Friday, March 8, 2019

90 Women's day 8th March 2019



महिला दिन विशेष अतिथी - एन के जी एस बी बैंक, कोथरुड शाखा. 


दैनिक देशोन्नती : लेखमाला अर्थसंस्कार : लेखांक ९० : कर्तव्य अणि हक्कांची सांगड :
शुक्रवार  ८ मार्च, २०१९.


एनकेजीएसबी बैंक मॅनेजर सोबत



सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पद्मश्री  : महिला दिन कार्यक्रम :  एम् कॉम विद्यार्थ्यांना लेक्चर :
विषय : महिलांसाठी शासकीय योजना : उल्लेखनीय : एमएसएमई सपोर्ट





 पुणे विद्यापीठात लेक्चर  देताना  : ८ मार्च,२०१९



अगं सखे,

आपला मानाचा कौतुकाचा महिला दिन करू यात आपण साजरा. एखादा दिवस ठेवून दे तू स्वत:साठी. मैत्रिणींच्या घोळक्यात खिदळण्यासाठी, हसता हसता फुलण्यासाठी. तुझा जन्म फुलण्यासाठी आहे, हे तू विसरलीस की काय? खरं आहे ते, कामाच्या जबाबदाऱ्याच्या ओझ्याखाली तू स्वत:कडे बघतेस कोठे? नाही ना जमतं तुला ते? असं म्हणून कसं चालेल. अगं, तू खूष आनंदी तर तुझं सगळं घर हसेल, नटेल, मजेत राहील. आणि तू जर नाराज तर सांग मला घरात काय होतं. भांड्याला भांड लागतं हे मलाही माहित आहे, पण म्हणून नेहमीच का त्या भांड्यांना भांडू द्यायचं. त्यावर तोडगा काढायची हिम्मत आहे तुझ्यात, ताकद नुसती कष्टाने मनगटात नसते, खंबीर व्हायला आजचा दिवस तुझ्यासाठी    आहे हे तरी विसरू नकोस.

हळूहळू तिला समज यायला लागली स्वत:च्या हक्कांची. सगळीकडे सध्या महिला दिन दणक्यात साजरा होऊ लागला. थोडं इकडे तिकडे बघितल्यावर बदल होताना दिसतो, समाजात महिलांना मान मिळायला लागला आहे. तिच्यातल्या माणूसपणाची ओळख तोही ओळखू लागला, आणि नसेल त्याला त्याची जाणीव तर तीही शहाणी होऊन त्याला त्याची जागा दाखवू लागली. त्यातं काय व कसे हेही तिला समजू लागले. बायका सुधारित आहेत, यात समाजाला गती दिली जाते, प्रगती होते, समाजाची उंची वाढते हे आलेच आहे लक्षात सगळ्यांच्या. असे हे स्थित्यंतर हळू हळू होणारी प्रोसेस आहे. त्याला अधिक गतिमान केले पाहिजे. सकारात्मक  विस्तार  वाढवला पाहिजे. खेड्यापाड्यातली परिस्थिती अजूनही जुनाट वळणाची असायची शक्यता धूसर होताना खूप ठिकाणी जाणवते. तेथील महिलांची हिम्मत, ताकद आणि स्वत्व जपायची जिद्द खरोखरीच वाखाणण्याजोगी दिसते. प्रत्येक गावाचे चित्र वेगळेपण दर्शविते. त्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच. वाईट याचेच वाटते की याच कर्तबगार बायकांना गावात दारूबंदी करा असे फलक घेऊन रस्त्यावर यावे लागते. अशावेळी पुरुषोत्तम देशातले कधी सुधारणार? आपलेच गुणगान कौतुक कधी थांबवणार आणि खर्या अर्थाने माणूस कधी बनणार? यासाठी तिनेच  स्वत:ची जागा निर्माण केली पाहिजे. स्त्रीला फुकट सहज अहसा गोष्टी मिळत नाहीत, हे इतिहास सांगतो. तिला ते सर्व मिळवावे लागते, लढा द्यावा लागतो हक्कासाठी तरच तिला मिळते तिच्याच घरात एखादा हक्काचा कोपरा. देऊ केली जाते  मानाची जागा तिच्या घरी, दारी, मनी, गाभारी. याचसाठी बोलावते मी एकेकीला.

बायांनो, आपल्याला बदल घडवायचा आहे. परिवर्तन दीर्घकाळाची प्रक्रिया होऊ देण्यात स्त्रियांचेच नुकसान आहे. एकेक पिढी त्याच कामातच जर खपली तर कसे होईल? त्यासाठी महिलांनी अधिक जोमाने स्त्रीवर्गात आत्मभिमान रुजवायचा आहे,  बदल घडवून समाजपरिवर्तन करताना डगमगायचे सोडून दिले की सगळं काही छान जुळून येते. खटकते गं एक गोष्ट, सांगतेच, बाईचं बाईची वैरीण असते, ह्या वाक्यातही तथ्य आहेच. त्यामधील हवा काढून टाकायची आणि महिलांनीच एकमेकींचा पाठीशी उभं रहायचे. यालाच जोरात फिरवून गती द्यायची की मग  सगळ्यांच्या आयुष्यात चार चांद लागायला वेळ लागणार नाही.... शेवटी तुझे तुलाच सर्व करावे लागणार आहे, कोणीही तुझ्या समोर उभे राहून तुझ्या हातावर काही ठेवणार नाही.. तर उठ, हो पुढे आणि गोंजारून बघा  स्वत्व तुझ्यातलं. फार छान आहे ते. घे शेजारणीला बरोबर, आणि साद घाल साऱ्या सख्यांना..... तर.... फेर धरला येशील,ओठी गाणे गाशील....

चलं गं सये, महिलादिनी खेळाया
हक्काचा सुदिन साजरा कराया
आपुल्या जीवा कौतुकाचं गाणे गाया
धरूनी हातात हात मन मोकळं कराया
एकमेकी आधाराची साथ संगती द्याया...

किती जरी सांगितले, बोलावले, समजावले  तरी तिला जे रुचेल तेच ती करेल. हे मला ठावूक आहे. माझे हे वाचतील आणि पळतील कामाला. तरीही तिला सांगितल्या शिवाय मला राहवतं नाही हेही खरे. गदागदा हलवून तिला समजावले की मला बरे वाटते. त्यामुळे इथे एकच शेवटचे सांगते आणि थांबते. बाई गं, तुला आर्थिक व्यवहारांसाठी काही अडचण आली तर जिथे मिळेल तिथे, तू वाचीत रहा, त्यात माझी लेखणीही तुला कुठेतरी भेटेल. तुला समजेल असेही मी लिहिले आहे. आणि मी आहे ना तुला मार्गदर्शन करणारी. कधीही फोन करून बोलू शकतेस तू माझ्याशी. सांगीन मी मला जमेल तसे. एकेक करून खूप मोठा फेर धरायचा आहे आपल्या सगळ्या बायकांना. मध्यभागी ध्येय ठेवायचे अर्थसाक्षर होण्याचे.... तर... कोण कोण येणार फेर धरायला, महिला दिनी गाणे गायला.

