Saturday, June 25, 2016

78. Ghayalanchi Mot - घायाळांची मोट


पुस्तक : घायाळांची मोट – कथासंग्रह
प्रकाशक : एकविरा प्रकाशन, पुणे
पाने : १५२   किंमत : रु.२००.-.
परीक्षण : सौ.मनीषा आवेकर

सौ.वंदना धर्माधिकारी यांच्या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभास मी गेले होते. ‘घायाळांची मोट’ कव्हर बघताचं कथा वाचायची उत्कंठा वाढली होती. प्रसिद्ध झालेल्या स्वतंत्र १५ कथांचे संकलन “घायाळांची मोट”.मानवी  आयुष्यातील घायाळता आणि त्यातून मोकळं होणं सुंदर आहे.  आपणही कधीतरी घायाळ होतो,किंवा कोणाला तरी घायाळ केलेलं असतं. वाचताना आपल्याच इतिहासातील काहीजण डोकावतात. हीच लेखणीला माझी पहिली दाद. आत खोलवर हलायला होतं, मनाला स्पर्शून जातं, नकळतपणे पापण्या पुसल्या जातात. इथे आठवण झाली वपुंच्या हेलावून सोडणाऱ्या कथांची.खूप दिवसांनी भारावलेलं कथालेखन वाचलं,आवडलं, म्हणून त्याबद्दल थोडेसे.

घायाळांची मोट कथासंग्रहात व्यक्तिरेखा, घायाळता, प्रसंग, भावना, संवाद, शब्दसामर्थ्य, रेखाटलेली मार्मिक चित्रे, आणि मानवी मनाची उकल असे सर्वांचेच प्रकटीकरण होते. कथा भिडणाऱ्या, हृदयस्पर्शी आहेत.शीर्षककथा प्रेमाची परिसीमा आहे. लेखिका म्हणते,‘असे प्रेम कुठे असेल तर दोघांना माझे लाखलाख प्रणाम, सलाम.’ हळव्या लेखणीला सलाम ठोकावा इतकं प्रेम त्यात ओतलं आहे. ‘मला आत्ताच कळलं’मध्ये मुलीकडून आईला मिळालेल्या पाठींब्यामुळे मनाला दिलेली उभारी फार सुंदर व्यक्त केली आहे. ‘मी तुझा नवराच बरा’ म्हणजे पतीपत्नीच्या नात्यातील विविधता उलगडून दाखवताना शेवटी नवऱ्याची भूमिका मनमोकळेपणाने मांडली आहे.

वंदनाताई बँकेत होत्या, त्यामुळे तेथील अनुभवातून आलेल्या  ‘एक एक ओझं’ कथेत उपेक्षितांचे अंतरंग दाखवताना शंकरची व्यक्तिरेखा मानवी मनाच्या अनेक भावनांचे रूप दाखवते. शेवट अगदीच वेगळा, थोडासा सस्पेन्स खिळवून ठेवतो. ‘मी त्याला मारलं’ या कथेत घरातली मोलकरीण मालकिणीची मैत्रीण आहे. ‘राजहंस होऊन जा’ इथेतर एखाद्याला खड्यासारखे बाजूला काढणाऱ्यांचे अवलोकन सडेतोडपणे केलेले आहे, त्याचबरोबर अपमानीत खेचाखेचीकडे दुर्लक्ष करून ध्येयाकडे जाण्याचा संदेश दिला आहे. एकत्रितपणे काम  करताना दुसऱ्याच्या पोटदुखीचा त्रास होतोच.‘एका पा वर दोन पा’ झालेली फसवणूक,प्रसंग,इतरांच्या प्रतिक्रिया,आशावाद आणि शेवटची कलाटणी मनाला अस्वस्थ करते.सगळ्याच कथांबद्दल लिहिणं अशक्य आहे.  ‘मिलिंबिता’ अंधश्रद्धेवर मात, ‘बहावा’ भावलेली प्रेमकथा. फॅण्टसी, मनीमाऊ, रुग्ण, आणि चक्क गदिमा! अप्रतिम!!

कथांमधून मधेच कविता, चारोळ्या, गद्यपद्य त्याने कथा ओघवत्या होतातच. शिवाय जाणवते  लेखणीची ताकद, वैविध्य, ओलावा, काव्यमाधुर्य, भावनांची घालमेल.  सर्वच कथा रंजक, रसाळ, ओघवत्या, संवाद प्रसंगोचित, आणि चित्रदर्शी आहेत. कथांमधील पात्रांशी संवाद साधत सुंदर अनुभूती घेण्यात वाचक रंगून जातो, त्याचा एक भाग बनतो. प्रत्येक कथा पुन्हा पुन्हा वाचावी, अगदी चघळत तिचा स्वाद घ्यावा अशा आहेत. मी तेच केलं.

फेसबुक – नुक्कड फेम श्री.विक्रम भागवत यांनी पुस्तकाला सुंदर प्रस्तावना दिली आहे. भावनापूर्ण  ओथंबलेल्या कथासंग्रहाबद्दल वंदना धर्माधिकारींचे अभिनंदन. म्हणूनचं सगळ्यांनीच पुस्तक वाचावं असा आग्रह आहे.

मनीषा आवेकर

फोन :  9763706200 



25-09-2016
घायाळांची मोट कथासंग्रह
लेखिका : सौ.वंदना विजय धर्माधिकारी
प्रस्तावना : श्री. विक्रम भागवत

वंदना धर्माधिकारी ह्यांच्या  कथा संग्रहाला प्रस्तावना लिहावी असा त्यांचा प्रस्ताव आला... आणि मला एक प्रश्न पडला की कुठल्या अधिकारात आपण ही प्रस्तावना लिहायची आहेमी  समीक्षक नव्हे...कुठल्याही साहित्याची चिकित्सा करावी असा माझा अभ्यास नाही...आणि कथेच्या क्षेत्रात तसे म्हटले तर माझे वैयक्तिक योगदान नाही. असे प्रश्न मला  पडले आणि मला माझ्या मार्यादांची जाणीव झाली. त्याचवेळी मग मी विचार करू लागलो...की मग मी काय करू शकतो?
मी एक  आस्वादक आहे. माझ्याकडे दररोज भरपूर वाचायला येते. त्यात बऱ्याच कथा असतात. “नुक्कडह्या आमच्या लघु आणि लघुतम कथांना वाहिलेल्या ब्लॉगची ही एक किमया आहे. त्यामुळे  माझही आस्वादकाची भूमिका किंवा  बैठक म्हणा पक्की तयार झाली आहे...आणि मी जे काही लिहितो आहे ते त्याच भूकीकेतून लिहित आहे...सौ. वंदना धर्माधिकारी ह्यांच्या कथांचे मुल्यमापन करण्याचा हा प्रयत्न नाही हे कृपया ध्यानात घ्या.

