प्रभात दिवाळी अंक २०१६ ::: कथा : एक जड पारडं
लेखिका ::: सौ.वंदना विजय धर्माधिकारी
रुपाली घुटमळत होती घरात. कसं आईला बोलू? कशी सुरवात करावी समजेना.... तरी आज
बोलायचं असा जणू निश्चय केला होता तिने, अगदी सकाळी उठल्या उठल्या. ‘किती दिवस
ढकलायचे असेच. काही गांभीर्य आहे की नाही. हो पुढे आणि बोल. ठरवलं ना तू बोलायचं.
मग गप्प नाही बसायचं,’
“आई, काय
करतेस? सारखं गं काय काम असतं तुझं? ये ना, बसं जवळ.” शेवटी तोंड उघडलं रुपानं
“काय गं,
तसं काही नाही. हे जरा आवरायचं मनात आलं. काय म्हणतेस तू?” पदराला हात पुसतच आई स्वयपाकघरातून हॉल मध्ये आली. रूपा उगीचच
पेपरात डोकं घालून बसलेली. मालतीबाई लेकीजवळ बसल्या. “बोल मने, काय बातमी आहे गं
त्यात.? रोज काही ना काही तरी घडतंच असतं विचित्र. वाचवत नाही बघ अगदी.....जाऊ
देत. तू काय म्हणत होतीस?’
“ तुला एक
सांगायचं होतं.... सांगतेच. अग, आता दोन महिने झालेत. सांगायचं कसं हेच समजत
नव्हतं मला. म्हणून......” खाली मान घालून रुपी इतकं बोलली, आईच्या नजरेला नजर
देणं तिला शक्य नव्हतं.
आणि बॉम्ब फुटला.
क्षणात चित्र पालटलं. मालतीबाईंचा चेहरा बदलला, जणू घर फिरायला लागलं. आणि
“ काय? काय बोललीस? दोन महिने झालेत? आणि आत्ता बोलतेस तू
हे?”
“ हो. कसं सांगावं हेच समजतं नव्हतं मला. म्हणून....” रूपी सहज बोलली.
“ तरीच मध्ये एक दिवस तू अचानक सुट्टी घेतली होतीस. मला
माहितच नव्हतं का
घेतलीस. मी आले घरी तर झोपलेली संध्याकाळची. विचारलं तर उगीच कंटाळा आला. नक्कीच
काही त्रास होतं होता म्हणून घेतली असशील सुट्टी. हो की नाही ते सांग.”
“ नाही. तसं नव्हतं”
“ असं का?
आत्ता समजेनासे झाले काय? करताना समजलं का कसं करतात ते? लाज नाही वाटली तेंव्हा? ..... आज बोलतेस आईला. कुठं पाप केलंस? कोण आहे तो?
सांग, कार्टे आता तरी उघडं थोबाडं. कुणाला तोंड दाखविता येणार नाही आम्हाला...
देवा रे देवा... हेच ऐकायचं होतं मला. मोकळं रान तुला मिळालं?” काही क्षणाची शांतता एकीकडे उकळत होती. रुपीला समजेना हिला
कसं सांगावं. ती फक्त मधून मधून ‘आई..... अगं’ म्हणायची. पण, आईचा पट्टा थांबायचं
नाव घेईना...
“ केंव्हा?
कुठे केलेस हे असले धंदे? आई जाती कष्ट करायला तुमच्यासाठी. शिकायचं ना तुम्हाला
आणि तुम्ही लावा हे असे दिवे. बोल बया
बोल. सांग कोण आहे तो नालायक.? त्याला का शिव्या देऊ? माझीच लेक निघाली अशी... वाट्टेल ते करणारी... माझ्या नजरेसमोर
थांबू नकोस. चालती हो घराबाहेर....” बापरे... आईचा पारा एकदम चढला. काय करावं, कसं
बोलावं काही समजेना रुपीला. तरातरा उठली आणि गेली आपल्या खोलीत. मालतीबाई डोकं
धरून सोफ्यावर बसलेल्या तशाच.
