‘दैनिक लोकसत्ता’ वर्तमानपत्राची ‘’चतुरंग’
पुरवणी उत्तम ललित साहित्याने भरलेली भारलेली असते. ‘चतुरंग’ मध्ये आपला लेख
प्रसिद्ध होणे हे देखील मानाचे आहे. लेखणीचे कसब पणाला लागते, आणि सहज फोफावते.
तसेच काहीसे माझ्याही लेखणीचे झाले. नेहमीच्या बोलण्यात आपण कितीतरी छोटी छोटी
वाक्ये तीन तीन शब्दांची उच्चारतो. कधी अर्थपूर्ण तर कधी निरर्थक असतात ती.
बोलीभाषेचा थाट सजवणारी छोटी तीन शब्दांची वाक्ये बोलणाऱ्याच्या शैलीला खुलवते,
आणि लेखणीला दर्जेदार बनविते. तीच संधी मला मिळाली आणि “फक्त तीन शब्द” लेखमाला मी
लिहिली. वाचकांना खूप भावली. कदाचित आपणही वाचले असतील ते लेख. त्यातले काहीच लेख
इथे देते.
धन्यवाद!
वंदना धर्माधिकारी
लोकसत्ता : चतुरंग पुरवणी : लेखमाला : ते तीन
शब्द :
लोकं काय म्हणतील?
लेखिका : सौ. वंदना विजय धर्माधिकारी
वसंताला,
लहानपणापासून पानाचे दुकान टाकायची हौस होती. खूप शिकला, मस्त करिअर, नोकरी,
छोकरी, पैसा, बंगला, गाडी, मुलं. निवृत्ती नंतर पानाचे मोठे दुकान टाकायला बायकोने
खूप विरोध केला. “पानवाला काय? लोकं काय म्हणतील ते बघं. एव्हढ्या मोठ्या
हुद्द्यावर काम केलं, आणि हे भिकीचे डोहाळे. नाही टाकायचं पानाचे दुकान.” आतला
आवाज, लहान पणापासूनची इच्छा वसंताला स्वस्थ बसू देईना. दुकान थाटले, भलेमोठ्ठे.
खरोखरीच पानाचे दुकान सुंदर चालले. लोकंनिंदेची सुरवातीची भीती त्याला नव्हतीच.
स्वत:ची इमेज जपायची तिची धडपड फोल ठरली, इतरांनी केलेले कौतुक ऐकून कळीही खुलली.
कायम धोतर
नेसणारे बंडोपंत, निघाले मुलाकडे अमेरिकेत. तिथे सुद्धा धोतरच नेसणार असा निश्चय. पण
कसलं काय? तिथल्या थंडीची हुडहुडी. सक्तीने गरम कपडे घातले, जीन्स सुद्धा. भारतात
येताना बायोकालाच दटावले, “कुणाला सांगू नका. नाहीतर लोकं काय म्हणतील? तुम्ही
तोंड बंद ठेवा.” ती नुसती हसली. तिने आणि मुलाने मिळून बंडोपंतांचे फोटो दिले होते
सगळ्यांना पाठवून. मनापासून आवडलेला तो
पेहराव. होती आतली भीती, लोकं काय म्हणतील?.
आपल्या
मनाविरुद्द काही होणार असे नुसते वाटले तरी समाज काय म्हणेल म्हणून नकोसं होतं .
सामाजिक
दडपण उगीचच घेणारे लोकं बरेचदा प्रवासात, गर्दीत कसे करू, कोणी बघेल, म्हणत नैसर्गिक
विधींना जात नाहीत. कोणी काही म्हणत नसते. याचं आपलं, घरी गेल्यावर जाईन म्हणत
बसतात, पायावर पाय घेऊन.
निवृत्तीनंतर
वेळ, पैसा, स्वास्थ्य आणि मोकळीक सगळंच असते. धकाधकीच्या दबडघ्यात अनेक छोट्या
गोष्टी करायच्या राहिल्या. “मी असा टी
शर्ट घालू ?”, “पंजाबी शिवू का ?”, “कधीच मिशी काढली नाही, काळी पांढरी मिशी
चांगली नाही वाटत, आता काढली तर?”, “स्टायलिश राहिले नाही, आता सुनबाई म्हणते जरा
बदला, मी बदलू, मॉडर्न राहू ?” राहा ना हवे तसे. कोणी काहीही म्हणणार नाही.
म्हणाले तर बोलणाऱ्यांचे दात दिसतील, तेही
काळे पिवळे, वेडेवाकडे, घाणेरडे, न घासलेले. समजलं.
राधिकाने
स्वत:चेच ठरवले. सगळं छान. वेगळी जात छळू लागली. घरात सांगायला गेली. केव्हढा गहजब.
