Monday, November 24, 2014

21. Diwali 2014 - Niranjan


निरंजन दिवाळी अंक २०१४   :::  बांधावे लागतात शब्द्पूल


“श्वासही आत जात नाही तुझ्यासाथी शिवाय
पापणीसुद्धा मिटत नाही तुझ्या आठवणीशीवाय
कसं पटेल तुला सारं मला भेटल्या शिवाय
इतकं का कोणी जीव लावतं आपलं असल्याशिवाय.....”
ज्याच्या कोणाच्या एखाद्या कां होईना नात्यात या ओळी लागू होत असतील ती व्यक्ती भाग्यवान समजावी. आपलं असणं, आपल म्हणंण, तसं वागणं, बसणं, बोलणं आणि एकमेकां सुखावणं हे असलं कि आपोआप जीव जडतो. जीवापाड जपणूक होते. अशावेळी क्षणोक्षणी आठवण येणारच, डोळे वाट बघणार, मन हिंदळणार आणि आपल्या माणसाला भेटल्यावर आनंदोत्सवात तेच मन पिंगा घालीत नाचणार तेही आपल्याच भोवती. आपण कोणाचे तरी कोणीतरी आहोत, याची संपूर्ण खात्री मनाला असणं आणि तशीच ग्वाही आपणहून दुसऱ्याला देणं हेच तर नाते जपणं असते.
दोन प्रकारची बैठक असते या नात्यांची, जपायची दोन्ही नाती. जैविकतेतून आलेली आणि प्रेमाने बांधलेली असतात नाती. आपलेपणा हा कंसाबाहेर काढलेला सामायिक भाव पाहिजेच. ‘Blood is thicker than water’ हे सूत्र जैविक नाती दृढ करते. घट्ट बांधून घेतात हि घरातली नाती एकमेकांना. किती जरी भांडण झाले तरी मनातल्या मनात एकमेकांची आठवण येतेच, आणि ख्याली खुशाली घेतली जातेच. भांडभांड भांडला बहिणीशी तरीपण राखीला तिच्याकडे जाऊन मुक्याने का होईना राखी बांधून घेणारच. हा राखीचा धागा किंवा भाऊबिजेचे औक्षण अतूट नात्याची खूण आहे. तिथे खुडलेल्या नात्याचं रोपटं पुन्हा घट्ट रोवू पाहतं. हीच जैविक नाती जपण्यासाठी, त्यांच्यात पुन्हापुन्हा संवाद घडावा म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये वेगवेगळे सण साजरे करतो. आणि दिवाळीत सर्व नात्यांचा एकत्र मिलाप म्हणून उत्साहाने साजरी करतो आपण सगळेच.
दुसरी जाती फक्त प्रेमाने ओली होतात, फुलतात, बहरतात, जोडली जातात. इथलं नाते मैत्रीचे असेल, ओळखीचे असेल, गुरु शिष्याचे असेल, मालक नोकराचे असेल, दुश्मनीचे असेल,  प्रियकर प्रेयासिचेही असेल, नाहीतर निनावी न सांगता येणारे असेही असू शकेल. हि अजोड प्रेमजोडणी नैसर्गिक अनामिक ओढ असते. नाते कोणाशीही जमते, नुसती नजर देखील नाते जोडायला कारणीभूत  होऊ शकते. हीच माणसाच्या जिवंतपणाची खुण आहे. एकमेकांना आपल्याकडे खेचून घेऊन आपल्या मनोबंधाने घट्ट आवळून ठेवायचं दुसऱ्याला,  ह्यात माणसाची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. जगायचं एकत्र, हसायचं, फुलायचं, रडायचं देखील. एक श्वास, एक उच्वास, एकच धडकन, एकच मन. प्रेमातून दिला जातो विश्वास. निसर्गाला रंग हवाच आणि  फुलाला गंध हवा, अगदी तसाच नाती जपायला एकमेकांवर विश्वास हवा.




रोपं लावायला माती हवी, तिथे रुजायला पाणी हवं,
उंच वाढायला ऊन हवं, आणि आनंदाने डोलायला वारा हवा.
तसचं अगदी तस्सचं....
नातं रुजायला भावना हवी, नातं फुलायला ओलावा हवा,
नातं टिकायला संवाद हवा, आणि नात्याचा आनंदोत्सव साजरा करायला एकत्र सहवास हवा....
विश्वासाने नाते टिकवून ठेवायला संवाद लागतो, त्यामध्ये भावना आणि ओलावा हवाच. शब्द असे सहज मिळत नाहीत, प्रेमाचे आपलेपणाचे तर नाहीच नाही. नसेल यायचं शब्दांना तर झुळूक साधी फिरकत नाही. दुखलं खुपलं, हवंनको बघताना शब्दांची पाखरण हवीच असते. नुसते कोरड्याने कर्तव्य करणारी असतात काही माणसे. अलिप्तता त्यांचा स्थायी स्वभाव. अबोल म्हणून न बोलता कर्तव्य करीत राहतात. मनात असलेला ओलावा त्यांना कृती करायला भाग पडतो.  कधी काही कारणाने झालेला विसंवाद पुसायला संवादच हवा. त्यासाठी मध्यस्ती घेतली तरी चालते. संवाद साधणे  खूप काही अवघड नक्कीच नाही. फक्त त्याची तीव्र इच्छा हवी. आपोआप भावनांनी ओथंबलेले शब्द बाहेर येतात कोठूनतरी
काही शब्द पोटातून
कहो आले ओठातून
जिव्हाग्रावर क्षणी विसावून
काही उतरले श्वासातून

शब्दांनी नात्याची वीण घट्ट होऊ लागते. पण कधीकधी शब्द शस्त्र होते,आणि सपासप कापले जातात नात्यांचे बंध. नात्याची परीक्षा असते. नात्यांमधली गैरसमजाची गाठ आणि मोकळं व्हायचं शंकाकुशंकांच्या तेढीतून  काठीण होते. हे बघा, धागे कापून गुंता सोडवल्यावर त्याच धाग्यांना पुन्हा गाठी मारीत गुंडाळलेला लोकरीचा गुंडा, वरून बघताक्षणीच ताणलेल्या लोकरीचा आहे हे लक्षात येतेच. वरून बरासा मऊ मऊ दिसला गुंडा तरिही ठुसठुसणा-या गाठी असतातच. नात्यात बोचर्या गाठी, आठवणी, शाब्दिक आहेर असतातच. त्याचा दोष कोणाला द्यायचा. बरेचदा स्वनिर्मिती असल्याने तक्रारही करता येत नाही. मग समोरची व्यक्ती दोषी समजून आपली सुटका केली जाते. खापरं फोडावं  नशिबावर. ‘मी इतका चांगला वागूनही मला कोणीच विचारीत नाही.’ अशी आपणच निर्माण केलेली एक खंत बळावते.

