Tuesday, August 15, 2017

71. Arthakranti - अर्थपूर्ण - भारतीयांचा आनंदांक


01-11- 2017

अर्थपूर्ण : दिवाळी अंक २०१७
उसंबळून येऊ देत भारतीयांचा आनंदांक !!
सौ.वंदना विजय धर्माधिकारी


बँक शाखाधिकारी
सन्माननीय मॅडम,
सप्रेम नमस्कार,
आपणास माझे पत्र पाहून कदाचित आश्चर्य वाटेल. माझा आनंद आपणाबरोबर शेअर करते. राहवलं नाही म्हणून. बँकेतल्या सगळ्यांना पाहून बोलून मी सुखावते म्हंटल तरी चालेल. माझे खाते काढून जेमतेम तीन वर्षे झाली असतील. तेंव्हापासून मी खरी जगायला लागले असं माझं प्रांजळ मत आहे.  नावाप्रमाणे मी आनंदाने राहू लागले, अर्थसाक्षर झाले. वाटतं, सगळ्यांनी असेच माझ्यासारखे बदलावे, आनंदी  रहावे. माझ्यासारखे अनेक अस्वस्थ जीव आहेत. मला घावला एक मार्ग, तो दाखवीन सर्वांना.  पसरू देत आनंदी आनंद सर्वदूर, देशभर, घरोघरी. उसंबळून येऊ देत वर प्रत्येक भारतीयाचा आनंदांक.  वाढू देत माझ्या देशाचा आनंदांक एकेक करीत... माझ्यासारखा!! .....हीच इच्छा आणि प्रार्थना.
सामान्य घरातली बाई, आई, सून, पत्नी, आणि मालकीण सगळ्यांच्या दिमतीला तयार असलेली स्त्री.  खंगून गेलीली, पुसट अस्तित्वाची, निर्जीव होऊ पहात होते मी.  चैतन्य संपलेली मी कधी संपेल असेच वाटायचे मला. मी आपल्या बँकेत खातं काढलं, वरचेवर येत राहिले. एकेक शिकत गेले. आपण सर्वजण लोकांच्या पैशाची कामे अतिशय आपलेपणाने, विश्वासाने, हुशारीने, वेळेत, जबाबदारीने आणि आत्मीयतेने करता त्याचे मला प्रचंड अप्रूप आहे. महिला आणि पुरुष एकमेकांना सहकार्य करतात, ना कुठे भेदभाव, ना हेवेदावे. भारावून गेली असेन मी कित्येकदा बँकिंग हॉल मध्ये बसून. बँकिंग वाचलं, समजून घेतलं, वाढवलं. मला आता बरेच काही यायला लागले आहे. तो आनंद मी तुमच्याबरोबर शेअर करायचाचं ठरवलं. दुसऱ्या कोणाही बरोबर याबद्दल बोलायची इच्छा नाही माझी. माझा आनंद ज्यांनी दिला त्यांनाच सांगते. 
पुढील आयुष्यात खूप मोठ्ठी उर्जा देणारी बँकेने दिलेली प्रेमाची भेट आनंदाचं लाघवी देण आहे. त्याच्या जीवावर उर्वरित आयुष्य सुखाने जगेन याची मला खात्री झाली आहे. अनेकविध फायदे मागील तीन वर्षात मिळाले. ज्याला मी पूर्वी पारखी होते. इथून पुढे मी त्याची पायिक होणार आहे. तर...असं आहे.
१.      माझं बँकेत खातं आहे. त्यात काही पैसे आहेत फक्त म्हणजे फक्त माझेच, माझ्या नावावर आहेत. ही भावनाच माणसाला सुखावून जाते. 
२.      आपले पैसे सुरक्षित आहेत, त्यावर व्याज मिळते, आणि कोणालाही त्याबद्दल माहिती दिली जात नाही.
३.      मला पाहिजे तेंव्हा माझे पैसे काढून मला पाहिजे तसे खर्च करू शकते, मला कोणीही आडवू शकत नाही.





