Sunday, November 15, 2015

23. Diwali 2015 - Niranjan - संस्कारांची संस्कृती


निरंजन दिवाळी अंक २०१५  :::   संस्कारांची संस्कृती
लेखिका  :::  सौ.वंदना विजय  धर्माधिकारी


एकदा काही तपासण्या करण्यासाठी लॅबमध्ये गेले. तिथे हि गर्दी. बसायला जागा नाही. आत प्रवेश करतानाच माझं  सटकलं. थोडीफार चुळबुळ करून तोंड उघडलंच  मी, “एकस्युज मी, बाहेर डॉक्टरांनी मोठे रॅक बूट चपलांसाठी ठेवलेलं  आहे. त्यावर फक्त माझी आणि आधी आलेल्यांपैकी एकांच्या चपला दिसत आहेत. प्लीज, प्रत्येकाने आपापले बूट चप्पल उचलून रॅकवर ठेवा.” सर्व मंडळी दिसतं होती  अगदी सुशिक्षित. पटकन कोणीच उठेना. माझी टकळी सुरूचं, “घरी असे आपण वागत नाही, तुम्हीही वागत नसाल. सार्वजनिक ठिकाणी का इतका हलगर्जीपणा?” दोनपाच जणांना जाणवलं, आपापली चप्पल उचलली. मला वाटलं, आत डॉक्टरकडे गेलेल्या व्यक्ती येतील म्हणून मी पण दमादमाने घेतलं. दहा मिनिटे झाली. आतले बाहेर आले, गेले, नवीन आले फटकन चप्पल भिरकावून देत. मी पुन्हा माझी कॅसेट वाजवली. तर, तेथील रिसेप्शनिस्ट पटकन उठली आणि खाली पडलेल्या चपला उचलून  खिडकीतून भिरकावून देत तावातावाने बोलली, “ काही उपयोग होणार नाही तुम्ही कितीही सांगितलेत तरी. आम्ही दमलोत सांगून सांगून. हे सगळे सुस्थितीतील सुशिक्षित आहेत. त्यांची घरं बघा कशी चकाचक असतात. इथे मात्र यांचे हे असे.” निशब्दपणे काही शहाणी मंडळी उठली. तिसऱ्या मजल्यावरून लिफ्ट बंद असताना खाली पळाली. केव्हढा हा निर्लज्ज निगरगट्टपणा. असंस्कृतपणा यालाच म्हणतात. त्या सुसंस्कारित सुशिक्षित माणसांच्या वर्तणुकीतून दिसली ती सामाजिक जाणीवेची कमतरता. मला तो सार्वजनिक असंस्कृतपणा वाटला. तसं, हे पायताणाचे उदाहरण खूप मवाळ आहे. छोट्या छोट्या गोष्टींपासून होणारी  बेफिकिरी,  नालायक वृती जलद गतीने फोफावत जाते. हे चांगले तर नक्कीच नाही.  “मी आणि माझं” करीत हळूहळू अनेक संस्कारांना बासनात बांधणारा समाज निर्माण होत आहे. सामाजिक जाणिवांचे  अध:पतन, म्हणजे संस्कृती पतन होय. दारात चपला कशा ठेवल्या आहेत त्यावरून घराचे संस्कार कळतात. हे आजीचे शब्द त्यादिवशी मला आठवले आणि संस्कार शब्दाभोवती खूप भरकटले.

