नागरी बँक वार्तापत्र – जून २०१७ –
विमुद्रीकरण, कॅशलेस बँकिंग आणि
पर्यायी माध्यमे
लेखिका :: सौ.
वंदना विजय धर्माधिकारी
एखादा महत्वाचा ऐतिहासिक निर्णय अल्पकाळात संपूर्ण देशाला हादरून सोडतो. ८
नोव्हेंबर, २०१६ ह्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चलनातील रुपये ५००.- व
रुपये १०००.- च्या नोटा रद्द केल्याचे घोषित केले, चलनी नोटांचे विमुद्रीकरण
करण्याचा प्रचंड धाडसी निर्णय जाहीर केला. भारतातील काळा पैसा घालविण्यासाठी, खोट्या नोटांचा प्रचंड
पसारा, न आटोक्यात येणारा चलन फुगवटा यासर्वांवर मात करण्यासाठी विमुद्रीकरण –- demonetisation डीमोनिटीझेशन हा एकमेव उपाय समोर होता.
अल्पावधीतच देशाला कॅशलेस व्यवहार करायला भाग पाडले जात आहे. जगाच्या दृष्टीने
भारतासारख्या विस्तीर्ण मोठ्या देशाची संपर्ण आर्थिक सिस्टीम बदलताना त्याची जबाबदारी घेण्याचे
सामर्थ्य, धडाडी, पुढे होणारा विरोध सहन करायची तयारी, बिकट परिस्थितीतून मार्ग
काढून सर्व सुरळीतपणे व्हायला हवे त्यासाठी मोठ्या प्रमाणातील नियोजनबद्धता,
सुसूत्रता, अंमलबजावणी आणि असेच बरेच काही
या विमुद्रीकरण प्रक्रियेत
आवश्यक होते. योजनेच्या कामाचा आवाका बघता उत्तम रीतीने प्रक्रिया पूर्णत्वास नेली
गेली.ह्या टेकनॉलॉजी मध्ये भारत बराच मागे होता, तो झपाट्याने मुसंडी मारून पुढे
येत आहे, याचा अभिमान बाळगावा असेच देशात घडले आहे. सर्वसामान्य नागरिक विमुद्रीकरणावर खूष
आहे. त्रास झाला तरी तो अल्पावधीसाठी सगळ्यांनी सहन केला, कारण देशाच्या
भवितव्याच्या दृष्टीने हा बदल आवश्यक होता. सर्वांनी एकत्रितपणे दिलेला पाठींबा
मोलाचा आहे, देशप्रेमाची जणू एक लाट सर्वत्र दिसू लागली. अवैध्य व्यवहार, काळा
पैसा, दहशतवाद, मनी लॉंडरिंग, तस्करी, अशा वाईट गोष्टींना नक्कीच लगाम लावला गेला.
देशहित, समाजहित
लक्षात घेता इथून पुढे काळा पैसा जमा व्हायला नको, म्हणून कॅशलेस व्यवहार वाढीस
लावण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केंद्र तसेच राज्य सरकार, बँका, आणि समाज करीत
आहे. देशाची अर्थव्यवस्था प्रगल्भ होऊ घातली आहे. इथे अडचण आहे ती
अर्थनिरक्षरतेची. अजूनही देशातील ४०-४५% जनता बँक खाते वापरीत नाही. जन-धन योजने
अंतर्गत जरी खाते काढलेले असले तरीही व्यवहार मात्र रोखीनेच केले जातात. त्यामध्ये
बदल करणे, वा होणे हे जरी क्रमप्राप्त आहेच. अर्थव्यवस्था जागतिक लेव्हलला नेऊन
समृद्ध होऊ पाहत आहे.