सर्व महिला भगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि मी थांबते.


वंदना धर्माधिकारी
८ मार्च, २०१९


Friday, December 14, 2018

89. Marathi Sahitya Sammeln - 11,12,13 Jan.2019


मराठी साहित्य संमेलन, यवतमाळ, महाराष्ट्र, पुणे 








Saturday, December 8, 2018

88. Loksatta : Nisatalya Kshananche Zaad : Chaturang :





88. निसटलेल्या क्षणांचे झाड! : लोकसत्ता :चतुरंग पुरवणी : शनिवार : ८ डिसेंबर, २०१८ 








एखादी वस्तू हरवली तर ती शोधून काढता येते. वेळ लागतो शोधायला. असते अशीच कुठेतरी पडलेली, अडकून बसलेली. सापडल्यावर  खूप आनंद होतो कारण त्यात आपला अडकला असतो ना जीव. निर्जीव ज्याला आपण म्हणतो त्यातही आपला जिवंत जीवात्मा असा घट्ट अडकतो. तर मग, ना ज्याला आकार उकार रूप गंध अशा त्या क्षणाचे काय? कसे जातात कुठे तरी न सांगता सवरता, हळूच चोर पावलांनी आलो असं दाखवतात आणि लुप्त होतात. पटापट एकेक करीत कितीतरी क्षण घरंगळत जातात, निसटतात एकामागून एकेक. त्यांची लागलेली चुटपूट जीवघेणी असते. पुन्हा नाही भेटत ते, हळवं मन कासावीस होते क्षणिक त्याच्या अनुभूतीसाठी. पुसटशी जरी चाहूल लागली तरी जीव मोहरून उठतो हे मात्र अगदी खरं!

छोट्या छोट्या गोष्टी सरकन गळून जाव्यात, तसेच क्षण कधी निसटतात समजत नाही. हे हरवले, गेले, परत नाही येणार याची जाणीव मात्र अस्वस्थ करून सोडते. घड्याळाचे काटे उलटे फिरवता येत असते तर कित्ती छान झाले असते? नको तसेही. त्याने तर काळ पुढे गेलाच नसता. तसे बरोबर नाहीच. जे जे हवे जे मागे गेले त्याच्याच पाठी धावलो असतो आपण सगळेजण. म्हणूनच निसटलेले क्षण फक्त स्मरायचे असतात. आत खोलवर पडलेले असतात कायमचे  विसाव्याला आल्या सारखे. तरीपण काळाची पुटं चढतात त्यावर आणि त्यांची बोचणी हलकी होतं जाते. नाही मिळालं मला तेंव्हा तर नाही, काही बिघडलं नाही असं म्हणून मीच माझी समजूत घातली की नवीन काही हासील करायला जोर येतो.


नंतर गंमत होते. हेच कधीचे कुठले तरी जुने पुराणे सांडलेले, ओढून घेतलेले, निसटलेले ते एकेक करीत स्वप्नात येतात माझ्या. अगदी खरं... त्यात ‘आईने असे नाही करायचे, तसे नसते वागायचे, हेच असेच बरोबर ते चूक चूक चूकच अगदी बजावून सांगितलेले’ देखील आहेत. चिडलेली असते मी, तरी आई ऐकत नाही माझं, तिचं आपलं तेच असतं, नाही म्हणजे नाही... कधीतरी मी आणि आई दोघीच घरात असताना आई खूप काय सांगते, त्याने काय झालं,  काय होईल ... काहीबाही असतं सारं काही. त्यावयात फारसं समजायचं नाही. आईला आपली खूपखूप काळजी आहे, याची जाणीव व्हायची आणि मी आईला बिलगायची. मला पटायचं आईने सांगितलेलं आणि माझ्या नाकावरचा पुसला जायचा. हरवले काही क्षण आईमुळे पण आईचं ऐकायाचेच हेच बरोबर होतं. असू देत माझं असं. मला चालतं.


कधी मोठी झाले हे उंची मोजूनही मला नव्हतं समजलं. वरच्या वर्गात गेल्यावर लक्षात यायचं फळ्यावर लिहिताना हात वरपर्यंत पोचायला लागला ते. तिथेतर किती हरवलं सांडल होतं. शाळा अकरावी पर्यंत नंतर कॉलेज चार वर्षे. अगणित  निसटलेले एकेक क्षण येतात सामोरे. आता हसू येतं त्यांचे, पण त्या वेळी हवेसे वाटायचे. मी ते सगळे क्षण सुरवातीला एका कंपासपेटीत ठेवायची. पण 
ती लगेच भरली, मग घेतलं जुन दप्तर. लवकरच तेही लहान झालं. आमच्याकडे शेतावरचा आंबेमोहोर असायचा. त्याचं पोतं घेतलं  आणि कोंबले क्षणांना आत. पोत्याला भोकं होतं हे मी बघितलंच नाही. गेले बाई माझे क्षण हरवून. कुठे आठवतं बसू. दिलं त्यांना कायमचं सोडून. मारला दाभणाने टाका पोत्याला आणि एकेक करीत पोती टाकली माळ्यावर. माळाही भरला, आता काय करायचं या निसटलेल्यांचे? शिवाय मांडलेला संसार म्हंटल की माळ्यावर काय काय ठेवावं लागतं ते आधी नव्हतं ना माहित. तरीपण, त्यापेक्षा माझे सांडलेले क्षण मोलाचेच होते, तेंव्हाही आणि त्यातले काही आत्ताही. फरक इतकाच वाटतो, आता त्यांच्याकडे मी तिर्हाईताच्या नजरेतून बघू शकते. आतलं आंदोलन नाही उमटतं.


मी पडले की हो संसारात.  काय काय सोडलं देवालाच ठावूक. मिळवलं देखील भरपूर काही तरीही निसटणारे होतेच तिथे. काही हळवे, काही रडके, काही ह्यांचे काही इतरांचे. घरचे दारचे, पाळणाघरातले देखील, काय सांगू कित्येक क्षण बस मधले देखील आहेत. बस नाही मिळाली तर काय व्हायचं लेटमार्क!  त्याचे नकोत का टिपलेले क्षण. गाडी घेऊन किक मारल्यावर भरधाव पळतानाचे सिग्नलवर दिसलेले, कोणीतरी मागून पुढे गेलेले, जाताना कानाजवळ जोरात शिट्टी मारलेले. खूप खूप आहेत ठेवलेले.  आई झाल्यावर खुलली कळी आणि सारं काही छान छान वाटू लागलं. गणपती बाप्पाचे  विसर्जन करता करता गेलेले क्षणही दिले मुळामुठा अर्पण. आता तर नातवंड खेळतात मांडीवर तेंव्हा कशाच्च काहीच वाटतं नाही. ह्यालाच वय वाढलं म्हणावं का? मोठ्ठ घर घेतलं तरी पोत्यांनी माळे भरले गेलेच. तरी बरं प्रत्येक खोलीत माळे आहेत माझ्या घरात.


