निरंजन दिवाळी अंक २०१४ ::: बांधावे लागतात शब्द्पूल
“श्वासही आत जात नाही
तुझ्यासाथी शिवाय
पापणीसुद्धा मिटत नाही
तुझ्या आठवणीशीवाय
कसं पटेल तुला सारं मला
भेटल्या शिवाय
इतकं का कोणी जीव लावतं
आपलं असल्याशिवाय.....”
ज्याच्या कोणाच्या एखाद्या कां होईना नात्यात या ओळी लागू
होत असतील ती व्यक्ती भाग्यवान समजावी. आपलं असणं, आपल म्हणंण, तसं वागणं, बसणं,
बोलणं आणि एकमेकां सुखावणं हे असलं कि आपोआप जीव जडतो. जीवापाड जपणूक होते.
अशावेळी क्षणोक्षणी आठवण येणारच, डोळे वाट बघणार, मन हिंदळणार आणि आपल्या माणसाला
भेटल्यावर आनंदोत्सवात तेच मन पिंगा घालीत नाचणार तेही आपल्याच भोवती. आपण कोणाचे
तरी कोणीतरी आहोत, याची संपूर्ण खात्री मनाला असणं आणि तशीच ग्वाही आपणहून
दुसऱ्याला देणं हेच तर नाते जपणं असते.
दोन प्रकारची बैठक असते या नात्यांची, जपायची दोन्ही नाती.
जैविकतेतून आलेली आणि प्रेमाने बांधलेली असतात नाती. आपलेपणा हा कंसाबाहेर काढलेला
सामायिक भाव पाहिजेच. ‘Blood is
thicker than water’ हे सूत्र जैविक नाती दृढ
करते. घट्ट बांधून घेतात हि घरातली नाती एकमेकांना. किती जरी भांडण झाले तरी
मनातल्या मनात एकमेकांची आठवण येतेच, आणि ख्याली खुशाली घेतली जातेच. भांडभांड
भांडला बहिणीशी तरीपण राखीला तिच्याकडे जाऊन मुक्याने का होईना राखी बांधून
घेणारच. हा राखीचा धागा किंवा भाऊबिजेचे औक्षण अतूट नात्याची खूण आहे. तिथे खुडलेल्या
नात्याचं रोपटं पुन्हा घट्ट रोवू पाहतं. हीच जैविक नाती जपण्यासाठी, त्यांच्यात
पुन्हापुन्हा संवाद घडावा म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये वेगवेगळे सण साजरे करतो. आणि
दिवाळीत सर्व नात्यांचा एकत्र मिलाप म्हणून उत्साहाने साजरी करतो आपण सगळेच.
दुसरी जाती फक्त प्रेमाने ओली होतात, फुलतात, बहरतात, जोडली
जातात. इथलं नाते मैत्रीचे असेल, ओळखीचे असेल, गुरु शिष्याचे असेल, मालक नोकराचे
असेल, दुश्मनीचे असेल, प्रियकर
प्रेयासिचेही असेल, नाहीतर निनावी न सांगता येणारे असेही असू शकेल. हि अजोड प्रेमजोडणी
नैसर्गिक अनामिक ओढ असते. नाते कोणाशीही जमते, नुसती नजर देखील नाते जोडायला
कारणीभूत होऊ शकते. हीच माणसाच्या
जिवंतपणाची खुण आहे. एकमेकांना आपल्याकडे खेचून घेऊन आपल्या मनोबंधाने घट्ट आवळून
ठेवायचं दुसऱ्याला, ह्यात माणसाची हातोटी
वाखाणण्याजोगी आहे. जगायचं एकत्र, हसायचं, फुलायचं, रडायचं देखील. एक श्वास, एक
उच्वास, एकच धडकन, एकच मन. प्रेमातून दिला जातो विश्वास. निसर्गाला रंग हवाच आणि फुलाला गंध हवा, अगदी तसाच नाती जपायला
एकमेकांवर विश्वास हवा.
रोपं लावायला माती हवी, तिथे
रुजायला पाणी हवं,
उंच वाढायला ऊन हवं, आणि
आनंदाने डोलायला वारा हवा.