साहजिकच प्रश्न येतो
हे कॅशलेस म्हणजे नक्की काय? अगदी सोप्प आहे ते. कॅशलेस म्हणजे ज्या व्यवहारात कॅश-रोख रक्कम-रोकडा दिला जात
नाही, तरीही अन्य मार्गाने व्यवहाराची पूर्तता केली जाते ते व्यवहार वा तशाप्रकारे
हाताळले जाणारे बँकिंग होय. ई-बँकिंग - इलेक्ट्रॉनिक बँकिंग कार्यप्रणालीचा सर्वत्र
बोलबाला होत आहे. बँकिंग पर्यायी माध्यमांच्यात वैविध्य असून त्याने कॅशलेस
व्यवहारास पुष्टी मिळाली आहे. संपूर्ण गावच्या गाव कॅशलेस झालेले आहे, आणि इतर
गावे त्याचीच री ओढू लागलेत. यामध्ये ज्याला पैसे द्यायचे आहेत त्याच्या बँक
खात्यातून रक्कम काढली जाते, डेबिट पडते आणि ज्याला पैसे देणे आहे त्याच्या
खात्यात ती जमा होते. त्यासाठीची अनेक पर्यायी माध्यमे पुढील प्रमाणे आहेत. तीच
आता वापरावी लागणार आहेत.
इलेक्ट्रोनिक बँकिंग
पर्यायी माध्यमे ::
रोख रक्कमेस सर्वात
जुना पर्याय म्हणजे चेक, डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर. चेकचे पेमेंट करायला १/२ दिवसाचा कालावधी जातो. रोखीच्या
ऐवजी यांचा वापर चांगलाच मुरला आहे, अंगवळणी पडलेला आहे. तरीपण, अनोळखी व्यक्तीशी व्यवहार करताना यात
थोडी जोखीम घ्यावी लागते. त्यासाठी ई-पेमेंटचा
पर्याय अतिशय सोयीस्करपणे वापरात येणारा आहे. त्याचे प्रकार पुढीलप्रमाणे
आहेत – प्लास्टिक मनी. (डेबिट/क्रेडीट/एटीएम कार्ड्स), NEFT/RTGS, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, IMPS, MMID. यासार्वांवर मात केली आहे. युपिआय – UPI –
Unified Payment Interface, भीम अॅप या कार्यप्रणालीने केली आहे. अगदी थोडक्यात
या सर्वांचा परिचय इथे होईल.
प्लास्टिक मनी –
यामध्ये डेबिट, क्रेडीट आणि एटीएम कार्द्सचा समावेश होतो. यांचेद्वारे खात्यातून
पैसे काढणे, पैसे भरणे, खात्याचे मिनी स्टेटमेंट मिळवणे, चेकचे पेमेंट थांबविणे,
पिन बदलणे, अशी काही कामे केली जातात. कार्डचा वापर बर्यापैकी रुळलेला आहे,
लोकांच्या अंगवळणी पडलेला आहे. कार्डचा स्वीकार बहुतांशी लहान मोठ्या दुकानांमध्ये
केला जातो. पेट्रोल पंप, मॉल्स, दुकाने, विविध प्रकारचे बुकिंग, विशिष्ट सेवा,
रेल्वे सिनेमा बुकिंग, त्याचप्रमाणे ऑनलाईन खरेदी
व्यवहार करता येतात. दरमहा कार्ड पेमेंटचे स्टेटमेंट येते. ते ऑनलाईन देखील
बघता येते. डेबिट व एटीएम कार्ड वापरल्यावर संलग्न खात्यात लगेचच डेबिट पडते.
क्रेडीट कार्डवर काही दिवसांची उधारी वापरायला मिळते, आणि जेंव्हा खात्यात डेबिट
पडणार असेल त्यावेळी खात्यात शिल्लक असावी लागते. अतिशय सोप्या पद्धतीने कार्डचा
वापर करणे शक्य असल्याने ज्यांनी कार्ड घेतले नसेल त्यांनी जरूर घ्यावे. इथे
आवर्जून सांगावेसे वाटते की कार्ड घेतना संपूर्ण भारतीय बनावटीचे रू-पे कार्ड
घ्यावे. देशभरात कोठेही वापरता येते. सगळ्या बँका रु-पे कार्ड आपल्या ग्राहकांना
देतात, तर त्याचाच आग्रह धरावा.
