Saturday, August 4, 2018

38. Sahitya jeevan gaurav puraskar- साहित्य जीवनगौरव पुरस्कार ४ ऑगस्ट, २०१८





साहित्य संमेलन अध्यक्षा आणि साहित्य जीवनगौरव पुरस्कार : ४,ऑगस्ट, २०१८

लेखणीने मला खूप माणसे दिली. त्यापैकी एक श्री. मधुसूदन घाणेकर. त्यांच्याशी परिचय झाला, माझ्या लेखणीची कलाकुसर पाहून लगेचच ते म्हणाले, की तुम्ही आमच्या संमेलनाच्या अध्यक्षा. खरं तर साहित्यात माझे योगदान अध्यक्षा होण्याइतके नाही. तशी जाणीव मला आहे, तेच मी त्यांनाही सांगितले. मध्ये बराच काळ गेला. वाटलं, लोकं म्हणतात हे करू ते करू, पण जोपर्यंत प्रत्यक्ष काही केलं जात नाही तोपर्यंत काही खरं नसतं अशी माझी समजूत.   काही दिवसांनी एकदिवस खरोखरीच मला अध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारण्याची विचारणा झाली. त्याचबरोबर “साहित्य जीवन गौरव पुरस्कार” घोषित केला गेला.

साहित्य गौरव हा साहित्यिकांचा एक ग्रुप आहे. अनेक दिग्गज साहित्यिक एकत्रित येतात आणि दरवर्षी वार्षिक संमेलन ऑगस्ट, महिन्यात भरवतात. तेच यंदा ४ ऑगस्ट,२०१८ रोजी वेद शास्त्रोत्तेजक सभागृह, पुणे येथे भरविले होते. त्या साहित्य संमेलनाची अध्यक्षा व्हायचा मान मला देण्यात आला. त्याने खरं तर माझी जबाबदारी अधिक वाढली असेच मला वाटले. तेंव्हा अधिकाधिक लिखाण करायचेच असे मी मनाशी ठरवले. छोट्याश्या का होईना संमेलनाची मी अध्यक्षा झाले, यात मला खूप आनंद आहे. माझ्या लेखणीला मिळालेली ही अतिशय मोलाची दाद आहे, असे मला वाटते.

“साहित्य जीवन गौरव पुरस्कार” हे नावचं खूप काही सांगून जाते. साहित्य प्रकारातील काही प्रकार मी हाताळते, सातत्याने लिखाण करते त्याचेच हा गौरव हे फलित आहे. विशेषत्वाने माझे अधिकांश लिखाण बँकिंग विषयावर असते. त्याच बरोबर माझा कथासंग्रह, कवितासंग्रह, ललित वैचारिक लेखांचे संकलन केलेले पुस्तक आणि साहित्य क्षेत्रात असलेला वावर याची दखल घेतली गेली याचा मला आनंद आहे, समाधान आहे.

धन्यवाद!