रुपी आत जाऊन खिडीकीतून बाहेर बघू लागली. “ घराबाहेर जा
म्हणाली आई मला? ऐकून सुद्धा घेत नाही. इतकं चिडावं तिनं?” पाठोपाठ आई आलीच. नुसती
आग ओकत होते डोळे. आत आल्या, बसल्या क्षणभर आणि गेल्या निघून. रूपीने सुरवातच केली
होती फक्त सांगायला, तर हा प्रकार. आता पुढे कसे कोण काय बोलणार या संतापापुढे? मधून
मधून बोलायचा प्रयत्न तिने केला. नाही असं
नाही, पण आईसाहेबांचा संताप, तो अवतार पाहून तिला बोलताच आले नाही हेच खरं. रुपीला वाटलं होतं, आई विचारेल
प्रेमाने, पण हा तिचा संतापाचा आवेग आवरण अवघड होतं. इतकं चिडायला काय झालं? कशाला
दोन महिने झाले हे पण नाही ऐकून घेतलं तिने आणि लागली आग पाखडायला? काय हे
विचित्र.... रूपालीचे विचारचक्र क्षणिक स्तब्ध झाले, ब्रेक घेतला आणि दिशा बदलली.
काही मिनिटे अशीच गेली, आणि रूपी आलीच परत आईच्या मागे. माय लेकीचं त्या,
एकमेकींच्या मागेच राहणार. जाणार कोण कुठे? रूपीने काहीतरी ठरवलेले दिसतं होते
चेहऱ्यावर. आरशात बघून तिच्याकडूनही काहीतरी मागून घेतलं होतं. होय, तिनेही दिलं
होतं तिला, म्हणाली असेल, “जा, बोल बिनधास्त. नको घाबरुस.” म्हणूनही असेल कदाचित, रुपीचा चेहरा गंभीर
तरीही ठाम वाटू लागला. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले गेले. काय असते ही आई? ‘मला
नीट विचारायचं, काय झालं, कोणाचं, कधी, काय करायचं यावर बसून चर्चा करायची तर हे
असलं मला घराबाहेर जा बोलणं आईचं. अजिबात शोभत नाही आईला. एका मुलीच्या आणि एका
मुलाच्या आईलाही.’
आई हॉल मध्ये
बसलेली डोकं धरून, डोळ्यात वीज आणि गालावर चार थेंब.
“ हे बघ, तू जर नीट ऐकणार
असशील तरच मी तुला सांगेन. नाहीतर नाही.’ ठामपणे रुपालीने आईला सांगितलं.
तिचा आवाज स्थिर होता. तो ऐकताच आईचा आवाज पुन्हा चढला.
“ कशाला ते? काय होणार? आणि काय करणार? कितीही चर्चा केली तरी......”
“ कशाला ते? काय होणार? आणि काय करणार? कितीही चर्चा केली तरी......”
“ आई, हे तुझं अति होत हं. जरा शांतपणे घेतलंस तर....”
“ अहाहा!! आली शहाणी मला शिकवायला. हेच शहाणपण तेंव्हा कुठं
गेलं होतं शेण खायला. “
इतक्यात
हेमंत आला. रूपालीचा धाकटा भाऊ. तसा तो दारात काही क्षण थांबला होता. मामला गंभीर
आहे, हे त्याच्या लक्षात आलेलं होतं. तरीपण तो घरात आला. जसं काही मी काहीच ऐकलं
नाही. अशा अविर्भावात हेमंत आत आला. आई डोकं धरूनच बसलेली पाहून विचारलं त्यानं,
“ काय
झालं?”
एक ना दोन.
कोणीच काही बोलेना.
कशी कोण जाणे, हेमंतने आईला हाक मारली. “आई, काय झालं?”
“ काय सांगू तुला? तुझ्या कामाचं नाही. जा, पळा.”
