Monday, January 1, 2018

83. Maitree Bankingshee - ब्रेल पुस्तक ३ खंड


ब्रेल रुपांतरीत  ::: मैत्री बँकिंगशी
सावी फाउंडेशन, पुणे
श्रीमती रश्मी पांढरे, अध्यक्षा,

श्री.लुई ब्रेल यांनी स्वत: दृष्टिहीन असूनही आपल्या इतर बांधवाना साक्षर बनविण्यासाठी आयुष्यभर खडतर परिश्रम घेतले आणि ब्रेल भाषेचा शोध लावला. त्यामुळे पुढील पिढ्यांमधील दृष्टिहीन लोकांना आपले आयुष्य जगताना ब्रेल भाषेने प्रचंड उर्जा देऊ केली.
श्रीमती वंदना धर्माधिकारी यांनी अशा विद्यार्थ्यांना एकदा खूप सुंदर मार्गदर्शन केले होते.  त्यानंतर, त्यांच्या दोन बँकिंग पुस्तकांचे ऑडीओ रेकोर्डिंग करून अनेकांनी ते आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून त्यावरून बँकिंगच्या प्रवेश परीक्षांचा अभ्यास करायला सुरवात केली होती. त्यानंतर ब्रेल रुपांतरीत पुस्तक करण्यात आले.
“सावी फाउंडेशन” ने बँकिंग विषयाचे  “मैत्री बँकिंगशी” ह्या श्रीमती वंदना धर्माधिकारी लिखित आणि ‘यशोगाथा’ प्रकाशित ब्रेल पुस्तकाचा प्रकाशन समारंभ ९ जानेवारी २०१६ रोजी आयोजित केला होता. विशेष म्हणजे पुस्तक प्रकाशनासाठी आरबीआयचे असिस्टंट जनरल मॅनेजर श्री. राजेश आसुदानी खास नागपूरहून आले होते. जन्म:त दृष्टिहीन असूनही बँकिंग क्षेत्रात उच्च पदापर्यंत पोचलेल्या सरांना पाहून अनेकांनी  प्रेरणा घेतली आणि बँकिंग क्षेत्र निवडले.
‘सकाळ प्रकाशनचे मैत्री बँकिंगशी’ पुस्तकाचे ब्रेल रुपांतर  ‘यशोगाथा - ब्रेल प्रकाशक आणि मुद्रक श्री.स्वागत थोरात’ यांनी सुबकरीत्या वेळेत करून दिले. मुळात १८० पानांच्या पुस्तकाचे ब्रेल रुपांतरीत तीन खंड केले गेले. प्रकाशन प्रसंगी अंधांसाठी काम करणाऱ्या विविध अनेक संस्थांना पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. ज्यांनी मैत्री बँकिंगशी पुस्तकाचे रेकोर्डिंग ऐकले, ब्रेल वाचले, त्यावरून अभ्यास करून परीक्षा दिल्या असे अनेक विद्यार्थी आहेत. त्यांना वंदनाताईंच्या पुस्तकांचा कसाकाय फायदा झाला ते पुढील मुद्द्यावरून लक्षात येईल.

१.       बँकिंगची अगदी मुळापासून ओळख झाली.
२.       चेक, ड्राफ्ट, त्यावरील नंबरंपासून सगळं समजलं.
३.       बँकांच्या विविध ठेवी, कर्ज, वा इतर नव्या जुन्या योजनांची माहिती झाली.
४.       पुस्तकातील संक्षेप रुपांमुळे अनेक गोष्टी नव्याने समजल्या. यांचा उपयोग इंटरव्ह्यू मध्ये छान झाला.
५.       नवीन लोकांना तर याचा फायदा होतचं आहे, पण जे आधीपासून बँकेत काम करीत आहेत त्यांनाही स्वत:चे ज्ञान अद्ययावत ठेवायला मदत झाली.
६.       आपल्या डिपार्टमेंटबरोबरच इतर डिपार्टमेंटच्या कार्याची, त्यांच्या संकल्पनांची, अधिक उणे काय याची माहिती पुस्तकाने झाली. त्याचा फायदा परीक्षा देताना होतोच. शिवाय एका जागेवर बसून सर्व टेबलांवर काय व कसे चालते यांचा अंदाज येतो.
७.       आर्थिक विषयाची पार्श्वभूमी तयार झाली, त्याने आत्मविश्वास वाढला.
८.       ग्राहकांशी चर्चा करताना पुस्तकातले आठवले आणि ग्राहकांशी चांगला संवाद साधला, असे अनेकदा होते.
९.       बॅंकेतर्फे ट्रेनिंग घेत असताना कुठलाही विषय समजायला उपयोग होतो. बारकावे देखील आधीच समजलेले असतात. इतरांना आश्चर्यही वाटते, तेंव्हा आम्ही पुस्तकाचे आणि वंदना मॅडमचे नाव सांगतो.
१०.   इलेक्ट्रॉनिक बँकिंगमधील विविध ऑनलाईन बँकिंग, ज्याची आवश्यकता वाढत आहे त्याची माहिती मिळाली.
मोड्युलर इन्फोटेक द्वारा वंदनाताईंची पाच पुस्तके ब्रेल मित्र – ब्रेल रीडर वर उपलब्ध आहेत. त्यापैकी बँकिंगची तीन आहेत आणि इतर दोन. बँकिंग जिज्ञासा (सहावी आवृत्ती), Banking Horizon (2nd edition), मैत्री बँकिंगशी (दहावी आवृत्ती) ही देशभरातील अनेक संस्थांमधून अभ्यासली जातात. 