तसचं अगदी तस्सचं....
नातं रुजायला भावना हवी, नातं
फुलायला ओलावा हवा,
नातं टिकायला संवाद हवा, आणि
नात्याचा आनंदोत्सव साजरा करायला एकत्र सहवास हवा....
विश्वासाने नाते टिकवून ठेवायला संवाद लागतो, त्यामध्ये
भावना आणि ओलावा हवाच. शब्द असे सहज मिळत नाहीत, प्रेमाचे आपलेपणाचे तर नाहीच
नाही. नसेल यायचं शब्दांना तर झुळूक साधी फिरकत नाही. दुखलं खुपलं, हवंनको बघताना
शब्दांची पाखरण हवीच असते. नुसते कोरड्याने कर्तव्य करणारी असतात काही माणसे.
अलिप्तता त्यांचा स्थायी स्वभाव. अबोल म्हणून न बोलता कर्तव्य करीत राहतात. मनात
असलेला ओलावा त्यांना कृती करायला भाग पडतो. कधी काही कारणाने झालेला विसंवाद पुसायला संवादच
हवा. त्यासाठी मध्यस्ती घेतली तरी चालते. संवाद साधणे खूप काही अवघड नक्कीच नाही. फक्त त्याची तीव्र
इच्छा हवी. आपोआप भावनांनी ओथंबलेले शब्द बाहेर येतात कोठूनतरी
काही शब्द पोटातून
कहो आले ओठातून
जिव्हाग्रावर क्षणी विसावून
काही उतरले श्वासातून
शब्दांनी नात्याची वीण घट्ट
होऊ लागते. पण कधीकधी शब्द शस्त्र होते,आणि सपासप कापले जातात नात्यांचे बंध.
नात्याची परीक्षा असते. नात्यांमधली गैरसमजाची गाठ आणि मोकळं व्हायचं
शंकाकुशंकांच्या तेढीतून काठीण होते. हे
बघा, धागे कापून गुंता सोडवल्यावर त्याच धाग्यांना पुन्हा गाठी मारीत गुंडाळलेला
लोकरीचा गुंडा, वरून बघताक्षणीच ताणलेल्या लोकरीचा आहे हे लक्षात येतेच. वरून
बरासा मऊ मऊ दिसला गुंडा तरिही ठुसठुसणा-या गाठी असतातच. नात्यात बोचर्या गाठी,
आठवणी, शाब्दिक आहेर असतातच. त्याचा दोष कोणाला द्यायचा. बरेचदा स्वनिर्मिती
असल्याने तक्रारही करता येत नाही. मग समोरची व्यक्ती दोषी समजून आपली सुटका केली
जाते. खापरं फोडावं नशिबावर. ‘मी इतका
चांगला वागूनही मला कोणीच विचारीत नाही.’ अशी आपणच निर्माण केलेली एक खंत बळावते.
कोण्या एके काळी, नात्याचा
गोतावळा असणं हे समृद्धीचे लक्षण समजतं.
नात्यांना सांभाळून धरून जपणं हि मात्र तारेवरच्या कसरतीपेक्षाही कठीण. ते
ज्याला जमलं तो माणूस खरचं ग्रेट समजावा. आता जमाना बदलला, एकमेकांकडे जाणंयेणं, बसणं,
बोलणं, या सगळ्याचीच स्टाईल बदलली. संवादाची माध्यमे वाढली, आणि बरेचदा जुजबी, तेव्हढाच, हाय-ह्यालो पुरता संवाद होऊ लागला. इलेक्ट्रॉनिक माध्यमाने तर संवादात कमाल
केळी. एटीएम वरून पैसे काढायला गेल्यावर देखील कोणीतरी बोलून आपल्याला सूचना देते,
आणि त्यानुसार आपण कृती केली कि व्यवस्थित
रित्या पैसे काढता येतात. कार्डही घेता येते. टेलीफोन, मोबाईल, मेसेज, whatsapp,
फेसबुक, इंटरनेट, Linkenden, skyup, ही संवादमाध्यमे आहेत. शिवाय आता त्यात भर
पडली आहे, एमेमएस, फेसटाईम, व्हायबर यांची. पाहिजे असलेले रेकॉर्ड करून आवाज
पाठविला जातो. रेकोर्ड केलेला निरोप त्या आवाजात ऐकता येतो. शिवाय बोलताना
पलीकडच्या व्यक्तीचा चेहरा दिसतो म्हणजे फेसटाईम, आणि व्हायबर म्हणजे इंटरनेट वरून
बोलणे करणे. सगळीच संवादाची प्रचलित प्रगतमाध्यमे आहेत. या
सर्वांद्वारे संवाद करून कामे होतातच. वायफट बडबड आटोक्यात ठेवली जाते. अशी हि
उत्तम साधने आहेत. शिवाय नाती जपणूक करण्या साठी हि साधने उत्तम सहकार्य देतात.