वंदना धर्माधिकारी
४ ऑगस्ट,२०१८
पुणे





Tuesday, June 26, 2018

58. Story - माझी लाडकी


नुक्कड कथा स्पर्धा सहभाग
कथा  :  माझी लाडकी
लेखिका : सौ. वंदना विजय धर्माधिकारी

“उडदामाजी काळेगोरे, काय निवडावे निवडणारे”. काळेगोरे निवडणारे .....पुढे काय? हे काय चकाकलं?  
ऊन परावर्तीत होऊन देवावर?  
“बाप्पा प्रसन्न झाला काय? छे, माझं कुठलं नशीब असले? कोण रे तिकडे?”
‘अगं बाई, आलं की गालावर. आणि अडकलं  गालाच्या खड्यात! खळी कसली, दात काढलेत ना मी..आता वय आहे का गालावरल्या खळीत कोणी अडकायला? इश्श!!  भलतंचं काहीतरी येतं मनी. म्हातारचळ ह्यांचेच.’
मनाशी बडबड करीत सरलाबाईनी ताम्हण दूर सारलं अन ‘उडदामाजी’ म्हणतं भिंतीच्या  आधाराने उठल्या. कवडसा  नाकावर डोळ्यावर. पटकन झाकला चेहरा. तोच समोर तेच आपलंच ध्यान!!  काळेगोरे!!!  काय निवडलं होतं मी?  किती गोरापान होता आणि आता काळाकूट्ट!
‘ ओ! गप बसा. काय चाललंय? मनाची नाही जनाची तरी. चार नातवंडांचे आजोबा! गपगुमान रहा. सोडा तुमचे चाळे, जरा अधिकचं होतंय. काय म्हणावं? पूजेचं एक काम करीत होतात तेही माझ्यावर ढकललं! अन ग्यालरीतून बायकोकडे बघत बसता? वेड लागलं अप्पांना असं म्हणतील.’
“बॉबी! माझी बॉबी!!” म्हणतं पळाले आतल्या खोलीत. त्यांच्यामागे सरलाबाई.
“हमतुम एक कमरे में बंद हो जाय और चाभी खो जाय....” गिरकी घेऊन चक्क हसत बसले की कॉटवर अप्पा!
‘आता मात्र कहर झाला? कपाळ माझं? आगीतून फुफाट्यात पडलेत, आधीचं बरं होतं म्हणायची वेळ आली. हे व्यंकटेशा, मला आधी उचलं. नको अब्रूचे धिंडवडे म्हातारीचे.’ सरलाबाईंचा नमस्कार.
“ शेर कों मै कहूँ गी, मुज़े खा जाय.” तोंड वेंगाडत सरलाबाई कावल्या.
“हमतुम कमरे में? काय आरंभलय तुम्ही? आजारी आहात तर असला हिरवटपणा. हे बरं कळतं, बाकी काही नाही? लाकडं गेलीत म्हसणात.” अतिशय संतापल्या सरलाबाई  
काळजीने डोळे पाणावले तसे सरलाबाई बसल्या अप्पांशेजारी.  काकुळतीने  विचारलं “का असे वागता तुम्ही?”
“माझी शपथ आहे तुम्हाला. तरुणपणात नाही लाडान केलं असं? कायम चिडचिड, वसंवस, आरडाओरडा. पंच्याहत्तरी ओलांडली ना? त्राण आहेत का अंगात? त्रास होत असेल तर जाऊ डॉक्टरकडे?”
डॉक्टर ऐकताच अप्पा चिडले, “नाही, मला काहीही झालेलं नाही. नाहीतर बोलशील पोराजवळ, तो उचलेल आणि टाकेल हॉस्पिटलमध्ये. अजिबात नाही. समजलं? काय म्हणतोय मी?”
“आहो नाही कसं? महिना झाला बघतें मी, आरशात काय बघतं बसता, हसता काय, गाणं म्हणता! मी काय नवी नवरी आहे? किती अंगलट करता? मागेमागे! चक्क डोळा मारलात परवा.”
“लागला तुला? कुठे? दाखव बरं. फूssss. जे करायचं राहिलं ते तर करतोय आता. जवळ ये ना दावतो.”
“आलीस ना माझ्याजवळ? कसा चमकला चेहरा एका पोरीचा... नाSSSS एका म्हातारीचा? मज्जा?”
“मज्जा!!! मेलं तुमचं कर्म. असे का करता ते सांगा आधी. नाहीतर मी ”
“मीमी काय? म्हण, माहेरी जाईन, जीव देईन, बोलणार नाही.”
“तुम्हाला वेडं लागलं आहे.“ सरलाबाई एकदम घायाळ. आधीच कॅन्सरच्या रोगाने पछाडलेला नवरा, आता वेडा झाला. महाभयंकर!
रडायलाच लागल्या तर अप्पा मोठ्यांदा हसायला लागले.
“सरले, तू रडू नको. जरा बघ माझ्याकडे, तुझ्या वेड्याकडे “
सरलाबाई नवऱ्याच्या जवळ जाऊन मुसमुसू लागल्या, “तुम्ही मला सांगा खरंखरं कारण. का असे तरुण होतं आहात तुम्ही? मी कमी पडले का कधी? मी आज मुलांना सांगीन ....”
“दम देता काय सरला त्र्यंबक मोने? कोणाला? आपल्या पतिराजांना? पाहून घेतो तुमच्याकडे?” चक्क डोळे वटारून दम दिला अप्पांनी, आणि मिशीला पीळ देऊ लागले.
सरलाबाई आणखीनच घाबरल्या, ‘आता काय बाई हे? घरात दोघेच, हा अॅटॅक तर नाही ना? फोन लावावा का प्रकाशला  नको, सुनबाईला बोलावते.”
“नको गं राणी, अशी निष्ठुर होउस. तू फक्त माझ्याकडे बघं”
‘अप्पा चेष्टा करतात की गंभीरपणे विचारतात, काही समजेना.?’
“बोला, काय बघू. काही बाकी आहे का तुमच्याकडे?”
“हे बघ, माझी मिशी... माझी मिशी जशीच्या तशी. जाताना मला मिळणार खुषी. “
“बाबा रे! स्पष्ट बोलं. काय झालं मिशीला?”
“काय झालं? तुला नाही समजलं? अरे देवा! किती अभागी मी.”
“तुम्ही भाग्यवान हो, मीच अभागी. मला नाही अक्कल. सेवा करते तुमची, आणि तुम्ही छळा मला.”
“आत्ता बोलता का सूsssss सुस्पष्ट?” शेवटचा स्वर काढला मात्र....”
अप्पा चरकले.
“अग, तुला आठवतं माझ्या मिशीला चाई लागलेली. चांगली गोलाकार मोठ्या टिकली एव्हढी! डाव्याबाजुची मिशी मी कमी केली, एकचं कशी कमी करायची म्हणून दुसरीकडे लावली कात्री.”
“हो, लागली होती चाई. तिचं काय?”
“तिचं म्हढ! तेच उगवलं बघं. ये ये बघ....उगीच नव्हतो मी आरशात बघतं. बघ काळपांढर गवत उगवलं
मिशीच.”