बँकिंग विषयाचे इतके चांगले पुस्तक या सर्वांपर्यंत पोचवता आले याचा ‘सावी’ला सार्थ अभिमान आहे.


रश्मी पांढरे.

अध्यक्षा, सावी फाउंडेशन, पुणे


----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


मनोगत : मैत्री बँकिंगशी – ब्रेल रुपांतर
लेखिका  :  सौ.वंदना विजय धर्माधिकारी


दोन हजार सोळा साल उजाडताच माझ्या “मैत्री बँकिंगशी” पुस्तकाचे ब्रेल भाषेतील रुपांतरीत पुस्तक सर्वांसमोर ठेवताना मला आनंद होत आहे. मी स्वेच्छानिवृत्ती घेऊन आता पंधरा  वर्षे झाली, पंधरा वर्षांनी फक्त पेन्शन रीस्टोअर होते इतकेच मला ठावूक होतं तेंव्हा. हे असे बँकिंग विषयावर मी लिखाण करेल, त्याच्या आवृत्त्यावर  आवृत्त्या निघतील, इतर भाषांमध्ये रुपांतर होईल असे मला तेंव्हा कधी वाटले नव्हते. भविष्याच्या पोटात काय दडलेले असते ते थोडेच आधी समजते? ते समजत नाही म्हणून तर आपण स्वप्न बघू शकतो आणि त्याच्यातच रममाण होतो.  स्वप्न झोपेत बघतो, म्हणजे डोळे मिटलेले, तरी पण स्वप्न रंगवून त्याचा पाठपुरावा होतोच. म्हणजे डोळ्यांनीच फक्त बघायचे असते, असे नाही. बंद डोळ्यांपुढे देखील चित्र सरसर सरकते, त्याच्यात रंग भरता येतात. खिळून बसतो आपण त्याच चित्रांमध्ये.

डोळे मिटून चित्र बघताना व डोळे उघडल्यावर समोर ते सदृश्य  नसताना मला कधीतरी काहीतरी थोडासा अंदाज येतो. दोहोंमधील रेघ ज्यांच्या आयुष्यात अंधुक झाली आहे अशा लोकांच्या अस्तित्वाची जाणीव होते. आजूबाजूचे सर्वकाही ते कसे बघतात, कसे वाचतात, समजून घेतात, आणि आत्मविश्वासाने पुढे पुढे जाताना आयुष्य रंगवीत असतात, हे न उलगडलेलं  कोडं  आहे.  मला वाटते त्यांचे मन:चक्षू चाणाक्ष नजरेने सारेकाही आत्मसात करून घेत असणार. ही तर निसर्गाची त्यांना विशेष लाभलेली देणगी आहे. अशांना  आर्थिक विषयाची, एका अर्थाने बँकिंगची ओळख, त्याची जाण करून देणारे  हे ‘ब्रेल रुपांतरीत मैत्री बँकिंगशी’ पुस्तक.