एकूण १४ कथा ह्या कथासंग्रहात सौ वंदना धर्माधिकारी ह्यांनी समाविष्ट केल्या आहेत. हा कथांचे विषय वेगवेगळे आहेत...काही कथान नर्म विनोदाची जोड आहे... (कर सार साफ), काही कथा ह्या दोन जीवांच्या भाव विश्वाचे अत्यंत तरल भाषेत वर्णन करतात (मी तुझा नवराच बरा), तर एक कथा (तुतुर्संगे रंगली रंगपंचमी) फ्यानटसी चा आधार घेत एक वेगळेच विश्व आपल्यापुढे उभे करते...अव्यक्त प्रेम...आपल्या हृदयात जपून ठेवणारे छाया आणि शशांक...तर मनाला लोभवतातच...(आजच उद्यावर)

मला ह्या कथा वाचताना एक  गोष्ट प्रकर्षाने जाणवली...ह्या कथा दोन भागात विभागता येतील....एकनिसटलेल्याकिंवानिसटू पाहणाऱ्याक्षणांच्या कथा आणि दुसरा भाग आहे...आपलेस्त्रीतत्व प्रखरपणे जागृत होऊ पाहणाऱ्या स्त्रीचे व्यक्तिचित्रण करणाऱ्या. अर्थात हे होत असताना मुलाने दगा दिलेल्या कुटुंबाची व्यथा मांडणारी कथा सुद्धा डोळ्यांसमोर येते. आणि लक्षात येते ते एक समृद्ध अनुभव-विश्व लेखिकेचे. त्या व्यवसायाने ब्यांकेत नोकरीला आहेत त्यामुळे अनेक व्यक्तिरेखा त्यांच्या सानिध्यात येतात. लेखकाच्या अनुभवांची   मोडतोड होऊन पुन्हा जुळणी होत असते...आणि  नवे अनुभव जन्माला येत असतात. तसेच इथेही होत असणार ह्यात मला शंका नाही.


त्यांच्या ब्यांकेत नोकरी करणारा शिपाई  सखाराम(एक एक ओझ) किंवा मुलाच्या त्रासाला  कंटाळलेली पारूबाई, किंवा ब्यांकेत बदली  होऊन आलेले आणि आपली पूर्वाश्रमीची मैत्रीण (मी प्रेयसी हा शब्द टाळतो आहे) क्यान्सरच्या आजारात अखेरच्या क्षणात एकदा तरी मनातले सर्व व्यक्त करू पहाणारे मकरंद कानडे(मुलांनी दिल बळ) मोकळे होऊ  पाहणारे हे मला खूप भावले. तर त्याच रंगरूप पालटल मधील शारदाबाई, ह्या सर्व व्यक्तिरेख मानवी शाश्वत मूल्यांच्या खूप जवळ जाऊ पहाणाऱ्या आहेत

ह्या कथांमध्ये व्यक्त भावनांची तडफड लेखिकेने खूप उत्तम रित्या वाचकापुढे मांडली आहे. अशा अव्यक्त भावना कधीना कधीतरी व्यक्त व्हायलाच हव्या...त्यांना आपल्याला हवासा प्रतिसाद मिळो अगर ना मिळो...पण मनावरचा भार हलका होणे खूप गरजेचे असते...हे  निर्विवाद.
ह्यात मला  खास वैशिष्ट्य जाणवले  ते  स्त्री मनाचे विभिन्न पदर ज्या नजाकतीने लेखिकेने उलगडून दाखवले  आहे त्याचे.

आयुष्याच्या उत्तरार्धात पुन्हा एका सहजीवनाच्या दिशेने पाउल टाकणारी कल्पना (मला आत्ताच कळल) ह्या कथेत  होणारी तिची घालमेल...ज्या सामर्थ्याने लेखिकेने अभिव्यक्तीत केले आहे..तितक्याच नजाकतीने मुलीने स्वतःकडे आपल्या आईची आई होण्याची भूमिका घेणे आणि आईच्या भावी पतीला निरोप देणेमाझ्या आईची काळजी घ्याहे अत्यंत हृद्य असेच आहे आणि  ह्या कथासंग्रहाचे सामर्थ्य सुद्धा आहे.

पाटील कुटुंबाची शोकांतिकाएक पा वर दोन पाअत्यंत करूण आहेत्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात आपल्या एकुलत्या एक मुलावर टाकलेला  अमर्याद विश्वास त्यांना भोवतो आणि मग एक करूण कहाणी आपल्या डोळ्यांसमोर चित्रित होतेह्या संपूर्ण कथेचे लेखन अत्यंत संयत आणि सामर्थ्यशाली असे झाले आहे. त्यांची शोकांतिका चित्रित करतानाच आजूबाजूला उभ्या असलेल्या सोसायटी मेम्बर्सची व्य्क्तीचित्रणे विलक्षण ताकदीने त्यांनी उभी केले आहेत. वाचत असताना वाचकाला  सतत वाटत राहते हो...हो...हे असेच व्हायला हवे..त्यांच्या मुलाला सर्वांनी असाच विरोध करायला हवा. हे लेखिकेचे यश निर्विवाद आहे.
आणखी एक व्यक्तिरेखा मला खूप भावली ती म्हणजे मोलकरणीचे काम करणारी शारदाबाई दररोज रात्री दारू पिऊन झिंगलेल्या नवऱ्याचा मार खाणारी आणि तरीही भले थोरले कुंकू कपाळी मिरवीत वटसावित्रीची पूजा करणारी शारदाबाई. त्या ज्यांच्या कडे काम करतात त्यांच्या एके दिवशी मारझोड करणाऱ्या नवऱ्याचा शारदाबाई हात धरते आणि त्याचा अन्याय झुगारून देतेहे सर्वच वर्णन अत्यंत परिणामकारकरीत्या लेखिकेने वाचकापुढे उभे केले आहेवाटत राहते की जणू संपूर्ण प्रसंग आपल्या डोळ्यासमोरच घडत आहे. सासूच्या मृत्युनंतर तिला शब्द दिला आहे म्हणून कायम नोकरी साठी आलेली सून सुद्धा एकाच प्रसंगात खूप ठसठशीत उभी राहिली आहे.
सौ वंदना धर्माधिकारी ह्यांच्या सर्वच कथांचा आस्वाद स्थला अभावी घेणे शक्य नाही...पण जी उदाहरणे मी दिली आहेत ती इतकी सशक्त आहेत की त्यावरुनच इतर कथांबद्दल सुद्धा वाचकांना उत्सुकता निर्माण व्हावी. ह्या कथासंग्रहातील बहुतांश कथा पारितोषिक प्राप्त आहेत. ह्याचाच अर्थ त्या सिद्ध झालेल्या आहेत...त्यांना वेगळे सिद्ध व्हायचे नाही आणि त्यामुळे वाचकांच्या समोर  आपल्या ह्या कथा ठेवताना लेखिकेच्या मनावर काही ताण असायचे कारण नाही.
मी सौ. वंदना धर्माधिकारी ह्यांना खूप सुयश चिंतितो.

