03-06-2017
कथा : कपिले..... घे
शिंगावर.
लेखिका : सौ.वंदना
धर्माधिकारी
“आजे, ए आजे....
आजे कुठं हायस तू ?”
“का रं महाद्या.
बोंबलतोस नरडीपासून. आत ये. मी चुलीपासी हाय.” आजीने बसल्याजागी महाद्याच्या
ओरड्याला बोलावलं. महाद्या बी धापा टाकीत आजी जवळ आला.
“आजे...... “
“बोलं की रं”
तव्यावरच्या भाकरीवर पाणी फिरवीत आजी बोलली अन मान वळविली.
“इतकं धावला कशा
पायी? काय झालं?”
“बाबा आणि आजा “
“काय झालं
त्यास्नी? बोलं भडभडा.”
“त्यांनी घागरी
रस्त्यामंधी ओतल्या.”
“म्हंजी????”
“आजे, त्यांनी
दुधाच्या भरलेल्या चार घागरी उपड्या केल्या रस्त्यावरी? आपल्याच व्हत्या घागरी...”
“कशापायी मी
म्हन्ते? दुध कुणी ओततं का? अन कुठं केलं हे असं? ”
“आजे, समदा गाव
गोळा झालता, अन पांडोबा बी व्हता. त्यानं बी दोन घागरी सांडल्या. काय पण त्याचा
आवं, भराभरा उपड्या केल्या. दूध ओतलं रस्त्यामंदी. लई राहाडा केला लोकांनी. संप
आहे म्हनूनशानी.”
“काय बी झालं तर
दूध नाय सांडू..... “
“ आजे, तू मला
रागावली व्हातीस... दूध सांडलं व्हतं
म्या. आत्ता येऊ देत दोघबी घरी.... तू रागाव. गप्प नाय बसायचं. तू
इचारायचं हायसं दोघांस्नी. हा... माझा बाप अन त्याचा बी बाप. त्यांनीच चार
घागरी दुध ओतलं.”
“खरं बोलतु
नव्ह... पण, ये हे असं? खरं हाय ना रं?”
“तुला ठाव नाय.
म्या तुझ्या संग कधी खोटं बोलतू काय? सांग तूच. नगं शंका घेऊ. ऐक तर खरं तू.”
“ना माझ्या
लेकरा. लय गुणाचं तू... पण, समजना ये दूध का कोणी फेकून देतं?”
“त्या दिशी,
चूकूनशानी गलासभर दूध सांडलं, तू कावलीस. अन आज्यानं मारलं मला.”
“व्हयं. समदं
आठवलं.”
“आता, तू आज्याला
मारशील? की बाबाला? मारायचं दोघांना बी. सांगतो तुला.”
“व्हयं रं....माझा
जीव बी ना तुटला बघ. हे असं? सोडून दे. मोठी माणसं.”
“आजे... बोलं ना
तुला बी वाटतं या... दोघांना बडविलं पायजे...”
“हां.....”
“मग? दूध सांडत्यात ते?
आजे, मला लई राग आलाय. त्यांना चांगल दावणार आता. तूच सांग मला..... आजे, कपिलाला
किती गं वाईट वाटंल?”
“व्हयं रे पोरा. कशापायी
असं वागावं? आज तर वासराला दूर करून धार काढली बघ सख्यानं. तुझा बाप ओरडला, लवकर कर. मला वेळ नाय थांबायला. तर,
सख्यानं वासराला खेचलं बांधल दावणीला अनं काढली धार.”
“असं व्हयं. सख्याला बी नाय आवडणार हे असं.
कपिला शेवंती, त्यांना समजलं तर गं आजे?”
अन.... महाद्याला हुंदका
फुटला. ओठात दाबून धरीत बोलत होता इतक्यावेळ. म्हातारी भाकरी उलटीत
होती. अन चौदा पंधरा वर्षाचं पोरगं रडाया लागलं. तशी म्हातारी उठली, स्टोव्ह बंद
केला.. आली लेकाराजवळ.
आजीचा हात लागला, अन
महाद्यानं हंबरडा फोडला. लई जिव्हारी लागलं त्याच्या. त्यानं बापाचा असाच मार
खाल्ला होता एकदा. दुधाची चरवी ठेवली होती बाहेर, अन ह्याचा चेंडू चरवीत पडला, दुध
उडालं, चरवी कलंडली. तसा बाप आला धावतं अन जोरशानं कानफाडात बसली. जणू, तिच्याही
पेक्षा आज महाद्याला जास्तीच लागलं होतं. लई दुखापत झाली जीवाला. महाद्याच्या...
