“मातृ देवो भव!’ ही भारतीय संकृती. आईचा सन्मान विविध प्रसंगी
केला जातोच. अमेरिकेचे तत्कालीन ‘राष्ट्रपती-वूडरो विल्सन’ यांनी १९१४ -मे महिना,
दुसरा रविवार हा मदर्स डे म्हणून जाहीर केला . तेंव्हापासून अमेरिकेत, आणि नंतर
हळूहळू जगभर हाच दिवस ‘मदर्स डे – मातृदिन’
म्हणून साजरा होऊ लागला. तेच आता आपल्यादेशात होत आहे.
आई म्हणजे जन्मदात्री. तिची
ओळख असतेच सगळ्यांना, काय वेगळं सांगायचं आई बद्दल? तरीही थोडं वेगळं आईचं रूप बघू
यात आजच्याच दिवशी. बघा, वाचा, पटलं तर
बदला, नाही पटलं तरी किमान आईसाठी तरी बदल करा. आग्रह नाही, विनंती सुद्धा नाही.
आई ही आईच असली तरीही तिला
चांगली आई, वाईट आई अशी लेबल्स लावली जातात. असं का होतं?
एखादीची माया पातळ असते? की
तिला मुलांचा तिरस्कार वाटत असतो? आईची माया पातळ व्हायला सुद्धा काही कारणं होत
असतील का? हाताची पाची बोटं सारखी नसतात. तसंच! किती जरी सगळी मुलं आईला सारखी
असली, तरी घोडं आपल्या गुणावर पेंड खातं म्हणतात तसंच आई सुद्धा डावं उजवं करते.
हे खरं आहे. आई म्हणून वावरताना काही किमान गोष्टींचे भान आईला असणं अत्यंत
महत्वाचे असते. पण प्रत्येक आईला ते असतेच असे नाही. आईच्या हातूनही चुका होत
असतात, त्यालाही माफ करायला इतरांना जमतेच असे नाही. आई आहेस ना, म्हणजे तिने
केलेच पाहिजे सगळ्यांचे सगळे, अशी अपेक्षा करून तिला गृहीत धरले जाते. त्यावेळी
तिची फक्त कानकोंडी अवस्था होते. तिलाही वाटत असते, नवऱ्याने किमान हे तरी काम
करावे. मुलांनी जातायेता होतील ती
बाहेरची, आणि थोडीफार घरातली कामे नको का बघायला? तिच्याही काही अपेक्षा असतात
इतरांकडून, पण बऱ्याच वेळा त्यांची दखल कोण घेतं. आईचे कौतुक नक्कीच व्हायला
पाहिजे, तिची जपणूक, विचारपूस, काळजी, हवंनको, औषधपाणी, तिच्या भावना, आदर, गरज हे
सर्वच्या सर्व तिने स्वत: तर बघितलेच
पाहिजे. त्याचबरोबर घरातील इतर, घर प्रमुख तिचा नवरा, त्यापाठोपाठ सासूसासरे,
आईवडील, मुलं सुना, जावई या सर्वांची
जबाबदारी आहे आईच्या या गोष्टींची पूर्तता करण्याची.
मुद्दा आहे चांगली आई आणि
वाईट आई याचा. चांगुलपणाच्या कल्पना आई, वडील, मुले आणि घरातील इतर म्हणजे
आजीआजोबा अशा सर्वांच्या वेगळ्या असल्यावर एकाच पद्धतीने तिच्या चांगुल पणाचे मूल्यमापन कसे होणार? असेल व्याख्या वेगळी
वेगळी, पण आईला स्वत:च्या मनासारखे मुलं वाढविण्यासाठी स्वतंत्र विचारशक्ती असली
तरीही तशी मुभा मिळते घरातून? कित्येक घरात तर तिला विचारले देखील जात नाही.
निर्णय क्षमता जणू तिच्याकडे नसतेच, मग विचारा
कशाला? काय कळतं तिला? हा सूर पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रथम वाक्य आहे.