NEFT – National Electronic Fund Transfer आणि RTGS – Real Time Gross Settlement
देशभरातील एका बँकेच्या एका शाखेतून
दुसऱ्या बँकेच्या कुठल्याही शाखेतील ठरवीक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी
वापरात असलेल्या या योजनांनी मागील काही वर्षात प्रचंड मोठ्या प्रमाणात धनप्रेष
केले गेलेत. यासाठी ज्या कोणाला पैसे द्यायचे असतील त्या व्यक्तीचा खाते नंबर व
खाते असलेल्या बँकेचा IFSC – Indian Financial System Code द्यावा
लागतो. दिवसा काही ठराविक वेळेनुसार पैसे पाठवले जातात. व्यवहार पूर्ण झाल्यावर
पाठविणारा व ज्याला मिळाले असणार त्या दोघांच्या मोबाईलवर मेसेज येतो. सोयीची ही
पद्धत सर्वच बँकांमध्ये असल्याने पैसे देण्याचे काम याद्वारे देखील करता येईल.
याचाही फायदा सर्वांनी घ्यावा. ज्या दिवशी पैसे पाठवा अशी सूचना बँकेला दिली त्या
दिवशी किंवा उशिरात उशिरा दुसऱ्या दिवशी पैसे पाठवले जातात.
इंटरनेट : सर्व
बँकांनी देऊ केलेली सुविधा. यासाठी अर्ज केल्यावर युजर आयडी, लॉगीन पासवर्ड आणि
ट्रांझ्याकशन पासवर्ड दिले जातात. हे कोणाला सांगायचे नसतात. याचा वापर करताना
कधीही नेट कॅफे मधून पैसे ट्रान्सफर करू नयेत. काहीवेळा तिथे या गोष्टी दुसऱ्यास
कळू शकतात. याबद्दल गुप्तता बाळगणे आवश्यक असते. आपल्या वैयक्तिक कॉम्प्यूटर किंवा
लॅपटॉपचाच वापर करून बँकिंग व्यवहार करावेत. बँकेची औथोरेज्ड साईट ओपन करावी. अनेक
फसव्या वेबसाईट असतात. तेंव्हा पूर्ण माहिती घेऊन, योग्यप्रकारे इंटरनेट व्यवहार
करावेत. पैसे पाठविताना वन टाईम पासवर्ड – ओटीपी घ्यावा लागतो. तो बँक खात्याला
जोडलेल्या मोबाईलवर येतो. व्यवहार पूर्ण करताना ओटीपी देऊन पूर्ण करावा लागत
असल्याने मोबाईल जवळ असणे आवश्यक असते. कार्डचा सिव्हीव्ही देऊन
इंटरनेटद्वारे व्यवहार केले जातात. सर्व
प्रकारच्या बिलांचे पेमेंट, रेल्वे विमान सिनेमा बुकिंग करणे, ऑनलाईन खरेदी करणे
याने शक्य होते. बुकिंग केलेली तिकिटे इमेलने पाठवली जातात. ही सेवासुविधा घेताना
बारकाईने सर्व सावकाशपणे करणे गरजेचे असते. कॅशलेस व्यवहारात अधिक वापरात असलेली
ही सुविधा आहे. फिशिंग ई-मेल्स पासून सावधानता बाळगावी.
मोबाईल
बँकिंग –
मोबाईल खिशात ठेवताना आता आपली बँक खिशात आलेली आहे. सर्व व्यवहार मोबाईल वरून
करता येतात. IMPS – Immediate payment
Service क्षणार्धात पैसे एका खात्यातून
दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करणारी सेवा आहे. यासाठी बँकेकडे रजिस्ट्रेशन करावे
लागते. तसेच ईमेल द्वारे ही सेवा घेता येते. अथवा मोबाईल वर अॅप स्टोअर मध्ये त्या
त्या बँकेचे अॅप डाउनलोड करून घ्यावे लागते. मोबईल द्वारा इंटरनेट सुविधा वापरून
आर्थिक व्यवहार करता येतात. यासाठी खातेदारास MPIN – Mobile PIN number, MMID – Mobile Money Identifier नंबर Transaction paasword’ दिला जातो. MPIN, MMID आणि ‘Transaction paasword’हे वापरून खात्यात
डेबिट टाकून पाहिजे त्या व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करता येतात. 24*7 कधीही कुठूनही हा
व्यवहार पूर्णत्वास नेता येतो. मोबाईलवरून इंटरनेटच्या माध्यमातून WiFi/3G/4G ला कनेक्टेड असताना
हे बँकेचे
अॅप चालते. अॅप मध्ये बँकेने देऊ
केलेले सर्व व्यवहार करता येतात. ज्या
व्यक्तीच्या खात्यात पैसे पाठवायचे आहेत, त्यांचा MMID टाकून त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात. तसेच जर
आपल्याला कोणाकडून पैसे घायचे असतील तर आपला MMID फक्त त्यांना द्यावा लागतो. खाते नंबर व बँकेचा IFSC या ऐवजी MPIN, MMID आणि ‘Transaction कोड वापरला जातो.
