Saturday, October 28, 2017

50. Poem - लोपामुद्रा - क्षितिजाची कोर


माझी ‘क्षितीजाची कोर कविता लोपामुद्रा – फेसबुक पेजवर ०८-१२-२०१७ रोजी
टाकली गेली होती. लोपामुद्रा – कवयित्री, अभिनेत्री स्पृहा जोशी हिचे पेज आहे.
कवयित्री – सौ.वंदना विजय धर्माधिकारी

क्षितीजाची कोर

दिसू लागे पैलतीर
जरी अंधूक नजर
मन होई ना  तयार
जाया क्षितीजाच्या पार

सांग आधी कोण जाई
उगा मागेपुढे होई
माझी श्रीमंत पुण्याई 
पुढे जाया मज घाई

दोन जीव एक मन 
एका क्षणी उडो प्राण
नभ धरेचे मिलन
क्षितीजाची कोर छान

नको आडवू उगाचं
दोघं संगच जायाचं
आहे स्वर्गीय दाराची 
कडी क्षितीज रेघेची 

रेघ भिडे धरित्रीला
त्याने निरोप धाडीला
मावळती मुहूर्ताला
दोघं निघू प्रवासाला

सोड आता भुईतण
भांडीकुंडी  अंथरूण
बघ नभीचं तोरण
क्षितीजाचं ते आंगण

त्या अंगणी खेळाया
चंद्र चांदण्यांचा मेळा
हात हातामंदी  घ्याया
तुझं गाणे  गोड गळा

सुर घुमेल नभात
मोती जमले डोळ्यात
हास गडे तू खुशीत
नातं आहे  जन्मजात

वंदना धर्माधिकारी.......२४ ऑक्टोबर, 2017


Sunday, October 22, 2017

70. Story - Deshonnti - टिंब टिंब गावचा सुभान्या



“चंदू... ये चंदू... बाहेर ये.” पलाडल्या आळीतला सुभान्या धावत धावत आला. चंदू कायम बाहेर भेटायचा त्याला. पण आज तो नसलं भेटला, म्हणून निरोप द्यायला स्वारी आली चंदुला शोधीत  घरी. सुभान्या कामधंदा नसलेला स्वत:ला टिंबटिंब गावचा दादा समजणारा पारावरचा मवाली गुंड आहे.  त्याचे उद्योगही तसेच रिकामपणाचे धंदे.     

“काय काम आहे? चंदूचे वडील माधवराव जरा तीरास्कारानेच बोलले. आता पोराच्या बापाचा विचारायचा सूर ओळखून  तरुण मुलाने गप गुमान चालू लागायला हवं आल्या वाटेन. इथं सुभान्या, वर तोंड करून म्हणतो, “गेला कुठं? लई टाईम नाही ना लागणार? म्हंजे कसं तालुक्याहून दादांचा फोन आलाय. अनं त्यांना २५ पोरं पाहिजेत. गाडी येईल दोन वाजता. त्याला म्हणावं वरच्या रस्त्यावरच्या टपरीवर मी थांबतो. पाठवा त्याला.”
एका दमात सुभान्यानं सांगून टाकलं आपल्या कामाचं.

“कसलं काम म्हणतोस तू. ट्रक मधून जिल्ह्याला जायचं, झेंडा घेऊन बोंबाबोंब करीत गावभर हिंडायचं, वडापाव हादडायचा, मिरवणूक झाल्यावर सिनेमा फुकट बघायचा. शंभरदोनशे कोंबायचे खिशात. जीवाचं कौतुक करायचं अन पार रातच्या दहाच्या पुढं यायचं गावात. हेच काम हाय नव्हं तुमच्या दादाचं. काय दुसरं काम असणार म्हणा? आज तो येणार नाय. तू जा वापस.” माधवरावांनी कामाचे वर्णन केल्यावर तरी सुभान्यानं पायउतार व्हावं. पण कसचं काय, अगदी बेडर झालेला.

“काका, एक सांगू का? नाय म्हंजी, आता झेडपीची निवडणूक आली, नंतर दुसरी कुठलीतरी आली हाय. शिवाय दादा पैसे बी वाढवणार म्हणालेत. काय व्हतं थोडं चाललं, हातात झेंडा घेतला, काही बोर्ड मिरवले, अन ते  सांगतील तस्सचं ओरडलं जोरश्यान तर. नाय म्हंजी, नंद्याला बी आवडतं. रोज थोडचं असतं? आता हेच बघा दोन आठवडं झालं आमचा नंबर लागतुया. तवा, त्याला नेतो संग माझ्या” आपल्या कामाचं कवतिक करीत सुभान्या निघाला. “धाडा त्याला. मला निरोप द्यायचं हाय पोरांना.” गेला निघून. माधवरावांच्या डोळ्याला डोळा मात्र नाय लावला. अजून थोडी आशा धुगधुगी आहे वाटतं आत.