संस्कार म्हणजे नक्की काय? संस्कारांना किती जरी शब्दबद्ध केलं तरी संस्कारांचे परिपूर्ण वर्णन मांडता येणार नाही, याची जाणीव मला झाली. संस्कार शब्दातून पाझरतात,  मनाला भिडतात, मस्तकात शिरतात, नसानसातून वाहतात, रक्तात भिनतात आणि पाहिजे तेंव्हा कळत नकळत अजाणतेपणी कृतीतून प्रकट होतात. अशा अनेक कृतींची  मिळून व्यक्ती कशी आहे, सुसंस्कृत, कुसंस्कृत कि असंकृत ठरवले जाते. अंतिमत: चांगली कृती ज्यातून घडते, ते सुसंस्कार. व्यक्तीच्या वागण्याबोलण्यातून दिसतात ते त्या व्यक्तीचे संस्कार. एकाच प्रकारे संस्कारित झालेला समाज, त्यांचे वागणे ही त्या समाजाची संस्कृती बनते. रोजच्या जगण्याची पद्धती हेच संस्कृतीचे मुख्य अंग असते. समाजाच्या सामान्य वागण्यात जी दिसते तीच खरी त्या समाजाची संस्कृती, पुस्तकात दिसते ती नव्हे.  माणुसकीचा संस्कार सर्वश्रेष्ठ म्हणूनच वागणुकीच्या विविध तऱ्हा वरून व्यक्तीचा अंदाज बांधला जातो, स्वभावाचे पदर उलगडले जातात.  अगदी नित्यनेमाच्या गोष्टी देखील सुसंस्कारित आणि असंस्कारित व्यक्ती एकसारख्याच पद्धतीने करताना दिसणार नाहीत. एका व्यक्तीत अनेक व्यक्तिमत्वे दडलेली असतात, कुठल्या क्षणी कशाचे दर्शन होईल, आणि कशी प्रतिक्रिया मिळेल, हे खुद्द यजमानांना सुद्धा समजत नाही. किती जरी ठरवलं असंच वागायचं, तरीही प्रत्यक्ष प्रसंग समोर ठाकताच पलटी मारली जाते, तेही नकळत, आणि एक बरावाईट धप्पा बसतो त्या व्यक्तीवर. एकाच माणसाच्या स्वभावाला अनेक छटा असतात, त्यातली केंव्हा कधी प्रकटेल, आणि कोण कधी कसा वागेल हे निश्चित स्वरुपात कोणालाच सांगता येत नाही. नेहमी चांगली सुसंस्कारितपणे वागणारी ती किंवा तो कधीतरी बाजू  बदलते. ही व्यक्ती अशी कशी वागली, याचे सगळ्यांनाच आश्चर्य जरी वाटले तरी लेबल चिकटवायला दुनिया हजर. आयुष्यातील चढउतार माणसाची परीक्षा घेत असतात. संकट समयी तुम्ही कसे वागता त्यावर तुमचे मुल्यांकन अधिक चांगल्याप्रकारे केले जाते. म्हणून वागणे जास्त महत्वाचे. याचाच अर्थ एखादी व्यक्ती संपूर्णत: चांगली सुसंस्कारित नसते, तसेच पूर्णत: वाईट वा असंस्कारित किंवा कुसंस्करीत असत नाही. संमिश्रता हा मनुष्य स्वभावाचा गुण आहे. माणूस वाचणं सर्वात कठीण कारण प्रत्येक माणूस वेगळा आणि एक माणूस फक्त एकदाच हा तर नियतीचा नियम आहे. कसा ओळखायचा कोण कसा?
लहानमुलांवर   संस्कारित वयात उत्तम  संस्कार करायची जबाबदारी आईवडिलांची तशीच   घरातल्या सगळ्यांची असते. तिथे काही बिघाड झाला तर मुलाचे वागणे बिथरते. एकेक मुल बिघडत जाते, तेंव्हा सहज जिभ उचलली जाते, “ हल्लीची मुले व्रात्य आहेत, त्यांना ना वळण, ना समज, ना संस्कार.” वयाने, मानाने, ज्ञानाने मोठ्या असणाऱ्या समाजातील व्यक्तींनी केवळ सुसंस्कारांचे भले मोठे गाठोडे पुढच्या पिढीला दिले तरी सर्व काही दिल्या सारखे आहे.  लहानपणी होणारे संस्कार मुलांच्या कायम स्मरणात राहतात. ओल्या मातीत बी लगेच रुजतं, अगदी  तसचं. मुलं अनुकरणप्रिय असतात, जाता जाता टिपत असतात मोठ्यांना. त्यांनी केलेली नक्कल गंमत म्हणून छान वाटते सुरवातीला, परंतु, त्याच वेळी दसपट वाढलेली मोठ्यांची जबाबदारी कितीजणांच्या लक्षात येत असेल कोण जाणे?

