विक्री व्यवहार करायला
सुरवात केली आहे. कॅशलेस व्यवहार वाढविण्यात ग्रामीण भागाने बरीच पुढची मजल
मारलेली दिसते. एखादे गावच्या गाव कॅशलेस केले गेले, आणि इतर गावांनी यांचा वसा
उचलून आपल्याही गावात कॅशलेस व्यवहार सुरु करायचा प्रयत्न सुरु केला. त्यांनाही
याकामी मोठे यश येताना दिसते. या दृष्टीने ‘मैत्री बँकिंगशी’ पुस्तकाच्या नव्या
अकराव्या आवृतीमधील कॅशलेस प्रकरणात चांगल्या प्रकारे विषयांची मांडणी करून
समजावून दिलेले आहे. सर्व पर्यायी माध्यमांची ओळख तिथे होते. त्यातून ज्याला जे
घेणे शक्य असेल ते घेऊन व्यवहार करता येतील.
जन-धन योजना, आधार संलग्न योजना,
मुद्रा कर्ज योजना, वित्तीय समावेशन अशा विविध योजनांच्या माध्यमातून जनमानसात
बँकिंगची बीजे रुजवण्याचे कार्य सरकारी पातळीवर चालू आहेच. त्याचे अतिशय चांगले
परिणाम देखील दृष्टीपथात येताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांशी हसत
खेळत संवाद साधणारे “मैत्री बँकिंगशी” हे पुस्तक बहुमोल ठरते. बँक व त्यांचे
ग्राहक यांच्या नात्यासंबंधी व ग्राहकांच्या हक्कासंबंधीची माहिती उपयुक्त,
मार्गदर्शन करणारी आहे. अर्थसाक्षरता वृद्धी होणे ही देशाची निकड आहे, कारण आर्थिक
विषय हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे.
बँकिंग क्षेत्रामध्ये सध्या मोठ्या
प्रमाणावर नवीन नोकरभरती होत आहे. बँकिंग करियर निवडणाऱ्या अशा उमेदवारांना देखील
हे पुस्तक योग्य मार्गदर्शन करणारे आहे. ब्रेल पुस्तक केलेलेच आहे, तसेच ब्रेल
रीडरवर पुस्तकाची उपलब्धता असल्याने दृष्टिहीन विद्यार्थ्यानाही पुस्तकाचा उपयोग
करून घेता येणारा आहे.
सोपी सरळ मांडणी, विषय सुलभ करून
सांगण्याची कौशल्यपूर्ण हातोटी, आकर्षक छपाई, मर्यादित पृष्ठसंख्या या
वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांमुळे सदरचे “मैत्री बँकिंगशी – बेस्ट सेलर – ११ वी
आवृत्ती” पुस्तक वाचकांशी सहजतेने “मैत्री” साधते. बँकिंग साक्षरता वाढविण्याच्या या
महत्वपूर्ण योगदानासाठी सौ.वंदना
धर्माधिकारी यांचे अभिनंदन आणि खूपखूप शुभेच्छा! तसेच इतक्या आवृत्त्या
अतिशय सुबकतेने प्रकाशित करणाऱ्या ‘सकाळ प्रकाशन’ चेही अभिनंदन आहे. अशाच
उत्तरोत्तर पुस्तकांच्या आवृत्त्या निघोत, तसेच विविध भाषांमधील अनुवादित
आवृत्त्या प्रकाशित होवोत, ही सदिच्छा!
रवींद्र प्र. मराठे
व्यवस्थापकीय संचालक व मुख्य
कार्यकारी अधिकारी,
बँक ऑफ महाराष्ट्र.
ब्रेल रुपांतरीत ::: मैत्री बँकिंगशी
सावी फाउंडेशन, पुणे
श्रीमती रश्मी पांढरे, अध्यक्षा,
श्री.लुई ब्रेल यांनी स्वत: दृष्टिहीन असूनही आपल्या इतर बांधवाना साक्षर
बनविण्यासाठी आयुष्यभर खडतर परिश्रम घेतले आणि ब्रेल भाषेचा शोध लावला. त्यामुळे पुढील पिढ्यांमधील दृष्टिहीन लोकांना
आपले आयुष्य जगताना ब्रेल भाषेने प्रचंड उर्जा देऊ केली.
श्रीमती वंदना धर्माधिकारी यांनी अशा विद्यार्थ्यांना एकदा खूप सुंदर
मार्गदर्शन केले होते. त्यानंतर,
त्यांच्या दोन बँकिंग पुस्तकांचे ऑडीओ रेकोर्डिंग करून अनेकांनी ते आपल्या
मोबाईलवर डाउनलोड करून त्यावरून बँकिंगच्या प्रवेश परीक्षांचा अभ्यास करायला
सुरवात केली होती. त्यानंतर ब्रेल रुपांतरीत पुस्तक करण्यात आले.
“सावी फाउंडेशन” ने बँकिंग विषयाचे
“मैत्री बँकिंगशी” ह्या श्रीमती वंदना धर्माधिकारी लिखित आणि ‘यशोगाथा’
प्रकाशित ब्रेल पुस्तकाचा प्रकाशन समारंभ ९ जानेवारी २०१६ रोजी आयोजित केला होता.
विशेष म्हणजे पुस्तक प्रकाशनासाठी आरबीआयचे असिस्टंट जनरल मॅनेजर श्री. राजेश
आसुदानी खास नागपूरहून आले होते. जन्म:त दृष्टिहीन असूनही बँकिंग क्षेत्रात उच्च
पदापर्यंत पोचलेल्या सरांना पाहून अनेकांनी
प्रेरणा घेतली आणि बँकिंग क्षेत्र निवडले.