बायकांना अक्कल नसते. हे इतके बिंबविले गेले आहे, की बायका किती जरी शिकल्या, धीट
झाल्या, तरी त्यांना नामोहरम करणारी ही पुरुषप्रधानता तिचे खच्चीकरण केल्याशिवाय
राहत नाही. अगदी स्वत:ला सुशिक्षित सुशिक्षित म्हणवणारे देखील, बायकांचे पाय मागेच
ओढत असतात, तिने काही विशेष केल्यास त्यास दाद देणे, म्हणजे तिला डोक्यावर चढविणे
वाटते ह्या नवरोबांना. प्रोत्साहन देवून तिच्या गुणांची कदर झाली एखाद्या घरात तर
त्या गृहलक्ष्मीचे महत भाग्य होय.
अशावेळी सांगावेसे वाटते, आई म्हणजे आत्मा अधिक ईश्वर याचंचे मिश्रण. जिथे
मीत्व, स्वत्व विरघळून केवळ आई एक माऊली हीच भावना तग धरते ती. माऊली म्हणजे
मावळलेल्या मी पणाची महन्मगल मूर्ती आई.
माउली असते प्रेम, माया, ममता, वात्सल्य, अर्पणभाव, अपेक्षारहित कृती, सर्वस्व
देणारी. आईचे प्रेम, कृती, परिणाम, साफल्य, त्याचे कार्य हे सगळं माया ममता यांनी
ओथंबलेले असते. ज्या मातेकडे ज्ञान आणि जिव्हाळा दोन्ही आहे तिला माऊली म्हणतात.
संत ज्ञानेश्वर आपले माऊली आहेत, तिथे प्रेम, ज्ञान आणि जिव्हाळा तिन्हीचे
एकत्रीकरण आहे. ते माउलीचे प्रतिक आहेत.
आई आणि मुलं यांचा श्वास एक असतो. मुलं तिचं अपत्य असतं. अ-पत्य, म्हणजे
ज्याचे पतन, खाली पडणे होणार नाही असे ते नाते. ती आपल्या बाळाला खाली पडू देत नाही. त्याला पोटात
तर वाढवते नऊ महिने, आणि त्यानंतर त्याला कवटाळून राहते, आपल्या पोटाशी, छातीशी,
कडेवर, मांडीवर अगदी घट्ट घट्ट धरते बाळाला. स्तनपान करताना बाळ ज्या प्रकारे आईला
धरून ठेवतो, ते वर्णन करणं माझ्या लेखणीच्या क्षमतेच्या बाहेर आहे. दुदू पिणार बाळ आणि आई, दैवी मिलन असते ते. आईचे
प्रेम हे असे स्वयंप्रकाशित आणि स्वयंपूर्ण असते. त्यात तिच्या अंतरात्म्याचा
प्रकाश असतो, ज्याने ती बाळाला स्वयंपूर्ण बनविते. बाळ मोठं होताना ते पडलेलं,
खाली गेलेलं, त्याचे अध:पतन होत असलेलं आई पाहू शकत नाही. कायम ती त्याला सावरायला
जाते. पडला तरी त्यातून काय शिकायचं ते आई
सांगते, तोच एक संस्कार असतो, सुसंस्कार मुलांवर. अपत्यांचे सुख दु:ख तिचे स्वत:चे
असते. आईचे स्वत:चे अस्तित्व धूसर असते. कायम मुलांचे भोवती तिचे मन घुटमळत असते. अशी
असते आई. स्त्री या शब्दाचे विश्लेषण महाभाष्यकार पतंजली यांनी “स्त्यायति अस्यां
गर्भ: इति” केलेले आहे. जिच्या शरीरात गर्भ आहे ती, गर्भाशय धारण करणारी. जिच्या
जीवनाला मातृभावाव्यतिरिक्त दुसरे वैशिष्ट्य नाही. हे सत्य आहे. म्हणतात ना स्त्री
ही क्षणाची पत्नी आणि अनंतकालची माता असते. वात्सल्य हा तिचा हृदयरस, स्त्री धर्म
आहे. म्हणूनच स्त्री आपला भाऊ, वडील, पती यांच्याकडेही वात्सल्याने बघते.