हल्ली, बिल्डर्स नाही काढतं माळे. कारण काय, तर ते  अडगळीचे नकोच ठेवायला, त्यापेक्षा मस्त इंटिरियर करून घ्या. बिल्डर माणूसच असतो, त्याला कसे माहित नाही हे गुपित माळ्यांच? कोणीतरी मागतं असेलचं की ही असली ठेव ठेवायला मला मोठ्ठा माळा हवाच म्हणून. अशावेळी, जास्त पैसे मागितले की होते पंचाईत. घर घेणे सोपे थोडेच असते, शिवाय त्यात माळा मागितला तर हजारो जास्तीचे द्यायचे. त्यापेक्षा माळ्यावर टाकायचं ते देऊ यात नदीत सोडून. होतं असं देखील कधीकधी कोणाच्यातरी बाबतीत. मला तर वाटतं, हल्ली माळे नसलेली घरेच वाढतं चालली, म्हणूनही असेल की लोकं तुटक वागायला लागली. मोठ्ठ गाठोडेच फेकलं पाण्यात असेच वाटते. वाड्यासारखी नाही राहिली, जुन्या सोसायटीत देखील माळे असायचे, सावली होती वाड्यासारखी तिथेही. अजूनही आहे, लागते ना सगळ्यांना मधूनमधून. पण आता तेही नाहीत, म्हंटल्यावर काय होणार? एक माझी शंका अशीही.

धो धो कोसळतात हेच निसटलेले निसरड्या मनातून खाली. मी एकटी असते, मस्त मूड असतो तेंव्हाही येतात, आणि मी नाराज असते त्यावेळेला देखील डोकावतात हळूच. यायचं असतं पुढे हेच खरं. बोलवायला का लागतं त्यांना. आतल्या खोलीतल्या दाराच्या आडून हॉलमध्ये नाहीतर ओट्यापाशी मी असेल तिथे वाकून बघायची सवयच असते त्यांना. जित्याची सवय मोडता येत नाही, तर मग यांची ती मी काय मोडणार? एखादं झाडं तयार करावं याच निसटलेल्या क्षणाच असं मनात आलं. त्याच रात्री घराच्या गच्चीवर भला मोठा चौकोनी वाफा करून झाड करायला लागले. मी एकटीच हं, नको मला कोणाची लुडबुड. फक्त माझे हरवलेले क्षण तिथे लावणार, इतरांना काय त्याचे?  कितीही वाढू देत त्यांची उंची, कोणी काही म्हणणार नाही की जागा मोकळी करून दे असा दट्ट्या लावणार नाही. आठवून आठवून अशा निसटलेल्यांना लटकवल की मी तिथे, गच्चीवरील झाडावर.  मोठमोठ्या झुंबरांना कसे रंगीबेरंगी लोलक लटकवतात ना तसेच लोंबणारे हलणारे डोलणारे ते क्षण चकाकतात मस्त पैकी. माझं झाड तसं सरळसोट नाही त्या उभ्या ख्रिसमस्ट्रीसारखं. तर वेगळं मस्त  डौलदार, गोलाकार, सावली देणार आहे. खोडाला टेकून उभं राहायचं आणि वर बघायचं तर आकाश फटीतून दिसतं इतकं गच्चगुच्च भरून केलं लगेच. किती काय लोंबत आहे खाली, मला खुणवतं, त्यांना झाड आवडलं असेच मला वाटतं. नाहीतर बसले असते का ते निसटलेले क्षण गपगुमान झाडावर. पुन्हा खाली घे आणि होतं तिथेच ठेव असा  हट्ट् केला असता. मस्त नाचले मी एकटीच माझ्या झाडाभोवती.

तुम्हाला दाखवीन कधीतरी. आता हेच बघा ना,  मला लिहावं लागलं हे सगळं. गेला की नाही निसटून मनातला क्षण. जवळ असतात तर बडबड नसती का केली मी. खूप हसलो असतो आपण सगळेजण. त्यासाठी तरी यायलाच पाहिजे एकत्र. बसले टपटप टाईप करीत लॅपटॉपवर. नेहमी नाही असं बडवत बसणार. मग, माझे क्षण कमीकमी होतील की. आधीचे सगळे गेलेत झाडावर. नवीन हवेत मला. माझा ठेवा आहे तो लाडाचा. आत्ता मात्र जाऊ दे म्हणून देते सोडून.  असं असलं तरी तुम्ही येणार नक्की माझं झाड बघायला. आणि नाही आलात तर मी काय करीन सांगू. आपण एकत्र गप्पा मारतोय याच निसटलेल्या क्षणांना मी झाडाला टांगणार आणि त्याभोवती परत गिरकी घेणार.  


वंदना धर्माधिकारी

Wednesday, November 28, 2018

86. Will and it's execution - ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन


86.
28-11-2018
नामांकन, मृत्युपत्र आणि त्याची अंमलबजावणी
अथश्री : मार्गदर्शनपर माहिती आणि मार्गदर्शन
वक्ती : सौ.वंदना विजय धर्माधिकारी

कायद्याने किती जरी आपले आयुष्य आखीव रेखीव करायची सोय केलेली असली तरी देखील काही शब्द, संकल्पना मनाला टोचतात. अशा विषयात लक्ष घालून करायची तयारी लवकर होत नाही. मन हळवं होत, आणि आजचे उद्यावर ढकलले जाते. मृत्युपत्राचे बाबतीत असेच होते. नामांकन सहजगत्या केले जाते. परंतु इच्छापत्र करताना सर्व गोष्टींचा आढावा घ्यायचा म्हंटल्यावर एक तर ते वेळ खाऊ कष्टाचे वाटते, शिवाय मला थोडंच आत्ता फायदा आहे त्याचा. असे म्हणून त्यापासून दूर राहण्याचा अनेकांचा कल असतो. त्यासाठी खास मनावर गोष्ट घेणे आवश्यक असते. शिवाय अनेक शंकाकुशंका डोकावीत असतात. असाच विचार करून अथश्री येथील सौ.विद्या पंढरपुरे यांनी माझे लेक्चर ठरविले, आणि मी तासाभरात मार्गदर्शन केले.