कदाचित नकला करणाऱ्या मुलांवर नक्कीच काहीतरी संकट येत असेल, का नकला विरघळून जातात. टिपण्याची कला पुढे मारली जाते हेच खरे. खरे पाहता तो उपजतचा  उत्तम संस्कार असतो. फक्त त्याला थोडे वळण दिले की झालं, सोपे असते मुलांवर संस्कार करणे. “जे जे चांगले जिथे जिथे दिसेल तेव्हढेच उचलायचे.” हा एकच संस्कार उत्तम माणूस घडायला पुरेसा आहे. मग ते काहीही असेल, एखादीची पोळी लाटायची पद्धत, तर दुसरीची रांगोळीची रेघ. कोणी एखादा कपड्यांच्या घड्या नीट घालीत असेल, तर दुसरा घर चकाचक ठेवत असेल. एखाद्याचे स्मितहास्य सुद्धा बळ देणारे असते. पाठीवर थाप द्यायला त्रास नाही पडत. चांगल्याला चांगलं म्हणताना कष्ट कसले, पण पटकन जीभ रेटत नाही हे ही तितकेच खरं नाही का? फक्त चांगलं गोळा करायचं ठरलं  तर उचलेगिरी सर्वोत्तम म्हणायला हवी. कारण, उचलता उचलता एक सुंदर सुसंस्कारित उबदार व्यक्तिमत्व आकार घेते. स्वत:हून घेतलेला  आकार सहसा बिघडत नाही. अशी व्यक्ती जिथे जाईल तिथे आनंदाची खैरात करीत सुटते. प्रत्यक्षात चित्र असे का दिसत नाही?

“जाता जाता जगता जगता पारखून उचलणे”, हा  एकच संस्कार जरी मनावर नीट कोरला गेला तरी  मुलांना संस्कारित बनविताना कष्ट उपसावे लागणारही नाहीत. आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये एखादी तरी गोष्ट, पुसटसा का असेना एखादा सदगुण टीपण्याजोगा असतोच. तोच घ्यावा. एकेक धन टिपता टिपता श्रीमंती वाढते. कोणी काय काय घ्यावे हे तीच व्यक्ती  ठरवणार. देणारे हात खूप भेटतील. सगळ्यांनी दिलेलं किंवा स्वत:हून त्यांच्यातलं उचललेलं असो, त्याचे वजन पेलण्याइतकी ओंजळ मात्र ताकदीची हवी.  घेतलेले गुण जपण्यासाठी, वाढविण्यासाठी कष्टाची तयारी आणि सक्षम मानसिकता हवी. अन्यथा गळून गेलं तर काय उपयोग? वाढत्या वयाबरोबर असे खुराक सर्वत्र, म्हणजे घरीदारी, शेजारी पाजारी, अंगणात, शाळेत, सगळीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळतात. आजकाल घर बसल्या साऱ्या दुनियेचे दर्शन घडते, मिडीया भले बुरे उधळीतच असते, रिमोट बघणाऱ्याकडे असतो. त्यानेच ठरवायचे काय घ्यायचे, काय बघायचे, काय नाही आणि किती वेळ ते. प्रत्यक्षात मात्र बरेचदा चित्र वेगळेच दिसते. फार उथळपणा जाणवतो, गंमत म्हणजे, थोडा मानसिक त्रास झाला तरी त्याचीही सवय होतेच तीही सगळ्यांनाच. त्यापाठोपाठ दुर्लक्ष, आणि “मीच का बोलू, त्यांना नाही समजत?” तिथेच संवादाला ओहोटी लागते. माणूस माणसाला समोरासमोर टाळतो, आणि व्हॉटसअॅप पिन करून मोकळा होतो. नजरेला नजर देऊन बोलायची वेळ येते, तेंव्हा मात्र तंतरते, त्यापेक्षा अनेकांपैकी एखादा पर्याय निवडावा. अगदीच झाले तर डिटेल्स मध्ये इमेल करायचा, आले उत्तर तर आले, नाही आले तरी काही बिघडत नाही, पुन्हा मीच का आठवण करून द्यायची, म्हणत गप्प बसणे. नव्यापीढिची भाषा मोठ्यांना नाही समजत, आणि मोठ्यांचे सांगणे अगदीच काहीतरी. अंतर वाढत जाते माणसा माणसातले त्यात काय एव्हढे. समाज विस्कळीत होत जातो. संस्कारांचे इथे कोठे काय झाले बरे? काही नाही, त्यांची आठवण पण होत नाही, हेच विशेष.

