सौ.वंदना विजय धर्माधिकारी
दैनिक देशोन्नती : लेखमाला
अर्थसंस्कार
लेखांक १०० : “अर्थसंस्कार शताब्दी -१००”
दैनिक देशोन्नती मधील पान ४ वरील अर्थसंस्कार
लेखमालेतील लेखांची.” आज शंभरी होत आहे. लेखाची शंभरी
काही विशेष साजरी करायची नाही. शंभर नंबरवर काहीतरी किमान पाच शंभर शब्दात मांडते
असेच काहीतरी.
जून,२०१७ पासून
दर शुक्रवारी अर्थसंस्कार मालिकेत बँकिंग विषयाची माहिती देत होते. १०० लेख झालेत,
पुढे लिहावे का थांबावे विचारात आहे. बँकिंग विषय एक सागर आहे, लिहावे तितके नवीन
मिळत राहते. लेखमालेस उत्तम प्रतिसाद मिळाला. धन्यवाद!
लहानपणी जोरजोरात पाढे म्हणताना “दहावर शून्य शंभर!!” सर्व
ताकदीनिशी मोठ्यांदा ओरडायचे असते. पुढे जोरात ओरडायचे,“माझा पहिला नंबर.” असेच
दंगामस्ती करताकरता हळूहळू समजायला लागतं की किती जरी काहीही छान चांगले केले तरी
आपल्यापुढे त्याहीपेक्षा भरीव आखीव रेखीव कामे करणारे अनेक आहेत. तसे करणे इतर
कोणालाही करायला जमणारे नसते. थोरामोठ्यांप्रती प्रचंड आदर मनात गोळा होतो. आदर्श
समोर ठेवून मार्गक्रमणा करताना समाजातील ज्येष्ठश्रेष्ठ व्यक्तीच्या कार्याने
अनेकवाटा दाखवलेल्या असतात. दिग्गज व्यक्तिमत्व समाजाला आधारस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन
करीत असते. मोठमोठ्या लोकांची चारीत्रे,
अनुभव कथन याच कारणास्तव वाचायची असतात. मग, अजिबात म्हणता येत नाही की ‘माझा
पहिला नंबर!’
पहिला नंबर नसला तरी आजचा नंबर आहे शंभर. गणितातला अव्वल
आकडा १००. शंभर म्हणजे दहावर शून्य, दहाचा वर्ग, दाहीदाही शंभर, सम, नैसर्गिक
प्रमुख-प्राईम नंबर. शंभर- शेकडा-शे-शत-शतक-हंड्रेड.
२०१९ वर्ष गदिमा, बाबूजी आणि पुलं त्रयींचे जन्मशताब्दी
वर्ष आहे, याची जाणीव मराठी मनाला आहेच आहे. शंभर आकडा अतीव महत्वाचा आहे.
“शतायुषी भव!” असा मोलाचा आशीर्वाद दिला जातो. परीक्षा असते शंभर मार्कांची. मग ती
कुठलीही असो शाळा कॉलेजमधील नाहीतर आयुष्यातील चढउतारांची गोळाबेरीज करणारी. यश
टक्क्यात मोजलं जाते. टक्केवारी म्हणजे १०० पैकी किती गुण मिळाले ते. एखाद्याने
खूप छान मोठे काम केले तर सहज शब्द उमटतात, “अगदी शंभर नंबरी काम केलेत आपण.”
‘शंभर नंबरी सोन्याची’ असे एखाद्याचेच कौतुक होते. अर्थ निघतो व्यक्ती शुद्ध सोन्याची
झळाळी ल्यालेली गुणसंपन्न आहे. फार थोड्यांनाच असे कौतुक मिळते, अगदी शंभरात एखाद्याच्याच
वाट्याला येते. नाहीतर असतेच शंभरी टोमण्यांची वा शिव्यांची. आता हेच बघा. करू नये
असा गुन्हा केलेल्याला शिक्षा ठोठावली जाते, “काही खरं नाही त्याचं. भरली शंभरी आता.” अगदी लहान मुलांना
अभ्यासावरून फराळ दिला जातो, “शंभरवेळा समजावून दिल्यावर देखील कसे डोक्यात शिरत
नाही तुझ्या? माठ्या?” भांडण, मग ते कोणाचेही असो, शंभरदा तेचतेच बोलत असतात. आहे
ना गंमत.
शंभर पैशाचा एक रुपया १९५७ मध्ये ठरवले गेले. त्याआधी १६
आण्यांचा रुपया होता. भारताचा रुपया तसेच इतर देशांचे चलन, तेही १००च्या भाषेत. उदाहरणार्थ:
१००पैसे = १रुपया : १००सेंट्स = १डॉलर : १००पेन्स = १पौंड :
१००सेंट्स = १युरो
३० नोव्हेंबर,१९१७ रोजी प्रथम एक रुपयाची नोट छापली गेली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यावर अशोक स्तंभ
प्रतिमा दिसू लागली. मध्यंतरी नोटेची छपाई बंद होती. लोकाग्रहास्तव परत २०१५ मध्ये एक रुपयाच्या नोटा छापल्या गेल्या.
३० नोव्हेंबर,२०१७ रोजी याच नोटेला शंभर वर्षे झाली आहेत.
कशाचेही मोजमाप शंभरात. जागतिक युनिट सिस्टीम मेट्रिक
पद्धतीमध्ये शंभर असते.
आपल्या बरोबर ग्रीस, इस्त्राईल, नेपाळ यांच्याहीकडे
पोलिसांचा फोन नंबर १०० आहे. शुद्ध उकळत्या पाण्याचे तपमान असते १०० डिग्री
सेल्सियस. क्रिकेट खेळात शंभरचे महत्व का सांगायला हवे? महाभारतात कौरव १०० होते. शिशुपालाचे १०० अपराध
झाल्यावर श्रीकृष्णाने भर सभेत सुदर्शन चक्राने त्याचा वध केला. असे खूप काही आहे.
अर्थसंस्कारच्या शंभरीच्या निमित्ताने मला आठवण झाली दिवाळी
अंकांच्या शताब्दी वर्षात २००८ साली मी मोठ्ठा अभ्यासपूर्ण लेख लिहिला होता. “शताब्दी
दिपिकांची.” खूप गाजला तो लेख. सहज आठवलं इतकेच.
‘अर्थसंस्कार’ शंभरीत पूर्ण भरला जाणारा नाहीच. पुढेपुढे जाणारच
आहे. कितीतरी अजून लिहायचे आहे. तरीपण, आजच्या शंभरीच्या निमित्ताने
देशोन्नती संपादक, त्यांची सर्व टीम, मोठ्या प्रमाणात लाभलेला अर्थसंस्कारचा
वाचकवर्ग या सर्वांना खूपखूप मन:पूर्वक धन्यवाद देते. आर्थिकविषयक माहिती घेण्यासाठी पुन्हा भेटू यात.
वंदना धर्माधिकारी
M : 9890623915