विक्रम भागवत



Sunday, May 8, 2016

65. Prabhat - Rupgandh केवळ आईसाठी तरी


“मातृ देवो भव!’  ही भारतीय संकृती. आईचा सन्मान विविध प्रसंगी केला जातोच. अमेरिकेचे तत्कालीन ‘राष्ट्रपती-वूडरो विल्सन’ यांनी १९१४ -मे महिना, दुसरा रविवार हा मदर्स डे म्हणून जाहीर केला . तेंव्हापासून अमेरिकेत, आणि नंतर हळूहळू जगभर हाच दिवस  ‘मदर्स डे – मातृदिन’ म्हणून साजरा होऊ लागला. तेच आता आपल्यादेशात होत आहे.

आई म्हणजे जन्मदात्री. तिची ओळख असतेच सगळ्यांना, काय वेगळं सांगायचं आई बद्दल? तरीही थोडं वेगळं आईचं रूप बघू यात  आजच्याच दिवशी. बघा, वाचा, पटलं तर बदला, नाही पटलं तरी किमान आईसाठी तरी बदल करा. आग्रह नाही, विनंती सुद्धा नाही.

आई ही आईच असली तरीही तिला चांगली आई, वाईट आई अशी लेबल्स लावली जातात. असं का होतं?
एखादीची माया पातळ असते? की तिला मुलांचा तिरस्कार वाटत असतो? आईची माया पातळ व्हायला सुद्धा काही कारणं होत असतील का? हाताची पाची बोटं सारखी नसतात. तसंच! किती जरी सगळी मुलं आईला सारखी असली, तरी घोडं आपल्या गुणावर पेंड खातं म्हणतात तसंच आई सुद्धा डावं उजवं करते. हे खरं आहे. आई म्हणून वावरताना काही किमान गोष्टींचे भान आईला असणं अत्यंत महत्वाचे असते. पण प्रत्येक आईला ते असतेच असे नाही. आईच्या हातूनही चुका होत असतात, त्यालाही माफ करायला इतरांना जमतेच असे नाही. आई आहेस ना, म्हणजे तिने केलेच पाहिजे सगळ्यांचे सगळे, अशी अपेक्षा करून तिला गृहीत धरले जाते. त्यावेळी तिची फक्त कानकोंडी अवस्था होते. तिलाही वाटत असते, नवऱ्याने किमान हे तरी काम करावे. मुलांनी जातायेता  होतील ती बाहेरची, आणि थोडीफार घरातली कामे नको का बघायला? तिच्याही काही अपेक्षा असतात इतरांकडून, पण बऱ्याच वेळा त्यांची दखल कोण घेतं. आईचे कौतुक नक्कीच व्हायला पाहिजे, तिची जपणूक, विचारपूस, काळजी, हवंनको, औषधपाणी, तिच्या भावना, आदर, गरज हे सर्वच्या  सर्व तिने स्वत: तर बघितलेच पाहिजे. त्याचबरोबर घरातील इतर, घर प्रमुख तिचा नवरा, त्यापाठोपाठ सासूसासरे, आईवडील,  मुलं सुना, जावई या सर्वांची जबाबदारी आहे आईच्या या गोष्टींची पूर्तता करण्याची.

मुद्दा आहे चांगली आई आणि वाईट आई याचा. चांगुलपणाच्या कल्पना आई, वडील, मुले आणि घरातील इतर म्हणजे आजीआजोबा अशा सर्वांच्या वेगळ्या असल्यावर एकाच पद्धतीने तिच्या चांगुल पणाचे  मूल्यमापन कसे होणार? असेल व्याख्या वेगळी वेगळी, पण आईला स्वत:च्या मनासारखे मुलं वाढविण्यासाठी स्वतंत्र विचारशक्ती असली तरीही तशी मुभा मिळते घरातून? कित्येक घरात तर तिला विचारले देखील जात नाही. निर्णय क्षमता जणू तिच्याकडे नसतेच, मग विचारा  कशाला? काय कळतं तिला? हा सूर पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रथम वाक्य आहे. बायकांना अक्कल नसते. हे इतके बिंबविले गेले आहे, की बायका किती जरी शिकल्या, धीट झाल्या, तरी त्यांना नामोहरम करणारी ही पुरुषप्रधानता तिचे खच्चीकरण केल्याशिवाय राहत नाही. अगदी स्वत:ला सुशिक्षित सुशिक्षित म्हणवणारे देखील, बायकांचे पाय मागेच ओढत असतात, तिने काही विशेष केल्यास त्यास दाद देणे, म्हणजे तिला डोक्यावर चढविणे वाटते ह्या नवरोबांना. प्रोत्साहन देवून तिच्या गुणांची कदर झाली एखाद्या घरात तर त्या गृहलक्ष्मीचे महत भाग्य होय.

