Friday, May 25, 2018

94. Deshonnati 50 article educational loan

94 Deshonnati 50 article  educational loan






शुक्रवार : २१-०५-२०१८ http://deshonnati.digitaledition.in/c/28964845
स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट, २०१५ रोजी “प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी कार्यक्रम” सरकार ने घोषित केला. कौशल्य विकास आणि मेक इन इंडिया ह्या सरकारच्या योजनांना  नजरेसमोर ठेवून जास्तीत जास्त भारतीय युवकांनी यामध्ये सहभागी व्हावे त्यासाठी त्यांना आवश्यक ते शिक्षण घेताना आर्थिक मदत मिळावी. या उद्देशाने नवीन पोर्टल सुरु केले. गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे त्यांच्या आवडीचे शिक्षण घेताना आर्थिक अडचणी येऊ नयेत, त्यासाठी त्यांना आर्थिक मदत करू शकणारी ही ऑनलाईन प्रक्रिया आहे. सरकार कडून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती तसेच बँकातर्फे शैक्षणिक कर्ज रूपाने मदत घेण्यात यामुळे सुलभता आणली गेली आहे.  भारत सरकार, अर्थ मंत्रालय, मानव संसाधन विकास मंत्रालय, उच्चतर  शिक्षा विभाग, भारतीय बँक संघ (Indian Bank’s Association – IBA) आणि  NSDL - e governance सर्वांनी मिळून “प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी कार्यक्रम” साठी  तयार केलेले पोर्टल आहे www.vidyalakshami.co.in.

NSDL - e governance द्वारा सरकारच्या योजना राबविणे, त्यामध्ये पारदर्शकता ठेवणे, विविध सुविधा पुरविण्यात येणाऱ्या अडचणींवर मात करणे, योग्य लाभार्थीनां फायदा मिळवून देणे, संपूर्ण नियंत्रण ठेवणे, समस्या निवारण करणे, अशी सर्वतोपरी जबाबदारी घेतली जात आहे. जास्त माहितीसाठी www.egov-nsdl.co.in या वेबसाईटला भेट द्यावी.

वरील पोर्टल वर जाऊन विद्यार्थी आपले संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर देऊन आपले रजिस्ट्रेशन करून शकतो. भारतीय बँक संघ (IBA) यांनी तयार केलेला सर्व बँकेचा एकत्रित असा कर्ज अर्ज फॉर्म ( CELAF – Common Education Loan Application Form) भरायचा असतो. पत्त्याचा दाखला, स्वत:चे आधार कार्ड, आय डी प्रुफ, कॉलेजमध्ये प्रवेश मिळाच्याची नोंद , पैसे भरल्याची पावती, बँक खाते नंबर अशी माहिती भरायची.  आपल्या ग्राहकास जाणा – केवायसी प्रक्रियेच्या  आवश्यकतेनुसार कागदपत्रे स्कॅनकरून पाठवायची असतात. अटींना मान्यता दिल्यावर शिष्यवृतीसह शैक्षणिक कर्ज उपलब्धता पोर्टल दर्शविते. कर्ज कुठल्या कुठल्या बँकांकडून घेता येते त्या बँकांची यादी बघायला मिळाल्यावर तीन पर्याय निवडता येतात. प्रत्येक बँकांच्या शैक्षणिक कर्ज योजनेनुसार पुढील कर्ज प्रकरण कर्ज अर्ज तपासणी व मंजुरी केले जाते.