सुभान्या दोन वर्षापूर्वी बरा होता. बाप मेल्यावर शाळा केली दोन वर्ष. झाला असलं चारदा नापास. अखेरला दहावी पासचा शिक्का बसला. अन, उधळला रेडा. आईला थोडीच दाद देतं असलं पोरं. चांगलच उंडारलं. तालुक्यातली टवाळ पोरं म्हणे याचे दोस्त. त्यांच्या सारखं बनायचं ही जिद्द. तालुक्याचा दादामन्या त्याचा आदर्श. दादागिरी टिंबटिंबच्या पोरांवर करायची. दिवसभर पारावर चारपाच टाळकी राजकारणावर बोलत्यात. एकदा राजकारणी मेसेज असला व्हाटसअॅपवर की धाडला पुढं. जणू याचंच लिखाण. तोंडांत गुटका तंबाखू असतेच. मधून मधुन पार्ट्या आल्याच की हो.

माधवराव अस्वस्थ झाले. सगळं आयुष्य या गावात गेलेलं, पण अशी वेळ नव्हती कधी आली. एक सच्चा गावकरी होते ते. माधवराव विचारात पडले.....
‘गावातली पोरं बिघडायला लागलीत, वेळीच काहीतरी करायला हवं. आपण गप बसून काय होणार नाय. नंदूला तर मी आज धाडणारच नाही. मला वाटतं त्याला हे आवडत नसलं. पण काय सांगा. तरुण रक्त कधी कुठे धावेल ते. आज आत्ताच मी हे थांबवणार आहे. कसा सुंदर गाव माझं, आमची पिढी किती कष्टाने पुढे आली. शेती, शाळा, रस्ते समदं सुधारली. अन, या चारपाच वर्षात तरुण पोरं बिघडली. नव्हं मुद्दाम बिघडवली. भडकवून देतात पोरांना, हातात  टिकल्या टेकवल्या म्हंजी झालं. पोरं सुटली झेंडा घेऊन बोंबलायला. त्यांच्या बापाचं काय जातं. पोरं ना शेतात काम करीत, ना आईबापाला मदत, ना गावासाठी काही चांगल. कमवायचं ते बी जातं बिडी काडी गुटका अन दारूला. आम्ही बी प्यायली दारू. पण घर गाव समाज नाही नासवला. ही धेंड आत्ताच लागले गावाचं दिवाळं काढाया, अन आयाबहिणी नासवाया. वेळीच ठेचलं तर ठीक, नाहीतर काय खरं नाय गावाचं.”

आज माधवराव एकटेच घरात होते. मुलं आणि बायको गेले होते मामाकडे पूजेला. मामाने दुकान टाकलं नवीन, त्याची वास्तुशांत होती. उद्या येणार समदे घरी. तवा आजचा दिवस माझ्या गावाला देतो. असं म्हणून अंगणातली माती त्यांनी कपाळी लावली. डोळं मिटून मातीला वंदन केलं. भरून आलं मन, अन पाणावले डोळे. इतकं प्रेम केलं होतं या गावावर, इथल्या लोकांवर, या जमिनीवर. शर्टाच्या खिशात माती कोंबली, धोतराला हात पुसले, अन आले घरात.  कडक चहा करून घेतला आणि फोनजवळ बसले. गावात त्यांना मान होता. अतिशय सुंदर शेती करीत होते. कोणाला काही प्रश्न पडला तर लोकं विचारायचे माधवरावांना. अतिशय शांततेने समस्या जाणून घ्यायचे, त्यांच्या शेतावर जाऊन पिक बघायचे आणि काय हवंनको ते सुचवायचे. त्यावर अभ्यास करायचे. चार तज्ञ लोकांशी चर्चा करायचे फोनवर. गावकऱ्यांना सांभाळायचं काम सुंदर करतात. आत्ता, गाव राखण करण्यासाठी गावची माती ठेवली खिशात.

वेळ झाली दुपारच्या जेवणाची, पण माधवरावांची भूकच मेली. एकटेपणात ‘चार घास खावून घ्या,’ म्हणणार आज कोणी घरात नव्हतं. फोन लावला तुकाराम लाटेला, त्याचा पोरगा याच वयाचा. बघू तर काय म्हणतो. तुक्या पक्का आहे वागायला. बरोबर करील सुभान्याला.

“तुकाराम, मी बोलतोय. अरे, महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. म्हणजे माझं नाय, तर आपल्या गावाचं.”

“गावाचं. काय झालं. बोल बिगीबिगी. गावात काही झालं की काय? बोल बाबा? गावासाठी काय बी.”
तुकाराम घाईघाईने बोलला.

“अरे तो सुभान्या, गावच्या समद्या पोरांना घेऊन बोंबा ठोकायला नेतो ट्रक मधून. भडकवून देतो पोरांना, अन चार टिकल्या टेकवतो. पोरं बिघडायला लागलीत असं स्पष्ट मत आहे माझं. थांबलं पाहिजे सुभ्यान्याच हे असलं
पोरांना फूस लावणं, भडकावणं, ते वरच्या पट्टीत बोलणं.” माधवरावांनी सुतवाच केलं.