पतीत्वाने घेतलेला उपभोग हा त्या क्षणाचा असतो, क्षणभंगुर असतो. तिची पती बद्दल
वात्सल्य भावना ही नेहमीच कामुकतेच्या भावनेपेक्षा पटीने अधिक असते. स्त्री ही
परमेश्वराची सर्वात सुंदर निर्मिती आहे. त्यात आईचे भावमाधुर्य आहे. उगीच नाही
म्हणतं, एक तरी मुलगी असावी. तीच पुढे आई होते ना. म्हणून मुलगी पाहिजे, तिचा लळा
हवा, हट्ट तर लागतोच, आई बाबांचा जीव की प्राण असलेलं कन्यारत्न. ती जेंव्हा आई
होते, तेंव्हा आजी आजोबा होणं, तिचं
बाळंतपण करणं यामधील आनंद जो कोणी उपभोगतो त्यालाच माहित त्याचे सौदर्य, ठेव,
महात्म्य, ओलावा, आत्मीयता, कर्तव्य आणि लडिवाळता.
इतके सगळे गोडवे त्या मातृत्वाचे गायले जातात. असे हे पवित्र, दैवी, आधारभूत
मातृत्व पायदळी तुडवताना कोणाला लाज, लज्जा, शरम काहीच वाटत नाही, याचेच दु:ख आजही
अनेक मातांना भोगावे लागतं आहे. एक दिवस पूजा करायची आणि दुसऱ्या दिवशी पाद्यपूजा
करून जोड्यानं मारायचं. ही कुठली संस्कृती. नका करू आईचे कौतुक, नको तिला कविता,
पूजा, महात्म्य गाणाऱ्या ओव्या. तुमचे नकली अश्रू तिच्यासाठीचे, तिच्यासाठी
भेटवस्तू, काही काही काही नको असते आईला. किमान एक माणूस म्हणून माणुसकीची वागणूक, प्रेम,
ओलावा तिला देऊ केलात, तरी तेव्हढे तिला पुरेसे असते. ती तेव्हढ्यावर आपलं सर्वस्व देऊ करते,
नवऱ्याला, मुलांना, संपूर्ण घरादाराला अगदी पै-पाहुण्यांसकट, अधिकच्या संकटांना झेलतं, डोंगरभर कष्ट उपसत, ते सुद्धा न कुरबुर करता, न भांडता, पूर्ण
ताकदीनिशी, सर्वस्व पणाला लावून. इतके मोलाचे दातृत्व खचितच कोणाचे असेल. याला ना
किंमत ना कोणाला जाणीव तिच्या देण्याची, तिच्या कष्टांची. तसूभर परतफेडीची सुद्धा अपेक्षा
नसते आईची, जर तिला चांगले वागवले
तर तिला खरोखरीच काही म्हणजे काहीच नको
असते. नवऱ्याकडून, मुलांकडून, समाजाकडून सुद्धा. प्रेमाने मिळालेले चार शब्द तिला
ताकद देतात इतर सर्व कर्तव्ये पुरविण्यासाठी. अशावेळी प्रयत्नांची पराकाष्ठा
ती करते, घरादाराचे आनंदवन फुलत राहते, वर्षानुवर्षे अनंतकाळ. त्याच्या स्मृती ती
गेल्यावर सुद्धा आनंदाचीच बरसात करीत राहतात प्रत्येकाच्या मनात, आठवणीत. असे
असूनही, किती अवहेलना, राग राग, मत्सर, घृणास्पद नजर, मार, अपमान, विषारी बाण,
घाणेरडी भाषा, शिव्या सहन करावे लागते आईला. असं का? कधी सुधारणार आपला समाज?
मी लहानपणी घरात एक प्रश्न केला होता.
असेन चौथी पाचवीत. घरात सगळेजण होते त्यावेळी. “ए आई गं, सांग ना मला, सगळेजण
भांडायला लागल्यावर आईला वाईट वाईट शिव्या का देतात?” माझी आई, एक सामान्य
मध्यमवर्गीय बाई, काही बोलली नाही. वडील मात्र ओरडले, “काहीतरीच काय विचारतेस?
