शताब्दी दीपांकांची : श्री
सर्वोत्तम दिवाळी अंक २००८ :
“दिवाळी अंक” ही मराठी माणसाची गरज, आवड आहे, फराळाची चव आहे. इतकेच नव्हे दिवाळी
अंक वाचणे हे त्याचे प्रेम आहे साहित्यावरचे. ती मराठी मनाची मिजास आहे. मिजास
म्हणण्या इतके वैविध्य, अविष्कार, साहित्य, काव्य, व्यक्तिमत्वे, विनोद, पदार्थ,
दौरे आणि बरेच काही मराठी दिवाळी अंकांतून दरवर्षी मराठी मनाला श्रीमंत बनवीत
असते. शतकानुवर्षाचा अंकांचा प्रवास फक्त मराठीत आहे. इतर भाषांनी याचे अनुकरण
करून अंक काढायला सुरवात केली, परंतु त्यांची संख्या केवळ बोटांवर मोजण्या इतकीच
आहे. आपुल्या ज्ञानियाच्या म्हराठीत मात्र प्रतिवर्षी ५०० हून अधिक अंक निघतात,
काही बंदही होतात, तसेच नवीन येतातही. पण एकुणातला आकडा असाच असतो.
दिवाळीच्या विविध पदार्थांच्या
चविष्ट चटपटीत गोड फराळा बरोबर दोनचार अंक घरात येतातच. आता, इंग्रजी माध्यमांच्या
मम्मी पप्पांच्या घरात कदाचित नसतील येत. त्यांना सांगावेसे वाटते, मराठी आहात ना,
घातलं ना मुलांना इंग्रजी शाळेत, मग, निदान दिवाळीच्या सणाला तरी आपल्या भाषेचे
काहीतरी वाचायला घरात आणा. तुम्हाला हवे त्या विषयाचे विशेषांक देखील असतात. बालसाहित्य,
तरुणाई, वार्धक्य, पर्यटन, आरोग्य, विनोद, बदलते जग, अगदी फक्त इतर देशातील अनुभव,
मॉडर्न जीवन, असे एकेका विषयाला वाहून घेणारे वैशिष्ठ्यपूर्ण अंक काढले जातात. अनुभवातून
काही शिकायचे असते तेंव्हा इथे तर त्यांची रेलचेल असते म्हंटल तर चुकीचे होणार
नाही. दहाबारा अंक वाचल्यावर लक्षात येतील हे बोल.
आपल्याच भाषेचे हे जगा वेगळेपण आपणचं
जतन करायचे आहे. मराठी माणसाचे कर्तव्य
आहे असे म्हणावेसे वाटते, त्यासाठी दिवाळी अंक घेत जा, वाचत जा, खूप छान छान अंक
येतात.
‘लोकसत्ता – लोकरंग’ मध्ये याच विषयावर माझा दीर्घ लेख आला होता. खूप
गाजला तो लेख साहित्यिक विश्वात. काहींनी त्यातला काही मजकूर त्यांच्या दिवाळी
अंकांत टाकला होता.
१९०९ मध्ये ‘मनोरंजन’ दिवाळी
अंकाने सुरवात केलेली ही साहित्यिक दिवाळी आहे. त्यांचा शताब्दी वर्षात २००८ साली
इंदोर येथील ‘श्रीसर्वोत्तम’ दिवाळी अंकात मी लिहिलेला ‘दिपांकांची शताब्दी’ हा
अभ्यासपूर्ण लेख जरूर वाचा. आणि हो.... मी सांगितलेले ते... दिवाळी अंक दरवर्षी
दिवाळीत घ्यायचे, भेट द्यायचे, वाचायचे, आणि मराठीला वाढवायचे. हे लक्षात ठेवा
म्हणजे ठेवा. एकदा याही फराळाची चटक लागली, की म्हणालं, “दिवाळी अंकांशिवाय दिवाळी
साजरी केली जात नाही.”
वंदना धर्माधिकारी