Sunday, November 23, 2014

66. Diwali - Chintan Aadesh - फजिती - कर सारं साफ





23-11-2014

चिंतन आदेश – फजिती विशेषांक – २०१४
लेखिका : सौ.वंदना विजय धर्माधिकारी


पक्षांच्या किलकिलाटाने मला जाग आली. तशी डोळे चोळतच उठले. खिडकीच्या फटीतून बाहेर पाहिलं, तसं पूर्ण उजाडलं नव्हत. पण झोप पूर्ण झाल्याच्या समाधानाने उठवलचं  मला. उठून बसते तोच, मी जीवंत आहे याची जाणीव झाली. स्वप्न तर नव्हे ना हे. माझेच मला पडले कोडे? म्हणजे काल मला कोणी मारलं नाही. ना खून, ना दरोडा, कोणी चोर पण नव्हता का आला? मग ते दारावर धडका देणं. कोण होत? पुन्हा जरा रात्रीची भीती अंगावर आली. आणि दूर फेकलेलं पांघरून ओढून घेतलं. उजाडल्याशिवाय घरातला दिवा लावायलाच नको. कोणी लपून बसलं असेल बागेत तर, मागच्या दारामागे असेल तर, खरं तर बाथरुमला जायची इच्छा झालेली. काय करू? दिवा न लावता जायचं ठरवलं, आणि अंदाजपंचे जाऊन आले. तसे या घरात राहून तीनच महिने झाले होते. आणि आता या बंगल्यात एकटी राहून मोजून पाच दिवस झाले. सोमवारी तर आले संध्याकाळी आणि आज शनिवार. शनिवार म्हणताच मन घराकडे धावलं. क्षणार्धात पुण्यात कोथरूडला पोचलं देखील. भराभरा आवरलं पाहिजेच याचे भानही झाले. आज बँकेत लवकर जावं, कालचं  पडलेलं काम उरकायलाच हवं. तरचं दुपारची अडीचची गाडी पकडता येईल. एस.टी.च्या वेगाने मन पळत होतं. तशी उठलेच, आणि पाहते तो चक्क उन्ह आलं होतं. म्हंटल, ‘चला, लाईट न लावता, नक्कीच आवरता येईल.’

मी बँकेत नोकरी करीत होते. माझी बदली झाली सोलापूरला. तशी मी नाराज वगैरे अजिबातच नव्हते. सोलापूरला आमच्या नात्यातल्या एक आजी एकट्याच बंगल्यात राहायच्या. त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला आणि गेले त्यांच्याघरी. आमचं दोघींचं मस्त जमायचं.  माझी तर सोय चांगली झालेली, आणि आजीना पण आवडलं माझं तिथे राहणं. तसे दोन अडीच महिने होत नाहीत तोच काही कारणाने आजीनी  पुण्याला  लेकाकडे यायचं ठरलं.  मला किल्ली देवून, कुठे काय आहे हे सांगून माझ्याच बरोबर पुण्याला त्यांना मी घेऊन आले आधीच्या शनिवारी दुपारी.

आजी राहिल्या पुण्यात पण सोमवारी सकाळी पाचच्या गाडीने मला सोलापूरला जावेच लागले. परस्पर बँक, दिवसभर काम आणि पार संध्याकाळी सहा वाजता दुध आणि ब्रेड घेऊन बंगल्याचे मागले दाराने मी आत प्रवेश केला. आतून कुलूपच लावले. पुढच्या दाराला बाहेरून लावले होते. कोणाला वाटेल, आत कोणीच नाही. बाहेरच्या मुख्य दरवाजातून आत आल्यावर एक छोटीशी पडवी होती. फक्त दोन खुर्च्या, आणि थोडी अडगळ अशी लहानशी जागा. तिथेच चप्पल काढून आत हॉल मध्ये प्रवेश व्हायचा. आजींच्या सांगण्यावरून पडवी आणि हॉल मधले दारही वरची-खालची कडी लावून बंद केलेले. जर मागच्याच दाराने यायचे तर कशाला इकडून पडवीत जा, आणि बाहेर अंगणात. हॉलमधेच कॉटवर मी झोपायची. पलीकडे दोन बेडरूम्स होत्या. पण मी आणि आजी आम्ही दोघीही हॉलमध्येच झोपायचो. तसंच करायचं मी ठरवलं. सोमवारी भल्या पहाटे उठून सोलापूरला आले आणि दिवसभराचा थकला भाकला देह आठ वाजताच पडला.