कोण्या एके काळी, नात्याचा गोतावळा असणं हे समृद्धीचे लक्षण समजतं.  नात्यांना सांभाळून धरून जपणं हि मात्र तारेवरच्या कसरतीपेक्षाही कठीण. ते ज्याला जमलं तो माणूस खरचं ग्रेट समजावा. आता जमाना बदलला, एकमेकांकडे जाणंयेणं, बसणं, बोलणं, या सगळ्याचीच स्टाईल बदलली. संवादाची माध्यमे वाढली, आणि बरेचदा जुजबी,  तेव्हढाच, हाय-ह्यालो पुरता संवाद होऊ  लागला. इलेक्ट्रॉनिक माध्यमाने तर संवादात कमाल केळी. एटीएम वरून पैसे काढायला गेल्यावर देखील कोणीतरी बोलून आपल्याला सूचना देते, आणि  त्यानुसार आपण कृती केली कि व्यवस्थित रित्या पैसे काढता येतात. कार्डही घेता येते. टेलीफोन, मोबाईल, मेसेज, whatsapp, फेसबुक, इंटरनेट, Linkenden, skyup, ही संवादमाध्यमे आहेत. शिवाय आता त्यात भर पडली आहे, एमेमएस, फेसटाईम, व्हायबर यांची. पाहिजे असलेले रेकॉर्ड करून आवाज पाठविला जातो. रेकोर्ड केलेला निरोप त्या आवाजात ऐकता येतो. शिवाय बोलताना पलीकडच्या व्यक्तीचा चेहरा दिसतो म्हणजे फेसटाईम, आणि व्हायबर म्हणजे इंटरनेट वरून बोलणे करणे.  सगळीच  संवादाची प्रचलित प्रगतमाध्यमे आहेत. या सर्वांद्वारे संवाद करून कामे होतातच. वायफट बडबड आटोक्यात ठेवली जाते. अशी हि उत्तम साधने आहेत. शिवाय नाती जपणूक करण्या साठी हि साधने उत्तम सहकार्य देतात. चांगल्या प्रकारे ज्यांच्याशी वर्षानुवर्षे संवाद झाला नाही, त्याची गाठभेठ होते, ख्यालीखुशाली समजते, ठावठिकाणा कळला कि गाठीभेटीसुद्धा होतातच. अनेक शाळा कॉलेजचे ग्रुप्स यानेच तयार झाले. एकत्रित रित्या शाळेसाठी काही सहकार्य करणारी अनेक मुले आहेत. याने माणसे जवळ आणली गेली असे म्हणायला हरकत नाही. skyup वरून परदेशात राहणाऱ्या आपल्या मुलांशी नियमित बोलणारे अनेक आहेत. प्रत्यक्ष समोर स्क्रीनवर मुलाबाळांना, नातवंडांना पाहून समाधान मिळते. ओळख ठेवायला लहान मुले शिकतात. मोठमोठ्या कंपन्या online, मोबाईल वर, किंवा कॉन्फरन्स कॉल करून नोकरीसाठी, अथवा दुस-या कशासाठी मुलाखत घेतात. हा संवादच असतो. इथे वेळ, श्रम, पैसा, याची मोठी बचत केली जाते आणि सर्वांना सोयीस्कर अशा या पद्धतींचा स्वीकारही होत आहे. हे प्रगतीचे लक्षण आहे.

प्रत्येक गोष्टीला नकारात्मक बाजू असतेच, तशीच या नाविन्यपूर्ण संवाद माध्यमांना आहेच. यांचा वापर विघातक गोष्टींकडे झुकत असल्याने, समाज व्यवस्थेवर संकटे येतात. नको त्या विधेयकांचा गाजावाजा, कोण कोणाला काय म्हणाले यावर चर्चा, कशावरून तरी वादावादी, भांडणे, मतभेद, अशा गोष्टीना उत येतो. त्याने हे नवीन वाईट असा गैरसमज पसरवला जातो. जसे टीव्ही वर अनेक च्यानेल्स आहेत, रिमोट तुमच्याच हातात आहे. काय बघायचे, काय ऐकायचे ठरविण्याचा हक्क फक्त तुमचाच. मग ठरवा तुम्हीच सकारात्मकतेकडे झुकायचे कि गदारोळ माजवायचा. शेवटी, प्रत्येक व्यक्ती वेगळी, तिचे विचार आणि वर्तणूक भिन्न. म्हणूनच सांगावे लागते, चांगले ऐका, चांगले बोला, चांगले वागा आणि चांगले म्हणून घ्या. दुनिया सुंदर आहे, त्याहीपेक्षा तुम्ही माणूस म्हणून वावरता हे तुमचे परमभाग्य आहे. त्याचा मान राख आणि संपन्न आयुष्य जगा

संवादाचे अनेक प्रकार आहेत. वरवरचा, जुजबी, कामापुरता, ऑफिशियल, व्यावहारिक, टेकनिकल, सक्तीचा, एकतर्फी, मोकळा, घरगुती, बारकाईने, अनावश्यक, आवश्यक, हमरीतुमरीचा, वादावादीचा, चर्चात्मक, एकेरी, आदरयुक्त, अपमानित, सहानुभूतीचा, आपलेपणाचा, प्रेमळ, हवाहवासा, गोडवा, जिव्हाळ्याचा, चेष्टामस्करिचा, अंतर्मुख करणारा, एकदिलाचा, हळवा, ओला, कोरडा, काळजाचा, काळजाला हात घालणारा, आणि असाच नाव नसलेला संवाद. संवादात देहबोली महत्वाची भूमिका बजावते. तुमचे हातवारे, चेहऱ्यावरील हावभाव, नजर, कपाळावरील आठ्या, याने संवाद पोचायला सोपे जाते. संवाद हि एक कला आहे. बोलतात सगळेच, पण एखाद्याचे बोलणे लक्षात राहते, काळजाला भिडते, त्याचा परिणाम कायमस्वरूपी राहू शकतो. शब्दोच्चार, शब्दफेक प्रभावी करायचे कसब कमावता येते. देवाने तोंड दिले म्हणून कायम उघडलेच पाहिजे असे नाही. संवाद उत्तम साधायचा असेल, तर तोंड बंद ठेवून श्रावणभक्ती केलीच पाहिजे. नुसते ऐकूनहि भागत नाही, तर त्याचा अर्थ समजून, विचार पूर्वक बोलणे जमले, कि संवाद परिणामकारक होतो. वैयक्तिक, व्यावसायिक जीवनात संवाद कौशल्य असेलेली व्यक्ती प्रभावी ठरते. जिंकून घेते. संवाद कौशल्य अंगी बाणवले पाहिजे. आपल्या आवाजाचा पोत, चढउतार, उंची खोली, शब्दोच्चार, शब्दप्रयोग, शब्दसाठा, शब्दार्थ, व्याकरण,  तसेच आपण बोलतो तेंव्हाच वेग, दुसऱ्याचे ऐकून घ्यायची इच्छा आणि कृती अशा अनेक गोष्टींवर संवाद होत राहतो. त्यावर व्यक्तिमत्व अवलंबून असते, त्यानेच माणूस पारखला जातो. आजचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने स्वत:चा प्रभाव, इंप्रेशन पाडता आला पाहिजे. बरं, ते फक्त मुलाखती पुरते कामाचे नको, तर कायम टिकविता आले पाहिजे. त्यासाठी संवाद्कौशल्य हवेच..