नामांकन आता बँकेत तरी सक्तीचे असल्याने अनेकांनी केलेले असते. नामांकन केले की आपली जबाबदारी संपली. आता त्या पैशांची वाटणी नीट केली गेली असा गोड गैरसमज अनेकांचा असतो. ते तसे नसते. यावर थोडेसे बोलले असेन. नामांकानापेक्षा मृत्युपत्र अधिक वरचढ असते. त्यातील नोंदी महत्वाच्या असतात आणि ते फायनल असते. ते करताना मात्र अनेकांना अवघड जाते, कसे करू, कोणाला काय देऊ? नीट होईल ना? आणि त्याने मनात गुंतलेले धागे सोडविताना अवघड जाते हे खरे. मृत्युपत्र शब्दाचीच दहशत मनात असल्याने त्याकडे कानाडोळा करावासा वाटते. जे व्हायचे ते होईल, मी थोडीच असणार ते बघायला असाही विचार करणारे अनेक असतात.

असे असले तरीही मृत्युपत्र करणे ही देखील प्रत्येकाची आपल्या पुढच्या पिढीप्रती जबाबदारी असते. ती निभावली पाहिजे, याची जाणीव मात्र पुरेशी नसते. जाणिवेची टोके बोथट असतात, हेच खरे. पुढच्या पिढीत भावंडांच्यात वादावादी, भांडणे, कटुता, अबोला होऊन नातेसंबंध बिघडू नयेत. त्यांचे एकमेकांकडे जाणेयेणे असावे, एकोपा रहावा, प्रेमाने सगळ्यांनी राहावे. या सदिच्छेने मृत्युपत्र करायला पाहिजे. त्यासाठीची माहिती भाषणातून मी दिली.

तसेच यासाठी बँकांची मदत कशा प्रकारे घेतली जाते.  एक्झिक्युटर आणि ट्रस्टी सेवेबद्दल लोकांना फारसे माहित नसते. तेही समजून सांगितले. काही माहिती पत्रके दिली. बरं वाटले मला की अथश्री सारख्या सोसायटीमध्ये, की जिथे फक्त ज्येष्ठ नागरिक राहतात अशा ठिकाणी मी त्यांना थोडीफार माहिती मी दिली. भावनिकदृष्ट्या थोडासा आधार दिला. बास.... इतकेच.

वंदना धर्माधिकारी





Sunday, November 25, 2018

85. II endition of Braille book - ब्रेल मैत्री बँकिंगशी लवकरच





25-11-2018
‘मैत्री बँकिंगशी ब्रेल रुपांतरित द्वितीय सुधारित आवृत्ती’ लवकरच येत आहे.
नुकतीच  “मैत्री बँकिंगशी – बेस्ट सेलर” पुस्तकाची सुधारित अकरावी आवृत्ती यशोगाथा ब्रेल प्रकाशनाचे सर्वेसर्वा ब्रेलमॅन श्री.स्वागत थोरात यांच्याकडे मी सुपूर्त केली. तसेच सावी फौंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती रश्मी पांढारे यांनाही पुस्तक प्रत भेट दिली. रश्मीताईंच्या “सावी फाउंडेशन” ने “मैत्री बँकिंगशी”  पुस्तकाच्या १० व्या आवृत्तीच्या ब्रेल रुपांतरीत तीन खंडांचे प्रकाशन आयोजित केले होते, तसेच अंधांसाठी काम करणाऱ्या एकूण दहा संस्थांना ब्रेलच्या तीन खंडांच्या प्रती भेट दिल्या होत्या. नव्या आकराव्या आवृत्तीमध्ये शुभेच्छा देताना रश्मीताईंनी हे सर्व नमूद केलेले आहेच.
‘यशोगाथा’ प्रकाशित ब्रेल पुस्तकाचा प्रकाशन समारंभ ९ जानेवारी २०१६ रोजी आयोजित केला होता. विशेष म्हणजे पुस्तक प्रकाशनासाठी आरबीआयचे असिस्टंट जनरल मॅनेजर श्री. राजेश आसुदानी खास नागपूरहून आले होते. जन्म:त दृष्टिहीन असूनही बँकिंग क्षेत्रात उच्च पदापर्यंत पोचलेल्या सरांना पाहून अनेकांनी  प्रेरणा घेतली आणि बँकिंग क्षेत्र निवडले.
आत्ता, मैत्री बँकिंगशी आकराव्या आवृत्तीमध्ये नव्याने झालेले बँकिंग व देशाच्या अर्थव्यवस्थेतील सर्व बदलांचा समावेश केलेला आहे. त्याबद्दलची माहिती दृष्टिहीन वर्गाकडे जाण्यासाठी लवकरच ब्रेल मधली दुसरी आवृत्ती प्रकाशित करायचा मानस आहे. ब्रेलमॅन श्री.स्वागत थोरात यांनी ती जबाबदारी स्वीकारली असल्याने लवकरच ब्रेल पुस्तकाची दुसरी सुधारित आवृत्ती यशोगाथा प्रकाशन उपलब्ध करून देईल.
त्याचसाठी मी पुस्तकाच्या प्रती दिल्या आहेत. रविवार दिनांक २५ नोव्हेंबर, २०१८ रोजी ब्रेल भाषेत रुपांतरीत केलेलं आपल्या देशाचे ‘भारतीय संविधान’ दृष्टिहीन लोकांसाठी प्रकाशित करण्यात आले. प्रकाशन सोहळा बी.जे.मेडिकल कॉलेज, कॅम्प, पुणे येथील महात्मा गांधी सभागृहात साजरा झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती सी.एल.थुल होते. अनेक मान्यवरांचे उपस्थितीत पुस्तक लोकार्पण करण्यात आले.
समाजाच्या दृष्टिहीन लोकांपर्यंत मैत्री बँकिंगशी - ब्रेल द्वितीय आवृत्तीद्वारे अद्ययावत बँकिंग माहिती त्यांच्या पर्यंत पोचणार आहे. हीच अकरावी आवृत्ती ब्रेल रीडरवर उपलब्ध आहे, आणि अनेक संस्थांमध्ये ब्रेल रीडर असल्याने अनेकांनी त्यावरून आपला अभ्यास केलेला आहे. यातचं मला समाधान आहे.