‘सकाळ प्रकाशनचे मैत्री बँकिंगशी’
पुस्तकाचे ब्रेल रुपांतर ‘यशोगाथा - ब्रेल प्रकाशक आणि मुद्रक
श्री.स्वागत थोरात’ यांनी सुबकरीत्या वेळेत करून दिले. मुळात १८० पानांच्या
पुस्तकाचे ब्रेल रुपांतरीत तीन खंड केले गेले. प्रकाशन प्रसंगी अंधांसाठी काम
करणाऱ्या विविध अनेक संस्थांना पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. ज्यांनी मैत्री
बँकिंगशी पुस्तकाचे रेकोर्डिंग ऐकले, ब्रेल वाचले, त्यावरून अभ्यास करून परीक्षा
दिल्या असे अनेक विद्यार्थी आहेत. त्यांना वंदनाताईंच्या पुस्तकांचा कसाकाय फायदा
झाला ते पुढील मुद्द्यावरून लक्षात येईल.
१. बँकिंगची अगदी मुळापासून ओळख झाली.
२. चेक, ड्राफ्ट, त्यावरील नंबरंपासून
सगळं समजलं.
३. बँकांच्या विविध ठेवी, कर्ज, वा
इतर नव्या जुन्या योजनांची माहिती झाली.
४. पुस्तकातील संक्षेप रुपांमुळे अनेक
गोष्टी नव्याने समजल्या. यांचा उपयोग इंटरव्ह्यू मध्ये छान झाला.
५. नवीन लोकांना तर याचा फायदा होतचं
आहे, पण जे आधीपासून बँकेत काम करीत आहेत त्यांनाही स्वत:चे ज्ञान अद्ययावत
ठेवायला मदत झाली.
६. आपल्या डिपार्टमेंटबरोबरच इतर डिपार्टमेंटच्या
कार्याची, त्यांच्या संकल्पनांची, अधिक उणे काय याची माहिती पुस्तकाने झाली.
त्याचा फायदा परीक्षा देताना होतोच. शिवाय एका जागेवर बसून सर्व टेबलांवर काय व
कसे चालते यांचा अंदाज येतो.
७. आर्थिक विषयाची पार्श्वभूमी तयार
झाली, त्याने आत्मविश्वास वाढला.
८. ग्राहकांशी चर्चा करताना
पुस्तकातले आठवले आणि ग्राहकांशी चांगला संवाद साधला, असे अनेकदा होते.
९. बॅंकेतर्फे ट्रेनिंग घेत असताना
कुठलाही विषय समजायला उपयोग होतो. बारकावे देखील आधीच समजलेले असतात. इतरांना
आश्चर्यही वाटते, तेंव्हा आम्ही पुस्तकाचे आणि वंदना मॅडमचे नाव सांगतो.
१०. इलेक्ट्रॉनिक बँकिंगमधील विविध
ऑनलाईन बँकिंग, ज्याची आवश्यकता वाढत आहे त्याची माहिती मिळाली.
मोड्युलर इन्फोटेक द्वारा
वंदनाताईंची पाच पुस्तके ब्रेल मित्र – ब्रेल रीडर वर उपलब्ध आहेत. त्यापैकी
बँकिंगची तीन आहेत आणि इतर दोन. बँकिंग जिज्ञासा (सहावी आवृत्ती), Banking Horizon (2nd edition), मैत्री बँकिंगशी (दहावी आवृत्ती) ही देशभरातील अनेक संस्थांमधून अभ्यासली
जातात.
बँकिंग विषयाचे इतके चांगले पुस्तक
या सर्वांपर्यंत पोचवता आले याचा ‘सावी’ला सार्थ अभिमान आहे.
रश्मी पांढरे.
अध्यक्षा, सावी फाउंडेशन, पुणे
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मनोगत :: ११ व्या आवृत्तीच्या निमित्ताने
आपल्याच आयुष्याचा लेखाजोखा करताना कधीकधी गंमत वाटते, आश्चर्यही असतेच. सहज आपणच आपल्याला प्रश्न
विचारतो, ‘हे मी केले?’ जाणीव होते आपलीच आपल्याला आणि खूप छान वाटायला लागते. मी
काहीतरी केलं, जे इतरांच्या उपयोगी येत आहे यामधील समाधान शब्दातीत आहे. शिवाय
वेळोवेळी भेटलेली माणसे आणि जनसंपर्काचा वाढीव परीघ बघूनही माझ्यावरच मी खूष होते.
माझ्या हातात लेखणी दिली म्हणून देवाचे आभार मनोमन मानते अनेकदा. देव देखील एखादे
चांगले काम करण्यासाठी कोणाचा तरी हात धरून ते करून घेत असतो, इथे बँकिंग
लिहिण्यासाठी त्याने माझा हात धरून काम करून घेतले. यावर माझा विश्वास आहे, मी
फक्त उतरवीत गेले. बास! इतकेच!
स्वेच्छानिवृत्ती माझ्या पथ्यावर पडली म्हणते मी. बरं झालं नोकरी सोडून घरी बसले
आणि असेच खूप काही करीत राहिले, लिहित गेले. बँकेतच राहिले असते, तर कधी लिहिले
असते? शक्यच नसतं झालं. आत्ताशी मागील काही वर्षात कुठे वेगळ्या अर्थाने जगायला
लागले मी. वयाच्या पन्नाशीत लेखणी घेतली,
माईक आला हातात, स्टेजवरून वावरायला अन लोकांशी बोलायला लागले, त्याला बहर येत
असताना का थांबावे मी? खूप काही करायचे
डोक्यात येते. अगदी आतून कोणीतरी ओरडत असते, “कधी काढणार आम्हाला बाहेर, लवकर घे
ना माझं लिहायला.” एकेक करीत मांडत राहते कागदांवर आणि ठेवते वाचकांच्या पुढ्यात.
कधी बँकिंग, कधी कथा, कधी कविता तर मुलाखत आणि इतरकाही सुंदर ललित वैचारिक देखील.
आज नाही का मी ‘मैत्री बँकिंगशी’ बेस्ट सेलर
पुस्तकाच्या ११ व्या आवृत्तीचे मनोगत लिहायला घेतले. खूप आनंद होतोय मला आणि माझ्या
घरादाराला देखील. त्यांच्या सहकार्याने तर इतकी मजल मारू शकते मी. २०१४ मध्ये
जेंव्हा याच पुस्तकाची सातवी आवृत्ती प्रकाशित झाली, तेंव्हा काही वाचकांनी मला
विचारले,
“मॅडम, पुस्तकास किती पुरस्कार मिळाले?”