मानवी जीवनातील असाधारण महत्वाची भूमिका बजावणारा तो पैसा. कधी काळा कधी गोरा. जवळ असला तरी समजला आहे, असे नाही. समजायला अवघड तर नक्कीच नाही, पण सांभाळताना पळपुटा. पदोपदी ठेचा लागतात तो नसताना, आणि असतानाही सगळं सुरळीत होईलच याची खात्री नसते. का इतके मोठे मानायचे या पैशाला? त्याच्यावर थोड्याफार प्रमाणात निर्धारित असते माणसाची भिस्त, आयुष्यातील चढउतार, समाजातील स्थान, समाधानाची पुंजी, संसारातील हसू-आसू आणि मन:शांती. केवळ पैसा असला म्हणजे सर्व सुखे लोळण घेतात असे नक्कीच नाही, आणि हे ही  खरं की त्याच्या अभावी मात्र सर्व प्रकारच्या दु:खांना रिकाम्या पोटी भिडावं लागतं. आज, एकविसाव्या शतकात नुसत्या मनाच्या श्रीमंतीने भागत नाही आणि नुसत्या पैशाच्या श्रीमंतीने माणूसपण गावत नाही. आणि आपण तर सारी माणसे, हाडामासाची तसचं भावभावनांनी भारलेली. पैशाअभावी सांभाळता येत नाही देहाचा डोलारा आणि डोईवरील कर्तव्यांची टोपली. म्हणून पैशाशी ओळख करून घ्यायला हवी. अर्थाचा अर्थ समजला की जीवनात अर्थ भरणं सहज शक्य होतं, हे साधे गणित सोडविताना तुम्हा सर्वांना या पुस्तकाची मदत होईल याची मला खात्री आहे.

माझी बँकिंग विषयाची एकूण ८ पुस्तके आहेत. ‘सकाळ प्रकाशन, पुणे’ यांनी अतिशय उत्तम तर्हेने त्यातील ६ पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यापैकी बेस्ट सेलर “मैत्री बँकिंगशी” पुस्तकाची १० वी आवृत्ती बाजारात आहे. त्याचे हिंदी, गुजराती आणि आता ब्रेल रुपांतर झाले आहे. बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी मला सांगितले की, भारतीय सर्व भाषांमध्ये या पुस्तकाचे रुपांतर व्हायला पाहिजे. प्रत्येक घराघरात पुस्तक पोचले पाहिजे म्हणजे अर्थसाक्षरता वृद्धिंगत व्हायला गती मिळेल. ते करायला मला  नक्कीच आवडेल. बघू, काय काय होईल ते. सरकार, भारतीय रिझर्व्ह बँक, सर्व बँका अर्थसाक्षरतेसाठी विविध योजनांद्वारे प्रयत्नशील आहेत. तरीही, सर्वत्र दिसणारे चित्र म्हणजे बँकिंग अवघड क्लिष्ट विषय असल्याने म्हणा किंवा तो जाणून घेण्याच्या  इच्छाशक्तीचा अभाव असल्याने म्हणा, फक्त वरवर नजर टाकून आपापले आर्थिक व्यवहार उरकले जातात, तेही कसेतरी. यालाच बगल देते “मैत्री बँकिंगशी.”

माझ्या लेखणीने मला खूप माणसे दिली. कोणाला काय सुचलं, कोणी काय सुचवलं, आणि एकेक समोर तयार झालं. तसंच हे ब्रेल रुपांतरीत  “मैत्री बँकिंगशी” पुस्तक आपल्या हाती दिले पाहिजे या भावनेने अनेकांनी  मनावर घेतले, प्रयत्न केले, आर्थिक पाठींबा दिला, आणि शेवटी पुस्तक तुम्हा सर्वांपर्यंत पोचलं आहे. ह्या ब्रेल लिपीतील पुस्तकाने समाजाच्या एका मोठ्या समुदायाशी माझे नाते जोडले जात आहे, त्यांच्याशी माझा परिचय होणार आहे. ह्यात मला आनंद आहे. ओळखीची ना पाळखीची, बघितलेली न बघितलेली अशा अनेकांच्या मदतीने पुस्तक रंगरुपाला आले, एक नाही तर तीन तीन पुस्तके. देवनागरी लिपीतील एका पुस्तकाची ब्रेल मध्ये तीन पुस्तके केली गेली आहेत.  “मैत्री बँकिंगशी” पुस्तक ब्रेल लिपीत यावे यासाठी श्रीमती दीपा गुजर आणि श्रीमती रश्मी पांढरे यांनी पुढाकार घेतला. पुस्तकाच्या ब्रेल आवृत्तीच्या निर्मितीत ‘यशोगाथा आणि स्पर्शज्ञान परिवार’ च्या श्रीमती मोनालिसा विश्वास, श्रीमती रेश्मा हरियान, श्रीमती संगीता निकम आणि श्रीमती मंगल अहिरे यांनी परिश्रम घेतले. हे पुस्तक जास्तीतजास्त अंध वाचकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ‘सावी फाउंडेशन’च्या श्रीमती गायत्री चौधरी, श्रीमती वीणा ढोले, श्रीमती शुभांगी पिंगळे आदी सदस्यांनी उचलली आहे. जास्तीत जास्त ब्रेल पुस्तके निर्माण व्हावीत यासाठी कार्यरत असणारे श्री.उमेश जेरे आणि श्रीमती सुखदा पंत यांचेही सहकार्य या पुस्तकास लाभले आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मैत्री बँकिंगशी – ब्रेल पुस्तकाचे मुद्रक आणि प्रकाशक  आहेत  श्री. स्वागत थोरात, संपादक व प्रकाशक – स्पर्शज्ञान ब्रेल पाक्षिक वृत्तपत्र. आणखीनही अनेकांचे हातभार याकामी लागले आहेत.  तमाम सर्वांचे आभार मानायला माझे  शब्द अपुरे आहेत. या सगळ्यांच्या ऋणात राहणे मला आवडेल.