विद्यार्थ्याने भरलेला अर्ज एनएसडीएल तर्फे त्या त्या बँकेमार्फत ज्या भागात विद्यार्थी राहत असेल, अथवा त्याने नमूद केलेल्या बँकेच्या विशिष्ट शाखेकडे अर्ज पाठविला जातो. त्या बँक शाखेच्या CAPS – Credit Automation  Processing System वर सर्व पाठविल्यावर पुढील प्रक्रियेसाठी अर्जदार विद्यार्थ्याला बँकेत बोलावले जाते. या पोर्टलवरून कर्ज मिळाल्यास शैक्षणिक कर्जासाठीची  सबसिडी दिली जात नाही. ही विद्यार्थ्याच्या सोयीसाठीची एक खिडकी योजना (singal window) आहे.प्रत्येक बँकेची कर्ज योजना थोड्याफार फरकाने एकसारखी आहे. काही फरक असू शकतो. ढोबळमानाने पुढील मुद्धे महत्वाचे आहेत. :-
कर्ज मंजुरी :: भारतात शिक्षणासाठी : जास्तीतजास्त १० लाखापर्यंत,
      परदेशात शिक्षण घेणार असल्यास २० ते २५ लाखांपर्यंत
मार्जिन :: कर्जदाराचा सहभाग : ४ लाखापर्यंत – ०%
                        पुढे – भारतात शिक्षण – ५% ते १०%
                             परदेशात शिक्षण – १५% ते २०%
कर्जदार :: विद्यार्थी,         सहकर्जदार :: आईवडील, पालक,
परतफेड :: १) संपूर्ण शिक्षण झाल्यावर सहा महिन्यांनी वा नोकरी लागल्यावर लगेचच.
         २) शिक्षण चालू असताना दरमहिन्याला लागणारे व्याज भरल्यास काही बँकांकडून
            व्याजदरात ०.०५% सवलत                     
         ३) शिक्षण पूर्ण होई पर्यंत ठराविक दराने दरमहा सरळ व्याज   

विद्यार्थिनींना विशेष सवलत :: ०.०५ ते १ % व्याजदर कमी
सबसिडी :: ४ लाखांपर्यंतच्या कर्ज प्रकरणास काही खात्यांमध्ये सबसिडी देण्यात येते.
         परंतू, “ प्रधान मंत्री विद्या लक्ष्मी कार्यक्रम – एनएसडीएल पोर्टल” वर अर्ज नोंदणी
         केल्यास सबसिडी मिळत नाही. 
तारण :: बँक ठेवपावत्या, केवायसी, एनएससी, घर-बंगला-फ्याट, सरकार बॉंड,
विद्यार्थ्याचे पालक आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतील तर कर्ज प्रकरणात त्यांना व्याज उत्पादन योजनेच फायदा घेता येतो. मानव संसाधन विकास मंत्रालय कडून व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण यासाठी कर्ज घेता येते. यामधील बरेचसे कोर्सेस अल्प कालावधीसाठी असतात. ६ महिने/१ वर्ष अशा काळात शिक्षण घेऊन नोकरी देखील लागू शकते, अथवा व्यवसाय काढता येतो.
प्रमुख तारण :: विद्यार्थ्याची गुणवत्ता, प्रामाणिकपणा, चिकाटी, ध्येयाप्रती निष्ठा, कष्ट, जिद्द, झेप. कर्ज प्रकरण करताना अनेक कागदपत्रे द्यावी लागतात. त्याचा स्वतंत्र विचार करावा.     
     
ही सर्व प्रक्रिया चालू असताना आपला अर्ज कुठ पर्यंत आलेला आहे, त्याचा प्रवास तपासता येतो.
अधिक माहितीसाठी पुढील ठिकाणी संपर्क साधता येतो.
मुंबई : फोन नंबर : 022 24994200/ 022 24976351
तमाम सर्व विद्यार्थ्यांनी याचा जरूर जरूर लाभ घ्यावा. शुभेच्छांसह!