“अगदी माझ्या मनातलं बोललास. माझा वश्या आत्ताच म्हणाला जेवताना, ‘मी जातो तालुक्याला दोनच्याला.’ मी इचारलं.’ कशा पायी जायचं?  मी बियाणे आणाया सांगितल तवा नाय गेला, अन आज सुभान्या म्हनतो तर चालला ढुंगणाला पाय लावीत. तवा गप्प बसला. हे बघ, आता एक वाजला हाय. दोन वाजता ट्रक येईल. आपण आपल्या पोरांना नाय धाडायचं. जायचं असलं तर सुभान्या जाईल एकटा. चलं, ये तू माझ्याकं. जेवलास नव्हं?”

“हां. आलो मी. येतो. जेवलो नाय. पण इच्छाच नाही खायची.” माधवने खरं सांगितलं.

“अरे देवा! काय रं झालं. जेवणावर राग नाही काढतं कोणी. चल, ये माझ्या घराला. खावून घे.
येतोस नवं. मी वाट बघतू या. ये, चल निघ. दोनला जायचं आहे.” जिवाभावाच्या मित्राला काळजी वाटणारचं.
आणि माधव तुकारामाकडे गेला. जाता जाता आणखीन दोन जणांना निरोप देऊन गेला. सगळ्यांनी तुकारामाकडे जमायचं आहे. तुक्याने देखील तेच केलं. गावातल्या मोठ्या माणसांना बोलाविलं. अचानक आलेला बुलावा म्हंजी नक्कीच काहीतरी महत्वाचं असणार. त्यामुळे जो तो आपलं उठला आणि आला तुक्याच्या ओसरीला.

“अरं, असं न जेवता का बसला बा? अन वाहिनी कुठ माहेर गेली का? चल जेवून घे.” आल्या आल्या माधवला तुक्याने अगदी प्रेमाने विचारलं. गावातलं हे प्रेम असेच राहिलं पाहिजे याच साठी आज सगळे इथे जमणार  होते.

“तुक्या, आपलं गाव खराब होऊ द्यायचं नाय. त्यासाठी आपण काय बी करायचं बघ. टिंबटिंब गाव चांगलं हाय, ते तसचं चागलं ठेवायचं या पुढच्या पिढीने सुद्धा. सुभान्याला समजावू आधी. बापाविना पोर आहे. बिथरलं असलं तर येईल नीट रस्त्यावर. नाहीतर, त्याचं नशीब अन तो. पण आपल्या पोरांना असं उचकवलेल  चालणार नाही.” निश्चयी आवाजात माधवने तुकारामला सांगितलं.

“अरं, हो हो. करू बंदोबस्त. करू सरळ त्याला. बारसं जेवलोत आपण सुभान्याचं. जेवून घे.  चल. आता येतील बघ समदे.” माधव तुकारामाकडे मोकळा झाला. जेवण होत नाही तो आलेच सगळे.

सगळ्यांनाच हा विषय त्रासदायक झालेला. मुलं ऐकत नव्हती. “त्याला एकटा सुभान्या जबाबदार नाही, आपली पोरं बी बिघडली हायत. समदं मिळालं ना त्यास्नी म्हणून नाय किंमत कशाची. असं जुंपल पाहिजे कामाला. ऐकतच नाय. अन, किती सांगायचं.” वैतागून पांडोबा बोलला.

“हे बघा, आपण जर दादामन्याच्या विरोधात गेलो तर काय होईल? मला नाय वाटतं तो आता निवडून येईल. अन कोणी का येईना. असं खोटं बोलून, पैसे चारून का देशाची सेवा करता येते? यांना देशाचं काहीच पडलं नाही. आता वाटणार आणि नंतर उकळणार. नंबर एक हरामी आहे.” सखाराम म्हणाला

“पण मग करायचं काय? नाय आपल्या पोरांना धाडायचं? ठरलं एकमतानं?” हे तर खरं ना. तुक्या बोलला.

“हां.... हां... ठरलं. नाय धाडायचं आपल्या पोरांना पैसे घेऊन बोंबलायला.” एकच आवाज उठला.

“असं करू या म्हणतो म्या. आपण जायचं का ट्रकने जिल्ह्याला? काय कसं तुक्या? आम्ही येतो म्हणून सांगू त्या सुभान्याला. बघू काय म्हणतो. नाहीतर जाऊ दे एकलाच. जे व्हईल ते व्हईल. आपल्याला काय?” गणप्याने चांगली युक्ती काढली.

अन समदे गावकरी दोन वाजता जमले वरच्या रस्त्याच्या टपरी जवळ. सुभान्या तिथंच व्हता. त्यास्नी समजणां पोरं आली नाहीत, त्यांचे बापे का आले? पण, लगेच नको इचारायला. अजून ट्रक नाय  आला. बघू काय म्हणत्यात ते. तसं कोणीच काही बोललं नाही. तसंच ठरलं व्हतं. अन आला ट्रक धूळ उडवीत. सुभान्या अन त्याचा एकुलता एक मित्र महादू दोघेच होते जाणारे.

