नुक्कड कथा स्पर्धा सहभाग
कथा : माझी लाडकी
लेखिका : सौ. वंदना विजय धर्माधिकारी
“उडदामाजी काळेगोरे, काय निवडावे निवडणारे”. काळेगोरे निवडणारे .....पुढे काय?
हे काय चकाकलं?
ऊन परावर्तीत होऊन देवावर?
“बाप्पा प्रसन्न झाला काय? छे, माझं कुठलं नशीब असले? कोण रे तिकडे?”
‘अगं बाई, आलं की गालावर. आणि अडकलं गालाच्या खड्यात! खळी कसली, दात काढलेत ना मी..आता
वय आहे का गालावरल्या खळीत कोणी अडकायला? इश्श!! भलतंचं काहीतरी येतं मनी. म्हातारचळ ह्यांचेच.’
मनाशी बडबड करीत सरलाबाईनी ताम्हण दूर सारलं अन ‘उडदामाजी’ म्हणतं भिंतीच्या आधाराने उठल्या. कवडसा नाकावर डोळ्यावर. पटकन झाकला चेहरा. तोच समोर
तेच आपलंच ध्यान!! काळेगोरे!!! काय निवडलं होतं मी? किती गोरापान होता आणि आता काळाकूट्ट!
‘ ओ! गप बसा. काय चाललंय? मनाची नाही जनाची तरी. चार नातवंडांचे आजोबा!
गपगुमान रहा. सोडा तुमचे चाळे, जरा अधिकचं होतंय. काय म्हणावं? पूजेचं एक काम करीत
होतात तेही माझ्यावर ढकललं! अन ग्यालरीतून बायकोकडे बघत बसता? वेड लागलं अप्पांना
असं म्हणतील.’
“बॉबी! माझी बॉबी!!” म्हणतं पळाले आतल्या खोलीत. त्यांच्यामागे सरलाबाई.
“हमतुम एक कमरे में बंद हो जाय और चाभी खो जाय....” गिरकी घेऊन चक्क हसत बसले की
कॉटवर अप्पा!
‘आता मात्र कहर झाला? कपाळ माझं? आगीतून फुफाट्यात पडलेत, आधीचं बरं होतं
म्हणायची वेळ आली. हे व्यंकटेशा, मला आधी उचलं. नको अब्रूचे धिंडवडे म्हातारीचे.’
सरलाबाईंचा नमस्कार.
“ शेर कों मै कहूँ गी, मुज़े खा जाय.” तोंड वेंगाडत सरलाबाई कावल्या.
“हमतुम कमरे में? काय आरंभलय तुम्ही? आजारी आहात तर असला हिरवटपणा. हे बरं कळतं, बाकी काही
नाही? लाकडं गेलीत म्हसणात.” अतिशय संतापल्या सरलाबाई
काळजीने डोळे पाणावले तसे सरलाबाई बसल्या अप्पांशेजारी. काकुळतीने
विचारलं “का असे वागता तुम्ही?”
“माझी शपथ आहे तुम्हाला. तरुणपणात नाही लाडान केलं असं? कायम चिडचिड, वसंवस,
आरडाओरडा. पंच्याहत्तरी ओलांडली ना? त्राण आहेत का अंगात? त्रास होत असेल तर जाऊ डॉक्टरकडे?”
डॉक्टर ऐकताच अप्पा चिडले, “नाही, मला काहीही झालेलं नाही. नाहीतर बोलशील
पोराजवळ, तो उचलेल आणि टाकेल हॉस्पिटलमध्ये. अजिबात नाही. समजलं? काय म्हणतोय मी?”
“आहो नाही कसं? महिना झाला बघतें मी, आरशात काय बघतं बसता, हसता काय, गाणं
म्हणता! मी काय नवी नवरी आहे? किती अंगलट करता? मागेमागे! चक्क डोळा मारलात परवा.”
“लागला तुला? कुठे? दाखव बरं. फूssss. जे करायचं राहिलं ते तर करतोय आता. जवळ ये ना दावतो.”
“आलीस ना माझ्याजवळ? कसा चमकला चेहरा एका पोरीचा... नाSSSS एका म्हातारीचा? मज्जा?”