काही जण खट्याळपणे संस्कार स्वीकारल्याचे नाटक करतात. आत एक आणि  बाहेर एक अशी दुट्टपी विचारसरणी आणि विचित्र  वागणूक समोरच्याच्या पटकन लक्षातही येत नाही. भेटतात अशीही माणसे कधीकधी प्रत्येकाला. एक प्रश्नचिन्ह काही काळापुरते मनात रेंगाळते, तो असा का वागला? उत्तर मिळेलच असे नसते. तसा प्रत्येक माणूस वेगळा असतोच. एकाच घरातील सर्व मुले सक्खी भावंडे तरी कुठे सारख्या स्वभावाची असतात. एकाच गाठोड्यातील संस्कारशिदोरी सत्ताड उघडी असते त्यांच्यापुढयात. पण उचलणारे हात थोडेच एकाचे असतात. म्हणूनच, भिन्न स्वभाव प्रकृतीची भावंडे एकाच  छताखाली लहानाची मोठी होतात. त्याच्यात का असे होते? चांगल्या संस्कारित घरात देखील एखादा बदमाश, लाच घेणारा, समाजविघातक कृती करणारा वावरतो. त्याच घरातली मुलगी शिकून सवरून नीट राहते, आणि संसार करताना आईवडिलांना सांभाळते. असे का होते, तर चांगलं वाईट उचलण्याची पेलण्याची क्षमता. सगळेच पानात वाढलेलं पूर्ण खातातच असे नाही, कोणाला काही तर कोणाला दुसरेच पाहिजेच असते. तसेच संस्कारांचे. नाहीतरी  संस्कार हे उत्तम खाद्य आहे, ज्यावर आयुष्याची भलीबुरी गुजराण होणार असते.

 ‘अभ्यासाशिवाय काहीही खरं नाही.’  एक संस्कारित वाक्य इतकं पुसट होतं चाललं, कारण अभ्यास न करता सरळ पुढेपुढे जाता येतं. मग कशाला करा अभ्यास? शिक्षण घेताघेता प्रत्येक विषयातून मौलिक संस्कार  वेचायचे , मनात रुजवायचे आणि त्यावर भविष्याची स्वप्ने रंगवीत मजले चढवायचे. त्या स्वप्नांनाच कात्री लावली तर पुढची पिढी स्वप्न बघणे विसरून जाणार. स्वप्न नाही तर प्रगती नाही, ध्येय नाही, धडपड नाही, प्रयत्न नाहीत, कि यशाची मस्ती नाही. काही नाही. उरला फक्त उडाणटप्पूपणा आणि टाईमपास. त्यासाठी नाविन्यात आकर्षकता आहेच. शिवाय खेळ सुद्धा बदललेले. कॉम्पुटर, आय पॅड, मोबाईल, यावर पाठलाग करायचा, भराभर गोळ्या झाडायच्या, एकामागून एकेक खून करीत सुसाट धावायचे. पायाने नाही तर फक्त स्क्रीनवर. नंतर मोठ्या फुशारकीने आपला स्कोर सांगायचा,’मी दहा मिनटात पंचवीस मुडदे पाडले.’ माज मस्तकात जाटाच  एक विध्वंसक उदयास येतो. या अशा वागणुकीची जाणीव होत असताना पालकांची  डोळेझाक हे दुर्दैव, दुसरे काही नाही. याला शैक्षणिक धोरण जबाबदार आहेच. परीक्षा न देता पुढील वर्गात प्रवेश ही देऊ केलेली खात्री, मुलांना, पुढच्या पिढीला आळशी बनवते. विविध आकर्षणे त्यांना खुणावतात. मग वाहवत जायला सोपे झालेच की. “आळस हा माणसाचा शत्रू त्यापासून दूर रहा” हा एक संस्कार होता, त्याची अंतयात्रा काढली. इतकेच नव्हे तर, अभ्यास, परीक्षा, कॉपी, मार्कांची रस्सीखेच, शिक्षणासाठी पैसा, डोनेशन, वशिला, खोटे कागदपत्रे, जातीयवाद त्यानुसार रिझर्वेशन असेच काहीही, मग अभ्यास कशाला लागतो.  लहानवयात या गोष्टींना असलेले अवास्तव महत्व मुलांना नको इतके शहाणे बनविते. यात त्यांचे तरी काय चुकले? व्यवस्थाच चुकीची.

