Sunday, April 10, 2005

55. Poem - चिमणी


कविता : चिमणी
कवयित्री : सौ.वंदना विजय धर्माधिकारी


चिमणीची उडी तुला कळली ना ..... कळली ना ....कळली ना
      चिमणीनं केलं काम
      चिमणीनं आणला दाणा
      चिमणीनं गायलं गाणं
      गाण्यावर ताल तू धरला ना .... धरला  ना
चिमणीची उडी तुला कळली ना ..... कळली ना ..........१.

      चिमणीच्या हातामंधी
      प्रेम माया तेथं नांदी
      हाती भाजी चिरताना
      वरणाला फोडणी तू घातली ना ..... घातली ना
चिमणीची उडी तुला कळली ना ..... कळली ना ..........२.

ऑफिसातून घरी आली
चिमणी पावसात भिजलेली
ओली साडी सो
गॅसवर आधण तू  ठेवले ना ..... ठेवले ना
चिमणीची उडी तुला कळली ना ..... कळली ना ..........३.

      चिमणीला माहेराला
      मधून मधून डोकायला
      पिल्लांसंगे निघताना
      तुझं तिकीट तिच्या संगे काढलं ना ..... काढलं ना
चिमणीची उडी तुला कळली ना ..... कळली ना ..........४.
     

     चिमणी आली तुझ्या दारी
      लागलं तसं पाणी भारी
      माझं माझं म्हणताना ना
      पुरुषी अहं तुझा सरला ना .... सरला ना
चिमणीची उडी तुला कळली ना ..... कळली ना ..........५.    


   
वंदना धर्माधिकारी
१० एप्रिल, २००५.

Sunday, May 16, 2004

51. Poem - दूरस्थ बाळास




दूरस्थ बाळास
कवयित्री  ::  सौ.वंदना विजय धर्माधिकारी

एखादा कार्यक्रम रंगतो, सगळ्यांना आवडतो, पण सादर करणाऱ्याला काहीतरी आपलं चुकलं असं वाटतं राहतं. माझेही असेच झाले. रिचमंड, अमेरिका यांच्या महाराष्ट्र मंडळात माझा “ ...आणि म्हणूनचं गं!” कार्यक्रम ठरवला होता. अनेक कवितांपैकी पुढील कविता मी सादर केली. प्रेक्षकांमध्ये माझी मुलगी आणि जावई होतेच. त्यांच्याकडे न बघता, किंबहुना अगदी शेवटी समोरच्या भिंतीकडे बघून मी ती गाऊन सादर केली. तशी मी सरावले होते कविता सादरीकरणाला. माहोल, एकदम गंभीर झाला. बरेच जण उठून बाहेर निघून गेले. कविता संपली...निश:बद्ध शांतता. मी अनेकांना रडवलं होतं. हे माझ्या कवितेचे, गायकीचे यश होतं.... माझा हात हातात घेऊन, अक्षरशः खांद्यावर डोकं टेकवून काही रडले. मोकळे झाले म्हणते मी. म्हणाले, “काकू, आज कितीतरी वर्षांनी मी रडलो. तुम्ही रडवलंत आम्हाला>’

नंतर, मलाच वाटलं, असे होऊ शकते हे माहित असताना काय गरज होती ही कविता जरी त्यांच्यावर असली तरी सादर करायची. आणि सगळ्यांना रडवायची.... मी काय करणार. कविता गायन झालेले होते. मीही हालले होते.