ह्यासाठी स्मार्टफोन लागतो.
मोबाईल पेमेंट
अॅप – मोबाईल मध्ये
कंपनीचे अॅप असते. अॅपल मोबाईल फोन मध्ये अॅपल-पे, तसेच अॅण्डरॉईड मोबाईल फोनमध्ये अॅण्डरॉईड-पे अॅप असते. अॅपवर जाऊन क्रेडीट/डेबिट/एटीएम
कार्ड्सची डीटेल्स भरायची. खरेदीच्या वेळी
फोन पिओएस–Point of Sale समोर
धरून फोन अनलॉक केल्यावर पेमेंट अॅपमधून पेमेंट होते, लगेचच खात्यात डेबिट पडून
एसेमेस येतो.
NUUP
– National Unified USSD Platform. : यामध्ये बँक आणि टेलीकॉम सर्व्हिस
प्रोव्हायडर एकत्र काम करतात. ही सुविधा USSD – Unstructured Supplementary
Service Data – वर आधारित आहे. स्मार्टफोन नसताना देखील मोबाईल द्वारे पैसे
ट्रान्सफर करण्याची ही सुविधा 2014 पासून उपलब्ध आहे. बऱ्याच बँकांनी ही
सुविधा देऊ केलेली आहे. त्यासाठी आपला साधा फोन नंबर बँकेकडे रजिस्टर करायचा.
प्री
पेड मोबाईल मध्ये * # सारखे कोड वापरून किती शिल्लक आहे ते समजते. तसेच मोबाईल
रिचार्ज केला जातो. ते कोड नंबर म्हणजे USSD कोड. त्याच प्रकारे “*99#” हा USSD कोड वापरून
बँकिंग व्यवहार देखील करता येतात. USSD कोड हा टेलीकॉम
ऑपरेटर सर्व्हरशी जोडणी करून देतो, आणि मोबाईल रजिस्टर असल्याने बँक खात्याशी
जोडणी होते. दोन्हीचा वापर करून व्यवहार पूर्णत्वास नेता येतो. MPIN, MMID बरोबर जनरेट झालेला OTP द्यावा लागतो. MPIN हे सिक्युरिटीचे काम
करते. विविध प्रकारे पेमेंट करण्यासाठी ही सुविधा सोपी, सहज वापरता येणारी अशी
आहे. NUUP चा मेनू वरून ३
प्रकारे - MMID/IFSC/Adhar कार्ड नंबर वापरून पैसे ट्रान्सफर करता
येतात. ज्याला पैसे मिळणार असतील त्या व्यक्तीने मोबाईल बँकिंग घेतले असेल तर
त्याचा MMID वापरून व्यवहार
होतो. नाहीतर त्याचे खाते नंबर बँक IFSC कोड वापरता येतो.
आधार
कार्ड नंबर वापरून फंड ट्रान्सफर – AEPS – Aadhar Enabled Payment System – आधार कार्ड नंबर बँक
खात्याला जोडला पाहिजे. याद्वारे खात्यात पैसे भरणे, काढणे, शिल्लक जाणून घेणे,
आणि दुसऱ्या आधार कार्ड जोडणी केलेल्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणे ही सुविधा
यामध्ये दिलेली आहे. पैसे ट्रान्सफर करण्यासाठी फक्त ज्या बँकेचे खाते आहे त्याच
बँकेच्या BC
– Banking Correspondent च्या सहाय्याने फंड ट्रान्सफर करता येतात.