फक्त जातीच्या एका शिक्याच्या जोरावर मिळवली मोठी डिग्री ते देखील पैसे कोंबून, पाठोपाठ  उच्च पदावर नोकरी सुद्धा भेटली. मग छोकरी तर सोडा, पाहिजे ती पाहिजे तेंव्हा मिळालीच पाहिजे असा दबदबा वाढला. सगळीकडे धाक, ओळखी, गुंडगिरी, फक्त मस्ती. बाकी  कर्तव्यता  शून्य, मनसोक्त खाबुगिरी केली, कुचेष्टेत दिवस सरले, ना कोणाचे भय ना मनाला पापांची कबुली. का बरं असा समाज वृद्धिंगत झाला. त्यांनाच राजाश्रय मिळाला म्हणून. काय करणार इतरेजन. आहे कि नाही संस्कारासह मुल्यांची पायमल्ली.

पोटची पोरं मोठी व्हायला लागली की आईबापाचं काळीज कसंनुसं होऊ पाहतं. कुठे जातात, कोणा बरोबर असतात, काय करतात, वेडवाकड तर नाही ना करणार, अन एखादं व्यसन लागलं तर? भीतीनेच झोप उडते अनेक जन्मदात्यांची. वाटतं, त्यांनी केलेल्या संस्कारांवरील त्यांचा विश्वासच उडून गेला. समाजात वावरताना थोरामोठ्यांना भरकटायला होतं तिथं  मुलांचं  काय?  सगळ्यांनाच एखादी तरी चिंता भेडसावतं असतेच. अविश्वासानं जोर धरावा, आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं व्हावं? शेजारच्या काकाच्या मनात काळबेरं येतं आणि शिळी भाकरी एका मुठीत कुस्करावी तशीच कुस्करली त्याने एक लहानगी नाजूक कळी. निर्भया, तर प्रत्येक गावी, गल्लीत भीतीने वावरतात. का? स्त्री पुढे जात आहे, याबद्दल कौतुकाचे  शब्द तर नाहीतच, उलट तिला खाली खेचून कसे बदनाम करता येईल हेच दिसते सगळीकडे. असे का?

निसर्ग कोपला हे खरं, आलेलं संकट पेलायची ताकद येते देखील, पण जर आपला आधारवड असलेला समाज वठला, सडला, दूर पळाला तर कोणाच्या बळावर जगावं हीच शंका कुरतडून टाकते आणि लटकलेला शेतकरी दिसतो गाववेशीवर. हे सगळं का वरचेवर दिसते? नक्कीच कुसंस्कारांची मस्ती वाढली, सुसंस्कारांची  भिती दाटली. भयं उंबऱ्यात आल्याशिवाय दाहकता जाणवेल कशी? पाय पोटाशी घेऊन कोपऱ्यात निपचित पडला समाज. फोफावत चालली वाईट नकारात्मक वाईट वृत्तीं. संस्कारांची ऐशी तैशी.