“मज्जा!!! मेलं तुमचं कर्म. असे का करता ते सांगा आधी. नाहीतर मी ”
“मीमी काय? म्हण, माहेरी जाईन, जीव देईन, बोलणार नाही.”
“तुम्हाला वेडं लागलं आहे.“ सरलाबाई एकदम घायाळ. आधीच कॅन्सरच्या रोगाने पछाडलेला नवरा,
आता वेडा झाला. महाभयंकर!
रडायलाच लागल्या तर अप्पा मोठ्यांदा हसायला लागले.
“सरले, तू रडू नको. जरा बघ माझ्याकडे, तुझ्या वेड्याकडे “
सरलाबाई नवऱ्याच्या जवळ जाऊन मुसमुसू लागल्या, “तुम्ही मला सांगा खरंखरं कारण.
का असे तरुण होतं आहात तुम्ही? मी कमी पडले का कधी? मी आज मुलांना सांगीन ....”
“दम देता काय सरला त्र्यंबक मोने? कोणाला? आपल्या पतिराजांना? पाहून घेतो
तुमच्याकडे?” चक्क डोळे वटारून दम दिला अप्पांनी, आणि मिशीला पीळ देऊ लागले.
सरलाबाई आणखीनच घाबरल्या, ‘आता काय बाई हे? घरात दोघेच, हा अॅटॅक तर नाही ना?
फोन लावावा का प्रकाशला नको, सुनबाईला
बोलावते.”
“नको गं राणी, अशी निष्ठुर होउस. तू फक्त माझ्याकडे बघं”
‘अप्पा चेष्टा करतात की गंभीरपणे विचारतात, काही समजेना.?’
“बोला, काय बघू. काही बाकी आहे का तुमच्याकडे?”
“हे बघ, माझी मिशी... माझी मिशी जशीच्या तशी. जाताना मला मिळणार खुषी. “
“बाबा रे! स्पष्ट बोलं. काय झालं मिशीला?”
“काय झालं? तुला नाही समजलं? अरे देवा! किती अभागी मी.”
“तुम्ही भाग्यवान हो, मीच अभागी. मला नाही अक्कल. सेवा करते तुमची, आणि तुम्ही
छळा मला.”
“आत्ता बोलता का सूsssss सुस्पष्ट?” शेवटचा स्वर काढला मात्र....”
अप्पा चरकले.
“अग, तुला आठवतं माझ्या मिशीला चाई लागलेली. चांगली गोलाकार मोठ्या टिकली एव्हढी!
डाव्याबाजुची मिशी मी कमी केली, एकचं कशी कमी करायची म्हणून दुसरीकडे लावली
कात्री.”
“हो, लागली होती चाई. तिचं काय?”
“तिचं म्हढ! तेच उगवलं बघं. ये ये
बघ....उगीच नव्हतो मी आरशात बघतं. बघ काळपांढर गवत उगवलं
मिशीच.”
“जिंदगानीत नसती उतरवली मी. कॅन्सरच्या
आजारपणात सप्पाट करावी लागली.”
“चार केमो नंतर..... ती आली परत! होय,
खरचं! सगळीकडे आली माझी लाडली. आता न कापता भरदार मिशीच्या देही देवाघरी जाणार.”
आणि तोंड वाकडं करून मिशीची अप्पांनी पप्पी घेतली
“अगं बाई....खरंच की! किती आवडते मिशी तुला. माहिती आहे मला. तुझं
ते....” चक्क लाजल्या सरलाबाई.
“सरला, अगं मला इतकं वाईट वाटायचं. प्रत्येक केमोच्या वेळी. चौथी केमो
केल्यानंतर दोन दिवसांनी बसलो होतो घाणेरडा चेहरा न्याहाळत. चाईच्याजागी हात फिरला तर हाताला लागलं काहीतरी. तुरा यायला लागलेला. तुला बोलणार होतो. वाटलं, तुझी गंमत करावी. थोडा
वेडा झालो. बास!”
“तू ना अस्सा ..... !”
“वेडाबाई गं माझी!”