नेहमीप्रमाणे मंगळवारी उठले, आवरले, बँकेत गेले. तिथूनच पुढे दोन दिवस मी मैत्रिणीकडे राहिले. गुरवारी मात्र बंगल्यावर झोपले. एकटी. फार काही करायचे नसायचेच. त्यामुळे बहुधा रात्री दहा म्हणजे माझी मध्यरात्र असायची. कुठे धावतपळत चार दिवस गेले समजले सुद्धा नसेल मला.  शुक्रवारी मात्र रात्री उशीर झाला, तो फोनवरील गप्पांमुळे. सोलापूरच्याच परिचयाच्या एकीचा फोन आला, आणि गप्पांना उत आला. झालं, मला जेवण करून झोपायला साडेनऊ वाजून गेले. शिवाय एक भाकरी करण्यात वेळ गेला. पण पटकन डोळा काही लागला नाही. नलूताईंच्या गप्पाच आठवतं कूस बदलत होते झालं. अचानक दारावर टकटक वाजलं. आधी वाटलं रस्त्यावर असेल कसलातरी आवाज. पण नाही, तो आमच्याच दाराचा आवाज होता. मी उठणं, कोण आहे म्हणून विचारणं शक्यच नव्हतं. तसे घरातले लाईट बंद करूनही अर्धा तास झाला असेल. बहुधा सव्वादहा वाजले असतील. आज विचार केला तर तसा फार उशीर नव्हता झालेला. १५/१६ वर्षापूर्वीचा काळ. तेंव्हा त्या भागात सामसूम लवकर व्हायची, टीव्हि बिघडलेला होता. त्यामुळे, झोपाळू मी लवकरच झोपायची. असं होतं, पण त्या दिवशी, काहीतरी आवाज जोरजोरात येऊ लागला. काय करावं?

एकदम मागच्या बंगल्यातल्या जोशी काकू आठवल्या. आजींनी  जाताना मला सांगितलं होतं, “काही लागलं तर जोशी काकूंकडे जा. वाटलं तर त्यांच्या निशाला झोपायला बोलवा.” पण, मीच खूप धिटाईने म्हंटल होतं, “नको, मला नाही भीती वाटतं, झोपेन मी एकटी.” तशा जोशी काकू सुद्धा दोनदा येऊन माझी चौकशी करून गेल्या होत्या. आणि ही दारावरची थाप, आवाज वाढतच गेला. ठरवलं, काही झालं तरी दार उघडायचं नाही. पांघरून घेतलं डोक्यावरून, तरी आवाज येतचं होता. रामरक्षा म्हणायला सुरवात केली. संध्याकाळी देवापुढे दिवा लावायचा राहिला होता. म्हणा, आजींच्या घरात मी पाहुणी, कशाला असल्या गोष्टी करा. पण सवय होती ना, तिन्हीसांजा दिवा लावायची. म्हणून एकदोनदा लावला इतकेच. पण नेमकी त्या दिवशी विसरले, आणि रामरक्षा चुकली. तोच तोच श्लोक पुन्हापुन्हा म्हंटला जातोय हे लक्षात आलं. बाहेर आवाज येतच होता. बरोबर चूक रामरक्षा म्हणता म्हणता कधी झोप लागली कळलेच नाही. जाग आली ती एकदम सहा वाजता तीही पक्षांच्या किलबिलने.