आजीच्या... अन कपिला शेवंतीच्या. त्या दिवशी महाद्या सुजलेला गाल घेऊन शाळेत गेलता
रडत रडतच. बाई आणि तो दोघं रस्त्यातच भेटले अन संगच चालत गेलं. बाईंनी इचारलं
व्हतं महाद्याला, ‘ का रडतोस?’
महाद्यानं झालेला प्रकार
सांगितला, बाई काहीच बोलल्या नाहीत. पण वर्गावर त्यांनी दुधाचाच तास घेतला व्हता.
तोच महाद्याच्या आयुष्यात महत्वाचा तास ठरलेला. तेंव्हा महाद्यानं ठरविलं असेच खूप काही.
“उगी उगी माझ्या लेकरा. नगं रडू. मी इचारीन काय झालं ते. धर पाणी पी.
का खातो भाकर गरमगरम?”
“नगं...” म्हणतं
महाद्यानं तांब्या लावला तोंडाला. गटागटा प्यायला अनं आजीच्या पदराला तोंड पुशिलं.
“आजे, त्या दिवशी बाईंनी
आईचं दुध, गाईचं दुध, म्हशीच, शेळीच, उंटीणीचं...दुध कसं ते सांगितलं. आईच्या
गाईच्या दुधाचं महत्व बी समजावून दिलं. त्यावरची एक कविता म्हंटली.”
“हा. तू बोलला व्हतास माझ्याशी हे समदं एकदा.”
“हां. आजे, मला वर्गातच
आठवलं होतं. आपली पमा तान्ही व्हती. आईची दुध घ्यायाची. तवा आई कशी हसायची. अन,
मला संग घेऊन बसायची. आजे, आई कुठं गेली.”
“गेली भाजी खुडाया. येईल आत्ता...”
“बाईंनी सांगितलं नगं.
तव्हापासून मी ठरविलं आईला तरास द्यायचा नाय. अन तुला बी. तू तर मोठी आई.”
“शहाणं बाळ माझं. पण, आज
समदं आठविल तुला. अन, पमाच्या हातनं दुधाची बाटली सांडली, तर तू तिला उचललं आणि
सांगितलं ‘दूध सांडायच नाही, दादाचं ऐकायचं.’ मला आठवतं अजून. अन शहाण्या पमानं तुझ्या मांडीवर बसून दूध घेतलं तुझ्या
हातांन. हाय ना. तिला समजलं ते या दोघांना नाय.. काय फेफरं भरलं की काय दोघांना ते
पण संग संग बरोबर.”
“आजे,कपिलाला लई वंगाळ
वाटेल बघ. तिच्या वासराला दूर करून दूध काढलं अन ओतून दिली घागर कळशी रस्त्यावर. आजे,तुला सांगतो मी आज बोलणार बघ.
माझ्या बापाला अन त्याच्या बी बापाला. मला मारत्यात गीलासभर दूध सांडल तर,अन हे
आरडाओरडा करीत कळशी उपडी करत्यात रस्त्यावरी. आपण दोघं एक व्हायचं. आईला येऊ देत.
ति तर आपलीच.”
“व्हयं.तुझ्या बापाचा धाकच हाय तिला लई. बिचारी
शांत हाय. येईलच आता.”
“आजे, तू मला म्हणाली
होतीस, पुन्हा दूध सांडलं तर शेवंती अन कपिला दोघींना सांगीन. कपिला घेईल तुला
शिंगावर. मला भ्या वाटलं. पण, त्यापाठी मी कवाचं दूध नाय सांडलं. हाय ना गं.”
“व्हयं. खरं हाय. तू एकदम शहाणा झाला व्हतास
त्या दिसापासनं. लई वंगाळ वाटलं ना तुला आज?”
“आजे.” म्हणतं
महाद्या उठला..
“आजे, मी कपिलाला
सांगतो. त्या दोघांना घे शिंगावर. अन शेवंतीलाही शिंगावर घ्यायला सांगतो. दोघांना
घ्यायलाचं पाहिजे शिंगावर, अन गरागरा फिरवून आपटाचं खाली.”
“असं नाय बोलू
लेकरा..”
“तू मलाचं बोल
लाव. त्या जोडीला आज तू लई बोलशील बघ. घाबरू नगंस. म्या हाय तुझ्या सोबत. आता अजिबात
ऐकणार नाही. मी लहान नाय आता.”