वंदना धर्माधिकारी

Wednesday, April 25, 2018

79. Maitree Bankingshee - मैत्री बँकिंगशी



पुस्तक परीक्षण  : मैत्री बँकिंगशी – बेस्ट सेलर - लेखिका: वंदना धर्माधिकारी








सुधारित अकरावी आवृत्ती, प्रकाशक : सकाळ प्रकाशन,पुणे.२५,एप्रिल,२०१८,पृष्ठे २१० किंमत रु.२८०.-
दैनंदिन बँकिंगची सुलभ आणि उपयुक्त माहिती एकाच ठिकाणी मराठी भाषेत ज्यांना हवी आहे त्यांना वंदना धर्माधिकारी लिखित ‘मैत्री बँकिंगशी’ या पुस्तकाच्या सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या सुधारित अकराव्या आवृत्तीशिवाय पर्याय नाही. आजकाल सर्वसामान्य शिक्षित आणि सुशिक्षित मराठीजन,ज्ञानभाषा म्हणून केवळ इंग्रजी हीच एकमेव भाषा असल्याची ओरड करतात त्यांना वंदना धर्माधिकारी लेखित‘मैत्री बँकिंगशी’ हे बँकिंगविषयीची जिज्ञासा भागविणारे सुलभ आणि माहितीपूर्ण पुस्तकरुपी उत्तर आहे. गेल्या सात वर्षांत निघालेल्या विक्रमी अकरा आवृत्या ही ‘मैत्री बँकिंगशी’ पुस्तकाच्या   यशाची सर्व थरातील वाचकांनी दिलेली पावती आहे. जनसामान्यांचे बँकेंविषयीचे अज्ञान दूर व्हावे, बँकिंग साक्षरता वाढावी, बँक व्यवहारांचे आकलन व्हावे, सुलभरित्या मातृभाषेत बँक व्यवहाराबद्दल प्राथमिक आणि सखोल माहिती मिळावी यासाठी स्वत: अनुभवी सेवानिवृत्त बँक अधिकारी असल्याने लेखिकेने अतिशय उत्तमरितीने उपयुक्त आणि मार्गदर्शक माहिती बँक ग्राहकांपर्यंत पोहोचविली आहे.प्रचलित प्राथमिक ते  महाविद्यालयीन अभ्यासक्रमात पुरेसा ऊहापोह नसलेल्या बँकिंग सारख्या व्यवहारातील अविभाज्य अंग बनलेल्या विषयाची ओघवत्या शैलीतील वाचनीय, आकलनास सुलभ आणि नेमकी माहिती देणार्‍या लेखिकेच्या लेखनकौशल्याला दाद द्यावी तेव्हढी थोडीच.

‘मैत्री बँकिंगशी’ या पुस्तकाच्या मराठीतील अकरा आवृत्यांच्या प्रकाशनाबरोबर हिंदी, गुजराती आणि ब्रेल लिपीत झालेले या पुस्तकाचे भाषांतर/रूपांतर त्यातील माहिती चोखंदळ बँक ग्राहकांच्या आणि वाचकांच्या पूर्णपणे पसंतीला उतरल्याची साक्ष देते. विशेष असे की मैत्री बँकिंगशी पुस्तकाच्या स्वतंत्र अशा आवृत्त्या तीन बँकांनी खरेदी केल्या आहेत. दोन बँकांनी या पुस्तकावर सर्व स्टाफची परीक्षा घेतली आहे, हे तर नक्कीच विशेष.
अनेक बँकांनी शेकड्याने मैत्री बँकिंगशीच्या प्रती खरेदी करून अनेकांना पुस्तकभेट दिलेली आहे. लेखिकेने विकसनशील भारताच्या ग्रामीण, अर्धनागरी आणि नागरी भागांत पसरलेल्या बँकांच्या जाळ्याचा विचार करुन जनसामान्यांना बँकांशिवाय जगणे आणि आर्थिक व्यवहार करणे शक्य नाही याचा विचार करुन या पुस्तकात अमुल्य मार्गदर्शन केले आहे. पारंपरिक बँकिंगसोबत प्लॅस्टिक मनी, कॅशलेस, इंटरनेट, इलेक्ट्रॉनिक बँकिंगचे अनेक प्रकार आता जनसामान्यांना हाताळावे लागत आहेत. व्यवहारांची सुलभतेने ओळख करुन देण्याचे काम आणि अधिकचे कौशल्य आत्मसात करण्याची संधी ‘मैत्री बँकिंगशी’ पुस्तक करुन देते.लेखिकेने नागरिकांच्या बँकिंग विषयांच्या समस्येवर सांगोपांग उत्तरे शोधण्याच्या तळमळीतून स्वानुभवातून मिळविलेल्या ज्ञानावर आधारित बँकिंग विषयाची उपयुक्त माहिती सुलभ आणि सोप्या भाषेत सामान्य माणसापर्यंत पोहोचविली आहे. मराठी भाषिक बँक ग्राहकांसाठी आणि अन्य वाचकांना बँकिंगविषयी विस्तृत माहिती एकाच ठिकाणी असलेले असे हे दर्जेदार पुस्तक आहे.‘मैत्री बँकिंगशी’या पुस्तकाच्या रुपाने मराठीत बँक व्यवहारांसंबंधीच्या माहितीची मौलिक भर पडली आहे हे निश्चित.
लेखिकेने आपली भूमिका स्पष्ट करताना सर्वसामान्यांसह बँकिंग परिचितांना समोर ठेवून  सर्वांना रुचेल अश्या सुबोध, सोप्या, सुटसुटीत आणि नेमका अर्थ व्यक्त करणार्‍या तरीही भाषेचा उच्च स्तर राखण्याचा समतोल साधला आहे. बँकिंग विषयाची माहिती देताना केवळ बुद्धिमत्तेचे व व्यासंगाचे प्रदर्शन न करता गेल्या तीन चार वर्षातील नोटाबंदी, नकदी व्यवहारांना प्रोत्साहन, वस्तू व सेवा कर याविषयांची सुगम माहिती सादर केल्याने नव्याने झालेले सर्व बदलांचे ज्ञान, त्याबद्दलच्या  शंकाकुशंकांचे समर्थन इथे होते. प्रचलित बँकिंगमधील काही संबोधनपरशब्द मराठीत आणि इंग्रजीत तसेच मराठीत अर्थासह दिलेले आहेत. पर्याय उपलब्ध नाही तिथे स्पष्टीकरणात्मक टिपा देऊन माहिती वाचकाला समजेल यावर भर दिला आहे. शेवटच्या प्रकरणात ४०० बँकिंग संक्षेप रूपे विस्तारासह दोनतीन वाक्यात समजून दिलेली आहेत, त्याचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच होईल. कुठेही असे सापडलेले नाही. प्रत्येकाच्या संग्रही पुस्तक हवेचं  असे म्हणावेसे वाटते.