“कुठल्या तोंडाने सांगायची त्याची जात. सगळी माणसं काय म्हणतील?.” केवढं दडपण आलं
घरातल्यांना. असं होतेच नेहमी. समीरचा
दणक्यात साखरपुडा झाला. एक दिवस बाहेरून आल्या आल्या समीरने लग्न मोडल्याचे जाहीर
केले. “मोडतोस काय? सगळे लोकं काय म्हणतील?” “ असेल थोडफार इकडे तिकडे. चालवून
घ्यायचे. तोंड काढायला जागा नाही राहणार आम्हाला.” समीर ने स्पष्ट सांगितले, “तुम्ही
आधी मी सांगतो त्यावर लक्ष द्या. लोकं काय, म्हणतच असतात.”
लोकं काय
म्हणतील? अनेकवेळा निर्णयास नेणारा तरीही प्रश्नच. मोठ्ठा स्पीडब्रेकर, प्रगतीतला
अडथळा.
पदोपदीचा
अनुभव, त्रास, वैताग, अनिश्चितता, अपमान, दुख:, भीती. माणसाने माणसाला घाबरायचं?
हवेहवेसे
मिळत नाही, त्याची वेदना, जबरदस्त ओढ, सवय, सारंसारं सोडायचं. आपले नसलेल्या
लोकांसाठी? जीवाच्या आकांतानेच विचारायचे प्रश्न पुन्हापुन्हा स्वत:लाच. दोष
कुणाचा? लोकं म्हणून कोणाला जाब विचारायचा? जर मनातला डाव न बोलताच आपला आपणच
उधळून लावला तर? नंतर रडण्यात काय अर्थ? मनातले
मांडे मनातच. भावनिक आणि व्यावहारिक चढाओढीत व्यवहार सरसावतो. भावना कोसळतात. स्वत:पुरताच
मर्यादित विचार मनातल्या मनात. लोकांना दोष देण्यात काय अर्थ? लोकांना जाणीवही
नसते तुमच्या आतल्या आंदोलनांची. . लोकोपवादाची अनामिक भीती परावृत्त करते
कृतीपासून. काल्पनिक कोशाच्या विचारानेच इच्छांचा
गळा घोटला जातो. नकोचचा पवित्रा, स्वत:चेच
नुकसान. वाईट वाटेल, कायम मनात राहील, किती हवे होते ते मला. भीतीने गाळण
उडते. ‘नको रे बाबा’ नकोच, पळा पळा. केव्हढी ताकद, भीती, धाक, दरारा. कल्पनेनेही घामेघूम व्हावं.
बरेचदा, परिस्थितीची
स्पष्ट कल्पना देण्यात कुठेतरी चुकते. शिवाय सगळ्यांचे स्वभाव, अहं, हट्ट,
अपेक्षा, भूमिका कुठे जुळतात. विचार भिन्न, वागणं तसंच. मानसिकतेचा अंदाज समोरची
व्यक्ती कितपत घेते यावर अवलंबून. फक्त वर वर काय तेव्हढेच बोलले जाते. स्पष्ट
मोकळा संवाद दूर. तुम्हाला एखाद्या गोष्टीची किती गरज आहे? किती ओढले गेलेले आहात?
तुमची इनव्हालमेंट किती? याची जाणीव
इतरांना कितपत असणार? तेंव्हा सुरवातीस जरी विसंवाद वाटला तरीही, मन मोकळं करावं.
नंतर जाणवतेही दुसरी बाजू, तेंव्हाच सर्वबाजूने
विचार केला जातो. आपाल्याच निर्णय क्षमतेवरील साशंकता, अविश्वास, वैचारिक गोंधळ,
इतरांची उदाहरणे, आतल्याआत कुढणं, यांचाच
पगडा जबरदस्त. त्यावरच अपयश लादलं जातं. अनेकवेळा न्यूनगंड बळावतो. ‘यांना घाबरलो’,
म्हणत लोकांनाच दोषी धरून रागराग केला
जातो इतरांचा.. दोष लादून मोकळे. स्वत:ला आणि इतरांना नाकारत फरफट होते आयुष्याची.
तेथेच मत्सराला कोंब फुटतात. कालांतराने ज्यांना तुम्ही घाबरत होतात, तीच लोकं स्पष्ट विचारतात, “ तू असे का
केलेस?” उत्तर नसतेच. ‘मी तुम्हालाच घाबरलो, तुम्ही काय म्हंटले असते?’ असे
विचारता हि येत नाही. निसटून गेलेले क्षण. हाय रे दैवा किती हि वंचना? किती चुटपूट
जीवाला. विचार, चांगलं वाईट, खरंखोट काथ्याकुट केला. लोकं छानछान म्हणतील अशीच मी
वागले. तरी आतल्या काथ्याचे तुकडे
आतल्याआत रक्तबंबाळ करतातच. कमनशिबी, अपयशी? पुन्हा मनस्ताप.