खरंच की, महाद्याला
मिसरूड फुटलं व्हतं, हे आजीच्या ध्यांनी आलं. बरं झालं पोरगं शहाण झालं. बापाच्या
वळणावर नाय गेलं तेच बेस झालं. लई चिंता व्हती मानसी. देवा, पांडुरंगा, पांग फेडलं
पोरगं माझ्या अन त्याच्या आईच्या कष्टाचं.
“आजे उठं. चल माझ्या संग.
शेवंती कपिला अन समद्या गुरांना सांगू यात यांची करामत.”
“थांब वाइस, चालला लगेच
शिंगावर घे सांगाया.”
“आजे, आज दोघांना शिंगावर
घ्यायला मीच सांगणार हाय गायांना. बिचाऱ्या माझी गुर, कसं बी वागवावं काय म्हनून?”
“बरं, कर तुला
वाट्टेल ते त्याचं. बापलोक असे वागले तर.”
“काय गं आजे....स्टोव्हवर
दुध ओतू जाया लागलं तर तू धावतं येतीस अन उतरवतीस दुधाला. तुला चालता बी येत नाय
अन तवा तू पळत येतीस दुधाला वाचवायला. पाय दुखायचं ध्यानात येतंच नाही तवा तुझ्या.
अन हे तुझं असं वागणं काय आज्याला ठाव नाय? अन त्या माझ्या बाबाला बी.”
“ ह!.”
अन महाद्या उठला,
मागल्या दारी पळत सुटला..
“महाद्या, अरं
थांब.कुठं जातू या.”
म्हातारीच मन तिच्या
पायापेक्षा जड झालं होतं. तिला आठवली आपली पाची लेकरं. अर्धवट झालेली देखील
डोकावली मनात. अन त्यांना पदराखाली पाजलेले दिवस. आईच समजू शकते दुधाची धार.
लहानग्याच्या ओठांचा लुसलुशीत स्पर्श, अन त्यासाठी छातीशी घुसमट. किती जीव ओतला
जातो त्या दुधात. तशाच माझ्या कपिला
शेवंता. अन आज या दोघांनी असं ओतावं दूध???. लाज नाय वाटतं बाप्प्या माणसांना.
माणसं कसलं भूतं मेली.
“कपिले....शेवंते....काय गं हे....”
जमिनीवर हात टेकत कशी बशी
म्हातारी उठली...महाद्या गेला त्या दिशेला चालू लागली. टिपले डोळे पदरानं. जड
अंत:करणाने पाय उचलले...
“महाद्या.... ये लेकरा .... महाद्या.”
म्हातारीचा
आवाजही कापला. तिचं पाय मणामणानं जड झाले. ओढलं स्वत:ला तिनं. कसंबशी उंबरा
ओलांडून मागल्या दारी आली गोठ्यात. तर.
महाद्या....
महाद्या कपिला अन
शेवंता दोघींच्या गळा पडून मोठ्यांदा रडत व्हता. “कपिले. घे तू शिंगावर. माझ्या बाला, शेवंता, तू
बी घे शिंगावर. माझ्या बा च्या बाला, माझ्या आज्याला. वासराला तोडून दुध ओढलं अन
रस्त्यावर मातीत ओतलं त्यांनी. नाय सोडायचं मोकळ त्यास्नी.”
म्हातारीने
तिन्ही लेकरं बघितली अन. खूप खूप भरून आलं. काय करणार होती ती? तोंडाला पदर लावून मटकन खाली बसली.........
वंदना धर्माधिकारी
Vandana10d@yahoo.co.in
M : 9890623915
M : 9890623915
खूप छान कथा ����
ReplyDeleteहन्यावाद!
Deleteज्या चूकीसाठी मार खाल्ला वरचेवर तेच मारणारे तीच चूक उघडपणे सर्वांसमक्ष जाणिवपूर्वक करीत असतील तर संताप येणारं. आणि सूडाची भावना उसळणार...तेच तर झालं. अतिशय हळवी कथा. सलाम!
Deleteछान कथा.👍
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteअप्रतिम
ReplyDeleteवाचताना कासावीस झाला ना .... माझाही होतो. जेंव्हा जेंव्हा वाचते तेंव्हा.
Deletesunder
ReplyDeleteखोलवर जाते... धन्यवाद!
Deletechanach g
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
Delete