लोकसत्ता : चतुरंग : लेखमाला : फक्त तीन शब्द
‘कशी आहे मी?’
लेखिका : सौ.वंदना विजय धर्माधिकारी
“धावत येऊन विचारला आरशाला प्रश्न
बावळट, मूर्ख, तर कधी वेडी शहाणी
घरातल्या साऱ्यांचीच मते किती
भिन्न
मला नाही समजत, मी होते सुन्न
अशी का तशी? कशी आहे मी?
तू सांगशील तेच खरं, तेच मला
मान्य”
या चिमुरडीला प्रश्न पडायचे कधी सोपे कधी अवघड. उभी
रहायची आरशापुढे. आरशातली ‘ती’ गोष्टी सांगायची. काहीतरी मिळताचं स्वारी खुशीत
खेळायला धावायची. आरशात असतं प्रतिबिंब, त्याच्याशी संवाद? त्यानं काय होत?
प्रश्न्नाच उत्तर सापडतं?
“आई गं ...” जोराची हाक ऐकताच शांताबाई दचकल्याच.
काय झालं म्हणत आवाजाच्या दिशेने पळाल्या. खोलीच दार नुसतं ढकललेलं. साडेतीन
वर्षाची अलका आईला पाहताच बिलगली. मोठ्ठा भोकाड पसरला. बाबांनी आणलेला मोठ्ठा
पावडरचा संपूर्ण डबा आपल्या अंगावर ओतला होता, आणि ‘मी कशी दिसते’ बघायला आरशासमोर
जाताच घाबरगुंडी झाली.
“इतकी पावडर ? हे काय ?”
आईने पदरानंच तोंड पुसलं.
वाहतं नाक फुरफुरलं “ ताई
पावडर लावून गोरी झाली ना. म्हणून मी” उंउं ....
“ असं नसतं राणी.”
“ होच मुळी. सगळे म्हणतात काळी काळी अलका. मी
पावडर लावणार.”
शांताबाईना गलबलून आलं. “तू काळी आहेस, म्हणून
जास्त छान आहेस. लाडोबा आहेस माझी.”
झरकन अलकाला कुशीत ओढलं, पापे घेतले. तेंव्हाचं
ते आईने कुशीत घेणं, पापे घेणं, लाडोबा जाहीर करणं तिला आयुष्यभर पुरलं. अलकाने आपला
काळा रंग इतक्या लहान वयात स्वीकारला. जे आपण बदलू शकत नाही त्याचा बिनशर्त
स्वीकार हवाच. वाड्यात कुठूनही ‘ये काळे’ अशी हाक येताच ‘आलेच रे’ म्हणून धावयाची
जोमानं.
कुणी कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व
आहे. ते शक्य नसेल तर जास्तीतजास्त कसं नसावं हे नक्कीच अत्यंत महत्वाचं असतं. कसं
नसावं हे कोरूनच सुंदर घडवायचे असते स्वत:ला आयुष्यभर. “मी कशी/कसा आहे?” याचं
मोजमाप रंगरुपापेक्षा स्वभाव आणि वागणूक यानेच मोजलं जाणार याची तीव्र जाणीव माणूस
बनायची पहिली पायरी म्हणावी. मनातलं आपलं
दर्शन धूसर असतं. तेथे प्रतिमा नसते, चेहराही नसतो. असतात फक्त शब्द. ‘मी शहाणी
आहे’, ‘मी धीट आहे’, अशी विशेषणे चिकटवली जातात. विचार घोळवले जातात आणि प्रश्न
पडतो “खरचं मी तशी आहे का?” याला ‘हो’ म्हणताना पटकन ‘नाही’च पुढं येते. ‘हो’
म्हणून घ्यायचेचं असेल तर नक्कीच चुकीच्या वागण्यात सुधारणा केली जातेच. तरचं ‘मी
एक चांगला मुलगा आहे’. हे वाक्य उच्चारले जाते. चांगले विचारांच्या अनुषंगाने
आपल्या आंतरिक शक्तीला नक्की काय हवे याची जाणीव होते. आपोआप वागणं, बोलणं
चांगुलपणाकडे झुकू लागते. निर्भीडपणे स्वत:च्या प्रतिमेच्या नजरेला नजर भिडते आणि
सुधारायची प्रक्रिया सुरु होते. त्याचक्षणी शब्द उमटतात, “मी अशी आहे, यापेक्षा
मला असं व्हायचं, काय काय करू” प्रश्नांकित चेहरा आरसा वाचतो, बघताबघता मार्ग
सुचतो. यामध्ये सातत्य लागते,
मार्गदर्शनाने इप्सित लवकर साध्य होते.
