• लेखिका, निवेदिका, कवयित्री • १४ प्रकाशित पुस्तके : ९ बँकिंग विषयी आणि ५ साहित्यिक • १० लेखमाला. नियमित मासिकात लिखाण • ललित, वैचारिक, आर्थिक विषय : मासिके, दिवाळी अंक, वर्तमानपत्रे, पुस्तके • अनेकविध कार्यक्रमांचे निवेदन • कवीसंमेलनात सहभाग, स्वरचित कवितांचे सादरीकरण • श्रीमती पुणे २००५ :संपन्न व्यक्तिमत्व स्पर्धा,वरिष्ठ गट प्रथम पुरस्कार
Sunday, November 23, 2014
66. Diwali - Chintan Aadesh - फजिती - कर सारं साफ
23-11-2014
चिंतन आदेश – फजिती विशेषांक – २०१४
लेखिका : सौ.वंदना विजय धर्माधिकारी
पक्षांच्या किलकिलाटाने मला
जाग आली. तशी डोळे चोळतच उठले. खिडकीच्या फटीतून बाहेर पाहिलं, तसं पूर्ण उजाडलं
नव्हत. पण झोप पूर्ण झाल्याच्या समाधानाने उठवलचं
मला. उठून बसते तोच, मी जीवंत आहे याची जाणीव झाली. स्वप्न तर नव्हे ना हे.
माझेच मला पडले कोडे? म्हणजे काल मला कोणी मारलं नाही. ना खून, ना दरोडा, कोणी चोर
पण नव्हता का आला? मग ते दारावर धडका देणं. कोण होत? पुन्हा जरा रात्रीची भीती
अंगावर आली. आणि दूर फेकलेलं पांघरून ओढून घेतलं. उजाडल्याशिवाय घरातला दिवा
लावायलाच नको. कोणी लपून बसलं असेल बागेत तर, मागच्या दारामागे असेल तर, खरं तर
बाथरुमला जायची इच्छा झालेली. काय करू? दिवा न लावता जायचं ठरवलं, आणि अंदाजपंचे
जाऊन आले. तसे या घरात राहून तीनच महिने झाले होते. आणि आता या बंगल्यात एकटी
राहून मोजून पाच दिवस झाले. सोमवारी तर आले संध्याकाळी आणि आज शनिवार. शनिवार
म्हणताच मन घराकडे धावलं. क्षणार्धात पुण्यात कोथरूडला पोचलं देखील. भराभरा आवरलं
पाहिजेच याचे भानही झाले. आज बँकेत लवकर जावं, कालचं पडलेलं काम उरकायलाच हवं. तरचं दुपारची अडीचची
गाडी पकडता येईल. एस.टी.च्या वेगाने मन पळत होतं. तशी उठलेच, आणि पाहते तो चक्क
उन्ह आलं होतं. म्हंटल, ‘चला, लाईट न लावता, नक्कीच आवरता येईल.’
मी बँकेत नोकरी करीत होते.
माझी बदली झाली सोलापूरला. तशी मी नाराज वगैरे अजिबातच नव्हते. सोलापूरला आमच्या
नात्यातल्या एक आजी एकट्याच बंगल्यात राहायच्या. त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला
आणि गेले त्यांच्याघरी. आमचं दोघींचं मस्त जमायचं. माझी तर सोय चांगली झालेली, आणि आजीना पण आवडलं
माझं तिथे राहणं. तसे दोन अडीच महिने होत नाहीत तोच काही कारणाने आजीनी पुण्याला
लेकाकडे यायचं ठरलं. मला किल्ली
देवून, कुठे काय आहे हे सांगून माझ्याच बरोबर पुण्याला त्यांना मी घेऊन आले
आधीच्या शनिवारी दुपारी.
आजी राहिल्या पुण्यात पण
सोमवारी सकाळी पाचच्या गाडीने मला सोलापूरला जावेच लागले. परस्पर बँक, दिवसभर काम
आणि पार संध्याकाळी सहा वाजता दुध आणि ब्रेड घेऊन बंगल्याचे मागले दाराने मी आत
प्रवेश केला. आतून कुलूपच लावले. पुढच्या दाराला बाहेरून लावले होते. कोणाला
वाटेल, आत कोणीच नाही. बाहेरच्या मुख्य दरवाजातून आत आल्यावर एक छोटीशी पडवी होती.
फक्त दोन खुर्च्या, आणि थोडी अडगळ अशी लहानशी जागा. तिथेच चप्पल काढून आत हॉल
मध्ये प्रवेश व्हायचा. आजींच्या सांगण्यावरून पडवी आणि हॉल मधले दारही वरची-खालची
कडी लावून बंद केलेले. जर मागच्याच दाराने यायचे तर कशाला इकडून पडवीत जा, आणि
बाहेर अंगणात. हॉलमधेच कॉटवर मी झोपायची. पलीकडे दोन बेडरूम्स होत्या. पण मी आणि आजी
आम्ही दोघीही हॉलमध्येच झोपायचो. तसंच करायचं मी ठरवलं. सोमवारी भल्या पहाटे उठून
सोलापूरला आले आणि दिवसभराचा थकला भाकला देह आठ वाजताच पडला.