चांगल्या प्रकारे ज्यांच्याशी वर्षानुवर्षे संवाद झाला नाही, त्याची गाठभेठ होते,
ख्यालीखुशाली समजते, ठावठिकाणा कळला कि गाठीभेटीसुद्धा होतातच. अनेक शाळा कॉलेजचे
ग्रुप्स यानेच तयार झाले. एकत्रित रित्या शाळेसाठी काही सहकार्य करणारी अनेक मुले
आहेत. याने माणसे जवळ आणली गेली असे म्हणायला हरकत नाही. skyup वरून परदेशात
राहणाऱ्या आपल्या मुलांशी नियमित बोलणारे अनेक आहेत. प्रत्यक्ष समोर स्क्रीनवर मुलाबाळांना,
नातवंडांना पाहून समाधान मिळते. ओळख ठेवायला लहान मुले शिकतात. मोठमोठ्या कंपन्या
online, मोबाईल वर, किंवा कॉन्फरन्स कॉल करून नोकरीसाठी, अथवा दुस-या कशासाठी
मुलाखत घेतात. हा संवादच असतो. इथे वेळ, श्रम, पैसा, याची मोठी बचत केली जाते आणि
सर्वांना सोयीस्कर अशा या पद्धतींचा स्वीकारही होत आहे. हे प्रगतीचे लक्षण आहे.
प्रत्येक गोष्टीला
नकारात्मक बाजू असतेच, तशीच या नाविन्यपूर्ण संवाद माध्यमांना आहेच. यांचा वापर
विघातक गोष्टींकडे झुकत असल्याने, समाज व्यवस्थेवर संकटे येतात. नको त्या
विधेयकांचा गाजावाजा, कोण कोणाला काय म्हणाले यावर चर्चा, कशावरून तरी वादावादी,
भांडणे, मतभेद, अशा गोष्टीना उत येतो. त्याने हे नवीन वाईट असा गैरसमज पसरवला
जातो. जसे टीव्ही वर अनेक च्यानेल्स आहेत, रिमोट तुमच्याच हातात आहे. काय बघायचे,
काय ऐकायचे ठरविण्याचा हक्क फक्त तुमचाच. मग ठरवा तुम्हीच सकारात्मकतेकडे झुकायचे
कि गदारोळ माजवायचा. शेवटी, प्रत्येक व्यक्ती वेगळी, तिचे विचार आणि वर्तणूक
भिन्न. म्हणूनच सांगावे लागते, चांगले ऐका, चांगले बोला, चांगले वागा आणि चांगले
म्हणून घ्या. दुनिया सुंदर आहे, त्याहीपेक्षा तुम्ही माणूस म्हणून वावरता हे तुमचे
परमभाग्य आहे. त्याचा मान राख आणि संपन्न आयुष्य जगा
संवादाचे अनेक प्रकार आहेत.
