“विना संस्कार नाही उध्दार
व विना सहकार नाही उध्दार” या वचनाच्या भावनांचा आदर करून सहकार क्षेत्र
महाराष्ट्रात सर्वतोपरी मार्गक्रमणा करीते. आर्थिक ध्येयाप्रती काम करून समाजाचे
रंगरूप बदलून टाकायचे या विचाराने प्रभावित होऊन स्वत:हून पुढे आलेल्या लोकांची एक
स्वायत्त संस्था म्हणजे सहकारी संस्था. समाज उत्थापन करून व्यक्तीव्यक्तीची
पतवृद्धी करायचा प्रयत्न सहकारी बँकांकडून केला जातो. या बँकांवर सहकार खाते,
राज्य सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचे वर्चस्व असते. त्यांनी आखून
देलेल्या नियमांनुसार बँकिंग कार्य करायला सगळ्याच सहकारी बँका बांधील असतात.
शनिवार, १९ ऑक्टोबर,२०१३
च्या चतुरंग मध्ये “बँकिंग क्षेत्रातील महिला शक्ती” हा लेख मी लिहीला होता. त्यामध्ये
राष्ट्रीयकृत, प्रायव्हेट, फॉरीन बँकांमधील उच्चपदस्थ महिलांचा अल्पसा परिचय करून
दिला होता. त्याचवेळी सहकारी क्षेत्रातील
स्त्रीशक्ती वर लिखाण करायचे मी ठरविले आणि आज महिला दिनाचे निमित्ताने हा लेख मी
देत आहे. सहकारी बँकांच्या सध्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या अशा नऊ महिलांचा
अल्प परिचय मी करून देऊ शकते. त्यांच्या पाठीशी तमाम सर्व महिला बँक कर्मचारी
आपापले कसब पणाला लावून बँकेप्रती योगदान
देताना दिसतात. ही झाली एक बाजू. आणि दुस-या बाजूला सर्व महिला वर्ग बँकांकडून मदत
घेऊन आत्मविश्वासाने पतवृद्धी करणारा. आज
महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना अभिवादन करून आपल्या काही मैत्रिणींचा
परिचय मी करून देत आहे.
महिलांना कर्ज देणे तसे अवघड जाते,
कारण घरादारातील कुठलीच संपत्ती त्यांच्या नावावर नसते. अशावेळी नवऱ्याला
सहकर्जदार करून घ्यावेच लागते. चंद्रपूर येथील सन्मित्र महिला सहकारी बँकेच्या
पदाधिकारी आणि सध्याच्या अध्यक्षा श्रीमती जया द्वादशीवार यांनी सांगितले, की
“समाजातील अनेकांना आपल्या पत्नीचे नाव आपल्या बरोबर घर, दुकान, व्यवसाय यामध्ये
लिहून घ्या, म्हणजे आम्हाला कर्ज प्रकरण करणे सोपे जाईल, असे वारंवार सांगूनही
एकही पुरुष असे करायला तयार झाला नाही. आहे ती संपत्ती माझीच ही स्वकेंद्रित
पुरुषी वृत्तीने ही बँक अनेकींना कर्ज देऊ शकली नाही. आणि फक्त महिलांनाच कर्ज
द्यावयाचे असा रिझर्व्ह बँकेचा आदेश असल्याने बँकेचा कारभार सांभाळून विस्तार करणे
जड गेले. मग युक्त्या क्लुप्त्या लढवून महिलांची खाती वाढविण्यात आली.
महानगरपालिकेत यंदा महापौरांसह ३३ महिला नगरसेविकांना सहकार्य मागितले.