वंदना धर्माधिकारी
२५.११.२०१८









Thursday, November 8, 2018

41. Diwali 2018 - Dhamal masti - मनीचा पराक्रम

धमाल मस्ती : दिवाळी अंक : २०१८
कथा : मनीचा पराक्रम
लेखिका  ::  सौ. वंदना विजय धर्माधिकारी

घरात हॉलभर  अनेक रंगांच्या लोकारींचे गुंडे अस्ताव्यस्त पडलेले होते. जसे लोकरीचे तुकडे तशीच  दोऱ्याची रिळे भारंभार. पेन्सिली त्याही सहासात होत्याच, शिवाय शार्पनर, कात्री, मणी असा लवाजमा घेऊन जयाश्रीचे काम सुरु होते. रंगीबेरंगी डब्यात तयार झालेली फुले ठेवली होती. जयश्री मावशी झाली होती ना. म्हणून बाळासाठी  छान छान काहीतरी करीत होती. नक्कीच. तिला खूप आवडत असलं काहीतरी करायला. पुढच्याच रविवारी बारसं बाळाचं, मग नको का तयार करायला भरभर. तेच तर चालू होतं. आईने मस्त सिफॉनची कुंची केली होती, शिवाय मॅचिंग मोजे, झबले देखील तयार होते.  जमतील तशी त्यावर फुले लावायची असं जयश्रीने ठरवलं आणि लागली कामाला. होते तेव्हढे सगळे रंग पसरलेले ते याचसाठी.

जोरात बेल वाजली. “दादा आलाच.” म्हणतं पटकन उडी मारून जयश्री दाराकडे धावली. इतक्यात बेलचा आवाज ऐकून मनी धावत आली. धावता धावता मधेच थांबली. काय ते कोणालाच कळले नाही. मनीने दादाला पाहून सोफ्यावर उडी घेतली. मनीकडे दोघांचही लक्ष नव्हतं.  प्रकाशच्या हातात होत्या हरभऱ्याच्या जुड्या. एक नाही, दोन नाही चक्क तीनतीन.  

“धर ना पटकन.” म्हणून हरभरा त्याने जयश्रीच्या हातावर ठेवला आणि तो लगेच निघाला.

“आता कुठे चाललास?” जयश्रीने दादाला विचारले.

“अगं थांबा ना. माझी पुस्तके कॅरियरला तशीच आहेत. मी आलोचं घेऊन.”’

असं म्हणतं प्रकाश धावत गेला, तसाच पटकन वर आला. हातात पुस्तके आणि सायकलची किल्ली. थोडेच लगेच जागेवर ठेवतात या गोष्टी? दिल्या भिरकावून खुर्चीवर आणि पळाला स्वयंपाकघरात.  

“तू तीन तीन गड्या आणल्यास हरभऱ्याच्या.” असं म्हणतं पटकन जयुच्या  तोंडात गेला देखील.

“अगं, आपण सोलून ठेवू यात. आई त्याची उसळ करेल. मला खूप आवडते.”

“मला पण.” जयुने पक्यादादाच्या हातावर टाळी दिली.

सकाळ पासून न भेटलेले बहिण भाऊ हरभरा समोर ठेवून त्याचा फडश्या पाडू लागले. बाहेर रेडीओ गात होता, कोणी बघत नव्हते, तरीपण टूरटूर टीव्ही सुरूच होता. 

खाता खाता टेबलावर नजर गेली आणि पक्यादा ओरडला जयश्रीला, “अगं, किती खातेस सारखी. सोललेले बघ किती कमी ते. उसळ करायची म्हंटल ना मी. आता बास खाणं. फक्त सोलायचे.” असे म्हणून पक्यादाने आपल्या तोंडात मात्र चार दाणे टाकले.



तोपर्यंत मनी माऊ किती वेळा इकडून तिकडे गेली, हे काही दोघाच्या लक्षात आलेच नाही. मनीनेही आवाज केला नव्हता, आणि केला असला तरी हरभरे खाणाऱ्यांच्या लक्षात आला नाही. शिवाय हॉलमध्ये टीव्ही सुरूच असल्यावर कशी काय “म्यांव! म्यांव!!” ऐकू येणार?

दुपारची वेळ होती, जेवण करून आई जरा पडली होती आतल्या खोलीत. पक्यादा आणि जयश्री  दोघांची जुंपली होती हरभऱ्याच्या  घाट्यांबरोबर.

तेव्हढ्यात! टण! टण! करीत भांडे लोळत कुठेतरी गेलेच.  सकाळी शेजारचे नंदुकाका आले होते, त्यांना पाणी दिलं ते तांब्याभांड तसेच हॉलमध्ये टीपॉयवर राहिले होते. मनीने ते दिलं ढकलून. टण! टण!! टण!!!

काय झालं? बघायला जयश्री आली तोच, “ये मने, काय केलंस हे, माझी......”

खरं तर, जयूला रडायलाच यायला लागलं. एकाजागी बसून ती फुल करीत होती. पक्यादा आला तेंव्हा बाल्कनीतून मनीने आत उडी मारलेली जयूला कळलं होतं. मनीने सगळी लोकर इकडून तिकडे उड्या मारीतमारीत घरभर केली होती. त्याचे वेढे पडले होते सगळ्यांना. पार बाल्कनी पासून हॉलच्या दरवाज्यापर्यंत. ज्या काही वस्तू तिच्या वाटेत आल्या त्या सगळ्यांना प्रदक्षिणा घालून लोकरीने  गुंडाळून घेतले होते मनीने.

जयुचे ओरडणे, मनिवर खेकसणे ऐकताच जयश्रीचा पक्यादादा बाहेर हॉलमध्ये आला. एकूण  अवतार पाहून “ये हे काय???” जोरजोरात हसायला लागला.  मनी बसली होती कोपऱ्यात आणि जयू कमरेवर हात देऊन डोळे वटारून मनीकडे बघत होती.

‘मनीला वाटल, पक्यादा तरी येईल माझ्या मदतीला. तिने अपेक्षेने पक्यादा कडे बघितलं. तसा दादा आला पुढे तर त्याचाच पाय अडकला लोकरीच्या धाग्यात. अलगद सोडवून घेतला त्यानं.

पक्यादाने खुर्चीखाली लपलेल्या की अडकलेल्या मनीला बाहेर काढलं. पाहतो तर काय तिच्या पायात धागा अडकलेला होता. तो काढाणार तरी कसा, लोकरीचे सगळे धागे, दोऱ्याची रीळ आणि दोरे सारे काही मनीच्या शेपटीला आणि पोटाला पूर्णपणे गुंडाळले गेले होते. मनीची  आवळलेली शेपटी पाहताच जयुने  एकदम फक्कन फस्स केले.  दोघांना गंमत वाटली, तिकडे मनी अधिकच कावरी बावरी झाली.

“पोटात दुखत असेल तिच्या बहुतेक” पक्याची लाडली ना ती, लगेच तिच्या बाजूने झाला.

“कसं केलंय बघ माझं सगळं तिने, दोन धपाटे घाल आधी तिला.” संताप आलेलाच होता.

“थांब, हिला सोडवतो गं आधी. ये मनाली माझी.”




“अगं, मनुटले धीटूकले. काय केलंस तू? कसं गं तुला कळतं नाही? अडकली लोकरीत आणि नाचलीस घरभर. आता कसे काढायचे हे धागे, किती गुंता केलास त्यांचा. शेपटी बघितलीस का रंगीबेरंगी दोऱ्यांनी सजलेली?” पक्या गुंत्याचे काय करावे याचा शोध घेता घेता मनीला धीर देत होता.