शनिवार अर्धा दिवस म्हणजे बँकेत ही गर्दी. याच दिवशी सगळ्यांना पैसे काढण्यासकट इतर सारी बँकेतील कामे आठवतात. सारखं घड्याळाकडे लक्ष जात होते. तसं सामान काहीच नसतं पुण्याला जाताना. एक पर्स उचलायची आणि रिक्षाने एस टी स्टँड गाठायचा. दुपारच्या अडीचच्या गाडीचा ड्रायव्हर कंडक्टर नेहमी तेच असायचे. बँकेतल्या बाईंची जागा देखील ठरलेली असायची. एकदा मला उशीर झाला, तर गाडी दहा मिनिटे उशिरा सोडली होती. शक्यतो मी वेळेत यायचीच. त्या दिवशी रिक्षाच मिळाली नाही मला, आणि आमच्याच बँकेतील एकाने मला सोडले ते देखील पलीकडच्या चौकात, म्हणून उशीर झाला. या शनिवारी असा कामाचा सपाटा मारला, आणि बरोबर वेळेवर गाडीत बसले. केलं हुश्श! मस्त झोप लागली.
जाग आल्यावर कंटाळवाणा लांबलचक प्रवास, शेवटास तो तासाभराचा हडपसर ते स्वारगेट प्रवास. पुढे कोथरूडला रिक्षा करीत स्वारी रात्री मुक्कामाला घरी आली. घरच्यांची ख्यालीखुशाली, आलंगेलं, बाईचं रिपोर्टिंग, उद्याचे कार्यक्रम, पुढच्या आठवड्याची सर्वतोपरी बेगमी करताकरता सारंकाही आवरण्यात रविवारही गेला, आणि नेहमीप्रमाणे सोमवारी पहाटेच्या गाडीने बाईसाहेब चाटी गल्लीतल्या बँकेत आल्या. न येऊन सांगता कोणाला?

दोन दिवस शुक्रवारची टकटक डोक्यातही वाजायची मध्येमध्ये. पण घरी कोणाजवळ बोललेच नाही. तसा वेळही मिळाला नाही. बघू गेल्यावर, झालं असेल काहीतरी. नाहीतर माझेच मनाचे खेळ असतील. कधीच एकटी राहिले नव्हते. दिवसा काही वाटायचे नाही एकटी असले तरी. वेळ जायचा कामात. पण एकटीने राहणं ते देखील पाच खोल्यांच्या बंगल्यात, ते ही दुसऱ्याच्या घरात, आणि ते सुद्धा सोलापूरला. की जेथे बँक ते घर इतकाच रस्ता मला माहित असलेल्या गावात. म्हणूनही असेल भीती वाटली. पण पुण्यात घरी काहीच बोलले नाही.