मालतीबाईंनी मुलाला जायला सांगितलं. तो तसा लहान नव्हताच मुळी. असेल, चोवीस
वर्षाचा. आणि रुपाली सव्वीस वर्षाची. दोघांमध्ये जेमतेम दीड पावणेदोन वर्षांचा फरक.
रुपालाही यंदा लग्न करायचं आहेच. तर, हे असं मधेच काहीतरी.
हेमंतने पडत्या फळाची आज्ञा उचलली, तो वळणार तोच, “ चाललास
कुठे, थांब इथेच. तू काय आत्ता कुक्कुल बाळ आहेस काय? जायचं नाही कुठे?”
“ त्याला कशाला थांबवतेस? जाऊ दे त्याला.”
“ तो जाणार नाही, नाही म्हणजे नाही. मी सांगते म्हणून.
समजलं तुला.” हेमंतची हिमंत नाही झाली, रुपालीचे न ऐकता पुढे जाण्याची.
“ जा रे तू, बघू काय करते ही. क्लास असेल ना तुझा आत्ता.”
मालतीबाई पोराला पिटाळत होत्या.
“ हेमंत, कुठेही जाणार नाही. हे मी सांगते.” रुपालीच्या
आवाजाची धार ऐकून मालतीबाई देखील गप्प बसल्या.
“ आई, माझा क्लास नाही. मी थांबतो.”
“ इथेच, याच खोलीत. वर जायचं नाही. समजलं” रुपीने हेमंतला दमातच घेतलं.
“ इथेच, याच खोलीत. वर जायचं नाही. समजलं” रुपीने हेमंतला दमातच घेतलं.
पाचदहा मनिटे अशीच गेली. पुढे काय हा प्रश्न तिघांसमोर
होता, पण कोणीही कोणाकडे बघत देखील नव्हते.
“ जा, वरून बाबांना बोलवून आण. मी बोलावलं म्हणून सांग.”
हेमंत ही लगेच उठला. वर न जाता खालूनच आवाज दिला, “ बाबा, खाली या.”
“ इतका वेळ घरात काय चाललं हे काय त्यांना ऐकू गेलं नाही की
काय? नाटकी कुठले? मुद्दाम बसले आत लपून. आता येतील गुरकतं फुकटचे. येऊ देत
त्यांनाही.” रुपी हे स्वगत बोलली, पण आईच्या कानांनी टिपलं.
“ कोणाला काय बोलतेस? बाबा आहेत ते.” रागावल्याच.
“ माहित आहे, तू नको सांगूस नातं आमचं. इतके वर्षे ओळखते
त्यांना आणि तुलाही. आज अशीही तुझी ओळख करून दिलीस तू.” आईच्या उत्तराला उत्तर
द्यायचेच असं ठरवलंच रुपीन.
“ मी का तू ?” मालतीबाईंनी पुढलं गीळलं. बाबा आले ना.
“ काय गं काय चाललं आहे मघापासून दोघींचं. मी आपलं काम करीत
होतो, नाही आलो खाली. कशाला बोलावलं मला. काय गं मालू. बोला कोणीतरी... रुपी काय
म्हणतं होतीस?”
“ सांग, आता सांग. मला बोललीस तेच.” आई म्हणाली.
“ मी कशाला सांगू त्यांना. तूच सांग ना. नेहमीसारखं. काही
असलं की आधी आईला सांगा, बाबांशी डायरेक्ट बोलायला शिकवलं तरी का तू. केव्हढा धाक
त्यांचा. काय बोलणार आम्ही. सांग तूच.” रूपालीचे हे असे बोलणे अजिबात कोणालाही
अपेक्षित नव्हते. फक्त तिला, आरशातलीला माहित असेल, हे असचं काही होणार म्हणून.
“ फार शहाणी झालीस काय? उलट उत्तर देतेस आईला.” आता तर
बाबांनी तोंड उघडलं.
“ उलट नाही, सरळ देत आहे. म्हणा तुम्हाला त्याची सवय नाही.
तरी ऐका.”
