माण देशी महिला सहकारी बँक लि. म्हसवड, तालुका माण, जिल्हा सातारा.
बँकिंग मार्गदर्शन पर तीन पुस्तके
लेखिका : सौ. वंदना विजय धर्माधिकारी
‘माण देशी बँक आणि माण देशी फाऊंडेशन’ यांचे ग्रामीण महिलांसाठीचे काम जगजाहीर आहे. श्रीमती चेतना सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकविध प्रकारे ग्रामीण महिलांचा दर्जा उंचविण्याचे महत प्रयत्न होत असतात. त्यामुळे त्यांच्या जिथे जिथे शाखा आहेत त्या भागातील महिलांना अनेकविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. आणि प्रत्येकीच्या जीवनात तिची चांगली घडी बसवून दिली जाते. काही ना काहीतरी उद्योग करायला महिलांना उद्युक्त केले जाते, आधार दिला जातो तो ही आर्थिक आणि भावनिक देखील. अतिशय एकोप्याने सर्व सभासद महिला अनेकविध प्रकारची कामे करतात.
‘बँकिंग जिज्ञासा’ आणि ‘मैत्री बँकिंगशी’ ही माझी दोन्ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली आणि त्याच्या ऑफिसर बाई माझ्या घरी आल्या. त्यांना माझ्या लेखणीतून ग्रामीण महिलांसाठी काही लिखाण हवे होते. त्यातून तीन पुस्तके त्यांनी खासगी वितरणासाठी करून घेतली. तिन्ही पुस्तके ‘सकाळ प्रकाशन,पुणे’ यांनी प्रकाशित केलेली आहेत.
स्वप्नपूर्तीसाठी बँकिंग
नंदाताईचा सल्ला
आठवडा बाजार कर्ज योजना
पुस्तके झाल्यावर बँकेतील काही महिलांनी खेड्यापाड्यात जाऊन बँकिंग मार्गदर्शन करायचे ठरले. हजारच्या पटीत पुस्तकांच्या प्रती घेतल्या आहेत. बँकेतील काही महिलांना पीपीटीच्या माध्यमातून बँकिंग कसे समजून सांगायचे याचे विशेष प्रशिक्षण मी दिले. त्यांना काही अडलं तर फोन करून मला विचारीत होत्या. आज त्या महिला महाराष्ट्रभर खेडोपाडी बँकिंग शिक्षण महिलांना देतात. अंगणवाडी, बचत गट, शाळा कॉलेज मधील मुली अशांना प्रशिक्षण देऊन ‘स्वप्नपूर्तीसाठी बँकिंग’ आणि ‘नंदाताईचा सल्ला’ पुस्तके भेट दिली जातात. तसेच बँकेकडून कर्ज घेणार्यांना ‘आठवडा बाजार कर्ज योजना’ पुस्तिका दिली जाते. कॅशलेस व्यवहार देखील ग्रामीण महिला अगदी सहजतेने करायला लागल्या आहेत.
३० जून,२०१५ रोजी तिन्ही पुस्तकांचे प्रकाशन सातारा येथे मोठ्या सोहळ्यात
करण्यात आले.
यामध्ये मला मिळालेले समाधान शब्दातीत आहे. नाही सांगता येत.
वंदना
धर्माधिकारी
सौ.वंदना विजय धर्माधिकारी
लेखिकेचे मनोगत : स्वप्नपूर्तीसाठी बँकिंग
ग्रामीण भागातील पहिली
महिला सहकारी बँक म्हणून गौरविण्यात आलेल्या माणदेशी सहकारी बँकेच्या श्रीमती रेखा कुलकर्णी
माझ्या घरी आल्या, खूप मनमोकळ्या गप्पा आम्ही मारल्या आणि त्यांनी दोन पुस्तकांचा
प्रस्ताव समोर ठेवला. अगदी माझ्या मनातले काम करायला मला मिळाले कारण खूप
दिवसांपासून या बायकांना समजावून देण्याची माझ्या मनात जबरदस्त इच्छा दडलेली होती.