संवादाला माध्यम हवेच का? ध्वनिलहरी पोचविणारी हवा असतेच सगळीकडे. वेगळे माध्यम नसताना  संवाद होतोच. समोर समोर केलेला संवाद आतपर्यंत भिडतो, चेहरा वाचता येतो. वर्षानुवर्षे संवादाबरोबर चेहरा लक्षात राहतो. ‘तेंव्हा आजोबांच्या केव्हढया मिशा होत्या?’ ‘ तिने कुठली साडी नेसली होती?’ ‘ त्याने घातलेला शर्ट, भेटीची जागा, गप्पा मारल्या ते हॉटेल, खाल्लेले पदार्थ,”... असा सगळा बाडबिस्तरा प्रत्यक्ष संवादाला चिकटलेला असल्याने ते स्मरणात खूप काळ रहातात. सांगितलेले , ऐकलेले, बोललेले  त्यावर विचार होतो. याच समोरासमोरच्या संवादाला ग्रहण लागेल अशी भीती निर्माण होताना जाणवते. अर्थात, असा संवाद कधीही संपणार नाही, काही नाती त्या शिवाय जगूच शकत नाहीत. त्यामध्ये खुल्लमखुल्ला संवाद होतोच, कधी गोड, कधी कडू. पण, सर्वसाधारण समाजात मोकळा संवाद कमी व्हायला लागला म्हणायला पुष्टी देता येईल. वातावरणातील बदल अनेकांना  जाणवतो. याला ग्राहणापुर्वीचे वेध म्हणूयात.

ग्रहण, वेध, नाते, आणि संवाद...  म्हणजे नक्की काय आणि कसे? नात्यांमध्ये विनाकारण संवाद कमीकमी होत जातो. विचारले, तर एकमेकांवर  ढकलाढकली होतेच. “ तो येत नाही, मग, आपणच कशाला जा उगीच त्याला डिस्टर्ब करायला? आपलं काय नडलंय? ” नाराजीची पुस्ती जोडून भेट टाळली जाते. तेंव्हा, दुसरा सुद्धा असेच काहीतरी बोलतो. “ मीच का आधी?” ही भावना अहं पोसू पाहते आणि पायात बेड्या कधी घालते समजत नाही. आठवण दोघानाही येत असते, फक्त फोफावत जातो अहं. माघार कोणी घ्यायची, याला उत्तर नसते. कारण काही झालेलं नसताना विचित्र घडते. त्याचीही सवय होते. अचानक कोणाच्या बारशाला नाहीतर बराव्याला भेटल्यावर वरवर चौकशी करून शब्द गोठतात. उरते, कधीतरी चाकोरीतले भेटणे, भेटू यात आश्वासन देणे, कारणमीमांसा आणि स्पष्टीकरण. आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या. अंतर मात्र वाढलेले असते.

काही काही माणसे, हे टाळण्यासाठी विशेष काळजी घेतात. पडदा टाकायचा त्यांचा प्रयत्न असतो. दुसऱ्या व्यक्तीने प्रतिसाद दिला नाही तरीही काहीजण लोचाटासारखे मधूनमधून फोन करतील, जावून भेटतील. पण दुसर्याने पूर्णच टाळाटाळ केल्यावर काय करणार? विचारल्यास, उत्तर मिळेलच याची खात्री नाहीच. पुन्हापुन्हा चौकशी होते, अगदी तुटू नये भावनेतून. अखेर संवाद अशक्त होत जातो, आणि क्षीण अवस्थेत काय संबंध फुलणार, काय नाते टिकून राहणार? जाऊ देत, तेव्हढाच ऋणानुबंध दोघांचा अशी समजूत पूर्णविराम देते.



पण, मी म्हणते, संवादासाठी नाते हवेच का? अपरिचित व्यक्तीशी संवाद साधल्यावर तेच परिचित व्यक्ती होते. एक माणूस आपल्या संग्रही येतो. माणसांचा मोठा ताफा असणे श्रीमंतीचे लक्षण नव्हे काय? दुकानदार, रिक्षावाले, बस स्टोपवर भेटणारे, नेहमीच्या  परिसरातले, कारणानिमित्ताने दिसणारे, तरीही अपरिचित लोकं खूप असतात आपल्या अवतीभवती. त्यांना कायमच अपरिचित म्हणायचे का? ओळख करून घेतली तर बिघडले कुठे? थोडंस  बोलल्याने काय बिघडते? पण एक फॅशन आहे आजकाल, अनोळख्या माणसाशी बोलायचे नाही. एसटीत पाटी असते, ‘अपरिचित व्यक्तीने काही खायला दिल्यास घेऊ नका.’ याचा अर्थ, तुमच्या डोळ्या देखत शेजारच्याने गाडीवरून केळी घेतली, तुम्हाला एक दिले, तर ते घ्यायचे नाही का? सगळीकडे शंकेखोर डोळे वावरताना भासतात. लुच्चेच दिसतात सगळे नजरेला. असे तितकेसे बरोबर वाटत नाही. असेल कधीतरी कोणाला लुच्चालफंगा भेटलेला, म्हणून समोरची प्रत्येक व्यक्ती चोर नालायक नसतेच. एखाद्यावर विश्वास टाकताना घ्यायची काळजी जरा जास्तच घेतली जाते, एव्हढे मात्र खरं. आजकाल जगात वावरायचा तो नियम होऊ पाहत आहे. हेच खटकते. वाईट लोके कमी असतात, पण त्यांचाच बोभाटा होतो, आणि सर्व सामान्य समाज भीतीने वावरतो. चांगले अनुभव येतातच अनेकांना अनेक वेळा. रोज रोज तीच माणसे त्याचं लोकलने त्याच डब्यात बसून त्याच स्टेशनवर चढतात आणि दुस-या  एका स्टेशनवर उतरतात. अशा सहप्रवाशांची मस्त मैत्री होते. एखादा दुसरा आला नाही, तर लगेच मोबाईल येतोच हातात.