क्षणभर थांबून मी म्हंटल,’ एकही नाही’.
त्यांना आश्चर्य वाटले, म्हणाले,”का बरं?”
“मी पुरस्कारासाठी कधीही कुठलेच पुस्तक कुठेही पाठवले नाही.”
मग वाटले आपले काहीतरी चुकले. पुस्तक पाठवायचे असते, हे डोक्यातच आले नाही. इतक्या
भराभरा आवृत्त्या निघाल्या, शिवाय तीनचार वेळा परदेशी जाणे झाले तेही
अगदी सहासहा महिने. कधी कुठे वेळचं नाही, आणि लक्षातही नाही आले. “जाऊ देत.”
म्हंटलं आणि लागले पुढच्या आवृत्तीच्या तयारीला. ‘जाऊ दे, जे गेलं ते गेलं.’ हा
‘जाऊ दे’ शब्द माझ्या पठडीतला. मला आवडणारा. बरं असतं ‘जाऊ दे’ म्हणून सोडून देणं, नव्याने मस्त रिचार्ज होणं.
‘मित्रता बँकिंग से’ पुस्तक देखील माझ्या ‘बँक ऑफ इंडिया’ कडून ‘केंद्र-सरकार’
कडे दिले गेले. त्याचे असे झाले, ‘केंद्र सरकार राजभाषा विभागा’च्या सचिव आणि त्यांची टीम
पुण्याला आली होती. तेंव्हा मराठी माणूस हिंदी साठी काय करतो याचा आढावा घेताना ते
‘बँक ऑफ इंडिया’त येणार होते. माझे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले होते. बँकेने मला बोलावले, त्या सर्वांना माझ्या
पुस्तकांचा संच दिला गेला. मग, मला दिल्लीवरून फोन आला, “हे हे बघा, भरा आणि
पाठवा.” मी सांगितलं तसं केलं. ‘ भारत सरकार, केंद्रीय हिंदी निदेशालय, मानव संसाधन
विकास मंत्रालय, यांचे कडून - “हिदीतर भाषी हिंदी पुस्तक लेखिका
पुरस्कार घोषित किया गया.” एक लाख रुपये तो कभी के मेरे खाते में आ गये. लेकीन अभी तक पुरस्कार लेने के
लिये बुलावा तो नहीं आया. मुजे तो इसीका
इंतजार है.
तसाच महाराष्ट्र शासनाचाही ‘मामा वरेरकर पुरस्कार’ मी स्वीकारला आहे. आणि होय,
‘दैनिक लोकमत’ तर्फे आर्थिक विषयी प्रकाशित लेखांना देण्यात येणारा “पत्रपंडित
पां. वा. गाडगीळ पुरस्कार” यावर्षी २०१६ चा मला जाहीर झाला आहे. ‘दैनिक लोकसत्ता’ मध्ये
महिला दिनाचे निमित्ताने लिहिलेल्या ‘महिलांची अर्थसाक्षरता’ या लेखास पुरस्कार देऊ
केला आहे. हाच पुरस्कार ‘अर्थपूर्ण दिवाळी अंक २०१२ - अर्थसाक्षरता’ या लेखालाही
मिळाला होता. मध्यंतरी काहीच पाठवले नाही. पाठवले तर मिळणार हे माहित असूनही
पाठवले जातेच असे नाही.
‘हिंदी-मित्रता बैंकिंग से’ पुस्तकाचे प्रकाशन ‘अहमदाबाद’ येथे मोठ्या व्यासपीठावर झाले. तेंव्हाच तेथील ज्येष्ठ मंडळींना पुस्तक खूप आवडले होते. “ये पुस्तक
भारतीय सभी भाषाओंमे अर्थसाक्षरता वृद्धी के लिये रुपांतरीत होनी चाहीए.” असे अनेक बँकिंग दिग्गजांनी मला बोलून
दाखविले. ऐकूनच मला समजेना, मी कुठे चालली आहे ते? एक लेखणी मला कोठे कोठे घेऊन
जात होती. रिझर्व्ह बँकेचे निवृत्त एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री.व्ही.एस.दास आणि
गुजरात अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक्स फेडरेशन चेअरमन श्री.ज्योतिन्द्र मेहता, आणि
श्री.जोशी यांनी गुजराती पुस्तक करायला मोलाचे सहकार्य केले. GUCBF ने पुस्तकाची एक आवृत्ती खरेदी केली, तसेच भाषांतराचा खर्च उचलला. एकदिवस
पुन्हा आम्ही अहमदाबादला जाऊन “બન્કીંગ મૈત્રી” प्रकाशित केले. इथे मी असेही सांगू इच्छिते की, इतर कुठल्याही भारतीय
भाषेच्या आणि त्या बरोबर मराठीचा अभ्यास असलेल्या व्यक्तीने विशेष करून बँकरने पुस्तकाच्या रूपांतराचा
जरूर विचार करावा. दोन्ही भाषा आणि बँकिंग असे मिळून आले तर त्याही भाषेत पुस्तक प्रकाशित करता येईल.
त्यांनी माझ्याशी अथवा सकाळ प्रकाशन विभागाशी जरूर संपर्क साधावा.
पुस्तकाची ‘अकरावी सुधारित आवृत्ती’ काढताना प्रकर्षाने जाणवला तो बँकिंग
इंडस्ट्री व देशाची अर्थव्यवस्था यामधील महत्वाचा बदल. विमुद्रिकरण, कॅशलेस,
जीएसटी आणि अनेकविध योजनांची सुरवात याने संपूर्ण देशाला जोरजोरात हलविले आहे.
अर्थव्यवस्थेतील होत असलेली पारदर्शकता देशाच्या प्रगीतीला पोषक आहे. समाजाच्या
विशेष करून तळागाळातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचविण्याच्या दृष्टीने
आत्ताच्या भाजप प्रणित सरकारचे प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहेत, वाखाणण्याजोगे आहेत.
