08-03-2010
पालवी – अडगुलं मडगुलं ते
पैलतीर
लेखिका : सौ. वंदना विजय
धर्माधिकारी
लेखणी सर्वत्र उधळत पळत
होती. मासिके, वर्तमानपत्रे काहीतरी देत होते. ते घेत होते, छापत होते. मुक्ता मासिकात दरमहा लिखाण करायची संधी मला
दिली. ललित वैचारिक लेख द्यायचे होते. अगदी माझ्या आवडीचे काम होते. साहजिकच माझी
लेखणी घरात फिरू लागली लहानांमध्ये खेळू लागली. तरुणाईत रंगू लागली आणि
वयस्करांबरोबर शांतपणे गप्पा मारू लागली. नातेवाईक येत जात होते, एकीकडे अभ्यास
करणारे टाळाटाळ करीत होते. कोणीतरी आपल्या लग्नाची स्वप्ने रंगवीत होते. आजीआजोबा आयुष्याचा
लेखाजोखा मांडण्यात मग्न झालेले. एकाचे एक तर दुसऱ्याचे भलतेच काहीतरी. ताळमेळ कसा
बसणार, आणि गाडी रुळावर कशी कधी येणार. आयुष्यातली निरुत्तरित राहिलेली कोडी उगाचच
पुन्हा पुन्हा उकलत बसण्यात काही अर्थ नसतो हे माहित असले तरी त्यावरून मनस्ताप
होतोच ना. दुरावा बोचतो, तर कोणाची हाक बळ देऊन जातं.
छोट्या छोट्या गोष्टी सहज
टिपल्या जातात, बोचत राहतात. बोचणीची होते लेखणी आणि कोड्याचे उत्तर सापडते. एकेक
करीत एकवीस लेखांना एकत्र गुंफल आणि त्यांची पालवी तयार केली. अडगुलं मडगुलं
म्हणतं पिढ्या पिढ्या मोठ्या झाल्या. त्याच काही टप्प्यांवर डोलत असते पालवीची
हिरवाई. वैचारिक हिरवळ म्हणू यात का? पायवाट मोकळी सापडते आणि जोरात पळत जावं
त्याच वाटेवरून अशी उभारी देखील मिळते.
वंदना धर्माधिकारी