आईवडील दोघेही कामानिमित्त बाहेर, घरात आजीआजोबा असतील नसतील घरात. मुले शाळेतून येतात, जेवतात, अभ्यास करतात. शेजारच्याच फ्ल्याटमध्ये दोघेजण वयस्कर राहत असतात. ते मुद्दाम दररोज या मुलांकडे थोड्यावेळ बोलायला येतात. गप्पा होतात, गोष्टी अनुभव सांगून त्यांची चांगली गट्टी होते. कधी आजी खायला करतात आणि मुलांना आणतात वाटीभर. तो चहा बनवतो आजीआजोबांसाठी. वेगळे संस्कार मिळतात, अनुभवातून शिकायला मिळतं मुलांना. जातायेता मुले काय हवे, काय आणू विचार पूस करू लागतात. संवाद केल्याने एक नात्याचा पूल सहज बांधला जातो. मुलांना आपली जबाबदारी यांच्याप्रती सुद्धा आहे हि जाणीव होऊ लागते.  त्याबरोबर एक जबाबदार व्यक्ती होण्याच्या वाट फुलू लागते. मुले सुसंस्कारित होतात. त्यांच्या आईबाबानाही आनंद होतो. हे नक्कीच सुचिन्ह आहे. असेच जर सगळ्या सोसायट्यांमध्ये घडू लागले तर शेजारच्या घरातला सुस्थितीत वाढणारा तरुण रेव्ह पार्टीत आढळणार नाही. आणि मुलगी वाकडे पावूल पडताना अडखळेल. काय हरकत आहे, जरा जेष्ठ लोकांनी आजूबाजूच्या तरुणाईशी  संवाद साधायला? तरुणांनीसुद्धा   मोठ्या लोकांकडून काहीतरी शिकावं. आजूबाजूला अत्यंत उच्च पदभार सांभाळणारी, ज्ञानी, अभ्यासू लोक असतात, त्यांच्याकडे जाऊन आपलाच फायदा करून घेणारी तरुणाई दिसत नाही. नक्कीच बदलतात येईल हे चित्र संवादामार्फत.

असा हा संवाद, आणि त्याची करामत, गुंतागुंत. शब्दांची उधळण, एकमेकांच्या भावनांची कदर, नात्यांची जपणूक, धडपड, हे सारे काही प्रत्येकाला हवेच असते. तरीपण,  का बर उगीच आढेवेढे घ्यावेत? फुकटचा आगाऊपणा करावा? नखरे आणि शिष्ठपणा यालाच म्हणतात. शब्दांचे दुर्भिक्ष, संवादाचा अभाव आणि त्याने होणारी मनाची कुचंबणा अनुभवलेली असते कधी ना कधीतरी प्रत्येकाने. पण या अनुभवातून शिकतात थोडेच.  शिकतात, तेच आघात आणि दु:ख विसरू शकतात. त्याला कारण एकच.
“नात्यांमधला दुरावा जोडायला
बांधावे लागतात शब्दपूल
त्याचं महत्व त्यांनाच समजतं
ज्यांना दुराव्यानं केलं असतं दूर...”.


वंदना धर्माधिकारी
मोबाईल : ९८९०६२३९१५








Sunday, November 23, 2014

22. Diwali 2014 - Samtol - Brexit


“ब्रेक्झीट” हा शब्द “Britain  आणि exit  या दोन शब्दांवरून तयार झाला आहे.  Br+exit =Brexit” युरोपीय महासंघ (युनियन – ईयु - EU) मधून बाहेर पडायचा ब्रिटन देशाने घेतलेला निर्णय म्हणजे ब्रेक्झीट होय. गुरवार दिनांक 23  जून,2016 रोजी ब्रिटनने देशवासीयांचे मत अजमाविले, त्यात 52% मतदानाने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा कौल दिला.  तर 48%मतदान त्याच्या विरोधात गेलेले होते. सार्वमत चाचणीमध्ये केवळ 2% अधिक मते जादा मिळाल्याने ब्रेक्झीटचा अतिशय महत्वाचा ऐतिहासिक निर्णय स्वीकारला गेला. 
ब्रिटनने 1073 साली युरोपीय युनियन सभासदत्व स्वीकारून इतर देशांशी सलगी केली. एकूण 28 देश या महासंघात आहेत, त्यापैकी 19 देशांनी 1999 मध्ये ‘युरो’ चलनचा स्वीकार केला. परंतु, ब्रिटन देश आपले स्वतंत्र अस्तित्व राखून राहिला, त्यांचे चलन ‘पौंड स्टर्लिंग’ होते तेच राहिले. ईयु मधील सर्व  देशांचा मिळून एकच ‘शान्जेन व्हिसा’ आणला, परंतु ब्रिटनने त्यांचा स्वतंत्र व्हिसा ठेवला आणि त्याचे नियम अधिक कडक केले. एकत्र राहूनही आपले असे काहीतरी वेगळे ठेवणे, हा ब्रिटीश लोकांचा स्वभाग होता, असे दिसते. त्याचेच पुन्हा एकदा प्रत्यंतर ब्रेक्झीट मुळे जगासमोर आले.
युरोपीय महासंघातील सर्व देशांचे नागरिक इतर सदस्य देशात व्हिसा नसताना सहज येजा करू शकतात. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, उद्योग यासाठी विनाअट  प्रवेश असतो. शिवाय देशादेशात व्यवसाय, वस्तू, भांडवल, सेवा, अशा महत्वाच्या गोष्टींची देवाण घेवाण मोठ्या प्रमाणात आणि नियमितपणे होत असते. एक देश संपून दुसरा कुठे सुरु होतो, हे देखील लक्षात येत नाही, प्रचंड एकसंधता या देशांमध्ये दिसते. त्याने त्यांचा व्यापार उद्योग वाढला, आणि इतर देशांशी अनेक करार केले गेले. या देशांमधे व्यापर, मालाची नेआण नियमित विना कर होत होती. ते आता थांबले म्हंटल्यावर बाजारात माल कमी पडू शकतो, कारण ताजा माल मिळतो  तेंव्हा अनावश्यक साठवण केली जात नहीं. अचानक परिस्थिती बदलल्याने तो माल लवकरच कमी पडू लागला, मागवता येतोच असेही नाही. तसेच ब्रिटनहून इतर देशात जात असलेल्या मालालाही उठाव असला तरी, नियमअटी यामधे तो अडकला आहे.