“इचार की त्यांना. पोरं कुठे हायत? निरोप दिला ना समद्यास्नी? मग, आली का नाहीत?” महाद्यानं विषय काढलाच सुभान्याजवळ. तर तो गप्पच. काहीच बोलेना. काय करावं समजेना. लोकं नुसती उभी होती. एक ना दोन. कोणीच कोणाशी बोलतं नव्हतं.

ट्रक ड्रायव्हर आवाज देत होता, “ये चला लवकर. किती वेळ झाला मला येऊनश्यानी.” त्यालाही काहीतरी वेगळं जाणवत होतं.

सुभान्याला समजेना, ‘एकट्यानं जावं की नको. गावच्या विरोधात गेलं तर काय व्हईल? नगं. काही बोलायचं नाही, आपण आपलं निघायचं. मला पाहिजे ते मी करीन. नसतील तुमची पोरं तर नसं न का?’ अन सुभान्या ट्रकमधी चढला.

त्यामागं महाद्या जायला लागला, तसा तुक्यानं आडवला. “महाद्या, कशापायी जातोस तू? कोणी बी जाणार नाही गावातून. तू नको जाऊस. तुझा बा, संपत कुठे गेला. घरी नाय वाटतं?”  तवा, त्याला थांबव लागलं. थांबला. बावीस तेवीस वयाचं पोरगं समद्या थोरल्या गावकार्यांपुढे काय बोलणार? गप गुमान घरला गेलं. तेबी बोललं नाही कोणाशी. मुक्यानेच आजचा सुभान्याचा डाव उधळला.

एकटा सुभान्या गेला तालुक्याला दादामन्याला भेटायला. एक चकार शब्द नाही निघाला तोंडातून. नजर मात्र टिपत होता  कोण कोण आलं, ‘कोणाचा बाप आला, कोणाचा आजा, चुलता आला, आणि ही वीसबावीस माणस एका तासात गोळा झाली. ठरवून केलं हे काम. पोरांना आडविलं, आपल्या इरोधात. हं. काहीतरी नक्की हाय.’
“बघू, उद्या भेटतील पोरं तवा समजलं काय झालं ते. आपण आपले शिलेदार. चला म्होरं.” मनाशीच बडबड करीत बसला ट्रकमध्ये.

दोन वाजताचा शो तर चांगला झाला. तिथून समदे आले परत तुकारामाच्या घरी. बसले तासभर, गप्पा झाल्या, काय करायचं, आपापल्या पोरांना नीट समजवायचं, सुभान्याला समज द्यायची, पोरांना शेताच्या कामाला खेचायचं. असेच बरेच काही झालं. दुपार गप्पांमध्ये रमली. अन रखमाने केलेला चहा घेऊन जो तो गेला आपापल्या घराला.

विशेष काही घडले नाही. दुसरा दिवस आला तसा गेला. तीसराही उजाडला. हे रहाटगाडग थोडचं थांबतं कोणासाठी? सुरूच कायमचं. तिसऱ्या दिवशी सांजशाला सुभान्याच्या आईनं महाद्याला बोलावलं. अन तेंव्हा तिला कळलं की सुभान्या एकटा तालुक्याला गेलाय.

जाताना सांगितलं होतं, “जातोय तालुक्याला.” बासं. फक्त दोन शब्द.

“मावशे, गावाच्या लोकांना सुभान्याच वागणं नाय पसंत असं दिसतंय. सुटतात थोडे पैसे. नाय असं नाय. कुठतरी काहीतरी चुकतंया असं मला बी वाटतं कधीमंदी. जाऊ द्या, समदे जातात, तर चला संग. जरा बाहेर जाया मिळतं ना. तुला काय बोलून गेला सुभान्या. कवा येणार काय सांगितलं का तुस्नी?” महाद्याला सुभान्याची थोडी काळजी वाटू लागली. दोन दिवस झाले, का नसलं आला? काय झालं असलं? समजना.’

तोही दिवस असाच गेला. अन तिसऱ्या दिवशी सकाळी सकाळी, पेपरमध्ये वसंताने वाचंल, “मारहाण झाली, आणि सुभान्याला दवाखान्यात ठेवलं आहे.” वाचता वाचता उठला तसा तुकारामाने विचारलं, “काय रे, असं बावचळलास का? काय आलंय पेपरात छापून?”

“सुभान्याला मारलं अन इस्पितळात ठेवलं हाय.” वश्यानं थोडक्यात सांगितलं. तुकाराम उठला. घरातच इकडून तिकडे दोन चार चकरा मारल्या अन फोन केला माधवला.

“आजचा पेपर पहिला का? काय बातमी आली बघ.” स्वर काळजीचा होता हे माधवने लगेच ओळखलं.