गेल्या काही वर्षातील सरकार पुरस्कृत अनेक समाजोपयोगी योजनांचा समावेश  पुस्तकात केला असल्याने वाचकांस नवीन बँकिंग बदलांचा आणि कार्यप्रणालींचा परिचय होतो. संबंधीत माहिती संकलित करताना लेखिकेने अभ्यासपूर्वक निरीक्षणे, तज्ज्ञांशी सल्लामसत करून अद्यतन माहिती अंतर्भूत केली असल्याचे प्रकर्षाने जाणवते. भारतातील बँकांचे प्रकार, कार्यशैली, आरबीआय, अनिवासी भारतीय, ठेवींचे प्रकार, तसेच पीपीएफ, सारे काही आहेच. शिवाय कर्जाची मानसिकता, आवश्यकता, विविधता, सुविधा, प्रकार, फरक, देताना लहानापासून ते ज्येष्ठ नागरिकांना लागणाऱ्या  सर्व कर्ज योजना पुस्तकात समजून दिल्याने कर्ज घ्यायलाच पाहिजे अशीच भावना होईल.  \  नामांकन सुविधा,सुरक्षित  ठेव कक्ष, वित्तीय समावेशन, जन-धन योजना, मृत्युपत्र, प्लास्टिक मनी, इंटरनेट बँकिंग, निधी हस्तांतरणाच्या सुविधा, असा सर्वतोपरी ग्राहकोपयोगी माहितीचा भरणा खच्चून  पुस्तकात आहे. वाचकांना सहजपणे बँकसुविधांचा लाभ घेणे शक्य होऊ शकते. वाचक बँकिंग पारंगत होऊ शकतो.