त्यांच्यासाठी राज्यशास्त्र अभ्यासवर्ग घेतला. त्या सगळ्यांनी बँकेला सहकार्य
केले. विदर्भात दोन वर्षापूर्वी दुष्काळ पडला तेंव्हाची गोष्ट. सरकारी मदतीचे
चेक्स आले होते, तेंव्हा चेक घेऊन बँकेत बोलावले, शून्य शिलकीचे खाते काढून देऊन
सगळ्यांना मदतीची पूर्ण रक्कम देऊ केली. शाळा शाळांमध्ये जाऊन मुलांना आपल्या
आईबाबांना बँकेत घेऊन या, तुमचे खाते काढून घ्या असे सांगून मुलांची तसेच पालकांची
अनेक खाती काढली. गृहपयोगी वस्तू खरेदीसाठी महिलांना वीनातारण कर्ज वाटप केले.
यामध्ये असलेली जोखीम जबाबदारी मोठी असली तरी महिलां कर्जफेड करीत आहेत. विधवा
महिलांच्या कर्ज खात्यावरील व्याज माफ करून एकरकमी पैसे भरून कर्जखाती बंद केली.
महिलांचा आधार असलेल्या या बँकेच्या अध्यक्षा जयाताई आणि उपाध्यक्ष डॉ.रजनी हजारे
या दोघी आणि सर्व फक्त महिला कर्मचारी अशा तमाम सगळ्याजणी या बँकेच्या चढत्या आलेखाच्या मानकरी आहेत.
सगळ्याच महिला बँका
आपापल्या परीने महिलांच्या प्रगतीसाठी विशेष प्रयास करतात. अहमदनगर जिल्ह्यातील,
अंबिका महिला सहकारी बँक तशीच प्रयत्नशील. सध्याच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पा मरकड
असून दुसऱ्यांदा त्यांनी हा पदभार उचलला आहे. एम.ए.एम.एड झालेल्या पुष्पाताई आधी एका
कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या. बँकेत आल्यावर मात्र संपूर्ण बँकिंग त्यानी समजून
घेतले. आज अंबिका बँक जिल्ह्यातील अग्रणी बँक म्हणून तिच्याकडे बघितले जात आहे.
जिल्हा उद्योग विनिमय आणि महिला बँक मिळून अनेक मेळावे घेतले, महिलांना प्रशिक्षण,
कर्ज दिले. पर्यटनापासून विविध कारणासाठी कर्ज देण्यात येते. खास तरुणाईला बँकिंग
कडे ओढताना कॉलेजमध्ये जाऊन संवाद साधून सगळ्यांना बँकेत आणले.
कोणाच्या पावलाने कोणाचे
भाग्य उजळेल हे सांगता येत नाही. तसंच झालं नांदेडच्या भाग्यलक्ष्मी महिला सहकारी
बँकेच्या बाबतीत. अतिशय बिकट परिस्थितीत २००७ साली सौ.संध्या कुलकर्णी यांनी
बँकेच्या अध्यक्ष पदाची सूत्रे हातात घेतली, आणि बँकेचे भाग्य उजळू लागले.
आल्याआल्या संध्या ताईंनी
बँकेला स्थैर्य देऊ केले आणि नंतर विस्तार कार्यास प्रारंभ केला. जिद्द, खंबीर
नेतृत्व, धडाडी या गुणांमुळे अल्पावधीत त्यांनी बँकेत अनेकविध प्रकल्प सुरु केले.
बचत गटाच्या माध्यमातून अत्यंत दुर्दम्य अशा आदिवासी महिलांना अनेक समस्यांना तोंड
देत सक्षम केले. त्यांच्यात मोठा बदल घडवून आणला. प्रतिवर्षी या आणि इतर बचत
गटांची संख्या वाढत गेली. नाबार्डकडून बँकेला स्वयंसेवी संस्था म्हणून मान्यता
मिळाली आणि त्याने अल्पदराने महिलांना कर्ज उपलब्ध होऊ लागले.