“नाही रे... तू सांग ना काय झालं ते. बोल. काय बी असू देत.” माधवला देखील काळजी वाटली.

“सुभान्याला मारलं अन ठेवलं आहे इस्पितळात. आपण काय करू यात?” काहीतरी केले पाहिजे असे तर तुकारामला वाटले. बापाविना पोर आहे. आईचं ऐकतं नाही.

“करतो तुला फोन. थांब वाईस.” काय करावं? त्याला धडा तर शिकवायचा आणि मदत करून वाचावयचं  देखील. त्याला बघायला जायचं की नाही असा विचार मनात आला. पण नको जायला हेच निश्चित केले.

तुकारामाला घरी बोलाविलं, तसंच गंणप्याला घेऊन यायला सांगितलं. माधवरावांच्या घरी तीनचार जमा झाले. ते परवा होतेच टपरीजवळ ट्रक आला तेंव्हा. काही बातचीत झाली. अन शेवटी शेतावर काम करणाऱ्या सखुबाईंकडून निरोप दिला सुभान्याच्या आईला. थोडावेळ येऊन जा घरी. अन, सुभान्याला सांगू नका कुठे गेला ते. निरोप पोचताच आई – मालती आली माधवरावांचे घरी. माधवची पत्नी सुरेखा आली बाहेर तिच्या जवळ बसली.

“ये मालती, बसं. किती लागलं सुभान्याला? कशी आहे तब्येत?” सुरेखाने आपलेपणाने चौकशी केली.

“समजलं नवं समद्यास्नी. सकाळीच इस्पितळातली गाडी आली. सुभान्याला सोडलं आणि फिरली. काय सांगू, पण गावभर झालं काय ते.” मालतीने सुरवात केली.

“डाव्या हाताला काठी बसली. कोपराच्या पुढे बांधून ठेवलाय कडक करून. तसंच डाव्या पायाला पण घोट्याच्या तिथं हाय. दोन्हीकडे चांगलचं लागलं हाय. हाडाला लागलं, म्हणून पल्यास्तर घातलंया.  मारलं त्या दादामन्याच्या माणसांनी. लई गुंड आहेत ते. अन हे- माझं. ऐकलं तर शपथ.” मालतीचा गळा भरून आला.

“हो गं, खरं आहे गं. नाही ऐकतं तुझं तो. बघू काय करायचं ते. पण तुझी साथ हवी आम्हाला. देशील ना? ... अं....नाही देच. सुधारू त्यालाही.” समजावणीच्या सुरात सुरेखा सांगू लागली.

“माझं अजिबात बी ऐकत नाही. कायम बाहेर बाहेर, एक काम घरातलं करीत नाही. गावातून येताना दुकानातून गुळमीठ आण म्हंटलं तर ते बी नाय आणतं. शेतावर फिरकत नाही, काय लागतं, कुठून आणायचं, समद मीच बघते. आता, या पोरानं नको का लक्ष घालाया? कोण बघणार? गौरी माझी तालुक्याला. तिला तिचंच थोडं होतं, अन लांबून का शेतात लक्ष घालता येत?  हा जातो तालुक्याला पण बहिणीकडे जात नाही, तिला कधी विचारीत नाही. खायला काळ अन भुईला भार. नसता आला घराला आत्ता, तरी चाललं असतं मला. आता कोणी करायचं याचं.” मालती बरंच बोलली, जणू थकली. पदर लागलाच डोळ्याला..

सुरेखानं चहा पोहे दिले पुढ्यात, सगळ्यांनी घेतले. माधवरावांना वाटलं आता पुढचं मी बघावं. म्हणाले, “हे बघा मालतीबाई, गावातल्या कोणालाही सुभान्याच वागणं पसंद नाही. पोरांना ट्रकमध्ये कोंबून न्यायचं, दोनचारशे कमविण्यासाठी घसा फोडून ओरडायचं. बरं तेही करायला हरकत नाही, परंतु हे सगळं त्या गुंड मवाली दादामन्यासाठी? त्याला काय करायचं ते त्याने करावे. गावातल्या मुलांना न्यायच्या भानगडीत त्याने पडायचं नाही. हे माझं सांगणे आहे. ते त्याला ऐकावंच लागेल.”

“कितीदा सांगितलं त्याला म्या. ऐकतच नाही. मलाच म्हन्तू. तुला काय बी समजत नाही. आला मोठा निवडणूक लढविणारा. लोकांना समदं कळतं. पण त्याला नाय वाटतं. दहावी कसा झाला हे समद्याला ठावूक हाय. लहान नाही, चांगला घोडा हाय. दादा, तुम्ही म्हणाल तसं करू यात. तुमच्या शब्दाबाहेर मी जाणार नाय. बघू एक प्रयत्न. जमलं, सुधारलं तर ठीक. नाहीतर हाय माझ्या नशिबी वनवास.” मालतीने मनातलं सांगितलं.