“ काय ते तरी सांगा लवकर. चहाची वेळ झाली. जा चहा कर आधी.
बडबड चालली केंव्हापासून.”
“ मी चहा करणार नाही.” रूपालीचे हेही उत्तर तितकेच स्पष्ट
ऐकलं सगळ्यांनी. मालतीबाई आत गेल्या.
“ आज चहा उशिरा मिळेल.” असं म्हणून तिने आईला देखील आडवलं.
‘ह्यांना काय होतं चहाच्या ऑर्डर्स सोडायला. स्वत: करून आम्हाला दिला तर काय
बिघडेल याचं.’ मनातले विचार तिला परखड बोलायला भाग पाडत होते.
“ हेमंत, तू सांग रे काय झालं ते.” बाबांनी लवकरच आपला होरा
लेकाकडे वळविला. याचा सरळ अर्थ काहीतरी भयंकर झालेलं आहे, हे त्यांना कळलं होतं.
पटकन माघार घेणारे ते नव्हतेच. तरी अजून आरडाओरडा सुरु झालेला नव्हता. ऐकलेलं असेल
काहीतरी. रुपिला हसू आलं.
“ हसायला काय झालं. आई रडतं आहे, तू हसतेस, शरम नाही
वाटतं.” बाबा तडकलेच.
“ कोणाला विचारताय? मला? रडायची वेळ तुमची आहे आता, माझी
नाही. आणि शरम मला का वाटली पाहिजे? मी काय केलं? सांगा. नुसतं ओरडायच ठावूक आहे
तुम्हाला.” रूपालीने कमाल केली. कधी नव्हे तिने बाबांच्या पुढे आवाज केला होता.
“ रूपे, गप्प बैस.” असं म्हणून बाबा पुढे आले, हात शिवशिवत
होताच. तसं तिला मागील दोन एक वर्षात नसेल मारलं त्यांनी. पण, आज पाऊल उचललं होतं.
आणि रूपालीला तेव्हढ पुरलं.
“ मारा, या ना. मी बघते तुम्ही मला कसे मारता ते. राग,
संताप्, आरडाओरडा, घृणा आणि तिरस्कार कायमच असतो बरोबर. का हो थांबलात तिथे.” खुद्द
बापाला आव्हान केल्यासारखी बोलत होती आज रुपाली. कधी नाही अशी वागलेली. काय झालं
तिला? इतकं बेफान व्हावं तिनं?
“ ताई, प्लीज शांत हो. चल तू वर जा.” हेमंताने खूप वेळाने
तोंड उघडलं तशी चवताळून पुढे आली रुपाली.
“ रूपा,” बाबांचा वरच्या पट्टीतली चढी चाल आणि तिच्या
दिशेने आलेलं एक पाउल. पुरेसं झालं रुपीला चार पावले बाबांच्या दिशेने जायला.
“ ओरडा, तुम्ही मारा. त्यात तुम्हाला कधीच काही वाटतं नाही.
तिघेही या माझ्या अंगावर धावून. मी पण बघीन. मी माझ्या स्वत:च्या रक्षणासाठी कर्राटे शिकले. एका दमात लोळवीन तिघांना. काय
समजता काय स्वत:ला. वाटलं नव्हतं त्या कर्राट्यांचा प्रयोग पहिल्यांदा घरच्यांवर
करावा लागेल.” असे म्हणून रुपालीने पवित्रा घेतला बाबांसमोर. बाबा तिथेच खाली
बसले....जणू घेरी आली की काय. पण नाही, तसं नाही झालं.
रुपालीची स्वारी बंधुराजांकडे वळली. तसा मातोश्रींचा जीव
घाबरला. त्याला मारणार की काय? रुपीने त्याच्या शर्टला गळ्याजवळ धरलं आणि जोरात
खेचून आईच्या कडे फेकलं.
तर.... मालतीबाईंची दातखीळ उघडली. “रूपे, काय करतेस?”