संस्कार करायचा अधिकार, ती दानत फक्त माणसाची  नसते. कधीकधी भिंती देखील बोलतात, वारा कानाशी गुजगोष्टी करतो आणि काहीबाही सांगत निघून जातो. पाण्यात पाय जरी बुडवला, तरी मस्तकाला गारीगार वाटतेच ना. डोईवर भली थोरली पोकळी घेऊन फिरताना भीती नाही वाटतं, की ही पोकळी फाटली तर काय होईल याची. निसर्गाने देऊ केलेलं संस्कारधन हेच आहे. झाडांची सगळी पाने पानगळीत पडून जातात, अगदी उघडंबोडकं डोकं घेऊनही झाड खंभीरपणे उभे राहते ते वसंताच्या आशेने. पोटात ज्वालामुखी असतानाही हिरवीगार मऊशार हिरवळ डोळ्यांना थंडावा देते. तळपत्या उन्हाने करपून न जाता आपला सुगंध वाटायचा ही शिकवण फुलांची. टिपूर चांदणं, तळपत उन, बोचणारी थंडी, धुव्वाधार पाऊस, शेतातलं पीक, मुंग्यांची रांग, अशी ही सारी प्रकृती काहीतरी सांगत असते, वाटत असते. निसर्गाच्या  भरभरून संस्कारधनासाठी आपण कृतज्ञ राहायलाच हवे, नाही का?  

आता हेच बघा ना, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत आपले आयुष्य हे संस्कारांनी परिपूर्ण भरलेले आहे, नव्हे जीवन संस्कार संचय आहे. जन्माला आलेला मरतोच. तेंव्हा तो कसा जगला याला जास्त महत्व असते. त्याचे जगणे मोजले जाते संस्कारांवर. बघा हं,  उठल्या उठल्या तोंड घुणे, दात घासणे, हे एकापाठोपाठ संस्कारच बोलतात. हात फक्त कृती करतात. भरलेले ताट समोर पाहून जरी “वदनी कवळ घेता” म्हंटले नाही, चित्रावती घातली नाही तरी क्षणभर डोळे मिटून अन्नदात्याचे स्मरण होतेच. हाही संस्कारच. मौज मजा मस्ती करताना देशाच्या सीमेवर रात्रंदिवस पहारा देणारा सैनिक, की जो तिथे आहे म्हणून आपण इथे सुखात आहोत, त्याची क्षणिक आठवण काढता कधी? त्याची आठवण आवर्जून मनापासून अधूनमधून काढली तर  देशप्रेमाने उर भरून येतोच ना? अशाच भावनांची, कृतज्ञतेची  फ्रिक्वेन्सी दसपट वाढली की आपोआप सुसंस्कृतता बहरेल.  आजचा दिवस मला मिळाला म्हणत रात्री अंथरुणाला पाठ टेकवताना ते क्षण देणाऱ्याला धन्यवाद नाही दिले तरी हलके स्मरण केल्यावरही त्यातील भाव पोचतोच. आहेत असे संस्कार तुमच्या पोतडीत? नसतील तर घाला ताबडतोब. अजूनही वेळ गेलेली नाही. चांगले संस्कार वेचायला कुठल्याही वयात, कुठल्याही क्षणी सुरवात करता येते.

एक सुशील सुंदर रूप माणसाचं. त्यानेच सर्वत्र सौदर्य फुलवायचं. तसं फुलवलं त्यानं सुद्धा अगदी महत प्रयत्नांनी. अजूनही अबाधित आहे, त्यात भरसुद्धा पडते. पण, तेच सौंदर्य काहींच्या डोळ्यांना खुपलं, समाजविघातक वृत्तीने त्याला पायदळी तुडवलं. मारामारी झाली सुसंस्कार आणि कुसंस्कार यांच्यात. कुसंस्काराला जोर आला, त्याला वाटलं, ‘मी करीन तेच खरं.’ वाढली त्याची ताकद. तसं सगळंच चित्र नक्कीच मलीन नाही. अजूनही  वेळ गेलेली नाही. जिथं  दुखतं तिथेच मलमपट्टी करायची. माणसाच्या आतला नवनिर्मितीचा अंकुर एखाद्या शिडकाव्याची वाट पहात दडलेला असतो. त्याला पाहिजे असलेली बुद्धी, शक्ती, ताकत, कौशल्य, दूरदृष्टी सारं काही देवाने फक्त त्यालाच दिलेलं आहे. जे झालं ते झालं. केलं माफ त्या विध्वंसक दुष्टांना, काहीना कठोर शासन केलं, सूत्रे हातात घातली. त्याबरोबर  सुसंस्कारित समाजाने उचल घेतली, मनाने  निश्चय केला, कल्पनांनी  भरारी  घेतली, दूरदृष्टी स्थिरावली, मुठी घट्ट आवळल्या, पायात बळ आलं, ठोकली आरोळी, झाले सगळे गोळा, हातात हात घेताच मलिन चित्र बदलण्याची शपथ घेतली ओठांनी. “सुसंकृत समाज निर्माण” ध्येयाने पेटून उठले सारेजण. सर्वार्थाने बदल घडलाच पाहिजे एकच पवित्रा. निश्चित स्वरुपात परिवर्तन होणार याची खात्री प्रत्येक मन देत सुटले. कुसंस्काराने काळे केलेले देशाचे मलीन कॅनव्हास नक्कीच स्वच्छ सुंदर होऊ शकेल. इथेच आशा पल्लवित झाली, आणि मशाल पेटली. असे चित्र रंगवले स्वप्नाळू मनाने, येईल सत्यात हे स्वप्न?