अशावेळी सांगावेसे वाटते, आई म्हणजे आत्मा अधिक ईश्वर याचंचे मिश्रण. जिथे मीत्व, स्वत्व विरघळून केवळ आई एक माऊली हीच भावना तग धरते ती. माऊली म्हणजे मावळलेल्या मी पणाची महन्मगल   मूर्ती आई. माउली असते प्रेम, माया, ममता, वात्सल्य, अर्पणभाव, अपेक्षारहित कृती, सर्वस्व देणारी. आईचे प्रेम, कृती, परिणाम, साफल्य, त्याचे कार्य हे सगळं माया ममता यांनी ओथंबलेले असते. ज्या मातेकडे ज्ञान आणि जिव्हाळा दोन्ही आहे तिला माऊली म्हणतात. संत ज्ञानेश्वर आपले माऊली आहेत, तिथे प्रेम, ज्ञान आणि जिव्हाळा तिन्हीचे एकत्रीकरण आहे. ते माउलीचे प्रतिक आहेत.

आई आणि मुलं यांचा श्वास एक असतो. मुलं तिचं अपत्य असतं. अ-पत्य, म्हणजे ज्याचे पतन, खाली पडणे होणार नाही असे ते नाते. ती  आपल्या बाळाला खाली पडू देत नाही. त्याला पोटात तर वाढवते नऊ महिने, आणि त्यानंतर त्याला कवटाळून राहते, आपल्या पोटाशी, छातीशी, कडेवर, मांडीवर अगदी घट्ट घट्ट धरते बाळाला. स्तनपान करताना बाळ ज्या प्रकारे आईला धरून ठेवतो, ते वर्णन करणं माझ्या लेखणीच्या क्षमतेच्या बाहेर आहे.  दुदू पिणार बाळ आणि आई, दैवी मिलन असते ते. आईचे प्रेम हे असे स्वयंप्रकाशित आणि स्वयंपूर्ण असते. त्यात तिच्या अंतरात्म्याचा प्रकाश असतो, ज्याने ती बाळाला स्वयंपूर्ण बनविते. बाळ मोठं होताना ते पडलेलं, खाली गेलेलं, त्याचे अध:पतन होत असलेलं आई पाहू शकत नाही. कायम ती त्याला सावरायला जाते. पडला तरी त्यातून काय शिकायचं ते  आई सांगते, तोच एक संस्कार असतो, सुसंस्कार मुलांवर. अपत्यांचे सुख दु:ख तिचे स्वत:चे असते. आईचे स्वत:चे अस्तित्व धूसर असते. कायम मुलांचे भोवती तिचे मन घुटमळत असते. अशी असते आई. स्त्री या शब्दाचे विश्लेषण महाभाष्यकार पतंजली यांनी “स्त्यायति अस्यां गर्भ: इति” केलेले आहे. जिच्या शरीरात गर्भ आहे ती, गर्भाशय धारण करणारी. जिच्या जीवनाला मातृभावाव्यतिरिक्त दुसरे वैशिष्ट्य नाही. हे सत्य आहे. म्हणतात ना स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकालची माता असते. वात्सल्य हा तिचा हृदयरस, स्त्री धर्म आहे. म्हणूनच स्त्री आपला भाऊ, वडील, पती यांच्याकडेही वात्सल्याने बघते. पतीत्वाने घेतलेला उपभोग हा त्या क्षणाचा असतो, क्षणभंगुर असतो. तिची पती बद्दल वात्सल्य भावना ही नेहमीच कामुकतेच्या भावनेपेक्षा पटीने अधिक असते. स्त्री ही परमेश्वराची सर्वात सुंदर निर्मिती आहे. त्यात आईचे भावमाधुर्य आहे. उगीच नाही म्हणतं, एक तरी मुलगी असावी. तीच पुढे आई होते ना. म्हणून मुलगी पाहिजे, तिचा लळा हवा, हट्ट तर लागतोच, आई बाबांचा जीव की प्राण असलेलं कन्यारत्न. ती जेंव्हा आई होते, तेंव्हा आजी आजोबा  होणं, तिचं बाळंतपण करणं यामधील आनंद जो कोणी उपभोगतो त्यालाच माहित त्याचे सौदर्य, ठेव, महात्म्य, ओलावा, आत्मीयता, कर्तव्य आणि लडिवाळता.

इतके सगळे गोडवे त्या मातृत्वाचे गायले जातात. असे हे पवित्र, दैवी, आधारभूत मातृत्व पायदळी तुडवताना कोणाला लाज, लज्जा, शरम काहीच वाटत नाही, याचेच दु:ख आजही अनेक मातांना भोगावे लागतं आहे. एक दिवस पूजा करायची आणि दुसऱ्या दिवशी पाद्यपूजा करून जोड्यानं मारायचं. ही कुठली संस्कृती. नका करू आईचे कौतुक, नको तिला कविता, पूजा, महात्म्य गाणाऱ्या ओव्या. तुमचे नकली अश्रू तिच्यासाठीचे, तिच्यासाठी भेटवस्तू, काही काही काही नको असते आईला.  किमान एक माणूस म्हणून माणुसकीची वागणूक, प्रेम, ओलावा तिला देऊ केलात, तरी तेव्हढे तिला पुरेसे  असते. ती तेव्हढ्यावर आपलं सर्वस्व देऊ करते, नवऱ्याला, मुलांना, संपूर्ण घरादाराला अगदी पै-पाहुण्यांसकट,  अधिकच्या संकटांना झेलतं, डोंगरभर कष्ट उपसत,  ते सुद्धा न कुरबुर करता, न भांडता, पूर्ण ताकदीनिशी, सर्वस्व पणाला लावून. इतके मोलाचे दातृत्व खचितच कोणाचे असेल. याला ना किंमत ना कोणाला जाणीव तिच्या देण्याची, तिच्या कष्टांची. तसूभर परतफेडीची सुद्धा अपेक्षा नसते आईची, जर तिला चांगले वागवले
तर तिला खरोखरीच काही म्हणजे काहीच  नको असते. नवऱ्याकडून, मुलांकडून, समाजाकडून सुद्धा. प्रेमाने मिळालेले चार शब्द तिला ताकद देतात इतर सर्व कर्तव्ये  पुरविण्यासाठी. अशावेळी प्रयत्नांची पराकाष्ठा ती करते, घरादाराचे आनंदवन फुलत राहते, वर्षानुवर्षे अनंतकाळ. त्याच्या स्मृती ती गेल्यावर सुद्धा आनंदाचीच बरसात करीत राहतात प्रत्येकाच्या मनात, आठवणीत. असे असूनही, किती अवहेलना, राग राग, मत्सर, घृणास्पद नजर, मार, अपमान, विषारी बाण, घाणेरडी भाषा, शिव्या सहन करावे लागते आईला. असं का? कधी सुधारणार आपला समाज?