पण, एक सांगते ही कविता केली तेंव्हा माझ्या मुली इथेच माझ्या जवळ होत्या. भा.रा.तांबे यांच्या कवितांचा कार्यक्रम होता. खूप छानछान कविता झाल्या. पण, “कळा ज्या लागल्या जीव’” याने माझा कब्जा घेतला. गाडीवरून १५/२० मिनिटाचे अंतर येईस्तोवर मनात कविता तयार झाली. मधेच सिग्नलला थांबले असताना मैत्रिणीला फोन केला, “ हे बघ, मी आत्ता लगेच येत आहे. मला भा.रा. तांबे यांची कवितांची असतील ती पुस्तके काढून ठेव. मी नेणार आहे. आलेच मी” पुस्तके घेतली. साहजिकच घरी यायला उशीर झालेला. वातावरण कसे ते वेगळे सांगायला नकोच. स्वयंपाक जेवण उरकली. आवरलं. आणि कविता काढली. माझे शब्द घोळवीत होते. त्यांना स्थानापन्न केलं. पोटातून आलेल्यांना गळ्यातून अलगद खाली उतरवलं. मस्त धुंदीची रजई घेऊन झोपी गेले.

अशा प्रत्येक कवितेच्या जन्मकथा असतात..

तर ...ऐका “दूरस्थ बाळास”... नव्हे... इथे नुसतेच वाचा.
कधीतरी कार्यक्रमात हे गीत मी रेकोर्ड करून मग इथेही टाकीन. नक्कीच.


कवीवर्य भा.रा.तांबे यांच्या अनेक कविता मराठी मनात घर करून आहेत. त्या गुणगुणल्या जातात. त्यांची अशीच एक कविता ‘ कळा ज्या लागल्या जीव’ याच्या चालीवर मी टाकलेले शब्द म्हणजेच ‘दूरस्थ बाळास’ ही माझी कविता. मी ही कविता चालीवर गावून सादर करते, तेंव्हा अनेकांचे डोळे पाणावतात. तेंव्हा, माझ्या कवितेचे चीज झाले असे मला वाटते.

कळा ज्या लागल्या जीवा  मला की ईश्वरा ठावा
कोणाला काय हो त्याचे   कोणाला काय सांगाव्या........याच चालीवर माझे शब्द

नयनी का लागल्या धारा
कोंडला जीव का प्यारा
कुठे तू दूर देशी त्या
तेथला येईना वारा

मनाला खेचितो मागे
तुझा तो धिंगाणा प्यारा
कोठे गेल्या तुझ्या वस्तू
पसारा संपला सारा

घास हा आडतो कंठी
तुझी ही लाडकी भाजी
करू केंव्हा मी तुजसाठी
जेवण्या मित्रपरिवारा

पांघरुनी  घेशी कां रोज?
दिलेली तुजसी मऊ साडी
हाती बनवून ती दुलई
घराचा देई उबारा

कशी मी समजवू मजला ?
वाहुनी कोरडे डोळे
कसा रमला तू त्या देशी ?
तुटे कधी आकाशी तारा ?

वंदना  धर्माधिकारी





Monday, June 23, 2003

52. Poem - सल



  
सल
कवयित्री : सौ.वंदना विजय धर्माधिकारी



जे जे राहिले ते ते करायचं  
आता कोणाला नाही घाबरायचं  
स्वप्नातले चित्र आता सत्यात आणायचं  
आणि हिच्या वाढदिवसाला सरप्राईज द्यायचं  

आजोबांनी ठरवलं सर्वांना बोलावलं
नातवंड पतवंड झाली सारी गोळा
आल्या लेकीसुना नातजावई नातससुना
‘हे कशाला आले?’ आजीला काहीच कळेना

आजोबांची इंट्री होताच सगळे झाले स्ट्यॅच्यू
‘हे काय काहीतरी?’ बोलू लागले कुचूकुचू

नको ते धोतर, नको तो सदरा
नको ते टोपी अन नको तो सूट 
डार्क जीन्स अॅण्ड कलर टॉप
फॅशनेबल हॅट आणि मॅचिंग बूट

छोट्यांच सुटलं भान
लागले हसायला खो खो
मोठ्यांना आलं उधाण
पण, ग्र्ँडपाला वाटलं ब्रेव्हो!