“ बोंबल जोरात... माझ्या नावानं. येतं काय तुला दुसरं. कसं
तोंड उघडलं लगेच.” रुपालीची कडक नजर ना हेमंतने झेलली, ना आईला जमलं तिच्याकडे
बघायला. एक तरुण मुलगी आपल्या घरावर इतका संताप व्यक्त करू शकते, केवळ भयानक
उद्रेग झाला होता तरुणीचा.
“ तूच ना रे तो. उघडं थोबाडं. सांग तुझ्या आईबाबांना.”
रूपालीचं हे वाक्य आईने ऐकलं आणि ओरडलीच, “ काय, हेमंत तू. हे
असं.”
“ओ मातोश्री, अकलेचे पाजळले ते पुरेत. गप्प बसाल का जरा.
.... प्लीज.” मालतीबाईं घाबरल्याच. नवरोबांचे शेजारी बसल्या. रुपालीने रागाने नजर
टाकली आईबापाकडे.
“ हेमंत, तू बोलतोस कि मीच बोलायचं.” मोर्चा भावाकडे वळला.
जवळ गेली. “बोल की रे.”
मालतीबाईंचा जीव वरखाली. कोणीच काही वेळ बोलले नाही. शेवटी
रुपीनेच सांगायचं मनावर घेतलं. “ हेमंत, काय म्हंटल मी ऐकू नाही आलं का?”
हेमंत काहीच बोलेना. जिथे ढकलून पडला होता, तिथेच खाली मान
घालून बसलेला.
“ ऐका, सगळेजण ऐका. दोन महिने झालेत. हे फक्त इतकेच मी बोलले
तर इतका मोठ्ठा तमाशा झाला. आता कोण काय ते ऐका. हेमंतमुळे.”
“ आईबाबा अवाक. हे कसं शक्य आहे? आपण दोघे घरी नसताना हे
दोघं. अशक्य.. भयंकर .”
निशब्द शांतता. सगळ्या नजरा हेमंतकडे, त्याची नजर पायाच्या
करंगळीवर.
रुपाली दोन मिनिटे काहीच बोलली नाही. जो तो आपल्या मनात
काहीतरी भयानक चित्र रंगवीत बसलेले. रुपाली क्रूर हसली. तिच्या थोड्याश्या
हसण्याने चित्र हलले.
“ हेमंतमुळे एक मुलगी दोन महिन्याची गरोदर आहे.”
कोणीच काही बोललं नाही. त्यानेच उलट रुपाली जास्त चिडली.
“ का ग? ये आई..... तू त्याची पण आहेसच ना आई. मग, विचार त्याला.
मला खडसावून आरडून ओरडून विचारलं तसंच. शिव्या वाच जोरजोरात. हातवारे करीत एकेक
प्रश्न ओक त्याच्यापुढे. कुठं पाप केलंस? उघडं
थोबाड, देवा रे देवा....कोण ती. तिला का शिव्या घालू. माझाच मुलगा धड नाही. वाटलं
नव्हतं हे कारट असं निपजेल म्हणून. आता का
बोलतं नाहीस. पोराने केलं म्हणून गप्प
बसलीस. दे हाकलून त्याला घराबाहेर. माझ्यासारखेच. लगेच चल जा घराबाहेर... चालता
हो?” रुपालीने पट्टा सोडला. म्हणा तिचे बरोबरच होते. चुकला होता मुलगा, मुलगी
नाही. आईने शिव्या दिल्या मुलीला, आणि मुलाला एकही शब्द नाही. हा कुठला न्याय.
दोघेही एकाच आईच्या पोटात वाढलेले ना? तरीही हे असं, इतका भेदभाव दोघांच्यात.
“ दातखीळ बसली तुझी की वाचा गेली?
लाज नाही वाटली तेंव्हा? ..... कुठं पाप केलंस? कोण आहे ती? सांग, कार्ट्या आता तरी उघडं थोबाडं. कुणाला तोंड दाखविता येणार
नाही आम्हाला... हेच ऐकायचं होतं मला. मोकळं रान तुला मिळालं?” काही क्षणाची शांतता एकीकडे उकळत होती.