प्रत्येक योजनेची आखणी करताना बारकाईने अभ्यास केलेला जाणवतो. समाजाने विविध गोष्टींचा फायदा उचलावा, आणि देशाच्या
प्रगतीच्या हम रस्त्यावर यावे. पाउलवाट होती इतके वर्ष आपल्या देशाची; आता मोठा
एक्स्प्रेस वे समोर दिसत आहे. डेव्हलपिंग कंट्री ते डेव्हलपड कंट्री असा कायपालट
भारताचा हवा असेल तर प्रत्येकाने सदसद्विवेकबुद्धीला स्मरून देशहितासाठी सहभागी
व्हायला पाहिजे. इथे पुस्तकात या सर्व नव्या गोष्टींवर प्रकाश टाकलेला आहे.
नव्याने दोन प्रकरणे घातलेली आहेत. ‘विमुद्रीकरण’ तसेच दुसरे ‘कॅशलेस, पर्यायी
माध्यमे आणि जीएसटी’. प्रधानमंत्री योजनांची विविधता, उपयुक्तता, खोली आणि आवाका यांचाही
समावेश केलेला आहे. यातून बदलासाठीच्या अनेकविध गोष्टींची ओळख वाचकांना होईल,
त्याची जाण येईल, याची मला पूर्ण खात्री आहे.
बँकेत काम करीत असताना अनेकदा कोणी एखादी स्त्री समोर बसायची, मग ती शहरातली
असो नाहीतर खेड्यातली असो. तिची कहाणी सांगताना अज्ञानापोटी तिची झालेली फरफट मला
अस्वस्थ करायची. तेंव्हा वाटायचे, ‘इतक्या छोट्या छोट्या साध्या गोष्टी यांना समजू
नयेत? अशा लोकांना त्यांना समजेल अशा भाषेतच बँकिंग सांगितलं पाहिजे.’ आणि पुढे
अहम आश्चर्यम्. ते सर्व मलाच लिहावे लागले तेही थोडे थोडके नव्हे तर एका पाठोपाठ
प्रकाशित होत असलेल्या पुस्तकांच्या रूपाने. यापैकी खास ग्रामीण महिलांना बँकिंग
साक्षर करण्यासाठी ‘माण देशी बँक व
फाउंडेशन’ यांनी माझ्याकडून तीन पुस्तके लिहून घेतली. ‘स्वप्नपूर्तीसाठी बँकिंग’,
‘नंदाताईचा सल्ला’ आणि ‘आठवडा कर्ज योजना’ अशी ती पुस्तके. ‘सकाळ प्रकाशन, पुणे’
यांनी खूप सुंदर तयार करून दिली. माणदेशीत भेटल्या अनेकजणी, आणि माण देशी तर्फे
काही महिला महाराष्ट्रभर ग्रामीण महिला व मुली यांना प्रशिक्षण देत आहेत, बँकिंग
समजावून सांगत आहेत. तिथे
प्रशिक्षणार्थींना हीच पुस्तके भेट दिली जातात. त्याने माझी लेखणी अगदी खेडोपाडी
घरात गेली, आणि तिथे त्यावर चर्चा होते, त्याद्वारे चार हिताच्या गोष्टी पोचल्या
यामध्ये खरचं मला खूप आनंद झाला. आज त्याच ‘माण देशी बँके’च्या आणि ‘माण देशी
फाउंडेशन’च्या अध्यक्षां ‘माननीय श्रीमती चेतना सिन्हा’ यांच्या हस्ते माझी
वेबसाईट लॉँच करताना मला छान वाटते. बघितल्यावर सांगा कशी वाटली ते.
मी नोकरी केली ती राष्ट्रीयीकृत बँकेत. दिसायला सहकारी बँका आणि राष्ट्रीयीकृत
बँका सारख्याच दिसतात. तेंव्हा मी कशाला फरक जाणून घेते? तोही बारकाईने? सातव्या आवृत्तीच्या वेळी त्याही बँकांचा अभ्यास
केला आणि ‘सहकारी बँक आणि कार्यप्रणाली’ असे नवीन प्रकरण टाकले. सहकार क्षेत्रातील
अनेकांनी लेखणीचे पुस्तकाचे कौतुक केले. जनसेवा सहकारी बँक आणि जनता सहकारी बँक
यांनी एकेक आवृत्ती घेतली. देवगिरी नागरी सहकारी बँक, आणि लोकमान्य मल्टीपर्पज
सोसायटी यांनी ‘मैत्री बँकिंगशी’ पुस्तकावर चक्क सगळ्यांची परीक्षा घेतली. त्यांना
आलेले अनुभव खूप बोलके आहेत. अनेक बँकांनी म्हणजे बुलढाणा बँक, शासनाची जिल्हा
ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यासह अनेकांनी शेकड्याने प्रती घेऊन वाटल्या. त्याच
सहकारी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ‘सहकार भारती संस्थे’चे ‘संरक्षक माननीय श्री.
सतीश मराठे’ प्रकाशनाचे वेळी मुद्दाम उपस्थित राहत आहेत, ह्यात मला आनंद आहे.
त्यांच्या मोलाच्या सहकार्याने माझ्या पुस्तकांची घोडदौड आजपावेतो यशस्वी होत आहे.
‘मैत्री बँकिंगशी अकराव्या आवृत्ती’चे प्रकाशन २५ एप्रिल रोजी होत आहे.
बँकांच्या दृष्टीने मार्च आणि एप्रिल महिने अतिशय कामाचे, महत्वाचे असतात हे वेगळे
सांगणे नकोच. अशा घाई गडबडीत या पुस्तकाला अतिशय समर्पक प्रस्तावना लिहून दिली आहे
आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याची असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापकीय संचालक व
मुख्य अधिकारी असलेल्या माननीय श्री. रवींद्र प्र. मराठे यांनी. मराठी बँकिंग
पुस्तकाला अतिशय योग्य व्यक्तीने दिलेली हे कौतुकाची थाप त्या पुस्तकाचे भविष्य
घडविणारी ठरणार आहे, यांत शंकाच नाही. त्यात मी खूष आहे.