“जिंदगानीत नसती उतरवली मी. कॅन्सरच्या आजारपणात सप्पाट करावी लागली.”

“चार केमो नंतर..... ती आली परत! होय, खरचं! सगळीकडे आली माझी लाडली. आता न कापता भरदार मिशीच्या देही देवाघरी जाणार.” आणि तोंड वाकडं करून मिशीची अप्पांनी पप्पी घेतली

“अगं बाई....खरंच की!  किती आवडते मिशी तुला. माहिती आहे मला. तुझं ते....” चक्क लाजल्या सरलाबाई.

“सरला, अगं मला इतकं वाईट वाटायचं. प्रत्येक केमोच्या वेळी. चौथी केमो केल्यानंतर दोन दिवसांनी बसलो होतो घाणेरडा चेहरा न्याहाळत. चाईच्याजागी  हात फिरला तर हाताला लागलं काहीतरी.  तुरा यायला लागलेला.  तुला बोलणार होतो. वाटलं, तुझी गंमत करावी. थोडा वेडा झालो. बास!”  
 “तू ना अस्सा ..... !”
“वेडाबाई गं माझी!”

Wednesday, June 13, 2018

53. Poem - कुंडली! कुंडली!! कुंडली!!!



कुंडली! कुंडली!! कुंडली!!!
कवयित्री : सौ.वंदना विजय धर्माधिकारी


संगणकाने कमाल केली, जन्मवेळ देता जादू झाली I
गणिती आकडेमोड झाली, समोर जन्मकुंडली आली II 

शनी, राहू, केतू आले, बुध, नेपच्यून, प्लुटो बसले I
गुरु, मंगळ, हर्शल, चंद्र, शुक्रासह असते ‘कुंडली’ II

अक्षांश आणि रेखांश, जगात कोठे मिळतात I
त्यास काय म्हणतात? नाव सांगे ‘कुंडली’ II

पत्रिकेच्या नाना तऱ्हा, नारायणी पाश्च्यात I 
सायन आणि निरयन, सर्वच दावी ‘कुंडली’ II

नक्षत्र, रास, गण, गोत्र, पत्रिकेत एकत्र नोंदली I
दोघांची युती, पाठीशी शशी, सांगड घाली ‘कुंडली’ II

प्रत्येक राशीला साडेसाती, पाच सरली अडीच उरली I
शुभांक आणि खडे दाविती, प्रचीती दावे ‘कुंडली’ II

एक पानी, शंभर पानी, भूत भविष्याची रेखाटणी I
क्षणात सुबक मांडणी, छापून देई ‘कुंडली’ II

अभ्यास करून परीक्षा दिली, मार्कलिस्ट बघता भोवळ आली I
अपयशाने भरली झोळी, ‘काय करू?’ सांगे ‘कुंडली’ II