“दादा थांब. मी मनुलीचा असाच फोटो काढते. आणि घराचा देखील. बघा ना कसं केलंय तिने.”

“मस्त विणलंय जाळं. आता तुझं काम झालं.” दादाने जयश्रीला डिवचले.

“जाळं कसलं? नुसता गुंता करून ठेवलाय. जाळं एकसारखं असतं समजलं.  इथे बघा, काय झालं. खुर्चीला दिला वेढा, तिथून एकदम सोप्यावर, तिथे गुंडाळले कुशन. समजेना काय करायचं तर पळाली बाल्कनीत. जाताना गुंडाळला पेपर. खिडकीतून फिरली आत. बाहेर जाताना एका चौकोनातून गेली आणि येताना बयाबाई दुसरीकडून आली. हे बघ, कशी फिरली लोकर कुठून कुठे.  आत येताना पाडला डबा, सांडली माझी सगळी फुलं.”

जयू आधी धावली फुलांकडे. तिने किती कष्टाने केली होती फुलं. पेन्सिलीला मागून एक छोटासा छेद द्यायचा. सुईत लोकरीच्याचं रंगाचा दोरा ओवून दुपदरी गाठ बांधायची. दोरा अडकवायचा पेन्सिलच्या चिरेत. सुई धरायची पेन्सिलीवर. दुसऱ्या हातात लोकर धरून पेन्सिलीवर वेढे घालायचे. लोकरीने गोल गोल गोल ८/१० वेढे झाले की सुई पुढे ओढायची आणि मागे अडकवलेला धागा काढायचा. त्याच्या गाठीतून सुई ओवायची  आणि दोरा ओढायचा की सगळे वेढे बांधले जातात. पेन्सिल मधून सगळं काढलं बाहेर. सुरगाठ नंतर निरगाठ घट्ट बांधायची. हाताने लोकर मस्त फुलवायची. झालं फुलं तयार तेही सुंदर छान छान!

आईला अजून चाहूल लागलेली नसणार, नाहीतर आलीच असती आई बाहेर मदतीला. काही झालं की ते सोडवायला आई लागतेच ना मुलांना. तशीच इथे लगेच आईची आठवण आली. दोघेही शहाणी मुलं होणार होती, असं नुकतेच ठरवले होते दोघांनी. आधी आपण प्रयत्न करायचाच, तोही नेहमीच असेच काहीतरी होते दोघांचे. तेही मागल्या महिन्यापासून. म्हणून आईला उठवायला लगेच गेले नाहीत.

कसचं काय? घरात नुसता पसारा आणि हरभऱ्याचा केर. टेबल भरलेलं ठेवलं तसचं. दोघेही लागले लोकर गुंडाळायला. संपूर्ण गुंडा संपे पर्यंत मनीने उड्या मारून मारून हॉलभर आपला पराक्रम पसरवला होता. बरं तर बरं, ती कोपऱ्यातल्या टी-पॉय कडे गेली नाही. नाहीतर त्यावरची आईने नुकतीच आणलेली फुलदाणी पडली असती, तर मनीची कंबख्ती झाली असती.

“आणि बरं झालं तांब्यात पाणी नव्हतं नाहीतर, दादाच्या वहीचे काय झाले असते? आणि माझी  लोकर  ओली झाली असती तर?” जयश्रीचे निरीक्षण चालले होते.




मनी घाबरलेली दिसतं होती. तिच्या पायात अडकलेली  लोकर अलगद काढायला पक्यादा तिच्या जवळ  गेला तर...”उं! उं!!” करीत मनी रडायला लागली. तिची शेपूट ओढली जात होती. जयुने पटकन कात्री आणली.

“कपू का शेपूट तुझी. उडवलीस ना शेपटी घरभर. थांब आता.” एकीकडे फुलांची नासाडी आणि दुसरीकडे ते करणारी आपलीच मनी.

हळूच शेपटीवर गुंडाळलेली लोकर कापली. धागा केला मोकळा. मनीने पटकन उडी मारली. खरं, तर पटकन तिने बाहेर पळायला हवे होते. पण, कसलं काय? दोन पावलं पुढे गेली तर तिला लाल लोकरीचा धागा दिसला तशी मनुली झटकन मागे वळली आणि दादाच्या मांडीवर बसली. दोघांना हसायला आलं ‘ये मनू’ त्यानेही बसवलं तिला.

इतक्यात आई आलीच. बघते तर काहीतरी वेगळंच. खुणेनेच जयश्रीने मनीचे नाव सांगितले, तर, आई हसायला लागली. रागावली नाही तिच्यावर.

“काय गं बाई काय केलेस हे? बरं झालं. झोपताना मी माझं शिवणकाम उचललं होतं ते.” असं म्हणतं आई फुलं गोळा करायला लागली, तशी मनी आईच्या पायात गोलगोल करू लागली. तिला सांगायचं होतं, की आईकडून माया माया घ्यायची होती. हेच खरं, लागलं होतं ना शेपटीला, आईने फुंगर मारली की मनीचाही बाऊ बरा होतो म्हणूनच आली आईकडे.

आईने उचललं आणि बसली सोफ्यावर, तशी मनी आणखीनच बिलगून बसली, अगदी कुशीत आणि मान वर करून सांगू लागली आईला. मनी तशी सगळ्यांचीच लाडकी होती. तिने दुध प्यायल्याशिवाय पक्यादा आणि जयू दोघेही दुध पीत नसतं.

जरा शांत केलं लाडोबाला आणि तिला घेऊनच आई स्वयंपाकघरात आली. मनीला दुध दिलं. आणि आपल्यासाठी चहा ठेवला. जयु आणि पकादा दोघेही आले आईच्या मागेमागे.

“आई, आज उसळ करायची.” पकादाने ऑर्डर सोडली

“करते. आधी दुध घ्या बरं दोघे. मनीने बघा, आज तुमची वाट नाही बघितली. गट्टम करून टाकलं.”
आई असं म्हणाली तर लगेच मनी उडी मारून परत आईच्या खुर्चीवर चढली. एकाबाजूला जयू दुसरीकडे दादा आणि मनी मधेच आईच्या मांडीवर. पण, हलली नाही, डोलली नाही, पोटात दुध गेलं होतं ना. आणि आईचा चहा सांडला तर खरंच धपाटा मिळतो हे मनीला ठावूक होतं.  म्हणून तर एकदम चिडीचूप डोळे मिटून बसली.