अन्यथा दुसऱ्या बँकेच्या BC ची मदत घेऊन इतर
गोष्टी होऊ शकतात. या सर्वासाठी आधार कार्ड नंबर, बँकेचे नाव, इतके दिले आणि
बोटांचे ठसे दिले की व्यवहार करता येतो. एका व्यक्तीच्या बोटांचे ठसे कधीही
दुसऱ्या व्यक्तीच्या ठशांसारखे नसतात. याच्या आधारावर AEPS काम करते. मशीनवर
बोटांचे ठसे उमटवून आपली ओळख द्यायची असते. UIDAI – Unique Identification Authority of
India मार्फत
बोटांच्या ठशावरून योग्य व्यक्तीची ओळख
पटवली जाते. ओळख झाली की बँकेचे व्यवहार
करता येतात. इथे बँक आणि UIDAI यांचा सहभाग
महत्वाची भूमिका बजावतात. BC कडील POS – Point of Sale हे छोटे मशीन ATM प्रमाणे जोडणी देऊ
करते. त्यामुळे जिथे बँक नाही अशा अगदी दुर्दम भागात देखील घरोघरी जाऊन बँकिंग
सेवा देता येते. इतकेच नव्हे तर विविध प्रकारे व्यवहार करता येतात. म्हणून POS ला Mini ATM – किंवा मायक्रो
एटीएम असेही म्हणतात. ग्रामीण भागातील बँकिंग याने जलद वाढलेले आहे. याचाही वापर
सद्यपरिस्थितीत मोलाची भूमिका बजावते.
E-Vallets
– ई
व्यालेटस – Virtual Money purses - आभासी पाकीट आहे. पेटीएम, चिल्लर,
फ्रीचार्ज अशी काही मोबाईल अॅपस सध्या मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे.
स्मार्टफोनवर ही डाउनलोड करून त्यातील आभासी खात्यात डेबिट/क्रेडीट कार्ड द्वारे
पैसे भरून ते पैसे एखाद्या पर्समधील पैशांप्रमाणे सहज वापरता येतात. पैसे देणारा
आणि पैसे घेणारा या दोघांकडे एकाच प्रकारचे
अॅप असल्यावर पैसे सहज इकडून तिकडे ट्रान्सफर केले जातात. भाजीवाला, छोटे
दुकानदार सध्या याचा सर्रास वापर करीत आहेत. भाजी घेतल्यावर त्याचे आणि गिर्हाईक
यांचे जर एकच अॅप असेल तर फक्त त्याचा नंबर घेऊन गिर्हाईक आपल्या मोबाईल मध्ये
टाकतो. जर खरेदी केलेल्या वस्तूवर बार कोड असेल तर तो आपल्या मोबाईलवर स्कॅन करून
पेमेंट करता येते. यामध्ये एकच अडचण असते की दोघांची मोबाईल अॅपस एकच लागतात.
UPI – Unified Payment Interface of India – NPCI ने
मोफत देऊ केलेली ही सुविधा फंड ट्रान्सफर साठी उत्तम समजली जाते. इथे दोन बँकांच्या
खात्यांमध्ये पैसे हस्तांतरण सोप्या पद्धतीने केले जाते. आजमितीस 29 बँका ही सुविधा देत आहेत. इतर बँका देखील लवकरच
ही सुविधा देऊ करीत आहेत. गुगल प्ले स्टोअर मधून पाहिजे त्या बँकेचे UPI enabled app डाउनलोड करून घ्यायचे. त्याने तुमचे खाते जोडले जाते. 24*7 व्यवहार करण्यासाठी
स्मार्टफोन, इंटरनेट लागते. यामध्ये Virtual Payment
ID – VPI हा युनिक आयडी महत्वाचा असतो. तो आपण आपला ठरवायचा आणि
बँकेकडून मंजूर करून घ्यायचा असतो. तो ईमेल आयडी सारखा असल्याने तेव्हढाच लक्षात
ठेवले तरी पूर्ण काम होते. जास्त गोष्टी लागत नाहीत. माझा ICICI बँकेतील खात्याचा VPA फक्त vandana@icici असा
असू शकतो. मोबाईल नंबर जोडणी असतेच.