देशाचा भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे म्हणताना क्षणिक कुठेतरी घशात शब्द आडतो. असे का होते? ग्रीस देशाने दिवाळखोरी जाहीर केली. आर्थिक डबघाई झाली.  तेथील ढासळलेली संस्कृती मुख्यत्वे दिवाळखोरीला कारणीभूत आहे, हे खरे आहे. प्रत्येक देशाची एक संस्कृती असते. जगातील सर्वात प्राचीन संस्कृती म्हणून ग्रीस परिचित आहे. नुसता इतिहास मोठा दैदिप्यमान असून चालत नाही, तर वर्तमानाचे भान आणि भविष्याची बेगमी यांची उत्तम सांगड घालणारी देशाची संस्कृती तशीच राजकीय शक्ती असावी लागते. दिवाळखोर ग्रीसच्या  काळ्या संस्कृतीची ही पाने पुढील पिढी वाचेलच. ग्रीसच्या या परिस्थितीचा भारतावर डायरेक्ट फारसा परिणाम होणार नाही, पण, यातून भारताने शिकण्यासारखे खूप आहे.

संस्कृती हा शब्द बहुधा साहित्य, तत्वज्ञान, कला, विज्ञान यांच्या संदर्भात वापरला जातो. परंतु  रोजच्या जगण्याची पद्धती हेच संस्कृतीचे मुख्य अंग असते. समाजाच्या सामान्य वागण्यात जी दिसते तीच खरी त्या समाजाची संस्कृती, पुस्तकात दिसते ती नव्हे.  शाळेत पुस्तकात शिकवलेल्या नियमांपेक्षा हे संस्कृतीचे नियम बळकट असतात. समाजाचे विचार, वागणे आणि दैनंदिन जगणे म्हणजे संस्कृती.हेच देशाला एक तर वैभवावर नेतात किंवा रसातळाला नेतात. संस्कृती संस्कारांवर उभी असते आणि त्यावर समाज. बहुसंख्य लोकांच्या स्वभावातून त्या त्या देशाचा एक स्वभाव ठरतो. कसे जगायचे हे त्या त्या समाजाची संस्कृती सांगत असते. एखादा समाज सरकारी सुविधांना अगदी नखानखाने ओरबडून घेतो  तरीही समाधान मिळवू शकत नाही. ऐदीपणा, फुकटचे खाणे, कष्टांची कमी, असा समाज कुसंस्कृती दर्शवतो.  आजकाल मने इतकी बोथट झालीत कि एखादा भावनाप्रधान प्रसंग वाचला किंवा प्रत्यक्ष डोळ्यासमोर जरी काही भयानक घडलं  तरीही बघ्यांच्या मनावर शून्य होऊ शकतो. “त्याचे मला काय? मी कशाला लक्ष घालू किंवा त्यांचे ते बघतील.” माणुसकीला काळिमा फासणारी समाजाची वागणूक, वाढत चाललेली भावनाशुन्यता संस्कृतीच्या अधोगतीची पहिली पायरी म्हणायला हवी.