बायकांच्या तोंडात तीळ भिजत
नाही म्हणतात, आणि तेच भांडवल समजून समाजपयोगी प्रकल्प राबविताना मोठ्या प्रमाणावर
महिलांना सहभागी करून घेण्यात आले. शाडूचे गणपती, कागदी आकाशकंदील, सौरचूल हे सर्व तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. त्यातून
बरीच आवक झाली. घरोघरी सौरचुलीवर स्वयपाक केला जात आहे. बँकेच्या १६ पैकी संगणकीय
तीन शाखा पूर्णत: सौरउर्जेवर उत्तमरीत्या कार्यरत आहेत. नांदेड परिसरात पाण्याचे
दुर्भिक्ष प्रचंड. त्यावर मात करण्यासाठी बँकेने ‘जलपुनर्भरण’ प्रकल्पासाठी कर्ज
देऊ केले. वीज आणि पाणी दोन्हीची बचत करायचे हे बँकेचे प्रकल्प अनुकरणीय असेच
आहेत. सहकाराचं तत्व आमलात यावं या दृष्टीने भाग्यलक्ष्मी बँकेने बिझिनेस
कॉरसपॉनडनट नियुक्ती करून वित्तीय सामावेशनंतर्गत छोट्या छोट्या वाड्या,
वस्त्यावरील लोकांना बँकेत सामावून घेतले.
ही योजना राबविणारी मराठवाड्यातील एकमेव अशी बँक आहे. बँकेतील ६०% महिला
कर्मचारी आहेत. महिलांचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न
संध्या ताईंनी केले आणि सगळ्याजणी उत्साहाने कामाला लागल्या. अध्यक्षांच्या अथक
प्रयत्नांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले. २००९ ते २०१३ कालावधीत अनेकविध
संस्थांकडून “महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट महिला बँक” सन्मान मिळाला.
‘देशातील सर्वोत्कृष्ट
महिला बँक अध्यक्षा’ हा २०१३ चा राष्ट्रीय पुरस्कार सौ.संध्या कुलकर्णी’ यांना प्राप्त झाला आहे. त्यांना नांदेडची
भाग्यलक्ष्मी या नावाने सुद्धा संबोधिले जाते. ‘अष्टतारका’, ‘गुरुरत्न पुरस्कार’
यासह अनेक संध्या कुलकर्णी यांना मिळालेले आहेत.
अजूनही महिलांना म्हणावा
तितका पाठींबा घराघरातून मिळत नाही. त्यांना दुय्यम दर्चाचीच वागणूक मिळते. या पार्श्वभूमीवर
महिला तग धरून नेटाने प्रतिदिन प्रत्येक क्षेत्रात धडाडीने कार्यरत होत आहेत. यश
संपादन करीत आहेत. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. अशीच एक महिला बँक बघू यात. यवतमाळ
महिला सहकारी बँकेच्या सध्याच्या अध्यक्षा आहेत श्रीमती.ललिता निवल. यवतमाळ
जिल्ह्यात महिलांना कर्ज देण्यासाठी एकही
बँक पुढे येत नव्हती, त्याला शह दिला तो या महिला बँकेने. महत्प्रयासाने महिलांची
मानसिकता बदलून, त्यांना समजावून सांगून,
कर्ज प्रकरणे केली गेली. महिलांना स्वत:च्या पायावर उभे
राहण्याची ताकद दिली, आत्मभान जागरू करून सन्मानाने जगायचे असते हा संदेश दिला आणि
चित्र बदलत गेले. बॅंकेतर्फे आपद्ग्रस्तांना कपडे, अन्न, वस्तू वाटप केले.
सामुदायिक विवाहासाठी मदत केली. आता महिलांना संगणक प्रशिक्षण बॅंकेतर्फे देण्यात
येत आहे. या बँकेला वेगवेगळ्या संस्थांचे
अनेक पुरस्कार मिळाले. विशेष उल्लेखनीय म्हणजे ‘इकोनिमिक ग्रोथ सोसायटी ऑफ इंडिया,
न्यू दिल्ली,’ यांचा बँकिंग एक्सलेंट पुरस्कार.
