दूरस्थ बाळास
कवयित्री :: सौ.वंदना विजय धर्माधिकारी
एखादा कार्यक्रम रंगतो,
सगळ्यांना आवडतो, पण सादर करणाऱ्याला काहीतरी आपलं चुकलं असं वाटतं राहतं. माझेही
असेच झाले. रिचमंड, अमेरिका यांच्या महाराष्ट्र मंडळात माझा “ ...आणि म्हणूनचं
गं!” कार्यक्रम ठरवला होता. अनेक कवितांपैकी पुढील कविता मी सादर केली.
प्रेक्षकांमध्ये माझी मुलगी आणि जावई होतेच. त्यांच्याकडे न बघता, किंबहुना अगदी
शेवटी समोरच्या भिंतीकडे बघून मी ती गाऊन सादर केली. तशी मी सरावले होते कविता
सादरीकरणाला. माहोल, एकदम गंभीर झाला. बरेच जण उठून बाहेर निघून गेले. कविता
संपली...निश:बद्ध शांतता. मी अनेकांना रडवलं होतं. हे माझ्या कवितेचे, गायकीचे यश
होतं.... माझा हात हातात घेऊन, अक्षरशः खांद्यावर डोकं टेकवून काही रडले. मोकळे
झाले म्हणते मी. म्हणाले, “काकू, आज कितीतरी वर्षांनी मी रडलो. तुम्ही रडवलंत
आम्हाला>’
नंतर, मलाच वाटलं, असे
होऊ शकते हे माहित असताना काय गरज होती ही कविता जरी त्यांच्यावर असली तरी सादर
करायची. आणि सगळ्यांना रडवायची.... मी काय करणार. कविता गायन झालेले होते. मीही
हालले होते.
पण, एक सांगते ही कविता
केली तेंव्हा माझ्या मुली इथेच माझ्या जवळ होत्या. भा.रा.तांबे यांच्या कवितांचा
कार्यक्रम होता. खूप छानछान कविता झाल्या. पण, “कळा ज्या लागल्या जीव’” याने माझा कब्जा घेतला. गाडीवरून १५/२० मिनिटाचे अंतर
येईस्तोवर मनात कविता तयार झाली. मधेच सिग्नलला थांबले असताना मैत्रिणीला फोन केला,
“ हे बघ, मी आत्ता लगेच येत आहे. मला भा.रा. तांबे यांची कवितांची असतील ती
पुस्तके काढून ठेव. मी नेणार आहे. आलेच मी” पुस्तके घेतली. साहजिकच घरी यायला उशीर
झालेला. वातावरण कसे ते वेगळे सांगायला नकोच. स्वयंपाक जेवण उरकली. आवरलं. आणि
कविता काढली. माझे शब्द घोळवीत होते. त्यांना स्थानापन्न केलं. पोटातून आलेल्यांना
गळ्यातून अलगद खाली उतरवलं. मस्त धुंदीची रजई घेऊन झोपी गेले.
अशा प्रत्येक कवितेच्या जन्मकथा असतात..
तर ...ऐका “दूरस्थ बाळास”... नव्हे... इथे
नुसतेच वाचा.
कधीतरी कार्यक्रमात हे गीत मी रेकोर्ड करून मग
इथेही टाकीन. नक्कीच.
कवीवर्य भा.रा.तांबे यांच्या
अनेक कविता मराठी मनात घर करून आहेत. त्या गुणगुणल्या जातात. त्यांची अशीच एक
कविता ‘ कळा ज्या लागल्या जीव’ याच्या चालीवर मी
टाकलेले शब्द म्हणजेच ‘दूरस्थ बाळास’ ही माझी कविता. मी ही कविता
चालीवर गावून सादर करते, तेंव्हा अनेकांचे डोळे पाणावतात. तेंव्हा, माझ्या कवितेचे
चीज झाले असे मला वाटते.
कळा ज्या लागल्या
जीवा मला की ईश्वरा ठावा
कोणाला काय हो त्याचे कोणाला काय सांगाव्या........याच चालीवर माझे शब्द
नयनी का लागल्या धारा
कोंडला जीव का प्यारा
कुठे तू दूर देशी त्या
तेथला येईना वारा
मनाला खेचितो मागे
तुझा तो धिंगाणा प्यारा
कोठे गेल्या तुझ्या वस्तू
पसारा संपला सारा
घास हा आडतो कंठी
तुझी ही लाडकी भाजी
करू केंव्हा मी तुजसाठी
जेवण्या मित्रपरिवारा
पांघरुनी घेशी कां रोज?
दिलेली तुजसी मऊ साडी
हाती बनवून ती दुलई
घराचा देई उबारा
कशी मी समजवू मजला ?
वाहुनी कोरडे डोळे
कसा रमला तू त्या देशी ?
तुटे कधी आकाशी तारा ?
वंदना धर्माधिकारी