सोमवार ते सोमवार गेला. त्यारात्री मेल्यागत पडले होते. मंगळवारी मात्र ठरवलंच, पडवीतं जायचंच. उठल्या उठल्या मधलं दार उघडलं आणि मला ब्रम्हांड दिसलं. बापरे, काय हे... कसं करायचं...शी... म्हणून मस्त एक हासडली आजींच्या लाडक्या मांजरीला. मला मांजर अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही. आजींना मात्र भयानक प्यारी. तिने मस्त चार पाच कि पूर्ण आठवडा तिथे सर्व विधी केले होते. पार खुर्चीचे कव्हर, ते दारातले पायपुसणे, सर्वत्र त्या मांजरीचे जुलाब ओघळ तेही वाळलेले. तीच दारावर नखाने टकटक करीत असणार. माझी खात्री झाली. इतका कडेकोट बंदोबस्त केला असताना ही आलीच कशी आत? पाहते तो खिडकीची एक काच आधीच तुटलेली होती. पडद्यामागे मी कशाला बघते? तो पडदा देखील किती दिवसात कोणी सारला नसेल. गोऱ्याघाऱ्या मनीने बरोबर शोधून काढला मोकळा चौकोन आणि केला आत मुक्काम. नुसती झोपली असती, तर माझी तळपायाची मस्तकात गेली नसती. ही गलिच्छ घाण आता मला काढावी लागणार होती. कामवाली बाई सांगून गेली होती गावाला. म्हणजे, अजून चार दिवस हे असेच ठेवायचे. दुर्गंधी पसरलेली खरं तर रात्रीच जाणवली होती, पण दमले होते इतकी, की दोन केळी खावून क्षणार्धात झोपले. ओकारी येता येता... खराटा, बाटली, पाणी, केरभरणी, खरडायला एक पत्राही मिळाला. सगळी आयुध आणली. केली सुरवात. काही भाग तर पूर्ण कडक वाळलेला. बाहेरचे दार उघडून पाणी बाहेर ढकलावे असं वाटलं, पण तिथपर्यंत जाण्याची हिम्मत नाही केली. जमेल तेव्हढे केले साफ. चक्क अर्धी बदली पाणी ओतून ठेवले. संध्याकाळी तासभर तरी द्यायलाच हवा यासाठी असे म्हणून त्या खिडकीचा बंदोबस्त करायला लागले. रद्दी, जुना पाट, दोरी, शोधून आणली.  खिडकी बंद केली. कोपऱ्यात एक जुनी मोडकी बॅट सापडली. ती पुन्हा पाटाला टेकून खुर्चीच्या वर घट्ट बांधली. काय सांगा, तिने पाट ढकलला आणि आत आली तर.... कल्पनेनेच कसंतरी झालं.

आत जावून मी उलटीच केली. आर्धा पाऊण तास साफसफाईचे काम करीत होते. डोकं गरगरायला लागलं. उठल्यावर चहा सुद्धा घेतला नव्हता, आणि हे भयानक  दिव्य करीत बसले. करायलाच हवे होते. पुन्हा पडवीत पूर्ण बंदोबस्त केल्याची खात्री करून घेतली, आणि मग प्रथम आंघोळ आणि नंतर चहा. बँकेची वेळ झालीच इतके करेस्तोवर. मग काय  न खाताच बँकेत. घरात खायला गेलेच नसते त्यादिवशी मला. तसं बँकेजवळच्या हॉटेल मध्ये बऱ्यापैकी मिळायचं. खायचे नखरे करणारी मी त्यावरही खुश असायची.

संध्याकाळी घरी आले, ते येतानाच एका ठिकाणी थांबून खावून नंतरच. आत घमघमाट सुटला होता. सगळ्या खिडक्या उघडल्या, आणि सर्व म्हणजे पाच खोल्यांमधले पंखे जोरात लावले. एकीकडे त्यातल्या त्यात जुना झालेला गाऊन घातला, तेंव्हा  पंजाबीची पद्धत नव्हतीच आजच्या सारखी. आयुधं काढलेलीच होती सकाळी. सुरु केलं महान काम. पत्र्याने खरवडलं, ओलं झाल्याने निघालं तरी. बादलीत भरलं मागल्या दारी पार कोपऱ्यातल्या झाडाच्या बुंध्याला ओतलं. असे चार हेलपाटे मारले. बऱ्यापैकी साफ झालेले वाटले,  पण पूर्ववत नव्हेच. पुन्हा अर्धी बादली ओतली. पडले अंथरुणावर तेव्हड्यात आलीच महामाया. टकटक, खडखड करीत होती. पण, तिला आत येता  आलेच नाही. मी एकदम पक्का बंदोबस्त केला होता. पडवी आणि हॉलच्यामध्ये एक छोटीशी खिडकी होती. माझे डोळे तिला चिकटलेले. बॅट पडत तर नाही ना यावर लक्ष. थोडीशी हालली. पाट सरकतोय असे वाटले. मनूभवानी  दमली, आणि निघून गेली. पुन्हा पडवीत गेले. आतल्या बेडरूम मध्ये गाडीची एक वळकटी होती. ती आणली बाहेर. खुर्चीवर उभी ठेवली आणि जबरदस्त पक्केपणाने खिडकी बंद केली. नंतर मात्र गाढ झोपले. असे ओळीने पाच दिवस, म्हणजे मंगळवार सकाळ ते शनिवार सकाळ तोच कार्यक्रम करीत दिवस गेले. पुन्हा पुणे, सोमवारी सोलापूर.