नेहमीप्रमाणे मंगळवारी
उठले, आवरले, बँकेत गेले. तिथूनच पुढे दोन दिवस मी मैत्रिणीकडे राहिले. गुरवारी
मात्र बंगल्यावर झोपले. एकटी. फार काही करायचे नसायचेच. त्यामुळे बहुधा रात्री दहा
म्हणजे माझी मध्यरात्र असायची. कुठे धावतपळत चार दिवस गेले समजले सुद्धा नसेल
मला. शुक्रवारी मात्र रात्री उशीर झाला,
तो फोनवरील गप्पांमुळे. सोलापूरच्याच परिचयाच्या एकीचा फोन आला, आणि गप्पांना उत
आला. झालं, मला जेवण करून झोपायला साडेनऊ वाजून गेले. शिवाय एक भाकरी करण्यात वेळ
गेला. पण पटकन डोळा काही लागला नाही. नलूताईंच्या गप्पाच आठवतं कूस बदलत होते
झालं. अचानक दारावर टकटक वाजलं. आधी वाटलं रस्त्यावर असेल कसलातरी आवाज. पण नाही,
तो आमच्याच दाराचा आवाज होता. मी उठणं, कोण आहे म्हणून विचारणं शक्यच नव्हतं. तसे
घरातले लाईट बंद करूनही अर्धा तास झाला असेल. बहुधा सव्वादहा वाजले असतील. आज
विचार केला तर तसा फार उशीर नव्हता झालेला. १५/१६ वर्षापूर्वीचा काळ. तेंव्हा त्या
भागात सामसूम लवकर व्हायची, टीव्हि बिघडलेला होता. त्यामुळे, झोपाळू मी लवकरच
झोपायची. असं होतं, पण त्या दिवशी, काहीतरी आवाज जोरजोरात येऊ लागला. काय करावं?
एकदम मागच्या बंगल्यातल्या
जोशी काकू आठवल्या. आजींनी जाताना मला
सांगितलं होतं, “काही लागलं तर जोशी काकूंकडे जा. वाटलं तर त्यांच्या निशाला झोपायला
बोलवा.” पण, मीच खूप धिटाईने म्हंटल होतं, “नको, मला नाही भीती वाटतं, झोपेन मी
एकटी.” तशा जोशी काकू सुद्धा दोनदा येऊन माझी चौकशी करून गेल्या होत्या. आणि ही
दारावरची थाप, आवाज वाढतच गेला. ठरवलं, काही झालं तरी दार उघडायचं नाही. पांघरून
घेतलं डोक्यावरून, तरी आवाज येतचं होता. रामरक्षा म्हणायला सुरवात केली.
संध्याकाळी देवापुढे दिवा लावायचा राहिला होता. म्हणा, आजींच्या घरात मी पाहुणी,
कशाला असल्या गोष्टी करा. पण सवय होती ना, तिन्हीसांजा दिवा लावायची. म्हणून
एकदोनदा लावला इतकेच. पण नेमकी त्या दिवशी विसरले, आणि रामरक्षा चुकली. तोच तोच
श्लोक पुन्हापुन्हा म्हंटला जातोय हे लक्षात आलं. बाहेर आवाज येतच होता. बरोबर चूक
रामरक्षा म्हणता म्हणता कधी झोप लागली कळलेच नाही. जाग आली ती एकदम सहा वाजता तीही
पक्षांच्या किलबिलने.
शनिवार अर्धा दिवस म्हणजे
बँकेत ही गर्दी. याच दिवशी सगळ्यांना पैसे काढण्यासकट इतर सारी बँकेतील कामे
आठवतात. सारखं घड्याळाकडे लक्ष जात होते. तसं सामान काहीच नसतं पुण्याला जाताना.
एक पर्स उचलायची आणि रिक्षाने एस टी स्टँड गाठायचा. दुपारच्या अडीचच्या गाडीचा ड्रायव्हर
कंडक्टर नेहमी तेच असायचे. बँकेतल्या बाईंची जागा देखील ठरलेली असायची. एकदा मला
उशीर झाला, तर गाडी दहा मिनिटे उशिरा सोडली होती. शक्यतो मी वेळेत यायचीच. त्या
दिवशी रिक्षाच मिळाली नाही मला, आणि आमच्याच बँकेतील एकाने मला सोडले ते देखील
पलीकडच्या चौकात, म्हणून उशीर झाला. या शनिवारी असा कामाचा सपाटा मारला, आणि बरोबर
वेळेवर गाडीत बसले. केलं हुश्श! मस्त झोप लागली.
जाग आल्यावर कंटाळवाणा
लांबलचक प्रवास, शेवटास तो तासाभराचा हडपसर ते स्वारगेट प्रवास. पुढे कोथरूडला
रिक्षा करीत स्वारी रात्री मुक्कामाला घरी आली. घरच्यांची ख्यालीखुशाली, आलंगेलं,
बाईचं रिपोर्टिंग, उद्याचे कार्यक्रम, पुढच्या आठवड्याची सर्वतोपरी बेगमी करताकरता
सारंकाही आवरण्यात रविवारही गेला, आणि नेहमीप्रमाणे सोमवारी पहाटेच्या गाडीने
बाईसाहेब चाटी गल्लीतल्या बँकेत आल्या. न येऊन सांगता कोणाला?
दोन दिवस शुक्रवारची टकटक
डोक्यातही वाजायची मध्येमध्ये. पण घरी कोणाजवळ बोललेच नाही. तसा वेळही मिळाला
नाही. बघू गेल्यावर, झालं असेल काहीतरी. नाहीतर माझेच मनाचे खेळ असतील. कधीच एकटी
राहिले नव्हते. दिवसा काही वाटायचे नाही एकटी असले तरी. वेळ जायचा कामात. पण
एकटीने राहणं ते देखील पाच खोल्यांच्या बंगल्यात, ते ही दुसऱ्याच्या घरात, आणि ते
सुद्धा सोलापूरला. की जेथे बँक ते घर इतकाच रस्ता मला माहित असलेल्या गावात.
म्हणूनही असेल भीती वाटली. पण पुण्यात घरी काहीच बोलले नाही.
सोमवार ते सोमवार गेला.