लोकं
म्हणजे, घरातले नात्यातले, मित्रमैत्रिणी, ओळखीचे पाळखीचे, परिचित असे काही
वर्षापूर्वी होते. आता फेसबुक फ्रेंड्स विचारतील. जमाना बदलला, त्यानुसार वार फिराणारच.
तरुणाई जुमानत नाही कोणाला. एकमेकांचे बघून डेअरिंग करायला धाजावतात एकेकजण. प्रत्येक
व्यक्ती समाजाचा भाग आहे, समाजाने आखून दिलेल्या काही नियमांच्या, बंधानाच्या कळत
नकळत मर्यादा असतात. बंधनांचे अवडंबर नको.
त्यात लवचिकता हवी. पाश्चिमात्य देशात निळे कपडे फक्त मुलांचे आणि मुलींचे गुलाबी,
अगदी ठरलेले. कुठल्याही प्रवाहाच्या विरुद्द्ध पोहण अवघडच. तसचं इथेही. वाटतं, एखाद्या
घटनेचा, कृतीचा बोलबाला करायला वेळ आहे लोकांकडे? स्वत:च्यातच मश्गुल राहणारा
समाज, विनाकारण कधीतरी नाक खुपसतो दुसर्याच्या आयुष्यात. तोंडीलावायला पाहिजे
असते,म्हणून बोलतात लोकं. मॉब, घोळका, त्यांची स्मरणशक्ती अल्पकाळ असते, तरीही
तिचा पगडा जबरदस्त. आयुष्याची वाट लावायची ताकद नक्कीच असते यांच्या बोलण्यात.
“लोकं काय
म्हणतील?” याचा बागुलबुवा करू नये. टाळ्या वाजवणारे आणि
नावं ठेवणारे दोन्ही एकच लोकं. आपली इच्छा
पूर्ण करण्याची धडपड हे माणसाचे वैशिष्ट्य. सामाजिक रूढींना शह देणारे कृत्यात हीच भीती पटीने वाढते. “लोकनिंदेला कोण पुसत? लोकं काय म्हणायचेत ते
म्हणोत. मी नाही घाबरणार याला. माझं मी, मला, हवे तसे पाहिजे तेच करणार. ते कोण मला
सांगणारे?” ना धाक, ना कदर, फक्त उन्माद,
अहं, आणि मी. हे चांगले का? नक्कीच नाही. “ लोकं गेली उडत. त्यांना काय
करायचे”, असेही म्हणून वाट्टेल तसे बेभान,
वेडेवाकडे, असंस्कृतपणे, वागूहि नये. हल्ली तर लोकांची भीतीच कमी होत चालली आहे.
कोणीच कोणाला काहीही बोलायला, सांगायला जात नाही. कशाला मध्ये पडा, बघ्याची भूमिका
चांगली. ते हि बरोबर नाही. थोडा धाक, सामाजिक बंधने हवीतच.
करायचं तरी
काय? समाजविघातक काही करीत नाही ना? हा पहिला प्रश्न. दुसऱ्या कोणावर अतिक्रमण,
सक्ती, जोर जबरदस्ती, त्रास, नुकसान, खून, दरोडा, बलात्कार, लांडीलबाडी,
चोऱ्यामाऱ्या, फसवणूक अशी विघातक कृत्ये मी करीत नाही, याची खात्री हवी. नंतर मनातल्या
इच्छेला समोर पिंज-यात उभं करून उलटसुलट प्रश्न आपले आपणच विचारावेत. हजारदा
शहानिशा करावी आपल्या निर्णयाची. कोणासही न घाबरता घेतलेला पक्का निर्णय, त्याचे
परिणाम, त्रास, यश स्वीकारायची मानसिकता हवी. लोकोपवादाला तोंड द्यायची हिम्मत,
परिपक्वता हवी. इतरांचे टक्के, टोमणे, घालून पाडून बोलणं कानावर पडत असताना आपल्या
मनासारखे करता येणारे आंतरिक बळ हवेच. सारासार सर्वबाजूंनी विचार, सल्लामसलत, समुपदेशन
करून साधायचा असतो मध्य प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक वेळी, प्रत्येकाने.
प्रसंगसाक्षेप बदलतो निर्णय, मानाजोगा, किंवा विरुद्ध. म्हणूनच म्हणतात ना, ‘ऐकावे
जनाचे करावे मनाचे.’ मंग कशाला घाबरायचे?
वंदना
धर्माधिकारी
M : 9890623915
,