४.      माझ्या खात्यातील पैसे जेंव्हा मला लागणार नाहीत तेंव्हा बँक ते गरजू व्यक्तींना कर्जरूपाने देऊन मदत करते. वाटतं खूप पण वैयक्तिकरित्या कुठे जाणार असे सामाजिक काम करायला?  थोडं तरी चांगलं काम कळतं न कळतं.
५.      सर्वसामान्य लोकांच्या पद्धतीने माझे आर्थिक व्यवहार करताना प्रचंड आत्मविश्वास मला मिळाला.
६.      मी माझ्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक भाग झाले. जयहिंद!
७.      आता घरात/पर्समध्ये पैसे लपवून ठेवावे लागणार नाहीत.  नेहमी किती आहेत ते तपासा, बरोबर की चूक. कधी संशयाचे भूत बसायचे, त्रास व्हायचा. संपलं एकदाचं.
८.      घरात पैसे ठेवले तर चोरांची भीती जास्त वाटायची. आता चेकबुक पासबुक नीट ठेवले की झाले.  सापडलं तरी उपयोग नाहीच.
९.      लॉकरमध्ये केव्हढी जोखीन ठेवली गेली. लागेल तेंव्हा आणलं, घातलं, मिरवलं आणि परत नेऊन ठेवलं.
१०.  बिल भरण्यासाठीचे  हेलपाटे, मोठमोठ्या रांगा, संपल्या.  इसिएस केलं आणि परस्पर पेमेंट झालं सुद्धा. त्याने कितीतरी तास मिळाले मला माझ्यासाठी.
११.  वेगवेगळ्या वेळी पैसे मिळतील अशी रिकरिंग काढली, ठेवपावत्या केल्या. पुढील खर्चाची उत्तम तरतूद केली गेली. काळजी मिटली.
१२.  बँकेकडून कर्ज घेतलं. नवीन गाडी घेतली मी. जेंव्हा काही गरज वाटेल, तेंव्हा पहिली बँकेत येणार मी. त्या सावकाराकडून कधीच कर्ज घ्यावे लागणार नाही आता.
१३.  क्रेडीट/डेबिट कार्ड्सचे केव्हढे फायदे घेते, बापरे!  खरेदी करणं, तेही काही दिवसांच्या उधारीवर. एटीएम आहेच.
१४.  कोणाला पैसे द्यायचे झाले तर किती प्रकारे पाठवता येतात. सुरवातीला भीती वाटली, आता एकदम एक्स्पर्ट झाले. सोप्प आहे. कधी इंटरनेटनी तर कधी मोबाईलवरून तर कधी एनईएफटी. सहज जमायला लागलं.
१५.  मी स्वतंत्रपणे माझा पैसा वापरू शकते. हवे तेंव्हा हवे त्याला हवे तितके पैसे देण्याची सोय मला आवडली. मेसेज बघितला की हुश्श झालंच.
१६.  मोबाईल, इंटरनेट बँकिंग मुळे रिझर्व्हेशन, विविध तिकीटे, बुकिंग करणे किती तरी सोपे सोयीस्कर झाले.
१७.  ऑनलाईन खरेदी - व्वा!. किती छान!! गर्दी, घासाघीस, ऊन, पायपीट, सगळं संपल.
१८.  इतके केले तरी हिशोब वेगळा लिहून नाही ठेवावा लागतं. आपोआप पासबुकात नोंदी होतात.
१९.  म्युत्युअल फंडात एसआयपी केलं आणि परस्पर पैसे तिकडे पाठवले. नाहीतर हप्ता भरायला उशीर झाला की त्रास. काहीच लक्षात देखील ठेवावे लागत नाही.








२०.  शिवाय दरमहिन्याचे देणे त्यासाठी कायमस्वरूपी सूचना दिली आहेच. फटाफट रकमा ट्रान्सफर. कामवाल्या साखुबाईंनी देखील खातं काढलं तेंव्हा वेळेवर जातात पैसे खात्यात. सखुबाई म्हणते, ‘आता जरा पैका  बाजूला पडायला लागला. नाहीतर आला तेव्हढा खाल्ला असचं होतं.’ तुम्हाला सांगते, सखुबाई तिच्या मुलीला शैक्षणिक कर्ज घेऊन शिकविणार आहे. मी आहे तिला जामीन म्हणून राहायला तयार.
२१.  देशभर सुरु झालेली डिजिटल व्यवहार तर मी सर्सास करायला लागले आता. वेळ, श्रम, अगदी माझ्या गाडीचे पेट्रोल देखील वाचले. अभिमान वाटतो मला भारतीय असल्याचा. त्याने भ्रष्टाचार संपणार आहे. सलाम भारतीय लोकशाहीला आणि आपल्या राज्यघटनेला!
२२.  डीमॅट खातेही बँकेत काढलं आता शेअरमधेही गुंतवणूक करायला सुरवात केली. त्याचाही कोर्स करते बघा. अडलंनडलं तर द्याल समजावून, खात्री आहे. ओसंडून जातो आता माझा उत्साह.
२३.  बँकिंग जाणलं तसे बरेचकाही समजले. म्हणजे परदेशी जाताना, व्यवसाय असेल तर काय करतात ते. कर्ज प्रकरण देखील. सगळं भय गेलं बघा.  
२४.  आता तर मृत्युपत्र करताना मी बँकेची मदत घेणार म्हणते. तशी आहे धडधाकट. तरी पण करते. इतकेच नाही तर गेल्यावर त्यानुसार सगळं व्यवस्थित होणार यावर विश्वास बसला बघा.  .
२५.  नवल वाटते मला, या विमुद्रीकरणानंतर समाज किती बदलला. किरकोळ खर्च देखील मोबाईल वरून देतात घेतात. सगळेच कॅशलेस करतात. आपला देश यामध्येच मागे होता. आता प्रगत देशांच्या बरोबर माझा भारत येणार याचा मला खूप अभिमान आहे.
२६.  किती बावळट, भित्री होते मी, आणि आता बँकिंग जाणून घेतले, ते करायला लागले तर एकदम स्मार्ट झाले. माझा आत्मविश्वास कित्येक पटीने वाढलेला मला पदोपदी जाणवतो. मैत्रिणी भेटतात तेंव्हा कोणाला काही अडलं असेल तर ते मीच समजावून देते. आहे की नाही मी हुशार..सगळे अगदी बावळट म्हणून हेटळणी करायचे माझे. आता बिशाद कोणी मला काही म्हणेल. अगदी ह्यांना देखील कळून चुकलं की त्यांच्यापेक्षा मला जास्त चांगल्या प्रकारे बँकेची कामे करता येतात हे. किती त्रास दिला असेल यांनी मला पैशासाठी. आता माझी मी मोकळी आहे, स्वतंत्र आहे. आनंदी आणि स्वाभिमानी आहे. हेच हवे असते प्रत्येक स्त्रीला, तिलाच का तर त्यालाही. जे केवळ बँकिंग साक्षर झाल्याने आपोआप अलगद चालत आलं माझ्याकडे.
२७.  बँकेतील सगळे सगळ्याच ग्राहकांशी अतिशय आपलेपणाने बोलतात, काम समजावून देतात, मदत करतात. सकस वातावरण! सण समारंभ, एकमेकांचे वाढदिवस, कोणाला विशेष काही यश मिळालं, घरात काही चांगल झालं तर त्याचेही कौतुक करता,... खूप छान आहे. मला खूप आवडलं.... क्षणभर का होईना ‘मी इथे यायला हवे होते.’ ... जाऊ देत. बँक कर्मचारी म्हणून नाही आले, तरी ग्राहक म्हणून येताना आनंद होतो आहे.