ब्रेक्झीट निर्णय घेतल्यावर केवळ एका महिन्यात जुलै अखेर, ब्रिटन मधील लॉइडस् बँकिंग ग्रुप (LBG) नामांकित वित्त समूहाने सद्यस्थितीला सामोरे जाताना या आर्थिक वर्षात 3000+ अधिक नोकर कपातीचा कटू निर्णय घेतला आहे. तेथील वर्तमानपत्रात प्रसिध्द झालेल्या बातम्यांनुसार तेथील अन्य बँका देखील याचेच अनुकरण करण्याची शक्यता आहे. सामाजिक समस्या तीव्र स्वरुपात निर्माण होतील, याचे हे एक उदाहरण म्हणावे लागेल. तेथील पतधोरण नजीकच्या काळात येत आहे, त्यावेळी बँक ऑफ इंग्लंडने व्याजाचे दर आणखीन खाली म्हणजे 0.25 % असे अगदी तळाला नेले जातील, असे भाकीत केलेले आहे. तेंव्हा म्हणावेसे वाटते की, जर बँकिंग इंडस्ट्रीची परिस्थिती ब्रेक्झीट नंतर लगेचच अशी होत असेल, तर इतर इंडस्ट्रीजना कुठला सामना करावा लागेल. बँकिंग पुरते बोलायचे झाल्यास, इंग्लंड मधील सर्व बँकांचा विस्तार युरोपीयन देशांमध्ये मोठ्या प्रमाणात होता, आता त्यावरही काय परिणाम होईल सांगणे अवघड आहे. शिवाय तेथील प्रत्येक देशाचा मिळणारा पाठींबा, तोही प्रत्येक क्षेत्राला किती ते भविष्यात महत्वाचे आणि परिणामकारक ठरेल हे निश्चित. लंडन युरोपीय देशांच्या बरोबर व्यापाराचे प्रमुख द्वार आहे, नव्हे होते म्हणायला पहिजे. तर इथून पुढे, आधीच्या गोष्टींसाठी सुद्धा नवीन उद्योगीक करार करावे लागतील का? नवीन काही सुरु करताना त्या त्या देशाशी करावे लागतील असे वाटते. तसे करताना सहजता राहणार नाही. महत्प्रयासाने ते सर्व मिळवावे लागेल.
ब्रेक्झीटचा निर्णय जाहीर होताच पौंड घसरला, पाश्चिमात्य देशांशी व्यापारावर अवलंबून असलेल्या भारता सारख्या अनेक देशांचे शेअर बाजार कोसळले. सोन्याचा भाव वधारला. अस्थिर वातावरण जरी निर्माण झाले, तरी ते अत्यल्प काळापुरते होते, लवकरच जगाने आपली गती पकडली. असे जरी असले तरी ब्रेक्झीट परिणाम हा सगळ्यांनाच विचार करायला लावणारा आहे.
ब्रेक्झीट मुळे काय काय होईल, हा सगळ्या देशांना पडलेला प्रश्न आहे. बाहेर पडायची प्रक्रिया लवकरात लवकर व्हावी असे इतर युरोपियन देश म्हणत आहेत. बाहेर पडण्याचा प्रवास गुंतागुंतीचा आहेच कारण 43   वर्षे एकत्र काम केल्याने प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यासपूर्वक विचार करून पॉलिसीज  करायला पाहिजे. ब्रिटनची इयुमधील भूमिका महत्वाची होती, आणि जरी बाहेर पडले तरी जेंव्हा ब्रिटन होते तेंव्हाचे या देशाचे योगदान मोलाचेच आहे. अत्यंत काळजीपूर्वक हा गुंता सोडविला पाहिजे. इयु मधून एखाद्या देशास बाहेर पडतानाची प्रक्रिया युरोपीएन कॉंन्स्टीट्युशनने डिसेंबर 2009  मध्ये जारी केली. त्यास “Article 50 of the Lisbon Treaty” संबोधतात. त्या करारानुसार पुढील  दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया केली जाईल. ब्रिटीश सरकार, तसेच युरोपियन महासंघ दोघांनी ब्रीक्झेटसाठीची जबाबदारी एका  स्वतंत्र डिपार्टमेंटवर टाकलेली आहे.  संपूर्ण प्रक्रियेस किमान दोन वर्षाचा कालावधी लागेल असे तज्ञांचे मत आहे. तोपर्यंत ब्रिटनला इयुचे कायदेपालन करावे लागेल, परंतु इयुच्या निर्णय प्रक्रियेत ब्रिटनला भाग घेता येणार नाही. डिसेंबर 2016 पूर्वी यावर काही कृती केली जाणार नाही, असे सांगण्यात आलेलं आहे.
ब्रिटन मधेच ब्रेक्झीट वर अनेक मतमतांतरे आहेत. इंग्लंड, आयर्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स यामध्ये फुट पडली असून त्यापैकी आयरिश व स्कॉटिश नागरिकांनी  इयु मध्ये राहण्याचा विचार व्यक्त केला. ही लोकं स्वत:ला ब्रिटीश म्हणून घेण्यापेक्षा युरोपियन म्हणून घेणे जास्त पसंद करतात. इतके दिवस युरोपियन महासंघ आणि ब्रिटन मधील नागरिक सहजपणे कोठेही जाऊन राहू शकत होते. त्यावर काहीतरी बंधने येतील. ब्रिटीशांना इतर देशांत येण्याजाण्यावर बंधने येण्याची शक्यता वाढली आहे. तसेच जे युरोपियन नागरिक ब्रिटन मध्ये स्थाईक झालेले आहेत, त्यांच्या अस्तित्वासाठी नवीन नियमावली केली जाईल. कदाचित काही कालावधी पूर्वी ब्रिटन मध्ये स्थाईक झालेल्यांना तिथेच राहण्याची मुभा मिळेलही,  आणि नव्याने आलेल्यांना परत देखील पाठविले जाईल. तेच उलटे, म्हणजे ब्रिटीश लोकं जी इतर देशात स्थाईक आहेत, वा जाऊ इच्छितात, वारंवार जातात त्यांच्याबद्दलहि सगळीच अनिश्चितता होईल.
ब्रिटनमध्ये भारतीय वशांचे अंदाजे साडेसात ते आठ लाख लोक राहतात. त्यातील काहींनी ब्रिटनचे नागरिकत्व घेतलेले असल्याने जे ब्रिटीश नागरिकांचे होईल तेच यांचेही होईल. ब्रेक्झीटचा परिणाम तिथे शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी, भारतीय उद्योजक, विविध कंपन्यांनी पाठवलेली लोकं यांच्यावर होणार आहे. सद्य परिस्थितीत आयटी  कंपन्यांना ब्रिटन मध्ये मिळणाऱ्या  प्रकल्पांचे काय होईल हे  सांगणे लोकांना अवघड वाटते.  प्रकल्प रेंगाळतील, निर्णय घेतला जाणार नाही, चालढकल केली जाईल त्याचा परिणाम आयटी क्षेत्रावर होईल, त्यामुळे भारतीय कंपन्यांना त्रास होण्याची शक्यता वाटते. परंतु,याचा कालावधी फार मोठा नसेलही. जगातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व्यापार वृद्धी व स्पर्धा दोन्ही पाहिजे असल्याने ब्रिटनला चांगल्या चांगल्या कंपन्यांशी आउटसोर्सिंग हे करावेच लागेल. इथेच भारतीय आयटी  कंपन्या यशस्वी होतात, आणि आपल्या देशातील बुद्धिमत्ता, कार्यकुशलता नक्कीच उत्तम असल्याने भारतीय लोकांना तिकडे कामानिमित्त बोलावले जाईलच. असे मत तज्ञांचे आहे. फार काळ समस्या राहणार नाहीत, यावर मात्र सर्वांचे एकमत होताना दिसते.
जनतेच्या भावनिक मतांचा विचार करून ब्रेक्झीटचा निर्णय घेतला गेला आहे. असे तेथील अनेकांचे मत आहे.  शिवाय ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात निर्वासित लोकांचे लोंढेच्या लोढे येतील अशा भीतीने ब्रेक्झीटचा निर्णय घेतला गेला आहे. ते बरोबर नाही. म्हणून पुन्हा एकदा जनमत  घेण्यात यावे, अशी  आग्रही याचिका ब्रिटीश नागरिकांनी काढली आहे, आणि त्यावर दहा  लाखांहून अधिक लोकांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. ब्रिटीश संसदेमध्ये याचीकेवर  विचार व चर्चा होणार, चर्चेतून जनसामान्यांच्या भावनांचा अंदाज घेतला जाईल. पुढे काय माहित नाही.