दोघांची मने जुळली, परी पत्रिका आड आली I
जीवाची घालमेल झाली, तेंव्हा मार्ग दावी ‘कुंडली’ II

नोकरीवरती गदा आली, धंद्याची पुरी वाट लागली I
घरादाराला कळा काळी, उपाय सुचवी ‘कुंडली’ II







ही व्यवसायाची हमी, पैशाला ना पडे कमी I
घ्या संगणकी बसवूनी, श्रीमंत बनवी ‘कुंडली’ II

कुंडली नियमीत  काम, कष्ट थोडे, योग्य दाम I
वेळेचे नियोजन छान, ‘कुंडली’! ‘कुंडली’!! ‘कुंडली’ !!! 

वंदना धर्माधिकारी
१३ जून,२००४




Friday, May 25, 2018

94. Deshonnati 50 article educational loan

94 Deshonnati 50 article  educational loan






शुक्रवार : २१-०५-२०१८ http://deshonnati.digitaledition.in/c/28964845
स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट, २०१५ रोजी “प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी कार्यक्रम” सरकार ने घोषित केला. कौशल्य विकास आणि मेक इन इंडिया ह्या सरकारच्या योजनांना  नजरेसमोर ठेवून जास्तीत जास्त भारतीय युवकांनी यामध्ये सहभागी व्हावे त्यासाठी त्यांना आवश्यक ते शिक्षण घेताना आर्थिक मदत मिळावी. या उद्देशाने नवीन पोर्टल सुरु केले. गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे त्यांच्या आवडीचे शिक्षण घेताना आर्थिक अडचणी येऊ नयेत, त्यासाठी त्यांना आर्थिक मदत करू शकणारी ही ऑनलाईन प्रक्रिया आहे. सरकार कडून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती तसेच बँकातर्फे शैक्षणिक कर्ज रूपाने मदत घेण्यात यामुळे सुलभता आणली गेली आहे.  भारत सरकार, अर्थ मंत्रालय, मानव संसाधन विकास मंत्रालय, उच्चतर  शिक्षा विभाग, भारतीय बँक संघ (Indian Bank’s Association – IBA) आणि  NSDL - e governance सर्वांनी मिळून “प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी कार्यक्रम” साठी  तयार केलेले पोर्टल आहे www.vidyalakshami.co.in.

NSDL - e governance द्वारा सरकारच्या योजना राबविणे, त्यामध्ये पारदर्शकता ठेवणे, विविध सुविधा पुरविण्यात येणाऱ्या अडचणींवर मात करणे, योग्य लाभार्थीनां फायदा मिळवून देणे, संपूर्ण नियंत्रण ठेवणे, समस्या निवारण करणे, अशी सर्वतोपरी जबाबदारी घेतली जात आहे. जास्त माहितीसाठी www.egov-nsdl.co.in या वेबसाईटला भेट द्यावी.

वरील पोर्टल वर जाऊन विद्यार्थी आपले संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर देऊन आपले रजिस्ट्रेशन करून शकतो. भारतीय बँक संघ (IBA) यांनी तयार केलेला सर्व बँकेचा एकत्रित असा कर्ज अर्ज फॉर्म ( CELAF – Common Education Loan Application Form) भरायचा असतो. पत्त्याचा दाखला, स्वत:चे आधार कार्ड, आय डी प्रुफ, कॉलेजमध्ये प्रवेश मिळाच्याची नोंद , पैसे भरल्याची पावती, बँक खाते नंबर अशी माहिती भरायची.  आपल्या ग्राहकास जाणा – केवायसी प्रक्रियेच्या  आवश्यकतेनुसार कागदपत्रे स्कॅनकरून पाठवायची असतात. अटींना मान्यता दिल्यावर शिष्यवृतीसह शैक्षणिक कर्ज उपलब्धता पोर्टल दर्शविते. कर्ज कुठल्या कुठल्या बँकांकडून घेता येते त्या बँकांची यादी बघायला मिळाल्यावर तीन पर्याय निवडता येतात. प्रत्येक बँकांच्या शैक्षणिक कर्ज योजनेनुसार पुढील कर्ज प्रकरण कर्ज अर्ज तपासणी व मंजुरी केले जाते.