महिला बँकेच्या उत्तम कामगिरीमध्ये आदराने नाव
घेतले जाते ते ‘माणदेशी महिला सहकारी बँक, म्हसवड, जिल्हा सातारा’ या बँकेच्या
अध्यक्षा’ श्रीमती. चेतना सिन्हा यांचे. अल्पावधीत ह्या बँकेचा उदो उदो अमेरिकेत
ओबामा सरकारने केला आणि जगभर त्यांच्या कर्तुत्वाला मोठी दाद देण्यात आली. त्यांचा
परिचय लोकसत्ता मधून करून दिलेला आपण वाचलाच असेल.
या झाल्या सगळ्या महिला सहकारी बँक्स.
सर्वसाधारण सहकारी बँकांच्या अध्यक्ष पदी सुद्धा महिला अतिशय सक्षमतेने कार्यरत
आहे. त्यापैकी श्रीमती. जयश्री काळे, अध्यक्षा भगिनी निवेदिता सहकारी बँक लि.पुणे.
शाळा शाळांमधून मुलींची गळती मोठ्या प्रमाणात होते, ते प्रमाण कमी करण्यासाठी
जयश्री ताई दररोज त्यांच्या वस्तीत जावून गणिताचे शिक्षण या मुलींना देत आहेत.
लोकसत्ता मधून नुकताच त्यांचा परिचय सर्वांना करून देण्यात आला आहे. म्हणून या
दोघींचा केवळ नामोल्लेख आम्ही इथे करीत
आहोत.
अशीच एक मुंबईची
माहेरवाशीण, कोकणातील महाडगावात अनेक संस्थांचा कार्यभाग कुशलतेने सांभाळताना दिसताट.
या आहेत, रायगड जिल्ह्यातील सर्वसाधारण सहकारी बँक - दि अण्णासाहेब सावंत को-ऑप.
अर्बन बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा श्रीमती शोभा सावंत. संचालक मंडळात महिलांच्या
समावेशाची कायदेशीर तरतूद होण्यापूर्वीच या बँकेच्या संचालक मंडळात किमान ३
महिलांचा समावेश होताच. त्यांचे सासरे आणि
पती यांच्या पश्चात ते दोघे सांभाळीत असलेल्या अनेक सामाजिक
संस्थांचा पदभार २००६ पासून शोभाताईनी
स्वीकारला, आणि प्रत्येक ठिकाणी त्यांची कारकीर्द विशेष उल्लेखनीय होत आहे.
सहकार क्षेत्राबद्दल अविश्वासाचे वातावरण
असताना, बँकेच्या ठेवी वाढवून, वैविध्यतेने कर्ज वितरण करून तमाम ग्राहकांचा
विश्वास त्यांनी संपादन केला. त्यांनी घडवून आणलेले सकारात्मक परिवर्तन पाहून
त्यांची महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक्स फेडेरेशनच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात
आली. नवीन वर्षापासून ‘नारीसखी’ ह्या खास महिलां साठीच्या योजनेची सुरवात होणार
आहे. एक योगशिक्षिका, निसर्गोपचार तज्ञ,
अशीही त्यांची ओळख आहे. निर्णय होईपर्यंत सखोल चर्चा आणि निर्णय झाल्यावर त्याची
सखोल अंमलबजावणी हे शोभा तीनच्या नेतृत्व गुणाचे प्रमुख वैशिष्ठ्य आहे. ‘तेजस्विनी
पुरस्कार,२०१२’, ‘स्त्री शक्ती गौरव पुरस्कार’, ‘सावली गौरव पुरस्कार’, ‘अथर्व
रायगड सन्मान,२०१०’, ‘राज्यस्तरीय संजीवनी
पुरस्कार,२००९’ या आणि इतर अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत.
