“… आणि म्हणूनचं गं!” : लोकमत सखी मंच कार्यक्रम : १८ मे, २००८
कविता केल्यावर दुसऱ्याला वाचून दाखवायची घाई प्रत्येक कवीला असतेच. तशीच
मलाही आहेच. असे आहेत काही प्रथम श्रोता
होणारे, ऐकवीत असते त्यांना. खूष व्हायला होतं आपल्या कवितेला दाद मिळाली की!
अशीच एक संधी मला चालून आली. लोकमत सखीतर्फे चिंचवड, मोरे सभागृहात माझ्या
कविता सादरीकरणाचा कार्यक्रम ठरविला गेला. प्रायोजक होते, ‘चंदुकाका सराफ,पुणे’.
त्यांनी चिंचवडला शाखा काढली, तेंव्हा त्यांनी प्रायोजकत्व दिले, आणि मी कविता
सादर केल्या. नुसत्याच माझ्या मी नाही सादर केल्या, तर तबला पेटी, सिंथ सायझर,
गायिका असा सगळा गोतावळा घेऊन मस्त तयारीनिशी दोन तासांचा कार्यक्रम केला.
संगीतकाराने नव्याने काहींना चाली लावल्या होत्या, आधी बरीच प्रक्टिस केली होती.
त्याने उठावदार कार्यक्रम झाला. सगळ्यांना आवडला होता.
“... आणि म्हणूनचं गं!” माझी बँकेला उद्देशून केलेली कविता. प्रत्येक कृतीमागे
काहीतरी कारण असतेच. हे हे असं आहे म्हणून मी तसं करते. तेच या कवितेत मी व्हीआरएस
घेताना बँकेला सांगितले होते. माझं असे असे आहे म्हणून मी घरी राहते. त्याच नावाने
माझा कविता संग्रह आहे. “… आणि म्हणूनचं गं!” पुस्तक आलेल्या सर्व महिलांना भेट देण्यात आले.
मधून मधून अगदी एकटी देखील माझ्या कवितांचा कार्यक्रम मी करते. आवडते मला
तेही करायला.