बदलापूर्वीचा स्वस्वीकार खूप मोलाचा असतो. आपणच आपल्याला
नाकारलं तर प्रगती होणारच नाही. जो स्वत:वर प्रेम करू शकतो, तोच इतरांवर प्रेम
करेल. दुर्गुणांसह स्वस्वीकार असलेला सहज इतरांना त्यांच्या दोषांसकट आपलेसे करू
पाहतो. मन फार रगेल असतं, वरवर म्हणतं, ‘बरं,
मी बदलेन.’ पण प्रत्यक्षात अवघड जाते. स्वस्वीकारात श्रीगणेशा असतो. आपली
श्रद्धास्थाने मनोभावे पुजली जातात. माझ्यातील
दोष, कमीपणा, नकारात्मकता, सर्व मर्मस्थाने मीच उत्तम जाणू शकतो. स्वत:चे वाईट
वागणे आरशातील प्रतिमेला नजर भिडवू देत नाही. वाईटचा त्याग हवाच, म्हणता स्वच्छता
मोहीम घेतली जाते. जिद्द घट्ट होताना,
आत्मपरीक्षण होतेच. मी इतर कुणाला आवडो, अथवा ना आवडो. पण मी मला आवडलेच पाहिजे.
मला माझ्या नजरेला नजर भिडवता आलीच पाहिजे. इथेच ध्येयाची वाट सापडून मार्गक्रमणा
सुरु होते. प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारे, मुळापासून हलविणारे क्षण
येतातच अधून मधून. तेच गुरु बनतात. असे कोणीतरी येईल आणि मी बदलेन असे म्हणून चालत
नाही. गुरूच्या भूमिकेत कधी घरातली, जवळची
माणसे तसेच एखादा प्रसंग, पुस्तक, घटना, सिनेमा, वा अन्य काही येऊ शकते. बदलाच्या
वाऱ्याला दिशा दिली जाते सगळ्यांकडून. सद्सद्विवेकबुद्धी जागृत केली जाते. बरेचदा परिस्थिती
आड येते. आत्मबळाची कसोटी साशंक होते. एक मात्र चांगलं आहे. आपल्या अपयशाचं, असल्यानसल्याचं
खापर देवाच्या माथी फोडायला आपण तयार असतोच
सदोदित. आणि तो देव, कसे ही असलोत आपण तरी स्वीकारायला राजी असतोच.
तरुण संदीपचेच बघा. काय झाल? तो आळशी, झोपाळू,
अभ्यासातही बेताचाच. कायम घरच्यांची बोलणी खाणारा. एकदिवस जोरचं वाजलं घरात.
वडिलांनी पूर्ण तोंडसुख घेतलं. आईने फोडणीही घातली. हाणूनपाडून वाट्टेल तसे बोलले.
संदीपला अपमान असह्य झाला, त्याचाही पारा चढला, “ मी आहे हा असा आहे. त्यात माझा
काय दोष? तुम्हीच वाढवलेत कायकाय खाऊपिऊ घालून. त्यावर तर पोसलो मी. आणि तुम्हीच
ओरडता माझ्यानावाने. काही सांगू नका मला. तुम्हीच जरा आरशात जाऊन बघा स्वत:ला.”
मुलाचं वक्तव्य ऐकून आईबाबा वरमले, काहीतरी कुजतयं आपल्यातच दोघांनी जाणलं.