समाजोन्नती हेच बँकेचे
महत्वाचे कार्य आहे. समाज विकासासाठी कटीबद्ध, सर्वोत्तम व्यावसायिक स्थिती,
वक्तशीर आणि मैत्रीपूर्ण ग्राहक सेवा यासाठी नावाजलेली देवगिरी नागरी सहकारी बँक ली. औरंगाबादला आहे. या बँकेस ‘बँकिंग फ्रंटीयर, मुंबई
यांचेतर्फे – ‘तांत्रिक विभागातील
उत्कृष्ट बँक - २०१२ मध्ये प्रथम पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. सर्वसाधारण
सहकारी बँक असलेल्या या बँकेच्या अध्यक्षपदी प्रथमच एक महिला डॉ. मंजुषा कुलकर्णी
अध्यक्षा आहेत. २६ शाखांचा महाराष्ट्रभर
विस्तार, सुसज्ज कर्मचारी प्रशिक्षण केंद्र, संपूर्ण संगणकिकरण असलेल्या बँकेचा
प्रगतीचा आलेख अतिशय समाधानकारक आहे. आपला विस्तार करताकरता इतर दोन सहकारी
बँकांना आपल्यात समाविष्ट करून घेतले, हे विशेष आहे. कोअर बँकिंग, एटीएम सेवा, रूपे कार्ड, अशी प्रगत
बँकिंग कार्यप्रणाली बॅंकेतर्फे देण्यात येते.. मंजुषाताई व्यवसायाने मेडिकल
डॉक्टर आहेत. जनकल्याण रक्तपेढी, डॉ.हेडगेवार रुग्णालय या संस्थांचा कार्यभाग त्यांनी सांभाळला आहे.
वैद्यकीय क्षेत्रातून संपूर्णपणे भिन्न असलेल्या बँकिंग क्षेत्रात इतरांच्या उत्तम
साह्याने त्या बँकेचा कारभार सांभाळताना दिसतात. “कर्तुत्ववान महिला” हा पुरस्कार
त्यांना मिळालेला आहे. २००६ पासून देवगिरी बँकेच्या संचालक पदावर त्या कार्यरत
होत्या, आणि नोव्हेंबर,२०१२ पासून त्या बँकेच्या अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळत
आहेत. एकंदरीत या बँकेचा संख्यात्मक आणि गुणात्मक विस्तार करण्यामध्ये मंजुषांताईचा
मोलाचा सहभाग आहे.
महिला सहकारी बँका आणि
सर्वसाधारण सहकारी बँका यामधील काही महिला अध्यक्षांचा आपण परिचय करून घेतला. प्रत्येक
सहकारी बँकेत संचालक पदी किमान दोन महिला असायलाच पाहिजेत असा नियम आहे. त्यामुळे त्या स्थानावर महिला आहेतच.
जनरल manager पदी तर मोठ्या प्रमाणात महिला सुंदर काम करीत आहेत. आता, सर्वात कडी
केली आहे, ती श्रीमती सायली बोहीर यांनी. स्त्रिया आर्थिक क्षेत्रातील कुठलेही जबाबदारीचे पद स्वीकारून उत्तम तऱ्हेने
सांभाळू शकतात, हेच इथे प्रतीत होत आहे.