“गावातलं कोणीही त्याला भेटायला बघायला येणार नाही. इतकेच काय, तर त्याला मोबाईल करून चौकशी देखील करणार नाही. तुम्ही काय ते सांगायचं. तब्येत बिघडली तर बघता येईल. हातापायाला प्लास्टर तीन आठवडे असणार. त्याला त्याच्या स्वत:शीच विचार करू देत. तुम्ही त्याला सांभाळा. कधी रागवा, कधी काय चुकते ते सांगा, कधी कसे सुधारायचे ते बोला. त्याला वाटलं पाहिजे गाव आपल्या विरोधात गेलं आहे. कोणीही साधी चौकशी पण केली नाही. शिवाय, मुलं नेली नाहीत म्हणून मार खावा लागला, याचा अर्थ दादामन्या व त्याची माणसे कशी आहेत, हे सांगा. पुन्हा त्या वाटेला जायचं नाही.  शेतात काय आणि कसं करायला गरजेचे हाय, त्यानेच बघाया हवं, दुसरं कोण बघणार? तुम्हाला होतं नाही. किती आणि काय काय बघणार एकटी बाई....असं सगळं सारखं त्याला सांगत रहा. काय बोलतो, चूक समजली का, चांगल वागणार की नाही. असे सगळं आम्हाला कळवीत रहा. आता तीन आठवडे तो फार फिरणार नाही. त्याचा आपण फायदा घेऊ. शेवटी त्याला समजलं पाहिजे आणि त्याने गुंडगिरीचे धंदे बंद करून चांगलं वागलं पाहिजे.”

“चाललं. कोणी बी येऊ नका घराला. त्याला सांगितलं हाय की चालायचं नाही. घरातल्या घरात चाललं थोडं थोडं. ते बी थोड्या दिसांनी. बाहेर जायाचं नाही. कळेल त्याला. अन मी असचं बोलतं राहीन. नीट वागायला काय व्हतं ते. अन मग ठरवू पुढचं पुढं. मी बी अजून कुणाला सांगाया गेले नाय. हे असं फाटकं काय सांगा लोकांना, आपलच खोट निघालं.” इतकं बोलून मालती निघाया लागली.

“चालेल, तर असं करूयात. नंतर बघू त्याला कसं वठणीवर आणायचं ते. मी बघतो सारं. कोणीही तुमच्या घरी येणार नाही. त्याला कुठे जाऊ देऊ नका. बसल्या बसल्या विचार करू देत. सुधरेल पोरगं. बाप लई चांगला व्हता. करू पोराला बी त्याच्या बापाच्या वळणावर. ठीक आहे. तुम्ही इकडे येत रहा, पण लोकांना फारसं कळून देऊ नका. पटतय ना तुम्हाला. मग झालं. या चालेल. सुरेखा, या निघाल्या गं. बघ.” चहाच्या कपबश्या घेऊन आत गेलेली सुरेखा आली बाहेर आणि मालती घरी गेली.

दोनचार दिवस झाले अन मालती आली. “ये मालती, बसं. कशी आहेस? ठीक आहे सुभान्या?” सुरेखाने चौकशी केली. मालती सुरवातीला काहीच बोलली नाही.

“मालती, हे बघं. तुला बोलावं लागेल. सगळा गाव तुझ्या बरोबर आहे. सांग. काढू काहीतरी मार्ग.” जिवाभावाच्या मैत्रिणी सारखं सुरेखाने सांगितलं.

“ताई, सुभान्या नुसता पडून हाय. काय बी बोलतं नाय. मी चारदा इचारते. गप्प गुमान हाय. पुस्तक दिलं वाचाया. तर कसंच काय? कधी वाचलं हाय का? टीव्ही घे म्हणाला. पैसे घालू का त्यात? हायती, पण लागतील ना कशाला तरी. हप्त्त्यावर भेटलं का?” मालतीने वेगळाच पश्न केला.

माधवराव होतेच घरात. “इतकंच ना. घे हप्त्यावर. टीव्ही बघलं बघू देत. समदे चॅनेल घ्यायचेच नाहीत. आपल्या जोशिकाकांच्या दुकानातून घे. ते देतील तुला हप्त्यावर. मी बोलतो. चौकशी करू का? लहान घे. फार मोठा नाही. त्याला सांगायचं. ‘मी टीव्ही घेते. पण हप्ता भरावा लागलं. ते जड जातं. कसं करशील?’ काढून घे त्याच्या कडून. मग, ठरवू. काय. चालेल ना.”

“अगं, तू पण बघत जा मधून मधून. बरं वाटेल. नाहीतर नुसतं काम काम काम करून वैतागली आहेस जीवाला. तेव्हढाचं विरंगुळा.” सुरेखाचं पटलं मालतीला.

मालतीने तसं पोराला सांगितलं. तर सुभान्या म्हणाला, “का? मी काय कायमचा असाच राहीन काय? करील काहीतरी अन कमवील पैसे. घेऊ या टीव्ही.”