हाती घेऊन फुल, गुडघ्यावर बसून
टाकली तिरपी नजर, आजोबांनी
“I love you daring! I love you darling!!”
चा आजोबांनी केला गजर

आजीला झालं कसंचंचं
पिकली मोठी खसखस
आजोबा म्हणतात आजीला
“तू माझ्या जवळच बस.”

खाणपिणं सारं उरकलं
झाली सगळीकडे सामसून
आजोबा जवळ येतात
पण, आजी मात्र गुमसून

बाईचीच जात, पोटात थोडंच राहतं
मनात आलं की ओठावर नाचू लागतं
आज आजीबाई असं काही बोलून गेल्या
आजोबांना पूरतं हरवून गेल्या

“आवडलं रे आवडलं, तुझं आजचं रूप आवडलं
या रुपात स्वप्नी तुला मी खूपखूप न्याहाळलं
बसं, आता मी काय सांगते ते ऐक.....

अरे, तुझ्यामागे बाईकवर बसायचं राहिलं
वाऱ्याच्या गतीसंगे पलायचेच राहिलं
तासंतास नेट चॅट करायचेच राहिलं
एसएमएस वर निरोप धाडायचेचं राहिलं
डान्स पार्टीत तुझ्यासवे नाचायचं राहिलं
हल्लीच्या पोरीगत खूप भांडायचं राहिलं”

“अरे, काय सांगू, काय काय राहिलं
हे राहिलं, ते राहील, ते ते देखील राहिलं
पण, जाऊ दे ते आता, जे राहिलं ते राहिलंच
तुला सारं सांगून  त्यातच समाधान पावलं”

“पुढच्या महिन्यातल्या तुझ्या वाढदिवसाला .......”

“कुणालाही घरी मी बोलावणार नाही
अन, इकडची कडी तिकडे करणार नाही.

सकाळीच आपण दोघे बाहेरच जाऊ
छानश्या हॉटेलात निवांत राहू

संसाराच्या आठवणीत भिजून जाऊ
चुकले माकले कढ काढीत रडून घेऊ”

संध्याकाळी मात्र आपण घरीचं यायचं
आपल्याच घरात आपलं होऊन राहायचं







तिन्हीसांजा..................
तिन्हीसांजा मी तुला औक्षण करीन
हं....तिन्हीसांजा मी तुला औक्षण करीन
काय माहित तू आधी जाशील का मी आधी जाईन?
पण, एव्हढे मात्र खरं अगदी खात्रीने सांगते
तुझ्या वाढदिवसाच्या औक्षणापर्यंत मी नक्कीच राहते.
तुझ्या वाढदिवसाच्या औक्षणापर्यंत मी नक्कीच राहते.


वंदना धर्माधिकारी
माझा मास्टर पीस








Saturday, March 15, 2003

3. Study students and parents

“अभ्यास, मुलं आणि पालक” : सकाळ, मधुरा पुरवणी १५ मार्च, २००३
मुलाच्या परीक्षा  म्हणजे पालकांनाचं दडपण अधिक!   मुलींच्या अभ्यासाचं मी कधी टेन्शन घेतलेले आठवत नाही. मी माझ्याही परीक्षेचे घेतले नव्हते कधी. आणि खूप सारखं मागेही नव्हते लागले. आणखीन काय विचार करून मी मुलींची तेंव्हा काळजी घेतली, कसा अभ्यास घेतला, काय अपेक्षा ठेवल्या, आणि त्यांनी काय केले, असा विचार डोकावला आणि “अभ्यास, मुलं आणि पालक” मस्त लेख लिहिला.  दिला सकाळकडे पाठवून. आणि चक्क छापूनही आला. ‘मधुरा ‘ महिलांच्या पुरवणीत. लेख आवडला अनेकांना. हे लगेच समजले मला.