मी लहानपणी घरात एक प्रश्न  केला होता. असेन चौथी पाचवीत. घरात सगळेजण होते त्यावेळी. “ए आई गं, सांग ना मला, सगळेजण भांडायला लागल्यावर आईला वाईट वाईट शिव्या का देतात?” माझी आई, एक सामान्य मध्यमवर्गीय बाई, काही बोलली नाही. वडील मात्र ओरडले, “काहीतरीच काय विचारतेस? चलं, बसं अभ्यासाला. चला रे सगळे उठा इथून.” आम्ही पाच भावंड. फक्त नजरानजर झाली आमच्यात, उठलो. असं का? हा गोंधळ मनातला आणखीनच फुलला हे खरं. प्रश्न विचारणारी मी चुकले होते का? की इतक्या लहान वयात हा प्रश्न विचारायला लावणारा आजूबाजूचा समाज चुकीचा होता? नंतर, घरात फक्त मी आणि आई असताना आईच बोलली मला, “ अलके, असंच असतं गं बाईचं जीण. खूप सोसावं लागतं तिला.” तिचा आवाज कापरा, मला ओढलं तिनं कुशीत. का रडली आई? मला नाही समजलं तेंव्हा तरी. आता सगळा चित्रपट सरकतो डोळ्यांपुढे. तिला वाटलं,“ ही माझी लेक, मोठी होईल, आई होईलच. म्हणजे तिलाही शिव्याच खाव्या लागणार. कोणाच्याही, कितीतरी खंडीभर.” ते उत्तर आणि आईनं जवळ घेणं त्या बालवयात मला पुरलं. काही काळ डोक्यातून गेला तो प्रश्न. तरीही कुठेही, भांडण, शिव्या ऐकल्या की तो प्रसंग येतोच लगेच पुढ्यात.

कोणाला माहित असेल माझ्या प्रश्नांचे उत्तर तर सांगाल? का शिव्या दिल्या जातात आयाबहिणींवरून? त्याच्या विरोधात ना कोणी आवाज उठवला, ना संप, ना मोर्चा, ना निदर्शने, ना उपोषण, ना काळी फीत, ना मूक  धरणं. साधा निषेधही कोणी कधी कोठे नोंदविला नाही. बेवारस पडल्यात आया, उठसुठ कोणीही बोंबलावं तिला शिव्या देत तारस्वरात वरच्या पट्टीत. उचलली आणि लावली टाळ्याला. हासडल्या एका पाठोपाठ लाखोल्या. सहज झटकले हात. तोंड की गटार म्हणावं याला? एकीकडे सटीसामाशी आईचे गोडवे गायचे आणि कुठे थोडं मनाविरुद्ध झालं, खुट्ट होऊन तंत्र बिनसलं की चव्हाट्यावर टांगायची. तिचा त्या भांडणाशी सुतराम संबंध नाही, तिला माहित सुद्धा नाही काय झालं आहे ते, तरीही तिची उचल बांगडी करायची आणि आपटायची दगडावर उभ्या जोरानिशी पटापटा. तंबाखूची पिंक मारायची, बाह्या सरसावायाच्या, फुकटच्या मिसरुडाला पीळ देतं पाय आपटीत चालायचं. किळसवाणे ओंगळ व्यभिचाराच गल्लीच्छ दर्शन असते ते. काय पण मर्दुमकी गाजवली असाच तोरा, घसा कोरडा होईस्तोवर ओरडतोय शिव्या देत. त्याच्या आईला, माझ्या आईला, समद्या आयांना.

तमाम साऱ्या आयांना हे ऐकताना मान खालीच घालावी लागते. तो काळिमा ती मुकाट ऐकून घेते. कोण लागणार त्या नराधमाच्या नादी. एका क्रूर राक्षसी मनोवृत्तीपुढे ती प्रेमळ हळवी मूर्ती उभी राहूच शकत नाही. हे कडू जहाल विषारी सत्य पचवीत आहेत महिला, माता भगिनी. त्यात भरच पडत चालली दिवसेंदिवस. उलट, संस्कारांची ऐशीतैशी होते म्हणून ओरडायच आईच्याच नावाने. आणि स्वत: वक्तव्य तसेच  करायचे. सुसंस्कृत घरांच्या उंबर्याच्या आत आलेले शब्द अवमान करणारेच आहेत. त्या मालिका, ते सिनेमे, ते हिरोहिरोइन्स काय कसं बोलतात? दोनचार सांगतेच इथे – ‘मॉं की साकीनाका – एक हास्यविनोद कार्यक्रम’, ‘तेरी मॉं की आँख – चित्रपट रंग दे बसंती’, ‘आईचा घो’, ‘आईच्या गावा’, ‘च्यायला’ हे तर सर्रास. एखादा शहाणा म्हणेल, दुनियेत इतका भ्रष्टाचार, व्यभिचार, अनर्थ, अव्यवहार, असंस्कृतपणा, अनागोंदी, हे हे असे बोकाळलं आहे, त्यात आईवरून शिव्या म्हणजे अगदी किरकोळ बाब. त्यात काय एव्हढं? त्यात फेसबुक, व्हॉट्सअॅप ने भर घातली. काय काय फोर्वार्ड्स असतात बायकांच्या चेष्टेचे. तशा आईवरच्या कविताही असतात. त्या नसल्यातरी चालतील, पण हे गल्लीच्छ आवरा.