या सर्वांची मी अतिशय आभारी आहे. सकाळ प्रकाशन टीम तर माझ्या घरचीच वाटते.
इतका सहवास आणि उत्तम सहकार्य मला मिळत
आहे. सर्वांनी मनापासून मला देऊ केलेल्या
शुभेच्छा, त्याचबरोबर इतर अनेक हितचिंतकांच्या सदिच्छा आहेतच. लिहायला
लागल्यापासून अनेकांचे फोन आले, काही घरी भेटायला आले. कुठेतरी माझ्या लेखणीने
त्यांना पैशाचा हिशोब शिकवला. आयुष्यातील गुंता सोडवायला कोणीतरी मिळालं हीच भावना
त्यांच्या बोलण्यातून आली. ते शब्द आजही माझ्या मनात घोळत असतात.. माझ्या
प्रयत्नांना दाद देणारे सर्वजण, सर्व वाचक वर्ग, मला मार्गदर्शन करणारे, हितचिंतक,
अशा अनेक अनेकांना मी धन्यवाद देते, मनापासून त्यांचे आभार मानते.
धन्यवाद!
वंदना धर्माधिकारी
१० एप्रिल, २०१८.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मैत्री बँकिंगशी – ११ वी आवृत्तीस
शुभेच्छा!
श्री. सतीश मराठे
संरक्षक, सहकार भारती
“बेस्ट सेलर - मैत्री बँकिंगशी” या सौ. वंदना धर्माधिकारी लिखित पुस्तकाची आज ११
वी आवृत्ती प्रसिद्ध होत आहे. याचा खूप आनंद वाटतो. सध्याच्या मोबाईल स्यावीच्या
युगात छापील पुस्तकांना आणि त्यातून बँकिंग सारख्या तांत्रिक विषयाची माहिती
देणाऱ्या पुस्तकाला वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळतो आहे. इथे तर पुस्तकाची ११ वी
आवृत्ती येत आहे. याचे सर्व श्रेय सौ.वंदनाताईंच्या लेखणीला द्यावे लागेल. सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या, ओघवत्या भाषेत लिहिण्याची त्यांची हातोटी निश्चितच
कौतुकास्पद आहे. या निमित्ताने मी ‘मैत्री बँकिंगशी’ पुस्तकाचे पुन्हा एकदा
मनापासून स्वागत करतो.
आजच्या स्पर्धात्मक आणि अत्याधुनिक
युगात बँकिंगची संकल्पना सातत्याने बदलत आहे. सरकारी, खाजगी, विदेशी, अशा बँकांचे
जाळे देशभर विणले गेले आहे. त्याचबरोबर नागरी सहकारी बँका देखील या तीव्र
स्पधेच्या रेट्यात पाय रोवून उभ्या तर आहेतच शिवाय जोरदार प्रगती देखील करीत आहेत.
भारतीय संस्कृतीचा आधार असलेल्या सहकार चळवळीचा आणि अर्थव्यवस्थेचा जवळचा संबंध
आहे. अर्थव्यवस्थेत आजही सहकारी बँकांबरोबर पतसंस्था, महिलांचे बचत गट, विकास
सोसायट्या, अशा सर्वांचेच मोलाचे योगदान आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेत सहकार चळवळीची
प्रमुख भूमिका राहिली आहे. या पार्श्वभूमीवर पुस्तकात ‘सहकारी बँका व
कार्यप्रणाली’ या प्रकरणात सर्व प्रकारे माहिती विस्ताराने सर्व संदर्भांसह दिलेली
आहे. ज्या बद्दल लेखिकेला धन्यवाद द्यावेसे वाटतात.
आजच्या तरुणाईची गरज ओळखून
अत्याधुनिकतेची कास बँकिंग मधील सर्वच घटकांना धरावी लागत आहे. मोबाईल फोनवर एका क्षणात माहितीची
देवाणघेवाण करण्याबरोबर प्रत्यक्ष बँकिंग देखील विनासायास होत आहे. माननीय नरेंद्र
मोदी यांच्या सरकारचा देखील ‘डीजीटल इंडिया’चा नारा आहे. सर्वच नागरिकांनी कॅशलेस,
पेपरलेस व्यवहार करावेत या दृष्टीने या सरकारची धोरणे व कृती दिसून येतात. विमुद्रिकरणाने
समाजाला सक्तीने अनेकगोष्टी स्वीकाराव्या लागल्या आहेत. नाविन्याला डावलणारा मोठा
वर्ग आपल्या देशात जुन्याला घट्ट धरून बसलेला आहे. त्यावृत्तीला तडा देणे सोपे
नसते, आणि तेच कृत्य आपोआप डीमोनिटायझेशन मुळे केले गेले, किमान अनेकांनी
श्रीगणेशा केला आहे. आज बँकांमध्ये
प्रत्यक्ष जाण्यापेक्षा केवळ डीजीटल व्यवहार करून बँकिंग केले जाते. हे अत्यंत
स्वागतार्ह आहे. काळ्या पैशावर नियंत्रण
ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक व्यवहारांचा वाढता वापर हा अत्यंत महत्वपूर्ण बदल आज
बँकिंग मध्ये घडताना दिसतो. एका अर्थाने ‘Banking is necessary but Bank is not.’ आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची
मर्यादा त्यातून होणारे फ्रॉड आणि तंत्रज्ञान न स्वीकारण्याची मानसिकता अशा तिहेरी
प्रकरणात भारतीय बँकिंगची वाटचाल सुरु राहणार आहे. हे निश्चित. समाजाला हा विषय
किती सोपा करून सांगावा म्हणजे त्याचा स्वीकार अनेकांकडून केला जाईल, ही गोष्ट वंदनाताईच
लिहू शकतात.