भारतीय चलन-रुपया प्रकरणात रुपयाबद्दल उद्बोधक आणि उपयुक्त माहिती दिली आहे.चलनी नाणीं आणि  नोटांची विशद केलेली वैशिष्ट्यपूर्ण माहिती वाचकाच्या ज्ञानात भर घालणारी आहे. दैनंदिन आर्थिक व्यवहारांच्या सक्षम पूर्ततेसाठी प्रचलित आधुनिक मार्ग, भेडसावणार्‍या अडचणीं, आवश्यक  काळजी यांचा यथोचित आवश्यक उल्लेख आहे. त्याचबरोबर सरकारतर्फे तळागाळातील नागरिकांना देशाच्या प्रमुख अर्थप्रवाहात सामावून घेण्यासाठी सुरु केलेल्या अनेकविध  उपक्रमांची ओळख पुस्तकांत करुन देण्यात आली आहे. वाचकांनी पुस्तक काळजीपूर्वक वाचल्यास मोबाइल पेमेंट, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिटकार्ड वापर,  कॅशलेस व्यवहारासाठी आवश्यक विविध  अ‍ॅप्स कशी हाताळावीत याची माहिती देखील वाचकांना सापडेल. त्याने समज वाढेल, ज्ञान मिळेल, आपोआप दर्जा सुधारेल.
समाजातील सर्व वर्गांच्या बँकिंग गरजांचा विचार करताना  महिला बचत गट, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग व्यक्ति , छोटे-मोठे उद्योजक, शेतकरी, स्वयंसहायता बचत गट यासारख्या सर्वसमावेशक समाज घटकांना मार्गदर्शक ठरेल अशा माहितीची तजवीज प्रस्तुत पुस्तकात लेखिकेने केली आहे. लेखिकेने सहकार क्षेत्राबद्दल लक्षवेधक आणि माहितीपूर्ण लेखन केले आहे. ग्रामीण, अर्धनागरी आणि नागरी भागातील सहकारी बँकांना या लेखनाचा खचितच उपयोग होईल. बँकिंग स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासणे परीक्षार्थीना उपयुक्त आहे.   
लेखिका वंदना धर्माधिकारी यांची बँकिंग विषयाची एकूण 9 पुस्तके प्रसिध्द झाली आहेत.‘मैत्री बँकिंगशी’ पुस्तकाच्या ‘मित्रता बँकिंग से’ हिंदीतील पुस्तकास महाराष्ट्र सरकारतर्फे मामा वरेरकर( 25 हजार रोख) पुरस्काराने गौरविले आहे. तसेच केंद्र सरकारच्या राजभाषा विभागाने याच पुस्तकास एक लाख रुपयांचा पुरस्कार दिला आहे. ‘बँकिंग मैत्री’ गुजराती आवृत्तीची खरेदी गुजरात फेडरेशन, आणि गुजरात सरकार कडून मोठ्या प्रमाणात केलेली आहे. तसेच ‘ब्रेल रुपांतर’ केल्याने बँकांत काम करणाऱ्या, येऊ इच्छीणाऱ्या व इतर सर्व दृष्टिहीन वर्गाला प्रचंड दिलासा मिळाला आहे.  या पुस्तकासह ब्रेल रीडरवर एकूण ६ पुस्तके आहेत. याच लेखणीला माण देशी बँकेने मोठी दाद दिली, आणि वंदनाताईंकडून तीन पुस्तके बँकेच्या खासगी वितरणासाठी लिहून घेतली. माण देशी फाऊंडेशनतर्फे  महाराष्ट्रभर ग्रामीण महिलांना बँकिंग शिकविले जाते, आणि तिथे ही पुस्तके भेट म्हणून दिली जातात.

मी हे पुस्तक हल्लीच वाचले. पुस्तक वाचताना मला ते पृष्ठागणिक माहितीपूर्ण आणि उत्तम वाटले.मी आवडीने  वाचलेल्या काही मोजक्या पुस्तकांत ‘मैत्री बँकिंगशी’ हे  पुस्तक मला वैशिष्ट्यपूर्ण वाटले आणि म्हणूनच त्याचे परिक्षण आपणास सादर करीत आहे.लेखिका वंदना धर्माधिकारी यांचे‘मैत्री बँकिंगशी’ या पुस्तकाच्या अकराव्या आवृत्तीच्या यशाच्या निमित्ताने हार्दिक अभिनंदन करताना त्यांच्या पुढील लिखाणास शुभेच्छा देतो.

लेखिका वंदना धर्माधिकारी यांचेशी संपर्क : मोबाईल  9890623915  ::  vandana10d@yahoo.co.in
सकाळ प्रकाशन, पुणे - 020 2440567 ::  8888849050  ::  sakalprakashan@esakal,com

विश्वासराव पालेकर
मो: 9869431179, :: vishwasraopalekar@gmail.com
A/12,पपली को.ऑ.हा.सो.लि.,गुप्ते रोड,जोशी नगर, डोंबिवली(पश्चिम) 421202.



Tuesday, April 24, 2018

80. Maitree Bankingshee - ११ वी आवृत्ती





मैत्री बँकिंगशी  :  ११ वी आवृत्ती
प्रस्तावना  :  श्री.रवींद्र प्र. मराठे
व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी,
बँक ऑफ महाराष्ट्र.



आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. सर्वच क्षेत्रात सर्व स्तरांवर स्पर्धात्मक वातावरण आहे. पुस्तक प्रकाशन क्षेत्र देखील याला अपवाद नाही हे निश्चित! तर या स्पर्धेमध्ये स्वत:ला सिद्ध करून, अत्यंत अल्पावधीमध्ये पुस्तकाची ११ वी आवृत्ती प्रकाशित करण्याचा मान सौ.वंदना धर्माधिकारी यांनी पटकाविला आहे. त्यातही हिंदी, गुजराती आणि ब्रेल रुपांतरीत पुस्तकांचा समावेश असणे हे नक्कीच विशेष आहे. बँकिंगशी निगडीत विविध सेवा सुविधांची माहिती सोप्या भाषेत मांडून बँकिंग साक्षरता वृद्धीचे मोलाचे कार्य लेखिकेच्या लेखणीने केलेले आहे.

बँकिंग क्षेत्रात कालानुरूप बरेच बदल झाले. नवनवीन तंत्रज्ञानाधिष्ट बँकिंग हे इलेक्ट्रॉनिक बँकिंग म्हणून ओळखले जाऊ लागले. ग्राहकांच्या अपेक्षा देखील वाढल्या. ग्राहक आपल्या हक्कांसाठी सजग झाले. बँकिंग क्षेत्रामध्ये कामाच्या स्वरूपातही बदल झाले, सुधारणा झाल्या. परिणामी तणावही वाढला. बँकांचा कायापालट झाला म्हंटले तर योग्य होते.

“कस्टमरची पासबुक भरता भरता आपलं पासबुक भरायचं राहून गेलं कि काय?” असा  प्रश्न बँकेतील कर्मचाऱ्यांना नेहमीच पडतो. सेवानिवृत्तीनंतर पासबुकासारखे काय काय राहिले याची जाणीव होते. कारण या धकाधकीच्या करियरमध्ये आपले छंद असेच बाजूला पडलेले असतात.
पण लेखिका याला अपवाद आहेत असेच म्हणावे लागेल. २८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाखंडानंतर लेखन, निवेदन आणि काव्य क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी त्या करीत आहेत. आपल्याजवळ असलेल्या ज्ञानाचा सर्वसामान्यांनाही फायदा करून देण्याच्या हेतूने झालेले हे आर्थिक लेखन निश्चितच स्तुत्य आहे. केंद्र व राज्य सरकार यांनी लेखिकेला पुस्तकांसाठी पुरस्कृत केलेले आहे.

मागील दोन-तीन वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण समाजाला मुळापासून हलवून सोडणारे बदल केले गेले. विमुद्रिकरण, कॅशलेस आणि वस्तू व सेवा कर दोन्ही कार्यप्रणाली देशासाठी आवश्यक. अर्थव्यवस्थेला मजबूती देणाऱ्या एकापाठोपाठ आल्याने थोडाफार ताणही जाणवू लागला. भारत सरकारच्या या दोन्ही निर्णयांवरून जागतिकदृष्ट्या विशेष उल्लेखनीय वाहवा मिळाली. जन-धन योजनेद्वारा  २०१४ नंतर तळागाळातील लोकांना बँकेच्या माध्यमातून देशाच्या अर्थप्रवाहात सामावून घेण्यात आले. मोठ्या संख्येने खाती उघडली गेली आणि करोडो रुपये त्या खात्यात जमा केले गेले.

विमुद्रिकरणाने सर्वांना बँकिंग व्यवहारांच्या नव्या नव्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक वळवले गेले. लहानलहान व्यावसायिक लोकांनी देखील मोबाईल द्वारा आपापले खरेदी विक्री व्यवहार करायला सुरवात केली आहे. कॅशलेस व्यवहार वाढविण्यात ग्रामीण भागाने बरीच पुढची मजल मारलेली दिसते. एखादे गावच्या गाव कॅशलेस केले गेले, आणि इतर गावांनी यांचा वसा उचलून आपल्याही गावात कॅशलेस व्यवहार सुरु करायचा प्रयत्न सुरु केला. त्यांनाही याकामी मोठे यश येताना दिसते. या दृष्टीने ‘मैत्री बँकिंगशी’ पुस्तकाच्या नव्या अकराव्या आवृतीमधील कॅशलेस प्रकरणात चांगल्या प्रकारे विषयांची मांडणी करून समजावून दिलेले आहे. सर्व पर्यायी माध्यमांची ओळख तिथे होते. त्यातून ज्याला जे घेणे शक्य असेल ते घेऊन व्यवहार करता येतील.