तमाम सर्व आया बहिणींना सांगावेसे वाटते. मातृ दिनाचे निमित्ताने काहीजण कदाचित ठरवतील शिव्या अशा द्यायच्या नाहीत म्हणून. कदाचित ही एका आईची खोटी निष्फळ आशा असेल. तरीही, चांगल्याची आशा मन करतेच. काहीजण सुधारतील असे म्हणू यात. पण, आपण बायकांनी इथून पुढे तरी शिव्या खायच्या नाहीत असे ठरवावे. वेडे वाकडे मेसेजेस पाठविणाऱ्यांना, पोस्ट करणाऱ्यांना  चांगलेच फटकारले पाहिजे सगळ्यांनी. घरात  रणचंडिचाच अवतार घ्यावा. घरातल्यानेच आईवरून शिवी दिली आपल्याला तर चांगलं सुनवावं. घराघरात हे संस्कार आवश्यक आहेत आई म्हणजे मुलांना वळण लावणारी, पहिले गुरुपद आईकडे जाते. तेंव्हा मुलांना, विशेष करून पुरुष वर्गाला वाईट बोलायचेच नाही, जिभेला डाग देईन अशी कडक ताकीद, आणि शिक्षा करायला पाहिजे. त्याचबरोबर, काय चांगले काय वाईट याची पारख करायला आपणच शिकवायचे असे मुलांना. त्याची जीभ झडली पाहिजे आईवरून शिवी देताना. असा धाक हवा आपला घरात. एकेक करीत सगळी घरे जर सुधारली, एकच संस्कार पुढील पिढीवर, आणि एकेक फटकार आत्ताच्या पिढीवर केला प्रत्येक स्त्रीने तर आया बहिणींवरून शिव्या देणे कमी होईल. नाहीतर, नवीन आलेल्या सरकार दरबारी हे ही सुधारायची आवश्यकता आपल्या देशाला आहे. हे गाऱ्हाणे घेऊन जायला पाहिजे. यासाठी कुठलाही कायदा नाही, तो करायला पाहिजे.

असं कसंही असू देत आपलं जीण. आपण आयांनी ते आनंदाचं करून घेऊ यात. तशाच जगत असतो, आतल्याआत मरत मरत, तेच बदलायचा प्रयत्न करू यात. त्यासाठी आजच्या मातुदिनाचे निमित्ताने मी शुभेच्छा देते. --वंदना धर्माधिकारी.Vandana10d@yahoo.co.in M : 9890623915 पत्ता: 25,  तेजस सोसायटी, चैतन्य बिल्डींग, तेजसनगर, कोथरूड, पुणे 411038.













Friday, April 22, 2016

64. Prabhat - वसुंधरे, तुझ्याचसाठी



22-04-2016

प्रभात – रूपगंध पुरवणी – लेखांक ५ - जागतिक वसुंधरा दिवस
वसुंधरे, तुझ्याचसाठी
लेखिका  :  सौ.वंदना विजय धर्माधिकारी



संतांसी जाई शरण त्यासी म्हणती साधक
निसर्गसौंदर्याचे आम्ही सारे उपासक
ऋतु सहा पण तू सर्वांची पहिली पसंत
'
वसुंधरेचा संत' म्हणोनी नाम तुझे 'वसंत'

मी शब्दबद्ध केलेल्या वसंतऋतू कवितेतल्या संताला प्रथम वंदन करून जागतिक वसुंधरा दिनावर लेख लिहायला घेते. निसर्गासह निसर्गाच्या सान्निध्यात मनसोक्त डुंबणार्याना  निखळ आनंद देणारा वसुंधरेचा हा संत. संत म्हणजे कोण? त्याचे काम काय असते? असा प्रश्न डोकावला मनात, तेच काम हा वसंत करतो का? ‘होय’. हेच उत्तर. चांगल्यांचे रक्षण, सुधारणा, वृद्धी, उत्पन्न, यासाठी जो सतत प्रयत्न करतो तोच संतपदास जातो. आहे त्याची जपणूक, सत सत प्रवृत्तींची पेरणी करून खतपाणी घालून सुंदर वृक्ष वाढवायचा. हेच तर वसंताचे कर्तव्य आणि तो तर कर्तव्यपालनदक्ष. नवीन पालवी डोकावते एखाद्या छोट्या मोठ्या वृक्षावर ती वसंतातच. नवपालवीचा नाजुकपणा, लुसलुशीत स्पर्श, त्यावरील बारीकबारीक रेषा, किंचित पारदर्शकता असे मनमोहक सौंदर्य  मनाला भुरळ घालतेच.  नवपल्लवी बाकीच्या पानांपेक्षा मोहक तर असतेच, पण वाऱ्याबरोबर तिचं नृत्य एखाद्या अवखळ बालीकेसारखे भावते. त्या बालिकेच्या डुलातील लोलक कधी चमकेल, सांगणे अवघड नव्हे कठीण. तसेच या पानाची तुकतुकी कधी चमकून आपल्याला खेचेल हेही ओळखणे अनाकलनीय असते. अशाच पानावर अलगद विसावलेला तो सूर्यकिरण बघताक्षणी चमकून टाकतो कोवळ्या पानाला आणि आपल्या संवेदनशील मनाला.  अतिशय चपळाईने पान डोलताना लक्षात येते ती वसंताची किमया. त्याने घडवून आणलेला पृथीच्या परिसराचा हिरवागार  तजेलदार कायापालट. आंब्यालाही मोहर आला, मोगर्याला कळी. दुःख सोडून फुलून आली हास्य चंपाकळी.
वसुंधरा दिन एकच दिवस कसा असू शकेल? ती वसुंधरा तर सतत, क्षणाचीही उसंत न घेता स्वत:भोवती फिरते, आणि त्या सूर्याला प्रदक्षिणा घालीत युगानुयुगे धावत आहे. सगळेच दिवस तिचे, पण किमान एक दिवसतरी त्याच वसुंधरेवर बागडणाऱ्या सर्वांनी साजरा करायलाच हवा वसुंधरेचा उत्सव. त्यानिमित्ताने जाणून घ्यावे तिला, कशी आहे, आधी कशी होती, बदलली का थोडी,  का बरं असं बदलावं तिनं, कशामुळे हे झालं. माणसामुळे? कि निसर्गानेच बदलवले तिला, या धरतीला. हा दिवस आहे तिच्याशी आपण कसे वागतो याचे आत्मपरीक्षणाचा, काही बदल करता आला तर त्याचा संकल्प सोडायचा. निसर्गाने आपल्याला  खूप काही दिले, तो देतच राहणार. देणे, दातृत्व हा तर निसर्ग नियम आहे. आपण काय करतो? जपून ठेवतो ती ठेव? आपल्याच पुढच्या पिढ्यांसाठी? शांत डोक्याने विचार केला, तर आतला आवाजच सांगेल काही तरी चुकतं आहे नक्कीच. त्याच चुकांची जाणीव सर्वांना व्हावी म्हणून करायचा वसुंधरा दिवस साजरा. चार गोष्टी शिकायच्या आणि वाचावायचे नैसर्गिक मूल्यांना, संपत्तीला.
अमेरिकेत १९६९ साली राष्ट्रीय पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा सरकारने राजकीय कार्यक्रमपत्रिकेवर प्रथम घेतला. निसर्ग संपत्तीचे रक्षणासाठी देशभर विविध प्रकारे  कार्यक्रम आयोजित करायचे ठरले. परिणामी २२ एप्रिल १९७० रोजी निरोगी, स्वच्छ आणि शास्वत पर्यावरणासाठी एका किनार्यापासून दुसर्या किनार्यापर्यंत, रस्त्यांवरून, बागांमधून लोकांनी फेऱ्या काढल्या, फलक धरले, घोषणा दिल्या. विविध सभागृहात मार्गदर्शनपर व्याख्याने दिली. निसर्ग श्रीमंतीची नासाडी करणाऱ्या गोष्टींचा कडक निषेध करण्यात आला. अनेकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हीच ताकद ठरली. कारखाने, उर्जा प्रकल्प, तेलगळती, विनाप्रक्रिया विघातक व विषारी पदार्थ तसेच फेकून देणे, कीटकनाशकांचा वाढता  वापर, जंगलतोड, मोकळ्या जागांची हाव, सृष्टीसंपत्तीचा नाश, पाणतळ्यांची अवहेलना, त्यात नको ते मिसळणे, अशा एक ना अनेक निसर्गद्वेष्ट्या कृतीना पायबंद घालण्याचा निश्चय करूनच नागरिक रस्त्यावर आले होते. “Save earth - वसुंधरा वाचवा.” तोच २२ एप्रिल १९७० चा दिवस, ज्या दिवशी अमेरिकेचे सिनेटर गेलॉर्ड नेल्सन यांच्या नेतृत्वात ‘पहिला जागतिक वसुंधरा दिवस’ साजरा केला गेला. २००९ साली संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले, तेंव्हापासून उत्सवाचे स्वरूप सर्वव्यापक झाले. गरीब श्रीमंत, गावकरी, शेतकरी, उद्योजक, राजकारणी सर्वांनी दिलेल्या पाठींब्याने एकमताने “युनायटेड स्टेट्स एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन एजन्सी” ची स्थापना झाली. त्यापाठोपाठ स्वच्छ हवापाणी, जंगल रक्षण, नामशेष होऊ पाहणाऱ्या प्रजातींचे रक्षण यासाठी विशेष कायदे केले गेले. आवश्यकतेनुसार त्यात बदल, भर घातली गेली. याचा अर्थ योग्य प्रकारे कायदा पालन होतेच असे नाही.