म्हसवडला बँकेत जाऊन बँकेच्या अध्यक्षा, सगळ्यांच्या भाभी श्रीमती चेतना सिन्हा
यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली
आणि पुस्तकाचे निश्चित
केले. पुस्तकाला आकार देत असताना श्रीमती वनिता शिंदे याचे सहकार्य मिळाले. थोडासा
माझ्याकडून उशीरच झाला पुस्तके पूर्ण करायला.
खूप खूप लहानपणी मी खेड्यात
राहत होते. नंतर पुण्यात आले, आणि पक्की पुणेकर झाले. बालपणीचे दिवस मनात रुतलेले
होते. फार खेळली नसेल मी शेताकाठी, पारावर, नदीकिनारी. एक ओढ मनाला कधीकधी अस्वस्थ
करायची. तीच ओढ मला हे पुस्तक लिहिताना
मदत करीत होती. मनातून लेखणी झरते आणि कोणाला तरी भिडते. पारंब्यांच्या
झुल्याबरोबर एकेक विचार मनात आकार घेत होता. कायकाय सांगायला हवे खेड्यापाड्यातील
बायकांना ह्याचा शोध घेत होते. जेंव्हा कधी काय आणि कसे लिहावे मनात यायचे,
तेंव्हा सगळ्या साळकाया माळकाया यायच्या धावत आणि नुसती बडबड करायच्या. लेखणी त्यांचे शब्द ओढून घेत होती, कागद टिपून घेत होता. मला
वाटते, मनातील उर्मी कुठेतरी बागडली या पुस्तकांमधून. खेड्यापाड्यातल्या माझ्या
स्वप्नातील मैत्रिणींबरोबर कानगोष्टी केल्या, काय हवं नको सांगितलं, मी फक्त
उतरवलं कागदावर. इतकेच.
“ती बँक”. म्हणजे बँक
स्त्रीलिंगी आहे. याचा अर्थ ‘ती’ होय ‘तीच’ सगळ्यांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभी
असते. कुठल्याही परिस्थितीत आर्थिक पाठबळ देणारी सर्वांची हक्काची पाठराखीण असते ती बँक. तिने आपल्या मैत्रिणींना
खूप काही देण्यासाठी गोळा करून ठेवले आहे. साठवलेला साठा भरभरून सर्व महिलांनी
घ्यावा, उपभोगावा आणि हौसमौज करीत सुंदर आयुष्य जगावे. यासाठी लिहिले हे पुस्तक
‘स्वप्नपूर्तीसाठी बँकिंग. बँक बोलवीत होती बायकांना, ‘बँकेत कशी जाऊ?’ ‘जाऊ की
नको?’ करीत होत्या सगळ्याजणी. त्यांची स्वप्ने खूप होती. पण सगळी दूर अंधारात
असल्याने चाचपडत होत्या या सख्या. त्याच स्वप्नांना सत्यात आणण्यासाठी बँकेकडे
जायची आखीव रेखीव पाउलवाट ‘स्वप्नपूर्तीसाठी बँकिंग’ या पुस्तकाने प्रकाशित केली
आहे. त्या पाउलवाटेवरून सगळ्या सख्यांनी जावे, आपल्या ओळखीच्या पाळखीच्या सर्वांना
बरोबर न्यावे. हे माझे सांगणे आहे तमाम सर्व ग्रामीण महिलांना.
या पुस्तकाचे काम करताना
माणदेशी महिला सहकारी बँकेच्या सर्व भगिनिनी मला त्यांच्यातच सामावून घेतले, आणि एक वेगळेच
मैत्रीचे नाते प्रस्थापित झाले. ही नात्याची वीण घातली गेली, अशीच वाढत जाईल हे
वेगळे सांगणे न लगे.
धन्यवाद
वंदना धर्माधिकारी
09890623915
पत्ता : 25 तेजस सोसायटी, चैतन्य
इमारत,
तेजसनगर, कोथरूड, पुणे 411038