‘खोटं बोलू नये, लाच घेऊ नये’ हे लहानपणाचे संस्कार. प्रत्यक्षात   नोकरी व्यवसायात पडल्यावर संस्काराचे विस्मरण होते आणि लाच स्वीकारली तरी जाते, किंवा दिली तरी जाते. एकूण एकच, देणारा आणि घेणारा दोघेही वाईट संस्कृतीशी जवळीकतेने जोडले जातात.  वाईट प्रवृतींचा पगडा समाजाची नाळ ओळखतो आणि पैशातच बोलतो, जगतो. तिथेच समाजाची पर्यायाने देशाची अधोगती सुरु होते. देशातील  भ्रष्टाचार, घोटाळे, काळा पैसा, सरकार तिजोरी लुटमार यांची वाढती संख्या म्हणजेच संस्कृतीची घसरगुंडी. कठोर शासन हाच रामबाण उपाय केला तरच सुसंस्कृती बळकट होते.

“काय करणार यावर? आपल्या हातात काय? सत्तेधारी करतील ते खरे.” असे म्हणत फक्त बघ्याची भूमिका घेणे, हाही संस्कृतीचा एक काळा भाग. ठरवलं, मनावर घेतलं समाजाने तर चित्र नक्कीच पालटू शकेल. सुसंस्कृत समाज निर्माण” हे सुंदर स्वप्न पूर्ण होऊ शकेल.  ग्रीसदेशाच्या संकटातून भारतीयांसह इतर देशांनी हेच तर शिकायचे आहे. आपणही प्रयत्नपूर्वक देशाचे भवितव्य उज्वल करण्यासाठी झटले पाहिजे. हे सुज्ञास वेगळे सांगावे नाही लागणार. संस्कृतीतील सकारात्मकता ही आजची भारताची गरज आहे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा म्हणतात ते हेच, असेच आहे. तमाम सर्व भारतीयांनी यातून धडा घेऊन आपली संस्कृती आणि देशाची जगभरातील प्रतिमा उजळून टाकण्याचा प्रयत्न करू यात.


वंदना धर्माधिकारी
M : 9890623915






















































6 comments:

  1. कसे घडलो...कसे जगलो .... कसे वागलो...का? या सगळ्याचे सार ! किती विशुध्द आहे हे जगणे...किती securred असावे हे जगणे!!!
    सवइचे जगणे...बाळबोध वागणे.

    ReplyDelete
  2. संस्कारांची संस्कृती विरघळताना बघावी लागते. असे का होते? वयाने, मानाने, ज्ञानाने मोठ्या असणाऱ्या समाजातील व्यक्तींनी केवळ सुसंस्कारांचे भले मोठे गाठोडे पुढच्या पिढीला दिले तरी सर्व काही दिल्या सारखे आहे. सुन्न व्हायला होतं बरेचदा.... असो. जमाना बदल रहा है. देखते रहना...धन्यवाद!

    ReplyDelete
  3. माणूस वाचणं सर्वात कठीण कारण प्रत्येक माणूस वेगळा आणि एक माणूस फक्त एकदाच हा तर नियतीचा नियम आहे. कसा ओळखायचा कोण कसा?

    ReplyDelete
  4. एक माणूस एकदाचं. संस्कार तर सर्वांवर सर्व बाजूने होणे महत्वाचे असते. आणि असे झाले तरी, हाताची बोटे कोठे सारखी असतात. नाहीतर एकाच घरातली सगळी मुले एकाच प्रकारची नसती का निघाली. संस्कार करणारे एकच आईवडील असतात ना, तरी देखील मुलांच्यात किती बदल असतो... जो तो असतो वेगळा वेगळा... असो. धन्यवाद!

    ReplyDelete

Camera is a responsive/adaptive slideshow. Try to resize the browser window
It uses a light version of jQuery mobile, navigate the slides by swiping with your fingers
It's completely free (even though a donation is appreciated)
Camera slideshow provides many options to customize your project as more as possible

Here is a video for National Webinar on IBPS Exam. Guidance by Smt.Vandana Dharmadhikari on 17th July, 2020 

vandanadharmadhikari.blogspot.com