सल
कवयित्री : सौ.वंदना विजय धर्माधिकारी
जे जे राहिले ते ते करायचं
आता कोणाला नाही घाबरायचं
स्वप्नातले चित्र आता सत्यात आणायचं
आणि हिच्या वाढदिवसाला सरप्राईज द्यायचं
आजोबांनी ठरवलं सर्वांना बोलावलं
नातवंड पतवंड झाली सारी गोळा
आल्या लेकीसुना नातजावई नातससुना
‘हे कशाला आले?’ आजीला काहीच कळेना
आजोबांची इंट्री होताच सगळे झाले स्ट्यॅच्यू
‘हे काय काहीतरी?’ बोलू लागले कुचूकुचू
नको ते धोतर, नको तो सदरा
नको ते टोपी अन नको तो सूट
डार्क जीन्स अॅण्ड कलर टॉप
फॅशनेबल हॅट आणि मॅचिंग बूट
छोट्यांच सुटलं भान
लागले हसायला खो खो
मोठ्यांना आलं उधाण
पण, ग्र्ँडपाला वाटलं ब्रेव्हो!
हाती घेऊन फुल, गुडघ्यावर बसून
टाकली तिरपी नजर, आजोबांनी
“I
love you daring! I love you darling!!”
चा आजोबांनी केला गजर
आजीला झालं कसंचंचं
पिकली मोठी खसखस
आजोबा म्हणतात आजीला
“तू माझ्या जवळच बस.”
खाणपिणं सारं उरकलं
झाली सगळीकडे सामसून
आजोबा जवळ येतात
पण, आजी मात्र गुमसून
बाईचीच जात, पोटात थोडंच राहतं
मनात आलं की ओठावर नाचू लागतं
आज आजीबाई असं काही बोलून गेल्या
आजोबांना पूरतं हरवून गेल्या
“आवडलं रे आवडलं, तुझं आजचं रूप
आवडलं
या रुपात स्वप्नी तुला मी खूपखूप
न्याहाळलं
बसं, आता मी काय सांगते ते ऐक.....
अरे, तुझ्यामागे बाईकवर बसायचं
राहिलं
वाऱ्याच्या गतीसंगे पलायचेच राहिलं
तासंतास नेट चॅट करायचेच राहिलं
एसएमएस वर निरोप धाडायचेचं राहिलं
डान्स पार्टीत तुझ्यासवे नाचायचं
राहिलं
हल्लीच्या पोरीगत खूप भांडायचं
राहिलं”
“अरे, काय सांगू, काय काय राहिलं
हे राहिलं, ते राहील, ते ते देखील
राहिलं
पण, जाऊ दे ते आता, जे राहिलं ते
राहिलंच
तुला सारं सांगून त्यातच समाधान पावलं”
“पुढच्या महिन्यातल्या तुझ्या
वाढदिवसाला .......”
“कुणालाही घरी मी बोलावणार नाही
अन, इकडची कडी तिकडे करणार नाही.
सकाळीच आपण दोघे बाहेरच जाऊ
छानश्या हॉटेलात निवांत राहू
संसाराच्या आठवणीत भिजून जाऊ
चुकले माकले कढ काढीत रडून घेऊ”
संध्याकाळी मात्र आपण घरीचं यायचं
आपल्याच घरात आपलं होऊन राहायचं
तिन्हीसांजा..................
तिन्हीसांजा मी तुला औक्षण करीन
हं....तिन्हीसांजा मी तुला औक्षण
करीन
काय माहित तू आधी जाशील का मी आधी
जाईन?
पण, एव्हढे मात्र खरं अगदी
खात्रीने सांगते
तुझ्या वाढदिवसाच्या औक्षणापर्यंत
मी नक्कीच राहते.
तुझ्या वाढदिवसाच्या औक्षणापर्यंत
मी नक्कीच राहते.
वंदना धर्माधिकारी
माझा मास्टर पीस