हेमंतच गप्प बसणं जाणवलं आणि वेगळं सांगायची गरजच उरली
नाही.
“ काय चाललंय तुम्हा दोघांच. नीट सांगा. हेमंत....”
बाबांच्या आवाजासरशी हेमंत कापायला लागला.
“ मारा, मारा त्याला. लाडोबा नुसता करून ठेवलात. कधी चार
गोष्टी सांगितल्या का तुम्ही मुलाला? त्याला नाही तुम्ही दोघे रागावणार. मी मुलगी
तर मला लाखोली वाहिली आईने. आता
बसली. ढोंगी कुठली. का गं, चालू कर तुझ्या तोंडचा पट्टा. मला बोललीस
तसा. “
रुपालीने अगदी वर्मावर बोटं ठेवलं. “ तुम्ही कायम मलाच दोष द्या, रागवा, कामे
सांगा, त्याला गधड्याला कधी काही नाही. पोरगा ना तो. म्हणून त्याला सगळे गुन्हे
माफ करता. एखादी गोष्ट देखील त्याला
तुम्ही कधी सांगत नाही. वंशाचा दिवा आहे ना तुमचा. ओ, आई साहेब, घसा बसला का
तुमचा. पाणी प्या. ओरडा तुमच्या दिवट्यावर. मी जाणार घराबाहेर.”
रुपालीच्या शेवटच्या शब्दांनी सगळ्यांच्या माना वळल्या. ती
तशीच उभी बाहेरच्या दरवाजाकडे बघतं. तरीही मालतीबाई पुढे आल्या नाहीत. आणि....
रुपी दरवाज्याच्या दिशेने दोन पावले गेली. तसा हेमंत उठला आणि तिला धरलं. रुपीने
स्वत:ला लगेचच मोकळं करून घेतलं. दाराची पावले खिडकीकडे वळली, इतकाच बदल. काय दिसतं होतं तिला बाहेर?
किती वेळ गेला उकळणाऱ्या शांततेत? त्याचा भंग करायची हिंमत
फक्त रुपलीतच होती. पुन्हा तिचाच आवाज उमटला. “ तू म्हणालीस ना? मागल्या महिन्यात
मला त्रास होतं होता म्हणून मी सुट्टी घेतली. तर ऐका बाईसाहेब.....”
बाईसाहेब... म्हणजे? हे तर रुपालीने
फक्त एका स्त्रीला पुकारलं. हा फरक सगळ्यांनी टिपला. पण हललं कोणी नाही. इतकी
बधिरता वातावरणात.
“ कोण ती मुलगी
विचारलं नाहीस तू. विचारू पण नकोस. कारण चूक पोरानं केली आहे. त्यालाच जाब विचार.
मला बघायचं आहे. तू कशी बोलतेस त्याला ती. गोंजारत बसशील. शिव्या खायला मी आहे ना खमकी इथे, दिल्यास भरपूर पोटभर.... या पोट्याला जवळ घेऊन विचार बरं. काय आईबाप
आहेत दुनियेत? सगळा समाज बिघडवून टाकलात पार, कोणाला बोला. तुम्ही आईबाप ना. तुम्ही म्हणाल ते बरोबरच असणार.
आम्ही अजूनही लहानच, आणि मी तर मुलगी. ------- मला ना. आज अगदी स्पष्ट कळलं.
आईबाबा कसे आहेत, कसे असतात ते. आपल्या मुलांना कसे वेगवेगळे वागवतात. मुलगी काय
दुसऱ्याच्या घरी जायची. तिला कशाला प्रेम द्या. पोरगा तुमची काठी
म्हातारपणाची. स्वार्थी आहात तुम्ही. होय
तुम्ही दोघेही स्वार्थी आहात. दुजा भाव करता तुम्ही..........”