वरवरचा, जुजबी, कामापुरता, ऑफिशियल, व्यावहारिक, टेकनिकल, सक्तीचा, एकतर्फी,
मोकळा, घरगुती, बारकाईने, अनावश्यक, आवश्यक, हमरीतुमरीचा, वादावादीचा, चर्चात्मक,
एकेरी, आदरयुक्त, अपमानित, सहानुभूतीचा, आपलेपणाचा, प्रेमळ, हवाहवासा, गोडवा, जिव्हाळ्याचा,
चेष्टामस्करिचा, अंतर्मुख करणारा, एकदिलाचा, हळवा, ओला, कोरडा, काळजाचा, काळजाला
हात घालणारा, आणि असाच नाव नसलेला संवाद. संवादात देहबोली महत्वाची भूमिका बजावते.
तुमचे हातवारे, चेहऱ्यावरील हावभाव, नजर, कपाळावरील आठ्या, याने संवाद पोचायला
सोपे जाते. संवाद हि एक कला आहे. बोलतात सगळेच, पण एखाद्याचे बोलणे लक्षात राहते,
काळजाला भिडते, त्याचा परिणाम कायमस्वरूपी राहू शकतो. शब्दोच्चार, शब्दफेक प्रभावी
करायचे कसब कमावता येते. देवाने तोंड दिले म्हणून कायम उघडलेच पाहिजे असे नाही.
संवाद उत्तम साधायचा असेल, तर तोंड बंद ठेवून श्रावणभक्ती केलीच पाहिजे. नुसते
ऐकूनहि भागत नाही, तर त्याचा अर्थ समजून, विचार पूर्वक बोलणे जमले, कि संवाद
परिणामकारक होतो. वैयक्तिक, व्यावसायिक जीवनात संवाद कौशल्य असेलेली व्यक्ती
प्रभावी ठरते. जिंकून घेते. संवाद कौशल्य अंगी बाणवले पाहिजे. आपल्या आवाजाचा पोत,
चढउतार, उंची खोली, शब्दोच्चार, शब्दप्रयोग, शब्दसाठा, शब्दार्थ, व्याकरण, तसेच आपण बोलतो तेंव्हाच वेग, दुसऱ्याचे ऐकून
घ्यायची इच्छा आणि कृती अशा अनेक गोष्टींवर संवाद होत राहतो. त्यावर व्यक्तिमत्व
अवलंबून असते, त्यानेच माणूस पारखला जातो. आजचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने
स्वत:चा प्रभाव, इंप्रेशन पाडता आला पाहिजे. बरं, ते फक्त मुलाखती पुरते कामाचे
नको, तर कायम टिकविता आले पाहिजे. त्यासाठी संवाद्कौशल्य हवेच..
संवादाला माध्यम हवेच का? ध्वनिलहरी
पोचविणारी हवा असतेच सगळीकडे. वेगळे माध्यम नसताना संवाद होतोच. समोर समोर केलेला संवाद आतपर्यंत
भिडतो, चेहरा वाचता येतो. वर्षानुवर्षे संवादाबरोबर चेहरा लक्षात राहतो. ‘तेंव्हा
आजोबांच्या केव्हढया मिशा होत्या?’ ‘ तिने कुठली साडी नेसली होती?’ ‘ त्याने
घातलेला शर्ट, भेटीची जागा, गप्पा मारल्या ते हॉटेल, खाल्लेले पदार्थ,”... असा
सगळा बाडबिस्तरा प्रत्यक्ष संवादाला चिकटलेला असल्याने ते स्मरणात खूप काळ रहातात.
सांगितलेले , ऐकलेले, बोललेले त्यावर
विचार होतो. याच समोरासमोरच्या संवादाला ग्रहण लागेल अशी भीती निर्माण होताना
जाणवते. अर्थात, असा संवाद कधीही संपणार नाही, काही नाती त्या शिवाय जगूच शकत
नाहीत. त्यामध्ये खुल्लमखुल्ला संवाद होतोच, कधी गोड, कधी कडू. पण, सर्वसाधारण
समाजात मोकळा संवाद कमी व्हायला लागला म्हणायला पुष्टी देता येईल. वातावरणातील बदल
अनेकांना जाणवतो. याला ग्राहणापुर्वीचे
वेध म्हणूयात.
ग्रहण, वेध, नाते, आणि
संवाद... म्हणजे नक्की काय आणि कसे?