विद्यार्थ्याने भरलेला अर्ज एनएसडीएल तर्फे त्या त्या बँकेमार्फत ज्या भागात विद्यार्थी राहत असेल, अथवा त्याने नमूद केलेल्या बँकेच्या विशिष्ट शाखेकडे अर्ज पाठविला जातो. त्या बँक शाखेच्या CAPS – Credit Automation  Processing System वर सर्व पाठविल्यावर पुढील प्रक्रियेसाठी अर्जदार विद्यार्थ्याला बँकेत बोलावले जाते. या पोर्टलवरून कर्ज मिळाल्यास शैक्षणिक कर्जासाठीची  सबसिडी दिली जात नाही. ही विद्यार्थ्याच्या सोयीसाठीची एक खिडकी योजना (singal window) आहे.प्रत्येक बँकेची कर्ज योजना थोड्याफार फरकाने एकसारखी आहे. काही फरक असू शकतो. ढोबळमानाने पुढील मुद्धे महत्वाचे आहेत. :-
कर्ज मंजुरी :: भारतात शिक्षणासाठी : जास्तीतजास्त १० लाखापर्यंत,
      परदेशात शिक्षण घेणार असल्यास २० ते २५ लाखांपर्यंत
मार्जिन :: कर्जदाराचा सहभाग : ४ लाखापर्यंत – ०%
                        पुढे – भारतात शिक्षण – ५% ते १०%
                             परदेशात शिक्षण – १५% ते २०%
कर्जदार :: विद्यार्थी,         सहकर्जदार :: आईवडील, पालक,
परतफेड :: १) संपूर्ण शिक्षण झाल्यावर सहा महिन्यांनी वा नोकरी लागल्यावर लगेचच.
         २) शिक्षण चालू असताना दरमहिन्याला लागणारे व्याज भरल्यास काही बँकांकडून
            व्याजदरात ०.०५% सवलत                     
         ३) शिक्षण पूर्ण होई पर्यंत ठराविक दराने दरमहा सरळ व्याज   

विद्यार्थिनींना विशेष सवलत :: ०.०५ ते १ % व्याजदर कमी
सबसिडी :: ४ लाखांपर्यंतच्या कर्ज प्रकरणास काही खात्यांमध्ये सबसिडी देण्यात येते.
         परंतू, “ प्रधान मंत्री विद्या लक्ष्मी कार्यक्रम – एनएसडीएल पोर्टल” वर अर्ज नोंदणी
         केल्यास सबसिडी मिळत नाही. 
तारण :: बँक ठेवपावत्या, केवायसी, एनएससी, घर-बंगला-फ्याट, सरकार बॉंड,
विद्यार्थ्याचे पालक आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतील तर कर्ज प्रकरणात त्यांना व्याज उत्पादन योजनेच फायदा घेता येतो. मानव संसाधन विकास मंत्रालय कडून व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण यासाठी कर्ज घेता येते. यामधील बरेचसे कोर्सेस अल्प कालावधीसाठी असतात. ६ महिने/१ वर्ष अशा काळात शिक्षण घेऊन नोकरी देखील लागू शकते, अथवा व्यवसाय काढता येतो.
प्रमुख तारण :: विद्यार्थ्याची गुणवत्ता, प्रामाणिकपणा, चिकाटी, ध्येयाप्रती निष्ठा, कष्ट, जिद्द, झेप. कर्ज प्रकरण करताना अनेक कागदपत्रे द्यावी लागतात. त्याचा स्वतंत्र विचार करावा.     
     
ही सर्व प्रक्रिया चालू असताना आपला अर्ज कुठ पर्यंत आलेला आहे, त्याचा प्रवास तपासता येतो.
अधिक माहितीसाठी पुढील ठिकाणी संपर्क साधता येतो.
मुंबई : फोन नंबर : 022 24994200/ 022 24976351
तमाम सर्व विद्यार्थ्यांनी याचा जरूर जरूर लाभ घ्यावा. शुभेच्छांसह!

वंदना धर्माधिकारी

Camera is a responsive/adaptive slideshow. Try to resize the browser window
It uses a light version of jQuery mobile, navigate the slides by swiping with your fingers
It's completely free (even though a donation is appreciated)
Camera slideshow provides many options to customize your project as more as possible

Here is a video for National Webinar on IBPS Exam. Guidance by Smt.Vandana Dharmadhikari on 17th July, 2020 

vandanadharmadhikari.blogspot.com