मोठ्यांच्या चुकांची कबुली लहानांकडे कशी द्यायची? दोघे गप्प बसले. संदीपने “माझा
मीच शिल्पकार होणार” असे ठरवले. बाथरूमचे दार
बंद करून घेतलं. बसला आरशात स्वत:ला बघतं. संताप निवळला. काहीतरी फेकून द्यायचं निश्चयाने
ठरवलं, तेंव्हाच काहीतरी कोरायचं पक्क झालं. मनावर घेतलं तर नक्कीच मी मला हवा तसा
होऊ शकेन, हे जाणवलं. यासाठी सातत्याने प्रयत्न करायचे ठरलं. घाण साफ करायची
म्हणताच मस्त शॉवर घेतला, झुलपं उडवली,
तुषारांनी अर्वांगावर उत्साहाचे रोमांच
उभे राहिले, मंद शीळ घुमली आतबाहेर. “मी इतरांना आवडतो की नाही, हे मला माहित
नाही. पण मला मी नक्कीच आवडेन असेच मी वागणार, करणार. मी चुकलो असेन, पण मी मनाने वाईट
नाही. एक चांगला माणूस बनून दाखवेन सगळ्यांना. विश्वास ठेवा माझ्यावर. ठेवला विश्वास
तर मी लवकर फुलेन. इतकचं.”
आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रीयांना
स्वत:ला घडूच दिलेलं नाही. कुजतात बिचाऱ्या. बायकांना कोंडलं जातं घरात. घरकाम, चुलमूल
यातच आयुष्याची इतिश्री होते. काहीजणींच्या आयुष्यात अचानक सर्व जबाबदारी घ्यायची
वेळ येते. उत्तम तऱ्हेने घरदार, मुलं, संसार, व्यवसाय, नोकरी सारेकाही सांभाळतात.
त्यांनाच आश्चर्य वाटते की मी हे करू शकते? सांभाळू शकते? मग, पूर्वी का नाही करू
दिलं मला? नुसती कठपुतली म्हणून पुढेमागे नाचले. स्वत:चाच राग येतो अशावेळी. इथे, ‘मी
कशी आहे’, हे एखाद्या स्त्रीने ओळखले असले तरी ती ते करू शकत नाही ही एक शोकांतिका
आहे. आज आपल्याच देशात राजकारणासह अनेक
क्षेत्रात विधवा महिलांचे योगदान मोलाचे दिसते. स्त्रीशक्तीचा स्वीकार होत नाही, तिला डावललं
जाते. स्त्रीला चांगल्या पद्धतीने जगूच देत नाहीत. स्त्री फक्त स्वत:ला प्रश्न विचारीत
असते, तेही आतल्याआत. ‘मी कशी आहे, मला असं व्हायचंय... पण, हे नाही म्हणतात’ आणि
गाडी थांबते.
आपलं काय होतं? जागेपणी दुसऱ्याचाच विचार करतो
कायम. शब्दांची रेलचेल नुसती. त्याऐवजी आपलंच मन वाचलं तर? कधीकधी राहावं आपण
एकटेच, गोंगाटापासून दूर. मनापासून पुसलं जातं माझं मलाच. नव्याने आपलंच एखादं
रहस्य उलगडतं. सापडतात काही लपलेले खजिने, धावता धावता खाली गाडलेले. उघडली जातात भारलेली
तावदाने, चकाकतात पैलूदार हिरे. दिपून जातात डोळे तेजाने. आश्चर्य वाटलं तरी
विश्वास बसतो त्यावर. हे माझेच धन आहे. वर्षानुवर्षे बघितलंच नाही, त्या गुणांचे
आस्तित्व मला जाणवलं देखील नाही. चुकलं माझंच, दुर्लक्षच केलं मी माझ्याकडे. आता
मात्र मी फुलणार. आणि हसून सांगणार त्याला
‘मी अशी सुद्धा आहे. सुंदर सुंदर!!’
असं असलं तरीपण. “मी कशी/कसा आहे”, हे
दुसऱ्याला आपणहून सांगायची गरज नाही. का म्हणून सांगत सुटायचं जगाला आपल्याबद्दल? त्यातल्या
गोष्टींचं इतरांसमोर प्रदर्शन नसतं मांडायचं. माझ्यात काही अदभूतही असेल, इतरांना
न उलगडणारं, न समजणार. अशावेळी सांगितलं सगळ्यांना तर कदाचित खोट वाटेल, चेष्टा करतील माझीच. काय
सांगा, माझा आत्मविश्वास डळमळेल. आपणच खोटे ठरू. कोणालाही सांगायला नकोच.
लाखमोलाचं माझं मीपण माझ्याजवळ. सांभाळेन माझं आत्मभान. मला मी आवडते. खूप प्रेम
करते माझ्यावर. छान आहे मी!!!
वंदना धर्माधिकारी
vandana10d@yahoo.co.in
.