त्यारात्री मेल्यागत पडले होते. मंगळवारी मात्र ठरवलंच, पडवीतं जायचंच. उठल्या
उठल्या मधलं दार उघडलं आणि मला ब्रम्हांड दिसलं. बापरे, काय हे... कसं
करायचं...शी... म्हणून मस्त एक हासडली आजींच्या लाडक्या मांजरीला. मला मांजर
अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही. आजींना मात्र भयानक प्यारी. तिने मस्त चार पाच कि
पूर्ण आठवडा तिथे सर्व विधी केले होते. पार खुर्चीचे कव्हर, ते दारातले पायपुसणे,
सर्वत्र त्या मांजरीचे जुलाब ओघळ तेही वाळलेले. तीच दारावर नखाने टकटक करीत असणार.
माझी खात्री झाली. इतका कडेकोट बंदोबस्त केला असताना ही आलीच कशी आत? पाहते तो
खिडकीची एक काच आधीच तुटलेली होती. पडद्यामागे मी कशाला बघते? तो पडदा देखील किती
दिवसात कोणी सारला नसेल. गोऱ्याघाऱ्या मनीने बरोबर शोधून काढला मोकळा चौकोन आणि
केला आत मुक्काम. नुसती झोपली असती, तर माझी तळपायाची मस्तकात गेली नसती. ही
गलिच्छ घाण आता मला काढावी लागणार होती. कामवाली बाई सांगून गेली होती गावाला.
म्हणजे, अजून चार दिवस हे असेच ठेवायचे. दुर्गंधी पसरलेली खरं तर रात्रीच जाणवली
होती, पण दमले होते इतकी, की दोन केळी खावून क्षणार्धात झोपले. ओकारी येता येता...
खराटा, बाटली, पाणी, केरभरणी, खरडायला एक पत्राही मिळाला. सगळी आयुध आणली. केली
सुरवात. काही भाग तर पूर्ण कडक वाळलेला. बाहेरचे दार उघडून पाणी बाहेर ढकलावे असं
वाटलं, पण तिथपर्यंत जाण्याची हिम्मत नाही केली. जमेल तेव्हढे केले साफ. चक्क
अर्धी बदली पाणी ओतून ठेवले. संध्याकाळी तासभर तरी द्यायलाच हवा यासाठी असे म्हणून
त्या खिडकीचा बंदोबस्त करायला लागले. रद्दी, जुना पाट, दोरी, शोधून आणली. खिडकी बंद केली. कोपऱ्यात एक जुनी मोडकी बॅट सापडली. ती पुन्हा
पाटाला टेकून खुर्चीच्या वर घट्ट बांधली. काय सांगा, तिने पाट ढकलला आणि आत आली
तर.... कल्पनेनेच कसंतरी झालं.
आत जावून मी उलटीच केली.
आर्धा पाऊण तास साफसफाईचे काम करीत होते. डोकं गरगरायला लागलं. उठल्यावर चहा
सुद्धा घेतला नव्हता, आणि हे भयानक दिव्य
करीत बसले. करायलाच हवे होते. पुन्हा पडवीत पूर्ण बंदोबस्त केल्याची खात्री करून
घेतली, आणि मग प्रथम आंघोळ आणि नंतर चहा. बँकेची वेळ झालीच इतके करेस्तोवर. मग
काय न खाताच बँकेत. घरात खायला गेलेच नसते
त्यादिवशी मला. तसं बँकेजवळच्या हॉटेल मध्ये बऱ्यापैकी मिळायचं. खायचे नखरे करणारी
मी त्यावरही खुश असायची.
संध्याकाळी घरी आले, ते
येतानाच एका ठिकाणी थांबून खावून नंतरच. आत घमघमाट सुटला होता. सगळ्या खिडक्या
उघडल्या, आणि सर्व म्हणजे पाच खोल्यांमधले पंखे जोरात लावले. एकीकडे त्यातल्या
त्यात जुना झालेला गाऊन घातला, तेंव्हा
पंजाबीची पद्धत नव्हतीच आजच्या सारखी. आयुधं काढलेलीच होती सकाळी. सुरु
केलं महान काम. पत्र्याने खरवडलं, ओलं झाल्याने निघालं तरी. बादलीत भरलं मागल्या
दारी पार कोपऱ्यातल्या झाडाच्या बुंध्याला ओतलं. असे चार हेलपाटे मारले. बऱ्यापैकी
साफ झालेले वाटले, पण पूर्ववत नव्हेच.
पुन्हा अर्धी बादली ओतली. पडले अंथरुणावर तेव्हड्यात आलीच महामाया. टकटक, खडखड
करीत होती. पण, तिला आत येता आलेच नाही.
मी एकदम पक्का बंदोबस्त केला होता. पडवी आणि हॉलच्यामध्ये एक छोटीशी खिडकी होती.
माझे डोळे तिला चिकटलेले. बॅट पडत तर नाही ना यावर लक्ष. थोडीशी हालली. पाट सरकतोय
असे वाटले. मनूभवानी दमली, आणि निघून
गेली. पुन्हा पडवीत गेले. आतल्या बेडरूम मध्ये गाडीची एक वळकटी होती. ती आणली
बाहेर. खुर्चीवर उभी ठेवली आणि जबरदस्त पक्केपणाने खिडकी बंद केली. नंतर मात्र गाढ
झोपले. असे ओळीने पाच दिवस, म्हणजे मंगळवार सकाळ ते शनिवार सकाळ तोच कार्यक्रम
करीत दिवस गेले. पुन्हा पुणे, सोमवारी सोलापूर.