पंधरा दिवस गेले असतील, आणि सकाळ मधून फोन आला. “येऊन भेटायला जमेल का?” आणि मीही गेले. लेखाला अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या, पत्रे, फोन होतेच. मग, चौकशीही झाली. कोण, कुठे असता, काय करता, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. इतके दिवस काही लिहिले नाही का? .....
“कसलं काय? नोकरी, घर सांभाळता सांभाळता दररोजच्या वर्तमानपत्राची घडी न उलगडता रद्दीत जायची. तेंव्हा कुठे वेळ मिळायचा? नाही जमलं.”

“मग, आता लिहाल का? बँकिंग वर.” अशी विचारणा केली.

“हो, देईन की. अगदी डझनाने लेख देईन मी.”एकदम डझनाची बोली केली मी.

“अगदी सोप्प्या सोप्प्या भाषेत बायकांना बँकिंग समजावून द्या.” असे सांगितले, मग तसेच लिहिले. आठवड्याला एक लेख अशी सकाळ मधुरा पुरवणीत पहिली लेखमाला – ओळख बँकिंगची सुरु झाली.

“अभ्यास, मुलं आणि पालक” या बद्दल आणखीन एक गोष्ट सांगते. श्री.विजय धर्माधिकारी तेंव्हा मुंबईला सिंडीकेट बँकेच्या कांदिवली शाखेत होते. त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये कुलकर्णी नावाच्या बाई होत्या. त्यांचा मुलगा दहावीला आणि टेन्शन आईला. त्याने त्या सारखी त्याची काळजी करायच्या, बडबड करायच्या. दर शनिवार रविवार बाबा पुण्याला यायचे. घेऊन गेले एक अंक त्यांना दाखविण्यासाठी. दिला वाचायला. वाचला लेख त्यांनी, तरीही त्या म्हणाल्याच,
“ तुमच्या मुली आहेत हो हुशार. पण हा.”

पंधरा एक दिवसांनी कुलकर्णी बाईंच्या मुलाच्या क्लासमध्ये रविवारी सकाळी पालकांची सभा घेतली. तिथे सगळ्यांना सांगण्यात आले, कि ‘क्लासच्या चारी कोपऱ्यात जे लेख लावलेले आहेत, ते वाचून मगच जा.’ कुलकर्णी बाईंनी आत गेल्यागेल्या माझा लेख भिंतीवर बघितला होता. त्यांनी परत वाचला. पण नेमका रविवार आणि बाबा पुण्याला. घरचा फोन काही त्यांचेकडे नव्हता. सोमवारी बाबा गेले बँकेत. तर कुलकर्णी बाईंनी वृत्तांत सांगितला. आणि, बाबांनी घरी फोन केला, मीही बोलले कुलकर्णी बाईंशी. बरं वाटलं. माझा पहिला लेख असा गाजला. आणि मी सकाळ पेपर मध्ये लिहायला लागले..... आणि आत्ता, या निमित्ताने तुम्हाला सांगितले....बास. इतकेच!

वंदना धर्माधिकारी





Wednesday, April 10, 2002

57. Poem - देव आणि दैव


कविता :: देव आणि दैव
कवयित्री  ::  सौ. वंदना विजय धर्माधिकारी



देव दैवात वाद जाहला कुणी जायचे पुढे
एकमात्रा अधिक म्हणोनी दैव ठाकले पुढे
एक मात्रा स्वीकारुनिया देव पाठीशी खडे
राहिले देव पाठीशी खडे

प्रत्येकाचे दैव वेगळे
कुणीकुणाचे कधी न जाणले
गतजन्मीचा ठेवा म्हणोनी
या जन्मी उघडे
राहिले देव पाठीशी खडे

दैवाला ना पराम्मुखता परांड़्मुखता
प्रारब्धाची असे विविधता
भोग भोगणे या जन्मातच
सटवीने पुजिले
राहिले देव पाठीशी खड़े

