पुस्तक : घायाळांची मोट –
कथासंग्रह
प्रकाशक : एकविरा प्रकाशन, पुणे
पाने : १५२ किंमत : रु.२००.-.
परीक्षण : सौ.मनीषा आवेकर
सौ.वंदना धर्माधिकारी यांच्या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभास मी गेले होते. ‘घायाळांची
मोट’ कव्हर बघताचं कथा वाचायची उत्कंठा वाढली होती. प्रसिद्ध झालेल्या स्वतंत्र १५
कथांचे संकलन “घायाळांची मोट”.मानवी आयुष्यातील
घायाळता आणि त्यातून मोकळं होणं सुंदर आहे. आपणही कधीतरी घायाळ होतो,किंवा कोणाला तरी घायाळ
केलेलं असतं. वाचताना आपल्याच इतिहासातील काहीजण डोकावतात. हीच लेखणीला माझी पहिली
दाद. आत खोलवर हलायला होतं, मनाला स्पर्शून जातं, नकळतपणे पापण्या पुसल्या जातात.
इथे आठवण झाली वपुंच्या हेलावून सोडणाऱ्या कथांची.खूप दिवसांनी भारावलेलं कथालेखन
वाचलं,आवडलं, म्हणून त्याबद्दल थोडेसे.
घायाळांची मोट कथासंग्रहात व्यक्तिरेखा, घायाळता, प्रसंग, भावना, संवाद,
शब्दसामर्थ्य, रेखाटलेली मार्मिक चित्रे, आणि मानवी मनाची उकल असे सर्वांचेच
प्रकटीकरण होते. कथा भिडणाऱ्या, हृदयस्पर्शी आहेत.शीर्षककथा प्रेमाची परिसीमा आहे.
लेखिका म्हणते,‘असे प्रेम कुठे असेल तर दोघांना माझे लाखलाख प्रणाम, सलाम.’ हळव्या
लेखणीला सलाम ठोकावा इतकं प्रेम त्यात ओतलं आहे. ‘मला आत्ताच कळलं’मध्ये मुलीकडून
आईला मिळालेल्या पाठींब्यामुळे मनाला दिलेली उभारी फार सुंदर व्यक्त केली आहे. ‘मी
तुझा नवराच बरा’ म्हणजे पतीपत्नीच्या नात्यातील विविधता उलगडून दाखवताना शेवटी नवऱ्याची
भूमिका मनमोकळेपणाने मांडली आहे.
वंदनाताई बँकेत होत्या, त्यामुळे तेथील अनुभवातून आलेल्या ‘एक एक ओझं’ कथेत उपेक्षितांचे अंतरंग दाखवताना
शंकरची व्यक्तिरेखा मानवी मनाच्या अनेक भावनांचे रूप दाखवते. शेवट अगदीच वेगळा,
थोडासा सस्पेन्स खिळवून ठेवतो. ‘मी त्याला मारलं’ या कथेत घरातली मोलकरीण
मालकिणीची मैत्रीण आहे. ‘राजहंस होऊन जा’ इथेतर एखाद्याला खड्यासारखे बाजूला
काढणाऱ्यांचे अवलोकन सडेतोडपणे केलेले आहे, त्याचबरोबर अपमानीत खेचाखेचीकडे
दुर्लक्ष करून ध्येयाकडे जाण्याचा संदेश दिला आहे. एकत्रितपणे काम करताना दुसऱ्याच्या पोटदुखीचा त्रास होतोच.‘एका
पा वर दोन पा’ झालेली फसवणूक,प्रसंग,इतरांच्या प्रतिक्रिया,आशावाद आणि शेवटची कलाटणी
मनाला अस्वस्थ करते.सगळ्याच कथांबद्दल लिहिणं अशक्य आहे. ‘मिलिंबिता’ अंधश्रद्धेवर मात, ‘बहावा’ भावलेली
प्रेमकथा. फॅण्टसी, मनीमाऊ, रुग्ण, आणि चक्क गदिमा! अप्रतिम!!
कथांमधून मधेच कविता, चारोळ्या, गद्यपद्य त्याने कथा ओघवत्या होतातच. शिवाय
जाणवते लेखणीची ताकद, वैविध्य, ओलावा,
काव्यमाधुर्य, भावनांची घालमेल. सर्वच कथा रंजक,
रसाळ, ओघवत्या, संवाद प्रसंगोचित, आणि चित्रदर्शी आहेत. कथांमधील पात्रांशी संवाद
साधत सुंदर अनुभूती घेण्यात वाचक रंगून जातो, त्याचा एक भाग बनतो. प्रत्येक कथा
पुन्हा पुन्हा वाचावी, अगदी चघळत तिचा स्वाद घ्यावा अशा आहेत. मी तेच केलं.