मनी खूप खूप दमली होती. आईच्या मांडीवर तिचा चहा पिऊन व्हायच्या आत मनीने मान टाकली. लगेच झोप लागली तिला. आईची मांडी कुणाला आवडणार नाही तिथे झोपायला? प्रकाश आणि जयश्री आत्ता थोडे मोठे झाले म्हणून, नाहीतर मनीला आईची मांडी भांडून मिळायची. कधी कधी तर आईच्या मांडीवर दोघेजण आणि त्यांचा मांडीवर मनुडी. पण, आज दमलेली मनी एकटीच होती. आईने तिला थोपटून झोपवलं शेजारच्या खुर्चीवर. आणि धमाली मनीने तंगड्या ताणल्या की. मनीला हळूच एक चापट दिली जयश्रीने आणि पाळली फुलांकडे. प्रकाश मात्र तिथेच हरभरा सोलायला लागला. सोलता सोलता आईची आणि त्याची गप्पांची मैफल रंगली. आईने सांगितली गोष्ट, कुठली माहित आहे? ‘आजीची मनीने केलेली फजिती.’ विणलेला अर्धवट स्वेटर असाच एका मनीने उसवून टाकला होता ती. माहित आहे की नाही तुम्हाला, नाहीतर परत कधीतरी मीच सांगेन ती गोष्ट.



वंदना धर्माधिकारी
M : 9890623915









Wednesday, November 7, 2018

35. Forword for Mathematics book for competative examinations



पुस्तकास प्रस्तावना : A-ONE’S Basic to Advance Apptitude – I
                  सहज सोप्प गणित मार्गदर्शनासह
                  सौ.वंदना विजय धर्माधिकारी

पुस्तक : लेखक : श्री. संतोष वदक पाटील

माझा सर्वात आवडता विषय गणित आहे. मी गणिताची विद्यार्थिनी आहे. कॉलेजमध्ये गणित हाच प्रमुख विषय घेऊन मी कला शाखेची बी.ए. ही पदवी घेतली आहे. शाळेत असताना शंभर पैकी शंभर मार्क्स आणि दरवर्षी गणिताचे पारितोषिक घेतले होते. मी जेंव्हा शिकवण्या घेत होते, तेंव्हा माझ्या विद्यार्थ्यांना मी गणितात एकदम पक्क केलं होते. गणिताची त्यांना खूप भीती होती, ती तर घालवली शिवाय मार्क्स बरेच वाढले गेले. या विषयात पुढे नोकरी करताना विशेष काही करणे झाले नाही, हेही खरं. माझ्या दोन्ही मुलींचा गणित विषय एकदम तयार करून घेतला होता.

मला आठवते धाकट्या जान्हवीने एकदा एका परीक्षेत १० मार्कांसाठीचा प्रश्न म्हणजे तो विषय ऑप्शनला टाकला होता. ते मला परीक्षेला निघायच्या आधी १५ मिनिटे समजले. तिला म्हंटल अगदी ३ मिनिटे दे मला, मी तुला समजावून सांगते. तुला जमेल, नक्की प्रश्न सोडवता येईल. आणि खरंच अगदी दोन मिनिटात मी तिला समजावून सांगितले. त्या दिवशी परीक्षेला त्याविषयावर प्रश्न आला, आणि तोही १५ मार्काचा. तिने अगदी बरोबर सोडवता आला. तेंव्हा तिला खूप आनंद झाला, आणि मार्क्सही ९०+ मिळाले.

याच गणिताच्या एका पुस्तकाला प्रस्तावना द्याल का अशी विचारणा केली गेली. तेंव्हा मला अतिशय आनंद झाला. श्री.संतोष वदक पाटील हे स्पर्धा परीक्षेचे क्लासेस घेतात. मराठी मुलांना मराठीतून विषय समजावून देतात, म्हणून खास त्यांचेसाठी पुस्तक तयार केले, आणि मी त्यास प्रस्तावना दिली. मला खूपखूप आनंद वाटला. माझ्याकडे माझ्या विषयाच्या पुस्तकासाठी प्रस्तावना हा माझाच मला गौरव वाटतो.

वंदना धर्माधिकारी








प्रस्तावना ::: A-ONE’S Basic to Advance Apptitude – I
            सहज सोप्प गणित मार्गदर्शनासह
            सौ.वंदना विजय धर्माधिकारी

पुस्तक : लेखक : श्री. संतोष वदक पाटील

“गणित विषय एकदम सोप्पा. गणित ज्यांना जमते, ते आयुष्यात कुठलाही विषय अभ्यासून उत्तम यश संपादन करतात. म्हणून गणित येणं आयुष्यात महत्वाचे आहे.” हे लक्षात घेऊनच खास मराठी मुलांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हावे, ही  सदिच्छा मनी बाळगून या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. लेखक, श्री. संतोष वदक पाटील यांचे प्रथमत: मन:पूर्वक अभिनंदन! विद्यार्थ्यांच्या नजरेतून करावा लागणारा अभ्यास सोपा कसा होईल या विचाराने एकेका  गणिताची निवड केलेली दिसते. प्रत्येकात काही ना काहीतरी फरक आहेच. प्रकरणाच्या सुरवातीला त्या त्या विषयासाठी आवश्यक असलेली सूत्रे दिल्याने त्यातील गणिते सोडविणे नक्कीच सोपे जाणार आहे. मराठी मुलांनी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन अनेकविध क्षेत्रात प्रवेश करावा ह्या कळकळीने वदक सरांनी सुंदर पुस्तक लिहिले. आणि म्हणूनच या इंग्रजी पुस्तकाची प्रस्तावना मात्र मला मराठीतच लिहा असे त्यांनी सांगितले.

एकदा का गणिताची मेख समजली, त्याची गोडी लागली, की आयुष्यातच बदल होताना जाणवतो. म्हणजे कसं सहज रस्त्याने जाता जाता एखादी गाडीची नंबर प्लेट बघूनही आकड्यांची गंमत लक्षात येते. लहान लहन कोडी पटकन सुटतात. काही गोष्ट आवर्जून करा असे मी सुचविते. सुडोकू सोडवायची सवय खूप चांगली. त्याने मनाला, मेंदूला या आकड्यांशी खेळायची चटक लागते. अनेकविध कोडी सोडविताना आकडे मदतीस येतातच. पाढे पाठांतर पक्के होते, भूमितीतील दाखले व्यवहारी जगात वापरले जातात. गणितातील वैविध्य जाणवत राहते. त्याने बुद्धी तल्लख होते, आणि तल्लख मेंदूच यश खेचून आणतो.