जन-धन योजना, आधार संलग्न योजना, मुद्रा कर्ज योजना, वित्तीय समावेशन अशा विविध योजनांच्या माध्यमातून जनमानसात बँकिंगची बीजे रुजवण्याचे कार्य सरकारी पातळीवर चालू आहेच. त्याचे अतिशय चांगले परिणाम देखील दृष्टीपथात येताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांशी हसत खेळत संवाद साधणारे “मैत्री बँकिंगशी” हे पुस्तक बहुमोल ठरते. बँक व त्यांचे ग्राहक यांच्या नात्यासंबंधी व ग्राहकांच्या हक्कासंबंधीची माहिती उपयुक्त, मार्गदर्शन करणारी आहे. अर्थसाक्षरता वृद्धी होणे ही देशाची निकड आहे, कारण आर्थिक विषय हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे.

बँकिंग क्षेत्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर नवीन नोकरभरती होत आहे. बँकिंग करियर निवडणाऱ्या अशा उमेदवारांना देखील हे पुस्तक योग्य मार्गदर्शन करणारे आहे. ब्रेल पुस्तक केलेलेच आहे, तसेच ब्रेल रीडरवर पुस्तकाची उपलब्धता असल्याने दृष्टिहीन विद्यार्थ्यानाही पुस्तकाचा उपयोग करून घेता येणारा आहे.

सोपी सरळ मांडणी, विषय सुलभ करून सांगण्याची कौशल्यपूर्ण हातोटी, आकर्षक छपाई, मर्यादित पृष्ठसंख्या या वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांमुळे सदरचे “मैत्री बँकिंगशी – बेस्ट सेलर – ११ वी आवृत्ती” पुस्तक वाचकांशी सहजतेने “मैत्री” साधते. बँकिंग साक्षरता वाढविण्याच्या या महत्वपूर्ण योगदानासाठी सौ.वंदना  धर्माधिकारी यांचे अभिनंदन आणि खूपखूप शुभेच्छा! तसेच इतक्या आवृत्त्या अतिशय सुबकतेने प्रकाशित करणाऱ्या ‘सकाळ प्रकाशन’ चेही अभिनंदन आहे. अशाच उत्तरोत्तर पुस्तकांच्या आवृत्त्या निघोत, तसेच विविध भाषांमधील अनुवादित आवृत्त्या प्रकाशित होवोत, ही सदिच्छा!



रवींद्र प्र. मराठे
व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी,
बँक ऑफ महाराष्ट्र.  



  
ब्रेल रुपांतरीत  ::: मैत्री बँकिंगशी
सावी फाउंडेशन, पुणे
श्रीमती रश्मी पांढरे, अध्यक्षा,

श्री.लुई ब्रेल यांनी स्वत: दृष्टिहीन असूनही आपल्या इतर बांधवाना साक्षर बनविण्यासाठी आयुष्यभर खडतर परिश्रम घेतले आणि ब्रेल भाषेचा शोध लावला. त्यामुळे पुढील पिढ्यांमधील दृष्टिहीन लोकांना आपले आयुष्य जगताना ब्रेल भाषेने प्रचंड उर्जा देऊ केली.
श्रीमती वंदना धर्माधिकारी यांनी अशा विद्यार्थ्यांना एकदा खूप सुंदर मार्गदर्शन केले होते.  त्यानंतर, त्यांच्या दोन बँकिंग पुस्तकांचे ऑडीओ रेकोर्डिंग करून अनेकांनी ते आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून त्यावरून बँकिंगच्या प्रवेश परीक्षांचा अभ्यास करायला सुरवात केली होती. त्यानंतर ब्रेल रुपांतरीत पुस्तक करण्यात आले.
“सावी फाउंडेशन” ने बँकिंग विषयाचे  “मैत्री बँकिंगशी” ह्या श्रीमती वंदना धर्माधिकारी लिखित आणि ‘यशोगाथा’ प्रकाशित ब्रेल पुस्तकाचा प्रकाशन समारंभ ९ जानेवारी २०१६ रोजी आयोजित केला होता. विशेष म्हणजे पुस्तक प्रकाशनासाठी आरबीआयचे असिस्टंट जनरल मॅनेजर श्री. राजेश आसुदानी खास नागपूरहून आले होते. जन्म:त दृष्टिहीन असूनही बँकिंग क्षेत्रात उच्च पदापर्यंत पोचलेल्या सरांना पाहून अनेकांनी  प्रेरणा घेतली आणि बँकिंग क्षेत्र निवडले.
‘सकाळ प्रकाशनचे मैत्री बँकिंगशी’ पुस्तकाचे ब्रेल रुपांतर  ‘यशोगाथा - ब्रेल प्रकाशक आणि मुद्रक श्री.स्वागत थोरात’ यांनी सुबकरीत्या वेळेत करून दिले. मुळात १८० पानांच्या पुस्तकाचे ब्रेल रुपांतरीत तीन खंड केले गेले. प्रकाशन प्रसंगी अंधांसाठी काम करणाऱ्या विविध अनेक संस्थांना पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. ज्यांनी मैत्री बँकिंगशी पुस्तकाचे रेकोर्डिंग ऐकले, ब्रेल वाचले, त्यावरून अभ्यास करून परीक्षा दिल्या असे अनेक विद्यार्थी आहेत. त्यांना वंदनाताईंच्या पुस्तकांचा कसाकाय फायदा झाला ते पुढील मुद्द्यावरून लक्षात येईल.