MPIN आणि डेबिट कार्ड
च्या सहाय्याने खात्यात डेबिट टाकून रेमीटरच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले
जातात. ‘send
money’ वर क्लिक केल्यावर तिथे ३ ऑप्शन्स येतात. ज्याला पैसे
पाठवायचे त्याचा मोबाईल नंबर युपिआय वर असेल तर किंवा समोरच्या कडे VPI असेल तर तो टाकून थेट समोरच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे
टाकले जातात. किंवा समोरच्याचा खाते नंबर आणि बँकेचा IFSC कोड देऊनही पैसे ट्रान्सफर करता
येतात.
देशात सुरु असलेल्या
कॅशलेस अभियानात युपिआय बद्दल प्रचंड
कुतूहल आहे. सर्वात वापरायला सोपा, विना खर्चाचा हा उपाय असल्याने त्याचा वापर
प्रचंड प्रमाणात वाढीस लागला आहे. मोबाईल बँकिंग, ई व्यालेटस यापेक्षा ही सुविधा
जास्त सोयीस्कर सोपी आहे.
भीम (Bharat Interface Money) : डिजिटल पेमेंटचा वापर देशभर वाढविण्याचे उद्देश्य साकार करण्यासाठी भीम अॅप ३० डिसेंबर २०१६ ला सादर केले
गेले. त्याचा वापर करणे सहजसाध्य आणि
सर्वसामान्यांच्या आवाक्यात असल्याने त्याचा वापर लोकांनी करायला पाहिजे. सध्यातरी
अॅंड्रॉईड स्मार्ट फोनवर हे मोबाईल अॅप उपलब्ध आहे. पुढेमागे ते आयफोनवर देखील
येईलच. NPCI BHIM
App - मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअर मधून डाउनलोड करायचे. तेच आहे ना याची खात्री करून
घ्यायला हवी. एसेमेस साठी आपला नंबर बँकेत खात्याला रजिस्टर केलेला असतोच. त्याची
नोंद इथेही अॅप मध्ये केली
जाते. ४ आकडी पिन द्यावा लागतो. आणि त्याद्वारे भीम अॅप ओपन करता येते. तेंव्हा
त्याला संलग्न असलेल्या बँकांची माहिती मिळते. आपले खाते, जिथे मोबाईल रजिस्टर
केलेला आहे ते खाते भीम बरोबर जोडावे, लिंक करावे. त्यांनतर एमपीन सेट करताना
आपल्या डेबिट कार्डचे शेवटचे ६ नंबर, मुदत संपते ती तारीख द्यावी लागते. त्यानंतर
येणारा ओटीपी – वन टाईम पासवर्ड टाकून एमपीन सेट करायचा. हा इमपीन वरचेवर बदलता
येतो, बदलणे आपल्याच फायद्याचे असते. नंतर पैसे पाठवणे यावर, सेंड मनी यावर क्लिक
करून पुढे पुढे जात जात पैसे पाठवले जातात. हे असे किती जरी सांगितले तरी देखील
प्रत्यक्ष वापरायला लागल्यावरच नीट समजेल, उमजेल आणि आपोआप अंगवळणी देखील पडेल.
शेवटी इतकेच सांगावेसे
वाटते की चलन पुरवठा नाही, आमच्याकडे पैसेच नाहीत हा आरडा ओरडा थांबविण्यासाठी
वरील पैकी एखाद्या गोष्टीचा वापर करून आपले सर्व आर्थिक व्यवहार पूर्णत्वास
नेण्याचे बघावे. थोडे शिकून घ्यावे. त्यासाठी सरकारतर्फे खूप प्रयत्न केले जात
आहेत. मार्गदर्शन दिले जाते, अगदी हात धरून या गोष्टी शिकविण्याची सुविधा सरकार,
बँका, सामाजिक संस्था, तरुणाई यांनी समाजहित देशहित लक्षात घेता देऊ केलेली आहे.
त्याचा फायदा घ्यावा, नवीन कार्यप्रणालीचा वापर करावा आणि कॅशलेस आर्थिक व्यवहार
करावेत. जगाची गती आपण पकडली की आपोआप सर्वांबरोबर चालता येते, आपली प्रगती
त्यातचं आहे. तेच स्वत:च्या आणि देशाच्या हिताचे आहे
वंदना धर्माधिकारी