वसुंधरेची काळजी घेण्यासाठी ‘अर्थ डे नेटवर्क – EDN” ही संस्था जगभर  पर्यावरणविषयक जागृतीला चालना देते, एक चळवळ त्यांनी उभी केलेली आहे. आंतरराष्ट्रीय किमान २२ हजार संघटना यांच्या सभासद असून एकमेकांशी संपर्कात राहून कार्य करीत आहेत. पृथ्वी, पर्यावरण,समस्या, विचार, योजना, कृती असे सर्वांगाने लक्ष घातले जाते. २०१५ साली ‘अर्थ डे नेटवर्क’ ने सगळ्यांना आवाहन केले ते ‘आता नेतृत्वाची वेळ आपलीच’ या वाक्याने. कुठल्या देशाने काय केले, यावर चर्चा आणि उहापोह होईलच वसुंधरा दिनी. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने काय केले पाहिजे हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. आपणच काहीतरी केले पाहिजे - हाच निरोप आहे सगळ्यांना.

पृथ्वी स्वत:भोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते. स्वत:भोवतीची एक गिरकी म्हणजे एक दिवस. संपूर्ण सूर्य प्रदक्षिणा म्हणजे ३६५ दिवस-एक वर्ष. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना तिचा अक्ष काटकोनात नसतो, तर २३.५ अंशाने तो कललेला आहे. त्यामुळे सूर्यकिरण पृथ्वीवर पडताना कमीअधिक प्रमाणात तिरपे पडतात. त्याने सगळेच दिवस सगळ्या ठिकाणी सारखे नसतात. यालाच ऋतू बदल म्हणतात. भारताकडे ऋतूंची श्रीमंती आहे. एकुणात सहा ऋतू आपण मानतो. आपल्या देशात शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद आणि हेमंत  असे सहा ऋतू आहेत. भारतभूला नद्या नाले, पर्वत शिखरे, डोंगर दर्या, समुद्रकिनारा, उंचसखोलता असे मुबलक वैविध्य आहे. तसेच विस्तृतपणे पसरलेला भूभाग वैविध्यापूर्ण हवामानाने सुंदर सुंदर छटा सोडीत जातो. जे चित्र एका दिवशी काश्मीर मध्ये दिसेल, तसेच खाली कन्याकुमारीला नसते. हेच वैविध्य सांभाळणे, पृथ्वीचा समतोल राखणे ही जबाबदारी एक जबाबदार नागरिक या नात्याने प्रत्येक व्यक्तीची आहे. निसर्ग दोन्ही हातांनी अगदी मुक्तपणे मनापासून पृथ्वीवरील रहिवाश्यांना देत आलेला आहे, देत आहे, आणि देईलही. त्याचे सुरवातीपासून जे चालत आलेले आहे, त्यात खंड नाही. बदल केला, चुका केल्या, त्रास दिला, अजूनही देत आहे तो माणूस. इतर ग्रहांवर मानवसृष्टी   आहे किंवा नाही हे माहित नाही. पृथ्वीवरील मानव जमांत मात्र आपल्याच गुर्मीत निसर्गाची धूळधाण करू लागली. हेच संहारचित्र कलियुगातील काळे कुट्ट चित्र आहे. कोण नासाडी करते या निसर्ग संपत्तीची? मी, तुम्ही आणि तो. याला तमाम सर्व मानवजात जबाबदार आहे. माणसाने इतर पशुपक्ष्यांना आपल्या कह्यात घेतले, गरीब बिचारे एकेक करीत संपत चालले. अनेक पशु पक्षी कीटक यांच्या अनेक जातीजमाती संपून गेल्यात. असे जर राहिले तर मनुष्य जमातीच्या अस्तित्वाचे ग्वाही कोणीही देऊ शकणार नाही. हे कटू सत्य सगळ्यांना स्वीकारावेच लागेल.
पाणी, हवा, प्राणवायू यांचे शिवाय कोणीच जगू शकणार नाही. निर्जीव सजीव यांना संजीवनी देणाऱ्या या निसर्ग संपत्तीची वाताहत होताना सर्वसामान्य माणूस तटस्थ भूमिका घेतो. पाण्याच्या अभावी लोकांचे तोंडचे पाणी पाळलेले आपण सध्या रोजच तिन्हीत्रिकाळ बघत आहोत. माणसाला, निदान भारतीय जनतेला जलसाक्षर केले पाहिजे. त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. देशभरात सुमारे २००० नद्या आहेत. काहींचे प्रवाह झाकले गेले, काहींचे वळविले, पात्र संकुचित केले, मोठ्मोठ्ठले टॉवर्स उभारले, तर काहींची वाळू पळवून नेली.ज्यांना ते नाही जमले त्यांनी कारखान्यातील दुषितरसायन मिश्रित पाणीच नदीत सोडले. तेच पाणी जमिनीत मुरते, जमिनीचा कस गेलाच. प्लास्टिक, कचरा, कुजलेला भाजीपाला, निर्माल्य हे तर जणू नदीतच टाकायचं असतं. म्हणजे एकुणात काय, तर नदी खराब होण्यासाठी प्रत्येकजण आपला सहभाग नोंदवीत आहे. त्यांनी नदी स्वच्छ करण्याचे कामी सुद्धा हातभार लावावा. नदी मिळते समुद्राला. समुद्रातील सगळे जलचर जलसमाधी घेऊन समुद्रकिनारी लाखोंच्या संख्येने मृतावस्थेत आढळतात. अशा किती तरी जाती नष्ट झालेल्या आहेत. केवळ जलचर नाहीत, तर जंगल तोडीमुळे वन्य प्राण्यांना जगणे अशक्य होते. सस्तन प्राणी, सरपटणारे, जलचर, पक्षी, यांची संख्या कमी होत चालली. माणसाची संख्या वाढताना दिसते. नुसती संख्या, पण निसर्गाची जाण बाळगली जात नाही हीच शोकांतिका आहे.