“काहीतरी म्हंजी काय सांग की. एक सांगते, पुन्हा त्या दादामन्याचं काम नाय करायचं.”

“तू यडी की खुळी. मी कशाला जातो आता. या टिंबटिंब गावातून एकबी पोरगा जाणार नाही त्याच्या मदतीला. मीच थांबलो आता. बघीन. करीन काही तरी.” सुभान्या जाणार नाही बोंबलायला हे तर मालतीला समजलं.

दुसऱ्या दिवशी घरात टीव्ही आला. सुभान्या खूष झाला. दिवस मजेत जायला लागले. दोघं एकत्र टीव्हीवर काय काय ते शोधू लागले. एकदा मालती बाहेर गेली होती. आणि सुभान्या शोधतं होता टीव्हीवर. त्याला हिरवं गार शेतं दिसलं तिथे. चित्र पुढे पुढे सरकतं होतं तसं तसं शेतं नजरेत मावेनासे झाले. शेतकऱ्याने कष्टाने फुलवली होती सुंदर डाळिंबाची बाग. मोठ्ठाली  डाळिंब लटकलेली पाहून त्याच्याकडे पाहणीला आलेली समदी माणसं खूष होतं होता. कसं केलतं तुम्ही, कुठून आणली बियाणं, पाणी कसं दिलं, काय भाव येईल? अंदाज. अन लाखाचा आकडा ऐकता सुभान्या चकित झाला. तेव्हढ्यात जाहिरात आली. अशीच शेतीच्या बी बियाणाची. दुसऱ्या भागात दुसरं शेतं फुललेलं ज्वारीच्या कणसांनी भरलेलं,  तिसरं शेतं फुलांनी बहरलेलं. व्वा!

‘किती दिवसात शेतात गेलो नाही मी?’ मनाशीच बोलला, तेव्हढ्यात आईची चाहूल लागली, पटकन टीव्ही बंद  करून झोपेचं सोंग घेतलं सुभान्यानं.

मालतीला जरा शंका आली, कारण लांबवर टीव्हीचा येणारा आवाज एकदम बंद झाला होता. त्यावेळी टीव्हीवर आमची माती आमची माणसं कार्यक्रम असतो हे तिला माहित होतं. कधीकधी शेजारच्या वहिनींकडे ती जायची हा कार्यक्रम बघायला. खरं तर, आज घरच्या टीव्हीवर बघायचा म्हणून लवकर आली होती शेताची कामे उरकून.
पण तिने टीव्ही नाही लावला. नको, पोराला कसंतरी होईल. किती वेळ सोंग घेऊन पडणार. लवकरच सुभान्या उठला, इकडचं तिकडचं बोलणं झालं बासं.

एक दिवस त्यांच्या जिल्ह्याच्या शेतकी कॉलेजची काही माणसं टिंबटिंब गावात येणार अशी बातमी आली. जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन सर्व शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुढील आठवड्यात टिंबटिंब गावाला भेट देणार होते. सुभान्या आता काठी घेऊन चालू लागला होता. सुभान्याने तिथे जायचे ठरवलं होतं.

सुभान्या आईला बोलला देखील, “आज लवकर घरी ये ना आई. दुपारी चावडीवर ने मला. तुला ठावूक हाय का?”

“ना बा. काय ते. काय हाय चावडीवर? तुला जायचं. चल जाऊ या. दुखतं नाही ना पाय आता. मग काय.” आई बोलली.

“तेच गं. शेतकऱ्याला सांगायला जिल्ह्याची माणसं येणार हायत. टीव्हीवर सांगतात दोन दिसं झाले. तूला ठावं नाय का?” सुभान्या आईला विचारतो.

“तू आज बोललास मला? कोणी सांगितलं तुला? मला माहित आहे. कालचं गावची लोकं आली होती. मी नाव दिलं माझं. येणार म्हणूनशनी सांगितलं. चलं तू बी. जाऊ यात.” अन कित्येक वर्षांनी मायलेक एकत्र बाहेर पडले. मालतीला सुभान्याच पाहिलं पाऊल आठवलं, अन मन भरून आलं. पण गप्प बसली ती माउली. काही बोलली नाही. तिला सुभान्यातला फरक जाणवतं होता. आतल्या आत सुखावली होती ती. ‘असंच होऊ देत.आणखीन काही बदलू देतं माझं पोरं. पांडुरंगा, सांभाळ रे!’ अशी आळवणी करीत होती.

काठीचा आणि आईचा आधार घेऊन सुभान्या टिंबटिंब गावाच्या चावडीवर आलेला साऱ्या गावाने पाहिलं. तरीदेखील कोणी फारशी दखल त्याची घेतली नाही. लांबूनच महाद्यानं हात हलवला, वश्या बघून हसला. माधवरावांनी त्याच्याकडे बघितलं, आणि सुभान्या जेंव्हा त्यांच्याकडे बघायला लागला, तेंव्हा नजर वळवली. सुभान्याने कोणालाच काहीच प्रतिक्रिया दाखवली नाही.