चलं, बसं अभ्यासाला. चला रे सगळे उठा इथून.” आम्ही पाच भावंड. फक्त नजरानजर झाली
आमच्यात, उठलो. असं का? हा गोंधळ मनातला आणखीनच फुलला हे खरं. प्रश्न विचारणारी मी
चुकले होते का? की इतक्या लहान वयात हा प्रश्न विचारायला लावणारा आजूबाजूचा समाज
चुकीचा होता? नंतर, घरात फक्त मी आणि आई असताना आईच बोलली मला, “ अलके, असंच असतं
गं बाईचं जीण. खूप सोसावं लागतं तिला.” तिचा आवाज कापरा, मला ओढलं तिनं कुशीत. का
रडली आई? मला नाही समजलं तेंव्हा तरी. आता सगळा चित्रपट सरकतो डोळ्यांपुढे. तिला
वाटलं,“ ही माझी लेक, मोठी होईल, आई होईलच. म्हणजे तिलाही शिव्याच खाव्या लागणार.
कोणाच्याही, कितीतरी खंडीभर.” ते उत्तर आणि आईनं जवळ घेणं त्या बालवयात मला पुरलं.
काही काळ डोक्यातून गेला तो प्रश्न. तरीही कुठेही, भांडण, शिव्या ऐकल्या की तो
प्रसंग येतोच लगेच पुढ्यात.
कोणाला माहित असेल माझ्या प्रश्नांचे उत्तर तर सांगाल? का शिव्या दिल्या जातात
आयाबहिणींवरून? त्याच्या विरोधात ना कोणी आवाज उठवला, ना संप, ना मोर्चा, ना
निदर्शने, ना उपोषण, ना काळी फीत, ना मूक धरणं.
साधा निषेधही कोणी कधी कोठे नोंदविला नाही. बेवारस पडल्यात आया, उठसुठ कोणीही
बोंबलावं तिला शिव्या देत तारस्वरात वरच्या पट्टीत. उचलली आणि लावली टाळ्याला.
हासडल्या एका पाठोपाठ लाखोल्या. सहज झटकले हात. तोंड की गटार म्हणावं याला? एकीकडे
सटीसामाशी आईचे गोडवे गायचे आणि कुठे थोडं मनाविरुद्ध झालं, खुट्ट होऊन तंत्र
बिनसलं की चव्हाट्यावर टांगायची. तिचा त्या भांडणाशी सुतराम संबंध नाही, तिला
माहित सुद्धा नाही काय झालं आहे ते, तरीही तिची उचल बांगडी करायची आणि आपटायची
दगडावर उभ्या जोरानिशी पटापटा. तंबाखूची पिंक मारायची, बाह्या सरसावायाच्या,
फुकटच्या मिसरुडाला पीळ देतं पाय आपटीत चालायचं. किळसवाणे ओंगळ व्यभिचाराच
गल्लीच्छ दर्शन असते ते. काय पण मर्दुमकी गाजवली असाच तोरा, घसा कोरडा होईस्तोवर
ओरडतोय शिव्या देत. त्याच्या आईला, माझ्या आईला, समद्या आयांना.
तमाम साऱ्या आयांना हे ऐकताना मान खालीच घालावी लागते. तो काळिमा ती मुकाट
ऐकून घेते. कोण लागणार त्या नराधमाच्या नादी. एका क्रूर राक्षसी मनोवृत्तीपुढे ती
प्रेमळ हळवी मूर्ती उभी राहूच शकत नाही. हे कडू जहाल विषारी सत्य पचवीत आहेत
महिला, माता भगिनी. त्यात भरच पडत चालली दिवसेंदिवस. उलट, संस्कारांची ऐशीतैशी
होते म्हणून ओरडायच आईच्याच नावाने. आणि स्वत: वक्तव्य तसेच करायचे. सुसंस्कृत घरांच्या उंबर्याच्या आत
आलेले शब्द अवमान करणारेच आहेत. त्या मालिका, ते सिनेमे, ते हिरोहिरोइन्स काय कसं
बोलतात? दोनचार सांगतेच इथे – ‘मॉं की साकीनाका – एक हास्यविनोद कार्यक्रम’, ‘तेरी
मॉं की आँख – चित्रपट रंग दे बसंती’, ‘आईचा घो’, ‘आईच्या गावा’, ‘च्यायला’ हे तर
सर्रास. एखादा शहाणा म्हणेल, दुनियेत इतका भ्रष्टाचार, व्यभिचार, अनर्थ, अव्यवहार,
असंस्कृतपणा, अनागोंदी, हे हे असे बोकाळलं आहे, त्यात आईवरून शिव्या म्हणजे अगदी
किरकोळ बाब. त्यात काय एव्हढं? त्यात फेसबुक, व्हॉट्सअॅप ने भर घातली. काय काय
फोर्वार्ड्स असतात बायकांच्या चेष्टेचे. तशा आईवरच्या कविताही असतात. त्या
नसल्यातरी चालतील, पण हे गल्लीच्छ आवरा.