वस्तू विनिमयानंतर पैशाची झालेली
निर्मिती, त्यातून आलेली बँकिंग संकल्पना, त्यावर आधारलेले कायदे, नियम, शिस्त,
भारतीय रिझर्व्ह बँक आणि त्यावर आधारित बँकिंग सिस्टीम सहकारी बंकांबाबतचे
राज्यांचे धोरण, ग्रामीण अर्थव्यवस्थेत
अत्याधुनिकतेचा अभाव अशा सर्वच पार्श्वभूमीवर ‘मैत्री बँकिंगशी’ पुस्तक वाचकांना
निश्चितच उपयोगी पडणारे आहे. गेल्या चार
वर्षातील केंद्र सरकारच्या विविध प्रकारच्या योजना या प्रामुख्याने अर्थव्यवस्थेला
चालना देणाऱ्या ठरलेल्या आहेत. सर्वसामान्य नागरिक बँकिंग व्यवस्थेत आला पाहिजे
असा कटाक्ष सरकारचा आहे. त्यासाठी प्रत्यक्ष कृतींची अधिकाधीक आवश्यकता आहे. आजही
मोठ्या प्रमाणात जनता म्हणावे तेव्हढे बँकिंग वापरत नाहीत. याचा विचार सर्वांनी
करण्याची गरज आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून बँकिंग समजून घेत वाचक अधिक
अर्थसाक्षर होणार हे निश्चित. बँकिंगच्या सगळ्या गोष्टी कायदा आणि व्यवहार यांच्या
चौकटीत बसवलेल्या असतात, त्याची योग्य जाण बँक ग्राहकांना असणे हेच प्रगतीचे पाउल
आहे. आपोआप बँकिंग वृद्धिंगत होते आणि त्यासाठी मैत्री बँकिंगशी पुस्तक दीपस्तंभ
आहे असा मला विश्वास वाटतो.
अर्थव्यवस्थेमध्ये आपले स्थान
टिकवण्याची धडपड बँकिंग इंडस्ट्री मधील सर्वच घटकांना आहे. एक ग्राहक म्हणून सर्व
नागरिकांनी हे समजून घेण्याची निकड आहे. आणि हे सर्व काही मैत्री बँकिंगशी
पुस्तकात सामावलेले असल्याने त्यातून प्रत्येकाला हवे ते घेता येईल. लेखिका वंदना
धर्माधिकारी यांचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांचे बरोबर ‘सकाळ प्रकाशन’ कि जे
प्रकाशन व्यवसायातले मानाचे समजले जाते ते इथे खंबीरपणे आहेत, त्यांचेही अभिनंदन. या
पुस्तकाच्या अधिकाधिक आवृत्त्या निघाव्यात, तसेच इतर भारतीय भाषांमध्ये पुस्तक
रुपांतरीत व्हावे. अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो.
सतीश मराठे
संरक्षक – सहकार भारती.
मैत्री बँकिंगशी पुस्तकाच्या अकराव्या आवृत्तीच्या निमित्ताने :
श्रीमती चेतना सिन्हा,
अध्यक्ष, माण देशी बँक माण
देशी फाउंडेशन
बँकिंग पुस्तकांची लेखिका म्हणून सौ.वंदना धर्माधिकारी यांची ओळख सगळ्यांना
आहेच. त्यांची पुस्तके वाचल्यावर माण देशी टीमला खूपच आवडली, आणि आमचे विचारचक्र
वेगळ्या दिशेने फिरू लागले. आम्हालाही काहीतरी असे लिखित स्वरूपातले बँकिंग ग्रामीण महिलांना द्यायचे मनात होते, त्याच
विचाराने उचल घेतली आणि आमच्या रेखाताई वंदनाताईंच्या घरी भेटायला गेल्या. पुढे
चर्चा झाली आणि माणदेशी साठी विशेष अशी सुंदर दोन पुस्तके आणि आमच्या एका योजनेचे
परिपत्रक वंदनाताईंच्या लेखणीतून साकारले. सकाळ प्रकाशनने अल्पावधीत हजारो प्रती
आम्हाला सुंदर काढून दिल्या.
स्वप्न बघणे तर आपला हक्कच असतो, त्यासाठी तर जीवाचा आटापिटा करायचा आणि
पुढेपुढे जात राहायचं. एखादीची वाट असते सरळसोट, सावलीतून जाणारी तर दुसरी तळपत्या
उन्हात जाताना सावली तर नाहीच, एखादी झुळूक देखील भेटत नाही तिला. म्हणून ती
स्वप्न बघायचे थोडेच थांबते. अशीच सुंदर रंगीबेरंगी स्वप्ने कशी रंगवायची हे
सांगणारे पुस्तक - “स्वप्नपूर्तीसाठी बँकिंग” होय. महिलांना खूप आवडलेले, आणि बरेच
काही शिकविणारे आहे.
त्याचबरोबर कुणीतरी असावं आपली काळजी घेणारं, आडल्या नडल्याला समजून घेऊन चार
शब्द समजुतीचे सांगून पुढचा मार्ग दाखविणारे. तर, ती आहे तमाम सर्व आमच्या
महिलांची मैत्रीण नंदाताई. “नंदाताईचा सल्ला’ या पुस्तकातून ती सगळ्या बायांना हुशार
बनविते, आणि त्याही खूप हुशार झाल्या आहेत सर्वकाही ऐकता ऐकता. पुस्तकात किती जरी
लिहिलं तरी ते समजावून दिल्यावर अधिक चांगलं समजतं, लवकर त्यानुसार कृती केली
जाते, हा तर स्वभावच असतो बायकांचा. त्यासाठी माण देशी फाउंडेशनच्या महिलांना
वंदनाताईंनी एक दिवसभर छान मार्गदर्शन केले. पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशन तयार करून
दिलं, प्रत्येकगोष्ट समजावून दिली. aamchya trainer अंगणवाडी, बचत गट, शाळा, कॉलेज
अशा ठिकणी जाऊन तेथील महिलांना ग्रुप ग्रुपने बँकिंग समजावून सांगतात. काही अडलं
तर वंदना ताईंना फोन करून विचारतात. त्याही आपलेपणाने बारकाईने पुन्हापुन्हा समजावून सांगतात.