मंदिरातले सगुण ईश्वर
साठवले ते रूप मनोहर
आर्त होउनी आळवती  स्वर
अणुरेणुत तो दडे
राहिले देव पाठीशी खड़े

कुणी न पाहिले भगवंताला
परी मनोमनी तोची पुजिला
अपयशाचे खापर आम्ही
दैवावरी फोडले
राहिले देव पाठीशी खड़े

पुर्नजन्मीच्या दैवासाठी
या दैवापुढे हात टेकती
देवापुढती हात जोडुनी
घालती त्या साकडे
राहिले देव पाठीशी खड़े

मात्रा असुनी  न चले मात्रा
त्यांच्यापुढती मानव भित्रा
इलाज नसता या नियतीला
स्विकारती बापुडे
राहिले देव पाठीशी खड़े

दैवाचे साहूनी तडाखे
देवापुढती माथा टेके
देव नि दैवासवे अडकले
मनु मधे सापडे
राहिले दैवापाठी देव खड़े


वंदना धर्माधिकारी

Saturday, December 15, 2001

2. Before and after VRS

15-12-2001

व्हीआरएस घेऊन एक वर्ष झाले, आणि कसे सरले समजलेच नाही. तरीपण वर्षापूर्वी आणि वर्षभर काय व कसे

ते लेखणीने बरोबर पकडले शब्दात. तेच हे असे.....

व्हीआरएस पूर्वी आणि व्हीआरएस नंतर.

व्हीआरएस घेऊन एक वर्ष झाले, आणि कसे सरले समजलेच नाही. इतके सलग महिने घरात बसायची सवय नव्हतीच. आणि जरी सहा सहा महिने राजा घेऊन घरी बसले तरी बँकेत एक दिवस जायचे हे निश्चित होते, आणि गेले देखील. इथे तसे नाहीच, बँक आणि बँकिंग संपलेले. नव्याने आयुष्याला कलाटणी द्यायची म्हंटल तर करायचं तरी काय? तसा मला फारसा प्रश्न आला नाही. मी आणि मुलीच पुण्यात होतोत तेंव्हा. बाबा उत्तर प्रदेशात मिरेठला होते. मुलींची महत्वाची वर्षे होती. अभ्यास होता, धावपळ होती. त्यांना आई घरी आहे यात आनंद होता. तसा मलाही त्यांच्या बरोबर प्रत्येक दिवस घालवताना खूप छान वाटतं होते.
नोकरी करणाऱ्या बाईच्या मनाला खंत असते, “ मुलं लहान असताना नाही मला वेळ देता आला. आणि मी कुठेतरी कमी पडले, त्यांना वाढविताना, संस्कार करताना, अभ्यास घेताना. अगदी प्रत्येकीला असे वाटते. कधी कधी भितीही वाटते, ती अशी की - मुलं मोठी झाली आणि दूर गेली. मोठी मुलं बाहेरचं अधिक असतात, त्यांना आई फारशी नसली तरी चालते. पण, मी तरी काय करणार. नोकरी जी करते.” ही खंत मलाही होती, अजूनही आहे म्हंटल तरी चालेल. एखादी गोष्ट त्यात्या वयात मुलांना द्यायला नाही जमलं ते आईला जाणवते. बोलता येत नाहीत या गोष्टी हेच खरं. असो....
तर, एक वर्ष झाले व्हीआरएस घेऊन आणि गंमतशीर कविता केली. आधल्या वर्षी मी काय करीत होते, आणि आत्ता काय करते.

वंदना धर्माधिकारी 





Camera is a responsive/adaptive slideshow. Try to resize the browser window
It uses a light version of jQuery mobile, navigate the slides by swiping with your fingers
It's completely free (even though a donation is appreciated)
Camera slideshow provides many options to customize your project as more as possible

Here is a video for National Webinar on IBPS Exam. Guidance by Smt.Vandana Dharmadhikari on 17th July, 2020 

vandanadharmadhikari.blogspot.com