13-10-2017
मुक्तपीठ साठी : अनुभव :
फॅमिली पेन्शन आणि मोहनमाळ
सौ.वंदना धर्माधिकारी
काही माणसे कामानिमित्त भेटतात आणि मनात ठाण मांडून बसतात.
प्रसंग जुना १९९९/२०००मधला. तेंव्हा मी बँक ऑफ इंडियाच्या देहूरोड शाखेत होते.
माझ्याकडे विविध कामांपैकी पेन्शन खाती होती.
गावातली एक व्यक्ती अडाणी लोकांना मदत करायची. एकदा
७२/७५ वयाच्या म्हातारीलाबरोबर
आणलं आणि म्हणाले, “हिला फॅमिली पेन्शन मिळाली पाहिजे. नवरा मरून ७/८ वर्ष झाली.
आलती एकदा बँकेत. काय झालं नाही पुढे. आपण सगळ्या पेन्शनर्सना
मदत करता,
अडलेले प्रोब्लेमस सोडवता. म्हणून घेऊन आलो आक्कीला.
बघा काही.” ते निघून गेले.
आक्की घाबरलेली समोर बसायला देखील तयार नाही. चारदा सांगितल्यावर
बसल्या. चहा मागवला.
“बोला बाई, कधी गेले यजमान. बोला नाहीतर काहीही होणार
नाही.” थोडा वेळ द्यावा म्हणून दुसरं काम पुढे ओढलं. थोड्यावेळाने, “माझा
दादला मेला. अन पेन्शन बंद झाली. लई वर्ष
गेली. मी कामं करून पोट
भरते. पेन्शन मला भेटलं? पोरगा
मंबईला असतो, कधीच येत नाही. पोरगी तिच्या घरी. कवातरी येत्यी. पैसे
देती. मीच आता नगं बोलत्ये. पोरीला घोर घरचा.”
“बरं. बँकेबुक आहे? कधी झालं? जुनी केस आहे. कागदपत्रे द्या
काहीतरी.”
“ नाय काही.”
“ काहीतरी असेल, शोधा. नोकरी सोडल्याचं, पगाराची स्लीप,
चिठ्ठी चपाती... तुम्ही शोधा आणि घेऊन या. मग बघू.”
तिचा नवरा तिला काहीही सांगायचा नाही. पेन्शन मिळाल्यावर
घरापुरती देऊन मस्त दारू ढोसायचा. त्यातही खाऊन
पिऊन समाधानी ती.
महिनाभराने, सापडलेला २”*२”चा पासबुकच्या पहिल्या पानावरील
बँकेचा गोल शिक्का त्यावर तारीख असलेला जीर्ण तुकडा घेऊन आक्की आल्या. ९
वर्षापूर्वी काढलेले खाते पेन्शन खाते असू शकेल. नवरा
कधी मेला सांगू शकल्या नाहीत, ड्युप्लिकेट
डेथ सर्टिफिकेट आणा तेही नाही.
‘बाई, तुम्ही
त्यांच्या लग्नाची बायको आहात का?” असाही
प्रश्न मी विचारला. वेगळ्याही केसेस होत्याचं ....
एकुणात तुकड्याशिवाय काहीकाही मिळालं
नाही. असो...
सहज तुटेलसा छोटासा चुरगळलेला तुकडा मी डायरीत
चिकटवला. तिथेच बाकी लिहिले.
अकौंट-ओपनिंग
रजिस्टर शोधणं अवघड काम होतं. अशोक
देशमुख शिपायाने एका महिन्याने मला वैतागून शोधून
दिलं. खाते नंबर समजला. तेंव्हाचं पेन्शन रजिस्टर मात्र
त्यांनी लगेचचं दिलं.
मलाही बरं वाटलं... त्यावरून पीपीओ नंबर घेतला.
आणि अलाहाबादला पत्रव्यवहार सुरु केला.