एकंदरीतच ब्रिटनची आर्थिक परिस्थिती खालावेल, त्यांना आर्थिकदृष्ट्या समस्या उद्भवतील असे अनेक तंज्ञांचे मत प्रदर्शित केलेले होते. ब्रेक्झीटच्या  शॉक मधून अर्थव्यवस्था लवकरच सावरली जाईल आणि भविष्यात मार्केटला खूप मोठा धक्का बसेल असे काही होईल, असे वाटत नाही. असेही तेथील तज्ञ लोकांचे मत आहे, काहीतरी नक्कीच शिजत असणार. थोडे दिवस पौंडची किंमत डॉलरचे तुलनेत 10% ने घसरली आहे. ती पूर्ववत येईलच. त्यांच्या दृष्टीने खूप काही बदल होणार नाहीत. सर्वतोपरी येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्याइतकी सक्षमता ब्रिटीश सरकारची आहे, असे चित्र सध्यातरी रंगविले जात आहे. भविष्यात काय दडले आहे, ते वेळोवेळी बघायला मिळेलच. सध्या फक्त ‘Wait and Watch.’

वंदना धर्माधिकारी
Vandana10d@yahoo.co.in  M : 0 9890623915
पत्ता : 25 तेजस सोसायटी, तेजस नगर, कोथरूड, पुणे 411038



20. Diwali 2012 - Arthapurn - अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी अर्थसाक्षरता








66. Diwali - Chintan Aadesh - फजिती - कर सारं साफ





23-11-2014

चिंतन आदेश – फजिती विशेषांक – २०१४
लेखिका : सौ.वंदना विजय धर्माधिकारी


पक्षांच्या किलकिलाटाने मला जाग आली. तशी डोळे चोळतच उठले. खिडकीच्या फटीतून बाहेर पाहिलं, तसं पूर्ण उजाडलं नव्हत. पण झोप पूर्ण झाल्याच्या समाधानाने उठवलचं  मला. उठून बसते तोच, मी जीवंत आहे याची जाणीव झाली. स्वप्न तर नव्हे ना हे. माझेच मला पडले कोडे? म्हणजे काल मला कोणी मारलं नाही. ना खून, ना दरोडा, कोणी चोर पण नव्हता का आला? मग ते दारावर धडका देणं. कोण होत? पुन्हा जरा रात्रीची भीती अंगावर आली. आणि दूर फेकलेलं पांघरून ओढून घेतलं. उजाडल्याशिवाय घरातला दिवा लावायलाच नको. कोणी लपून बसलं असेल बागेत तर, मागच्या दारामागे असेल तर, खरं तर बाथरुमला जायची इच्छा झालेली. काय करू? दिवा न लावता जायचं ठरवलं, आणि अंदाजपंचे जाऊन आले. तसे या घरात राहून तीनच महिने झाले होते. आणि आता या बंगल्यात एकटी राहून मोजून पाच दिवस झाले. सोमवारी तर आले संध्याकाळी आणि आज शनिवार. शनिवार म्हणताच मन घराकडे धावलं. क्षणार्धात पुण्यात कोथरूडला पोचलं देखील. भराभरा आवरलं पाहिजेच याचे भानही झाले. आज बँकेत लवकर जावं, कालचं  पडलेलं काम उरकायलाच हवं. तरचं दुपारची अडीचची गाडी पकडता येईल. एस.टी.च्या वेगाने मन पळत होतं. तशी उठलेच, आणि पाहते तो चक्क उन्ह आलं होतं. म्हंटल, ‘चला, लाईट न लावता, नक्कीच आवरता येईल.’

मी बँकेत नोकरी करीत होते. माझी बदली झाली सोलापूरला. तशी मी नाराज वगैरे अजिबातच नव्हते. सोलापूरला आमच्या नात्यातल्या एक आजी एकट्याच बंगल्यात राहायच्या. त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला आणि गेले त्यांच्याघरी. आमचं दोघींचं मस्त जमायचं.  माझी तर सोय चांगली झालेली, आणि आजीना पण आवडलं माझं तिथे राहणं. तसे दोन अडीच महिने होत नाहीत तोच काही कारणाने आजीनी  पुण्याला  लेकाकडे यायचं ठरलं.  मला किल्ली देवून, कुठे काय आहे हे सांगून माझ्याच बरोबर पुण्याला त्यांना मी घेऊन आले आधीच्या शनिवारी दुपारी.

आजी राहिल्या पुण्यात पण सोमवारी सकाळी पाचच्या गाडीने मला सोलापूरला जावेच लागले. परस्पर बँक, दिवसभर काम आणि पार संध्याकाळी सहा वाजता दुध आणि ब्रेड घेऊन बंगल्याचे मागले दाराने मी आत प्रवेश केला. आतून कुलूपच लावले. पुढच्या दाराला बाहेरून लावले होते. कोणाला वाटेल, आत कोणीच नाही. बाहेरच्या मुख्य दरवाजातून आत आल्यावर एक छोटीशी पडवी होती. फक्त दोन खुर्च्या, आणि थोडी अडगळ अशी लहानशी जागा. तिथेच चप्पल काढून आत हॉल मध्ये प्रवेश व्हायचा. आजींच्या सांगण्यावरून पडवी आणि हॉल मधले दारही वरची-खालची कडी लावून बंद केलेले. जर मागच्याच दाराने यायचे तर कशाला इकडून पडवीत जा, आणि बाहेर अंगणात. हॉलमधेच कॉटवर मी झोपायची. पलीकडे दोन बेडरूम्स होत्या. पण मी आणि आजी आम्ही दोघीही हॉलमध्येच झोपायचो. तसंच करायचं मी ठरवलं. सोमवारी भल्या पहाटे उठून सोलापूरला आले आणि दिवसभराचा थकला भाकला देह आठ वाजताच पडला.