दुसऱ्या दिवशी माधवराव मुद्दाम चंदुला घेऊन सुभान्याला बघायला घरी गेले. मधल्या काळात मालतीबाई घरी येत होत्या. त्यामुळे चंदुला आणि त्या घरात सगळ्यांना काय चालले ते माहित होते. आता फार ताणण्यात अर्थ नाही असं वाटलं माधवरावांना आणि ते आले सुभान्याकडे.

लांबूनच चंदू आणि माधवराव आपल्या घराकडे येताना दिसलेले पाहून खरं तर सुभान्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. लगबगीने आईला आवाज दिला, पण तिला काही ऐकू गेलं नसावं. ती काही पुढ्यात आली नाही. तेव्हढ्यात ते दोघेही दारात आलेचं की. “काका, तुम्ही! या या ना. चंदू. अरे, अरे.ये बैस. आईला बोलावितो. आई! अगं बाहेर ये.” सुभान्याचा आवाज आणि चेहरा खूप काही बोलू लागला. आनंद होताचं, शिवाय आपल्याला यांनी माफ केलं असणार ह्या भावनेने तो अतिशय खूष झाला.

“सुरेखाताई नाही आल्या का? त्यांना पण आणायचं बरोबर.” मालतीबाईंना या घरानी खूप आधार दिला होता.

“पुढच्या वेळी येईल ती.” माधवरावांनी विषयाला हात घातला, “सुभान्या, हे बघ. काल चावडीवर ज्या कॉलेजचे प्राध्यापक आले होते ना, ते माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत. त्यांना काही शेतकऱ्यांना संपूर्णपणे उत्तम मार्गदर्शन करायचं आहे. म्हणजे मातीचा कस तपासणी पासून ते मार्केट  मध्ये माल विक्री, इतकेच नव्हे तर आणखिनही बरेच काही.  जर शक्य असेल तर परदेशातही माल पाठवला जाईल असे मार्गदर्शन ते देणार आहेत. जिल्ह्यातून दोन गावे, त्यातलं आपलं एक टिंबटिंब गाव आणि अजून एक निवडायच आहे. त्यांना प्रत्येक गावात पाच शेतकरी हवे आहेत. काम करावे लागेल, कष्ट तर असतातच, जिद्द चिकाटी हवी, पैशाची मदत देखील थोडीफार संस्थेतर्फे केली जाणार आहे. आधी तुझा विचारही मी केला नव्हता. काल तुला चावडीवर बघितल्यावर वाटलं आधी तुलाही विचारवं. तू माझ्या दोस्ताचा पोरगा. आज तो असता तर, तुला घेतलंच असतं आम्ही. म्हणून आलो तुला विचारायला. तर,  विचार कर, आणि आठ दिवसात मला काय ते सांग. काही शंका आली तर मला विचार. नीट विचार करून मला निर्णय दे. पुढचं मी बघेनच.” माधवरावांच्या भेटीचं कारण समजलं आणि सुभान्याला आश्चर्य तर वाटलचं, आणि काहीतरी मार्ग भेटल्याने भविष्यात एक किरण दिसला.

“काका, खूप छान होईल जर मला हे मिळालं तर. हा सुभान्या आता बदलला असं समजा. मी आता माझी शेती करणार. एकदम मस्त. आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने करणार आहे. मला ठावं नव्हतं, आपल्या जिल्ह्यात काय काय चाललं आहे. आता मी रोज टीव्हीवर बघतो, आणि कधी एकदा समदं मला माझ्या शेतात कराया भेटलं असं झालं बघा. माझं नाव लिवाच तुम्ही.लई उपकार होतील. मी कमी पडणार नाही. कष्ट वाट्टेल तितके करीन. काका.” आवाजात सगळं सामावलं होतं, डोळे असतातच अशावेळी बोलायला आणि सुभान्या खाली वाकला.

पुढे काय झालं ऐकायचं. तोच सुभान्या इतका बदलला, की प्रायोगिक शेती प्रयोगात तो यशस्वी झाला. त्याने प्रगत शेतीवर काम केलं. आज  जिल्ह्यात टिंबटिंब गावचा सुभान्या टीव्हीवर मुलाखतीला येतो. आख्या टिंबटिंब गावालाच नाही तर आख्या जिल्ह्यात मार्गदर्शन करीत कुठे कुठे जात असतो. एखादा प्रसंग माणसाचे आयुष्य बदलून टाकते, तसेच काहीसं टिंबटिंब गावच्या सुभान्याचं.























Camera is a responsive/adaptive slideshow. Try to resize the browser window
It uses a light version of jQuery mobile, navigate the slides by swiping with your fingers
It's completely free (even though a donation is appreciated)
Camera slideshow provides many options to customize your project as more as possible

Here is a video for National Webinar on IBPS Exam. Guidance by Smt.Vandana Dharmadhikari on 17th July, 2020 

vandanadharmadhikari.blogspot.com