मला सहज उमजलेले लिहिलं. हरवलेली मी मला भेटली. वाट चुकलेल्या भटक्या सारखी फिरायची दिवसभर घरभर. पत्र लांबत आहे. असू देत. थोडसं आणखीन.....मी मराठी भाषेची विद्यार्थिनी. पुस्तक काय पेपर वाचायला देखील कधी वेळ नाही मिळाला. अर्थ नव्हता जगण्याला माझ्या. घरात मरमर मरा. टू व्हीलर चालवते म्हंटल्यावर मारुतीच्या शेपटासारखी वाढणारी बाहेरच्या कामाची यादी सांभाळली. स्वत:साठी एक सेकंद नाही. आता, माझी कामे कमी झाली. माझा आत्मविश्वास वाढला. जवळची लायब्ररी लावली... काय सांगू, मला वाटतं निवडक ३०/३५ पुस्तके वाचली.  कॉम्प्यूटर कोर्स केला. कधीकधी लिहायची सुरसुरी येते, एकदोन कविता केल्या. मागील महिन्यात बँकेने ग्राहक मेळावा घेतला. तेंव्हा ग्रा कोणी काही बोलणार का? विचारल्यावर मी उठले. “मला माझी मी मिळाले”, असं थोडसं बोलले, आज पत्रातून पूर्ण मोकळी झाले. पुढे येऊन अनोळखी २००/२५० लोकांपुढे बोलायची चाळीस वर्षातली माझी पहिली वेळ होती. ती प्रेरणा, हिम्मत, ताकद, धीटपणा मला मिळाला अर्थसाक्षर झाल्यावर, कमावलेल्या आत्मविश्वासावर, अद्भुतरित्या भेटलेल्या स्वातंत्र्यावर ......म्हणून मी आपणा सर्वांची, बँकेची किंबहुना संपूर्ण बँकिंग इंडस्ट्रीची खूप खूप आभारी आहे.

सर्वांनाच  खूप खूप मन:पूर्वक धन्यवाद देते आणि थांबते.

आपल्या बँकेची एक ग्राहक


आनंदी
१५ ऑगस्ट, २०१७  
पत्ता : सौ.आनंदी आनंद गडे
      “जिकडे तिकडे” सोसायटी
      गाव :: आनंदांक, तालुका :: आत्मविश्वासी
      जिल्हा :: सुखकर  पिन :: ११११११.


वंदना धर्माधिकारी
M : 9890623915



Camera is a responsive/adaptive slideshow. Try to resize the browser window
It uses a light version of jQuery mobile, navigate the slides by swiping with your fingers
It's completely free (even though a donation is appreciated)
Camera slideshow provides many options to customize your project as more as possible

Here is a video for National Webinar on IBPS Exam. Guidance by Smt.Vandana Dharmadhikari on 17th July, 2020 

vandanadharmadhikari.blogspot.com