प्रशिक्षित महिलांना “स्वप्नपूर्तीसाठी बँकिंग’ आणि ‘नंदाताईंचा सल्ला’ दोन्ही
पुस्तके आम्ही देत असतो. त्या देखील परत परत पुस्तके वाचून शंका विचारतात. तेंव्हा
समाधान मिळते. आज देशाला अर्थसाक्षरता वाढविण्याची नितांत गरज आहे. तेही, महिलांना
आम्ही बँकिंग शिकवतो, योजनांचे माध्यमातून त्यांना अर्थसहाय्य करीत असतो. त्यांचा
राहणीमानाचा स्तर उंचावला आणि घरातलं वातावरण सुखासमाधानात बुडालं. बायकांना आणखीन
काय हवे असते यापेक्षा दुसरे? एक स्त्री शिक्षित झाली कि घर बदलते, पुढची पिढी
चांगल्या मार्गाने शिक्षण घेताना दिसते. एकेक घर करीत गावही बहरतो, हा अनुभव आहे
आमचा.
तिथेही माण देशी त्यांच्या बरोबर असते. आमच्या बँकेची “आठवडा बाजार कॅश
क्रेडीट योजना” आणि इतरहि अनेक योजना
महिलांना सहकार्य करणाऱ्या अशाच आहेत. याच योजनेचे माहितीपत्रक देखील
वंदनाताईंनी शब्दांकित केले आणि सर्व माहिती महिलांच्यात रुजवली गेली. त्यानेही
अनेक महिलांना बँकिंगमधले व्यवहाराचे शिक्षण मिळते, एकीबरोबर दुसरी असे करीत त्या
आपापला व्यवसाय वाढवीत आहेत.
वंदनाताईंच्या लेखणीचे वैशिष्ठ्य म्हणजे जणूकाही आपली जीवाभावाची मैत्रीण शेजारी
बसून एकेक गोष्ट समजावून सांगत आहे, पैशाचे गणित सोडवीत आहे. त्याने कितीतरी
बायकांना बँकिंग मधील अनेकगोष्टी चांगल्या समजल्या आणि त्या बँकिंग पारंगत होऊ
लागल्या.
आजच्या “मैत्री बँकिंगशी” या वंदना ताईंच्या पुस्तकाची ११ वी आवृत्ती निघत
आहे. बँकिंगचे पुस्तक एखाद्या कथा कादंबरी सारखे वाचत राहावे असे वाटणे, हीच
लेखिकेच्या लेखणीला दाद मी देते. पैसा तर सांगितलाच आहे त्यांनी, पण त्याबरोबरीने
जे संस्कार पुस्तकात दिलेले आहेत, ते खूप मोलाचे आहेत. अशीच अनेक पुस्तके त्यांनी
लिहावीत, देशाला अर्थसाक्षर बनविण्यासाठी त्यांची लेखणी प्रवाही राहावी. अशा
शुभेच्छा देते आणि मी थांबते.
चेतना सिन्हा,
अध्यक्ष, माण देशी बँक
माण देशी फाउंडेशन
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
“मैत्री बँकिंगशी” – ११ वी आवृत्ती
पुस्तक परीक्षण -
सकाळ – सप्तरंग
श्रीमती स्वाती दाढे.
सौ.वंदना धर्माधिकारी
लिखित “मैत्री बँकिंगशी” बेस्ट-सेलर पुस्तकाची ११वी आवृत्ती नुकतीच “सकाळ-प्रकाशन”तर्फे प्रकाशित झाली. सर्वसामान्य नागरिकांची
बँकिंग साक्षरता वाढावी, बँक
व्यवहाराबद्दल सजगता यावी, ग्राहक
हक्कांबद्दल जागरुकता वाढावी यांसाठी पुस्तक अतिशय उत्तम, उपयुक्त आणि मार्गदर्शक
आहे.
“मैत्री बँकिंगशी” पुस्तकाचे हिंदी,गुजराती आणि ब्रेल
रुपांतरे उपलब्ध आहेत. “हिंदी-मित्रता बँकिंग से” पुस्तकास महाराष्ट्र शासन तसेच
केंद्र सरकार, राजभाषा विभाग दोघांनी पुरस्कृत केलेले आहे. तीन बँकांनी “मैत्री
बँकिंगशी” पुस्तकाच्या विशेष आवृत्त्या घेतल्या आहेत. प्रचंड प्रतिसाद पुस्तकास
मिळाल्यानेच ११वी सुधारित आवृत्ती सामोरी आली.
बँका दाराशी आल्या, आणि लोकांनी बँकेस खिशात
बाळगायला सुरवात केल्याने बँकेशिवाय जीवनाची कुणी कल्पनाही करू शकणार नाही. मागील काही वर्षात झालेले
विमुद्रीकरण, कॅशलेस व्यवहार, जीएसटी सारखे देशहिताचे निर्णय एकापाठोपाठ आल्याने समाजात
संभ्रम, ताणतणाव वाढले आहेत. त्यासर्वांची
पार्श्वभूमी, ओळख, कारणमीमांसा परिणाम यावर लेखिकेने अभ्यासपूर्ण प्रकाश टाकलेला
आहे. लेखिका ‘अर्थक्रांती’च्या ‘अर्थपूर्ण’ मासिकाच्याही लेखिका असल्याने
विमुद्रीकरणावर चांगले लिहिलेले आहे. अकराव्या आवृत्तीत “विमुद्रीकरण-एक क्रांती”
आणि “विना रोकड आणि
वसेक(जीएसटी)” प्रकरणे नव्याने समाविष्ट केलेली आहेत.