थोड्याच स्पर्धा परीक्षांमधील प्रश्नपत्रिका मराठीतून असतात. बहुधा इंग्रजीत पेपर असतो, म्हणून मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याला आधीच टेन्शन येते. प्रश्न समजेल कि नाही इथपासून मनात शंका येतात. आणि मराठी मुले मागे राहतात. ते टाळण्यासाठी म्हणूनच ह्या पुस्तकात गणिते इंग्रजीतून दिलेली आहेत, पण प्रस्तावना, मनोगत, पुस्तकातील गमती जमती मात्र मराठीतूनच दिलेल्या आहेत. मराठी चांगले समजले की इंग्रजी समजणे, शिकणे सोपे जाते. डायरेक्ट इंग्रजी शिकण्यापेक्षा आपला ज्ञानाचा पाया मराठीने पक्का करून दुसऱ्या कुठल्याही भाषेत ते ज्ञान रुपांतरीत करण्याचे कौशल्य संपादन करता येतेच, मग फक्त स्पेलिंग बरोबर टाकून लिखाण करणे बाकी शिल्लक उरते.  सांगोपांग जाणीवपूर्वक हे असे करताना त्यामागे उद्देश, ध्येय आणि बरोबर सामाजिक भान आहे. मराठी भाषा, मराठी तरुणपिढी, मराठी माणूस आणि आपला महाराष्ट्र याप्रती प्रेम असल्याने सरांनी मराठी मुलांसाठी, मराठीतून गणित शिकविण्याचा केलेला प्रयत्न, त्यांना पुढे नेण्यासाठी सारे काही पुस्तक रूपाने मांडले आहे. डायरेक्ट इंग्रजी शिकण्यापेक्षा आपला ज्ञानाचा पाया मराठीने पक्का करून दुसऱ्या कुठल्याही भाषेत ते ज्ञान रुपांतरीत करण्याचे कौशल्य संपादन करता येतेच. पाटील सरांच्या स्तुत्य कार्याबद्दल त्यांचे विशेष आभार मी मानते.

गणित म्हणजे आकडेमोड. इथे तीच आकडेमोड एकदम कशी सोपी होते जेंव्हा पाढे पाठ असतात, हे समजावून देते. आणखीनही काही गोष्टी मराठीतून अभ्यास केल्याने शक्य होतात. एक अतिशय महत्वाची गोष्ट माझ्या नजरेस आली आणि ती मी सगळ्यांना नेहमी सांगते. मराठीतून  पाढे म्हणनं, घोकण, लक्षात ठेवणं, पाठ करणं, आठवण, उड्या मारीत पटकन उत्तर ओठावर येण, त्यानुसार गणित सोडवण हे इंग्रजीतून टेबल्स म्हणण्यापेक्षा खूपच सोप्प आहे. इथे कुठेही दुसऱ्या भाषेला कमी लेखायची भावना नाही. उदाहरणार्थ : ‘९*९=८१ - नवा नवा ऐक्याऐंशी - शब्द तीन’ तसेच ‘१२*१२=१४४ – बारं बारे चव्वेचाळाशे - शब्द तीन. तेच इंग्रजीतून म्हणताना ‘nine nine’s are eighty one’- शब्द ५’ आणि ‘twelve twelve’s are one hundred forty four – शब्द ७.’ शिवाय  ‘s आणि are  चा उच्चार करताना बोबडी वळते, शब्दोच्चार अस्पष्ट येतो, वेळ लागतो, गती मंदावते, आणि उगीचच जास्त शब्द उचारण्यात अधिक उर्जा खर्च झाल्याने टेबल्स म्हणणे कंटाळवाणे काम होते. ‘शे’ या एकाक्षरी शब्दाने इंग्रजीमधील ‘One hundred’ या १० अक्षरी अधिक एक स्पेस अशा शब्दाचे उच्चारण अर्थपूर्ण झालेले आहे. पटले ना. इंग्रजीच्या उलट पाढे म्हणताना जाणवते तो ठेका, रिदम, स्पष्ट शब्दोच्चार, गती, आणि उर्जा सुद्धा. संपूर्ण वर्ग जर जोरात पाढे म्हणत असेल, तर आवाजाची पट्टी प्रत्येकाची वाढत जाते. पण तीच पट्टी टेबल्स म्हणताना खाली घसरते. मोठ्यांदा पाढे म्हणून बघा, माझे म्हणणे नक्कीच पटेल.

माझे तर सांगणे आहे, जर मुलांना गणितात तरबेज करायचे असेल तर स्वत: मराठी पाढे नियमित म्हणा, मुलांना ते म्हणायला शिकवा. आपल्या संस्कृतीनुसार तिन्हीसांजेला शुभंकरोती आणि पाढे म्हणायची सवय आम्हाला होती, तीच पुढच्या पिढ्यानपिढ्या तशीच राहो, असे आवर्जून आग्रहपूर्वक सांगावेसे वाटते. गणित चांगले तर सगळे चांगले करणे शक्य होऊ शकते. जरी इंग्रजी माध्यमात शिक्षण मुले घेत असली तरी पाढे पाठ करून घेतले आणि त्यानुसार गणिते सोडवली गेली, तर लवकर लवकर गणिते सुटतात. एकदम उत्तर देता येते. पंधराचा पाढा पंधरा एके पंधरा पासून न म्हणता पंधरी पाची पंच्याहत्तर एकदम उच्चारले जातेच. आणखीन एक लक्षात घ्या, एक ते शंभर अंकात पंच्याहत्तर मध्ये ७ आणि ५ दोन अंक आहेत. पण मराठीत एकच शब्द आहे, तेच इंग्रजीमध्ये मात्र seventy five   असे दोन शब्द झाले. असेच सगळ्या अंकांसाठी आहे, तपासून बघा.

तुम्ही म्हणाल, पेपर इंग्रजीत असतो, तर मराठीत कसे पाढे म्हणून सोडवू. हे बघा, कमी वेळात जर जास्त गणिते अचूक सोडवायची असतील, जास्तीतजास्त गुण पाहिजे असतील तर विचार मराठीतून करा, गतिमान होईल आणि लिहिताना इंग्रजीत मांडा. जमते, वेळ वाचतो. आपली उर्जा तर वाचवायची, साठवायची आणि गणितात पूर्ण मार्क मिळवायचे असतील तर पाढे पाठ करून गणित सोडवा. यश नक्की मिळेल. याची खात्री बाळगा. आणि त्यासाठीच हे पुस्तक आहे. त्यासाठी श्री. संतोष वदक पाटील सरांचे मार्गदर्शन तसेच अभिनंदन!

सर्वांना उत्तम यश मिलो, त्यांची प्रगती होवो ह्या माझ्या शुभेच्छा!


वंदना धर्माधिकारी
मोबाईल : ९८९०६२३९१५.





Camera is a responsive/adaptive slideshow. Try to resize the browser window
It uses a light version of jQuery mobile, navigate the slides by swiping with your fingers
It's completely free (even though a donation is appreciated)
Camera slideshow provides many options to customize your project as more as possible

Here is a video for National Webinar on IBPS Exam. Guidance by Smt.Vandana Dharmadhikari on 17th July, 2020 

vandanadharmadhikari.blogspot.com