या वसुंधरा दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्या वसुंधरेला बघा, तिची काळजी घ्या, मिळालेला निसर्गरम्य ठेवा, निसर्गाची जपणूक करा, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी जपून वापरा. टाकाऊ पण न विरघळणार्या वस्तूंचा पुनर्वापर करा. प्लास्टिक, थर्मोकोल, दुषित रसायने व वायू   वापरणे बंद करा किमान कमीतकमी वापरा. वस्तूंचे पॅकिंग वेगळ्या पद्धतीने करा, जेणेकरून अविघटीत कचरा वाढणार नाही. विजेची बचत करा, सौर उर्जा वापर वाढवा. प्रदूषण कमी करण्यासाठी कमीतकमी वाहनांचा वापर करा. सुखी, आरोग्य संपन्न, समृद्ध जीवन स्वत:ला आणि आपल्या पुढील अनेक पिढ्यांना द्यायचे असेल तर, पर्यावरण जपणूक पाहिजे. स्वच्छ, शुद्ध, समृद्ध वसुंधरा जिवंत ठेवणे हे मानवाचे प्रथम कर्तव्य आहे. कर्तव्यदक्ष राहा, निसर्गाशी कृतघ्नपणे वागू नका. खोट्या सुखसमृद्धीच्या हव्यासापोटी लाभलेले ऐश्वर्य पायदळी तुडवू नका.
फुकट मिळालेल्या संपत्तीची योग्य देखभाल जर केली नाही तर तो निसर्गावर केलेला अन्याय असेल. अन्याय असह्य झाला तर हा निसर्ग कोपतो तो आपले रौद्र रूप अधून मधून दाखवीत असतोच. मानवाने किती जरी बढाया मारल्या तरी आपल्यापेक्षा निसर्ग अधिक बलवान, अधिक लहरी आहे याची जाणीव माणसाला आहे. नुसते ज्ञात असून काय उपयोग, त्यानुसार  कृती करताना आपली बुद्धी गहाण टाकूनच तो वागतो. त्याने निसर्गाची नासधूस  तर राजरोस सुरु केलीच आहे. तीच थांबवली पाहिजे. पृथ्वी आपल्यासाठी थांबलेली आपणास माहित आहे? कदाचित माहित नसेल अनेकांना.
होय, पृथ्वीने  आपल्यासाठी, तिच्यावर असलेल्या सजीव प्राणीमात्रांसाठी खूप मोठा त्याग केलेला आहे. असेल ती कवी कल्पना, पण त्यापासून खूप काही शिकायचे ते याच दिवशी, वसुंधरा दिनाचे दिवशी. कुसुमाग्रज म्हणजे श्री.विष्णू वामन  शिरवाडकर यांची एक कविता आहे, ‘पृथ्वीचे प्रेमगीत’. पृथ्वीचे आणि सूर्याचे प्रेमाचे नाते आहे. पहिल्या कडव्यात वसुंधरा प्रियकर सूर्याला म्हणते :
युगामागुनी चालली रे युगे ही, करावी किती भास्करा वंचना
      किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना

तीच विरहिणी वसुंधरा खूप बोलते सूर्याशी, आणि एका क्षणी तिला आठवतात तिच्या अंगा खांद्यावर खेळणारे सारे आपण. मिलनास आतुर असलेली ती पृथ्वी शेवटी म्हणते, ‘नको मिलन, विरहच बरा.’
ती म्हणते सूर्याला :  परी दिव्य ते तेज पाहून पुजून,  घेऊ गळ्याशी कसे काजवे
                 नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा,  तुझी दूरता त्याहुनी साहवे.



वंदना धर्माधिकारी
M: 9890623915








                       

     







Camera is a responsive/adaptive slideshow. Try to resize the browser window
It uses a light version of jQuery mobile, navigate the slides by swiping with your fingers
It's completely free (even though a donation is appreciated)
Camera slideshow provides many options to customize your project as more as possible

Here is a video for National Webinar on IBPS Exam. Guidance by Smt.Vandana Dharmadhikari on 17th July, 2020 

vandanadharmadhikari.blogspot.com