रूपालीचे शब्द खूप सत्य सांगत होते. त्याच घरातले नाही तर
प्रत्येक घरात हेच घडतं. मुलाला उजवीकडे झुकलं माप मिळतं आणि मुलीला डावललं जातं.
त्याने समाजात अनेक समस्या निर्माण होतात. पण या मोठ्या माणसांच्या लक्षात आपली
चूक येत नाही. अगदी उंबऱ्याच्या आत आल्यावर जाणवली चूक तरी पश्चाताप होत नाही. चूक
मुलीची असेल, तर शिव्या शाप, घराबाहेर, अब्रूची लक्तरे वगैरे वगैरे... तिला छापील किंमत तितकीच असते. कशाला तिचे महत्व
वाढवा? समाज बिघडवायला हेच आईबाप जबाबदार असतात. ते जर दोघांना एकसारखे वागवतील,
मुलाला समज देतील, तर मुलगे देखील जबाबदार होतील. पण.... पुरुषप्रधान संस्कृतीत हे
बसतं नाही ना... काय करणार? की हे असेच चालू राहणार? मग, एकेक रुपाली अशी बनेल. तेंव्हा
तिला रूपालीला कोणी दोष देऊ नका. नाही... तसे होणार नाही. उलट, आईबापाला उलट उत्तर
देणारी म्हणून तीच बदनाम होणार. हे नक्कीच. तिथेही मुलीचेच चुकीचे वागणे, असेच शिक्कामोर्तब होईल
तिच्यावर, एका मुलीच्या वागण्यावर. पोराला मात्र काहीही नियम नाहीत, मोकाट सोडलेला
लाडावलेला बैलोबा. ऐतखाऊ.
“ तर बाईसाहेब, त्याच मुलीशी बोलायला मी सुट्टी घेतली होती.
समजलं. तुला काय समजलं माहित नाही. पण, तुमच्या लेखी मी कोण, माझी काय किंमत हे
मात्र तुम्ही अगदी स्पष्ट दाखवलेत. त्याबद्दल थ्यांक्स.”
“ मी आणि ती मुलगी आम्ही बघू काय करायचे ते. तुम्हाला
मुलींची किंमत नाहीच. बसा तुमच्या लाडोबाला कुरवाळीत. बरं झालं म्हणा.... मलाही
कल्पना आली. मी काय करायचं ते.”
रुपाली वळली आणि आपल्या खोलीत जायला निघाली. तसे पिताश्री
उठले. बायकोवर डागली तोफ. “ काय बसलीस खिळून? वाट्टेल तसं बोललीस तिला. रूपे, तू
कुठेही जाणार नाहीस. हे मी सांगतोय. समजलं.”
“ ते आता माझं मी बघेन. सज्ञान आहे मी. माझ्या पायावर उभी
आहे.”
“ होय, ते आम्हीच उभं केलं आहे तुला.”
“ खरं आहे. म्हणूनच खरं बोललं गेले माझ्याकडून. मला कोणीही नकोय. बास.”
बापाच्या शब्दांनी ती विरघळली नाही. फक्त गप्प झाली इतकंच.
हेमंत उठला, रुपीला घेऊन तिला आपल्या शेजारी सोफ्यावर
बसवलं. त्याचा चेहरा पडलेला, काही तरी शोधणारा. पुन्हा स्मशान शांतता.....किती वेळ
मध्ये गेला कोण जाणे.
बहिणीच्या जवळ बसल्याने की काय हेमंतला धीर आला असं झालं की
काय? त्याने तोंड उघडलं.
“ ताई म्हणते ते खरं आहे. चित्राला दोन महिने झालेत.
आम्ही... दोघंलग्न करायचं म्हणतो.”
शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहणारी चित्रा, सुसंस्कृत घरातील
चांगली मुलगी. अशी अडकली होती. त्यावर.... पुढे काय?
“ आई, तू जरा विचार करायला हावा होतास ताईशी बोलताना. तिनेच
चित्राला धीर दिला, मला समजावलं आणि तुम्हाला सांगायला पुढे आली. पण, तू
म्हणजे......”
