महिला दिन विशेष अतिथी - एन के जी एस बी बैंक, कोथरुड शाखा.
दैनिक देशोन्नती : लेखमाला अर्थसंस्कार : लेखांक ९० : कर्तव्य अणि हक्कांची सांगड :
शुक्रवार ८ मार्च, २०१९.
एनकेजीएसबी बैंक मॅनेजर सोबत
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पद्मश्री : महिला दिन कार्यक्रम : एम् कॉम विद्यार्थ्यांना लेक्चर :
विषय : महिलांसाठी शासकीय योजना : उल्लेखनीय : एमएसएमई सपोर्ट
पुणे विद्यापीठात लेक्चर देताना : ८ मार्च,२०१९
अगं सखे,
आपला मानाचा कौतुकाचा महिला दिन करू यात आपण साजरा.
एखादा दिवस ठेवून दे तू स्वत:साठी. मैत्रिणींच्या घोळक्यात खिदळण्यासाठी, हसता
हसता फुलण्यासाठी. तुझा जन्म फुलण्यासाठी आहे, हे तू विसरलीस की काय? खरं आहे ते,
कामाच्या जबाबदाऱ्याच्या ओझ्याखाली तू स्वत:कडे बघतेस कोठे? नाही ना जमतं तुला ते?
असं म्हणून कसं चालेल. अगं, तू खूष आनंदी तर तुझं सगळं घर हसेल, नटेल, मजेत राहील.
आणि तू जर नाराज तर सांग मला घरात काय होतं. भांड्याला भांड लागतं हे मलाही माहित
आहे, पण म्हणून नेहमीच का त्या भांड्यांना भांडू द्यायचं. त्यावर तोडगा काढायची
हिम्मत आहे तुझ्यात, ताकद नुसती कष्टाने मनगटात नसते, खंबीर व्हायला आजचा दिवस
तुझ्यासाठी आहे हे तरी विसरू नकोस.
हळूहळू तिला समज यायला लागली स्वत:च्या हक्कांची.
सगळीकडे सध्या महिला दिन दणक्यात साजरा होऊ लागला. थोडं इकडे तिकडे बघितल्यावर बदल
होताना दिसतो, समाजात महिलांना मान मिळायला लागला आहे. तिच्यातल्या माणूसपणाची ओळख
तोही ओळखू लागला, आणि नसेल त्याला त्याची जाणीव तर तीही शहाणी होऊन त्याला त्याची
जागा दाखवू लागली. त्यातं काय व कसे हेही तिला समजू लागले. बायका सुधारित आहेत,
यात समाजाला गती दिली जाते, प्रगती होते, समाजाची उंची वाढते हे आलेच आहे लक्षात
सगळ्यांच्या. असे हे स्थित्यंतर हळू हळू होणारी प्रोसेस आहे. त्याला अधिक गतिमान
केले पाहिजे. सकारात्मक विस्तार वाढवला पाहिजे. खेड्यापाड्यातली परिस्थिती
अजूनही जुनाट वळणाची असायची शक्यता धूसर होताना खूप ठिकाणी जाणवते. तेथील महिलांची
हिम्मत, ताकद आणि स्वत्व जपायची जिद्द खरोखरीच वाखाणण्याजोगी दिसते. प्रत्येक
गावाचे चित्र वेगळेपण दर्शविते. त्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच. वाईट याचेच
वाटते की याच कर्तबगार बायकांना गावात दारूबंदी करा असे फलक घेऊन रस्त्यावर यावे
लागते. अशावेळी पुरुषोत्तम देशातले कधी सुधारणार? आपलेच गुणगान कौतुक कधी थांबवणार
आणि खर्या अर्थाने माणूस कधी बनणार? यासाठी तिनेच
स्वत:ची जागा निर्माण केली पाहिजे. स्त्रीला फुकट सहज अहसा गोष्टी मिळत नाहीत,
हे इतिहास सांगतो. तिला ते सर्व मिळवावे लागते, लढा द्यावा लागतो हक्कासाठी तरच
तिला मिळते तिच्याच घरात एखादा हक्काचा कोपरा. देऊ केली जाते मानाची जागा तिच्या घरी, दारी, मनी, गाभारी.
याचसाठी बोलावते मी एकेकीला.
बायांनो, आपल्याला बदल घडवायचा
आहे. परिवर्तन दीर्घकाळाची प्रक्रिया होऊ देण्यात स्त्रियांचेच नुकसान आहे. एकेक
पिढी त्याच कामातच जर खपली तर कसे होईल? त्यासाठी महिलांनी अधिक जोमाने
स्त्रीवर्गात आत्मभिमान रुजवायचा आहे, बदल
घडवून समाजपरिवर्तन करताना डगमगायचे सोडून दिले की सगळं काही छान जुळून येते. खटकते
गं एक गोष्ट, सांगतेच, बाईचं बाईची वैरीण असते, ह्या वाक्यातही तथ्य आहेच.
त्यामधील हवा काढून टाकायची आणि महिलांनीच एकमेकींचा पाठीशी उभं रहायचे. यालाच
जोरात फिरवून गती द्यायची की मग सगळ्यांच्या
आयुष्यात चार चांद लागायला वेळ लागणार नाही.... शेवटी तुझे तुलाच सर्व करावे
लागणार आहे, कोणीही तुझ्या समोर उभे राहून तुझ्या हातावर काही ठेवणार नाही.. तर
उठ, हो पुढे आणि गोंजारून बघा स्वत्व
तुझ्यातलं. फार छान आहे ते. घे शेजारणीला बरोबर, आणि साद घाल साऱ्या सख्यांना.....
तर.... फेर धरला येशील,ओठी गाणे गाशील....
चलं गं सये, महिलादिनी खेळाया
हक्काचा सुदिन साजरा कराया
आपुल्या जीवा कौतुकाचं गाणे गाया
धरूनी हातात हात मन मोकळं कराया
एकमेकी आधाराची साथ संगती द्याया...
किती जरी सांगितले, बोलावले, समजावले
तरी तिला जे रुचेल तेच ती करेल. हे मला ठावूक आहे. माझे हे वाचतील आणि
पळतील कामाला. तरीही तिला सांगितल्या शिवाय मला राहवतं नाही हेही खरे. गदागदा
हलवून तिला समजावले की मला बरे वाटते. त्यामुळे इथे एकच शेवटचे सांगते आणि थांबते.
बाई गं, तुला आर्थिक व्यवहारांसाठी काही अडचण आली तर जिथे मिळेल तिथे, तू वाचीत
रहा, त्यात माझी लेखणीही तुला कुठेतरी भेटेल. तुला समजेल असेही मी लिहिले आहे. आणि
मी आहे ना तुला मार्गदर्शन करणारी. कधीही फोन करून बोलू शकतेस तू माझ्याशी. सांगीन
मी मला जमेल तसे. एकेक करून खूप मोठा फेर धरायचा आहे आपल्या सगळ्या बायकांना.
मध्यभागी ध्येय ठेवायचे अर्थसाक्षर होण्याचे.... तर... कोण कोण येणार फेर धरायला,
महिला दिनी गाणे गायला.
सर्व महिला भगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि मी थांबते.
वंदना धर्माधिकारी
८ मार्च, २०१९