त्या दिवशी बयाबाई मांजरीची थाप मागच्या दारी यायला लागली. माझे अंगावर काटाच
आला. तिकडे काही उद्योग केला तिने तर. सकाळी उठून बघते, तो मांजर मागच्या अंगणात
पलीकडे, भिंतीला लागून झोपली होती. असं वाटलं दगड घालावा तिच्या डोक्यात, पण आजी
आठवल्या. त्यांचे ते मनुचे लाड आठवले. अजून माझी ट्रान्सफर पुण्याला झाली नव्हती.
काही दिवस मला आजींच्या बरोबर त्याच बंगल्यावर राहावे लागणार होते. आजी कधी येतील
असे वाटत होते. तोपर्यंत या मांजरीने माझी फार जिरवली होती. आजींच्या पाठोपाठ ती
सतत असायची, पण, तिला आत यायला मज्जाव मी केला होता. तशी एखादेवेळेस आली असती, तर
मीही बसले असते तिच्याशी खेळतं. पण, छे, हा पडवीतला प्रकार निस्तारल्यावर तिला
बंगल्याच्या कम्पाउंड मध्ये येऊ देत होते इतकेच माझ्या दृष्टीने खूप होते. मला
मांजर आवडायची नाही. सुरवातीला तिने माझ्याशी अंगलट केली. मी दूर ढकललं,
लवकरच तिला समजलं इथे आपली डाळ शिजणार
नाही हे. ती माझ्याकडे येईनाशी झाली होती. मलाही हायसं वाटलं. तीच मनी माऊ माझी
अशी त्रेधा तिरपीट करून मला कामाला लावेल, माझी चांगली जीरवेल असे मला अजिबात
म्हणजे अजिबात वाटले नाही. दोन महिन्यात तिला एकदाही मी घरात येऊ दिले नव्हते.
तसे भराभर गेले दोन महिने आणि आजी आल्या सोलापूरला. त्यांना मी हे सांगतलं खरं. तरं आजींनी तिलाच
जवळ घेतलं, कुरवाळलं आणि म्हणाल्या, “ दोन महिन्यात घरात आली नाही गं माझी बाय.
अशी जिरवलीस तू हिची. असू दे हं. हे घ्या. दुदू दुदू.... या या मांडीवर.”....मी
जवळच बसले होते. मनी मांडीवर लोळत माझ्याकडे तिरक्या नजरेने बघत होती, हळूच हासत होती. मी देखील तिच्याच कडे एकटक बघत
बसले. डोळे मी वटारले नाहीत. मनी मला म्हणाली, “कशी जिरवली तुझी. मस्त फजिती केली
की नाही. मागल्या दारी पण तसंच करणार होते. पण, म्हंटल, जाऊ देत. पाहुणी आहे.
सोडून देऊ यात. माझा रागराग करतेस काय? कर सारं साफ.”
वंदना धर्माधिकारी
Sunday, June 8, 2014
Saturday, May 24, 2014
Saturday, March 15, 2014
43. LOksatta - Chaturang - कशी आहे मी
लोकसत्ता : चतुरंग : लेखमाला : फक्त तीन शब्द
‘कशी आहे मी?’
लेखिका : सौ.वंदना विजय धर्माधिकारी
“धावत येऊन विचारला आरशाला प्रश्न
बावळट, मूर्ख, तर कधी वेडी शहाणी
घरातल्या साऱ्यांचीच मते किती
भिन्न
मला नाही समजत, मी होते सुन्न
अशी का तशी? कशी आहे मी?
तू सांगशील तेच खरं, तेच मला
मान्य”
या चिमुरडीला प्रश्न पडायचे कधी सोपे कधी अवघड. उभी
रहायची आरशापुढे. आरशातली ‘ती’ गोष्टी सांगायची. काहीतरी मिळताचं स्वारी खुशीत
खेळायला धावायची. आरशात असतं प्रतिबिंब, त्याच्याशी संवाद? त्यानं काय होत?
प्रश्न्नाच उत्तर सापडतं?
“आई गं ...” जोराची हाक ऐकताच शांताबाई दचकल्याच.
काय झालं म्हणत आवाजाच्या दिशेने पळाल्या. खोलीच दार नुसतं ढकललेलं. साडेतीन
वर्षाची अलका आईला पाहताच बिलगली. मोठ्ठा भोकाड पसरला. बाबांनी आणलेला मोठ्ठा
पावडरचा संपूर्ण डबा आपल्या अंगावर ओतला होता, आणि ‘मी कशी दिसते’ बघायला आरशासमोर
जाताच घाबरगुंडी झाली.
“इतकी पावडर ? हे काय ?”
आईने पदरानंच तोंड पुसलं.
वाहतं नाक फुरफुरलं “ ताई
पावडर लावून गोरी झाली ना. म्हणून मी” उंउं ....
“ असं नसतं राणी.”
“ होच मुळी. सगळे म्हणतात काळी काळी अलका. मी
पावडर लावणार.”
शांताबाईना गलबलून आलं. “तू काळी आहेस, म्हणून
जास्त छान आहेस. लाडोबा आहेस माझी.”
झरकन अलकाला कुशीत ओढलं, पापे घेतले. तेंव्हाचं
ते आईने कुशीत घेणं, पापे घेणं, लाडोबा जाहीर करणं तिला आयुष्यभर पुरलं. अलकाने आपला
काळा रंग इतक्या लहान वयात स्वीकारला. जे आपण बदलू शकत नाही त्याचा बिनशर्त
स्वीकार हवाच. वाड्यात कुठूनही ‘ये काळे’ अशी हाक येताच ‘आलेच रे’ म्हणून धावयाची
जोमानं.