यावेळी मात्र पिताश्रींनी आवाज केला, “ मालू, मी पण सगळं
ऐकतं होतो वर बसून. जरा पोरीचं ऐकून घेऊन बोलली असतीस तर काय झालं असतं? आणि समजा
असती रुपी प्रेग्नंट तर काय आभाळ कोसळणार होतं? तुला तशी कमीच आहे म्हणा.”
“ हेमंत, तू चुकीच्या पद्धतीने लग्नाची गोष्ट करतोस आमच्याशी. ताईच्या लग्नाचं काय? केलास का
कधी तिचा विचार.....”
रुपाली वरवर शांत दिसली, तरी आत अतिगंभीर शांत होती.
म्हणाली, “ माझ्या लग्नाचा विचार आता कोणीच करू नका. माझं मी बघेन. तुम्हाला तसदी
देणार नाही. ना लग्नाची, ना माझ्या इतर गोष्टींची. आणि....लग्न करीनच असेही नाही.
पुन्हा तिथे दुसऱ्या पुरुषाचा त्रास सहन करायची माझी इच्छा नाही. मला आई व्हायचचं असेल तर आता इतरही मार्ग आहेत. तुम्ही तुमचं
बघा, मला कोणीही काहीही सांगायची गरज नाही. खूप सोसलं मी या तुमच्या चुकीच्या
वागण्यामुळे. आता नाही, दाखवून दिलीत तुमची खरी रूपे. बस........”
“ रूपे, आम्ही आईबाबा आहोत तुझे. सगळं तुझं नीट करू.”
“ नको, जन्म दिलात, आभारी आहे. आणि आज जे रूप दाखवलेत,
त्याबद्दल आणखीन आभारी.”
रुपालीने आज आईबापाला सोडायचंच नाही, असेच ठरवले होते.
हेमंतला काहीतरी बोलायचं होतं.... “ ताई, मी खूप चुकलो. तू
कायम माझ्या चुका पोटात घालतं आलीस. आई बाबांना सुद्धा माहित नसेल ते ते सारं मी
तुला सगळं सांगायचो. मी आहे तुझ्या बरोबर. हे मात्र लक्षात ठेव. आई बाबा, आम्ही
आमचे निर्णय घेतलेत. तुम्ही बरोबर असावं असं वाटतं. असलात तर ठीक, नसलात तरी
ठीक....”
“ अजून प्रोबेशन वर आहात चिरंजीव. लग्नासाठी बरंच काही
लागतं. हवा पुरतं नाही. ती फक्त उडायला पुरते.”
“ मला माहित आहे. पण, माझ्या चुकीबद्दल रुपीला का शिक्षा?
मी भोगीन काय भोगायाचं ते. तिला का बोललीस आई तू. वाट्टेल तसे. उतरलीस तू. ना
तुम्ही मला जाणून घेतलेत ना ताईला. कायम तिला दुय्यम वागणूक दिलीत. मला समजायचं
तुमचं चुकीचं वागण, पण मी ही स्वार्थी होतो. तुमच्या विरोधात कधी आवाज केला नाही.
कारण मला मिळतं होतं सगळं. कशाला रुपीचा मी विचार करू? जेंव्हा खूप समंजसपणे
रुपीने आम्हा दोघांच प्रेम आणि जे झालं ते घेतलं, तेंव्हा मला ताई समजली. खूप
आवडली ताई मला. इथून पुढे तिला जर कोणी एक शब्द बोललात तर बघा. आम्ही मोठे झालोत,
तुम्ही नाही समजून घेणार हे मला माहित होतं. रुपीकडे गेलं की ती काहीतरी करेल याची
खात्री होती. म्हणून .... तिच्याशीच आम्ही दोघं बोलालोत.”
आणि.... एका दमात बोलणारा हेमंत कोसळला. “ताई.....” बासं
इतकंच म्हणून मोठ्यांदा रडायला लागला......
वंदना धर्माधिकारी
M : 9890623915