पत्रावर पत्रें, फोनं, फ्याक्स, रीमायंडर्स
... अनेक प्रकार करून त्यापुढे चारपाच महिन्यांने पेन्शन, निवृत्ती, खाते, आणि पिपिओ-पेन्शन-पेमेंट-ऑर्डरसह
सर्व माहिती आली. पिपिओनुसार हीच बायको, आणि
हिलाच फॅमिली पेन्शन मिळायला पाहिजे,
इथपर्यंत मी आले. आक्कींना बोलावलं. सांगितलं. सर्व शंका
माझ्या मी सोडवून घेतल्या. कागदपत्रे मंजुरी गोष्टी पूर्ण
केल्या. आक्कींचे खाते काढून घेतले.
एक दिवस चक्क ५५,०००.-खात्यात
जमा केले.
आक्की आल्या, काय करू पैशाचं?
तिचा प्रश्न? ती टेकली, रडली, हसली.
काम बाजूला सारून मी फक्त बघतं होते आक्कीकडे. दोघींनी परत चहा घेतला खुषीखातर. २५,०००.ची ठेवपावती केली.
“ उरलेल्यातून
किती काढायचे ते काढा.”
“ पंधरा
हजार चाललं.”
“ हं....
इतके कशाला? बाई, जपून
वापरा. पोरापोरीला वाटू नका...”बँकरचा
त्यातूनही म्हात्याऱ्यांच्या बँकरचा मोलाचा सल्ला
दिला..
माझ्याकडे बघतं बसली.
मीच म्हंटल, “काढा”....
पैसे घेऊन आक्की गेल्या.
दोनचार दिवस गेले..... बँकेत तुफानी गर्दी. पहिला आठवडा, उभं
राहायला जागा नाही. सकाळचे साधारण साडेदहा आकरा झालेले. माझे
लक्ष पूर्णत: काहीतरी कामात.
मान खाली... अचानक......आक्की आल्या. तिने मोहनमाळ माझ्या गळ्यात
घातली.... दोन्ही हात घट्ट धरले.... उभ्या उभ्या हुंदके देऊ लागली.
“ आहो
आक्का, हे काय....काढाकाढा...
काय घातलं माझ्या गळ्यात... मला नको... काढा आधी... “
माझ्या डिपार्टमेंटची क्लार्क ललिता
उठून जवळ आली, शिपाई
देशमुख आले. तीने माझे हात इतके घट्ट धरलेले,
मला सोडवता आले नाहीत. तिचा चेहरा अजूनही समोर अगदी या
क्षणाला आहे....
“ताई, या
इकडं. बघा....” तिने आणखीन दोघींना बोलावलं.
शेवटी हात सोडवून मी मोहनमाळ काढली. आक्कींचा
हात पकडला.
ठेवली हातावर.
“ ताई, तू व्हती, म्हणून
मला माझी मोहनमाळ परत दिसली. नाहीतर.....
गेलीच होती. म्हनुनशनी घेतल्या घेतल्या आधी तुझ्या गळ्यात मी
घातली मोहनमाळ......”
बासं.... इतकंच...
त्यानंतर आम्ही तिघे थोडे बोललो आणि लागलो कामाला. पुढे
त्यावर क्वचित माझी आणि ललिताची चर्चा झाली. विशेष काही केले असे आम्हाला कोणालाच
वाटले नाही. आम्ही आमचे काम केले. स्वेच्छानिवृत्तीनंतर भेटलेल्या माणसांची आठवण
काढताना आक्की यायच्याच समोर. तरी हा प्रसंग कोणाजवळ इतके वर्ष शेअर केला नाही.
काही कारणाने करावासा वाटला, म्हणून बोलले इतकंच.... बासं.....
वंदना धर्माधिकारी
M: 9890623915
इतक्या बारिक तुकड्यावरून आपण शोध घेऊन पेन्शनचे कित्येक वर्षांचे पेमेंट मिळवून दिलेत. याला हळवं मन लागत. दुसर्याच्या यातना समजून घेणे आहे.फार छान काम केलेत. धन्यवाद आणि अभिनंदन.
ReplyDelete