नुकतीच सहा महिन्यापूर्वी लंडनचा
सहा महिन्याचा मुक्काम करून घरी परतले. धाकट्या मुलीचे लग्नही लावले.... आणि
थोडीशी निवांतपणे वावरत होते. घरात एक बाळंतीण आणि लग्नघर, शिवाय परदेशातून
येणाऱ्या मुली म्हणजे ह्या मोठमोठ्या बॅगा त्यांच्या. म्हणून जागा करताना, माझ्या बँकिंग लिखाणाची भली मोठ्ठी रद्दी टाकली. म्हंटल
मनात,’ दहा वर्ष झाली बँक सोडून, आता कोणी म्हणणार नाही मला बँकिंग वर लिहा
म्हणून.’ दिलं टाकून. ना खंत ना खेद. आणि....
अचानक जानेवारी २०१० मध्ये सकाळ
ऑफिसमध्ये बोलावणे आले. गेले भेटायला. साप्ताहिक सकाळच्या संपादकांनी बोलावले
होते. गप्पा सुरु झाल्या. त्यांना बँकिंग विशेषांक काढायचा होता. मी अगदी स्पष्ट
शब्दात बोलले, “तुम्ही माझी मदत मागताय? माहित आहे ना दहा वर्ष झाली बँक सोडून
मला. आणि सकाळ मध्ये बँकिंग लिहायला फक्त पुण्यात हजार बँक अधिकारी मिळतील
तुम्हाला. बघा, विचार करा एकदा.”
तर ते म्हणाले, “आम्हाला दुसरे
कोणी नको. धर्माधिकारीचं पाहिजेत. मला तुम्ही लिहिलेलं बँकिंग समजते. साधं सोप्प,
पटकन लक्षात येणारे. सामान्य माणसाला हवे तसे तुम्ही लिहिता, आणि मीही मला काही
हवे असेल तर तुमचे बँकिंग जिज्ञासा वाचतो.”
मग काय, मी सरसावले पुढे, आणि
लागले कामाला. तेंव्हा संपादकांनी माझ्यापुढे एक अंक टाकला, आरोग्य विशेषांक,
“यात, आरोग्याच्या १०० टिप्स दिल्या आहेत. ठेवा संग्रही.”
म्हंटल द्या, सेकंड इनिंग सुरु
झालेली, हे असलं बरं असतं जवळ असलेलं.
आणि आम्ही दोघांनी मिळून विषय
ठरवले, काय घ्यायचे काय नको ते झालं. आणि उठताना मी म्हंटल, “आरोग्य विशेषांकांत
१०० आरोग्याच्या टिप्स दिल्यात ना. मग, बँकिंग विशेषांकात मी १०० बँकिंग अॅब्रिव्हेशन्स
देते.”
“ १०० द्याल?” थोड्या साशंकतेने
त्यांनी विचारलं.
“ अगदी सहज होतील १००. देतेच.”
आणि फेब्रुवारी २०१० - दुसरा साप्ताहिक
सकाळ अंक बँकिंग विशेषांक काढला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी मला
परत बोलावलं. तेंव्हा समजलं त्या १०० आकड्यामुळे अनेकांनी अंक घेतले, काही सहकारी
बँकांनी आपल्या प्रत्येक शाखेसाठी एकेक घेतला. मग काय ठरलं लेखमाला करायची. मलाही
सुरसुरी आली, आणि १ मे, २०१० पासून “नाते बँकिंगशी” लेखमाला सुरु झाली. लेखमालेला
खूपच छान प्रतिसाद मिळाला. इतके लिखाण तयार झाल्यावर पुस्तक नाही काढलं तर ती
वंदना कसली... नाही का? काढलं तेही सकाळ प्रकाशन कडूनच. “मैत्री बँकिंगशी”. तर ही
होती मैत्री बँकिंगशी पुस्तकाची जन्मकहाणी.
Banking explained in simple words.
ReplyDeleteWhy to make it difficult to understand. thanks.
ReplyDeleteसकाळ संपादकांनी बँकिंग विशेषांक काढायला बोलावलं आणि तूम्ही म्हणालात. 'मी अगदी स्पष्ट शब्दात बोलले, “तुम्ही माझी मदत मागताय? माहित आहे ना दहा वर्ष झाली बँक सोडून मला. आणि सकाळ मध्ये बँकिंग लिहायला फक्त पुण्यात हजार बँक अधिकारी मिळतील तुम्हाला. बघा, विचार करा एकदा.”..
ReplyDeleteआता तर १८ वर्षे झाली तरी तूम्ही बँकिंग लिहीता. चिकाटी आहे.
खरं सांगू का? समाजाचं काहीतरी देणं आपण लागतो. त्यातलाच हा भाग आहे असे मला वाटते. जर, लोकांना माझ्या लेखणीत लिहिलेले समजते, तर मी का लिहायचे नाही. मला त्यात समाधान आहे. आता १८ वर्षे झाली, बँकिंग बदललं, त्यामुळे मला वाचन, अभ्यास, चर्चा, प्रत्यक्ष बँकेत जाऊन बघणं या गोष्टी कराव्या लागतात. चांगलच आहे ना. मला यामधले समजते लवकर, लिहिताही येते. एक मात्र मी सांभाळते, चुकीची माहिती जाणार नाही याची खबरदारी मी घेते. एखादा मुद्दा द्यायचा राहिला तरी चालेल, पण चुकीचे काही गेले नाही पाहिजे यासाठी मी जागरूक असते. त्याला आपण चिकाटी म्हणालात. होय आहे ती म्हणून लिहिते. असो. धन्यवाद!
ReplyDelete