कुणी कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व
आहे. ते शक्य नसेल तर जास्तीतजास्त कसं नसावं हे नक्कीच अत्यंत महत्वाचं असतं. कसं
नसावं हे कोरूनच सुंदर घडवायचे असते स्वत:ला आयुष्यभर. “मी कशी/कसा आहे?” याचं
मोजमाप रंगरुपापेक्षा स्वभाव आणि वागणूक यानेच मोजलं जाणार याची तीव्र जाणीव माणूस
बनायची पहिली पायरी म्हणावी. मनातलं आपलं
दर्शन धूसर असतं. तेथे प्रतिमा नसते, चेहराही नसतो. असतात फक्त शब्द. ‘मी शहाणी
आहे’, ‘मी धीट आहे’, अशी विशेषणे चिकटवली जातात. विचार घोळवले जातात आणि प्रश्न
पडतो “खरचं मी तशी आहे का?” याला ‘हो’ म्हणताना पटकन ‘नाही’च पुढं येते. ‘हो’
म्हणून घ्यायचेचं असेल तर नक्कीच चुकीच्या वागण्यात सुधारणा केली जातेच. तरचं ‘मी
एक चांगला मुलगा आहे’. हे वाक्य उच्चारले जाते. चांगले विचारांच्या अनुषंगाने
आपल्या आंतरिक शक्तीला नक्की काय हवे याची जाणीव होते. आपोआप वागणं, बोलणं
चांगुलपणाकडे झुकू लागते. निर्भीडपणे स्वत:च्या प्रतिमेच्या नजरेला नजर भिडते आणि
सुधारायची प्रक्रिया सुरु होते. त्याचक्षणी शब्द उमटतात, “मी अशी आहे, यापेक्षा
मला असं व्हायचं, काय काय करू” प्रश्नांकित चेहरा आरसा वाचतो, बघताबघता मार्ग
सुचतो. यामध्ये सातत्य लागते,
मार्गदर्शनाने इप्सित लवकर साध्य होते.
बदलापूर्वीचा स्वस्वीकार खूप मोलाचा असतो. आपणच आपल्याला
नाकारलं तर प्रगती होणारच नाही. जो स्वत:वर प्रेम करू शकतो, तोच इतरांवर प्रेम
करेल. दुर्गुणांसह स्वस्वीकार असलेला सहज इतरांना त्यांच्या दोषांसकट आपलेसे करू
पाहतो. मन फार रगेल असतं, वरवर म्हणतं, ‘बरं,
मी बदलेन.’ पण प्रत्यक्षात अवघड जाते. स्वस्वीकारात श्रीगणेशा असतो. आपली
श्रद्धास्थाने मनोभावे पुजली जातात. माझ्यातील
दोष, कमीपणा, नकारात्मकता, सर्व मर्मस्थाने मीच उत्तम जाणू शकतो. स्वत:चे वाईट
वागणे आरशातील प्रतिमेला नजर भिडवू देत नाही. वाईटचा त्याग हवाच, म्हणता स्वच्छता
मोहीम घेतली जाते. जिद्द घट्ट होताना,
आत्मपरीक्षण होतेच. मी इतर कुणाला आवडो, अथवा ना आवडो. पण मी मला आवडलेच पाहिजे.
मला माझ्या नजरेला नजर भिडवता आलीच पाहिजे. इथेच ध्येयाची वाट सापडून मार्गक्रमणा
सुरु होते. प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारे, मुळापासून हलविणारे क्षण
येतातच अधून मधून. तेच गुरु बनतात. असे कोणीतरी येईल आणि मी बदलेन असे म्हणून चालत
नाही. गुरूच्या भूमिकेत कधी घरातली, जवळची
माणसे तसेच एखादा प्रसंग, पुस्तक, घटना, सिनेमा, वा अन्य काही येऊ शकते. बदलाच्या
वाऱ्याला दिशा दिली जाते सगळ्यांकडून. सद्सद्विवेकबुद्धी जागृत केली जाते. बरेचदा परिस्थिती
आड येते. आत्मबळाची कसोटी साशंक होते. एक मात्र चांगलं आहे. आपल्या अपयशाचं, असल्यानसल्याचं
खापर देवाच्या माथी फोडायला आपण तयार असतोच
सदोदित. आणि तो देव, कसे ही असलोत आपण तरी स्वीकारायला राजी असतोच.
तरुण संदीपचेच बघा. काय झाल? तो आळशी, झोपाळू,
अभ्यासातही बेताचाच. कायम घरच्यांची बोलणी खाणारा. एकदिवस जोरचं वाजलं घरात.
वडिलांनी पूर्ण तोंडसुख घेतलं. आईने फोडणीही घातली. हाणूनपाडून वाट्टेल तसे बोलले.
संदीपला अपमान असह्य झाला, त्याचाही पारा चढला, “ मी आहे हा असा आहे. त्यात माझा
काय दोष? तुम्हीच वाढवलेत कायकाय खाऊपिऊ घालून. त्यावर तर पोसलो मी. आणि तुम्हीच
ओरडता माझ्यानावाने. काही सांगू नका मला. तुम्हीच जरा आरशात जाऊन बघा स्वत:ला.”
मुलाचं वक्तव्य ऐकून आईबाबा वरमले, काहीतरी कुजतयं आपल्यातच दोघांनी जाणलं.
मोठ्यांच्या चुकांची कबुली लहानांकडे कशी द्यायची? दोघे गप्प बसले. संदीपने “माझा
मीच शिल्पकार होणार” असे ठरवले. बाथरूमचे दार
बंद करून घेतलं. बसला आरशात स्वत:ला बघतं. संताप निवळला. काहीतरी फेकून द्यायचं निश्चयाने
ठरवलं, तेंव्हाच काहीतरी कोरायचं पक्क झालं. मनावर घेतलं तर नक्कीच मी मला हवा तसा
होऊ शकेन, हे जाणवलं. यासाठी सातत्याने प्रयत्न करायचे ठरलं. घाण साफ करायची
म्हणताच मस्त शॉवर घेतला, झुलपं उडवली,
तुषारांनी अर्वांगावर उत्साहाचे रोमांच
उभे राहिले, मंद शीळ घुमली आतबाहेर. “मी इतरांना आवडतो की नाही, हे मला माहित
नाही. पण मला मी नक्कीच आवडेन असेच मी वागणार, करणार. मी चुकलो असेन, पण मी मनाने वाईट
नाही. एक चांगला माणूस बनून दाखवेन सगळ्यांना. विश्वास ठेवा माझ्यावर. ठेवला विश्वास
तर मी लवकर फुलेन. इतकचं.”
आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रीयांना
स्वत:ला घडूच दिलेलं नाही. कुजतात बिचाऱ्या. बायकांना कोंडलं जातं घरात. घरकाम, चुलमूल
यातच आयुष्याची इतिश्री होते. काहीजणींच्या आयुष्यात अचानक सर्व जबाबदारी घ्यायची
वेळ येते. उत्तम तऱ्हेने घरदार, मुलं, संसार, व्यवसाय, नोकरी सारेकाही सांभाळतात.
त्यांनाच आश्चर्य वाटते की मी हे करू शकते? सांभाळू शकते? मग, पूर्वी का नाही करू
दिलं मला? नुसती कठपुतली म्हणून पुढेमागे नाचले. स्वत:चाच राग येतो अशावेळी. इथे, ‘मी
कशी आहे’, हे एखाद्या स्त्रीने ओळखले असले तरी ती ते करू शकत नाही ही एक शोकांतिका
आहे. आज आपल्याच देशात राजकारणासह अनेक
क्षेत्रात विधवा महिलांचे योगदान मोलाचे दिसते. स्त्रीशक्तीचा स्वीकार होत नाही, तिला डावललं
जाते. स्त्रीला चांगल्या पद्धतीने जगूच देत नाहीत. स्त्री फक्त स्वत:ला प्रश्न विचारीत
असते, तेही आतल्याआत. ‘मी कशी आहे, मला असं व्हायचंय... पण, हे नाही म्हणतात’ आणि
गाडी थांबते.
आपलं काय होतं? जागेपणी दुसऱ्याचाच विचार करतो
कायम. शब्दांची रेलचेल नुसती. त्याऐवजी आपलंच मन वाचलं तर? कधीकधी राहावं आपण
एकटेच, गोंगाटापासून दूर. मनापासून पुसलं जातं माझं मलाच. नव्याने आपलंच एखादं
रहस्य उलगडतं. सापडतात काही लपलेले खजिने, धावता धावता खाली गाडलेले. उघडली जातात भारलेली
तावदाने, चकाकतात पैलूदार हिरे. दिपून जातात डोळे तेजाने. आश्चर्य वाटलं तरी
विश्वास बसतो त्यावर. हे माझेच धन आहे. वर्षानुवर्षे बघितलंच नाही, त्या गुणांचे
आस्तित्व मला जाणवलं देखील नाही. चुकलं माझंच, दुर्लक्षच केलं मी माझ्याकडे. आता
मात्र मी फुलणार. आणि हसून सांगणार त्याला
‘मी अशी सुद्धा आहे. सुंदर सुंदर!!’
असं असलं तरीपण. “मी कशी/कसा आहे”, हे
दुसऱ्याला आपणहून सांगायची गरज नाही. का म्हणून सांगत सुटायचं जगाला आपल्याबद्दल? त्यातल्या
गोष्टींचं इतरांसमोर प्रदर्शन नसतं मांडायचं. माझ्यात काही अदभूतही असेल, इतरांना
न उलगडणारं, न समजणार. अशावेळी सांगितलं सगळ्यांना तर कदाचित खोट वाटेल, चेष्टा करतील माझीच. काय
सांगा, माझा आत्मविश्वास डळमळेल. आपणच खोटे ठरू. कोणालाही सांगायला नकोच.
लाखमोलाचं माझं मीपण माझ्याजवळ. सांभाळेन माझं आत्मभान. मला मी आवडते. खूप प्रेम
करते माझ्यावर. छान आहे मी!!!
वंदना धर्माधिकारी
vandana10d@yahoo.co.in
.
Saturday, February 1, 2014
46. Loksatta - Chaturang - तू नसताना मी
01-02-2014
लोकसत्ता : चतुरंग : लेखमाला : फक्त तीन शब्द
तू नसताना मी
लेखिका : सौ.वंदना विजय धर्माधिकारी
अगदी परवाचीच गोष्ट. पाहुणे
आलेले घरी. मस्त गप्पा रंगल्या मधेच एकेकजण
झोपायला गेला. शेवटी मी स्वयंपाकघरात डोकावून आत जावून बघते तो काय, सगळे ढाराढूर.
मला हि खूप झोप आलेली,पण माझी उशी कुणीतरी घेतलेली. मी मनात बोलून गेले “अगं उशी
गं उशी, तू नसताना मी झोपू तरी कशी?”
जसं उशीच तसं कितीतरी
होतंच. सवयीचे गुलाम आपण, दुसरं काय.
हातात मोबाईल नसेल तर अस्वस्थ होतातच. गाडी एखादे दिवशी सर्व्हिसिंगला दिली कि लगेच, गाडी
नसताना मी जाऊ तरी कशी? इतर वाहने, रिक्षा, बस, लोकल आहे ना, आणि नसेल सोयीस्कर तर
दोन पाय आहेतच की शाबूत. पण छे, पडणार नाही बाहेर. घरात, लाईट नाही म्हणजे टीव्ही,
इंटरनेट, laptop नाही. करमणार कसं?