नेहमीप्रमाणे मंगळवारी उठले, आवरले, बँकेत गेले. तिथूनच पुढे दोन दिवस मी मैत्रिणीकडे राहिले. गुरवारी मात्र बंगल्यावर झोपले. एकटी. फार काही करायचे नसायचेच. त्यामुळे बहुधा रात्री दहा म्हणजे माझी मध्यरात्र असायची. कुठे धावतपळत चार दिवस गेले समजले सुद्धा नसेल मला.  शुक्रवारी मात्र रात्री उशीर झाला, तो फोनवरील गप्पांमुळे. सोलापूरच्याच परिचयाच्या एकीचा फोन आला, आणि गप्पांना उत आला. झालं, मला जेवण करून झोपायला साडेनऊ वाजून गेले. शिवाय एक भाकरी करण्यात वेळ गेला. पण पटकन डोळा काही लागला नाही. नलूताईंच्या गप्पाच आठवतं कूस बदलत होते झालं. अचानक दारावर टकटक वाजलं. आधी वाटलं रस्त्यावर असेल कसलातरी आवाज. पण नाही, तो आमच्याच दाराचा आवाज होता. मी उठणं, कोण आहे म्हणून विचारणं शक्यच नव्हतं. तसे घरातले लाईट बंद करूनही अर्धा तास झाला असेल. बहुधा सव्वादहा वाजले असतील. आज विचार केला तर तसा फार उशीर नव्हता झालेला. १५/१६ वर्षापूर्वीचा काळ. तेंव्हा त्या भागात सामसूम लवकर व्हायची, टीव्हि बिघडलेला होता. त्यामुळे, झोपाळू मी लवकरच झोपायची. असं होतं, पण त्या दिवशी, काहीतरी आवाज जोरजोरात येऊ लागला. काय करावं?

एकदम मागच्या बंगल्यातल्या जोशी काकू आठवल्या. आजींनी  जाताना मला सांगितलं होतं, “काही लागलं तर जोशी काकूंकडे जा. वाटलं तर त्यांच्या निशाला झोपायला बोलवा.” पण, मीच खूप धिटाईने म्हंटल होतं, “नको, मला नाही भीती वाटतं, झोपेन मी एकटी.” तशा जोशी काकू सुद्धा दोनदा येऊन माझी चौकशी करून गेल्या होत्या. आणि ही दारावरची थाप, आवाज वाढतच गेला. ठरवलं, काही झालं तरी दार उघडायचं नाही. पांघरून घेतलं डोक्यावरून, तरी आवाज येतचं होता. रामरक्षा म्हणायला सुरवात केली. संध्याकाळी देवापुढे दिवा लावायचा राहिला होता. म्हणा, आजींच्या घरात मी पाहुणी, कशाला असल्या गोष्टी करा. पण सवय होती ना, तिन्हीसांजा दिवा लावायची. म्हणून एकदोनदा लावला इतकेच. पण नेमकी त्या दिवशी विसरले, आणि रामरक्षा चुकली. तोच तोच श्लोक पुन्हापुन्हा म्हंटला जातोय हे लक्षात आलं. बाहेर आवाज येतच होता. बरोबर चूक रामरक्षा म्हणता म्हणता कधी झोप लागली कळलेच नाही. जाग आली ती एकदम सहा वाजता तीही पक्षांच्या किलबिलने.

शनिवार अर्धा दिवस म्हणजे बँकेत ही गर्दी. याच दिवशी सगळ्यांना पैसे काढण्यासकट इतर सारी बँकेतील कामे आठवतात. सारखं घड्याळाकडे लक्ष जात होते. तसं सामान काहीच नसतं पुण्याला जाताना. एक पर्स उचलायची आणि रिक्षाने एस टी स्टँड गाठायचा. दुपारच्या अडीचच्या गाडीचा ड्रायव्हर कंडक्टर नेहमी तेच असायचे. बँकेतल्या बाईंची जागा देखील ठरलेली असायची. एकदा मला उशीर झाला, तर गाडी दहा मिनिटे उशिरा सोडली होती. शक्यतो मी वेळेत यायचीच. त्या दिवशी रिक्षाच मिळाली नाही मला, आणि आमच्याच बँकेतील एकाने मला सोडले ते देखील पलीकडच्या चौकात, म्हणून उशीर झाला. या शनिवारी असा कामाचा सपाटा मारला, आणि बरोबर वेळेवर गाडीत बसले. केलं हुश्श! मस्त झोप लागली.
जाग आल्यावर कंटाळवाणा लांबलचक प्रवास, शेवटास तो तासाभराचा हडपसर ते स्वारगेट प्रवास. पुढे कोथरूडला रिक्षा करीत स्वारी रात्री मुक्कामाला घरी आली. घरच्यांची ख्यालीखुशाली, आलंगेलं, बाईचं रिपोर्टिंग, उद्याचे कार्यक्रम, पुढच्या आठवड्याची सर्वतोपरी बेगमी करताकरता सारंकाही आवरण्यात रविवारही गेला, आणि नेहमीप्रमाणे सोमवारी पहाटेच्या गाडीने बाईसाहेब चाटी गल्लीतल्या बँकेत आल्या. न येऊन सांगता कोणाला?

दोन दिवस शुक्रवारची टकटक डोक्यातही वाजायची मध्येमध्ये. पण घरी कोणाजवळ बोललेच नाही. तसा वेळही मिळाला नाही. बघू गेल्यावर, झालं असेल काहीतरी. नाहीतर माझेच मनाचे खेळ असतील. कधीच एकटी राहिले नव्हते. दिवसा काही वाटायचे नाही एकटी असले तरी. वेळ जायचा कामात. पण एकटीने राहणं ते देखील पाच खोल्यांच्या बंगल्यात, ते ही दुसऱ्याच्या घरात, आणि ते सुद्धा सोलापूरला. की जेथे बँक ते घर इतकाच रस्ता मला माहित असलेल्या गावात. म्हणूनही असेल भीती वाटली. पण पुण्यात घरी काहीच बोलले नाही.

सोमवार ते सोमवार गेला. त्यारात्री मेल्यागत पडले होते. मंगळवारी मात्र ठरवलंच, पडवीतं जायचंच. उठल्या उठल्या मधलं दार उघडलं आणि मला ब्रम्हांड दिसलं. बापरे, काय हे... कसं करायचं...शी... म्हणून मस्त एक हासडली आजींच्या लाडक्या मांजरीला. मला मांजर अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही. आजींना मात्र भयानक प्यारी. तिने मस्त चार पाच कि पूर्ण आठवडा तिथे सर्व विधी केले होते. पार खुर्चीचे कव्हर, ते दारातले पायपुसणे, सर्वत्र त्या मांजरीचे जुलाब ओघळ तेही वाळलेले. तीच दारावर नखाने टकटक करीत असणार. माझी खात्री झाली. इतका कडेकोट बंदोबस्त केला असताना ही आलीच कशी आत? पाहते तो खिडकीची एक काच आधीच तुटलेली होती. पडद्यामागे मी कशाला बघते? तो पडदा देखील किती दिवसात कोणी सारला नसेल. गोऱ्याघाऱ्या मनीने बरोबर शोधून काढला मोकळा चौकोन आणि केला आत मुक्काम. नुसती झोपली असती, तर माझी तळपायाची मस्तकात गेली नसती. ही गलिच्छ घाण आता मला काढावी लागणार होती. कामवाली बाई सांगून गेली होती गावाला. म्हणजे, अजून चार दिवस हे असेच ठेवायचे. दुर्गंधी पसरलेली खरं तर रात्रीच जाणवली होती, पण दमले होते इतकी, की दोन केळी खावून क्षणार्धात झोपले. ओकारी येता येता... खराटा, बाटली, पाणी, केरभरणी, खरडायला एक पत्राही मिळाला. सगळी आयुध आणली. केली सुरवात. काही भाग तर पूर्ण कडक वाळलेला. बाहेरचे दार उघडून पाणी बाहेर ढकलावे असं वाटलं, पण तिथपर्यंत जाण्याची हिम्मत नाही केली. जमेल तेव्हढे केले साफ. चक्क अर्धी बदली पाणी ओतून ठेवले. संध्याकाळी तासभर तरी द्यायलाच हवा यासाठी असे म्हणून त्या खिडकीचा बंदोबस्त करायला लागले. रद्दी, जुना पाट, दोरी, शोधून आणली.  खिडकी बंद केली. कोपऱ्यात एक जुनी मोडकी बॅट सापडली. ती पुन्हा पाटाला टेकून खुर्चीच्या वर घट्ट बांधली. काय सांगा, तिने पाट ढकलला आणि आत आली तर.... कल्पनेनेच कसंतरी झालं.