जन-धन योजना, आधार-संलग्नता, डीबीटी, युपिआय,
भीम, इन्शुरन्स, मुद्रा, कौशल्य, वय-वंदन, अटल-पेन्शन, इत्यादी संकल्पना समजावून
सांगणारे पुस्तक बहुमोल आहेच. संवाद साधत, शंकानिरसन करीत बँकिंग
ज्ञान देणारे पुस्तक समाजास बँकिंगसाक्षर बनवते. अर्थसाक्षरता वृद्धी आणि डिजीटल
इंडिया दोन्हीच्या स्वप्नपूर्तीस पुस्तक उत्तम सहाय्य करणारे आहे.
लेखिकेचा २८ वर्षांचा बँकिंगचा अनुभव, नवीन बदलांचा अभ्यास,
वाचन, चर्चा, इंटरनेट, प्रत्यक्ष बँकेत
जाऊन केलेलं निरीक्षण, तज्ज्ञांशी संवाद सर्वांच्या एकत्रितपणे पुस्तक आकाराला आले. यात एकूण २२-प्रकरणांतून बँकिंग मांडले आहे. “भारतीय चलन–रुपया”पहिल्या
प्रकरणात रुपयाबद्दल बबारकाईने सारेकाही दिलेले
आहेत. “बँक ठेवी”, “प्लास्टिक मनी”, ”इंटरनेट बँकिंग”, “सार्वजनिक भविष्यनिर्वाह
निधी”, “नामांकन मृत्युपत्र”, “सुरक्षित ठेव-कक्ष”, “वित्तीय
समावेशन” “जन-धन योजना” प्रकरणांतून वाचकांना माहिती मिळते तेंव्हा त्याचा वापर
करण्यास वाचक प्रवृत्त होतो, आणि आपोआप बँकिंग वाढते.
बँकांच्या उत्पन्नाचा आणि
ग्राहकांच्या उत्कर्षाचा प्रमुख स्रोत म्हणजे कर्ज. विविध कर्जप्रकार, आवश्यक कागदपत्रे, नियम, अटी, कार्यप्रणाली, इत्यादी सविस्तर
उहापोह वाचायला देताना समाजाची कर्जाप्रतीच्या
मानसिकतेमधील बदल यावर सुंदर विवेचन पुस्तकात आहे. नुसते मार्गदर्शनपर
पुस्तक नव्हे तर कर्ज घेतल्यावर फेडायची मानसिकता, तिचे महत्व, समाजाप्रती भावना
असाही उल्लेख पुस्तकात आहे. वाचक अशा अर्थसंस्कारांमुळे आत्मविश्वासाने बँकेची पायरी चढू शकतो,
हे महत्वाचे होय. सूक्ष्म-लघु-मध्यम,
ग्रामीण-शहरी उद्योग, सवलती, सबसिडी, ह्वेनको, कर्जप्रणाली यांची महत्त्वपूर्ण माहिती उद्योगासंबंधीच्या
प्रकरणात लेखिकेने सविस्तर दिली आहे. रिव्हर्स
मॉर्गेज, शैक्षणिक कर्ज अतिशय उत्तम माहितीचे.
स्वयंसाहाय्यता बचत गट,
त्यामधून मिळणारे शिक्षण, फायदा ओळख आणि स्वातंत्र्य याची माहिती वंदनाताई
आत्मीयतेने देतात. महिलांना वेळोवेळी काय
सवलती मिळतात याचा उल्लेख त्यात्या ठिकाणी केल्याने महिलांनी अर्थसाक्षर होण्याची
निकड अधोरेखित होते. त्याचप्रमाणे शेतीविषयक वित्तसहाय्य, विविध कर्जयोजना, विमा,
सवलती, पाणतळी, यावर स्वतंत्र प्रकरण आहेच. सहकारी बँका, समस्या, विविध कमिट्या,
त्यांचे मुद्दे, परिणामांसह सर्वतोपरी उलगडा पुस्तकात आहे. सहकारी बँकांना अतिशय उपयुक्त
पुस्तक.
शेवटची ४०० बँकिंग संक्षेपरूपे-अर्थासह स्पष्टीकरण
पुस्तकाचे मूल्य वाढविते. त्यावरूनही बँकिंगच्या अनेकविध गोष्टींची माहिती होते.
बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरभरती आहे. आयबीपीएस किंवा इतर परीक्षांना
बसणाऱ्यांनी अवश्य पुस्तकाचा अभ्यास करावा. अभ्यासावरून आठवले, दोन बँकांनी आपल्या
स्टाफला पुस्तक देऊन त्यावर परीक्षा घेतल्या आहेत. त्या बँकांना याचा खूप फायदा
झाला, असे त्यांनी लेखिकेस सांगितले. असो.
एकुणातच सर्वसामान्यांना आयुष्याच्या विविध टप्प्यांवर
अर्थसाक्षर होऊन निर्णय घेण्याची क्षमता वाढविणारे खूप उपयुक्त असे “मैत्री
बँकिंगशी” पुस्तक आहे. वंदना
धर्माधिकारी यांची साधी, सोपी शब्दरचना, विषय सुलभ करून
लिहिण्याची हातोटी, समाजाप्रती तळमळ,
पुस्तकात वारंवार स्पष्ट दिसते. पैशाचे गणित सोडविणे, किंबहुना आपली पत सुधारणे वाचकास
सहज शक्य वाटते. त्यावेळी वाढत्या ताणतणावात, गतिमान जीवनात आर्थिक
स्थैर्य मिळाल्यावर मिळणारे समाधानी जीवन आपोआप समृद्धीची वाटचाल करते, यासाठी
बँकिंगशी अतूट मैत्री जुळावी, त्याचसाठी हवे “मैत्री बँकिंगशी”. अवश्य संग्रही
ठेवावे, परतपरत वाचावे असे पुस्तक समाजाला दिले म्हणून लेखिकेचे मी आभार मानते.
n
स्वाती दाढे.
n
९७६७०४९९१२.
मैत्री बंकिंगशी – बेस्ट सेलर - सुधारित ११
वी आवृत्ती.
लेखिका- वंदना
धर्माधिकारी.
प्रकाशक- सकाळ प्रकाशन.
पृष्ठे – २०५. किंमत – २८०/- रु
No comments:
Post a Comment