खरं तर माणूस येताना एकटा
येतो, आल्यावर गोतावळा गोळा करीत फाफट
पसाऱ्यात जगतो. प्रत्येकात कणकण जीव अडकतो म्हणूनच उठताबसता म्हणतं राहतो. “पेपर
नाही टाकला, उठल्याउठल्या चुकल्यासारखं झालं.” “गॅस नाही स्वयंपाक कसा करू?” “दूधच
नासलं आज, चहा कसा मिळणार?”
“अरे,अरे, मिठा, तू नसताना
मी भाजी गिळू तरी कशी?” आहे ना गंमत. अडकावं कशाला इतक्या सर्वत्र? थोडं खुट्ट
झालं कि बिनसलं. इतक्या वर्षांची जुनी सवय अशी थोडीच मोडणार.
अशी या निर्जीव वस्तूंमध्ये
अडकणारी आपण माणसे, आपापसात गुंतलो नाही तरच नवल. बाळाला
पंहिल्या श्वासालाच भेटतात
सगळी नाती. वाढत्या वयाबरोबर नातीही फुलतात. आई करते, “बुवा s s कू.. क!” तोंडावर
धरलेला आपलाच हात. बाळाचा चेहरा कावराबावरा. जणू म्हणतं, “आई गं, तू नसताना
मी...आं आं आं S .” किती अल्पावधीसाठी हात धरला चेहऱ्यावर. इथे लहानग्याला आई
नसतानाची भावना रडायला लावते. असं का होतं? कुठेतरी गुंतलेला धागा अडकतो, तुटेल
अशी भीती वाटते, रडू कोसळतं.
खरं पाहता, कोणाचंच
कोणावाचून काहीही आडत नाही. थोडा वेळ, काही दिवस अनुपस्थिती जाणवते. हळू
हळू आपोआप सगळं सुरळीतहोते.
परंतू, त्या मधल्या काळातील मनाची अस्वस्थता असह्य भयानक होते. वास्तव स्वीकारले
जात नाही. आपल्या आयुष्यातील महत्वाचे क्षण वाया घालवले जातात इतकंच. काळ हेच सर्वावर औषधं असल्याने, कालांतराने पडदा
पडतो. थोड्या दिवसांसाठी, किंवा कायमस्वरूपी गेलेल्या व्यक्तीचे स्थान मनातल्या
मनात अबाधिक राहू शकते. फक्त जागा बदलते. आधी वावर होता,
सहवास होता, आता फक्त
मनातल्या कोप-यात निवास उरला. असं मनाला समाजवलं तर म्हणता येते, “तू
नसल्याची भावना मला बोथट करता येत नाही,
फक्त त्या भावनांबरोबर हिंदोळायाचं नाही असं ठरवलं मी आणि पूर्वीसारखे वागू
लागले.” अगदी चांगला आहे हा विचार. नसलेल्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावायचं नसतं.
भूतकाळातील आठवणींमुळे वर्तमानातला क्षण सोडायचा नसतो. आपल्यालाही मोजकेच श्वास
दिलेले आहेत, याच भान ठेवून समोरचा क्षण जिवंतपणे स्वीकारला की धीर वाढतो, क्लेश
जाणवत नाहीत. अशीच व्यक्ती म्हणू शकते, “
तू असताना मी एक झंझावाती वादळ होते, तू नसतानाही तशीच आहे. जेंव्हा केंव्हा
वादळ शमतं तेंव्हा थकून भाकून तुझ्याजवळ विसाव्याला येतं हे नक्की.”
तर काहींच्या बाबतीत भयानक
घडतं. अवास्तव अपेक्षा, स्वत:बद्दलचा ओव्हर कॉन्फिडन्स, बेफिकीर वृत्ती ताब्यात
ठेवणं जमतंच असे नाही. हवं ते मिळवण्यासाठीची हट्टी मन वाट्टेल त्या मार्गाने धडपड
करतं . काय सांगा अशावेळी वाईट मार्गाने पाहिजे ते मिळवताना कोणाची पर्वा केली जात
नाही. माणुसकीला काळिमा नुसता. वाचताना हळहळतात
सगळे, “ एकतर्फी प्रेमात, ती नसताना मी जगूच शकत नाही, ती माझी नाही तर
कोणाचीही नाही. प्रेयसीचा खून आणि
आत्महत्या ” किती ही अमानुषता.
कधी काय होईल सांगता येत
नाही. क्वचित एखाद्याचं नसणे सार्वजनिक होऊ शकतं. हेच पहा ना. आपल्या सचिनने
क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि तमाम भारतीयांना क्रिकेटची काळजी पडली. शेजारच्या
नंदूने तर सचिनला इमेल केला, “ तू नसताना मी मॅच बघू शकणार नाही. मला ती शिक्षा
वाटेल.”
कोण एका घरी काय झालं
सांगते. रेखा, हुषार आणि करिअरिस्ट. तिला अधूनमधून जावं लागायचं बाहेर परगावी
किंवा परदेशात सुद्धा. जाताना तिच्या आपल्या सूचनांवर सूचना हे नेहमीचच झालं.
तेंव्हा शशांक, तिचा नवरा तिला म्हणाला, “तू नसताना माझी मुलांशी मस्त ए वन मेतकुट जमलं. वेव्ह लेंध जुळल्याने मोकळेपणा आला नात्यात.
नाहीतर आई असायचीच मध्येमध्ये. बघशीलच, तू नसताना मी कसं छान मॅनेज केलं घर. अर्थात तुझी आठवण पदोपदी. गप्पात
तूच. तुला सांगतो, गरज असेल तेंव्हा तू जात जा. तुलाही तुझं करिअर आहेच की. तुझी
वाट बघत आहोत सगळे.” स्त्रीयांना इतकी मोकळीक देऊन करिअर करताना साथ देणारे थोडेच
आहेत.