नात्यांमध्ये विनाकारण संवाद कमीकमी होत जातो. विचारले, तर एकमेकांवर ढकलाढकली होतेच. “ तो येत नाही, मग, आपणच कशाला
जा उगीच त्याला डिस्टर्ब करायला? आपलं काय नडलंय? ” नाराजीची पुस्ती जोडून भेट
टाळली जाते. तेंव्हा, दुसरा सुद्धा असेच काहीतरी बोलतो. “ मीच का आधी?” ही भावना
अहं पोसू पाहते आणि पायात बेड्या कधी घालते समजत नाही. आठवण दोघानाही येत असते,
फक्त फोफावत जातो अहं. माघार कोणी घ्यायची, याला उत्तर नसते. कारण काही झालेलं
नसताना विचित्र घडते. त्याचीही सवय होते. अचानक कोणाच्या बारशाला नाहीतर बराव्याला
भेटल्यावर वरवर चौकशी करून शब्द गोठतात. उरते, कधीतरी चाकोरीतले भेटणे, भेटू यात
आश्वासन देणे, कारणमीमांसा आणि स्पष्टीकरण. आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या. अंतर
मात्र वाढलेले असते.
काही काही माणसे, हे
टाळण्यासाठी विशेष काळजी घेतात. पडदा टाकायचा त्यांचा प्रयत्न असतो. दुसऱ्या
व्यक्तीने प्रतिसाद दिला नाही तरीही काहीजण लोचाटासारखे मधूनमधून फोन करतील, जावून
भेटतील. पण दुसर्याने पूर्णच टाळाटाळ केल्यावर काय करणार? विचारल्यास, उत्तर
मिळेलच याची खात्री नाहीच. पुन्हापुन्हा चौकशी होते, अगदी तुटू नये भावनेतून. अखेर
संवाद अशक्त होत जातो, आणि क्षीण अवस्थेत काय संबंध फुलणार, काय नाते टिकून
राहणार? जाऊ देत, तेव्हढाच ऋणानुबंध दोघांचा अशी समजूत पूर्णविराम देते.
पण, मी म्हणते, संवादासाठी
नाते हवेच का? अपरिचित व्यक्तीशी संवाद साधल्यावर तेच परिचित व्यक्ती होते. एक माणूस
आपल्या संग्रही येतो. माणसांचा मोठा ताफा असणे श्रीमंतीचे लक्षण नव्हे काय?
दुकानदार, रिक्षावाले, बस स्टोपवर भेटणारे, नेहमीच्या परिसरातले, कारणानिमित्ताने दिसणारे, तरीही
अपरिचित लोकं खूप असतात आपल्या अवतीभवती. त्यांना कायमच अपरिचित म्हणायचे का? ओळख
करून घेतली तर बिघडले कुठे? थोडंस
बोलल्याने काय बिघडते? पण एक फॅशन आहे आजकाल, अनोळख्या माणसाशी बोलायचे
नाही. एसटीत पाटी असते, ‘अपरिचित व्यक्तीने काही खायला दिल्यास घेऊ नका.’ याचा
अर्थ, तुमच्या डोळ्या देखत शेजारच्याने गाडीवरून केळी घेतली, तुम्हाला एक दिले, तर
ते घ्यायचे नाही का? सगळीकडे शंकेखोर डोळे वावरताना भासतात. लुच्चेच दिसतात सगळे
नजरेला. असे तितकेसे बरोबर वाटत नाही. असेल कधीतरी कोणाला लुच्चालफंगा भेटलेला,
म्हणून समोरची प्रत्येक व्यक्ती चोर नालायक नसतेच. एखाद्यावर विश्वास टाकताना
घ्यायची काळजी जरा जास्तच घेतली जाते, एव्हढे मात्र खरं. आजकाल जगात वावरायचा तो
नियम होऊ पाहत आहे. हेच खटकते. वाईट लोके कमी असतात, पण त्यांचाच बोभाटा होतो, आणि
सर्व सामान्य समाज भीतीने वावरतो. चांगले अनुभव येतातच अनेकांना अनेक वेळा. रोज
रोज तीच माणसे त्याचं लोकलने त्याच डब्यात बसून त्याच स्टेशनवर चढतात आणि दुस-या एका स्टेशनवर उतरतात. अशा सहप्रवाशांची मस्त
मैत्री होते. एखादा दुसरा आला नाही, तर लगेच मोबाईल येतोच हातात.