मैत्री बँकिंगशी ब्रेल रुपांतरीत पुस्तकाचे प्रकाशन शनिवार ९ जानेवारी,२०१६ रोजी हडपसर, पुणे येथील Blind Men Association’s Technical Training Institute, रामटेकडी इथे होत आहे. ‘दैनिक सकाळ’ चे संपादक श्री. मल्हार अराणकल्ले यांच्या हस्ते प्रकाशन होत असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत श्री राजेश आसुदानी, असिस्टंट जनरल मॅनेजर, भारतीय रिझर्व्ह बँक, नागपूर. खास या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी ते नागपूरहून पुण्याला येत आहेत, हे पुस्तकाचे आणि आपले भाग्यच आहे. मैत्री बँकिंगशी हे पुस्तक श्री. मल्हार अराणकल्ले यांचेच आहे. २०१० साली
त्यांनी माझ्या लेखणीवर विश्वास टाकला, आणि माझ्याकडून ‘नाते बँकिंगशी’ ही लेखमाला लिहून घेतली. वर्षभर ‘साप्ताहिक सकाळ’ मध्ये लेखमाला चालू होती. त्यानंतर, ‘मैत्री बँकिंगशी’ पुस्तक ‘सकाळ प्रकाशन’ तर्फे प्रकाशित करण्यात आले. आपणच कधीतरी टाकलेल्या बी चे छोटेसे रोपटे होऊन त्याचे  हळूहळू झाड बनू पाहते. तसेच काहीसे झाले. त्यांनी सुरु केलेली लेखमाला, आणि आजचे पुस्तक हा प्रवास पाच वर्षांचा आहे. श्री. आसुदानी यांच्या उपस्थितीत श्री. अराणकल्ले यांच्या शुभहस्ते पुस्तक प्रकाशित होत असताना मला विशेष आनंद होत आहे. लेखमाला सुरु करताना मला वाटलं नव्हतं की त्यापाठोपाठ माझ्या लेखणीची  अशी यशस्वी वाटचाल होईल. डोळे मिटूनही हे स्वप्न बघितले नव्हते मी तेंव्हा.  म्हणजेच, या उद्याच्या गर्भात कल्पनेच्या  पलीकडले काहीबाही लपलेले असते, समोर ठाकते तेंव्हा आनंदोत्सव होतो. असेच आनंदोत्सव या “मैत्री बँकिंगशी – ब्रेल रुपांतरीत” पुस्तकाच्या सर्व वाचकांना साजरे करायला मिळोत, हीच हार्दिक शुभेच्छा मी देते आणि माझे  मनोगत इथेच संपविते.
धन्यवाद !

वंदना धर्माधिकारी
शनिवार, ९ जानेवारी, २०१६.


No comments:

Post a Comment

Camera is a responsive/adaptive slideshow. Try to resize the browser window
It uses a light version of jQuery mobile, navigate the slides by swiping with your fingers
It's completely free (even though a donation is appreciated)
Camera slideshow provides many options to customize your project as more as possible

Here is a video for National Webinar on IBPS Exam. Guidance by Smt.Vandana Dharmadhikari on 17th July, 2020 

vandanadharmadhikari.blogspot.com