‘दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप
बँक्स फेडरेशन’च्या मुख्य अधिकारी व सचिव
या पदाचा कार्यभाग मागील तीन वर्षे
सांभाळीत आहेत श्रीमती सायली बोहीर. त्या वाणिज्य आणि कायदा विषयांच्या पदवीधर
असून सध्या बँकिंग & फायनान्स विषयात एम बी ए करीत आहेत. फेडरेनच्या पदाधिकारी
या नात्याने महाराष्ट्रातील समस्त नागरी सहकारी बँकांच्या धोरणात्मक समस्या
रिझर्व्ह बँक, राज्य सहकार, केंद्र सरकार, सहकार खाते यांच्यासमोर त्या प्रभावीपणे
मांडतात आणि त्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करतात. फेडरेशनच्या माध्यमातून राज्यभर
सेमिनार्स, परिषदा, चर्चासत्रे आयोजित करून नागरी सहकारी बँकांमधील पदाधिकाऱ्यांना
मार्गदर्शन करीत असतात. शासनाने सहकारी संस्थांकरिता आदर्श उपविधी तयार करण्यासाठी
नेमलेल्या समितीवर त्या कार्यक्षम सदस्य आहेत. तसेच उत्कृष्ट सहकारी बँकांसाठी
निकष तयार करण्यासाठी शासनातर्फे गठीत करण्यात आलेल्या तज्ञ समितीवर देखील त्यांची
सदस्य म्हणून नेमणूक झालेली आहे. फेडरेशनचे त्रैमासिक – ‘नागरी बँक वार्तापत्रा’ अनेक वृत्तपत्रे,
मासिके, नियतकालिके या मध्ये सातत्याने त्यां लिखाण करतात. त्यांच्या कामाची
पद्धत, उरक, अचूकता, आणि तळमळ बघून अनेक मान्यवर संस्थांकडून त्यांना विविध
पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप
बँक्स फेडरेशन ली. ही राज्यातील सहकारी बँकिंग क्षेत्राचे पालकत्व स्वीकारलेली
राज्यस्तरीय संघीय संस्था आहे. रिझर्व्ह बँकेची धोरणपूर्व समिती, स्थायी सल्लागार
समिती, tafकब यासाठी नागरी सहकारी बँकांचे
प्रतिनिधित्व करून विविध समस्यांचे निवारण करण्याचे हेतूने फेडरेशन सातत्याने
प्रयत्न करीत असते. त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँकेचे आर्थिक निकष, राबविण्याची पध्दत,
वैधानिक बंधने, कर्ज व्यवहार व इतर संदर्भात वेळोवेळी परिपत्रके काढून बँकांना मार्गदर्शन
केले जाते. त्याचबरोबर केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन, सहकार खाते यांच्याकडून
जारी केल्या जाणाऱ्या विविध योजना, उदा.: कृषी कर्जमाफी व परतफेड योजना, एकरकमी
कर्ज परतफेड योजना, आदर्श उपविधी तयार करणे, बँकिंग विषयातील निरनिराळ्या
विभागांच्या कार्यपद्धती विषयक पॉलीसीज तयार करणे अशा प्रकारचे अतिशय महत्वाचे
कामकाज सर्व बँकांपर्यंत पोचविण्याचे, त्या संदर्भात मार्गदर्शन करायचे कार्य
फेडरेशन तर्फे होत असते. अभिमानाने सांगावेसे वाटते की फेडरेशनचा महत्वाचा पदभार,
मुख्य कार्यकारी व सचिव ह्या पदी एक महिला अधिकारी म्हणून सौ. सायली बोहीर
अतिशय सक्षमतेने, परिपूर्णतेने कार्यरत आहेत. आर्थिक क्षेत्रात महिला काय काय करू
शकतात, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
येथे ओळख करून
दिलेल्या भगिनी स्त्री शक्तीची
प्रतीकात्मक रूपे आहेत. बँकेची सुरवात अशीच महिलांच्या स्फूर्तीतून झाली. अनेकजणी
एकत्र आल्या, जबाबदारी वाटून घेतली गेली आणि बँकांचा परीघ विस्तारला. त्या सर्व
महिलां सह, आज कार्यरत असलेल्या महिला तसेच
बँकांशी मैत्रिणीच्या नात्याने जोडलेल्या अशा सर्व जणींना महिला दिनाच्या
निमित्ताने माझ्याकडून शुभेच्छा देते आणि थांबते.
वंदना धर्माधिकारी
पत्ता : २५, तेजस सोसायटी,
चैतन्य बिल्डींग,
तेजसनगर, कोथरूड,
पुणे : ४११०३८.
मो : ९८९०६२३९१५.