पुस्तक तयार करायला खूप वेळ लागतो. वेळ खाऊ काम आहे
ते. अगदी बरोबर. यालाच मी सुरुंग लावला एकदा. आणि चक्क आठ दिवसात पुस्तक तयार केलं
आणि धाडलं अमेरिकेला.
“प्राजक्त गंध”
पुस्तक तसे पंचवीसतीस पानांचे. पण, त्यात कथा, कविता,
काही मराठीत काही इंग्रजीत. आणि भरपूर फोटोंचे कोलाज... असे ते पुस्तक मस्त तयार
झाले, घरात आले काय आणि लगेच विमानात बसले काय. कशी केली धावाधाव... तर ही
अशी.........
प्रसाद : काकू, एक पुस्तक करायचं
आहे? अगदी लगेच हवे.
मी : लगेच होणाऱ्या गोष्टी नाहीत
रे. बरंच काही बघावं लागतं. पण कशाचं? आणि कधी पाहिजे?
प्रसाद : आमची marriage anniversary आहे या महिन्यात. तेंव्हा प्राजक्ताला काहीतरी
सरप्राईज
द्यावेसे वाटतं. तर, तिच्याच कथा कविता छापून
पुस्तक करायचं. माझं इथे पुण्यात या
क्षेत्रातलं कोणीच ओळखीचं नाही.
आणि, तुम्ही आहात त्यातल्या. म्हणून तुम्हालाच विचारतो.
तुम्हीच करू शकाल हे काम. दुसरं
कोणी नाही. म्हणून लेगेच आलो तुम्हाला भेटायला.
मी : अरे पण, इतक्या लवकर. किती कमी
दिवस? आणि ...
प्रसाद : फक्त १३ दिवस आहेत.
मी. : अवघड आहे. माझी टीम आहे सगळं
करणारी. मी त्यांना विचारून सांगीन. पण, कथा कविता
आणल्यात का तू? तेरा कुठेत? तेराव्या
दिवशी पुस्तक घेऊन तू अमेरिकेत पाहिजेस. तिकीट
कधीचे.
प्रसाद : दोन दिवस आधीचे. म्हणजे ११, नाही १० दिवसात पुस्तक होईल. अधिक पैसे
घेतले तरी
चालेल. पण, मला पुस्तक करायचं
आहे.
मी : बघू यात. विचारते सगळ्यांना.
आणि तू ईमेल वर पाठव मला सगळं. माझ्याकडेही आहेत
तिच्या
काही कविता, कथा.? माझ्याकडून प्रयत्न करते. आपण तर कामाला लागू. काहीतरी
तर दाखवायला पाहिजे त्यांना.
आणि पळावं लागणार. इतक्या थोड्या दिवसात म्हणजे
चांगलंच अवघड काम आहे.
प्रसाद : आजचं पाठवतो. तुमचाच लॅपटॉप द्या. लगेच इथेच तुम्हाला देतो.
आणि आम्ही कामाला लागलेत. इतरांना लावणार होतो.
डीटीपी, चित्रकार यांना फोन केले. सुरवातीला आढेवेढे झाले. अगदी रेट अधिक
लावलात तरी चालेल असे सांगितले तरीही त्यांना अजिबात वेळ नव्हता. बघू.. म्हणून फोन
दोघांनी बंद केला. पण, मला खात्री होती की हे दोघेही मला नाही म्हणणार नाहीत. आलेच
एकापाठोपाठ दोघांचे फोन. मग, काय विचारता......पुस्तकाच्या मागे पळाली टीम.
प्रत्येक कथा कवितेवर प्रसाद आणि मी आमची फोनवर चर्चा. कारण मला काम सांगून तो
निघाला त्याची कामे करायला. तिकडून मुले इकडे येतात तीच पंधरा वीस दिवसांसाठी.
त्यात किमान चारपाच गावांना जायचं असते. अनेकांना भेटायचे असते. बाकीची कामे असतातच, त्यात ह्या पुस्तकाने मोठी
भर घातली.
लेखीकेचा फोटो एकटीचा तरी हवाच पुस्तकात. एक मागितला तर प्रसादने हे फोटो
पाठवले. मग, त्यातले कुठले चांगले घेता येतील. शिवाय प्रिंटींगला चांगले दिसतील,
त्यावर चर्चा, ठरलं सगळं. त्याची सुदर ४/५ कोलाज केली. डीटीपी झाली. प्रुफ रीडर
मीच. मधेच प्रसाद मुंबईला जाऊन आला. बेळगावला गेला. आमच्या चौघांची फोनाफोनी
चर्चा, पाठवणे, हवे नको बदल करून फायनल करणे सुरु झाले. टेक्नोलॉजीला सलाम ठोकला.
चित्रकाराने प्राजक्ताच्या फोटोवरून तिचाच चेहरा टाकला कव्हरवर, शिवाय आतही मस्त
चित्रे दिली. आणि चक्क आठ दिवसात पुस्तक तयार लॅपटॉपवर.
शेवटची नजर फिरवली आणि दिले छापायला. आता जस असेल तसे केलेच पाहिजे. म्हणून ...