आईवडील दोघेही कामानिमित्त
बाहेर, घरात आजीआजोबा असतील नसतील घरात. मुले शाळेतून येतात, जेवतात, अभ्यास
करतात. शेजारच्याच फ्ल्याटमध्ये दोघेजण वयस्कर राहत असतात. ते मुद्दाम दररोज या
मुलांकडे थोड्यावेळ बोलायला येतात. गप्पा होतात, गोष्टी अनुभव सांगून त्यांची
चांगली गट्टी होते. कधी आजी खायला करतात आणि मुलांना आणतात वाटीभर. तो चहा बनवतो आजीआजोबांसाठी.
वेगळे संस्कार मिळतात, अनुभवातून शिकायला मिळतं मुलांना. जातायेता मुले काय हवे,
काय आणू विचार पूस करू लागतात. संवाद केल्याने एक नात्याचा पूल सहज बांधला जातो.
मुलांना आपली जबाबदारी यांच्याप्रती सुद्धा आहे हि जाणीव होऊ लागते. त्याबरोबर एक जबाबदार व्यक्ती होण्याच्या वाट
फुलू लागते. मुले सुसंस्कारित होतात. त्यांच्या आईबाबानाही आनंद होतो. हे नक्कीच
सुचिन्ह आहे. असेच जर सगळ्या सोसायट्यांमध्ये घडू लागले तर शेजारच्या घरातला
सुस्थितीत वाढणारा तरुण रेव्ह पार्टीत आढळणार नाही. आणि मुलगी वाकडे पावूल पडताना
अडखळेल. काय हरकत आहे, जरा जेष्ठ लोकांनी आजूबाजूच्या तरुणाईशी संवाद साधायला? तरुणांनीसुद्धा मोठ्या लोकांकडून
काहीतरी शिकावं. आजूबाजूला अत्यंत उच्च पदभार सांभाळणारी, ज्ञानी, अभ्यासू लोक
असतात, त्यांच्याकडे जाऊन आपलाच फायदा करून घेणारी तरुणाई दिसत नाही. नक्कीच
बदलतात येईल हे चित्र संवादामार्फत.
असा हा संवाद, आणि त्याची
करामत, गुंतागुंत. शब्दांची उधळण, एकमेकांच्या भावनांची कदर, नात्यांची जपणूक,
धडपड, हे सारे काही प्रत्येकाला हवेच असते. तरीपण, का बर उगीच आढेवेढे घ्यावेत? फुकटचा आगाऊपणा
करावा? नखरे आणि शिष्ठपणा यालाच म्हणतात. शब्दांचे दुर्भिक्ष, संवादाचा अभाव आणि
त्याने होणारी मनाची कुचंबणा अनुभवलेली असते कधी ना कधीतरी प्रत्येकाने. पण या
अनुभवातून शिकतात थोडेच. शिकतात, तेच आघात
आणि दु:ख विसरू शकतात. त्याला कारण एकच.
“नात्यांमधला दुरावा
जोडायला
बांधावे लागतात शब्दपूल
त्याचं महत्व त्यांनाच
समजतं
ज्यांना दुराव्यानं केलं
असतं दूर...”.
वंदना धर्माधिकारी
मोबाईल : ९८९०६२३९१५
छान लेख 👍👌
ReplyDeleteनातं रुजायला भावना हवी, नातं फुलायला ओलावा हवा,
ReplyDeleteनातं टिकायला संवाद हवा, आणि नात्याचा आनंदोत्सव साजरा करायला एकत्र सहवास हवा....छान.
हे कसं असतं, हे असं : रोपं लावायला माती हवी, तिथे रुजायला पाणी हवं उंच वाढायला ऊन हवं, आणि आनंदाने डोलायला वारा हवा.
ReplyDeleteतसचं अगदी तस्सचं....धन्यवाद!