फेसबुक – नुक्कड फेम श्री.विक्रम भागवत यांनी पुस्तकाला सुंदर प्रस्तावना दिली
आहे. भावनापूर्ण ओथंबलेल्या कथासंग्रहाबद्दल
वंदना धर्माधिकारींचे अभिनंदन. म्हणूनचं सगळ्यांनीच पुस्तक वाचावं असा आग्रह आहे.
मनीषा आवेकर
फोन : 9763706200
25-09-2016
घायाळांची
मोट कथासंग्रह
लेखिका
: सौ.वंदना विजय धर्माधिकारी
प्रस्तावना
: श्री. विक्रम भागवत
वंदना धर्माधिकारी ह्यांच्या
कथा संग्रहाला प्रस्तावना लिहावी असा त्यांचा प्रस्ताव आला... आणि मला एक प्रश्न पडला की कुठल्या अधिकारात आपण ही प्रस्तावना लिहायची आहे? मी समीक्षक नव्हे...कुठल्याही साहित्याची चिकित्सा करावी असा माझा अभ्यास नाही...आणि कथेच्या क्षेत्रात तसे म्हटले तर माझे वैयक्तिक योगदान नाही. असे प्रश्न मला पडले आणि मला माझ्या मार्यादांची जाणीव झाली. त्याचवेळी मग मी विचार करू लागलो...की मग मी काय करू शकतो?
मी एक आस्वादक आहे. माझ्याकडे दररोज भरपूर वाचायला येते. त्यात बऱ्याच कथा असतात. “नुक्कड” ह्या आमच्या लघु आणि लघुतम कथांना वाहिलेल्या ब्लॉगची ही एक किमया आहे. त्यामुळे
माझही आस्वादकाची भूमिका किंवा
बैठक म्हणा पक्की तयार झाली आहे...आणि मी जे काही लिहितो आहे ते त्याच भूकीकेतून लिहित आहे...सौ. वंदना धर्माधिकारी ह्यांच्या कथांचे मुल्यमापन करण्याचा हा प्रयत्न नाही हे कृपया ध्यानात घ्या.
एकूण १४ कथा ह्या कथासंग्रहात सौ वंदना धर्माधिकारी ह्यांनी समाविष्ट केल्या आहेत. हा कथांचे विषय वेगवेगळे आहेत...काही कथान नर्म विनोदाची जोड आहे... (कर सार साफ), काही कथा ह्या दोन जीवांच्या भाव विश्वाचे अत्यंत तरल भाषेत वर्णन करतात (मी तुझा नवराच बरा), तर एक कथा (तुतुर्संगे रंगली रंगपंचमी) फ्यानटसी चा आधार घेत एक वेगळेच विश्व आपल्यापुढे उभे करते...अव्यक्त प्रेम...आपल्या हृदयात जपून ठेवणारे छाया आणि शशांक...तर मनाला लोभवतातच...(आजच उद्यावर)
मला ह्या कथा वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली...ह्या कथा दोन भागात विभागता येतील....एक “निसटलेल्या” किंवा “निसटू पाहणाऱ्या” क्षणांच्या कथा आणि दुसरा भाग आहे...आपले “स्त्री” तत्व प्रखरपणे जागृत होऊ पाहणाऱ्या स्त्रीचे व्यक्तिचित्रण करणाऱ्या. अर्थात हे होत असताना मुलाने दगा दिलेल्या कुटुंबाची व्यथा मांडणारी कथा सुद्धा डोळ्यांसमोर येते. आणि लक्षात येते ते एक समृद्ध अनुभव-विश्व लेखिकेचे. त्या व्यवसायाने ब्यांकेत नोकरीला आहेत त्यामुळे अनेक व्यक्तिरेखा त्यांच्या सानिध्यात येतात. लेखकाच्या अनुभवांची मोडतोड होऊन पुन्हा जुळणी होत असते...आणि नवे अनुभव जन्माला येत असतात. तसेच इथेही होत असणार ह्यात मला शंका नाही.
त्यांच्या ब्यांकेत नोकरी करणारा शिपाई सखाराम(एक एक ओझ) किंवा मुलाच्या त्रासाला कंटाळलेली पारूबाई, किंवा ब्यांकेत बदली होऊन आलेले आणि आपली पूर्वाश्रमीची मैत्रीण (मी प्रेयसी हा शब्द टाळतो आहे) क्यान्सरच्या आजारात अखेरच्या क्षणात एकदा तरी मनातले सर्व व्यक्त करू पहाणारे मकरंद कानडे(मुलांनी दिल बळ) मोकळे होऊ
पाहणारे हे मला खूप भावले. तर त्याच रंगरूप पालटल मधील शारदाबाई, ह्या सर्व व्यक्तिरेख मानवी शाश्वत मूल्यांच्या खूप जवळ जाऊ पहाणाऱ्या आहेत.