१.       बँकिंगची अगदी मुळापासून ओळख झाली.
२.       चेक, ड्राफ्ट, त्यावरील नंबरंपासून सगळं समजलं.
३.       बँकांच्या विविध ठेवी, कर्ज, वा इतर नव्या जुन्या योजनांची माहिती झाली.
४.       पुस्तकातील संक्षेप रुपांमुळे अनेक गोष्टी नव्याने समजल्या. यांचा उपयोग इंटरव्ह्यू मध्ये छान झाला.
५.       नवीन लोकांना तर याचा फायदा होतचं आहे, पण जे आधीपासून बँकेत काम करीत आहेत त्यांनाही स्वत:चे ज्ञान अद्ययावत ठेवायला मदत झाली.
६.       आपल्या डिपार्टमेंटबरोबरच इतर डिपार्टमेंटच्या कार्याची, त्यांच्या संकल्पनांची, अधिक उणे काय याची माहिती पुस्तकाने झाली. त्याचा फायदा परीक्षा देताना होतोच. शिवाय एका जागेवर बसून सर्व टेबलांवर काय व कसे चालते यांचा अंदाज येतो.
७.       आर्थिक विषयाची पार्श्वभूमी तयार झाली, त्याने आत्मविश्वास वाढला.
८.       ग्राहकांशी चर्चा करताना पुस्तकातले आठवले आणि ग्राहकांशी चांगला संवाद साधला, असे अनेकदा होते.
९.       बॅंकेतर्फे ट्रेनिंग घेत असताना कुठलाही विषय समजायला उपयोग होतो. बारकावे देखील आधीच समजलेले असतात. इतरांना आश्चर्यही वाटते, तेंव्हा आम्ही पुस्तकाचे आणि वंदना मॅडमचे नाव सांगतो.
१०.   इलेक्ट्रॉनिक बँकिंगमधील विविध ऑनलाईन बँकिंग, ज्याची आवश्यकता वाढत आहे त्याची माहिती मिळाली.
मोड्युलर इन्फोटेक द्वारा वंदनाताईंची पाच पुस्तके ब्रेल मित्र – ब्रेल रीडर वर उपलब्ध आहेत. त्यापैकी बँकिंगची तीन आहेत आणि इतर दोन. बँकिंग जिज्ञासा (सहावी आवृत्ती), Banking Horizon (2nd edition), मैत्री बँकिंगशी (दहावी आवृत्ती) ही देशभरातील अनेक संस्थांमधून अभ्यासली जातात. 

बँकिंग विषयाचे इतके चांगले पुस्तक या सर्वांपर्यंत पोचवता आले याचा ‘सावी’ला सार्थ अभिमान आहे.


रश्मी पांढरे.
अध्यक्षा, सावी फाउंडेशन, पुणे
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Camera is a responsive/adaptive slideshow. Try to resize the browser window
It uses a light version of jQuery mobile, navigate the slides by swiping with your fingers
It's completely free (even though a donation is appreciated)
Camera slideshow provides many options to customize your project as more as possible

Here is a video for National Webinar on IBPS Exam. Guidance by Smt.Vandana Dharmadhikari on 17th July, 2020 

vandanadharmadhikari.blogspot.com