बरोबर ९ व्या दिवशी दुपारी ५ वाजता पुस्तके माझ्या हातात. साडेपाचला प्रसाद
आला. आमचा जीव भांड्यात पडला. ‘प्राजक्त
गंध’ पुस्तकं अगदी मस्त झालं. प्राजक्ताच्या लेखणीचा गंध आमच्या समोर होता. प्रसाद्कडून
पैसे माझ्या खात्यात झाले लगेच जमा. इतरांना भेटून पैसे द्यायला वेळ कुठे होता
त्याच्याकडे. आला तसा निघाला. रात्रीचे विमान होते, ते देखील मुंबई वरून.
दोन दिवसांनी पुस्तक बघितल्यावर
प्राजक्ताचा फोन खणखणला. केव्हढा आनंद झाला तिला. घरभर पुस्तक घेऊन नाचली असणार
ती.
मलाही जाणवलं ते असं की जर ठरवलं
तर होऊ शकतं.
वंदना धर्माधिकारी
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
27-12-2017
प्राजक्त गंध : प्रस्तावना
लेखिका : सौ. प्राजक्ता प्रसाद वझे
परदेशात मुलांकडे
गेल्यावर आपल्या मुलांबरोबर त्यांच्या मित्रमैत्रिणींचा सहवासही आनंददायी असतो.
अमेरिकेत रिचमंड शहरात माझी धाकटी मुलगी राहते. तिच्याकडे गेल्यावर तिच्या
मित्रमैत्रिणी देखील आमच्या आजूबाजूला असतात आणि त्यांच्याशी मस्त गट्टी झाली.
त्यांच्या घरी जाऊन तासंतास घालवणं, पत्त्यांचा डाव टाकणं, बरोबर ट्रीपला
जाणं यामुळे आपल्यालाच लहान होऊन मिसळताना
गंमत येते. अशीच, तिची एक मैत्रीण ‘प्राजक्ता प्रसाद वझे’ माझीही मैत्रीण झाली. आमच्यात लेखणी हा सामाईक दुवा
असल्याने असेल आमच्या गप्पा खूप रंगतात आणि आमची गट्टी छान जमली आहे.
प्राजक्ताचं
स्टेज सर्वात आवडतं. अनेकविध गोष्टी करायचा दांडगा सळसळता उत्साह तिला कायम
कार्यरत ठेवतो. एक स्पर्धा संपत नाही तर लगेच दुसरं सुचविते, आणि त्याच्या तयारीला लागते. कधी नाटक, कधी स्पर्धा, गाणी,
नकला, नृत्य, तेही कधी लहानांचे तर कधी मोठ्यांचे. इतरांकडून काम करून घेण्यातही
तिची हातोटी आहे. मी आणि प्राजक्ता
दोघिंनी मिळून महाराष्ट्र मंडळ कार्यक्रमात ‘कॉमेडी शो’ केला होता. मस्त एन्जॉय
केलं आम्ही.
“तू आई झाली म्हणजे समजेल.” असं
प्रत्येक आईने आपल्या मुलीला कधीतरी
म्हंटलेलं असतं. मुलगी स्वत:च्या मुलांची आई होते त्यापाठोपाठ खऱ्या अर्थाने तिला
स्वत:ची आई समजायला लागते. आणि मग... ती आईची आई कधी होते हे तिलाही समजत नाही,
आणि लक्षात आल्यावर म्हणते, “आईची मी आई”.
थोडक्या शब्दात
काहीतरी चांगल, मनाला पटणारी गोष्ट प्राजक्ता मांडते. मानवी मनाचे हळवे दुखरे
कंगोरे कधी उकललेले दिसतात, तर कधीतरी कुठेतरी त्यावर लिंपण केलेलं जाणवतं.
‘आठवणी’, ‘गा तीच अंगाई’, ‘Loneliness’, ‘हुरहूर’ अशा काही कवितांमधून
भूतकाळात जाऊन तिथे काही काळ विसावणारी तिची लेखणी आपल्यालाही मागे खेचते. जशा
कविता तशाच लघुकथाही. ‘मोठ्ठ होताना’ हे राहिलं आणि ते देखील... याची खंत कुठेतरी
टोचते. आजच्या जगात वावरताना वागण्यातले अचूक धडे तिने दिलेत ‘Corporate Reality’ मध्ये.
Future is a miraculous book for everyone. No one knows hidden moments in
it. No one gets training for transition but have to face it. From where one
gets the courage to step in to the horrible situation and manage
everything? Very nicely written
“Transition.”
“And the World Turns” अगदी खरं आहे. कालचक्र फिरता फिरता एकेक क्षण फेकत असतं. आपण वेड्यासारखे क्षण
गोळा करायला धावतो खरे, पण बरेच निसटून जातात. राहतात कुठेतरी खुणा बनून! मग त्यांच्या आठवणी होतात. नको नको म्हंटल तरी
घुमत राहतात आतल्या आत. तेंव्हा असाच कधीतरी ‘प्राजक्त गंध’ अनावर होऊन कागदावर
उमटतो.
प्राजक्ताची
लेखणी हळूहळू प्रवाहित होत आहे. कविता,
लघुकथा, स्फुटलेखन लिहायला लागली. त्याचा
बहर सुगंध बनून सर्वत्र दरवळेल एक
दिवस. प्रसाद पुण्यात आला आणि प्राजक्ताला काहीतरी सरप्राईज द्यावेसे त्याला
वाटले. त्याने सगळं गोळा करून माझ्या पुढ्यात ओतलं आणि मी फक्त गिफ्ट रॅप केलं.
इतकंच!!
वंदना
धर्माधिकारी