त्या दिवशी बयाबाई मांजरीची थाप मागच्या दारी यायला लागली. माझे अंगावर काटाच आला. तिकडे काही उद्योग केला तिने तर. सकाळी उठून बघते, तो मांजर मागच्या अंगणात पलीकडे, भिंतीला लागून झोपली होती. असं वाटलं दगड घालावा तिच्या डोक्यात, पण आजी आठवल्या. त्यांचे ते मनुचे लाड आठवले. अजून माझी ट्रान्सफर पुण्याला झाली नव्हती. काही दिवस मला आजींच्या बरोबर त्याच बंगल्यावर राहावे लागणार होते. आजी कधी येतील असे वाटत होते. तोपर्यंत या मांजरीने माझी फार जिरवली होती. आजींच्या पाठोपाठ ती सतत असायची, पण, तिला आत यायला मज्जाव मी केला होता. तशी एखादेवेळेस आली असती, तर मीही बसले असते तिच्याशी खेळतं. पण, छे, हा पडवीतला प्रकार निस्तारल्यावर तिला बंगल्याच्या कम्पाउंड मध्ये येऊ देत होते इतकेच माझ्या दृष्टीने खूप होते. मला मांजर आवडायची नाही. सुरवातीला तिने माझ्याशी अंगलट केली. मी दूर ढकललं, लवकरच  तिला समजलं इथे आपली डाळ शिजणार नाही हे. ती माझ्याकडे येईनाशी झाली होती. मलाही हायसं वाटलं. तीच मनी माऊ माझी अशी त्रेधा तिरपीट करून मला कामाला लावेल, माझी चांगली जीरवेल असे मला अजिबात म्हणजे अजिबात वाटले नाही. दोन महिन्यात तिला एकदाही मी घरात येऊ दिले नव्हते.
तसे भराभर गेले दोन महिने आणि आजी आल्या सोलापूरला.  त्यांना मी हे सांगतलं खरं. तरं आजींनी तिलाच जवळ घेतलं, कुरवाळलं आणि म्हणाल्या, “ दोन महिन्यात घरात आली नाही गं माझी बाय. अशी जिरवलीस तू हिची. असू दे हं. हे घ्या. दुदू दुदू.... या या मांडीवर.”....मी जवळच बसले होते. मनी मांडीवर लोळत माझ्याकडे तिरक्या नजरेने बघत होती,  हळूच हासत होती. मी देखील तिच्याच कडे एकटक बघत बसले. डोळे मी वटारले नाहीत. मनी मला म्हणाली, “कशी जिरवली तुझी. मस्त फजिती केली की नाही. मागल्या दारी पण तसंच करणार होते. पण, म्हंटल, जाऊ देत. पाहुणी आहे. सोडून देऊ यात. माझा रागराग करतेस काय? कर सारं साफ.”

वंदना धर्माधिकारी
Vandana10d@yahoo.co.in  ::  मोबाईल : ९८९०६२३९१५.



3 comments:

  1. छान वाटणार तुम्हाला. खरं खरं आहे हे. मला साफ करावं लागलं त्याचे काय? काय ती मनी... शी....
    धन्यवाद!

    ReplyDelete
  2. चांगलीच फजिती केली तुमची. पण एकट्या रहातं होतात मोठ्या बंगल्यात? कठीण धावपळीचे दिवस असतील.

    ReplyDelete

Camera is a responsive/adaptive slideshow. Try to resize the browser window
It uses a light version of jQuery mobile, navigate the slides by swiping with your fingers
It's completely free (even though a donation is appreciated)
Camera slideshow provides many options to customize your project as more as possible

Here is a video for National Webinar on IBPS Exam. Guidance by Smt.Vandana Dharmadhikari on 17th July, 2020 

vandanadharmadhikari.blogspot.com