माणसांचा एकमेकांचा सहवास
प्रत्येकाच्या मानसिकतेवर, परीपक्वतेवर, विचारधारेवर परिणाम करतो. थोड्या काळाचा
दुरावा देखील बोलून जातो. बाई वर्गात नसताना कुठल्याच शाळेतली मुले वर्गात शांत
बसत नाहीत. ऑफिसमध्येही तेच चित्र. बॉस खडूस असेल तर बाहेर जायची वाट बघतात सगळेजण,
आणि तो जाताच सुटतात एकामागून एक. शाळा,
ऑफिस, घर फरक काहीच नाही. घरात सुद्धा बाबांचा धाक इतका की, ते यायच्या वेळेला
एकदम चिडीचूप होते, मुलं अभ्यासाला बसतात, ती कामात गर्क असते. अशाने घराचे स्पष्ट
चित्र बाबांना कळतच नाही.
एखाद्याच्या आयुष्यात ‘तू
नसताना’ सुखावह होते. आमची कामवाली खूप कष्ट करायची. शिवाय मार
खायची. तो गेला आणि सहज
सखुबाई बोलली परवा, “गुरावाणी बडवायचास
मला. लाथा बुक्यांनी मारलस. मी आणि पोरं नुसती रडयाचोत. तुला यायचा चेव. का रडता
म्हणतं लाथा घालायचास कंबरेत. मुडद्या मेल्या, नरकात गेलास. आता, तू नसताना मी मजेत आहे. मी,
माझी मुलं, माझं घर सारे सुखात आहोत. आनंदोत्सव साजरा करतो आम्ही.” किती वाईट
बोलते. पण सत्य आहे. सहनशीलतेलाही मर्यादा असतातच. सुटली सखुबाई कायमची. लोकं असं
का वागतात, आपल्याच बायकोशी?
अशी ही नाती आणि त्यांचे
घट्ट जाळे. नात्यानात्याचे धागे भक्कम असतात, म्हणून तर सगळं कसं सुरळीत होतं
आयुष्यात. एखादा धागा सैल पडला, तुटला, निसटला तर जाळ्याची विण कमकुवत होते,
कुरकुरू लागते. टांगणीला
लागतो जीव. सगळेच अनुभवतात हे असलं जीणं. हा नियम सगळ्यांना सारखाच. प्रसंगात बदल
आणि वस्तू किंवा व्यक्ती वेगवेगळी. तो, ती, आणि ते नसताना मी नीट राहू शकत नाही,
एव्हढेच. जवळ असताना किंमत कळत नाही, दूर गेल्यावर चैन पडत नाही. बरोबर जगताना,
प्रेम करायचं, समजून घ्यायचं, चुकलं तर माफ करायचं असतं. त्याऐवजी आपलाच अहं
कुरवाळत बसतात सगळे. नंतर स्वत:चा रागराग करीत जगतात. येणारा जाणारच कधीतरी.
भेटलेला दुरावणारच. आपलं वागणं तर असतं आपापल्या हातात. गेलेले-दुरावलेले मनात असतात ठाण मांडून. त्यांनाच विचारायचं,
“तू नसताना मी काय कसं करू?”
अवघड असतं आपल्या माणसाला सोडून राहणं. आपलं
म्हंटल की नाते कुठलेही असो. तरीही पतीपत्नीच्या नात्यात मागे उरलेल्याची हालत फार
वाईट होते. कोण पुढे जाणार यांत शर्यत लागते. माझ्या विना तू कसा राहशील, तुझे कोण
काय बघेल, ही विवंचना छळते आतल्याआत. कशी सांगावी ती कुतरओढ ? माझ्याच एका
कवितेसारखी तर असते ती. बघा जरा, पटते कां?
संसाराचा किती वर्षं खेळला त्यांनी सारीपाट
तरीपण दोघांना जाता येत नाही पाठोपाठ
“ तू थांब मागं, मला जावं लागेल पुढं”
दोघेजण दामटत होते आपलं आपलं घोड.
देवाच्या
हिशोबी दोघांचेही हिशोबच वेगळे
बेरीज, वजाबाकी, गुणाकार करून
उरलेल्याला भागलं
ज्याचं गणित बरोबर त्याला अलगद उचललं
खूप
विचार केला, वाटलं सारकाही संपलं.
रडलं, भाकलं, ओरडलं, आरडलं नंतर मात्र स्थिरावलं
पुढे गेलेल्याला काय वाटेल? मीच मनाला दटावलं
तेंव्हा कुठे माझं मला थोडाफार उमजलं
“तू नसताना मी,” आहे त्यातच सूख मानायचं ठरवलं.
वंदना धर्माधिकारी
vandana10d@yahoo.co.in M: 9890623915.
Subscribe to:
Posts (Atom)
Camera is a responsive/adaptive slideshow. Try to resize the browser window
It uses a light version of jQuery mobile, navigate the slides by swiping with your fingers
It's completely free (even though a donation is appreciated)
Camera slideshow provides many options to customize your project as more as possible
Here is a video for National Webinar on IBPS Exam. Guidance by Smt.Vandana Dharmadhikari on 17th July, 2020
vandanadharmadhikari.blogspot.com
-
Here is a video for National Webinar on IBPS Exam. Guidance by Smt.Vandana Dharmadhikari on 17th July, 2020
-
Hello, On 17th July, 2020 I addressed a National Webinar on Banking Career and IBPS exams. SNDT Women's University & TMF SMA...
-
FOR ALL JOB SEEKERS and THEIR FRIENDS IBPS NOTIFICATION :: 2020 :: BANK RECRUITMENT EXAMINATIONS Sakal COMPREHENSIVE GUIDE T...