तमाम सर्व आया बहिणींना सांगावेसे वाटते. मातृ दिनाचे निमित्ताने काहीजण
कदाचित ठरवतील शिव्या अशा द्यायच्या नाहीत म्हणून. कदाचित ही एका आईची खोटी निष्फळ
आशा असेल. तरीही, चांगल्याची आशा मन करतेच. काहीजण सुधारतील असे म्हणू यात. पण,
आपण बायकांनी इथून पुढे तरी शिव्या खायच्या नाहीत असे ठरवावे. वेडे वाकडे मेसेजेस
पाठविणाऱ्यांना, पोस्ट करणाऱ्यांना
चांगलेच फटकारले पाहिजे सगळ्यांनी. घरात
रणचंडिचाच अवतार घ्यावा. घरातल्यानेच आईवरून शिवी दिली आपल्याला तर चांगलं
सुनवावं. घराघरात हे संस्कार आवश्यक आहेत आई म्हणजे मुलांना वळण लावणारी, पहिले
गुरुपद आईकडे जाते. तेंव्हा मुलांना, विशेष करून पुरुष वर्गाला वाईट बोलायचेच
नाही, जिभेला डाग देईन अशी कडक ताकीद, आणि शिक्षा करायला पाहिजे. त्याचबरोबर, काय
चांगले काय वाईट याची पारख करायला आपणच शिकवायचे असे मुलांना. त्याची जीभ झडली
पाहिजे आईवरून शिवी देताना. असा धाक हवा आपला घरात. एकेक करीत सगळी घरे जर
सुधारली, एकच संस्कार पुढील पिढीवर, आणि एकेक फटकार आत्ताच्या पिढीवर केला
प्रत्येक स्त्रीने तर आया बहिणींवरून शिव्या देणे कमी होईल. नाहीतर, नवीन आलेल्या
सरकार दरबारी हे ही सुधारायची आवश्यकता आपल्या देशाला आहे. हे गाऱ्हाणे घेऊन जायला
पाहिजे. यासाठी कुठलाही कायदा नाही, तो करायला पाहिजे.
असं कसंही असू देत
आपलं जीण. आपण आयांनी ते आनंदाचं करून घेऊ यात. तशाच जगत असतो, आतल्याआत मरत मरत,
तेच बदलायचा प्रयत्न करू यात. त्यासाठी आजच्या मातुदिनाचे निमित्ताने मी शुभेच्छा
देते. --वंदना धर्माधिकारी.Vandana10d@yahoo.co.in M :
9890623915 पत्ता: 25, तेजस
सोसायटी, चैतन्य बिल्डींग, तेजसनगर, कोथरूड, पुणे 411038.
माऊली म्हणजे मावळलेल्या मी पणाची महन्मगल मूर्ती आई. - हे वाक्य खूप आवडलं. पोटच्या लेकरासाठी काहीही करायला आई तयार असते. ते या वाक्यातून मांडलं. लेख आवडला.
ReplyDeleteआई मुलांसाठी सर्वस्व सोडून देऊ शकते... तसाच इगो देखील. प्रभात मध्ये २०१६ मध्ये लेखमाला लिहिली. महिन्यातील दोन विशेष दिवसांवर लेख लिहित होते. त्यातला एक लेख हा... धन्यवाद!
ReplyDelete