आत जावून मी उलटीच केली. आर्धा पाऊण तास साफसफाईचे काम करीत होते. डोकं गरगरायला लागलं. उठल्यावर चहा सुद्धा घेतला नव्हता, आणि हे भयानक  दिव्य करीत बसले. करायलाच हवे होते. पुन्हा पडवीत पूर्ण बंदोबस्त केल्याची खात्री करून घेतली, आणि मग प्रथम आंघोळ आणि नंतर चहा. बँकेची वेळ झालीच इतके करेस्तोवर. मग काय  न खाताच बँकेत. घरात खायला गेलेच नसते त्यादिवशी मला. तसं बँकेजवळच्या हॉटेल मध्ये बऱ्यापैकी मिळायचं. खायचे नखरे करणारी मी त्यावरही खुश असायची.

संध्याकाळी घरी आले, ते येतानाच एका ठिकाणी थांबून खावून नंतरच. आत घमघमाट सुटला होता. सगळ्या खिडक्या उघडल्या, आणि सर्व म्हणजे पाच खोल्यांमधले पंखे जोरात लावले. एकीकडे त्यातल्या त्यात जुना झालेला गाऊन घातला, तेंव्हा  पंजाबीची पद्धत नव्हतीच आजच्या सारखी. आयुधं काढलेलीच होती सकाळी. सुरु केलं महान काम. पत्र्याने खरवडलं, ओलं झाल्याने निघालं तरी. बादलीत भरलं मागल्या दारी पार कोपऱ्यातल्या झाडाच्या बुंध्याला ओतलं. असे चार हेलपाटे मारले. बऱ्यापैकी साफ झालेले वाटले,  पण पूर्ववत नव्हेच. पुन्हा अर्धी बादली ओतली. पडले अंथरुणावर तेव्हड्यात आलीच महामाया. टकटक, खडखड करीत होती. पण, तिला आत येता  आलेच नाही. मी एकदम पक्का बंदोबस्त केला होता. पडवी आणि हॉलच्यामध्ये एक छोटीशी खिडकी होती. माझे डोळे तिला चिकटलेले. बॅट पडत तर नाही ना यावर लक्ष. थोडीशी हालली. पाट सरकतोय असे वाटले. मनूभवानी  दमली, आणि निघून गेली. पुन्हा पडवीत गेले. आतल्या बेडरूम मध्ये गाडीची एक वळकटी होती. ती आणली बाहेर. खुर्चीवर उभी ठेवली आणि जबरदस्त पक्केपणाने खिडकी बंद केली. नंतर मात्र गाढ झोपले. असे ओळीने पाच दिवस, म्हणजे मंगळवार सकाळ ते शनिवार सकाळ तोच कार्यक्रम करीत दिवस गेले. पुन्हा पुणे, सोमवारी सोलापूर.

त्या दिवशी बयाबाई मांजरीची थाप मागच्या दारी यायला लागली. माझे अंगावर काटाच आला. तिकडे काही उद्योग केला तिने तर. सकाळी उठून बघते, तो मांजर मागच्या अंगणात पलीकडे, भिंतीला लागून झोपली होती. असं वाटलं दगड घालावा तिच्या डोक्यात, पण आजी आठवल्या. त्यांचे ते मनुचे लाड आठवले. अजून माझी ट्रान्सफर पुण्याला झाली नव्हती. काही दिवस मला आजींच्या बरोबर त्याच बंगल्यावर राहावे लागणार होते. आजी कधी येतील असे वाटत होते. तोपर्यंत या मांजरीने माझी फार जिरवली होती. आजींच्या पाठोपाठ ती सतत असायची, पण, तिला आत यायला मज्जाव मी केला होता. तशी एखादेवेळेस आली असती, तर मीही बसले असते तिच्याशी खेळतं. पण, छे, हा पडवीतला प्रकार निस्तारल्यावर तिला बंगल्याच्या कम्पाउंड मध्ये येऊ देत होते इतकेच माझ्या दृष्टीने खूप होते. मला मांजर आवडायची नाही. सुरवातीला तिने माझ्याशी अंगलट केली. मी दूर ढकललं, लवकरच  तिला समजलं इथे आपली डाळ शिजणार नाही हे. ती माझ्याकडे येईनाशी झाली होती. मलाही हायसं वाटलं. तीच मनी माऊ माझी अशी त्रेधा तिरपीट करून मला कामाला लावेल, माझी चांगली जीरवेल असे मला अजिबात म्हणजे अजिबात वाटले नाही. दोन महिन्यात तिला एकदाही मी घरात येऊ दिले नव्हते.
तसे भराभर गेले दोन महिने आणि आजी आल्या सोलापूरला.  त्यांना मी हे सांगतलं खरं. तरं आजींनी तिलाच जवळ घेतलं, कुरवाळलं आणि म्हणाल्या, “ दोन महिन्यात घरात आली नाही गं माझी बाय. अशी जिरवलीस तू हिची. असू दे हं. हे घ्या. दुदू दुदू.... या या मांडीवर.”....मी जवळच बसले होते. मनी मांडीवर लोळत माझ्याकडे तिरक्या नजरेने बघत होती,  हळूच हासत होती. मी देखील तिच्याच कडे एकटक बघत बसले. डोळे मी वटारले नाहीत. मनी मला म्हणाली, “कशी जिरवली तुझी. मस्त फजिती केली की नाही. मागल्या दारी पण तसंच करणार होते. पण, म्हंटल, जाऊ देत. पाहुणी आहे. सोडून देऊ यात. माझा रागराग करतेस काय? कर सारं साफ.”

वंदना धर्माधिकारी
Vandana10d@yahoo.co.in  ::  मोबाईल : ९८९०६२३९१५.



Camera is a responsive/adaptive slideshow. Try to resize the browser window
It uses a light version of jQuery mobile, navigate the slides by swiping with your fingers
It's completely free (even though a donation is appreciated)
Camera slideshow provides many options to customize your project as more as possible

Here is a video for National Webinar on IBPS Exam. Guidance by Smt.Vandana Dharmadhikari on 17th July, 2020 

vandanadharmadhikari.blogspot.com