ह्या कथांमध्ये व्यक्त भावनांची तडफड लेखिकेने खूप उत्तम रित्या वाचकापुढे मांडली आहे. अशा अव्यक्त भावना कधीना कधीतरी व्यक्त व्हायलाच हव्या...त्यांना आपल्याला हवासा प्रतिसाद मिळो अगर ना मिळो...पण मनावरचा भार हलका होणे खूप गरजेचे असते...हे निर्विवाद.
ह्यात मला खास वैशिष्ट्य जाणवले ते स्त्री मनाचे विभिन्न पदर ज्या नजाकतीने लेखिकेने उलगडून दाखवले
आहे त्याचे.
आयुष्याच्या उत्तरार्धात पुन्हा एका सहजीवनाच्या दिशेने पाउल टाकणारी कल्पना (मला आत्ताच कळल) ह्या कथेत
होणारी तिची घालमेल...ज्या सामर्थ्याने लेखिकेने अभिव्यक्तीत केले आहे..तितक्याच नजाकतीने मुलीने स्वतःकडे आपल्या आईची आई होण्याची भूमिका घेणे आणि आईच्या भावी पतीला निरोप देणे “माझ्या आईची काळजी घ्या” हे अत्यंत हृद्य असेच आहे आणि
ह्या कथासंग्रहाचे सामर्थ्य सुद्धा आहे.
पाटील कुटुंबाची शोकांतिका “एक पा वर दोन पा” अत्यंत करूण आहे.
त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात आपल्या एकुलत्या एक मुलावर टाकलेला अमर्याद विश्वास त्यांना भोवतो आणि मग एक करूण कहाणी आपल्या डोळ्यांसमोर चित्रित होते.
ह्या संपूर्ण कथेचे लेखन अत्यंत संयत आणि सामर्थ्यशाली असे झाले आहे. त्यांची शोकांतिका चित्रित करतानाच आजूबाजूला उभ्या असलेल्या सोसायटी मेम्बर्सची व्य्क्तीचित्रणे विलक्षण ताकदीने त्यांनी उभी केले आहेत. वाचत असताना वाचकाला
सतत वाटत राहते हो...हो...हे असेच व्हायला हवे..त्यांच्या मुलाला सर्वांनी असाच विरोध करायला हवा. हे लेखिकेचे यश निर्विवाद आहे.
आणखी एक व्यक्तिरेखा मला खूप भावली ती म्हणजे मोलकरणीचे काम करणारी शारदाबाई दररोज रात्री दारू पिऊन झिंगलेल्या नवऱ्याचा मार खाणारी आणि तरीही भले थोरले कुंकू कपाळी मिरवीत वटसावित्रीची पूजा करणारी शारदाबाई. त्या ज्यांच्या कडे काम करतात त्यांच्या एके दिवशी मारझोड करणाऱ्या नवऱ्याचा शारदाबाई हात धरते आणि त्याचा अन्याय झुगारून देते. हे सर्वच वर्णन अत्यंत परिणामकारकरीत्या लेखिकेने वाचकापुढे उभे केले आहे. वाटत राहते की जणू संपूर्ण प्रसंग आपल्या डोळ्यासमोरच घडत आहे. सासूच्या मृत्युनंतर तिला शब्द दिला आहे म्हणून कायम नोकरी साठी आलेली सून सुद्धा एकाच प्रसंगात खूप ठसठशीत उभी राहिली आहे.
सौ वंदना धर्माधिकारी ह्यांच्या सर्वच कथांचा आस्वाद स्थला अभावी घेणे शक्य नाही...पण जी उदाहरणे मी दिली आहेत ती इतकी सशक्त आहेत की त्यावरुनच इतर कथांबद्दल सुद्धा वाचकांना उत्सुकता निर्माण व्हावी. ह्या कथासंग्रहातील बहुतांश कथा पारितोषिक प्राप्त आहेत. ह्याचाच अर्थ त्या सिद्ध झालेल्या आहेत...त्यांना वेगळे सिद्ध व्हायचे नाही आणि त्यामुळे वाचकांच्या समोर
आपल्या ह्या कथा ठेवताना लेखिकेच्या मनावर काही ताण असायचे कारण नाही.
मी सौ. वंदना धर्माधिकारी ह्यांना खूप सुयश चिंतितो.
विक्रम भागवत